चित्रपट हा माझ्या अतिप्रचंड आवडीचा विषय असुनही मला कधीही एखाद्या चित्रपटाविषयी लिहावेसे वाटले नाही कारण इतर बरेचसे लोक हे काम माझ्यापेक्षा चांगले करतात आणि कित्येक लोकांना (पक्षी : समीक्षक) या कामाचे पैसे मिळतात. तसेच एखादा चित्रपट कोणाला कधी आणि कशासाठी आवडावा किंवा आवडू नये हे बऱ्यापैकी व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही बदलत जाता तशी तुमची आवडही बदलत जाते. तसेच अगदी चित्रपट बघतानाचा मूड, तेंव्हाच्या अपेक्षा यानीपण फरक पडतो. त्यामुळे हाच चित्रपट बघा वगैरे सांगण्यात मला फारसा अर्थ वाटत नाही. पण...
एखादा चित्रपट कळणे आणि कळल्यानंतर तो आवडणे/नावडणे यात फरक आहे. आणि एखादा चित्रपट पाहिल्यावर अशा प्रतिक्रिया ऐकण्यात याव्यात आणि तो चित्रपट पाहिल्यावर मी आणि इतरांनी वेगळाच चित्रपट पाहिला कि काय असे वाटावे, हि परिस्थिती याआधी झाली नव्हती.
हि वेळ 'पुणे ५२' ने आणली. म्हणून हा खटाटोप.
सर्वप्रथम निखिल महाजन, गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन. एक सुंदर चित्रपट दिल्याबद्दल! आणि दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी साधल्याबद्दल. एक म्हणजे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम करणे आणि चित्रपटाची उत्तम प्रसिद्धी करणे.
चित्रपट हे दृक-श्राव्य माध्यम असल्याबद्दल वाचून होतो. पण सिटी प्राईड कोथरूडला तरी ते बडबडण्याचे (चित्रपट सुरु असताना) आणि खेळण्याचे (मोबाईल) माध्यम असावे अशी शंका आली.
अनेकांशी चर्चा केल्यावर असे कळले कि त्यांना हा चित्रपट कळलाच नाही. माझ्या मते याची दोन कारणे आहेत.
एक : 'दया!! वो देखो लाश!!!' प्रकारची मानसिकता. यात प्रॉब्लेम असा आहे कि तुम्हाला समोर एक मेलेले रक्तबंबाळ शरीर जरी दिसत असले तरी जोपर्यंत कोणी म्हणत नाही कि 'वो देखो लाश' आणि 'धडाम धडाम' आवाज करत नाही. तोपर्यंत आपल्या डोक्यात काहीच घुसत नाही. सगळ सोपे करून भरवावे लागते.
दोन : एखादा चित्रपट वरकरणी जसा दिसत असतो त्यापेक्षा अजून काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक त्यात करत असतो. बरेचसे चांगले चित्रपट हे २-३ पातळ्यांवर एकाच वेळी सुरु असतात. यात नवीन काहीच नाही आहे. खूप सोपे उदाहरण द्यायचे झाले तर स्पीलबर्गचा ET. हि मुळात एक परीकथा आहे. (उदा. 'मोठी' माणसे बर्याच वेळा ET समोर दिसत असूनही न दिसल्यासारखा दाखवतात. कारण तो लहान मुलांच्या विश्वातली एक कल्पना आहे जी मोठ्यांना दिसत नाही. वगैरे वगैरे). गेल्या वर्षीचा ऑस्कार विजेता इराणी चित्रपट 'अ सेपरेशन' हा नातेसंबंधांवरचा वाटत असला तरी तो मुळात आजच्या इराण मधील राजकीय-सामाजिक परिस्थितिवरचा आहे. आपल्याकडचे सांगायचे तर देऊळ (नसरुद्दिन शाह चे पात्र का आहे? उत्खननाचा संदर्भ काय सांगतो?), हजारो ख्वाइशे ऐसी इत्यादी नावे घेत येतील. म्हणजे मुळात चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारी प्रतीके (symbolism) न कळणे/शोधणे हे दुसरे कारण.
