कन्याकुमारी ते जम्मू कुठल्याही किल्लीने उघडणारी बनावट साखळी : जंजीर

Submitted by उद्दाम हसेन on 7 September, 2013 - 11:57

जंजीरचा रिमेक पाहीन असं वाटलं नव्हतं. रिमेक म्हटलं कि गोंधळ उडतो. त्यातून ज्या सिनेमाचा तो रिमेक असेल तो सिनेमा जर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला मैलाचा दगड असेल तर एक प्रेक्षक म्हणून जुन्याचा पगडा कसा झुगारून द्यायचा हा प्रश्न पडतो. खरंतर नव्या आवुत्तीवर हा अन्याय आहे हे कळत असतं, पण काही गोष्टींना हात न घातलेलाच बरं असंही वाटतं. अमिताभ बच्चनला एका रात्रीत सुपरस्टार बनवणारा, अँग्री यंग मॅनचं युग सुरू करणारा हा ऐतिहासिक सिनेमा आहे. प्रकाश मेहरा, सलीम जावेद, प्राण अशा बड्या नावांना एकत्र आणणारा हा सिनेमा.

त्या काळात काळाबाजार, भेसळ, चोरटा व्यापार हे प्रश्न चर्चेत असायचे. सामान्यांमधे राग होता पण असहाय्यता होती. या असहाय्यतेला पडद्यावर एक आशेचा किरण दिसला, आपल्यासारखाच एक सामान्य तरूण या व्यवस्थेला आव्हान देताना दिसला आणि जनमानस सुखावलं. सलीम जावेद यांच्या सर्व सिनेमांचा हा आत्मा होता.

आजच्या जमान्यात ही गोष्ट सांगताना आजचे प्रश्न, आजच्या सर्वसामान्य माणसाला भावेल अशी पटकथा आणि संवाद गरजेचं होतं. या आघाडीवर नव्या जंजीरने बराच विचार केलाय हे कबूल करायला हवं. आज दारूतली भेसळ, चक्कू छुरीया तेज करानेवालीचं पोलीस अधिका-याबरोबरचं नातं हे चालणार नाही हे लखियांनी बरोबर ताडलं. म्हणून यातली माला एनआरआय आणि विजय खन्ना हा एसीपी आहे. इथे तेजा ऑईल माफीया आहे. त्याचा पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ करण्याचा ह्जारो कोटी रूपयांचा व्यापार वारीक सारीक तपशिलांसहीत दाखवताना एका कलेक्टरला जिवंत जाळण्याच्या घटनेचा संदर्भही खुबीने वापरलाय. एसीपी विजय खन्ना आंध्र प्रदेशमधून सतरा बदल्या होऊन पनिशमेंट पोस्टींगवर राज्याबाहेर मुंबईत आलाय. त्याच्याच हद्दीत ही जिवंत जाळण्याची घटना घडते ज्याची साक्षीदार माला असते. कथा तीच आहे पण सांगण्याची शैली आणि संदर्भ बदललेले आहे.

सुरूवातीला छोट्या विजय खन्नाच्या आईवडिलांची हत्या आणि त्याची झालेली फरफट न दाखवता थेट रात्रीच्या वेळी घोड्याच्या स्वप्नाने दचकून उठणारा नायक आपल्याला इथे भेटतो. जुना सिनेमा पाहीलेला नसल्यास उत्सुकता ताणण्यासाठी हे तंत्र प्रभावी आहे. पण पुढे या स्वप्नातून विजय खन्नाचं कॅरेक्टर डिफाईन करण्यात संपूर्ण टीम कमी पडलीय. जुन्या सिनेमात वरून शांत भासणारा पण आतून पचंड खदखदणारा विजय अमिताभने ज्या ताकदीने उभा केला त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही याची जाणीव ठेवूनही म्हणावंसं वाटतं कि एसीपी विजय खन्ना हे कॅरेक्टर कसं उभं करावं याबद्दल गोंधळ दिसतो. स्वतःचा वाढदिवस साजरा न करणारा विजय नायिकेबरोबर धमाल मस्ती करतो, हसतमुख देखील राहतो, निलंबनानंतर व्हिडीओ गेम्स खेळतो. हे बदल का केले याची उत्तरं मिळत नाहीत. त्याने कुठलीही व्हॅल्यु अ‍ॅडीशन होत नाही उलट नायक इथे कन्फुज्ड वाटला. त्यामुळेच रामचरण तेजा हा अभिनेता म्हणून कसा आहे हे क्ल्यायमॅक्समधल्या प्रसंगापर्यंत कळत नाही. जुन्या पटकथेत इतर पात्रं विजयच्या मानसिक अवस्थेबद्दल बोलत असतात, त्यातून ही व्यक्तिरेखा छान उलगडत जाते. या संवादांना फाटा देण्यात आला आहे. गतीवर जास्त भर देण्याच्या नादात अधून मधून येणारे आयटेम नंबर्स मात्र जुन्या पद्धतीचे वाटतात याकडे दुर्लक्ष झालंय. व्हिलनच्या अड्ड्यात जाऊन इशारे देणारा नायक हा त्या काळात चालून गेला. हाय व्होल्टेज ड्रामासाठी ते प्रसंग, संवाद आवश्यक होते. हे प्रसंग निभावणारे कलाकार त्या ताकदीचे असल्याने ते हास्यास्पद न वाटता त्या वेळी दाद मिळवून गेले. आजच्या काळात व्हिलनला जाऊन सावध करण्याची नायकाची स्ट्रॅटेर्जी पचनी पडण्यासाठी त्या प्रसंगांवर भरपूर विचार व्हायला हवा होता.

