चंद्र एखादा तरी...

Submitted by आनंदयात्री on 18 February, 2013 - 04:52

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?

पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/02/blog-post_18.html)

(या गझलेला मायबोलीकर 'दाद' यांनी लावलेली चाल - http://www.maayboli.com/node/41714)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages