मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

Submitted by वैवकु on 21 April, 2013 - 06:54

दैवाच्या गरम तव्यावर अस्तित्त्व थापले आहे
हळवेपण माझ्यामधले करपून चालले आहे

माझ्या ध्येयाचा आहे अंधारगावचा पत्ता
रस्त्यात दिव्याच्या खाली आयुष्य..थांबले आहे

वांझोट वाटते आहे संसारसुखाची शैया
कुठल्या वेश्येवर माझे वेडे मन जडले आहे ........ ( ##)

बोलणार नाही आता त्या तुझ्या विठ्ठलाशी मी
रुक्मिणीसारखे माझे ...'असलेपण' रुसले आहे

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

तू नकोस परतू आई थोपटून देण्यापुरती
रडरडून काळिज माझे अत्ताच झोपले आहे





_________________________________-

(##) =एक बेफीजींची ओळ होती , आय थिंक ती अशी होती की ...<<< हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले >>> !! ....त्यावरून
बेफीजी परवानगी न मागीतल्याबदल क्षमस्व!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलणार नाही आता त्या तुझ्या विठ्ठलाशी मी
रुक्मिणीसारखे माझे ...'असलेपण' रुसले आहे

>> व्वाह !!

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

>> छानच !!

तू नकोस परतू आई थोपटून देण्यापुरती
रडरडून काळिज माझे अत्ताच झोपले आहे

>> ____/\____ !! निव्वळ अप्रतिम ! रुतला काळजात....................!

अख्खी गझलच दर्जेदार.
काहून,मीहून हे बोलीभाषेतले प्रयोग गोडवा देणारे.
खयाल तीक्ष्ण.निखार आलेला आहे शब्दाशब्दाला वैभव, लेखनशुभेच्छा.

सर्वांशी सहमत. तुमचा गझलप्रवास दिवसेंदिवस गहिरा होताना पाहणे विलक्षण आनंददायी!

बहुतेक शेर आवडले.
गझल आवडली.
चांगल्या शेरापासून चांगल्या गझलेकडे जाण्याचा आपला प्रवास आश्वासक आहे.
भूषणशी सहमत.

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

सुंदर शेर.

मस्त !

वैभव कुलकर्णी,
प्रस्तुत गझलेत प्रचंड 'पोझिंग' असल्याने मला ही गझल फारशी आवडली नाही. तुम्ही उत्तम लिहू शकता, हे याआधी वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. हल्लीच्या काही गझलांत तुम्ही ठरवून "भारी" लिहिण्याच्या किंवा कोणाचे तरी अनुकरण करण्याच्या नादात बनावट शेर लिहित आहात, असे माझे मत झाले आहे. एखाद्या शेरात वारलेल्या आईला आणायचे, उगाचच वेश्या वगैरे भडकपणा करायचा किंवा बळजबरीने प्रत्येक गझलेत विठ्ठलाला ओढायचे- असा टाळ्याखाऊपणा करता करता तुम्ही 'तुमच्या' गझलेपासून दूर जात आहात, असे प्रामाणिकपणे वाटते.

बघा पटल्यास.

ज्ञानेश,

आपल्या मताचा 'आपले मत' म्हणून योग्य तो आदर आहेच. त्याबद्दल काही म्हणायचेही नाही. फक्त हे वाक्यः

>>>एखाद्या शेरात वारलेल्या आईला आणायचे<<<

मला व्यक्तीशः फारसे भावले नाही. ही दुर्घटना तशी नुकतीच झालेली असल्यामुळे तिचा परिणाम थोडा अधिक वारंवार गझलेत दिसणे मला तरी संभव वाटते.

** तुमच्या व वैवकुंच्या चर्चेत स्वतःहून पडण्याबद्दल दोघांसमोर दिलगीर आहे **

बेफिकीर यांच्याशी सहमत.
कवी दु:ख आणि दुर्घटनांमधून जास्त घडत असतो.कुणी व्यक्तीगत आयुष्यातल्या न पेलवणार्‍या दु:खांचे थेट प्रक्षेपण करतो, कुणी त्यांचे उन्नयन करून त्या दाबून टाकलेल्या दु:खावर प्रतिभेचा डोलारा उभारतो.
मोठेच उदाहरण द्यायचे तर ज्ञानेश्वर भयानक संकट-अन्याय परंपरेचा अतिशय लघु-उल्लेख 'बाप रखुमादेवी वरे विठ्ठले' या सिग्नेचर शब्दात (विठ्ठलपंत,रुक्मिणीबाईंची नावे त्यात गुंफून) करून त्यात आईवडिलांची अकाली अन्यायी ताटातूट जिरवून टाकतात.
तुकाराम संकटपरंपरेचे प्रकट शब्दात विवरण करतात.'बरे केले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामाजी..'' वगैरे अनेक..
कोण बरोबर ? कोण चूक? कोणीच नाही.ज्याचा त्याचा पिंडधर्म.
आपण या कारणास्तव जजमेंटल होणे मात्र नक्कीच चुकीचे.