प्रकाशराज ने तेजाला विनोदी बनवलाय. काही वेळा त्याने हातखंडा अभिनय केलाय. तेजाचे अनेक गाजलेले संवाद बदलले आहेत. काही आवश्यक तर काही अनावश्यक. बिंदूने अजरामर केलेल्या मोना डार्लिंग या व्हॅम्पच्या भूमिकेतल्या माही गिलने कॉमेडी शो मधे करीयर करायला हरकत नाही. अनावश्यक विनोद घुसडल्याने धड प्रकाशराज ला हवा तसा तेजा उभा करता आला नाही, ना धड जुन्या लायनची आठवण करून देणाराही. तेजा आणि विजय ही दोन्ही पात्रं अशा रितीने चाळीस वर्षांच्या काळखंडातले दोन त्रिशंकू म्हणून हेलकावे खाताना दिसतात.

जुन्या सिनेमातल्या प्रसंगांची लांबी अलिकडच्या सिनेम्यांमधे क्वचितच पहायला मिळते. जंजीरमध्ये मालाला ओळखपरेडसाठी बोलवायचा प्रसंग लांबलाय खरा, पण हा प्रसंग संपतो तेव्हां सुन्न करून टाकतो. नाटकातल्या प्रत्येक प्रवेशानंतर उंची गाठलेली असावी तसं जंजीर, दीवार, त्रिशूल या सिनेमात सलीम जावेदचं कसब जाणवतं. ही तुलना करायची नाही असं ठरवूनही त्याची आठवण होणं हे नव्या जंजीरचं मोठं अपयश आहे. नव्याने पाहणा-यालाही तो फारसा अपीलिंग वाटत नाही हे ही उल्लेखनीय.

जुन्या सिनेम्याचा युएसपी असलेला शेरखान इथे दात, नखं काढलेल्या मरतुकड्या वाघासारखा वाटतो. संजय दत्तला पाहवत नाही. अजिबात अभिनय करण्याचे कष्ट न करता पाट्या टाकल्याने शेरखान चक्क कंटाळवाणा झालाय. त्यातच अलिकडचे त्याच्याविरुद्ध गेलेले निर्णय हे ही आठवत राहतात आणि अन्यायाविरुद्ध लढणारा शेरखान दाखवायला आणखी कुणी भेटला नाही का असं वाटत राहतं.

ट्रेनच्या प्रवासात ऐनवेळी सामानाच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्मवरची कुलूपसाखळी घ्यावी आणि नंतर कुठल्याही स्टेनशवर मिळणा-या कुठल्याही कुलूपाच्या किल्लीने ती उघडते हे जाणवल्यावर काय अवस्था होईल तशीच अवस्था हा जंजीर करतो. बाहेर आल्यानंतर काहीही लक्षात न राहणारा हा रिमेक कसा आणि कुठे फसला याचं विश्लेषण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा झोपलेल्या पोरांना कडेवर घेऊन ओसाड थेटरातून पार्किंगपर्यंत कसं पोहोचायचं याच्या विवंचनेत आपण उठतो. या वेळी सिनेमा कुणी काढला, संगीत कुणी दिलं, कलाकारांची नावं काय हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करून घराकडे कूच करत असतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
प्रकाश राज seasoned actor आहे. त्याचा कंटाळा नाही येत.
'चेरी'ला हिंदीमध्ये बघायची उत्सुकता आहेच.

ट्रेनच्या प्रवासात ऐनवेळी सामानाच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्मवरची कुलूपसाखळी घ्यावी आणि नंतर कुठल्याही स्टेनशवर मिळणा-या कुठल्याही कुलूपाने ती उघडते हे जाणवल्यावर काय अवस्था होईल ?

