मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्यात स्वभावाच्या..रादर सवयीच्या विरुद्ध वागतेय..
एक पुस्तक संपवल्याशिवाय दुसरं हाती घेत नाही मी पण जवळपास ३ ते ४ पुस्तक एकसाथ वाचतेय...

पहिलं 'The Gene - An Intimate HIstory' by Siddharth Mukherjee
Science loversला नक्की आवडेल हे वाचायला.. The book title says it all...

दुसरं म्हणजे 'Diary of a Wimpy Kid- Rodrick Rules' by Jeff Kinney
हे मात्र संपवल मी कालचं.. मस्त पुस्तक.. खरतर पीडीएफ आहेत जवळ पण पुस्तकाची मजाच वेगळी म्हणुन अजुन सिरिजमधल पुढच पुस्तक नाही घेतलयं हाती..

आणि तिसरं 'बाराला दहा कमी' by माधव नेरुरकर आणि पद्मजा फाटक
खरं तर हे पुस्तक माबोवरील पुस्तकाविषयीची चर्चा वाचुनच घेतलं मी.. सुरुवातीचे काही प्रकरण संपवली.
सलग वेळ न मिळाल्यामूळे पूर्ण नाही झालीत अजुन..

नक्की वाचावी अशी आहेत...
आता परत बुकगंगा वरुन
१. कोबाल्ट ब्लु - सचिन कुंडलकर
२. एक ड्रिम मायला - अनंत सामंत
३. आहे हे असं आहे - गौरी देशपांडे
अशी तीन पुस्तकं मागवली आहेत.. ढिगभर पुस्तक घरी पडून आहेत पण दिल है के मानता नही.. !

हुश्श!!!! .......अमीश त्रिपाठी यांचे The Immortals of Meluha वाचून संपवले. सगळीकडे ऊगाच हाईप दिल्या सारखे वाटले

चित्र ता रका रेखा ह्यांचे चरित्र जगरनॉट पब्लिकेशनच्या अ‍ॅप वर प्रसिद्ध झाले आहे ६० रु किंमत आहे. सध्या सुरू केले आहे. रेखा चे पति मुकेश अगरवाल ह्यांच्या आत्महत्येच्या माहितीने ते सुरू होते. व मग त्यांच्या लहानपणा पासून माहिती दिली आहे. चित्रतारके मागची स्त्री ओळखायला मदत होते. रेखाचे आगमन, मेटॅमॉर्फोसिस व उमराव जान मधील अदाकारी, नॅशनल अ‍ॅवार्ड मिळणे, लग्न व पुढील
दुर्घटना रेखाचे कोषात जाणे हे सर्व बघितले आहे.पुस्तकाची भाषा सनसनाटी नाही. जसे घडले तसे लिहले आहे.

अभय नागराजन ह्या नव्या लेखकाची दोन धमाल विनोदी पुस्तके पण इथे उपलब्ध आहेत.कॉरपोरेट
अत्याच्यार सध्या संपवत आणले आहे. व दुसरे जगर नॉट वरून घेइन. इथे पुस्तक डाउनलोड करून ऑफलाइन वाचायची पण सोय आहे.

@ प्रसिक..
शिवा ट्रायोचा पहिला भाग तरी थोडा बरा वाटला, पुढचे दोन तर भयंकर कंटाळवाणे वाटले. संपवायचे म्हणुन संपवले. तिन भागांची काहिच गरज नव्हती. बर्‍याच ठिकाणी तेच तेच वर्णन परत परत दिलेलं आहे. काही काही chapters ची खरच गरज नाही वाटत. १-२ भागात संपवलं असत तर कदाचित एव्हढ boring वाटलं नसत.

अमा - धन्यवाद.

कॉरपोरेट अत्याच्यार >>> कॉर्पोरेट्/ऑफिस ह्यूमर आहे का? आपल्याकडे मी मधे शोधत होतो तशी पुस्तके पण दिसली नव्हती.