भारतीजींशी सहमतः

वैभवः
विचार आपण करावा.
तुकाराम म्हणतो बाप मेला नकळता, नव्हती संसाराची चिंता
हेही पोझिंग की काय.
अतिशय कमी वाचन आणि साचेबद्ध-घडीव लिखाणाची बाधा ह्या खरोखरच चिंतेच्या गोष्टी नाहीत का?
राहिली प्रभावाची गोष्ट. तर तो सुरुवातीला काही काळ राहणे स्वाभाविक आहे.
कालांतराने त्यातून कवी स्वतःशी प्रामाणिक राहिला तर बाहेर पडतोच.
जसा तुकारामावरील माऊलींचा प्रभाव पुसट होताना जाणवतो.

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

अतिशय सुंदर शेर.
वैभव, खरेतर मी म्हणेन की आपल्या गझलेत विठ्ठलाचे येणे, ही आपल्या गझलेची ओळख ठरावी.
शुभेच्छा.

समीर चव्हाण

सगळे जण माझ्या गझलेविशयी इतके मनमोकळेपणे प्रेमाने व भरभरून बोलता आहात त्यासाठी सर्वांचा ऋणी

या वाक्यानंतरचा माझा प्रतिसाद ज्ञानेशजीना असणार आहे . ते माझ्या गझलेच्या विरोधात बोलत आहेत म्हणून नव्हे तर तिच्याबद्दल काही गैरसमज त्याना झाले आहेत म्हणून.
________________________________________________
मित्रवर्य ज्ञानेशजी मुद्दे वेगवेगळे हाताळायचा प्रयत्न करतो ................
__________________________________________________________
पोझिंग : क्षमस्व ! एक तर मला इंग्रजी फारसे जमत नाही वरून असे भारदस्त साहित्यिक संकल्पना व्यक्त करणारे शब्द मला माहीत नसतात त्यामुळे पोझिंग म्हणजे असते काय तुम्ही कशाला पोझिंग म्हणताय हेच समजले नाही
__________________________________________________________
गझल आवड्ली नाही : ठीक आहे माझी काहीच हरकत नाही आहे
हा तुमच्या वैयक्तिक अभिरूचीचा / विचारसरणीचा / सद्यस्थितीच्या मनोवस्थेचा /आवडीनिवडीचा प्रश्न आहे
त्यावर तुमचा अधिकार आहे
____________________________________________________________
ठरवून भारी लिहिणे : मी फक्त काय लिहायचे आहे ? ते असेच का लिहायचे आहे ? हे लिहून कोणात्या प्रकारचे "खाजगी" समाधान माझ्या मनाला साध्य करायचे आहे? हे ठरवतो .
ते भारी आहे असे नंतर लोक ठरवतात
________________________________________________________________
कोणाचे तरी अनुकरण : हा भाग तुमच्या एकूण प्रतिसादाचा गाभा आहे तुम्ही हे बेफींजींचे नाव न घेता म्हणताय
मी अनुकरण करत नाही आहे

मला हे माहीत आहे की एक गझलकार म्हणून आता मी जिथे उभा आहे (या गझलेतल दुसरा शेर वाचावा)तिथून पुढे जायला मला बेफीजींसारखे उत्तम व्हायचे आहे आणि त्यांच्याइतकेच उत्तम ही का व्हायचे आहे हे ही मला माहीत आहे .....
मला बेफिकीर नाही व्हायचे वैवकुच व्हायचे आहे !!!
मी बेफिकीर कशाल होवू ?अगदीच व्हावे वाटले तर मी विठ्ठल होईन फारतर !

बेफीकीर असणे व वैवकु असणे यातला फरक मला फार पक्का महीत आहे मी परवा समोरासमोर भेट झाली तेव्हा बेफीजीना तो सांगीतलाही इथे इतराना सांगावे अशी गरज मला वाटत नाही म्हणून नाही सांगत आहे
_________________________________________________________________
आता तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काही अढी असेल तर मला माहीत नाही घेणे देणे नाही

किंवा वैवकु बेफीना का महत्त्व देतो आहे इतराना (स्पष्टपणे म्हणायचे तर मला -ज्ञानेशला का नाही)असले प्रश्न पडू पाहत असतीलच पाडून घेवू नयेत

मी सर्वप्रथम कुणापुढे व्यक्त झालो तर ती मायबोली..... सर्वात आधी मी गझल इथे वाचली ती बीफींची निघाली मला आवडलेली सर्वात आधीची गझल तीच होय...मग माझे ज्यच्याशी गझल् विषयी संवाद सुरू झाले ते प्रथम बेफीच ठरले ...भांडलोही बीफींशीच सर्वात आधी (आजही कधी भेटतो तेव्हा वाद होतातच)...."मी तुमच्या गझलेवर प्रेम करतो , (तुमच्यावर नाही)" असे मला म्हणणारा पहिला माणूसही बेफीच........आयुष्यात पहिला वहिला जीताजगता गझलकार नावाचा माणूस प्रत्यक्षात भेटला ते बेफीच निघाल्रे .... पहिला व आजवरचा एकमेव गझलसंग्रह माझ्या संग्रही तो बेफिकीरीच !!!

आता असे का झाले असला प्रश्न मला कधी पडला नाही की मी कुणाला विचारलाही नाही ....विठ्ठलालाही नाही

तुम्हाला प्रश्न पडल असेल तर तर मला विचारून काय उपयोग स्वतःसही विचारून तरी काय उपयोग?

