डॉ. आसावरी संत या इंदिराबाईंच्या नातसून. आपल्या आक्कांच्या आठवणी त्यांनी खास मायबोलीसाठी लिहून पाठवल्या आहेत.
माझी आक्कांबद्दलची पहिली ठळक आठवण ९२ सालची आहे. माझं निरंजनशी (त्यांच्या नातवाशी) नुकतंच लग्न ठरलं होतं. त्या वेळेला मी पुण्याच्या ससून रूग्णालयात इंटर्नशिप करत होते. आक्कांचे स्नेही, बेळगावचे प्रसिद्ध डॉ. याळगी यांचा नातू सहलीला जात असताना बस अपघात होऊन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी मी थोडीफार मदत केली, पण मुख्य म्हणजे रक्तदान केलं, हे समजल्यावर आक्कांनी मला एक सुंदर पत्र लिहिलं होतं. त्यात बेळगावशी आणि याळगी कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाचं खूप हृद्य वर्णन त्यांनी केलं होतं. त्यांच्या हळव्या मनाची ओळख करून देणारं ते पत्र. सोबत भेट म्हणून त्यांचं 'मृद्गंध' हे पुस्तकही त्यांनी पाठवलं होतं. या पहिल्याच पत्रभेटीने मी भारावून गेले. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे आक्कांची मी एखाद-दुसरीच कविता तोवर वाचली होती. माझ्या मराठी माध्यमातल्या मैत्रिणी यावरून माझी सतत थट्टा करत असत. इंदिरा संतांसारख्या ज्येष्ठ कवयित्रीच्या घरी मी त्यांच्या सहवासात राहणार आहे, याचा त्यांना खूप हेवा वाटत असे. मग त्यांनी आणि मी मिळूनच ’मृद्गंध' वाचून काढलं आणि आक्कांच्या संपन्न साहित्याशी माझं नातं जुळलं.
इंटर्नशिप संपल्यावर माझं लग्न झालं आणि मला लगेचच पोस्टग्रॅज्युएशनसाठी पुण्यात प्रवेश मिळाला. सासरी कोणाचा याला विरोध नव्हता, पण तीन वर्षं वेगळं राहायचं मला आणि निरंजनला पटत नव्हतं. म्हणून बेळगावच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. हे खाजगी कॉलेज असल्यामुळे कदाचित डोनेशन सीटचा प्रश्न आला असता, म्हणून मी निर्णय घेऊ शकत नव्हते. डोनेशन देण्याला माझा ठाम विरोध होता. पण तेव्हा माझ्या नकळत आक्कांनी माझ्या आईला निरोप पाठवला की, माझी संपूर्ण फी भरायची त्यांची तयारी आहे. ७७ वर्षांच्या निवृत्त प्राध्यापिकेनं एवढी मोठी रक्कम खर्चायला इतक्या सहज तयार असणं, ही किती मोठी बाब आहे, हे आज स्वतः कमवायला लागल्यावर कळतंय. त्या मागचा भाव कळतोय आणि त्यात कोणताही आविर्भाव नव्हता, हे विशेष जाणवतंय.
