तू आलीस

Submitted by दाद on 7 February, 2013 - 01:12

तुझं-माझं इतकं सख्य का? कुणास ठाऊक...
तू यायलाच हवस... मी ज्या ज्या वास्तूत रहायला म्हणून गेले त्या त्या वास्तूला तुझा स्पर्श हवा... तू येऊन आपल्या डोळ्यांनी सगळं बघायला हवंस... हा माझा हट्ट आहे. होय. आहेच मुळी.
कळतंय मला... हा चक्क वेडेपणाच. माझं अती-शहाणं मन ह्याला वेडेपणाच म्हणतं. शहाणं मन समजूत घालतं स्वत:ची.
पण वेड्या मनाचं काय करू?
मला ह्या घरात येऊन तब्बल पाच वर्षं झाली तरी अजून आली नव्हतीस हे मला कितीदा टोचलं म्हणून सांगू? का नाही आलीयेस अजून? कुठे अडकलीस? की... माझं काही चुकतय?... की ही वास्तूच तुला येण्यासारखी नाही?... तसही मी काय करीत होत्ये म्हणून आधीच्या घरांतून तू वावरलीस?
एक ना दोन... ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत.

मला आठवतं, आईकडे... आमच्या घरी तू खूप मोकळी असायचीस. कोकणातल्या अंगण, परसू, शिवारातली, तू...
मुंबईत असूनही आमच्या घराला केव्हढंतरी अंगण-परस होतं. माड, आंबा-फणस, पेरू, जांभळण, शेवगा, केळ, चिकू... इतकच काय पण भाजीचा वाफा, फुलझाडं ह्यानं हासरं होतं आमचं अंगण. बाबांच्या बाबांनाच किती आवड... स्वत: खपायचेच अन माळीही होताच.
मला आठवतं... तू यायची असलीस की, घरचेच काय पण अंगण-परसामधली ती हिरवी मनंही पालवून उठायची. सकाळचा पहिला चहा झाला की पुढे बाबांचे बाबा काठी टेकत अन ते दाखवतायत ते अन अजून बरच काही आपल्या बारिक नजरेनं टिपत त्यांच्यामागे तू...
मग तुझी म्हणून खास फेरी असायचीच. प्रत्येक थोरल्या वृक्षाची, धाकल्या झाडा-झुडपाची, लेकुरवाळ्या केळीची, झालंच तर पेरोबा, चिकुल्या, शेवगा... आणि, कोपर्‍यातल्या धुमारल्या वेलीची... पहिलच हिरवं गोंदण लेऊन लाजणार्‍या कुण्या ठेंगणी-ठुसकीची... अगदी सगळ्या सगळ्यांची जातीनं विचारपूस करीत तुझी स्वत:ची म्हणून एक निवांत फेरी असायची. मग संध्याकाळी आईला, तुझ्या लेकीला सोबत घेऊन कुठे आळं नीट कर, कुणावरची जुनी कात झटक, कुणाला आधार दे.. असं करीत दोघी रमायच्यात.

अजूनही अगदी असुया वाटते मला तुझ्या-तिच्यातल्या त्या हिरव्या नाळबंधाची. मला मुळीच तुझ्यासारखी-आईसारखी झाडांची आतून माया नाही... लावलेलं झाड अगदी कर्तव्य म्हणून मरु-झुरू देणार नाही, मी. पण धावधावून त्यांचं दुखलं-खुपलं बघणं, गदगदून येऊन खोडा-पानावरून हात फिरवणं, त्यांच्याशी बोलणं... शक्यच नाही. तो वसा तुझ्या लेकीनच आयुष्यभर पाळला. उतली नाही मातली नाही.. तू दिला वसा जीवापाड संभाळला... पण तो वसा माझ्या ओटीत आला नाही हे ही तितकच खरं.
वसा घ्यायला ओटही तितकीच घटमुट हवी.

