***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २
आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
आमचे गोंय - भाग ९ - गोव्याची सांस्कृतिक जडणघडण
आमचे गोंय - भाग १० - गोव्याची खाद्यसंस्कृती
आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज
***
आजचा गोवा
६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही.
त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला.
ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो अमका अमका जागा भाड्याने द्यायची म्हणत होता!” लगेच माझ्या नवर्याला स्कूटरवर घेऊन तो जागा बघायला रवाना झाला आणि म्हापश्याला बसमधून उतरल्यापासून अर्ध्या तासाच्या आत घराची किल्ली त्याच्या हातात होती! तो खरंच बॆंकेचा स्टाफ आहे का, सांगतोय तोच आहे की दुसरा कोणी आहे, काही न विचारता मालकाने जागा भाड्याने दिली! गोंयकार कोणावरही पटकन विश्वास टाकतो. अगदी आपुलकीने बोलायला लागतो. पण याच सवयीने गोव्याचा हळूहळू घात झाला. अगदी काश्मिरी, नेपाळी गुन्हेगार, रशियन आणि इतर काही ड्रग्ज विकणारे आणि इतर परदेशी लोकही किनार्यांवर भाड्याने जागा घेऊन बस्तान बसवून राहिले. आता परदेशी नागरिक इथे राहून हॉटेल्स चालवायचे धंदे कसे करतात, हळूहळू जागा विकतही कशा घेतात, मला माहिती नाही पण हे सगळीकडे सर्रास ऐकू येतं. ड्रग्स विकणारे आणि रेल्वेतून आलेले गुन्हेगार यानी गोव्याला फास लावलाय.
शाळा कॉलेजांमधे ड्रग्स विकणारे आणि विकत घेणारे असतात हे मुलंही सांगतात. काही पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू, वाढलेली गुन्हेगारी, पर्यटकांचे वाढते अपघात गोव्याच्या बाह्य जगात असलेल्या आकर्षक चित्राला कमीपणा आणतात हे नक्कीच! विशेषत: किनार्यांवर हे सगळं मोठ्या प्रमाणावर चालतं असं ऐकिवात आहे. वर वर शांत दिसणार्या, गोव्यात आतपर्यंत खूप खळबळ चालू आहे. मुंबईहून आलेल्या आमच्या काही कलिग्जना एका किनार्यावर काही हिंदी बोलणार्यांनी “इथे बसलात तर कापून काढू” अशी हिंदीतून धमकी दिलेली मला माहिती आहे. आज अशी परिस्थिती आहे, की आमच्यासारखे सामान्य घाबरट लोक फक्त पणजीच्या मिरामार किनार्यावर जातात आणि जास्त उशीर न करता परत येतात.
गोव्याला भेडसावणारा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खाणींचा. गोव्यात जंगल प्रदेशात लोह खनिजाचे मोठे साठे भूगर्भात आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी खाणमालक आणि राजकारणी यांनी अंदाधुंद खाणी सुरू केल्या आणि त्यामुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम घडून आले. काही ठिकाणी जलस्रोतांवर परिणाम झाले, तर बहुसंख्य भागात लोक खाणीतून काढलेल्या खनिजांच्या धुळीमुळे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. रस्ते, घरे सगळ्यांवर धुळीचे थर, एवढंच काय जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी वस्त्यांमधे येताहेत आणि विनाकारण मरण पावताहेत. काही दिवसांपूर्वी वाळपईजवळ एका ढाण्या वाघाला मारल्याचे फोटो आले त्यानंतर गोव्यात पट्टेरी वाघ आहेत का यावर चर्चा सुरू झाल्या. जुने लोक सांगतात की गोव्याच्या कर्नाटक हद्दीवरील जंगलांत ढाण्या वाघाचं अस्तित्व आहे, पण जंगलं वाघांसाठी संरक्षित करावी लागतील या भीतीने काही लोक ते होऊ द्यायला तयार नाहीत.
गोव्यातली गाड्यांची वाढती संख्या, लहान आणि वळणावळणांचे रस्ते, यामुळे अपघातांचं प्रमाणही लक्षणीय आहे. पण देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असल्याची ही गोव्याला चुकवावी लागणारी किंमत आहे. शेजारच्या महाराष्ट्र् आणि कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि गाड्याही स्वस्त आहेत. तशीच दारूही स्वस्त आहे, वाढत्या अपघातांना या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.