पुढे डोनेशन न देता, बॉन्ड सही करून मला बेळगावच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शिक्षण संपवून थोडी वर्षं नोकरी केली आणि परत दवाखाना काढायच्या वेळी पैशांचा प्रश्न आला. याही वेळेला आक्कांनी अगदी सहज एक मोठी रक्कम मला भेट दिली. स्वकष्टानं, सरळ मार्गानं कमावलेली ही रक्कम माझ्या व्यवसायाचा पाया आहे. मला आक्कांकडून मिळालेला हा आशीर्वादच आहे. पैशांच्या बाबतीत आक्का नेहमीच म्हणत 'मला कधी काही कमी पडत नाही. जेव्हा हवे असतात तेव्हा नेमके तेवढेच पैसे माझ्याकडे जणू आपोआपच आलेले असतात.' मलाच नव्हे अक्का सगळ्यांनाच सतत काही न काही देत असत. कुठल्याही संस्थेचे लोक आक्कांना भेटून जाताना देणगी, पुस्तकं, किंवा इतर काही उपयोगी वस्तू मिळाल्याशिवाय जात नसत. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी, लहानथोरांसाठी अगदी आगळ्या भेटवस्तू आक्कांकडे नेमक्या असत. पैसे, साडी, पुस्तकं, नाहीतर सत्कारात मिळालेली शाल त्या दिवशी भेटणार्या व्यक्तीला त्या अतिशय प्रेमानं देत असत. फुलं घरातील बायकांच्या केसात मायेनं माळत असत. अगदी जिव्हाळ्याची एखादी पाहुणी येणार असेल, उदा. सौ. कुवळेकर, वासंती मुजुमदार किंवा पुण्याच्या मावशी डॉ. वैजयंती खानविलकर, तर लगेच बाजारातून उंची साडी आणायला कोणालातरी धाडलं जाई. इतर वेळेला साध्या पोस्टाच्या तिकिटांचा किंवा कार्डांचा हिशोब ठेवणार्या आक्का भेटी मात्र कितीही किमतीच्या देत असत. आवडत्या लोकांना अथवा संस्थांना कधी बजेटचं बंधन नसे. असा खर्च करण्याबाबतीत त्या खूप अलिप्तपणे पैशांचा विचार करायच्या, असं मला वाटतं. भेट किंवा देणगी दिली तर परत त्याचा साधा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात नसायचा. कुठलाही कृत्रिमपणा त्या देण्यात नव्हता. आज समाजात लहानसहानन देणगी देऊन मोठेपणा मिरवणारे लोक बघितले, की आक्कांचा वेगळेपणा अधिक प्रकर्षानं जाणवतो. शिक्षिकेच्या पगारातून पै आणि पै साठवून जमवलेली पुंजी अतिशय सहजपणे सत्कार्यासाठी देऊन टाकत असत आक्का. लग्नाआधी मला खूप उत्सुकता होती की या मोठ्या कवयित्री घरात वागायला-बोलायला कशा असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल, लिहायला बसायची त्यांची ठरावीक बैठक / वेळ असेल का? पण तसं काहीच नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर आक्कांची 'मालनगाथा', लहान मुलांच्या कवितांच्या तीन पुस्तकं तसंच दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. हे सारं जवळजवळ आमच्या नकळतच म्हणावं लागेल. ही साहित्यनिर्मिती केव्हा घडायची, याचा आम्हांला पत्ताच लागत नसे. 'मी आता लिहायला बसते आहे. मला व्यत्यय नको आहे', वगैरे गंभीर वातावरण कधीही नसायचं घरात. रोज सकाळी आक्का स्वतःची खोली आवरून, कपड्यांच्या घड्या घालून ठेवत. चहा, न्याहारी आणि जेवण सगळ्यांच्या सोबतच घेत असत. चहाची भांडीसुद्धा स्वतः विसळून ठेवत असत. कोणी भेटायला आलं तर लगेच स्वतःचं लिखाण बाजूला ठेऊन त्याचं स्वागत करत असत. आक्कांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणाशीही संवाद साधू शकत होत्या. साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक, पत्रकार यांच्यापासून माझ्यासारख्या सामान्य मुलीशी गप्पा मारायला त्यांच्याकडे रंजक विषय असत. कुटुंबीयांवर आणि घरातील सर्व घडामोडींवर त्यांचं लक्ष असे. रोज घडणार्या सांसारिक गोष्टींमध्ये अगदी शेवटपर्यंत त्यांना रस होता. आमच्या रोजच्या गप्पा ऐकायला कधीही कंटाळायच्या नाहीत त्या. साध्यासाध्या गोष्टींमधून आनंद घेण्याची अमर्याद क्षमता त्यांच्यात होती. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांची मानसिक - भावनिक गुंतवणूक होती. आमच्या लहानसहान गोष्टींचं मोठं कौतुक होतं त्यांना.
