कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची. 'संग्राम स्टाईल' कुडते (म्हणजे रंगारी लोकं उघड्या गळ्याच्या नी कोपरापर्यंत हात असलेल्या बंड्या घालतात त्या), बेकहम सारखी 'मोहिकन' हेअर स्टाईल, अशा काही ना काही साथी इथे सदैव चालू असतात. त्यात खाणं म्हणजे जीव की प्राण. एक मटण म्हटलं तरी ते 'निलेश'चं, 'महादेव'चं, 'परख'चं असे पाठभेद असतात. दोने़कशे खानावळींपैकी कुणाला तरी अचानक मटका लागतो की आयला नादखुळा म्हणत सगळे तिकडे धावायला मो़कळे. दोन तीन महिन्यात पुन्हा कोणीतरी नवा शोधून काढतात.
'अख्खा मसूर' हा पदार्थदेखील कोल्हापुरी खाद्यक्षितिजावर असाच उगवला. हा मूळचा कोल्हापूरचा वाटत नाही. कोल्हापूरला 'रस्सा'पान करायला आवडते. मिसळीबरोबर कट (पातळ भाजी) आणि जेवणाबरोबर तांबडा-पांढरा रस्सा 'वढ की वढ' म्हणून ओरपल्याखेरीज आमचे पैसे वसूल होत नाहीत. त्यामुळे हा टोटली कोरडा पदार्थ कोल्हापूरच्या गृहिणीने निश्चितच शोधलेला नाही. पण दहा बारा वर्षांपासून हा एकदम 'ग्लॅमराईझ' झालाय. मुख्य म्हणजे नवलाईचा आवेग कमी झालाय पण प्रेम मात्र टिकून असल्याने कथा रोमिओ-रोझलीनची न होता रोमिओ-ज्युलिएटची झालीय, तीही सुखांतिका.
वेगवेगळ्या छोट्या हॉटेलांतून याची रेसिपी मिळवायचा मी बराच प्रयत्न केला. खूप करमणूक झाली (आत्ता लिहीत नाही, काळजी नसावी!). शेवटी बरीच सर-मिसळ हाती लागली. मायकेलँजेलोच्या चिवटपणाने जरा एडिटिंग केल्यावर ही खालची रेसिपी तयार झालीय. यात काय आहे नी काय हवे आहे यावर मौलिक चर्चा होईलच पण कोल्हापुरात मिळणार्या अख्खा मसूरची ही बर्यापैकी ऑथेंटिक रेसिपी आहे असे मानायला हरकत नसावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अख्खा मसूर"
साहित्य
भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ
कृती
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?)
तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा.
कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.
ता.क. यात लसूण, कढीलिंब, हिरवी मिरची काही नसल्यानं आधी मीही थोडा साशंक होतो. अर्थात त्यांच्यासकटही चांगलंच , सॉरी, नादखुळाच लागेल.
पण त्याला "अख्खा" मसुर का
पण त्याला "अख्खा" मसुर का म्हणतात?
म्हणजे दुसरा "अर्धा" / "पाव" मसुर असा ही काही प्रकार असतो का?
सोप्पी आहे की रेसिपी. आत्ता
सोप्पी आहे की रेसिपी.
आत्ता लिहीत नाही, काळजी नसावी!>>
मस्त... नादखुळा म्हणायची एक
मस्त...
नादखुळा म्हणायची एक लकब आहे ती इथे लिहीणे शक्य नाही.
कोल्हापुरी.... जगात भारी हे खरे!
मला हा पदार्थ आवडतो अनेकदा
मला हा पदार्थ आवडतो अनेकदा करूनही खाल्ला आहे पण ही कोल्हापुर्ची खासियस्त आहे हे माहीत नव्हते
आमच्या कडे पंढरपुरात आम्ही हाच पदार्थ काळे तिखट (कांदालसूण वाले)घालूनही करतो मस्त लागते
माझ्यामते मिसळीत नेहमीच्या मटकी ऐवजी असा अख्खा मसूर ट्राय करायला जाम मजा येईल
अमेय छान आणी सुटसुटीत आहे
अमेय छान आणी सुटसुटीत आहे तुमची रेसेपी. फोटो पण मस्त आलाय.
http://www.maayboli.com/node/31908
http://www.maayboli.com/node/36994
तुमचा उत्साह कमी करण्याचा हेतू अजीबात नाही, पण वरच्या लिंकमध्ये पण चिऊ आणी अवलची पाककृती बघा. तुम्हाला पण अशा पद्धतीने कदाचीत आवडतील.
अख्खे मसूर मला चवळीसारखे का
अख्खे मसूर मला चवळीसारखे का वाटतायत? फोटो टाकणार का?
माझ्या डोक्यातही अक्खा मसूर
माझ्या डोक्यातही अक्खा मसूर तो अवलचा असे समीकरण आहे. कसूर माफ.
छान रेसिपी!
छान रेसिपी!
मी पर्टूच्या रेस्पीने
मी पर्टूच्या रेस्पीने मसूरआमटी करते फार हौस आली की. नाहीतर सरळ गूळ-गोडा मसाला नि भरपूर खोबरं वगैरे घालून नेहमीची उसळ. कधीतरी बदल म्हणून टोमॅटो-खोबरं-गोडा मसाला वाटून घालते.
आता कशी करून बघीन.
छान आहे रेसिपी आणि लिखाणही.
छान आहे रेसिपी आणि लिखाणही.