गोव्यातल्या संधीसाधू राजकारणावर सगळेच ताशेरे ओढतात, पण त्याचे इतर काही दुष्परिणाम आहेत, त्यावर कोणीच कायमस्वरूपी इलाज शोधत नाही. कारण तशी इच्छाशक्ती कोणत्याच पक्षाकडे नाही. सत्ता चालवण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंगमेकर आमदारांचा आधार घ्यावा लागतो, हे आमदार लहान मतदारसंघांमुळे सगळ्याच मतदारांच्या ओळखीचे असतात. मग कोणाचीही कसली मागणी पुरी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसतं. यात काही काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यात भलतेच कोणी भरडून निघतात.
२ वर्षांपूर्वीएक विचित्र कायदा करण्यात आला. जुन्या पुरातन वास्तू संवर्धनासाठी खाजगी व्यक्तींकडे हस्तांतरित करण्याचा. एवढंच नाही तर या खाजगी व्यक्तींना संवर्धनासाठी या पुरातन वास्तू पाडून परत बांधण्याचा परवानाही या कायद्यात आहे. शिवाय कोणीही या कायद्याला न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे! या कायद्याचे परिणाम काय होऊ शकतात हे अगदी कोणाच्याही लक्षात सहज यैइल. उद्या कोणीतरी हॉटेलवाला एखादी पुरातन वास्तू ताब्यात घेऊन तिथे हॉटेल चालू करील आणि आपण त्या जागेचं संरक्षण करतोय असं सांगेल. किंवा मन मानेल तसं त्या वास्तूचं नूतनीकरण करील. खांडेपार इथल्या सप्तकोटेश्वर देवळाची अशीच पुनर्बांधणी करण्यात आली आणि ती मूळ देवळासारखी नाही हे फोटो पाहताच चटकन लक्षात येतं. पण या कायद्याला फारच थोडे लोक विरोध करतायत. पणजीच्या धेंपे कॉलेजातील इतिहासतज्ञ प्रा. प्रज्वल साखरदांडे हे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या लोकांपैकी एक.
गोव्यातले बरेच तरूण परदेशी स्थायिक होतात. तिथून आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात. शिवाय पूर्वीपासून गोव्यात बरेच लोक बर्यापैकी पैसे बाळगून आहेत. त्यामुळे कष्टाची कामे करायला मनुष्यबळ नाही. प्लंबर वगैरे कुशल कामगार बहुधा परदेशीच जातात. त्यामुळे इथे जी उणीव भासते ती पुरी करण्यासाठी शेजारच्या कर्नाटकातले, केरळातले आणि अर्थातच उत्तर भारतीय लोक गोव्यात स्थायिक होतात. आजघडीला फळं आणि भाजीपाल्याचा व्यापार बहुतांश हुबळीच्या मुस्लिम लोकांच्या हातात आहे तर मासे व्यापार भय्यांच्या हातात. आणि इतर पाव वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणात केरळी लोक तयार करून विकतात. एकुणात महाराष्ट्राचं जे दुखणं आहे, तेच गोव्याचंही आहे. पण गोंयकार जात्याच सोशीक आणि दुसर्याला आपलंसं करून घेणारा त्यामुळे त्याने बिनधास्त आपला व्यापार परप्रांतीयांच्या हातात जाऊ दिला. गोवा हे इतकं इटुकलं राज्य आहे की हे बाहेरून आलेले लोंढे लोकसंख्येच्या वाढीत मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सुविधांवर अतोनात ताण पडायला लागलाय.
गोंयकार २०२० सालापर्यंत गोव्यात अल्पसंख्य होतील अशी साधार भीती व्यक्त करण्यात येते, याला गोंयकारांकडे काही उपाय आहे का माहिती नाही. पण लवकर काही उपाय केले नाहीत तर इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती लवकरच नाहीशी होईल अणि एक बिनचेहर्याचं शहरीकरण झालेलं कलेवर इथं राहील याचं दु:ख आणि भय वाटतं.