लग्नापूर्वी निरंजनकडून त्याच्या या अतिशय प्रेमळ आजीबद्दल ऐकलं होतं. लहानपणी आक्का त्याला कशा गोष्टी सांगत असत, किंवा सहलीला जायची परवानगी त्याच्यावतीनं बाबांकडे कशी परवानगी मागत असत, त्याच्या सर्व हट्टांना पैसे कसे पुरवत, अशा अतिशय गोड गोष्टींमधून नऊवारी नेसणारी, सर्वांना असते तशीच त्याची आजी माझ्या डोळ्यांसमोर उभी राही. आक्कांना सिनेमा पाहायला आवडायचा आणि थिएटरमध्ये त्यांचा कुत्रा 'राहुल' त्यांच्या खुर्चीखाली बसायचा हेही मी अनेकदा निरंजनकडून ऐकलंय. त्या पोस्टात निघाल्या की त्यांचं मांजर म्हणे रस्त्याच्या कडेकडेनं त्यांच्यापाठोपाठ पोस्टात जाऊन यायचं. बेळगावहून पुण्याला जाताना कुत्रीमांजरी असा सगळा लवाजमा रेल्वेने प्रवास करत असे. या सर्व गमतीजमती ऐकताना मला खूप आश्चर्य वाटायचं. पण हे सगळं खरं होतं, हे लग्नानंतर लक्षात आलं. आक्का जेवायला बसल्या की त्यांच्या दोन्ही बाजूंना आमचं श्वानपथक आशाळभूतपणे बसलेलं मी रोज पाहायचे. मग आपल्याच बशीतून त्यांना चहा दिला जाई किंवा तूप-मोरंबा-पोळीचा स्पेशल घास भरवला जाई. बाहेर फिरताना कुत्र्याचं पाण्याचं भांड धुऊन त्यात ताजं पाणी आठवणीनं भरून ठेवायच्या आक्का. नवीन बॉक्सर जातीचा कुत्रा घरी आला तेव्हा आक्कांनी मला पैसे देऊन दुकानात पाठवलं. त्याच्या नकट्या नाकाला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्यासाठी नवी भांडी घेऊन यायला लावली. त्यांच्या आणि त्यांची बहीण ताई ( सौ.कमला फडके) यांच्याकडील कुत्री, मांजरं, माकडं व इतर पाळीव प्राण्यांच्या गमतीजमती, स्वभाव, वेगवेगळी विचारपूर्वक ठेवलेली नावं हे विषय आजही निरंजनला बोलायला - आठवायला आवडतात. आमची मुलगी आभा आणि तो या गोष्टींमध्ये खूप रमतात.
माझी नणंद रमा ही आक्कांची अतिशय लाडकी. रमा नुकतीनुकती कविता करू लागली होती आणि ती व तिची मैत्रीण सुमा त्यांच्या नव्या कविता आक्कांना दाखवायला घेऊन येत असत. अतिशय प्रेमाने आक्का त्यांत सुधारणा सांगायच्या. रमाच्या मैत्रिणींनाही कधी आक्कांच्या मोठेपणाचा संकोच वाटला नाही. सगळ्यांशी जवळीक साधायची आक्कांची एक खास शैली होती. लहानांमध्ये मिसळायची खुबी होती. त्यांच्या सगळ्या नातवंडांवर त्यांची खूप माया होती. आम्ही त्यांच्याजवळ राहत असल्यामुळे थोडं जास्त प्रेम आमच्या वाट्याला आलं. आभाला (त्यांच्या पणतीला) त्यांच्या खोलीत मुक्त प्रवेश असे. भिंती रंगवायची मुभा असे. दुपारचा कितीतरी वेळ आक्का तिच्याशी खेळण्यात घालवायच्या. तिच्या प्रत्येक नव्या कर्तृत्वाचं आक्कांनी कौतुक केलं. अंगात त्राण नसतानाही लाडानं कडेवर घेतलं. आपली बालकवितांची तीनही पुस्तकं त्यांनी आभाला दिली आहेत. मी आणि माझी मुलगी त्यांच्या सहवासानं खरंच कृतार्थ झालो आहोत.