माझी दुसरी चिडचिड हि आहे कि मी काही महान समीक्षक नाही. पण मला एकदा बघून आणि त्यावर एक १५-२० मिनिटे विचार करून हा चित्रपट बर्यापैकी झेपला. विचार अजूनही चालूच आहे आणि अजून पाहिल्यावर अजून झेपेल. थोडावेळ सर्वसामान्य प्रेक्षकांची गोष्ट आपण सोडून देऊ. पण समीक्षकांनी इतके उलट सुलट का लिहावे? आणि ते पण त्यांना या कामाचे पैसे मिळत असताना. त्यांना त्यांची मते असावीत हे मान्य आहे. पण एखादा चित्रपट मुद्दलातच आपल्याला झेपला नसताना त्याच्याविषयी का लिहावे? काहींनी आपले अज्ञान प्रकट केले आहे (उदा अमर आपटेचा पाठलाग कोण करते आहे ते कळत नाही) तर काहींनी 'abstract' म्हणून, 'हटके असूनही थोडा कमी पडतो ' ..., किंवा 'मराठी चित्रपटांचे उज्वल भवितव्य' असले लिहून वेळ मारून नेली आहे. असले arm chair journalism करताना एखाद्याच्या अत्यंत प्रामाणिक प्रयत्नांवर पाणी फेरू नये असे मला वाटते. आणि कोणाच्याच समीक्षेत चित्रपटाविषयी कोणतीही साधक-बाधक चर्चा दिसून आली नाही.अपवाद क्र १ आणि २.
/****** Spoiler Alert. जर चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेले वाचू नका *******/
आता चित्रपटाची उगाचच कलात्मक समीक्षा करत बसण्यापेक्षा सरळ प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने पुढे जातो.
प्रश्न १ : चित्रपटाचे नाव पुणे ५२ का आहे? आणि १९९२च का?
उत्तर : हा चित्रपट पुण्यातील कर्वेनगर सारख्या मध्यमवर्गीय लोकवस्ती मध्ये आर्थिक उदारीकरणच्या काळात घडणाऱ्या बदलांविषयी आहे. ९०-९५ च्या काळात कोथरूड हे आशियातील सर्वात झपाट्याने वाढणारे उपनगर आहे अशी चर्चा असायची. या काळात एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली. तसेच या काळाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जो बदल झाला तो अत्यंत झपाट्याने झाला.
हे सर्व बदल रिचवणे आणि त्यामध्ये स्वत:चे अस्तित्व टिकवणे हेच अमरच्या पात्राचे मुख मोटिवेशन आहे म्हणून १९९२.
उदाहरण : चित्रपटाच्या नामावलीत 'middle class on rise', रेडिओवर आर्थिक उदारीकरण सुरु झाल्याची बातमी येणे. शेवटला घरांचे रंग,पात्रांचे कपडे बदलणे. नवश्रीमंत झालेले बिल्डर, रस्त्यावरती सारखे काहीतरी खाणारे लोक, सेल आणि वस्तू विकत घ्या अशा जाहिराती(चंगळवाद). खूप जोराने फिरणारा कॅमेरा इ इ
प्रश्न २ : चित्रपट कशाविषयी आहे?