विचारायचे असेल तर तुम्हाला सांभाळणार्‍या अज्ञात हाताना तो विचारा !!!!!!!

_____________________________________________-

अज्ञात हातांवरून आठवले तुम्ही जे म्हणालात की <<<मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी >>>>

तर इथेच आपल्यात फरक आहे व तो इतकाच की तुम्ही ज्यास अज्ञात म्हणता तो विठ्ठलच आहे हे मला खात्रीशीर रित्या माहीत आहे असे मी म्हणतो आहे

हे एक पाउल पुढे असण्या सारखे आहे !!!!!!!!!!!

तुम्ही एकदा म्हणाला आसाल मी रोज म्हणतो गझलेतून इतकेच .........

आता रोज विठ्ठलाचे शेर करायचे की नाही हे मी ठरवणार तो माझा अधिकार आहे जो मी वापरून बसलो आहे

आजवर अनेकांनी म्हटले मला पण त्या कुणाचेच काय कुणाच्या बापाचेही मी ऐकणार नाही हे मी ठरवले आहे (बापाचे =पर्सनली घेवू नये आपणास माहीती आहे की असे म्हणायची मराठीत पद्धत आहे म्हणून :))

म्हणजे गझल करायची म्हणून न करता एका ध्येयास फिक्स करून मग मी हा प्रवास सुरू केला आहे व ते प्राप्त करायचे ठरवले आहे इतकेच

कुणी म्हणाले म्हणून मी माझे ध्येय का बदलू उगाचच !! अगदी विठ्ठलाने सांगीतले तरी ....???????

आतला आवाज माझा ऐकतो मी!
कौल हा माझाच मी फिरवू कशाला?
________देवसरांचा शेर

_______________________________________________________

वारलेली आई : माझ्या आईचा वारलेली असा उल्लेख करणे यापुढे समस्तांनी टाळावे माझ्या देखत तरी !!
वारलेली म्हणजे आता अस्तित्त्वात नसलेली व्यक्ती होय
आई माझ्या मनात आहे म्हणजे ती जगातही आहेच आहे
माझा एक शेर आहे
मला सोडून तू गेलीस आई .......................................(मेलीस नव्हे गेलीस!!)
अजुन विश्वास नाही बसत माझा

या गझलेतही ती गेलेली(कुठेतरी) आई आहे हा शेर वारलेल्या आईवर आहे असा गैरसमज नसावा

जसे माझे विठ्ठलाचे शेर माझ्या मनातल्या विठ्ठलावर आहेत तशीच ही आईही माझ्या मनातली आहे
मी जोवर जगीन तोवर तरी माझ्या मनातून जाणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य
______________________________________________________

बनावट शेर : मी त्या शेरातील भावनेच्या सत्यतेची प्रामाणिकपणाची प्रचिती आल्याशिवाय
शेर करत नाही

गझलेत आयुष्य मांडण्यात मला काडीचाही रस नसून मला माझ्या आयुष्यात गझल मांडायची आहे

मला माझ्या गझलेत विठ्ठल मांडायची इच्छा नसून मुळात माझी इच्छा माझी गझल विठ्ठलात मांडायची आहे

गझल साक्षात्कार आहे
जीवनाला भेटल्याचा
_____ सुप्रियाताईंचा शेर
_____________________________________________________

ज्ञानेशजी खरेतर तुम्ही चुकताय

उंबराच्या फुलागत कधीतरी माझ्या धाग्यावर उगवता त्रोटक खोचक लिहिता कुणाबद्दल मनात काही अढी असेलही ....राग मात्र माझ्या गझलेवर काढता

मी मागेही एक दोन विपू केल्यात की जरा माझ्या गझलेवर काही म्हणा मला समजूद्या काही नवीन जे की शिकता येईल या उद्देशाने पण् तुम्ही तसे काही कधी केले नाही

.अनेक दिवस तुम्ही स्वतःची गझल ही आणत नाही आहात इथे मायबोलीवरतरी .. मग माझ्यासारख्या नव्यांना काय समजणार खरी गझल काय असते असायला हवी व ज्ञानेशजी त्याबद्दल काय विचार बाळ्गून आहेत ते ?

तुम्ही तुमचा वावर आधी इथे वाढवायला हवा जास्तीत जास्त बोलते व्हायला हवे संवाद होतील वाद होतील पण म्हणणे आहे तरी काय हे तरी समजेल

वाटल्यास मला फोन नंबर द्या
माझा नंबर ९०२८५८८८४१ आहे
आपण बोलत जाऊ एकमेकाशी

____________________________________________________
जाता जाता बेफींचाच शेर आहे माझ्या आताच्या मनाचेच बोल असल्यासारखा आहे म्हण्नून देतो आहे केवळ गैरसमज नसावा

ओळीस दाद दे तू गंधीत मोहराची
असलो कसा जरीही मीही कवीच आहे

असलो कसा जरीही मीही कवीच आहे ......

~वैवकु

मला गझल --तितकीशी समज नाही
तरीही हिम्मत करते-- न पटल्यास सोडून द्यावे
................काळीज झोपल्यावर थोपटून देण्यास आईची गरज नाहीतेव्हा आईस
कष्ट नकोत........
एकदम बरोबर.