पण आमचं थोडं दुर्दैव असं की, त्या काळात आक्का वयामुळे आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे थकल्या होत्या. ऐकू कमी यायचं म्हणून इतरांशी संवाद थोडा कमी होता. पण त्या परिस्थितीत आई (म्हणजे माझ्या सासूबाई आणि आक्कांच्या सूनबाई सौ. वीणा संत) शक्य तितक्या जोरात बोलून घरातल्या सगळ्या घडामोडी आक्कांना सांगायच्या. सकाळी बाबा, निरंजन आणि मी कामाला गेलो की आई आणि आक्कांचा क्वालिटी टाइम असे. तासभर तरी टेबलावर नाश्ता करत दोघींच्या गप्पा व्हायच्या. कानाचं मशीन लावायला आक्कांना अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे आईंना वरच्या पट्टीतच बोलावं लागे. एकदा आमच्या शेजारीणबाईंनी मला विचारलं, 'तुम जब बाहर जाते हो तब वीणाताई बिचारी आक्का कों क्यो चिल्लाती है? जोरात बोलण्याचा तिने वेगळाच अर्थ काढला होता आणि आमच्या घरात पुढचे बरेच दिवस विनोदाला एक विषय मिळाला. शेवटच्या दिवसांत तर आक्कांशी संवादाचा एकाच मार्ग उरला - आई. आम्ही घरातले सर्व आणि बाहेरचे पाहुणेही सगळे निरोप आईंमार्फतच देऊ लागलो. कोणी भेटायला येणार, घरचं कोणी गावाला जाणार असेल, घरात काही बदल करायचा असेल - कितीही किरकोळ किंवा अगदी महत्त्वाची गोष्ट आई मुद्देसूदपणे त्यांना सांगायच्या. कराडहून काकांचा किंवा जालन्याहून आत्त्यांचा फोन आला की सगळ्या बातम्या आई लिहून ठेवत आणि न विसरता सविस्तर आक्कांना सांगत. इतक्या मोठ्या आवाजात सांगणं दिव्यच असायचं आईंसाठी खरतर, पण अगदी शेवटपर्यंत आईंनी हे व्रत पाळलं. त्यांची शारीरिक तब्येत तर आई समर्थपणे सांभाळायच्याच, पण माझ्या मते त्यांचं मन सर्वांत जास्त आईंनाच कळलं होतं. त्यामुळे घरातल्या कोणाकडूनच आक्कांचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून आई सतत सतर्क असायच्या.
आक्कांचं आणि आईंचं नातंही अगदी जगावेगळं होतं. सासू-सून, सासर-माहेर या पारंपरिक बंधनांपेक्षा वेगळ्या पातळीवर त्या वागताना मी बघितल्या आहेत. आईंच्या माहेरचे लोक आक्कांच्या खास जिव्हाळ्याचे. या खानविलकर मंडळींची नियमित चौकशी आक्का करत असत. आईंची भाचरं आक्कांना आपल्या नातवंडाइतकीच जवळची वाटायची. दोन्ही घरांमध्ये अगदी मोकळेपणाचं नातं होतं. वैजयंतीमावशी (खानविलकर) व मंग मावशी (गोगटे) या आईंच्या दोन बहिणी आक्कांच्या खास लाडक्या होत्या. दोघींना साडी किंवा अत्तर घेऊन द्यायला, नवीन पुस्तकांबद्दल दोघींशी चर्चा करायला आक्कांना खूप आवडायचं. या सर्वांच्या सहवासात त्या रमायच्या, सुखावायच्या. आक्कांबद्दलच्या आदरामुळे निर्माण झालेलं समोरच्या व्यक्तीपर्यंतचं अंतर आक्का स्वतःच मिटवून टाकायच्या. प्रसन्न हसत सगळ्यांशी अगत्यानं वागायच्या. प्रत्येक पाहुण्याला दारापर्यंत निरोप द्यायला यायच्या. बागेतल्याच एखाद्या फुला-पानाचा गुच्छ त्या गाडीत लावायला द्यायच्या.