आजपर्यंतच्या गोवेकरांच्या प्रेमाची, विश्वासाची परतफेड करता येणार नाही, पण इतकी वर्षं गोव्यात राहिल्यानंतर गोव्याबद्दल काही लिहायची संधी मिळालं हे मी माझं नशीब समजते, यातून गोव्याचं माझ्यावरचं ऋण थोडंतरी फेडलं असं मी म्हणू शकते. ही मालिका पुरी करण्यासाठी अनेक पूर्वसूरींना वाट पुसत आम्ही लिहिलं. त्यातील काही म्हणजे, बा.द. सातोसकर, यांचं 'गोवा - प्रकृती आणि संस्कृती'’, त्यांचेच गोमंतक ग्रंथाचे खंड, रियासतकार सरदेसाईंची रियासत, वामन राधाकृष्ण यांचं 'मुक्तीनंतरचा गोवा'’, बाळशास्त्री हरदास, मनोहरराय सरदेसाय, माधव गडकरी, अ.का.प्रियोळकर यांची पुस्तकं, उल्हास प्रभुदेसाई यांचं 'गंगावळ्ळी, नेत्रावळी, शंखावळ्ळी'’ आणि त्यांची इतर काही पुस्तकं, टिओटिनिओ डिसूझा यांची काही पुस्तकं, सरकारी गॆझेट्स आणखी इतरही खूप काही. सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही पण या सार्यांचंच ऋण आमच्यावर आहे. तसेच या लेखमालिकेच्या निमित्ताने आम्हाला गोव्याचा इतिहास आणि समाजजीवनाचे ताणेबाणे यांचा अभ्यास करायला मिळाला याबद्दल ही मालिका लिहायची कल्पना करणार्या आणि आम्हाला लिहायला लावणार्या श्री. बिपिन कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. ही मालिका मिसळपाव’ या संस्थळावर आणि त्यासोबत मायबोली’ आणि मीमराठी’ या संस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध होत होती. त्यासाठी या सर्व संस्थळांचे चालक, व्यवस्थापक आणि वाचक यांच्या आम्ही अतिशय ऋणी आहोत.
काही वर्षांपूर्वी मी एक योगाचा कोर्स केला होता, तेव्हा एका कार्यक्रमासाठी आम्ही काही जण म्हापश्याहून पणजीला सकाळी ६.00 च्या दरम्यान पोचलो. तेव्हा आताच्यासारख्या गाड्या नव्हत्या. त्यामुळे ५/६ स्कूटर्स/मोटारसायकलींवर आम्ही १०/१२ जण गेलो होतो. पणजीत पोचलो आणि एकाच्या व्हेस्पाचा टायर पंक्चर झाला. स्कूटरचं किट नेमकं कुणाकडेच नव्हतं. आता मिरामारपर्यंत कसं पोचायचं याचा विचार सुरू होता, तेवढ्यात एकजण व्हेस्पावरून येताना मला दिसला. काही विचार न करता मी त्याला हात करून थांबवलं. किट आहे का विचारलं. नेमकं त्याच्याकडे होतं. तो म्हणाला, “तुम्ही पंक्चर काढा, मी तोपर्यंत दूध आणि पेपर घेऊन येतो.” बर्याच जणांची मदत असल्याने पटकन पंक्चर झालेला टायर बदलून झाला.
थोड्या वेळात तो परत आला. “देव बरें करूं” म्हणत त्याचं किट परत देऊन आम्ही निघालो. माझा सहप्रवासी मला विचारायला लागला, तो व्हेस्पावाला तुझ्या ओळखीचा आहे का? मला हसू आलं, कारण पणजीला यायची वेळ सुद्धा फार क्वचित यायची. मी म्हटलं, “थेट नाही, पण तशी एकुणातच मी गोंयकारांना ओळखते आणि त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.” हा विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच गोव्याच्या पद्धतीने तुम्हालाही म्हणते, “देव बरें करूं!”
- ज्योति कामत
- इति लेखनसीमा -
*****
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (ज्योति_कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )
ही अख्खी लेखमालिकाच फार सुंदर
ही अख्खी लेखमालिकाच फार सुंदर लिहिलीय. मनापासून आवडली. या शेवटल्या भागातली कळकळ तर अगदी पोचली.
गोव्याच्या या देखण्या ओळखीबद्दल धन्यवाद!
<<ही अख्खी लेखमालिकाच फार
<<ही अख्खी लेखमालिकाच फार सुंदर लिहिलीय. मनापासून आवडली. या शेवटल्या भागातली कळकळ तर अगदी पोचली.
गोव्याच्या या देखण्या ओळखीबद्दल धन्यवाद!>> +१
सगळे भाग वाचले.
आवडली ओळख.
खूप सुंदर लेखमाला. देव बरें
खूप सुंदर लेखमाला.
देव बरें करु!
मस्त! एवढा मोठा प्रकल्प
मस्त!
एवढा मोठा प्रकल्प नेटाने पुरा केल्याबद्दल टीम गोवाचे अभिनंदन.