मी तबला वाजवायला लागल्यावर किती नाराज झाली होतीस तू. मुलीची जात... असं स्वच्छ, जुनंच पण मोकळ्या मनाचं समीकरण होतं तुझं. तेव्हा दुखावलेल्या, चिडलेल्या मला, तुझ्यातली नात नाकारणारी आज्जीच दिसत राहिली...
खूप मोठ्ठी झाल्यावर कधीतरी पाणी वळलं असणार... आपसुकच. कधीतरी तुझ्या अनुभवविश्वातली बावरलेली स्त्री, धास्तावलेल्या, नातीच्या काळजीनं खंतावलेल्या आज्जीपर्यंत मी पोचले... अन ती पटलीही. मोठं होणं असंच असतं गं... आपल्याच नकळत.
अगदी स्वच्छ आठवतं मला... त्याच माझ्या घुसमटल्या काळात एकदा खूप आजारले मी. आठवडा झाला तरी आली नव्हतीस तू.
एका संध्याकाळी तापाच्या ग्लानीत कधीतरी डोक्यावरून फिरलेला तुझा सुरकुतला हात अजून आठवतो मला... "... काय म्हणता गो पोर... माका आधी सांगू नय?"... असं तू म्हणताना तुझ्या हललेल्या स्वरानं माझ्या मिटल्या डोळ्यांच्या कडेनं सोडलेला ठाव...
मी अगदी बरी होऊन हिंडू-फिरू लागेपर्यंत तू हलली नव्हतीस माझ्या बाजूची.
तेव्हाच... तेव्हाच माझ्या पंचेंद्रियांनी कणाकणानं क्षणाक्षणातून तुला अगदी रेखून घेतलय माझ्या असण्यावर.
माझ्या अंगावरलं पांघरूण नीट करताना.. तुझ्या पदराची हलकी झुळुक...
येताजाता माझ्या डोक्यावरून, केसांवरून तुझा हात फिरताना तुझ्या हातातल्या दोनच बांगड्यांची माझ्या अगदी कानाशी किणकिण. तुझा सुरकुतलेला गोरापान हात माझ्या गालाखाली घेऊन मी घेतलेला दुपारच्या झोपेचा चुटका... तुझं अवघडून तिथ्थे तस्सं बसून रहाणं...
रोज संध्याकाळी मला उंबर्‍यात उभं करून तू मालवणीत पुटपुटत माझी काढून टाकलेली दृष्ट... त्यावेळी माझ्या क्लान्त अवस्थेत ते सगळं वैतागवाणं वाटलेलं. आता जाणवतय... जगातल्या सगळ्या कल्याणकारी शक्ती तेव्हा तुझ्या रुपात माझी अलाबला घेत होत्या.
तू कालवून आणलेला साधा पीठी-भात, मला सोसणार नाही म्हणून लोणचं द्यायला आई नाकबूल असताना, आपल्या ताटातल्या कालवलेल्या भाताचं माझ्या जीभेवर तू ठेवलेलं रसभरलं बोट....
तू पान खायचीस त्याचा कडवट, गोडुस वास...., तू सकाळी आंघोळ झाल्यावर एकदाच काय त्या चेहर्‍याला, मानेला लावलेल्या टाल्कमपावडरचा वास... तू स्वयंपाकघरात घातलेल्या फोडण्या, किंवा बागेतून फिरून येताना पदरातून आणलेला चाफा, मोगरा, जाई... किंवा दुर्वा, तुळशीच्या मंजिर्‍या, ह्या सगळ्याचा एक संमिश्र... खास तुझाच म्हणून गंध...
आज्जी, तू कशी अन किती माझ्यात भिनलीयेस... काय सांगू? आत्ता, ह्या क्षणी डोळे मिटले तर तू अज्जाच समोर उभी रहातेस...
पण अशी.. मी बोलवून, आठवून नकोयस तू यायला...

माझ्या घरांमधून माझ्या ध्यानी-मनी नसताना तू आपणहून आलीयेस. तुझा म्हणून तो गंध, दोनच बांगड्यांची किणकिण, पदराची झुळुक असं काहीतरी जाणवलय... मी वळून बघतच नाही. तूच आहेस ह्याची मला खात्रीच असते. कौतुकानं माझी घरातली लगबग बघत असशील. माझा वावर, माझी धावपळ, माझा गोंधळ, तुला सुखवत असेल... तुझी ओलावली दिठी माझ्या पाठीवरून उबदार हातासारखी फिरते. तू आहेस.... तू बघतेयस... मग ओल्या पापण्या फडफडावीत... मान हलवीत मी मनापासून घरातलं करीत... आवरीत रहाते. माझ्या नकळत येतेस तशीच हलक्या पावलांनी जातेसही...