आई सुगरण गृहिणी आहेत याचा आक्कांना अभिमान होता. सुनेनं केलेले सर्व पदार्थ अगदी पुरणपोळी, श्रीखंड, नॉन-व्हेजपासून मेक्सिकन किंवा चायनीज पदार्थही अक्का चवीनं चाखायच्या, आवडीनं खायच्या. आक्कांनी स्वतः अनेक पाककृती गोळा केल्या होत्या. एका भाजीचे अनेक प्रांतांतील प्रकार किंवा अनेक वेगळ्या पद्धती त्यांनी खूप नेटकेपणानं संग्रहित केल्या होत्या. दुर्दैवानं त्या आम्ही कधी प्रकाशित करू शकलो नाही. पण जेवणाबद्दल चर्चा करायला, वेगळं काही आईंनी केलं की त्याबद्दल अभिप्राय द्यायला त्यांना आवडायचं.
आक्कांच्या पुस्तकांचा प्रताधिकार (कॉपीराइट) आईंकडे आहे. दोघींचं बँकेत जॉइंट अकाउंट होतं. सर्व समारंभांना, सत्कारांना, कार्यक्रमांना आई त्यांच्याबरोबर जात असत. सासू-सुनेचं इतकं ममतेचं नातं क्वचितच बघायला मिळतं, नाही? आक्का जशा शरीरानं दमात गेल्या तशातशा त्या मनानंही आईंवर खूप अवलंबून राहू लागल्या. दिवसातून कितीतरी वेळा त्या खोलीतून 'वीणा' अशी हाक मारत. आक्कांच्या सगळ्या वेळा आई काटेकोरपणे सांभाळत. सकाळदुपारच्या गोळ्या काढून ठेवणं, मध्ये कधीतरी वेगळं सरबत किंवा एखादं फळ कापून त्यांना देणं किंवा चावायला त्रास होऊ नये म्हणून भाताची पेज, त्यात भाज्या किंवा तूप-मेतकूट घालून शक्य तितकी चविष्ट करण्यासाठी आई नेमानं प्रयत्न करत असत. आक्कांच्या डोळ्यांतील ग्रंथी अनेक वर्षं निकामी झाल्या होत्या. त्यांचे डोळे सारखे कोरडे व्हायचे, म्हणून दर दोन तासांनी डोळ्यांत औषध घालावं लागे. हे काम करायलासुद्धा त्यांना शक्यतो आईच हव्या असत. दोघींचे स्वभाव अगदी वेगळे असले तरी त्यांच्या निखळ निस्वार्थी नात्यात कधीच अडथळा आला नाही. आक्कांच्या जाण्यानं आईंच्या आयुष्यात खरोखरच भरून न निघणारी पोकळी मिर्माण झाली आहे. आक्कांच्या आठवणीनं त्या आजही गहिवरतात, बेचैन होतात.
मला वाटतं बाबांचं, माझे सासरे श्री. रवींद्र संत यांचं आपल्या आईशी आदरयुक्त स्नेहाचं नातं होतं. ते दोघं घरामध्ये एकमेकांशी फारसे बोलताना दिसत नसत. पण दोघांनाही एकमेकांची काळजी लागून राहिलेली कळत असे. बाबांना आक्कांनी कष्ट करून, खडतर परिस्थितीत आपल्या तिन्ही मुलांना दिलेल्या सुंदर बालपणाबद्दल अपार कृतज्ञता होती. त्या आजारी असल्या की ते खूप बेचैन व्हायचे. सतत आईंकडे त्यांची चौकशी करायचे. बाबा मितभाषी असल्यामुळे सगळ्या विवंचना मनात भरून ठेवायचे, याची आक्कांना काळजी असे. बाबांचे जवळचे मित्र श्री.विनोद कुलकर्णी गेले तेव्हा आक्कांनी मला आणि निरंजनला खोलीत बोलावून घेतलं. म्हणाल्या, तुम्हां सर्वांनी आता रवीची आता जास्त काळजी घ्यायला हवी. तो मनातलं दुःख बोलून दाखवत नाही, एकटा शांतपणे सहन करतो. तुम्ही त्याला एकटं वाटू देऊ नका, त्याला बोलतं करा.