मृण्मयी, बिनू, शैलजा, साती
मृण्मयी, बिनू, शैलजा, साती खूप धन्यवाद!
लेखमाला मस्त होती.. धन्यवाद
लेखमाला मस्त होती..
धन्यवाद
सुंदर लेखमाला.
सुंदर लेखमाला.
खरेच गोव्याबद्द्ल खूप खूप
खरेच गोव्याबद्द्ल खूप खूप सुन्दर माहिती आपण मेहनत घेउन आम्हा सर्वा करिता उपल्ब्ध करुन दिलीत . मनापासुन आभार.
आपण दिलेली माहिती पुन्हा एकदा वाचलि.
मस्तच .
गोवा सरकार ने स्विकारली तर अजुन छान होइल.
समारोप ! खुप छान मालिका आहे
समारोप ! खुप छान मालिका आहे ही.
खाण माफियांमूळे गोव्याचे पर्यावरण धोक्यात आलेय. हे डंपरवाले अंदाधुंदपणे गाड्या चालवतात आणि आजूबाजूच्या सर्व परीसरावर / झाडांवर लाल नापिक मातीचा थर चढतो. कुणीही त्या भागात जरा चौकसपणे फिरु लागले तर त्याचा पाठलाग होतोच होतो.
कार डिलर्सनी गोव्यात अनेक विक्रम केले असतील. काही वर्षांपुर्वीच दर ३ माणसामागे एक गाडी असे प्रमाण होते. ज्याच्याकडे बाईक आहे त्याला गाडी विका, असे धोरण आहे या डिलर्संचे.
माझा काही काळ रशियन टुअर ऑपरेटर्संशी व्यावसायिक संबंध आला. सगळ्या जगात गोव्यासारखे स्वस्त मासे आणि दारु इतर कुठेच मिळत नाहीत हे आकर्षण तर आहेच पण ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय ( विथ ऑल ईट्स व्हेरियंटस ) यांनीदेखील गोव्याला विळखा घातलाय. याचे नको तेवढ्या तपशीलात मी दर्शन घेतले आहे. हा
विळखा लवकरच सुटो, आणि देव बरें करो !
अतिशय सुंदर लेखमाला. देव बरें
अतिशय सुंदर लेखमाला.
देव बरें करु!
ज्योति ताई गेले दोन चार
ज्योति ताई गेले दोन चार रविवार ना मी तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पहायचे.
आणि आज अचानक आमचें गोय समारोप असे वाचले आणि खुप वाईट वाटले.
पण असो, गोव्याबद्द्ल खूप छान माहिति मिळाली तुमच्यामुळे. तुमचे खूप खूप आभार.
छान जमली लेखमाला. धन्यवाद.
छान जमली लेखमाला. धन्यवाद.
आवडली लेखमाला.. माझ्या
आवडली लेखमाला..
माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - राधा मंगेशकर
सतिशदादा, मला पण ही कविता फार
सतिशदादा, मला पण ही कविता फार आवडते. अगदी मोजक्या ओळीत
खूप छान वर्णन केलय गोव्याचं.
शेवटचा भाग ही अख्खी
शेवटचा भाग
ही अख्खी लेखमालिकाच फार सुंदर लिहिलीय. मनापासून आवडली>>>>>+१
चिनुक्स, विनायक परांजपे,
चिनुक्स, विनायक परांजपे, निलुदा, आशुतोष, दिनेशदा, अनुजा राणे, सतिश, HH, जिप्सी, सर्वांना मनापासून धन्यवाद!
सतिश, बाकीबाबच्या सुरेख कवितेसाठी खास धन्यवाद!
दिनेशदा, गोव्यातील हॉटेल व्यवसायाबद्दल आपले बोलणे आधीही झाले होते. परिस्थिती वाईट आहे खरीच. पण साध्या, माफक मजा करायला आलेल्या, कुटुंबवत्सल भारतीय टुरिस्टांना अजूनही तेवढा धोका नाहीये. इतर ड्रग्ज, वेश्याव्यवसाय यासाठी येणार्यांना कुठेही ते मिळवता येत असावे. महाराष्ट्रातले डान्स बार बंद झाल्यावर त्या बारबाला गोव्याकडे वळल्या असं ऐकलं. गोव्यात पूर्वी गुन्हेगारी अगदी नगण्य होती त्यामुळे लोकांना जास्त आश्चर्य आणि वाईट वाटतं.
