कणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी

Submitted by चेरी on 1 July, 2013 - 23:27

साहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)

टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.
जर या पद्धतीने धिरडं हाताने पसरता येत नसेल तर धिरड्याचे मिश्रण थोडं पातळ बनवून मग खोल डावाने / ग्लासने (तव्याच्या परिघापासून मध्यापर्यंत डाव गोल गोल फिरवत) धिरडी घाला.

IMG_0427 - Copy.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी मी गोड धिरडी करते. कणकेत गूळ-वेलची घालून. थोडी पातळसर ठेवली तर आपली आपण मस्त पसरतात.
आता ही तिखटामिठाची करून बघेन.

अशी मी गोड धिरडी करते. कणकेत गूळ-वेलची घालून.
<<<<<

अशी धिरडी माझी आईदेखील करते नाश्टयासाठी. आई त्याला गुळ-कणकेचा मालपुवा म्हणते.

चेरी मी अशीच एक पाकृ एका पुस्तकात वाचली आहे पण त्यात कणिक आधी भाजुन घ्यायला सांगितली आहे. कणिक न भाजता केली तरी चांगली लागते का? तु बनवलेल्या धिरडी मस्त दिसत आहेत.

आई त्याला गुळ-कणकेचा मालपुआ म्हणते. <<
हो माझ्याकडे एक असिस्टंट यायची तिच्या डब्यात असायचा हा प्रकार. तिच्या आईकडून घेतली होती रेसिपी. ती पण मालपुवाच म्हणायची बहुतेक.

यशस्विनी, आम्ही पण असाच मालपुवा करतो पण तो जरा जाडसर असतो. दुधात गूळ विरघळून त्यात कणिक मिक्स करून रात्रभर ठेवायची (फ्रीझमधे). करायच्या वेळी वेलची पूड टाकायची.
आयत्यावेळी पण मिश्रण करता येत पण रात्रभर भिजवून ठेवले की छान मालपूवा होतो.

चेरी आता वरच्या पद्ध्तीने करून बघेन.

अकोल्यात आम्ही ह्याला आयते म्हणतो. पहिल्यांदा आईने केले होते आयते तर केवढे केवढे आवडले होते. गुळामुळे छान जाळी येते आयत्याला. कणिक गुळाची चव पण छान येते.

आयत्यावेळी पटकन् करता येणारी म्हणून 'आयतं' म्हणत असावेत का? आम्ही तांदळाच्या पीठाच्या धिरड्याला 'आयतं' म्हणतो. Happy

बर्‍याच दिवसांत केली नाहीत लवकरच करण्यात येतील.
फोटो मस्त आहे.

छानच.. माझा हा खुपवेळा चपातीला पर्याय असतो. तवा चांगला तापलेला असेल तर छान जाळी पडते.

मी सुद्धा करते कणकेची तिखटामिठाची अशी धिरडी. पटकन होतात. ब्रेकफास्टला त्यात अंड फोडून घातलं एक तर मुलांकरता पूर्ण ब्रेकफास्टचा छान पर्याय होतो.

गुळ-वेलचीचा मालपुवा करुन बघते आता.

फेटायचं नाही. ऑलरेडी भिजवलेल्या पिठात ते फोडून घातल्यावर डावेने जस्ट एकत्र करुन घ्यायचे.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे खूप आभार Happy
मी आता कणकेची गोड धिरडी करून पाहेन.

@ यशस्विनी,
धन्यवाद.
या पाकृमध्ये कणिक भाजायची गरज नाही. चांगली लागतात ही धिरडी.

मस्त दिसतो आहे हा प्रकार. Happy हाताने धिरडे पसरण्याबद्दल लिहिले अहे, जसे डोश्याचे पीठ डावाने पसरता येते, तसे ह्याचे नाही का करता येणार?

Pages