Hi far end. This book is based on one young man's experience at giving investment advice to high net worth individuals. He is certainly more intelligent than chetan Bhagat

Those guys have all the fun- ESPN- James Miller

हे पुस्तक योगायोगानेच वाचायला सुरुवात केली. इएसपीएन नेटवर्कचा इतिहास आहे. एका लहानशा कल्पनेपासून ते आताच्या अजस्त्र नेटवर्कपर्यंतचा ३०-३५ वर्षांचा इतिहास दिला आहे. स्पोर्ट्स फॅन + कॉर्पोरेट मिडिया जगतात काम करणारे अशांना आवडेल..बाकीच्यांना बोअरिंगही वाटू शकेल. मला क्रिकेटमुळे इएसपीएन आधी कळलं पण पुस्तकात भारतातील मार्केट व क्रिकेटबद्दल कमी माहिती आहे..जवळजवळ नाहीच. जास्त फोकस अमेरिकेवर..बेसबॉल एनएफएल वगैरेवर आहे मला त्यातील माहिती नसल्याने ते जरा बोअर झालं पण तरी वाचायला ओव्हरऑल मला आवडलं. (माझ्या कामाचा कॉर्पकॉमशी संबंध असल्यामुळे तसं असेल कदाचित).

मराठीतील एक ख्यातनाम लेखक लक्ष्मण लोंढे यांचे गतवर्षी निधन झाले. यंदा त्यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा झाला व त्यानिमित्ताने ‘ओंजळभर’ हा स्मृतीग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाशी माझा काही कारणाने संबंध आल्याने माझ्या या आवडत्या लेखकाच्या काही पुस्तकांची आठवण चाळवली गेली. त्यापैकी ‘लक्ष्मणझुला’ या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते.

हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना.

माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते.

स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते.
‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे.

पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो.

‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही?

.. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.

कृष्णमेघ कुंटे लिखित 'एका रानवेड्याची शोधयात्रा' वाचलं..
खुपच सुंदर पुस्तक..

त्यातील वीरप्पन आणि केता ह्या प्रकरणांबरोबरच जेव्हा जंगल खायला उठतं यातील धडकी भरविणारे अनुभव, हत्तींचा हल्ला, कुडकोंबन, मोयार गॉर्ज मधील अनुभव सारं काही छान उतरलयं पुस्तकात..
मुख्य म्हणजे खर्‍या जंगलाच्या व्याख्येत कोण कोण बसतं याची जाण त्या लिखाणात पुरेपुर उतरलीए.. ज्यावेळी त्याने हे अनुभव अनुभवले त्या नंतर काही वर्षांनी ते कागदावर उतरल्यामुळे मॅच्युरिटीची एक वेगळी किनार लाभलीए संपुर्ण लिखानाला...

सुरुवातीला आलेली मिलिंद वाटवे यांची प्रस्तावना सुद्धा समर्पक..त्याचप्रमाणे त्यातील सगळे फोटो सुद्धा छानच...
अशक्यसुंदर अनुभव आहेत सारेच आणि ते तेवढ्याच सुंदर पद्धतीने लोकांसमोर उभे केल्याबद्दल लेखकाचे खरच आभार _/\_

पुस्तकाचे नाव - एका रानवेड्याची शोधयात्रा
लेखक - कृष्णमेघ कुंटे
राजहंस प्रकाशन
लोकआवृत्ती किंमत रु.१२५/-

येथे बर्‍याच लोकांनी हे पुस्तक वाचले आहे असे गृहीत धरुन चालते आहे तरीसुद्धा माझ्यासारखे कुणी लेटरिडर असतील त्यांच्याकरीता हि वरची माहिती..