अनुजा, शेवटचा भाग लिहिताना मालाही वाईट वाटलंच. पण आमचा मुख्य भर गोव्याच्या इतिहासावर साठलेली धूळ झटकण्यावर होता. त्याबरोबर मग खाद्यसंस्कृती, कोंकणी भाषा अशा वेगळ्या विषयांवर थोडक्यात ओळख करून देणारे लेख समाविष्ट केले. गोव्यात पर्यटन, खाणी हेच मुख्य व्यवसाय. त्यामुळे त्यावर स्वतंत्र लेख लिहिला नाही.
तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद! गोव्यात येणार असाल तेव्हा जरूर कळवा!
सुरेख लेखमाला.
सुरेख लेखमाला.
सुंदर झाली ही लेखमाला.
सुंदर झाली ही लेखमाला.
टिम गोवा.. तुम्ही गोव्याच्या
टिम गोवा.. तुम्ही गोव्याच्या इतिहासाच्या मानाने वर्तमान खुपच लवकर आटोपता घेतलाय.. शांत समजल्या जाणार्या गोव्यात अनेक आंदोलने झाली आणि त्यात्यावेळी त्याची शांतीच हरवली.. कोंकणरेल्वे प्रकल्पावेळी देखिल एक असेच आंदोलन झाले.. आणि योग्यवेळी तोडगा निघाल्याने गोव्यात रेल्वेने प्रवेश घेतला.. अन्यथा तेव्हा गोवा bypass करुन कर्नाटकातुन रेल्वे मार्ग काढण्याचे ठरवीले होते.. ते आंदोलन देखिल नेहमी प्रमाणे चर्च विरुद्ध इतर असेच लढले गेले..
अतिशय सुंदर लेखमाला होती ही.
अतिशय सुंदर लेखमाला होती ही. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.
टीम गोवाचे आभार!
झकासराव, साजिरा आणि माधव,
झकासराव, साजिरा आणि माधव, धन्यवाद!
सतिश, वर्तमानाबद्दल जास्त लिहिले नाही हे मान्य आहे. पण ती सगळी माहिती बहुतांशाने लोकांसमोर आहे. पाषाणयुगापासूनचा भूतकाळ, शिवराय आणि संभाजीराजे, पोर्तुगीजांचे अत्याचार याबद्दल एकत्रित अशी माहिती फार कुठे उपलब्ध नाही. त्याची एकीकडे नोंद असावी हा मुख्य उद्देश मालिका सुरू करताना होता.
कोंकण रेल्वेबद्दल तुम्ही म्हणताय ते खरे आहे. मुख्यतः खाजगी बसमालकांनी आपला धंदा बसेल या भीतीने कोंकण रेल्वेला विरोध केला होता. ते मुख्यतः ख्रिश्चन समाजाचे असल्याने त्यांनी चर्चला हाताशी धरून जुने गोवे चर्चेसना रेल्वेमुळे हादरे बसतील असे काहीतरी विक्षिप्त समज पसरवले. त्यामुळे रेल्वेचे काम गोव्यात चांगलेच रखडले होते. आंदोलने वगैरे झाली. पण शेवट चर्चेसपासून सुमारे ५ किमि अंतरावरून रेल्वे मार्ग काढून हा वाद सोडवला.
प्रत्यक्षात रेल्वेने येणार्या लोकांना परत जायला रेल्वेची तिकिटे मिळताना कठीण होते. त्यामुळे बसवाल्यांचा धंदा चांगलाच जोरात चालू आहे. आता या सगळ्या प्रकाराचे हसू येते पण तेव्हा खरोखरच कोंकण रेल्वेचा प्रकल्प खूप रेंगाळला होता आणि कदाचित कर्नाटकातून रेल्वे नेली असती तर कोंकण किनार्याने रेल्वे न्यायचा उद्देश पुरा झाला नसता.
असाच आणखी एक हास्यास्पद वाद मध्यंतरी चर्चेला आला होता. राष्ट्रीय महामार्ग १७ आणि ४अ गोव्यात खूप अरुंद होता. तो रुंद करण्यासाठी भूसंपादनाला लोकांनी विरोध केला. घरे, जमिनी, झाडे जातील ही भीती समजून घेता येते पण त्या मार्गामुळे गावाचे २ तुकडे पडतील असा काहीसा युक्तीवाद काही लोकांनी पुढे ठेवला होता!