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे
>> अत्त्तिशय सुरेख शेर!

अवांतरः तुमच्या स्पष्टीकरणातला जवळजवळ सगळाच भाग वाचून गंमत वाटली. गझल शिकण्याच्या सुरूवातीच्या प्रवासामध्ये तरी फक्त आणि फक्त गझल शिकण्यावरच लक्ष द्यायला हवे आणि वाक्यांचे अन्वयार्थ लावून विषय भरकटवण्यापेक्षा तेवढ्यापुरतीच प्रतिउत्तरे द्यायला हवीत असं वाटलं...

शुभेच्छा!

ज्ञानेशच्या 'त्या' दोन शब्दांबद्दल खेद वाटला..

माझ्या ध्येयाचा आहे अंधारगावचा पत्ता
रस्त्यात दिव्याच्या खाली आयुष्य..थांबले आहे

सुंदर

सर्व शेरांत काहीतरी वेगळे आणि चांगले आहे असे वाटले.

अनुतापाचा शेर फार आवडला.

दिव्याचा शेर 'तुझी स्वतःची अनुभूती' वाटली.

प्रगतीपथावर आहेस, कीप इट अप.

म्हणणे संयमित शब्दांत मांडावे, आपोआप ठाम होते. एकदा गझल बोलायला लागली की आपल्याला बोलायची गरज पडत नाही हे लक्षात ठेव.

हम को शायर न कहो 'मीर' की साहिब हमने
दर्द-ओ-ग़म कितने किए जमा तो दिवान किया

धन्यवाद!

चर्चा वाचुन थक.... /थक्क झालो .

"मला बेफिकीर नाही व्हायचे वैवकुच व्हायचे आहे !!!
मी बेफिकीर कशाल होवू ?अगदीच व्हावे वाटले तर मी विठ्ठल होईन फारतर !">>> ही स्पष्टता आवडली . आणी गझलही

दैवाच्या गरम तव्यावर अस्तित्त्व थापले आहे
हळवेपण माझ्यामधले करपून चालले आहे <<<<<<<<<<<अस्तित्व दैवाच्या गरम तव्यावर थापणे........कल्पना हृद्य वाटली नाही! पुढे करपणे येणार आहे म्हणून ओढूनताणून आणल्यासारखी शब्दयोजना जिच्यामुळे शायराच्या प्रत्ययाविषयी वाचक साशंक व्हावा!..............वै.म.

माझ्या ध्येयाचा आहे अंधारगावचा पत्ता
रस्त्यात दिव्याच्या खाली आयुष्य..थांबले आहे <<<<<<<<<<<<अंधार गाव व दिवे या विरोधी शब्दांची आशयविरळ पखरण फक्त दिसली! काळजातून न आलेले शब्द वाटले!

वांझोट वाटते आहे संसारसुखाची शैया
कुठल्या वेश्येवर माझे वेडे मन जडले आहे <<<<<<<<<<अपु-या चिंतनातून आलेला, अपेक्षा ठेवणरा, पवित्रेबाज, डच करेजमधून आलेला शेर वाटला! वांझ/वांझोटा/वांझोटी......शब्द वाचले, ऐकले होते! वांझोट शब्द खटकला! संसारसुखाच्या शैय्येला वांझ म्हणणे एकवेळ पटले, पण वांझ व शैय्या शब्द आल्याने भडक आविर्भावातील वेश्येविषयक उद्गार अनाठायी वाटले! हाच आशय आल्हाददायक शैलीत जास्त जोरकसपणे मांडता आला असता! आशयापेक्षा/कल्पनेपेक्षा अनुकरणाच्या अट्ठासातून लिहिलेली द्विपदी वाटते!

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे <<<<<<<<<<काहून शब्द खटकला! काहीबाही नवीन करण्याचा मोहातून नसलेल्या शब्दाचा वापर व भाषेची/व्याकरणाची मोडतोड बघवली नाही व उच्चारताना कानास गोडही वाटली नाही! काहून/मीहून या शब्दांतली नादशरणता लगेच रसिकांना बोचते!...........वै.म.

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

बोलणार नाही आता त्या तुझ्या विठ्ठलाशी मी
रुक्मिणीसारखे माझे ...'असलेपण' रुसले आहे

त्यातल्या त्यात बरे शेर!(काहून शब्द वगळता)
,
अपुरे चिंतन, गझल पूर्ण करण्याची लगबग, शब्दशरणता, शब्दांची मोडतोड, अनुकरणाचा अट्ठाहास, स्वत:च्या पिंडाची अपुरी ओळख इत्यादी बाबी सदर गझलेत प्रकर्षाने जाणवल्या.............वै.म.

टीप: वरील सर्व मते वैयक्तीक आहेत जी या गझलेच्या वाचनावर आधारीत आहेत! इतरांची/स्वत: शायराची मते वेगळी असू शकतात ज्यांचा आम्हास आदर आहे

वैवकु मेल पहावे!