कुठल्याही कुलूपाने उघडते की कील्लीने?

साती
महत्वपूर्ण त्रुटीच्या सूचनेबद्दल धन्यवाद. बदल अंमलात आणले गेले आहेत याची नोंद घेण्यात यावी.

कळावे आपला

किरण तेजा
(अँग्री नसलेला मॅन)

चांगले लिहिले आहे पण एकंदर ट्रेलर पाहुन सिनेमा पहायची इच्छा होत नाहिये. टीव्हीवर (बहुतेक) पाहणार.

रामचरण तेजा म्हणजे क्रूर चेष्टा आहे..... 'विजय'ची, 'अमिताभ'ची, 'जंजीर'ची आणि प्रेक्षकांचीही.
त्याचा चेहरा म्हणजे अर्धा दबलेला बत्तासा वाटतो.
जॉन अब्राहम बरा अ‍ॅक्टर आहे, असं ह्या निस्तेज तेजाला पाहून वाटलं.

============================

सिनेमाचं नाव 'जंजीर' अकारणच आहे.
पहिल्या सिनेमाचं नाव 'जंजीर' असण्याचं एक कारण होतं की, तेजाच्या मनगटात असलेल्या साखळीला लटकणारा घोडा विजयला पछाडत होता. इथे तर घोड्याचा 'टॅटू' केलाय... 'जंजीर' मिसिंग ! सरळ सरळ 'घोडा'च नाव दिलं असतं तरी चाललं असतं की... भंकसच तर करायची होती !!

--------------------------------------------

शेरखान-विजयची दोस्ती आणि माला-विजयचं प्रेम, 'हे होणारच आहे' हे लोकांना माहित आहेच, असा विचर करून मांडलंय बहुतेक.... कारण दोन्ही प्रकरणं अजिबात एस्टॅब्लिश होतच नाहीत 'जं-१' मध्ये होतात तशी.....

----------------------------------------------

एका एसयूव्हीने अख्खी वस्ती उध्वस्त करण्याचा सीन तर अचाट आणि अतर्क्यच ! भिंती पाडतो, माणसं चिरडतो, ड्रमं उडवतो, स्फोट होतात, अनेक घरातली भांडी-कुंडी, कपाटं वगैरे तोडफोड करत ही एसयूव्ही डोंगरमाथ्यावरून खालपर्यंत येते तरी तिचा बंपरही तुटत नाही ! कुठे उलटत नाही... पत्रा दबत नाही.. इतका मूर्खपणाचा बाजार कुठेच पाहिला नाही...बेसिकली, त्याचा हा अश्याप्रकारे वस्ती उध्वस्त करायचा प्लॅनच हास्यास्पद वाटला..

-----------------------------------------------

प्रियंका असले बंडल रोल का करते ?
एकंदरीतच.. माला, शेरखान ही दोन्ही अत्यंत महत्वाची पात्रं 'जं-२' मध्ये अगदीच बिनमहत्वाची करून टाकली आहेत.
जं-१ मधलं ओमप्रकाशचं कॅरेक्टर मिसिंग आहे.. पण इथे 'अतुल कुलकर्णी' वृत्तपत्राचा संपादक म्हणून घेतला आहे आणि सपशेल वाया घालवला आहे. त्याचं कहाणीत काहीही काँट्रीब्युशन नाही.. प्रत्यक्षात खूप महत्वाचं काँट्रीब्युशन करू शकला असता.. पण बिनडोक लेखकांनी वाया घालवलं ते कॅरेक्टर..

------------------------------------------------

एक संतापजनक रिमेक बनवल्याबद्दल ह्यांना 'जंजीर'ने बांधून 'रमैया वस्तावैया' वगैरे 'रिपीट' मोडवर दाखवत ठेवायला हवं... गयावया करून क्षमा मागेपर्यंत.

या सिनेमाचा तो रिमेक असेल तो सिनेमा जर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला मैलाचा दगड असेल तर एक प्रेक्षक म्हणून जुन्याचा पगडा कसा झुगारून द्यायचा हा प्रश्न पडतो. खरंतर नव्या आवुत्तीवर हा अन्याय आहे हे कळत असतं, पण काही गोष्टींना हात न घातलेलाच बरं असंही वाटतं. <<< सहमत आहे.

