यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
हिन्दु धर्मात पूजनीय असलेल्या भगवत गीतेत श्री कृष्णने पुन्हा अवतार केव्हा घेईन ते स्पष्ट केले आहे . सध्या देशातील आणि देशाबाहेरील स्थिती पाहता 'अवतार ' लवकरच जन्म घेणार असे राहून राहून वाटते . . असेच काहीसे वाटत असताना विचारांच्या तंद्रीत आकाशात साचत असलेल्या ढगांकडे सपशेल दुर्लक्ष करून मी बाहेर पडलो . . आल्फ्रेड हीचकॉक हयात असते तर ' अरे हाच तो रस्ता जो मी अनेक वर्षे शोधत होतो ' म्हणून एखाद्या भयपटाची निर्मिती करून टाकली असती .दुपारच्या ४ ला चक्क अंधार , सोसाट्याचा वारा , पानांपासून ते पदरा पर्यंत हवेत उडणाऱ्या अनेक गोष्टी , हेडफोन वरून कमाल आवाजात कमालीचा ठेका असलेले गाणे ऐकत असतानाही कानाच्या पदद्यावर आदळणारा वीजा फुटल्याचा आवाज , मधूनच कडमडत जाणारे कुत्रे , कावरे बावरे होऊन झिग झेग पाळणारे मांजर , माणसांची धावपळ पक्षांची फडफड . . . हे सगळे माझ्यासाठी नाही असे समजून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पचाक पचाक पावले टाकत , कपाळावर साचलेल्या पावसाच्या थेम्बाना बेफिकीरीने उडवत ,हाफ चड्डीतले एक पोट्टे फुल एटीट्युडने समोर सरकत होते . . कदाचित कोलंबस चे गर्वगीत वाचून आले असावे . . पोट्टेच ते त्यात दखल घेण्या सारखे काय ? जो पोट्टा एका हातात अक्खा किल्ला घेऊन पुढे सरकत असेल त्याची 'दखल ' घ्यायची नाही ? मला तर कृष्णाने सुदर्शन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली . . देवा . . घेतलास अवतार अखेर तू . . दिसले रे बाबा . . तुझे पाय खड्ड्यात दिसले . . मी नमस्कार करणारच होतो . . तेवढ्यात आडोशाला माझ्या शेजारी थांबलेलं म्हातारं सवयीने खाकरलं अन मी भानावर आलो . . एक नमस्कार वाचवला जेष्ठाने . . दिवाळीत ना, 'चव बघ ' म्हणून पोटभर खायला घालतात त्याने अशी सुस्ती आणि गुंगी येते । असो . . सांगायचा मुद्दा असा . . त्या पोट्ट्याच्या हातातला पीओपी चा लहानसा किल्ला बघून मला माझ्या लहानपणीचा मातीचा अन शेणाचा किल्ला आठवला . . उचलता न येणारा . . वर्षभर फडताळावर ठेवता न येणारा . .
मला लहानपणापासून किल्ला म्हणजे एकवचन आणि किल्ले म्हणजे अनेकवचन हे 'व्याकरण ' बरोबर मानले तर एका पन्हाळा किल्ल्याला 'किल्ला पन्हाळा ' असे न म्हणता 'किल्ले पन्हाळा ' असे का म्हणतात हे समजलेच नाही . कोणीतरी माझे अज्ञान दूर करावे . . . एका दिवाळीला एक असे अनेक किल्ले मी आजपर्यंत तयार केले . . टेहळणी बुरुज बांधले , राजमाच्या बांधल्या ,कोंढाण्यावर तानाजीला चढता यावे म्हणून सुतळीची घोरपड केली . बाजीप्रभूंचे बलीदान दाखवायला जुने मावळे हात ,पाय ,मुंडके तोडून धारातीर्थी पाडले . . प्रसंगाचे समजावे म्हणून कोयरीत ठेवलेल्या कुंकवाचे पाणी रक्त म्हणून मावळ्यांवर शिंपडले . (कोयरीत 'दो चुटकी सिंदूर ' सुद्धा शिल्लक न ठेवल्याने आईचा मारही खाल्ला ) नारळाच्या करवंटीची विहीर करून त्यात प्लास्टिकच्या मगरी , सुसरी ,कासवं सोडली . . बाबांच्या दवाखान्यातून भरलेल्या सलाईन च्या बाटल्या आणून त्याच्या पाईप मधून कारंजे उडवले . राज्यांना गडावर जायला पायघड्या नकोत का ? म्हणून गडाच्या अनेक ठिकाणी वळणे घेणाऱ्या ( सरळ रस्ता केला तर गडाखाली एकाच वेळी एकत्र जमलेले शास्ताखान ,आफ्जुल्खन ,सिद्दी जोहर सरळ सिंहासनापर्यंत नाही का जाणार ? ) रस्त्यावर सकाळ संध्याकाळ बागेत फुललेला टपोरा गुलाब खुडून त्याच्या पाकळ्या अंथरल्या . किल्ल्या भोवती तट खणून त्यातून कापरावर का कशावर चालणाऱ्या बोटी फिरवल्या . समुद्र वाटावा म्हणून किलोभर पांढरी रांगोळी पसरून त्यावर पावशेर निळी रांगोळी भुरभुरली . मोहरीच्या वाट्या ओतून किल्ला हिरवागार केला . . . हे सगळे मला का करता आले ? माझ्या कल्पनाशक्तीला वाव का मिळाला ? मी पुस्तकात वाचलेला इतिहास , बालेकिल्ला म्हणजे काय , टेहळणी बुरुजाचे महत्व ,त्याचे स्थान , तोफ कोठे लावावी ,मावळे कोठे तैनात करावेत इ . बारकावे का समजले ? कारण माझा किल्ला मातीचा होता , . माझ्या कल्पनाशक्तीचे स्मारक होता . .