काहून शब्द खटकला! काहीबाही नवीन करण्याचा मोहातून नसलेल्या शब्दाचा वापर व भाषेची/व्याकरणाची मोडतोड बघवली नाही व उच्चारताना कानास गोडही वाटली नाही! काहून/मीहून या शब्दांतली नादशरणता लगेच रसिकांना बोचते

कुठल्या रसिकांविषयी आपण बोलत आहात, सतीशजी.
काहून बद्दल इतके काही खटकण्यासारखे आहे, असे मला वाटत नाही.
कधी-कधी भटांनी सुद्धा नियमांबाहेर जाऊन शब्दांची तोडमोड केली आहे.
दोन उदाहरणे देतो:

मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो

इथे ओठांपुनी (ओठांपासून) ही भटांची निर्मीती आहे. एक अतिशय हुशार भूमिका अशी घेतली जाऊ शकते की काहून काहीतरीच आहे आणि ओठांपुनी एकदम पर्फेक्ट. ही मते व्यक्तिसापेक्ष आहेत आणि राहतील.

अजून एक भटांची गझल पाहूया रिक्त शीर्षकाची.
मत्ला असा आहे:
उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

जेव्हा मत्ला वाचला तेव्हा उगिच मलातरी खटकले. एकवेळ तेही चालून जावे.
मात्र पुढे वाचल्यावर लक्षात आले की ह्या गझलेत मधुन, चुकुन, धरुन, कधि असे अनेक शब्द आलेत.
भटांची ही गझल लोकप्रिय आहे.

उमेश वैद्यांनी माझ्या गझलेवर एक अतिशय छान मत मांडले होते:
आशयाची/अर्थाची गळचेपी होत असेल आणि त्या कविस फॉर्म पेक्षा अर्थ अधिक महत्वाचा आहे असे खरोखर वाटत असेल तर सुट म्ह्णून घेण्यास काहिच हरकत नाही. सुट घेणे हे स्वातंत्र्य कवीचे आहे एकदा त्याने 'सूट' म्हणून घेतल्यावर. ती का घेतली? किंवा घ्यावयास नको होती ह्या अंगाने विचार करणे निरर्थक वाटते.

आपले अपुरे चिंतन, गझल पूर्ण करण्याची लगबग, शब्दशरणता, शब्दांची मोडतोड, अनुकरणाचा अट्ठाहास, स्वत:च्या पिंडाची अपुरी ओळख हे आरोप अयोग्य आणि टोकाचे वाटले.
एखाद्या नवोदित गझलकाराला खुलू देण्याचा अवधी तर द्या.
आपल्या अश्या प्रतिसादांनी आपले प्रतिसाद सकारात्मकतेने घेतले जावे ही अपेक्षा वाजवी तरी आहे का ?

धन्यवाद.

कुठल्या रसिकांविषयी आपण बोलत आहात, सतीशजी.<<<<<<<
सहृदयी ,प्रांजळ, परखड व निर्भय रसिकांविषयी!

काहून बद्दल इतके काही खटकण्यासारखे आहे, असे मला वाटत नाही.<<<<<<<<
आम्हास खटकले हे आमचे वै.म.

कधी-कधी भटांनी सुद्धा नियमांबाहेर जाऊन शब्दांची तोडमोड केली आहे.<<<<<<<<
हे स्पष्टीकरण होऊ शकत नाही डिफेंड करायला!

उमेश वैद्यांचे वै.म. पोचले! म्हणून आमचे वै.म. बदलत नाही!
मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो

या मतल्यातील ओठांपुनी शब्द आम्हास खटकतो!

आपले अपुरे चिंतन, गझल पूर्ण करण्याची लगबग, शब्दशरणता, शब्दांची मोडतोड, अनुकरणाचा अट्ठाहास, स्वत:च्या पिंडाची अपुरी ओळख हे आरोप अयोग्य आणि टोकाचे वाटले.<<<<<<
हे तुझे वै,म. झाले जे आमच्या वै.मताशी सुसंगत नाही! तरीही आम्हास सर्वांच्या मतांचा आदर आहे, जरी ती मते आम्हास पटत नसली तरी!

एखाद्या नवोदित गझलकाराला खुलू देण्याचा अवधी तर द्या.<<<<<<
सदर गझलकाराचे लेखन/सदस्यकाल पहावा! त्याचे इतरांच्या(आमच्या देखिल) गझलांवरील ऐटबाज/ढुढ्ढाचारी प्रतिसाद वाचावेत, तुला उत्तर मिळेल!
आपल्या अश्या प्रतिसादांनी आपले प्रतिसाद सकारात्मकतेने घेतले जावे ही अपेक्षा वाजवी तरी आहे का ?<<<<<<<<<<<<<,

परखड, प्रांजळ प्रतिसाद देणे हा आमचा पिंड आहे! कुणी तो प्रतिसाद कसा घ्यावा हे आम्ही ठरविणारे कोण? ते त्या त्या व्यक्तींचे डिस्क्रिशन आहे!

सुमार गोष्टींचे बेसुमार गोडवे गाणे आमचा स्वभाव नाही!

************इति कर्दनकाळ

चर्चा निराशाजनक होत आहे. या चर्चेत काही मुद्दे निघाले जे महत्वाचे वाटले व त्यावर माझे मत / मते देत आहे.

