कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.
लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.
कल्हई :
म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन. Sn) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथिल गंजत नाही, व या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ, वा इतरही खाद्यपदार्थ 'कावळून' खराब होत नाहीत.
तर हे कल्हईवाले सुभाष देवरे, अन त्यांचं पोर्टेबल वर्कशॉप :
अंगणातल्या झाडाखाली एक छोटा खड्डा खणून त्यात एक हँडलवाल्या पंख्याची नळी सोडली आहे. पूर्वी कॅनव्हासच्या पिशवीचा भाता असे. समोर मांडलेल्या भांड्यांची 'ऑपरेशन पूर्वी' स्थिती पाहून ठेवा.
*
कल्हईसाठीचे मुख्य रासायनिक घटक.
चौकोनी पांढरी वडी दिसतेय तो नवसागर. अन शेजारी चकचकीत धातूची पट्टी आहे, ते कथिल.
नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. (NH4Cl). गरम भांड्यावर नवसागराची पूड टाकली, की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते, तसेच नवसागरामुळे कथिल लवकर वितळते व पातळ होते. पातळ झालेल्या कथिलाचा थर कापडी बोळ्याने भांड्याला आतून पसरवतात.
*
भांडे आधी चांगले तापवायचे :
*
मग त्यात टाकायचा नवसागर, अन भांडे स्वच्छ करून घ्यायचे :
नवसागराचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो. तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.
*
या ठिकाणी तापलेल्या भांड्यातून नवसागराचा धूर येत असतानाच कथिलाची काडी त्या भांड्याच्या बुडाशी घासतात. कथिल वितळून भांड्यात रहाते. पितळेचे पिवळे भांडे तापून लाल झालेय हे नोट करा.
*
वितळलेल्या कथिलाचा थर भांड्यात पसरवताना :
मोठं भांडं असेल तर अधून मधून नवसागर टाकत रहातात, ज्याने कथलाच्या गोळ्या न होता ते पातळ रहाते, तसेच भांडे तापवत रहातात.
*
कल्हई करून पूर्ण झाली.
आता हे भांडे पट्कन पाण्यात बुडवायचे. अचानक थंड केल्याने कल्हईला चमक येते. नाहीतर ती चमकत नाही.
(कल्हईचे फोटो काढण्याच्या नादात मी बादली जवळ उभा होतो, भसकन भांडे पाण्यात बुडवणे हा प्रकार माझ्या पायापाशीच झाल्याने नेमका तो फोटो हलला.)
*
हा आहे "ऑपरेशन नंतरचा" फायनल रिझल्ट :
याला म्हणतात कल्हई! इतकी चमक असल्यावर हे भांडे आतून दिसायला चांदीला भारी पडते, अन चांदीसारखे कळकत नाही हा वेगळा फायदा.
(माबोवर इतिहास शोधला तेव्हा कल्हईवरचा हा एक छान लेख सापडला.)
ता.क.
कल्हईचा व्हिडिओ. खाली प्रतिसादात दिलेला आहे, तो सगळ्यांना दिसला नसेल.
छान ,डॉक्टर धन्यवाद. अश्या
छान ,डॉक्टर धन्यवाद.
अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आता लुप्त झाल्यात... घंघाळ ,मापटं, गडवे, चवरी, रवी ,कंदील या गोष्टी आता दिसतही नाहीत.
मान अवघडली कि मापटं डोक्याखाली घेऊन पाठीवर झोपायचे आणि डोके, मान त्यावरुन स्लाईड करायचे असा एक उपाय होता..
भयंकर नॉस्टॅल्जीक झाले खरच.
भयंकर नॉस्टॅल्जीक झाले खरच.
मस्त इब्लिस.
धन्यवाद.
मृण्मयी, अहो, घिसाडघाई हा
मृण्मयी,
अहो, घिसाडघाई हा शब्द बहुदा, 'घाईघाईने, अविचारीपणे, कसेतरी उरकून टाकलेले काम' या अर्थी वापरला जातो. त्यात या कामातल्या नेमकेपणा अन चपळाईची वा कलाकुसरीची झलक दिसत नाही, म्हणून तो शब्द तसा गमतीने वापरत असावेत असे म्हटले.