ह्या घरात तू आलीच नव्हतीस हा सल किती टुपला म्हणून सांगू. मध्यंतरी खूप आजारी पडले. अगदी दोन-दोन दिवस उठवलही नाही.
एका करकरीत संध्याकाळी सगळ्या जगाची मरगळ घेऊन कुरवंडुन पडून राहिले होत्ये... दाराकडे पाठ करून. नवर्‍याचा, मुलाचा स्वयंपाकघरातला वावर मनाला पराण्या टोचत राहिला. टक्क डोळ्यांनी खिडकीबाहेरच्या आपल्यातच मग्न जगाकडे बघत राहिले....
आणि जाणवलं... तू आलीस.... खोलीच्या दारात उभी आहेस... तुझा गंध जाणवला, तुझ्या पदराची झुळुक, बांगड्यांची किणकिण... अगदी जवळून आल्यासारखी...
म्हणतेयस, ’काय झाला गो पोराक?... इतक्या आजारला... माका आधी सांगू नय?’.....

माझ्या डोळ्याच्या कडांमधून तुझ्या ओल्या स्वरांनी कधीच ठाव सोडला होता...

कधी नव्हे ते वेडं मन अतिशहाणं झालं अन न राहवून मी वळून बघितलं...
....
तू आली होतीस ना?...
आज्जी, आलीसच तू शेवटी.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा आभारी आहे, सगळ्यांचीच. आपापलं आजोळचं कोड्कौतुक आठवून हललात नं? भाग्यवान आहोत आपण, ज्यांना आज्जी-आजोबांचा सहवास मिळाला. प्रेमाची एक विलक्षण मऊ, मवाळ, पण तरीही कणखर ओंजळ आहे ही... कधीही त्यात जऊन पडावं... आपल्याला तर सुख आहेच पण ती ओंजळही आपल्याला फुलासारखी जपते...
हर्शला, "हात" ठेवला तिथे... थॅन्क्स, गं.
तुमच्या लेकरांना अशीच आज्जी-आजोबांची दुलई लाभो.

आताच शामच्या कवितेतल्या 'आजी' बद्दल रिप्लाय लिहिला आणि हे दिसलं. आज अगदी आजी दिवस आहे Happy
माझीही आजी - आईची आई - कोकणातलीच. तुमच्या आजीहून खूप वेगळी. पण 'आजी'पण असच अस्सल! जाऊन आता बरीच वर्ष झाली. आजोबातर तिच्याही बरेच आधी गेले. पण कितीतरी आठवणी... मी आजीच्या नातवंडातला सगळ्यात मोठा. पण मलाही काहीच करता आलं नाही आजीचं, आजीसाठी.... काही चुटपूटी आयुष्यभर पुरतात. असो. आजीबद्दल कधीतरी लिहीन लिहीन म्हणतो. पण तुझ्यासारखा वकुब नाही, ओघ नाही.

शलाका, तुझे आभार तरी कितीदा मागायचे Happy लिहीत राहा.

काय बोलू ते अजिबात सुचत नाही.

मागच्याच आठवड्यात माझी आजी (आईची आई) गेली Sad
त्यामुळे आता माझ्या मनात पण सुद्धा हेच चालू आहे. फक्त माझ नशीब खुप थोर म्हणून ती जाण्याचा आधी फक्त २ आठवडे मी भारतात होते आणि ते पण फक्त २० दिवस त्यात तिची भेट झाली आणि चक्क आम्ही ४/५ दिवस एकत्र घालवले..... खुप खुश होती ती आणि मी सुद्धा, फक्त त्यावेळी वाटल नाही की ती एवढया लगेच आम्हा सगळ्यांना पोरकं करून जाईल Sad

आणि दाद खरंच खुपच छान लिहलंस ... असच लिहीत जा Happy

तुझा लेख वाचून खरंच हालले. माझी जास्त गट्टी बाबांच्या आईशी..अतिशय प्रेमळ, मायेचा उमाळा असलेली माझी आज्जी होती.. खरंच भाग्यवान की तिचा सहवास भरभरुन मिळाला.. रोज रात्री तिच्या जवळ झोपुन अनेक गोष्टी ऐकल्या...ताक-लोणी काढ्ल्यावर तिचा तो मऊ सुरकुत्या असलेला हात माझ्या हातापायावरुन फिरायचा.. आजारपणात, परीक्षेत चांगले गुण पडले कि ती अशीच दृष्ट काढायची... तिची मूर्ति अशीच मध्ये डोळ्यासमोर येते आणि मग काही दिसेनासे होते.. आज्जी हे खरंच काही वेगळंच रसायन आहे... Happy
तू खुपच सुंदर लिहिलय... अशा ह्रद्याजवळच्या आठवणी शब्दबध्द करणे हे काही सोपे नाही...