राष्ट्रीय महामार्ग १७ अजुनही
राष्ट्रीय महामार्ग १७ अजुनही मडगाव काणकोण भागात एव्हढा अरुंद आहे की त्याला महामार्ग म्हणावे का असा प्रश्न पडतो.. बाकी पेडणे तालुक्यातील गावागावात पसरलेल्या अरुंद रस्त्यांवर गाडी चालवताना चालकाची खरी कसोटी लागते..
असो.. पर्रिकर सरकारने खाण व्यवसायाला लावलेल्या चापामुळे त्यांचे अभिनंदन.. खरे तर सिंधुदुर्ग आणि गोव्यात मिळणारे खनिज हे कमी प्रतिचे असुन ते कर्नाटकातील खनिजात मिसळुन परदेशात पाठवीले जाते.. हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे..
ज्योति, तेही खरेय, या लोकांचे
ज्योति,
तेही खरेय, या लोकांचे अड्डे वेगळेच आहेत.
मायबोलीवरच्या एखाद्या खास फोटोग्राफरला गोव्याचे आमंत्रण द्याच. पर्यटक पण नेमक्या ठिकाणीच जातात,
अनेक सुंदर जागा त्यांच्या नजरेस पडत नाहीत. मंगेशी / शांतादुर्गाच नव्हे तर गोव्यातील बहुतेक देवळे, अगदी आधुनिक असली तरी ती सुंदर आहेत.
चित्रपटात पणजीचा जेवढा परिसर दिसतो, त्यापेक्षा तिथे सुंदर ठिकाणे आहेत. कला अकादमी, महावीर उद्यानच काय अगदी नवे मार्केटही सुंदर आहे.
काणकोण बीच वरचा छोटासा धबधबा, बांबोलीम बीचवर येणारा ओहोळ, उबाळ्याचा झरा, सांखळीचे विठ्ठल मंदीर, नदीपल्याडचे दत्ताचे देऊळ, त्रिपुरारी पोर्णिमेचा उत्सव, मयेचा तलाव, चोर्ला घाट, हणजूणे धरण, करमळीच्या प्लॅटफॉर्मवरुन दिसणारे पक्षी, तिलारीचा परीसर, कसईचा डोंगर, चंद्रेश्वराचा पर्वत... हे सगळे कुशल फोटोग्राफरच्या नजरेतून दिसले पाहिजे.
दिनेशदा, तुमच्याकडे गोव्याचे
दिनेशदा, तुमच्याकडे गोव्याचे सुरेख फोटो आहेत हे मला माहित आहे. त्यातले काही निवडक फोटो इथे द्याल का? किंवा मग स्वतंत्र धागा कधी टाकला सलात तर त्याची लिंक द्या ना!
अतिशय सुंदर लेखमाला होती ही.
अतिशय सुंदर लेखमाला होती ही. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.
टीम गोवाचे आभार>>>
संपूर्ण लेखमाला संग्रही ठेवावी अशी झाली...
जेव्हा गोव्याला होतो त्यावेळी
जेव्हा गोव्याला होतो त्यावेळी बरेच फोटो टाकले होते. पण आजकालच्या कलाकारांनी काढलेल्या फोटोंसमोर ते
बापुडवाणे दिसतील.
उत्तम लेख माला आमचे गोव्यावर
उत्तम लेख माला आमचे गोव्यावर फार प्रेम आहे आणि ते तसेच राहणार.
लेखमाला फारच सुंदर झाली आहे.
लेखमाला फारच सुंदर झाली आहे. शिवाय आताच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्यामुळे त्याला दस्तऎवजाचे मोल प्राप्त झालेलं आहे. हे लिहीण्यसाठी घेतलेले परीश्रम, चिकाटी याच कौतूक कराव तितकं थोडच! टीमचे धन्यवाद.
मित, अश्विनीमामी, उमेश वैद्य
मित, अश्विनीमामी, उमेश वैद्य धन्यवाद!
दिनेशदा, खास धन्यवाद! अहो बापुडवाणे काय? अप्रतिम फोटो आहेत हे! पहिला नागेशीचा आहे ना? आणि दुसरा मांडवीवरील पुलाच्या बांधकामाचा दिसतोय. ३ आणि ४ नंबराच्या फोटोत मांडवीवरचे आकाश फारच सुंदर आले आहे. खरेच! पुन्हा धन्यवाद!
पहिला नागेशीचा, दुसरा
पहिला नागेशीचा, दुसरा अमोण्याचा, तिसरा पाट्टोमधला आणि चौथा पणजीमधून घेतलेला आहे.
Pages