(रच्याकने. हे घिसाडी लोक मायनर लोहारकामेही करतात. तसेच गळक्या बादल्या भांड्यांना डाग देणे वा पॅच लावणे इ. कामेही)
निनाद,
तुम्ही विकीवर टाकणार असाल तर माझी हरकत नाही. रेफरन्सेस मधे फक्त हा लेख 'साईट' केला की झाले. चित्रांचे प्रताधिकार नाहीत. मीच काढलेले फोटो असल्याने वापरास परवानगी देतो. मुळातच ही सहसा न दिसणारी कारागिरी नव्या पिढीला ठाऊक व्हावी हा उद्देश असल्याने हे लेखन विकीवर टाकण्यास हरकत नाही.
धन्यवाद!
खरंच - कंप्लीट नॉस्टालजिक
खरंच - कंप्लीट नॉस्टालजिक करणारा लेख...
डिटेलवार कृती लिहिलीये ती ही प्र चि सह - अग्दी एखादा शास्त्राचा प्रयोग (पण रोचक पद्धतीने लिहिलेला) वाचतोय असे वाटले ...
मस्त - मनापासून धन्स...
>>> खरंच - कंप्लीट नॉस्टालजिक
>>> खरंच - कंप्लीट नॉस्टालजिक करणारा लेख...
खरोखर, जुन्या आठवणी जाग्या झाल्यात या लेखामुळे.
नॉस्टॅल्जिक करणारा लेख.
नॉस्टॅल्जिक करणारा लेख.
पितळी देवही बनवुन घेतलेत आम्ही ते करणार्यांकडुन.
आम्हा पोराटोरांचा लै भारी टाइम पास व्हायचा त्या दिवशी.
कल्हईवाला, देव बनवणारा,कापुस पिंजुन देणारा, डोंबारी खेळ करणारे, कडकलक्ष्मी, क्वचित कधीतरी फुगेवाला, म्हातारीचे केसवाला असे सर्व आमचे वेगळे टिपी असायचे त्या काळातले.
सगळी पोरं तिथेच बघत बसायची.
देवाच्या मुर्ती ओतणारे ते
देवाच्या मुर्ती ओतणारे ते 'ओतारी' असतात.. कल्हई करणारे हे घिसाडी असतात, त्यांना गाडीलोहार असेही म्हणतात.
अरे वा, मस्तच माहिती आणि
अरे वा, मस्तच माहिती आणि प्रचि. धन्यवाद इब्लिस
घिसाडी आणि घिसाडघाईवरचा उहापोहही एकदम इंटरेस्टिंग. घिसाडघाई तर माहीत होती पण घिसाडी शब्दाचा अर्थ आजच कळला.
मराठी विकीसंबंधीची सूचना खरंच
मराठी विकीसंबंधीची सूचना खरंच उत्तम आहे.
मृण्मयी, कल्हईमुळे झालेली दिलजमाई भारीच!
छान माहितीपुर्ण लेख. माझ्या
छान माहितीपुर्ण लेख.
माझ्या सासुबाइ अति उत्साही होत्या.कल्हैवाल्याशी घासाघीस करायच्या न पटुन स्वतः कल्हई करायच्या.ते शुद्ध कल्है करत नाहीत.कथील ऐवजी जस्त मिसळ्तात.अस काहि तर म्हणायच्या अस काहि असत़ का?
त्यानी दिलेली भांडी मोडित घलायला धिर होत नाही आम्हि अजुन वापरतो.एक कल्हईवाला ठराविक दिवसानी येत असतो.पण आमची मोलकरीण मात्र बाई हि भांडी काढुन टाका म्हणत असते.
धिरज कांबळे, जऽरा
धिरज कांबळे, जऽरा पुण्यामुंबईकडून ग्रामीण महाराष्ट्राकडे सरका - तुम्ही लिहिलेल्या बहुतेक सगळ्या गोष्टी आढळतील.