चेटूक- विश्राम गुप्ते
विश्राम गुप्तेंचं नारी डॉट कॉम हे एकमेव पुस्तक मी या आधी वाचलेले होते आणि मला ते आवडले नसल्याने ’चेटूक’ जराशा साशंकतेनेच हातात घेतले. त्यात पुस्तकाचा आकार जाडजुड. मुखपृष्ठही जुन्या शैलीतलं. (तसं ते मुद्दाम केलं आहे हे नंतर लक्षात येतं). पण पुस्तकांशी नव्याने जोडलं जाण्याचा प्रयत्न करत असताना नवे ( म्हणजे माझ्याकरता नवे) लेखक जाणीवपूर्वक धुंडाळायचे ठरवले आहे हे एक. आणि दुसरे, लायब्ररीमधे त्यावेळी समोर अजुन कोणतीच जास्त इंटरेस्टींग पुस्तके नव्हती.
’चेटूक’ वाचायला लागल्यावर हे काही तरी वेगळंच प्रकरण आहे हे लक्षात आलं. नागपुरकर दिघे कुटुंब जिथे रहातं असतं त्या टिपणिसपु-याचं, तिथल्या रस्त्याचं, घरांचं साठेक वर्षांपूर्वीच्या काळातलं जे वर्णन विश्राम गुप्ते करतात ते आपल्याला फ़ारच आवडत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. दिघे कुटुंबातल्या व्यक्ती, त्यांचे आपापसातले संबंध, टिपणीसपु-यातलं जग आणि त्या जगात प्रवेशणारी ती विलक्षण राणी आणि तिचा वसंता.. सगळ्याची एक अद्भुत वीण तयार होते. फ़ार प्रयत्न न करता गोष्टीत गुंतायला होतं.
पुस्तकाची भाषा आवश्यक त्या जुन्या वळणाची. विश्राम गुप्तेंची नॅरेटीव शैली वर वर साधी, पण जो कोणी हे सांगत आहे त्याचा या सगळ्या घटनेशी फ़ार जवळून संबंध आलेला आहे हे पहिल्या काही पानांमधेच लक्षात येते आणि मग हा निवेदक या नात्यांच्या वेणीतला नेमका कोणता पेड हे ओळखण्याचाही एक समांतर खेळ वाचताना मनाशी खेळला जातो.
पन्नासच्या दशकात एक सुंदर, आक्रमक स्वभावाची, स्वतंत्र, सुशिक्षित, इंदोरच्या शाही वातावरणात वाढलेली एक मुलगी एका सुंदर, कवी मनाच्या पण भाबड्या, साध्या, आदर्शवादी विचारसरणीच्या घरात वाढलेल्या मुलाच्या पुस्तकी प्रेमात पडते, प्रेमापेक्षा प्रेम या संकल्पनेवरचे, प्लेटॉनिक धर्तीचे प्रेम त्या मुलीच्या मनात. जेमतेम सोळा सतराचे वय. अर्धवट झालेले शिक्षण, प्रेमाच्या झंजावातात वहावत गेलेले दोघे आणि त्या वावटळीत सापडलेली त्यांची कुटुंबे. लग्न होतं आणि या पुस्तकी प्रेमाला वास्तव जगातले व्यवहार ताळ्यावर आणतात.
प्रेम म्हणजे पत्रातून मारलेल्या गोड गोड, काव्यमय, बौद्धिक गप्पा नाहीत, त्यात शारिरिकता असते, व्यवहार असतो, पैसे कमावणं असतं, सासरच्यांशी, घराशी जमवून घेणं असतं, मुलंबाळं असतात, त्यांना वाढवणं असतं आणि अपरिपक्व, हवेत उडणा-या मनाला हे सगळं झेपतच असं नाही. राणीच्या मनाला यातलं काहीच नाहीच झेपत. प्रेमाच्या गुलाबी रंग झपाट्याने विरतो. वसंत तर ग्रीष्मात सापडल्यासारखा या सगळ्यात अनाठायी होरपळून गेलेला. राणीच्या प्रेमाचा झंजावात मुळातच त्याच्या कोवळ्या, साध्या मनाला न झेपलेला. तरीही त्याची तिच्याशी जोडलं जायची असाहाय, एकतर्फ़ी धडपड.
