दैनंदिन व्यवहारी जगण्याचा माणसाला जेव्हा कंटाळा यायला लागतो, तीच-तीच काम करून जेव्हा शरीर थकतं, नेहमी त्याच-त्याच माणसाच्या सहवासात जेव्हा मन गुदमरायला लागतं, आयुष्यातले सगळेच दिवस सारखेच वाटायला लागतात, तेव्हा माणसाला कुठेतरी दुर डोंगरदऱ्यांत, एखाद्या दाट जंगलात शांत ठिकाणी जावसं वाटतं.... तो एकांत मनाला नेहमीच साद घालत असतो.
कधीतरी दोन-चार मित्र सोबत घेऊन एखादी सहल काढावी असं सहज मनात येतं. माणूस आणि निसर्ग याचं अतूट नातं आहे, माणसाच्या मनाला निसर्गाची कायमच ओढ असते. डोंगर-दऱ्या, नद्या-नाले, घनदाट झाडी, पशु-पक्षी याच्या सहवासात माणसाला वेगळीच अनुभूती येते, जगण्याचं नवं सत्व गवसतं कारण जंगलात तुम्ही कमावलेल्या यशाला, संपत्तीला किंमत नसते.
पुढच्या सुटीच्या दिवशी सकाळीच निघायचं असा मित्रांसोबत बेत ठरला की यावेळेस जायाचं भंडारदऱ्याला. काळ कोणाचीही वाट पाहत नाही, नेहमीप्रमाणे सुटीचा दिवसही उगवला मग सकाळी मित्रांना मोबाईल केले, जे आधी येतो म्हणाले होते पण आज कोणाकडेच वेळ नव्हता, प्रत्येकाने काहीतरी कारण सांगितले, आपली नाईलाजी दाखवली. आता सोबत कोणी नव्हतं, मग एकटाच हिम्मत करून निघालो, खरं तर पावसाळ्यातच मजा असते इथं जाण्याची असं याच मित्रांच्या तोंडून कळालं होतं, कारण आजवर मी कधीच तिकडं फिरकलो नव्हतो.
एकदा जायाचं ठरलं की मग माघार कसली, मित्र सोबत आहेत अशी घरी थाप मारली, दुपारच्या जेवणाचा डबा घेतला, गाडीला किक मारली, एकटाच निघालो, नेहमीच्या रोडवरच्या गर्दीत सामील झालो. शहर कधी मागे पडलं हे कळलं नाही, कारण मन नवीन प्रवासात गुंतलेलं होतं. आज येणारा अनुभव नवीन होता.
प्रवास चालू करून एखादा तास झाला होता, अंगावर थंड हवेचा मारा सोसत, पावसाच्या धारा अंगावर घेत, डाबरी रोडवरचे खड्डे चुकवत पुढे चालत राहणं, यात वेगळीच मजा अनुभवायला येत होती. सभोवलाताची हिरवीगार झाडी, डोंगराच्या कडेवरून कोसळणारे धबधबे पाहण्यात गाडीची गती कमी होत होती, तरीही आज त्याचं फार काही वाटत नव्हतं, कारण आता धावपळीची गरज नव्हती.
भाताची लागवड करण्याचा हाच काळ असतो, रोडच्या बाजूच्या काही शेतात याची लागवड चालली होती. आकाशात ढग गर्दी करत होते, पावसाचा जोर आणखी वाढणार, असंच वातावरण तयार होत होतं, भांडारदरा धरण अजून बरचं लाबं होतं. पावसाचा मारा अंगाला सहन होत नव्हता तेव्हा एक मोठं वडाचं झाड पाहून गाडी थांबवली, झाडाच्या खोडाशी जावून उभा राहलो. आजूबाजूला पाहिलं दिसत होतं तोपर्यत कोणीच माणूस दिसत नव्हतं, रोडवरून एकही गाडी जात नव्हती.
तुफान वारा-पाऊस चालू झालं, माझ्या सभोवलाताली खळखळ पाणी वाह्याला लागलं, मी त्या वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत होतो. आता झाडही गळायला लागलं, अंगा-खाद्यावर पाउस खेळायला लागला तेव्हा मी केव्हा पावसाचा झालो हेही मला कळालं नाही, मी या जगापेक्षा वेगळा नाही, हि जाणीव मला त्या क्षणी झाली, कारण डोक्यात कोणताही विचार नव्हता, आजवरचे सगळे अनुभव विरून गेले होते, असा बरच काळ लोटला असावा.
पायावर काही हालचाल होत असल्याची जाणीव झाली, तेव्हा मी भानावर आलो, खेकड्याच लहान पिल्लू पायावर चढत होतं, मी एकदम पाय झटकला ते लांब जावून पडलं. आता मी माझ्या तंद्रीतून बाहेर आलो, अंगातले ओले कपडे काढले, ते जोर लावून पिळले, ते परत घातले, त्यामुळे अंगातली हुळ-हुळी कमी झाली. घरून निघतांच दुसरा ड्रेस आणला नव्हता, कारण भंडारदराल्या जायाचं म्हटलं की आपण प्रवासात ओलं होणार हि घटना मनात पक्की केली होती, म्हणून आता आलं झाल्यावर त्याचं काही वाटत नव्हतं.