मातीचा किल्ला करताना एक फायदा असतो, माती मिसळायची आणि मातीत मिसळायची सवय लागते . माती आपलीशी वाटू लागते . चिखल सहन होतो . . . पीओपी च्या साचेबद्ध किल्ल्यात हे होते का ? मुळात साचा आला की बद्धता येते . साचा करण्यापुरती कल्पनाशक्ती वापरली की कल्पना आणि शक्ती साचून राहते . 'मला वाटले ' म्हणून बदलता येत नाही . बदलावे म्हटले तरी मुदलाला परवडत नाही . आयुष्यात एकदा साचा आला की संस्कार अन संस्कृती लोप पावते आणि व्यावसायिकता जन्म घेते ..ज्या गोष्टी मनातून यायला हव्यात त्या खिशातून यायला लागल्या की त्याची 'किंमत ' ठरते . अमुल्य आणि अप्रूप या शब्दांचे भाव एकाचवेळी अदृश्य होतात. . ' अरे पन्नास किल्ले पाठवून दे रे ' अशा सुरात 'ऑर्डर ' ऐकताना 'किल्ला ' हा शब्द ऐकल्यावर जे भव्य ,दिव्य ,राकट ,रांगडे , अजिंक्य स्वरूप डोळ्यासमोर येते ते दिसत नाही . . तसेही 'ऑर्डर ' करून जे मागवून घेतो ते सगळेच मनाला रुचते आणि बुद्धीला पटते म्हणून कोठे घेतो ? पर्याय नसतो म्हणून समोरच्या ४ पर्यायातला त्यातल्यात्यात बरा आणि परवडेबल पर्याय (चरफडत ) स्वीकारतो . . म्हणूनच माझा पीओपी किल्ल्यांना माझ्यापुरता विरोध आहे . कोथिंबीरीच्या पेंडीच्या मुळाला मातीचे लहानसे ढेकळाला (चुकून ) हात लागला तर 'इनफेक्षन ' होईल म्हणून हात धुणाऱ्या अन संध्याकाळी 'काळजी ' म्हणून इनजेक्श्न घेणाऱ्या पोरांनी मातीत खेळले पाहिजे . लोळले पाहिजे . संपूर्ण अंग चिखलमय झालं पाहिजे . दगड मातीचा किल्ला कसा होतो ते अनुभवले पाहिजे . 'मी बनवला ' म्हणून मिरवले पाहिजे . किल्ला तोडताना डोळ्यात अश्रू तरऴले पाहिजेत . . म्हणूनच मातीचा किल्ला मनाजवळ जातो आणि पीओपीचा किल्ला केवळ डोळ्यासमोर राहतो . . . सगळ्यात वरच्या रांगेतला डावीकडून तिसरा काय 'सोलिड ' आहे ना ? म्हणून . . . .
छान लिहिलय!! <<पोरांनी
छान लिहिलय!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<पोरांनी मातीत खेळले पाहिजे . लोळले पाहिजे . संपूर्ण अंग चिखलमय झालं पाहिजे . दगड मातीचा किल्ला कसा होतो ते अनुभवले पाहिजे . 'मी बनवला ' म्हणून मिरवले पाहिजे . किल्ला तोडताना डोळ्यात अश्रू तरऴले पाहिजेत .<< हे खुप भावलं.
आवडलं! आता पीओपीचे किल्ले
आवडलं!