राणीचं मन आता नव्याने प्रेमाचा मुलामा चढवून घ्यायला आसुसलेलं. वसंताच्या मित्राच्या रुपाने राणीला नव्याने ते काव्यमय प्रेम आपल्या आयुष्यात आल्याची खात्री पटते. तिचा हट्टी, आक्रमक, स्वत:ला हवं तेच खरं करण्याचा स्वार्थी स्वभाव, संसाराच्या व्यापतापाला कंटाळलेलं, अजूनही अपरिपक्वच असलेलं मन त्या मुलाम्यात पुन्हा गुरफ़टतं. राणी घराबाहेर पडते. मुलांना, नव-याला मागे सोडून. पण पुन्हा एकदा तो मुलामाच असल्याचं तिच्या लक्षात येतं.
या टप्प्यावर एक वाचक म्हणून आपण पोचतो आणि अचानक लक्षात येतं निवेदक कोण असू शकेल आणि मग या सगळ्या कहाणीला एक वेगळं स्वरुप येतं. काहीसं आत्मकथनात्मक
चेटूक आपल्यावर पुरतं गारुड करतं या टप्प्यावर.
राणी आणि वसंत दिघे या जोडप्याचीच फ़क्त ही गोष्ट उरलेली नसते. तशी ती मुळातच नसते. दिघे घरातले सगळेच, विशेषत: स्वातंत्र्यसैनिक अमॄतराव दिघे आणि त्यांच्या पत्नी, खंबीर नागूताई यांची गोष्टही तितकीच प्रभावी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ, सामाजिक बदल, हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी, साहित्य, कवितांचे जग, या सगळ्या गोष्टी समांतरपणे राणी-वसंताच्या गोष्टीमधे आपापली जागा ठळकपणे घेत असतात. या सगळ्याची गुंफ़ण फ़ार छान घातलेली आहे गुप्त्यांनी.
मानवी नातेसंबंध, त्यांच्यातली ओढ, दुरावा, हेवेदावे, आकर्षण.. या सगळ्य़ा भावना सनातन असतात. मात्र या भावनांच्या अभिव्यक्तीवर ती माणसे ज्या काळात जन्मली, मोठी झाली, त्यांच्यावर ज्या घराचे, आजूबाजूच्या जगाचे, ज्यात अगदी घरासमोरचा रस्ताही आला, संस्कार झाले ्त्याचा किती दाट, विलक्षण परिणाम होत असतो हे चेटूक वाचताना स्पष्टपणे जाणवले.
चेटूकमधे आपण एक वाचक म्हणून कोणत्याही टप्प्यावर जजमेन्टल होऊ नये, कोणाचीच बाजू बरोबर, चूक अशा काळेपांढरेपणे आपण घेऊ नये याची काळजी नॅरेटर घेतो. अर्थातच जाणीवपूर्वक.. त्यात तो यशस्वी होतो.
राणी व्हिलन नाही आणि वसंता बिचारा नाही. प्रेम, आकर्षण,संमोहनाचे जाळे प्रत्येक व्यक्तीकरता वेगळ्या पोताचे, एखाद्याकरता ते चिवट, दुस-याकरता त्यातून सहज निसटणे शक्य, काहींकरता हे जाळे फ़क्त स्वत:वरच्या प्रेमापुरतेच तोकडे. त्यात दुस-याला मुळातच फ़ार जागा नसते. त्यांच्यावर चेटूक परिणाम करत नाही. त्यांचं चेटूक मात्र ज्यांच्यावर पडतं ते कायमच जाळ्यात कैद. चेटूक उतरवण्याचा मंत्रही त्यांच्याकरता निष्प्रभ ठरतो.
थोडक्यात काय- विश्राम गुप्तेंची ’चेटूक’ कादंबरी वाचनीय. आवडली.