आणि रवी वगैरे तर शहरी घरांमधे पण असते ना?
घंघाळ ,मापटं, गडवे, चवरी, रवी
घंघाळ ,मापटं, गडवे, चवरी, रवी ,कंदील << घंघाळं आहे छोटंसं. रोज त्यात पाणी घालून फुले घालून ठेवते. मापटं पण आहे. गडवे, चवरी म्हणजे काय समजले नाही. रवी आहे घरात. दह्याचं ताक करण्यासाठी रोज वापरला जातो. कंदील आहे तो पण सौर ऊर्जेवर चालणारा. रॉकेलवर चालणारी चिमणी पण आहे. पण रॉकेल मिळत नसल्याने वापरात नाही.
याखेरीज बांबूचे सूप, रोवळी, बुट्टी, पाटा वरवंटा, रूब्बी, धान्याची कोठी, दगडी चूल, तुळशी वृंदावन या सर्व गोष्टी आहेत घरामधे. काही कुठे हरवलं नाही. शहरात दिसत नाही म्हणजे कायमचं गायब झालं असं नाही.
इब्लिस, मस्तच ! नंदिनी, जमल
इब्लिस, मस्तच !
नंदिनी, जमल तर फोटो टाक ना प्लीज.
गडवा म्हणजे पेल्यासारखाच पण
गडवा म्हणजे पेल्यासारखाच पण तांब्यापेक्षा थोडे छोटे पात्र
चवरी ही ग्रामीण भागात दूध काढायला वापरायचे त्यात ताकही ठेवतात तांब्यापेक्षा मोठी आणि मोठ्या तोँडाची असते.
मस्त लेख. सेना तो
मस्त लेख.
मला पण भांड्यांना कल्हई करुन घ्यायचीय.
सेना तो गावदेवीजवळचा कल्हईवाला दिसत नाही रे आता तिथे!
ती चवरी नाही हो, चरवी -
ती चवरी नाही हो, चरवी - म्हणजे दुधासाठीचं भांडं
चवरी म्हणजे देवावर ढाळायला असते ती - झाडूसारखी
बुट्टी, रूब्बी म्हणजे काय?
बुट्टी, रूब्बी म्हणजे काय?
छानेय! थँक्स , मी हे कधीच
छानेय!

थँक्स , मी हे कधीच बघितलं नव्हतं
मस्त. खूप दिवसांनी कल्हईवाला
मस्त. खूप दिवसांनी कल्हईवाला बघितला. अंबाजोगाईला आई करून घ्यायची आमच्या क्वार्टरवर येणार्या कल्हईवाल्यांकडून कल्हई.
सासरी अजूनही पितळी भांडी वापरात आहेत. रेग्युलर कल्हई करून आणतात गावातल्याच दुकानदाराकडून (तो दुसरीकडे कुठे देतो कल्हईसाठी भांडी की स्वतः करवून घेतो माहित नाही.)
घंघाळ ,मापटं, गडवी, चरवी, रवी, पाटा वरवंटा, दगडी खल आणि वरवंटा, लोखंडी खलबत्ता, जातं, सूप, धान्याच्या कोठ्या हे सगळं आईकडे आहे औरंगाबादला.
सासरी पण आहेत यांची पंजाबी व्हर्जन्स.. तांब्या-पितळाची भांडी, मोठमोठ्या धान्य साठवायच्या कणग्या, कपड्यांच्या पेट्या, चुल..सगळं आहे.
रवी, सूप हे तर दिल्लीतल्या छोट्याश्या किचनमध्ये पण आहे.
बुट्टी - बांबुची टोपली ना?
बुट्टी - बांबुची टोपली ना? भाकर्या ठेवायची?
चरवी होय. चवरी म्हणजे मला ते
चरवी होय. चवरी म्हणजे मला ते राजाच्या मागे ढाळत असायचे ते वाटले होते आधी.
चरवी नाही आमच्याकडे!!!