१. पोझिंग (पावित्रेबाज लेखन) - कोणतेही लेखन अथवा कलाकृती ही 'अपावित्रेबाज' असू शकते हे मुळात पटत नाही. कोणताही पावित्रा नाही हा एक पावित्राच आहे. मी पावित्रा घेत नाही हा एक पावित्राच आहे. पोझिंग न करता लेखन सोडाच, आयुष्य जगणेच अशक्य आहे. माणूस पावित्रा घेतल्याशिवाय कसे काय काही करू शकेल? भटसाहेबांच्या गझलेत आलेल्या अखंड पोझिंगला काय म्हणणार? ती गझल प्रामाणिक नाही असे म्हणणार? 'थांबणेही अघोरी कला यार हो', माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही, तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी, मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या, या ओळींवर भरभरून बोलणारे, निबंध लिहिणारे, स्वतः गाजणारे, हे सर्वजण हे नाकारू शकतील का की यात पोझिंग आहे? एकाला एक न्याय, दुसर्‍याला दुसरा आणि स्वतःला तिसरा अशी तिटप्पी धोरणे हाही एक पावित्राच नाही का? पोझिंग न करता व अगदी आतले, प्रामाणिक लिहायचे आहे म्हणून थांबलो आहे वगैरे हाही पावित्राच.

२. प्रभाव - प्रभावहीन लिहिणेही अशक्यच आहे. किंबहुना कसला तरी प्रभाव असल्याशिवाय काहीही लेखणीतून उतरणारच कसे? संवेदनशील मनाने जे टिपले ते आपल्याला भावलेल्या स्वरुपात जगासमोर आणणे या प्रक्रियेचा आरंभच मुळी प्रभावातून होतो. प्रभाव माणसाचाच असेल असे काही नाही. पण प्रभावाशिवाय लेखन ही एक काल्पनिक बाब आहे. अनुकरण मात्र नसावे व टाळावेच.

३. वैवकुंनी ज्ञानेश यांना दिलेल्या प्रतिसादाचा टोन पटला नाही. मात्र काही मुद्दे तेवढे पटले. अधिक लिहिणे, अधिक संवाद साधणे, मतमतांतरात सहभागी होणे, खोचक प्रतिक्रिया टाळणे हे मुद्दे पटले.

४. हा प्रतिसाद देण्याचे मूळ कारण हा चौथा मुद्दा! अन्यथा येथे वाचनमात्र यायचे ठरवलेले होते. कर्दनकाळ यांनी जो काही प्रतिसाद दिला आहे तो वाचून येथे लिहावेसे वाटले. त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रतिसाद हा 'वै.म' म्हणजे वैयक्तीक मत म्हणून दिल्याचे नोंदवले आहे. सगळेजण वैयक्तीक मतेच देत असतात. प्रातिनिधिक अथवा दुसर्‍याची मते येथे कोणी देत नाही. मग वै म असे म्हणून हवा तो प्रतिसाद द्यायचा आणि मग 'हे तुझे वै म आहे जे मला पटत नाही' आणि 'हे माझे वै म आहे ज्यावर मी ठाम आहे' असे काहीतरी म्हणत बसायचे याला काही अर्थ नाही. कर्दनकाळांच्या प्रतिसादात त्यांनी या गझलेला लावलेले निकष वाचून मी हा प्रतिसाद द्यायला येथे पुन्हा आलो. हे निकष त्यांच्या स्वतःच्या गझलांना लावायला सुरुवात केली तर ज्या चर्चा होतील त्याला हे व्यासपीठ पुरणार नाही. आडवळणे घेऊन, भारदस्त शब्दांची खैरात करून आणि मास्तरकीचा चष्मा लावून कलाकृतीकडे पाहण्याच्या अतिरेकामुळे विशुद्ध आस्वाद हा भागच संपत चाललेला आहे. कवीला स्वातंत्र्य आहे असे मान्य केल्यानंतर त्या कवीकडून आपल्यासमोर जे काव्य आले आहे ते तसेच्या तसे आस्वादायची भूमिका का घेतली जाऊ नये? बरं गणिती भूमिका घ्यायची आहे तर ती आपल्याही कलाकृतीला लागू होते असे इतरांचे 'वै म' असते हे का मान्य होऊ नये? शब्दांना शरण गेल्याशिवाय, चपखल शब्द आठवून आठवून लिहिल्याशिवाय, रोज एका गझलेची घाई केल्याशिवाय कर्दनकाळांची कोणती गझल झालेली आहे? निव्वळ 'मराठीत नसलेल्या' अश्या काही शब्दांचा (काहून, वांझोट वगैरे) वापर खटकणे हे महत्वाचे की घिसाडघाईने सामान्य शेर आपल्याकडून खरडले जात आहेत हे खटकणे महत्वाचे? वयाने वरिष्ठ असलेल्यांनी व लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांनी आपल्या लेखनातील चिंतन कसे पुरेसे आहे हे दाखवून द्यायला नको काय? बाकी वैवकु यांचे सर्वच गझलकारांना येणारे प्रतिसाद हे धाडसी, अनेकदा अनावश्यक मते ठासून भरलेले आणि चुकीचा रोख असलेले असतात हा माझाही अनुभव आहे, जो सध्या मला माझ्या गझलांवर त्यांच्याकडून येत नाही आहे. त्यामुळे इतर ठिकाणी वैवकुंनी दिलेल्या प्रतिसादाचा सूड कर्दनकाळांना या गझलेवरील प्रतिसादामार्फत घ्यावासा वाटणे हे समजू शकतो, पण कर्दनकाळांनी यापूर्वीही असे अनेक प्रतिसाद अनेकांना दिल्याचे ज्ञात आहे.