शर्मिला...
स्पॉयलर असेल असं वाटून पहिल्या काही ओळी आणि शेवटची ओळ भित भित वाचली...
मिळवून वाचते हे पुस्तक..

माझ्या मुलाने काही महिन्यापूर्वी माधुरी पुरंदरेंची 'पाचवी गल्ली' आणि 'सख्खे शेजारी' ही दोन पुस्तके वाचली. ती त्याला इतकी प्रचंड भावली की मराठी वाचनाची एकदम आवडच लागली. अशी उत्तम निर्मितीमूल्ये, अत्यंत चपखल चित्रे आणि एकंदरीत पुस्तकरचना मराठीत फारच विरळा. त्याहूनही महत्वाचे म्हणजे शहरी मुलाच्या भावविश्वाला सुसंगत, 'हसतखेळत संस्कार' वगैरे करायचा करुण प्रयत्न (पोरांना याचा वास लगेच येतो आणि ते तात्काळ वाचन थांबवतात) न करणारे आणि तरीही निखळ, निरागस पुस्तक.
'या कोण रायटर आहेत त्यांची अजून पुस्तके आण' अशी जोरदार मागणी त्याने केली, पुस्तकाचे अजून यश काय असते?

Happy

त्यांचे 'चित्रवाचन' म्हणून एक भारी पुस्तक आहे. कसले जबरदस्त बारकावे टिपलेत त्यात. प्रत्येक वेळी बघताना मजा येते.

डोंगरी ते दुबई वाचतोय.
भाषांतराचे नमुने :
तो केवळ अशी ताकद बनला नव्हता, तर अशी ताकद सर्वत्र अस्तित्व दाखवून देणारी असते,याचा तो स्वतःच एक जिवंत पुरावा होता.

पण त्या दोघांत खडू आणि दुधाचे चीज या दोन पदार्थांइतकेही साम्य नव्हते.

सगळाच अनुवाद गंडलेला नाही. पण तरी हे खटकल्याशिवाय राहत नाही.

एवढ्यात नातिचरामी आणि शोध ही दोन पुस्तक वाचली.
नातिचरामी सुरूवातीला अंगावर येणार वाटल पण जसजस वाचत गेलो तसतस गुंतुत गेलो. पुस्तक संपल्यावरही गारूड कायम राहील.

शोध छानचं आहे पण खुप ग्रेट वगैरे नाही वाटलं.

बादवे, गडकिल्ल्यांची माहीती देणार एखाद पुस्तक सुचवा कि!

अमीश त्रिपाठी यांचे The Immortals of Meluha वाचून संपवले.
सगळीकडे ऊगाच हाईप दिल्या सारखे वाटले >> अगदी सहमत..
त्या सीरिजचे ३ हि पुस्तकं कंटाळवाणे आहेत कशी काय एवढी प्रसिद्ध झाले काय माहित

13 reasons why काल वाचुन संपवले. storytelling आणि फॉर्मॅट मस्त आहे. डिप्रेसिंग आहे पण तेवढ्याच आशादायी नोट्वर संपतं.
अर्थात हे बघुन उसगावात टीनेज सुइसाईड्स वाढले असे वाचले होते तितके काही सुइसाईडला ग्लॅमर दिलेले नाही.
पण ज्या उत्साहाने वाचायला घेतले होते तेवढी मजा नाही आली, जरा कंटाळाच आला. भारतात वाढलेल्या लोकांना १३ पैकी बरेचसे रीझन्स आत्महत्या करण्याइतके गंभीर वाटणार नाही कारण अश्या प्रश्नांना इथे रोजच तोंड द्यावे लागते.

यंग अडल्ट्स जॉनर आहे त्यामुळे त्यांना आवडू शकेल कदाचित.

विश्वास नांगरे पाटलांच मन में हैं विश्वास नुकतंच वाचलं. आवडलं. >> +१
त्यातील त्यांच्या युपीएससी परिक्षेतील मुलाखतीचा भाग खूप आवडला. इंग्लिशवर प्रभुत्व नसलेला उमेदवार देखील उत्तम मुलाखत देऊन आपली छाप पाडू शकतो, हे त्यातून दिसते. तेव्हा तो न्यूनगंड कोणी ठेवू नये हा संदेश महत्वाचा आहे.

2014: The Election that Changed India राजदीप सरदेसाई
पुस्तक रंजक आहे म्हणजे वाचताना उत्सुकता टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. पुस्तक मोदी, राहुल, मनमोहन/सोनिया/युपीए२, अरविंद केजरीवाल या मुख्य पात्रांभोवती पहिले २/३ भाग फिरते. यात या व्यक्तींवर फोकस आहे, त्यांच्या निवडणुकीदरम्यानच्या किश्श्यांवर, कृतींवर फोकस आहे. उरलेला १/३ भाग हा बीजेपीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर आहे.
मात्र २४/७ बातम्यांच्या युगावर व त्यामुळे येणार्‍या पत्रकारीतेतील सवंगपणा व सामान्यपणा यावर लेखकाने जी पुस्तकात वेळोवेळी टिका केली आहे तेच या पुस्तकाच्या बाबतीतपण झाले आहे असे वाचून झाल्यावर मनात उमटले. पुस्तक भारतभर घडलेल्या विविध राज्यातल्या मतदारसंघातल्या घटनांबद्दल क्वचितच भाष्य करते. वर उल्लेखलेल्या ३-४ व्यक्ती, त्यांच्या दिल्लीच्या आसपास घडलेल्या घटना + वाराणसीमधील रोड-शो हाच पुस्तकाचा कॅनव्हास राहिला आहे.
पुस्तक वाचनीय आहे, चांगले आहे मात्र २०१४च्या निवडणुकीचा संपूर्ण आढावा नसून या निवडणुकीतल्या ४मुख्य पात्रांवर आहे.