सतत दोन-तीन तास सारखा जोऱ्याचा पाऊस चालू होता, आता पाउस माघार घेणार नाही हे कळलं तेव्हा मी घ्यायचं ठरवलं, आज धरणावर जावून परत घरी जाण्याएवढा वेळ राहाला नव्हता, हे मी घड्याळामध्ये पाहिलं, कारण बाहेर सहलीला निघालो म्हणजे मी मोबाईल सोबत घेत नाही, कारण हा मोबाईल तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्य बिघडवून टाकतो, कारण कोण कधी रिंग देईल हे सांगता येत नाही. पाउस उघडला की परत फिरायचं हे बसल्या जागी पक्क केलं. आज आपण उगाचच आलो असाही आता मनात वाटायला लागलं होतं, कारण सोबत कोणी नाही म्हटल्यावर एकट्याने निघायचं हा निर्णय अगदी अव्यवहारी होता.
सूर्य माथ्यावरून खाली उतरला तेव्हा पावसाचा जोर ओसरला, मी गाडीजवळ गेलो, एकदा भंडारदऱ्याकडे जाण्याऱ्या रस्त्याकडे पाहिलं आणि स्वत:लाच म्हणालो “आज नाही तर परत कधीतरी येत येईल... आयुष्य खूप मोठं आहे.” मी माघारी निघालो, आता पोटाला भूक लागली होती, जेवणाचा डबा सोबत होता तेव्हा एका शेतात झोपडी पाहून मी गाडी थांबविली. भाताच्या शेताला वळसा घेत मी तिकडे चालू लागलो, पण त्या झोपडीत आपलं कसं स्वागत होईल, थोडा वेळ जेवायला जागा मिळेल? पिण्याला पाणी मिळेल? मला काही समजत नव्हतं, कारण आम्ही शहरातली माणसं अनोळखी माणसाला आपल्या घरात घेत नाही.
झोपडीजवळ गेलो तेव्हा कळालं की ती उघडीच होती, आत एक म्हातारं जोडपं चुलीजवळ लाकडं पेटवून शेकत बसली होती, हे मला बाहेरूनच दिसलं. त्या दोघांनी मला पाहिलं, त्यांना काही न विचारता मी सरळ आत घुसलो. त्यांनी काही विचारण्याच्या अगोदर मी माझी कहाणी सांगितली, माझं जेवण झालं की परत निघणार आहे हे त्यांना सांगितलं. त्या दोघांनी आपल्या शेकोटीजवळ बसायला मला जागा करून दिली. शेकोटीवर हात गेल्यावर मला ऊब येऊ लागली.
मी त्या झोपडीत नजर फिरवली, तिच्यात फार काही सामान नव्हतं. चार-पाच मडकी, चार-पाच पत्र्याचे डबे, एका कोपऱ्यात चूल, तिच्याच बाजूला जळणासाठी वाळलेल्या झाडाच्या फांद्या, एक राकेलावर जळणारा कंदील. या झोपडीत लाईट नव्हती, पुढेही कधीतरी येण्याची शक्यता नव्हती.
अगदी कमी साधनांच्या साह्याने जगायचं ठरलं तर माणसाच्या गरजा किती कमी असतात हे मला त्या झोपडीत बसल्यावर कळालं, नाहीतर शहरात घर म्हणजे वस्तुंचा बाजार भरतो, आपल्याला गरज आहे किंवा नाही याचा विचार न करता विकत घेत बसतो, कारण त्या वस्तू शेजारच्या घराची शोभा वाढवत असतात. माणसाचा आनंद आणि तो वापरत असलेली साधनं यांचा फार काही संबध नसतो.
चुलीतल्या शेकोटीजवळ अंग गरम झालं तेव्हा पोटातली भूक मला जाणवायला लागली, मी माझा डबा जेवणासाठी काढला, त्या म्हाताऱ्या आजीला पाणी मागितलं, तिनं ते आणून दिलं. मी जेवायला सुरवात करण्यापूर्वी त्यांनाही जेवायचं आमंत्रण दिलं, ते दोघंही नको म्हणाले. मी जेवायला सुरवात केली, तेव्हा त्या आजीने मला एका डब्यातून चटणी दिली, मी तिला नको-नको म्हणालो, पण तिनं माझं ऐकलं नाही. खरचं ज्याच्याजवळ देण्यासाठी फार काही नसतं, त्याचं मनही मोठं असतं.
मी जेवता-जेवता त्या जोडप्याच्या मुलांची चौकशी केली तेव्हा ते “आम्हाला मुलं झाली नाहीत.” हे अगदी सहज बोलून गेले, त्यांच्या बोलण्यातून कोणताही कमीपणा जाणवत नव्हता.. मी उगाचच विचारणा केली असं मला वाटायला लागलं, तेव्हा मी झोपडी बाहेर पाहायला लागलो. डोक्यात एक विचार चमकवून गेला, शहरातही ज्यांना मुले असतात ते कुठे आपल्या आई-वडिलांना आपल्या संसारात सामावून घेतात.
त्यांच्या झोपडीच्या पुढेच त्याची शेती होती, त्यात भात वाढत होता, तेच त्यांच्या जगण्याचा आधार.
जमिनीत जेवढं काही पेरलं ते सगळंच उगवतं असं नाही पण जे काही उगवतं तेवढ्या वरही भागवता येऊ शकतं. निसर्गा सोबत राहणाऱ्या माणसाची मनं ही त्याच्या सारखीच निर्मळ असतात हीच जाणीव मला त्या झोपडीतून निघतांना झाली. माणसाचं मन नेहमीच नवीन अनुभवासाठी आसुसलेलं असतं, आज मला भंडारदऱ्याला नाही जाता आलं तरी मला त्याचं काही वाईट वाटत नव्हतं, कारण आता जे काही मला मिळालं होतं तेही वेगळा आंनद देणारं होतं.
*****
...... झालं लिहुन!
...... झालं लिहुन!
आवडलं
आवडलं