एकुणात, वैवकुंची ही गझल त्यांच्या आत्तापर्यंतच्या गझललेखनातील एक महत्वाची गझल आहे असे विधान पुरेसा वकूब नसतानाही करण्याचे मी साहस करू इच्छितो.

-'बेफिकीर'!

श्री.भूषण कटककरांनी आमचे नाव घेऊन आमच्या प्रतिसादावर जी अतार्किक टिपण्णी केली आहे(प्रतिप्रतिसाद) त्यामुळे खालील लिखाणाचा प्रपंच!
१) ‘पवित्रेबाज’ हे विशेषण वैवकुच्या एका शेरास आम्ही लावले आहे! समग्र गझलेस नव्हे!
२) इतर शेरांत आम्हास जाणवलेले मुद्दे आम्ही नि:संदिग्ध, परखड व निर्भय शब्दांत मांडले आहेत! अनाहूत कावकाव टाळण्यासाठी ही वै.मते आहेत हे मुद्दाम नमूद करायला आम्ही विसरलो नाही, ज्याचा अत्यंत चुकीचा व भ्रामक अन्वयार्थ कटककरांनी लावलेला पाहून चकीत झालो आहोत!(मूळ मुद्यास बगल देण्याची लकब वाखाणण्याजोगी वाटली!)
३) आम्ही केलेली विधाने ही वैवकुच्या सदरहू गझलवाचनावरील आहेत!
४) आम्ही लावलेले निकष कोणाच्याही(आम्ही धरून) कोणत्याही गझलेस लावता येतात, यात काहीच वाद नाही!
५) लावा ना आमच्या गझलेला ते निकष! योग्यच आहे! कुणी आडवले आहे कुणाला?
६) प्रत्येकाच्या गझलेला लावायला हवेत नवा शायर, जुना शायर, मुरब्बी, कसलेला शायर असा भेद न करता!
७) पवित्रा घेणे..........म्हणजे सज्ज होऊन उभे राहणे, जसे मल्ल डावा पाय पुढे ठेऊन कुस्तीस सज्ज होऊन उभे राहतात!
८) पवित्र्यात असणे...........भांडणास सज्ज असणे!
९) पवित्रेबाज........म्हणजे पवित्राशरणता! पवित्रा घेण्याचा अतिरेक करणारा, असा अर्थ ध्वनीत होतो.
१०) पवित्रा असणे/घेणे/पवित्र्यात असणे यात गैर काहीच नाही! त्याचा अतिरेक वाईट आहे.
११) पवित्रा वाईट नाही, पवित्रेबाजपणा अप्रशस्त आहे!
१२) ब-याचदा पवित्र्याचा नुसताच पोकळ आव असतो!
१३) जसे बराच वेळ नेम धरायचा व नंतर नेमका नेम चुकायचा!
१४) ब-याचदा पोकळ पवित्र्याला समोर ठेऊन कृत्रीमपणे न आलेला प्रत्यय लिहिला जातो, जे शेरात उघडे पडते!
१५) थोडक्यात शेरातील प्रत्ययाची अप्रामाणिकता, लिखाणातील अप्रामाणिकपणा, पवित्राशरणता हे सर्व बोचरे वाटते!
१६) पवित्रा जर प्रामाणिक प्रत्ययावर आधारीत असेल, अंतीम सत्याच्या जवळ जाणारा असेल, व कलात्मकरित्या अभिव्यक्त होत असेल तर चांगलेच आहे!
१७) पण, पोकळ पवित्र्याच्या हव्यासापायी, आशयविरळ शेरातील आणलेला आविर्भाव हा चाणाक्ष रसिकांच्या लगेच लक्षात येतो!
१८) अनुकरणाच्या अट्टहासातूनही हे असे होऊ शकते!
१९) इथे प्रस्तुत चर्चेत शेरात पवित्रा असणे/नसणे हा मुद्दा नसून तो पवित्रा किती प्रामाणिक/सच्चा व अनुभूतीजन्य आहे हे महत्वाचे आहे!
२०) नुसतीच पोकळ पवित्र्याची ऐट रसिकांच्या लक्षात येते!
२१) लेखनगर्भनिष्ठेच्या आभावामुळेही असे घडू शकते!
२२) भटांच्या कटककरांनी दिलेल्या ओळी ह्या भटांच्या अलौकिक प्रतिभेची, अचाट प्रज्ञेची, उत्तुंग कल्पनाविलासाची व मनाच्या तरलतेची साक्ष देतात!
२३) इथे पवित्रा/पवित्रेबाजपणा या सगळ्याच गोष्टी गळून पडतात, कारण या ओळींमधील आशयघनता व अनुभूतीजन्यता जी डोळ्यांस दिपविते! आपणास नतमस्तक करते!
२४) पवित्रा असावा नसावा या बिनबुडाच्या मुद्यावर चर्चा जात आहे हे पाहिल्याने हे लिहावे लगले!
२५) कुणामुळे प्रभावीत होणे गैर नाही, पण प्रभावातच अडकून पडणे/ अनुकरण करणे/स्वत:ची ओळख विसरणे हे मात्र गैर आहे!
२६) वैवकुने ज्ञानेश यांना दिलेल्या प्रतिसादाचा टोन<<<<<< no comments! कारण हा टोनच शायराच्या एकंदर पिंडावर प्रकाश टाकतो!
२७) कर्दनकाळाचा प्रतिसाद जिथे पोचायचा तिथे बरोबर पोचलेला दिसत आहे!
२८) आमच्या प्रतिसादात वै.म. असे लिहावे लागले कारण बरेच महाभाग त्याचे सार्वत्रिकीकरण करून काहीही तारे तोडतात!
२९) वैवकुच्या गझलेस लावलेले निकष आम्ही धरून कुणाच्याही कोणत्याही गझलेला लावायलाच हवेत, यात काहीच दुमत नाही!
३०) आम्ही गझलेची कधीच घाई करत नाही! गझलेस आमच्याकडून लिहून घ्यायची घाई झालेली असते!
३१) घाई ही व्यक्तीसापेक्ष आहे, जी शायराच्या प्रतिभेवर, प्रज्ञेवर, व्यासंगावर अवलंबून असते!
३२) शेरातील अपुरे चिंतन हे शेराच्या ओबडधोबडपणावरून व आशयविरळतेवरून लगेच कळते! तिथे शायराला झालेली घाई, त्याचा एकंदर उतावीळपणा लगेच कळतो!
३३) कोण रोज किती गझला लिहितो हा ज्याच्या त्याच्या प्रतिभेचा /प्रज्ञेचा/ व्यासंगाचा प्रश्न आहे!
३४) घिसाडघाई कर्दनकाळाच्या पिंडात नाही!
३५) प्रत्येक शब्दाची /प्रतिमेची चव घेत घेत लिहिणा-याला कसली आली घिसाडघाई?
३६) विशुद्ध आस्वादाची भाषा कधी कधी कुणाच्या मुखात शोभत नाही, हेच खरे!
३७) कुणाच्याही लेखनातील चिंतनावर लिहिणे हे महत्वाचेच आहे!
३८) पण, दुर्दैवाने याचेही इथे अनेकांना वावडे आहे!
३९) असे शेराचे विवेचन केल्यावर अनेक महाभाग म्हणतात की, शेरच बोलका पाहिजे!
४०) बरोबर आहे, शेर कितीही बोलका असला तरी काव्यकर्णबधिरांना कसे कळायचे की, शेर बोलतो आहे की, घुमा आहे!
४१) आम्ही प्रतिसादातून सूड उगवत आहोत हा एक निव्वळ गोड भ्रम आहे!
४२) चिलटांवर कसला उगवायचा सूड?
४३) आम्ही दिलेले कोणतेही प्रतिसाद व वैवकुने दिलेले प्रतिसाद कोणत्याही ख-या तज्ञाला दाखवावेत, उत्तर आपोआप मिळेल!
४४) कुणाच्याही एकंदर गझलप्रवासावर कोणतेही लेबल डकविण्याइतका कर्दनकाळ महान नाही!
४५) शेवटी आमचाच एक शेर देतो व थांबतो........
४६) इतकी अजून मोठी माझी तहान नाही!
इतका तुझ्याप्रमाणे मीही महान नाही!!.........इति कर्दनकाळ
**************कर्दनकाळ
****************************************************