Happy Sad

दुधावरची साई, तिच माझी आई.. सई भोवुरला भोवुरला.....
अबुलाल, गबुलाल, बाळाची टोपी लाल......

गुलबक्षी साडी.. कधी पांढरा ब्लाऊज.. तर कधी काहीच नाही.. सकाळी उन्हाला पाठ देऊन आमच्याकडून पाठ खाजवून घेणं.. कानातल्या कुड्या आणि हातातल्या बांगड्या सोडता बाकीचे दागिने आता आठवतच नाहीत... आजोबा ज्या गादीवर झोपत असत.. त्या गादीवर त्यांच्या जाण्यानंतर एका दुपारी मला आणि नानूला कुशीत घेऊन पडलेली पण काहीही न गुणगुणणारी तिच्या आमच्या अंगावर पांघरलेल्या त्याच गुलबक्षी पदरातून दिसलेली आजी.. ह्याच माझ्या आठवणी!

बाबांच्या आठवणीतून कळलेली आणि आईच्या आठवणीतून दिसलेली आजी वेगळीच.. तिच्याबद्दल एकदा लिहायला हवं!

आता दिवसभर पिंगा.. दुधावरची साई, तिच माझी आई.. सई भोवुरला भोवुरला.....:(

खूप सुंदर ग, डोळे भरुन वहातच राहिले...माझ्या आईला तिच्या आईकडून असाच झाडापेडात रमायचा वारसा मिळाला आहे...मला माझ्या अन माझ्या मुलांच्या आजी-आजोबांची पण आठवण आली...असच लिहित रहा...तु लिहिलेलं वाचलं की दिवस कारणी लागतो...

दाद फार सुंदर लिहलयस गं!
आज्जीचा खुप सहवास मिळणा-यांपैकी मी एक नशिबवान... एकदम भरुन आलं आजीच्या आठ्वणीनं. खुप छान .
आणि धन्स.. Happy

छान !

खूप छान लिहिलंय ..... नेहमीप्रमाणेच.

माझ्या दोन्ही आज्या आठवल्या.
त्यांचा सहवास क्वचितच लाभायचा अधूनमधून; पण जेव्हा भेट व्हायची तेव्हा प्रेमात न्हाऊन निघायचो.

दाद, ____/\___ खूप छान लिहिलंत.
तुमची भाषा खूप ओघवती व थेट आत भिडणारी आहे.
मलाही माझी आज्जी आठवली.

दाद, अप्रतिम लिखाण! इतकं सुंदर, ओघवतं लिखाण कसं काय जमतं ग तुला! वाचताना मधूनच धूसर दिसायला लागतं आणि मग कळतं डोळे पाणावलेले आहेत.

अप्रतिम !

तुमच्या लेकरांना अशीच आज्जी-आजोबांची दुलई लाभो.>>> दाद, माझ्या लेकीलातर पणजीची (पंजीची) चौघडीही आहे. Happy

apratim!

दाद किती सुंदर लिहीलं आहेस !!!!

मी याबाबतीत एकदम कमनशिबी! दोन्हीकड्चे आजीआजोबा माझ्या लहानपणीच गेले.
आप्पा म्हण्जे माझ्या आईचे वडील मात्र दर रविवारी तीन तास प्रवास ़ करून (येताना तीन आणि जाताना तीन) फक्त मला भेटायला यायचे. मी सहा वर्षाची असताना ते गेले. आईची आई, एकदा धापा टाकत माझ्या हट्टापायी मला बागेत घेउन जात असल्याचे आठवते. याशिवाय अक्षरश: अजिबात आठवत नाही. मला त्यांचा सहवास इतका कमी मिळाला की मला आजीआजोबा नाहीत यापेक्षा आईपपा ते कसं सहन ़ करत असतील असं वाटायचं.
मला पहिलं बाळ झाल्यावर खरं मुलांसाठी आजीआजोबांचं स्थान काय असतं ते कळलं.

Pages