आपल्या आईला स्वतःचं घर असावं म्हणून व्यवसाय चालू केल्याच्या थोड्याच दिवसांनी बाबांनी आमचं आत्ताचं राहतं घर बांधलं. ते स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे उत्तम सजवलं, भोवती बाग लावून बहरवलं. या सगळ्याची आक्कांना जाणीव होती. खूप आनंद होता. कराडच्या काकांचं घरही ते भूगर्भशास्त्रज्ञ होते म्हणून कसं विचारपूर्वक बाबांनी डिझाइन केलंय, हे त्या आम्हांला नेहमी सांगत असत. बाबांशी त्यांचे कधी मतभेद, वाद झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य - आचार-विचार सगळ्यांचंच. याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं, तर आक्का स्वतः कधी देवपूजा, पोथीवाचन, आरती वगैरे करत नसत. पण आईंची देवावर श्रद्धा आहे आणि नातवंडांची हौस म्हणून आमच्या घरी गणपती असतो.
इतरांची मतं स्वीकारून एक कुटुंब म्हणून कसं राहावं, हे मी खरच आक्कांकडे आल्यावर शिकले. आपापसांत तरल, सच्चं, घट्ट नातं कसं जोपासायचं याचं त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून उदाहरण घालून दिलं होतं. आपलं माणूस म्हंटलं की त्याच्या गुणदोषांसकट त्याच्यावर अतोनात प्रेमाचा वर्षाव त्या करायच्या. प्रत्येकाच्या स्वभावातले कंगोरे जाणूनही त्यांच्या वागणुकीत कधी फरक व्हायचा नाही. निर्मल, मोठं मन होतं त्यांचं. त्यांचा जो काही सहवास मला लाभला ते खरोखरच मी माझं भाग्य समजते. त्यांच्याबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. पण त्यांची नातसून असण्याखेरीज माझी कोणतीच पात्रता नाही. जे लिहिलं आहे, तेही लहान तोंडी मोठा घासच आहे. त्यासाठी मनोमन आक्कांच्या स्मृतीला वंदन करुन त्यांची माफीच मागितली पाहिजे, अशी माझी भावना आहे. आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे त्या मला क्षमा करतील, याची पूर्ण खात्री बाळगूनच हा लेख त्यांना अर्पण करते.
या लेखातील इंदिरा संत यांचं छायाचित्र डॉ. आसावरी संत यांच्या सौजन्याने, त्यांच्या खासगी संग्रहातून.
फार सुरेख लिहिलंय,
फार सुरेख लिहिलंय, आसावरी
संयोजक, आमच्यापर्यंत लेख पोचवल्याबद्दल अपरंपार धन्यवाद
लेख आवडला.
लेख आवडला.
अतिशय मोजक्या शब्दांत
अतिशय मोजक्या शब्दांत मांडलेलं व्यक्तिचित्रण! खूपच आवडलं.
धन्यवाद संयोजक.
सुरेख!
सुरेख!
अप्रतीम लेख!
अप्रतीम लेख!
फार सुरेख लिहिलंय,
फार सुरेख लिहिलंय, आसावरी
संयोजक, आमच्यापर्यंत लेख पोचवल्याबद्दल अपरंपार धन्यवाद >>>>>>>+१११११११
इंदिरा संतासारख्या
इंदिरा संतासारख्या प्रतिभावतीच्या नातसुनेला शोभेसा विनम्र घरंदाज शैलीचा लेख,वाचून आनंद झाला..
फारच गोड लिहिलंय या डॉक
फारच गोड लिहिलंय या डॉक नातसुनेने ...
का कोण जाणे इंदिराबाईंच्या या खालील ओळी सतत आठवत होत्या आज -
अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
""हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव ....""
संयोजक, आमच्यापर्यंत लेख पोचवल्याबद्दल अपरंपार धन्यवाद >> +१०००.....
सुंदर प्रतिसाद शशांकजी,आभार
सुंदर प्रतिसाद शशांकजी,आभार ही कविता येथे टंकल्याबद्दल. आणि तो सिग्नेचर शेवट- 'हे माझ्यास्तव,हे माझ्यास्तव..''