ब्लॅक फ्लॅग्ज - राइज ऑफ आयसिस
लेखकः जोबी वॉरिक
साधारण २००४/०५ पासून इराकमधल्या भीषण अंतर्गत यादवीच्या बातम्या बाहेर यायला सुरुवात झाली. शिया - सुन्नी मिलिशियांचे आपापसातील युद्ध या पार्श्वभुमीवरून लादेनलाही लाजवतील असे झरकावी, बगदादी कृरकर्मा जगासमोर येऊ लागले. सेक्युलर इराकमध्ये हे कसे झाले, का झाले याचा सर्वांगीण आढावा हे पुस्तक घेते. माहितीपूर्ण, वाचनीय पुस्तक.

बर्‍याच दिवसांपासून लिस्टवर असलेले सुधीर वेंकटेशचे Gang leader for a day हे पुस्तक आज वाचायला घेतले. अर्धे वाचून झाले आहे आणि आवडले आहे अजून तरी. झाल्यावर लिहिन.

मला थोडी मदत हवी होती. सध्या गेम ऑफ थ्रोनची हवा आहे तर घरातल्या सॉर्ट ऑफ ज्येनांनी (म्हणजे जेन्या होण्यास दोनेक वर्ष कालावधी आहे असं) पुस्तक मागव असं सांगितलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे असलेले पुस्तक इंग्रजीत आहे . तर गेम ऑफ़ थ्रोनचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे का ?असल्यास कुठे मिळेल.मी बुकगंगा आणि डायमंड पब्लिकेशनच्या साईट वर चेक केलं तर नाही सापडलं. बुक्गंगाच्या साईट वर इंग्लिश भाषेतले पुस्तक आहे .कोणाला काही माहीत आहे का ?

जाई,
माझ्या माहितीप्रमाणे अजुनतरी गेम ऑफ थ्रोन्स चा मराठी अनुवाद कुणी लिहिलेला नाही..
एवढ्यात येईल असं वाटत नाही..

जाई - वाचू द्या तिला इंग्रजी ! त्या निमित्ताने इंग्रजी वाचन होईल, आणि तिला आवडले तर एका फटक्यात काम होईल.
(फक्त 'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये इतका व्हायलंस आहे की ! पण नवीन पिढीला ते तेवढे खटकणार नाही कदाचित. Happy

टीना, रैना धन्यवाद Happy मराठी अनुवाद नाहीच आहे उपलब्ध तर. आहे तेच इंग्लिश पुस्तक देते वाचायला.

रैना, इंग्लिश वाचन बऱ्यापैकी आहे. व्हायलंस वगैरेचे अजूनतरी वावडं नाही. काही टिप्पणी आलीच तर "तुमच्या भंगार शिरेलीमध्ये याहून अधिक मानसिक व्हायलंस असतो "असं उत्तर तयार ठेवलं आहे Lol

बिहाइंड द ब्युटिफूल फॉरेवर्सः कॅथरीन बू
एकॉनॉमिस्टमध्ये उल्लेखलेलं हे पुस्तक बर्‍याच अपेक्षेने वाचले. पण खास आवडले नाही. नुसतेच एक रिपोर्ताज वाटला. एका झोपडपट्टीतल्या हुसेन कुटुंबीयांच्या भोवती फिरणारी ही कहाणी त्यातल्या अब्दुल, झैरुन्निसा या आइ-मुलाबरोबर इतर पात्रे आशा (झोपडपट्टी नायिका बनू पाहणारी), मंजू तिची मुलगी, राहुल हा तिचा मुलगा, सुनिल/कल्लु/व इतर अनेक कचरा/भंगार उचलणार्‍या पात्रांच्या भोवती फिरते. ही सत्यकथा आहे, नावेसुद्धा बदललेली नाहीत. कदाचित भारतातल्या गरिबीचा धक्का आपल्याला बसत नाही म्हणुन असेल किंवा अति परिचयात अवज्ञा होत असेल, पण पुस्तक मुळीच परिणामकारक वाटले नाही. एकामागोमाग एक घटना घडत राहतात. मुंबई विमानतळाच्या शेजारी असलेल्या अण्णावाडी झोपडपट्टीचा कॉन्ट्रास्ट विमानतळ व तिथल्या इतर ५-स्टार हॉटेलची सोसायटी करण्याचा प्रयत्न पुस्तकात होतो. पण अकुणात फार फ्लॅट वाटले. पुन्हा एकदा हा दोष माझा असेल की गरिबी (दुसर्‍यांची) पाहून पाहून माझे डोळे मेले असतील.