=============

रसपः

त्याचा चेहरा म्हणजे अर्धा दबलेला बत्तासा वाटतो.<<< Lol

सरळ सरळ 'घोडा'च नाव दिलं असतं तरी चाललं असतं की... भंकसच तर करायची होती !!<<< Lol

इथे 'अतुल कुलकर्णी' वृत्तपत्राचा संपादक म्हणून घेतला आहे आणि सपशेल वाया घालवला आहे. त्याचं कहाणीत काहीही काँट्रीब्युशन नाही.<<< Proud

भारी लिहिलेय. लेखाचे नावही आवडले. फुटकळ ट्रेलर बघूनच साधारण काय दिवे लावलेत याची कल्पना आली होती त्यामुळे शुदेरो पाहिला.
रसप Happy +१
बाकी रामचरण तेजा, मोहित अहलावत इत्यादी अभिनेत्यांना (?) इंद्रजाल वगैरे मायावी विद्या वश असावी. अन्यथा पडद्यावर एक दोन मिनिटातच बेकार वाटणारी ही मंडळी स्क्रीन टेस्ट वगैरे कशी काय पास होतात आणि चार सहा महिन्यांच्या शूटींगमध्येही दिग्दर्शकाला 'मिष्टेक' कशी काय वाटत नाहीत हे कोडेच आहे.

बाकी रामचरण तेजा, मोहित अहलावत इत्यादी अभिनेत्यांना (?) इंद्रजाल वगैरे मायावी विद्या वश असावी. अन्यथा पडद्यावर एक दोन मिनिटातच बेकार वाटणारी ही मंडळी स्क्रीन टेस्ट वगैरे कशी काय पास होतात >>

हे लोक स्क्रीन टेस्टसाठी उघडे जात असावेत आणि डायलॉग मारताना कधी दंडाचे, कधी पोटाचे, कधी छातीचे मसल्स टुण्णटुण्ण उडवत असावेत... टेस्ट घेणारा मसल्स बघत बसत असेल आणि नाकावर चिकटलेली माशी दिसत नसेल. Angry

ह्याचा हीरो चिरंजीवीचा मुलगा आहे हे आत्ताच कळले. म्हणुन त्याला घेतला असेल.
रसप - मस्त. Happy (मला हा रसपचाच लेख वाटला होता आधी, मग किरणु दिसले).

या शिनेम्याचं परीक्षण रसपनेच लिहायला हवं होतं. त्याने या रिमेकच्या गुन्ह्याची शिक्षा बरोबर ठोठावली असती. नेटवर अनेक विख्यात समीक्षकांनीही चांगलेच वाभाडे काढलेत हे नंतर पाहण्यात आलं....शिणेम्याचं नाव घोडा ठेवलं असतं तर ही कमेण्ट खूपच बोलकी आहे. जंजीरचं नाव कशासाठी वापरायचं हे ही कळायला हवं सामान्य प्रेक्षकांना.

या शिनेम्याचं परीक्षण रसपनेच लिहायला हवं होतं....... >>

खुमखुमी तर जाम होती... हात शिवशिवत होते.. पण ब्लॉगचे १ लाख पेज व्ह्युज पूर्ण होणार होते आणि असल्या थुकरट पिच्चरवरचं लिखाण त्यासाठी कारणीभूत होऊ नये, असा विचार केला आणि टाळलं. (कदाचित 'इल्लॉजिकल' विचार आहे.. पण कधी कधी माझ्यातला किरकोळ कवी असेच विचार करतो. Sad )

Happy

थँक्स !

असल्या थुकरट पिच्चरवरचं लिखाण त्यासाठी कारणीभूत होऊ नये, असा विचार केला आणि टाळलं. <<<

Lol थुकरट हा एक नवीनच शब्द मिळाला.

(कदाचित 'इल्लॉजिकल' विचार आहे.. पण कधी कधी माझ्यातला किरकोळ कवी असेच विचार करतो. अरेरे )<<

अंधश्रद्धाविरोधी संघटनांनी हे विधान वाचले तर? Wink

थुकरट हा एक नवीनच शब्द मिळाला.>>

बेफीजी,

इथे मराठवाड्यात वापरतात हा शब्द.. नुकताच इथल्या पाणीपुरी, शेवपुरी वगैरे चाट पदार्थांची इन्दोरच्या चाटशी तुलना करताना एका मूळ मराठवाडी आणि इन्दोरला ये-जा करणार्‍या एका मित्राने हा शब्द माझ्याशी बोलताना वापरला होता.. लै पटला, म्हणून लगेच डोक्यात बसला !! Happy

अहो...
रीमेक काय... 'फ्री-मेक' जरी बनवलात, तरी फायनन्सर कसला.. प्रेक्षकसुद्धा मिळणार नाही तुम्हाला !!

हे म्हणजे 'कुत्रं पिसाळलं आहे, पण विकत घेता का?' म्हणणं झालं ना राव !