नि:शब्द.
अगदी आतून आलेलं सच्चं आणि
अगदी आतून आलेलं सच्चं आणि ओघवतं लिखाण. अतिशय सुरेख लिहिलं आहे तुम्ही आसावरी !
संयोजकांना अनेकानेक धन्यवाद
खुप सुंदर आठवणी आहेत.
खुप सुंदर आठवणी आहेत.
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद !!! फारच सुंदर लेख.
धन्यवाद !!!
फारच सुंदर लेख. वैद्यकीय व्ययसायात असुन अतिशय ओघवत्या, नेमक्या आणि संवेदनशील शब्दांकन केल्याचे कौतुक वाटते.
महान लेखिका इन्दिरा संत यांनी संस्कारक्षम अशा नातसुनेवर केलेले संस्कार ... दुसरे काय?
- संजय संती,
खार्टुम, सुदान
संयोजक, आमच्यापर्यंत लेख
संयोजक, आमच्यापर्यंत लेख पोचवल्याबद्दल अपरंपार धन्यवाद << +१.
खूप सुंदर, ओघवतं आणि सच्चं लिहिलं आहे.
हृद्य आठवणी. धन्यवाद.
हृद्य आठवणी.
धन्यवाद.
खुप सुंदर
खुप सुंदर
खूप प्रामाणिक लेख. अगदी आतून
खूप प्रामाणिक लेख. अगदी आतून आलेला वाटतो. याबद्दल डॉक्टर आसावरींना नम्र अभिवादन! आणि संयोजकांचे शतश: आभार!
-गा.पै.
वरच्या सगळ्यांनाच डिट्टो. ती
वरच्या सगळ्यांनाच डिट्टो.
ती कविता पण फारच मस्त आहे.
धन्यवाद ! लेख आवडला
धन्यवाद !
लेख आवडला
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त लेख. // मितभाषी बाबा
मस्त लेख.
// मितभाषी बाबा म्हणजे लंपूचा भाऊ बिट्या कि काय!?
लेख आवडला. कवितेतून ओळख होत
लेख आवडला. कवितेतून ओळख होत असली तरी 'कवी तो होता कसा आननी' हे कुतूहल आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना असतंच. या लेखातून त्या पैलूचा हृद्य परिचय होतो.
सुंदर साध्या घरगुती आठवणी फार
सुंदर साध्या घरगुती आठवणी फार आवडल्या. धन्यवाद.
मितभाषी बाबा म्हणजे लंपुचे काका असतील मृदुला.
हा लेख फार म्हणजे फारच आवडला.
हा लेख फार म्हणजे फारच आवडला. सुसंस्कृत, साहित्यिक कुटुंब "दिसतंय" लेखातून.
नाही रैना, मृदुलाचं बरोबर
नाही रैना, मृदुलाचं बरोबर आहे. बिट्ट्याच
लंपन पूर्ण समजून घ्यायचा असेल तर इंदिराबाईंचं मृद्गंध आणि गवतफुलाची कविता दोन्ही वाचणं आवश्यक आहे असं मला नेहेमी वाटतं. लंपनच्या आयुष्याचे आणखी काही तुकडे/भाग वेगळ्या दृष्टीकोनातून गवसत जातात...
लंपनचा संबंध नाही कळला
लंपनचा संबंध नाही कळला
ओह.. ओके. तसं म्हणतेस आले
ओह.. ओके. तसं म्हणतेस आले लक्षात वरदा, मृद्ला.
नताशा, लंपनचे लेखक प्रकाश संत
नताशा, लंपनचे लेखक प्रकाश संत हे इंदिराबाईंचे ज्येष्ठ पुत्र. आणि लंपन खूपसं आत्मचरित्रात्मक आहे.
फारच छान लेख आहे. अतिशय
फारच छान लेख आहे. अतिशय प्रसन्न वाटलं वाचून.
ओह अच्छा..असं आहे का? धन्यवाद
ओह अच्छा..असं आहे का? धन्यवाद वरदा. मृद्गंध वाचीन आता पुन्हा.
Pages