गडवा म्हणजे गडू असेल तर तो आहे माझ्याकडे एक.
बुट्टी म्हनजे बांबूची बुट्टी. भाकरी चपाती ठेवायला एकदम आयडीयल. त्यातल्याच एका बुट्टीत मी फळं घालून ठेवते.
रूब्बी म्हणजे इडली डोशाचं पीठ वाटायचा दगड. घरमालकाने जमिनीला फिक्स करून बसवलाय तो दगड आणि पाटा-वरवंटा.
वरदा धन्यवाद माझा चवरी कि
वरदा धन्यवाद माझा चवरी कि चरवी असाच गोंधळ उडाला होता ...आपण चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
नंदीनी ,होय गडव्याला काहीजण गडू म्हणतात.
राजे महाराजांसाठी असते तिला चामर म्हणतात.
चांगला लेख आहे. फोटोही
चांगला लेख आहे. फोटोही आवडले.
केमिस्ट्री शिकून आता बरीच वर्षे झाली.. कल्हई च्या कोट मधे शिसं पण असतं का ? (कल्हईचा कोट ही द्विरुक्ती झाली का ?)
कथील म्हणजे नेमकं कोणतं अॅल्युमिनियम अलॉय ?
( अॅल्युमिनियम ची भांडी जेवणासाठी वापरू नयेत असं एका वैद्याने सांगितलं होतं. कारण लक्षात नाही. अॅल्युमिनियमला मीठ चालत नाही. भोकं पडतात) .
कथिल म्हणजे टीन
कथिल म्हणजे टीन (TIN),कोल्ड्रींगचे टिन असतात ना ,तेच हे मेटल.
धीरज, टिन म्हणजे कथिल हे
धीरज,
टिन म्हणजे कथिल हे बरोबर. केमिकल सिंबॉल Sn. (Atomic Number 50). ते मी लेखात लिहिलेले आहेच.
कोल्ड्रि़ंकचे टिन (डब्बे) अॅल्युमिनियमचे असतात.
बरोबर आहे इब्लिस, ते
बरोबर आहे इब्लिस, ते एल्युमिनियमचे असतात. परंतु आतून टीनचे कोटींग असते हा बघा संदर्भ.
beverage can
मस्त लेख! आमच्या सोसायटीत
मस्त लेख!
आमच्या सोसायटीत यायचा पुर्वी कल्हईवाला. बरोब्बर दसर्याच्या आसपास यायचा, दिवाळीसाठी पातेली, परात इत्यादी मोठीमोठी भांडी कल्हई करायची असायची. आणि आम्ही सहामाही परीक्षेचा अभ्यास सोडून अधाश्यागत प्रत्येकवेळी नव्या नवलाईने त्याची कारीगरी बघत बसायचो आणि आयांचे धपाटे खायचो.
बुट्टी म्हनजे बांबूची बुट्टी.
बुट्टी म्हनजे बांबूची बुट्टी. भाकरी चपाती ठेवायला एकदम आयडीयल
>>
असं होय. आमच्याकडे आहे की मग. त्यात लसुण वगैरे ठेवतात.
शिंकाळे आहे का अजुन कोणाकडे?
इब्लिसजी अगदी जुन्या आठवणी
इब्लिसजी अगदी जुन्या आठवणी जागवल्यात. कोल्हापूरात लहान असताना कल्हईवाले फिरायचे.
शेजारी पाजारी सगळे मग पितळी मोठी भांडी काढून कल्हई करून घ्यायचे. आत्ताचा काळ (दिवाळी दसरा) हाच मौसम त्यांच्या येण्याचा. चांगले दोन दोन तीन तीन तास चालायचे ते काम.
मी भाग्यवान आहे, कल्हई पहायला मिळालीये.
मस्त लेख. ठाण्याला गावदेवीला
मस्त लेख. ठाण्याला गावदेवीला कल्हईवाला अजूनही असतो. पण शनिवारी आणि रविवारी सकाळच्या वेळी असतो.
Pages