गन्स जर्म्स अँड स्टीलः जरेड डायमंड
काही समाज प्रगत आहेत व काही आत्ता आत्तापर्यंत अश्मयुगात जगत होते ही विषमता का आहे याचे उत्तर शोधण्याचा हे पुस्तक प्रयत्न करते. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा सध्याच्या जगात असलेली विषमतेवर (युरोपीयन वि. एशियन वि. फार इस्ट एशियन) भाष्य असेल ही अपेक्षा होती. मात्र हे पुस्तक अर्वाचीन काळापासून सुरुवात करते. मुख्यत्वेकरुन युरेशियन संस्कृतींची (युरोप + आशिया) प्रगती जी साधारण आजच्या इराक युफ्रेटिसच्या खोर्‍यात सुरू झालेल्या शेतीपासून तिचा प्रसार उत्तरेला युरोप, पस्चिमेला उत्तर आप्र्हिका व पुर्वेला भारत/चीन व जपानपर्यंत कसा झाला व त्याच्या पाठोपाठ इतर प्रगती (शस्त्रे, अस्त्रे, भाषा, गणित, विज्ञान) आणि रोगराई (जीवाणु, दाट वस्तीत राहिल्याने उद्भवणारे आजार) कशी झाली व का झाली यावर बरेच भाष्य आहे. त्या तुलनेत अमेरिका (इंका, माया, प्री-कोलंबियन संस्कृत्या) तसेच ऑस्ट्रेलिया खंडावरील आयसोलेटेड मानवस्मुहांमध्ये प्रगती का कमी झाली यावर कारणीमिमांसा आहे. काही काही सिद्धांत इन्टरेसटिंग आहेत. जसे युरेशियाचे पुर्वपश्चिम पसरले असणे शेतीच्या प्रसाराला पूरक ठरले कारण मोठा भुभाग एका रेखांशावर येतो जिथे तापमान समान आहे. तर अमेरिका खंड दक्षिणोत्तर पसरला असल्याने शेतीचा प्रसार एका भागातून दुसरीकडे झाला नाही. मोठी जनावरे युरेशियात शिल्लक राहिली, माणसाळली तर अमेरिकेत फक्त लामा या प्राण्याचा त्यासाठी वापर झाला. ऑस्ट्रेलिया/पापुआ न्यु गिनीमध्ये एकही बिग मॅमल पोचला/टिकला नाही. पुस्तकाच्या शेवटच्या भागात समूह, टोळी, संस्थानिक समाज आणि देशाचे नागरीक असलेला समाज, त्यांची वैशिष्ट्ये व उत्क्रांती यावर सुंदर विवेचन आहे.
युरोप व इतर मानवी समाज यातल्या आजच्या गॅपबद्दल वाचायचे असेल तर हे पुस्तक त्यासाठी नाही.

सध्या पु भा भाव्याच सतरा वर्श ह कथा सन्ग्रह वाचतोय व त्यानि लिहिलेलि व्यक्तिचित्र.....बरोबर रिचर्ड बर्टन (explorer) याच्या नाइल नदिच्या उगमाच्या शोधाचि कथ वाचतोय अतिशय रोमान्चक व साहसि जिवन...याला २५ का कितितरि भाशा येत होत्या मराठि धरुन.......मक्केत गेलेला पहिला आणि शेवटचा गैर मुस्लिम माणुस(दुसर्या धर्मियान्चा ताबडतोब शिरछेद करतात अति साहसि प्रवस वर्णन

Pages