>>मिसळीबरोबर कट (पातळ भाजी)
>>मिसळीबरोबर कट (पातळ भाजी) कटाला पातळ भाजी म्हणू नको हो.
"व्हेज कोल्हापुरी" सारखं restaurants नी शोधून नाव दिलेलं असेल. त्यामुळे "ऑथेन्टिक" काय हा प्रश्नच आहे. "टोटली कोरडा" पण नसतो. रस असतो. "मराठा दरबार" यांचा मसाला वापरुन करा. यात सुकं खोबरं, तीळ, खसखस इ. आहे. मोहरी नसते घालायची. सायो, ती मोहरी तुला चवळीच्या डोळ्यांसारखी दिसतेय का? चपटे, फिक्या रंगाचे मिळतात ते हे मसूर असावेत.
मागच्या बाजूला रेसिपी आहे.
ती मोहोरी आहे का? त्यामुळेच
ती मोहोरी आहे का? त्यामुळेच चवळी असल्याचा संशय बळावला
खरंतर दाणेही चवळीसारखेच मोठे दिसतायत.
मला आठवते त्याप्रमाणे ~गरम
मला आठवते त्याप्रमाणे ~गरम मसाला~ आपरतात या अख्खा मसूर साठी .
कोणतीही झणझणीत तिखट पाककृती गरम मसाल्याशिवाय अपूर्ण आहे
वॉव.. मस्त टेस्टी दिस्तीये
वॉव.. मस्त टेस्टी दिस्तीये दाल.. छान रेसिपी
मस्तच
मस्तच
मस्तच.. हीच रेसीपी मी पण
मस्तच.. हीच रेसीपी मी पण वापरते नेहमी ..
विदिपा:+१
लोला मी कोल्हापूरचा नसून
लोला मी कोल्हापूरचा नसून सुद्धा मला कसंतरीच वाटलं मिसळीच्या तर्रीला पातळ भाजी म्हंटल्यावर. हे म्हणजे पहिलवानाला गणपत पाटिल म्हणण्यासारखे आहे.
पदार्थ छान दिसतोय फोटोत.
मस्त! लोला यंदाच येताना
मस्त!
लोला
यंदाच येताना कोल्हापूरातुन मराठा दरबार चा अख्खा मसूर मसाला आणलाय...
मसुराची 'बित्तु' ची रेसिपि पण
मसुराची 'बित्तु' ची रेसिपि पण बेस्ट आहे
>>मला कसंतरीच वाटलं मिसळीच्या
>>मला कसंतरीच वाटलं मिसळीच्या तर्रीला पातळ भाजी म्हंटल्यावर
अगदी अगदी
आख्खा मसूर हा सातारा कराड कडच्या धाबेवाल्यांनी हाईप केलेला पदार्थ आहे असे माझे वैयक्तिक मत!
रेसिपी सोपी आहे. जयसिंगपूर
रेसिपी सोपी आहे.
जयसिंगपूर जवळ 'चक दे' रेस्टॉरंट आहे. तिथे केवळ अख्खा मसूर आणि रोटी एवढच मिळतं. आणि ते खाण्यास तूफान गर्दी असते.
>>आख्खा मसूर हा सातारा कराड कडच्या धाबेवाल्यांनी हाईप केलेला पदार्थ आहे असे माझे वैयक्तिक मत>><< बरोबर, इस्लामपूर ते कराड रोड वर 'फेमस' अख्खा मसूरची जाहिरातबाजी आहे.
बर्याच ठिकाणी आक्का मसूर
बर्याच ठिकाणी आक्का मसूर लिहितात.
माझी एक बेसिक शंका. नाव अक्खा
माझी एक बेसिक शंका. नाव अक्खा मसुर असुनही प्लेटमधे चवळी का आहे? मसुर असा असतो ना? http://en.wikipedia.org/wiki/Lentil
हा पण छान प्रकार. मूळचा
हा पण छान प्रकार.
मूळचा कोल्हापूरचा नक्कीच नाही. पुर्वी हॉटेलच्या मेन्यू कार्डावर पण नसायचा.
ते काळे ठिपके म्हणजे मोहरी
ते काळे ठिपके म्हणजे मोहरी आहे वाटतं. म्हणून चवळी सारखे वाटतायत दाणे बहुतेक.
सर्व प्रतिसादकांचे आभार. बाकी
सर्व प्रतिसादकांचे आभार.
बाकी धडधडीत अख्खा मसूर असे नाव लिहून मी मायबोली सारख्या स्थळावर चवळ्या दडपून देऊ शकतो इतपत 'डेरिंग' माझ्यात असेल अशी शंका बाळगणार्यांना भक्तिभावाने नमस्कार.
ते काळे ठिपके म्हणजे मोहरी
ते काळे ठिपके म्हणजे मोहरी आहे वाटतं. म्हणून चवळी सारखे वाटतायत दाणे बहुतेक.
>> हो, नवरा ऐकायलाच तयार नाहिये की ती चवळी नाहिये
अमेय, रेसीपी चांगली
अमेय, रेसीपी चांगली आहे.
नादखुळा ही मात्र टुम नाही बरं का. कोल्हापुरी भाषेतला नेहमी शब्द आहे तो.
>>चवळ्या दडपून देऊ शकतो इतपत
>>चवळ्या दडपून देऊ शकतो इतपत 'डेरिंग'
अहो, "बायको शाकाहारी आहे हे विसरलो" असे इथे लिहायचे डेअरिन्ग तुम्ही केले! त्यापुढे हे काहीच नाही.
लोला
लोला
Pages