सर्वांना नम्र विनंती आहे की यापुढे प्रतिसाद देताना प्रतिसाद केवळ १ मार्कांसाठीच आहे याची नोंद घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत जादा पुरवणी मागु नये, कागद महाग झाले आहेत.
प्रतिसाद ५ ओळींच्या पुढे गेल्यास तो फाउल धरला जाईल.

Biggrin

प्रिय कर्दनकाळजी आपल्या अशा प्रतिसादांमुळे जर इथे माझ्या धाग्यावर भांडणे झाली व यदाकदा संयोजकांनी माझ्या या धाग्यास अपाय केला तर मी आपणास माझ्या मनातून कधीही क्षमा करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही आता या धाग्यावर प्रतिसाद देणे थांबवा ही विनंती
कृपया इतर वाचकांनीही पुढील प्रतिसाद देताना योग्य ते भान ठेवावे ही कळकळीची प्रार्थना
टीपः एकंदर प्रतिसाद ४ ओळीत संपला! राहिलेली जागा वाया जाऊ नये म्हणून टीप दिली आहे बाकी काही नाही Wink

आदरणीय कर्दनकाळजी,

माझ्या प्रतिसादातील पहिले दोन मुद्दे ज्ञानेशसाठी व तिसरा मुद्दा वैभवसाठी होता. फक्त चौथा मुद्दा आपल्याला उद्देशून होता. आपल्या प्रतिसादावर वेळ मिळाल्यावर प्रतिसाद देईनच.

Pages