आता पीओपीचे किल्ले देखील मिळू लागले?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
छान लेख. मला त्या गवळणी,
छान लेख. मला त्या गवळणी, मावळे फार आवडतात. महाराजांचे एक चित्र मी जपून ठेवले आहे व ते आता वीकांताला नीट रंगवून डिस्प्ले करणार आहे.
अगदी माझ्या मनातलं लिहिलंय.
अगदी माझ्या मनातलं लिहिलंय. ते लाकडी आणि पीओपीचे किल्ले पाहून मलाही अगदी असेच वाटते!
छान लिहीलय, शेवटचा परिच्छेद
छान लिहीलय, शेवटचा परिच्छेद जास्त आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं लिहीलंय. मुलांनी मातीत
मस्तं लिहीलंय.
मुलांनी मातीत खेळलं पाहिजे हे अगदी बरोब्बर.
अगदी पटलं...त्यामुळे माझा
अगदी पटलं...त्यामुळे माझा पोरगा तीन चार वर्षाचा होताच त्याच्या बरोबरीने किल्ला करायला सुरुवात केली. त्याला चिखलात माखताना बघून, अगदी मन लाऊन सगळी चित्रे मांडताना बघून खूप खूप बरे वाटते...माझे बालपण परत आल्यासारखे वाटते
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
छान लिहीलय.
छान लिहीलय.
छान लिहीलयं.. गेल्या
छान लिहीलयं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गेल्या आठवड्यातच अपार्टमेंटमधली मुलं किल्ला बनवत होती.. छोटा की मोठ्ठा बनवायचा यावर एकाच उत्तर होत 'अरे शिवाजींना कोणताही चालतो'.. तरी बरं केला! यातच समाधान..
अंकुरादित्य, लेख आवडला.
अंकुरादित्य,
लेख आवडला. किल्ले पन्हाळा हे फारसी (की अरबी?) शब्दप्रयोग किल्ला-ई-पन्हाळा याचं बोली रूप आहे.
रच्याकने : स्कॉटलंडमध्ये किली (Killi) हा उपसर्ग डोंगरी गड दर्शवतो. ही माहीती एका स्कॉट माणसाकडून ऐकली आहे. (जालावर शोधलं तर Kil म्हणजे चर्चचे प्रांगण असा अर्थ सापडला.) स्वाहिलीत किल्मा म्हणजे डोंगराचे शिखर यावरून किलीमांजारो हे नाव आले असं म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
अंकुरादित्य, कस्लं मस्त
अंकुरादित्य, कस्लं मस्त लिहिलय. का कुणास ठाऊक पण लहानपणी किल्ला केला नाही (कल्ला करण्यात सगळाच्या सगळा वेळ गेलाय... कबूल).
हे असं वाचलं ना की. तेव्हढ्यासाठी लहान व्हावसं वाटतं.
खूप सुंदर लेख... खूपच सुंदर.
फार सुंदर लेख, खूप म्हंजे
फार सुंदर लेख, खूप म्हंजे खूप्पच आवडला!!!
सर्वांचे मनपुर्वक आभार !!
सर्वांचे मनपुर्वक आभार !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडले
आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर, लहानपणी किल्ला
खूप सुंदर, लहानपणी किल्ला करायचो ते आठवलं. शेवट छान केलाय.
मुंबईत राहाणार्या आम्हाला
मुंबईत राहाणार्या आम्हाला कधी किल्ला नाही बनवता आला. कधी बनवलेला पाहिला सुद्धा नाही, आता मुलासोबत बनवायची इच्छा आहे. कोणती माती घ्यावी, कुठे मिळेल? इमारतीत घराबाहेर बनवल्यास स्वच्छतेची खबरदारी कशी घेता येईल. मुळात माती मिळाल्यावर कसा बनवायच किल्ला कोणी सांगेल का?
छान लिहिलय. आम्ही मातीचा तर
छान लिहिलय. आम्ही मातीचा तर बनवायचोच पण समुद्रावर जाऊन वाळूचा पण बनवायचो.
वल्लरीच>> दगड, विटा गोळा करुन
वल्लरीच>>
दगड, विटा गोळा करुन त्यावर पोते/ कापड टाकायचे. त्यावर भरपूर माती लिम्पायची. हे काम चिल्ली पिल्ली मोठ्या आवडिने करतात. छोट्या फरशिच्या तुकड्याने पायर्या करायच्या. हे बेसिक. मग कार्डशीट पेपरने बुरुज वगैरे. मी आणि लेकाने मिळून दिवाळिच्या आद्ल्याच दिवशी केला. हा माझा मायबोलीवरचा पहिलाच प्रतिसाद. टाईप ला खूप वेळ लागला.