उत्तर : चित्रपट हा वर म्हणल्याप्रमाणे जागतिकीकरण(Globalization) आणि त्याचे परिणाम याविषयी आहे. नवीन काळात माणसाच्या मुल्यांपेक्षा पैशाला जास्त महत्व प्राप्त झाले. हि अमर आपटेच्या 'हिरो' असण्याची आणि बदलत्या जगामध्ये त्याचे सत्व जपून ठेवण्याची कथा आहे. अमर प्रामाणिकपणे पैसे कमवत असतो व त्यामुळे आलेल्या गरिबीला त्याची बायको कंटाळली असते. यात तो नेहा कडे ओढला जातो. जी चंगळवादाचे प्रतिक आहे. अमरच्या हातून नकळत तिचा खून(?) होतो व त्याचा फायदा करून घेऊन प्रसाद साठे त्याला अनेक घाणेरडी कामे करायला लावतो. हि सर्व कामे केल्याबद्दल नवा समाज त्याचे कौतुक करतो. अमरकडे पैसा येतो. लोकांची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. पण अमरच्या मनात या सर्व गोष्टींची गिल्ट असते. नेहा खरच जिवंत आहे का हे नक्की सांगता येत नाही ते अमरच्या मनातील गिल्ट आहे. तिचा मृत्यू(ग्लोबलाइजेशनला बळी पडणॆ) हे कारण करून तो तडजोडी करणे आणि पैशाच्या मागे धावणे हे करतो. यामुळे त्याला सारखे फोन वाजण्याची, नेहाचे भास होण्याची स्वप्ने पडतात. एकदा त्याला नेहा जिवंत आहे असे वाटते,म्हणून तो प्रसादला जाब विचारयला जातो जिथे प्रसाद त्याला ब्लॅकमेल करायला जातो. अमर हा खरा हिरो आहे तो त्याला धुडकावून लावतो व परिणामांना सामोरे जातो. तो बायकोला सगळे सांगून टाकतो. स्वप्नाच्या मागे धावताना मोडून पडल्याचे कबुल करतो. शेवटी प्रसादाच्या माणसांचा मार खाउन शब्दश: मोडून पडलेला अमर आपल्याला दिसतो. जो या बदलाच्या काळात हिरो व्हायला बघत आहे.
उदाहरण : जेंव्हा प्रसाद अमरला नेहाचा काटा काढायची ऑफर देतो तेंव्हा तो त्याला म्हणतो कि 'ग्लोबलाइज व्हा आपटे'. झटपट श्रीमंत व्हा अशा स्कीम्सचे संदर्भ. नेहाच्या जवळपास सर्व प्रसंगातील फ्रेम्स खूप ब्राईट आहेत. पण अमरच्या 'ग्लोबलाईझ' होण्याच्या आधीच्या सगळ्या फ्रेम्स खूप डार्क आणि रंगहीन आहेत. आधीचा अमर हा दाढी वाढलेला फाटका दिसणारा माणूस आहे. नंतर सुंदर घरात राहणारा, सुंदर कपडे घालणारा, नेटकी मिशी ठेवणारा आहे . जेंव्हा अमर आपटे लोकप्रिय होण्याच्या बातम्या येतात('भाडखाऊ' आणि मारामारीचे प्रसंग) तेंव्हा अमर फक्त वेगाने पळताना (उर फुटेस्तोवर) दाखवला आहे. अमर बायकोला जे म्हणतो ते 'मी तोच आहे ग प्राची. भोवती सगळे बदलत आहे. तुला आनंद हवा होता. त्यासाठी मी बदलायला हवे होत . माझ्या स्वप्नांचा माझ्या वास्तवाशी काहीच संबंध उरला नाही आहे. मी मोडून पडलो आहे....'. त्याचाकडे असलेले नाणे हे तो हिरो असल्याचे प्रतिक आहे जेंव्हा तो नेहाचे सगळे प्रकरण करतो तेंव्हा तो बऱ्याच वेळा ते नाणे हरवतो/विसरतो. अमर जेंव्हा पण गाडीवर फिरतो आहे तेंव्हा खूप वेगाने हलणारा कॅमेरा आजूबाजूचे वेगाने घडणार बदल दाखवत आहे. 'ग्लोबलाइझ' झाल्यानंतर आवाजांचा वाढलेला गोंगाट इ इ .
प्रश्न ३ : मग गुप्तहेराची कथा का घेतली?
उत्तर : माझ्या मते गुप्तहेर हा समाजावरती नजर ठेवणार माणूस आहे. बदलांचा साक्षीदार असल्याचे तो प्रतिक आहे. तसेच फिल्म न्वार.
प्रश्न ४ : दळवींचे पात्र का आहे?
उत्तर : दळवी हे १९९० च्या आधीच्या काळाचे प्रतिक आहेत.
उदाहरण : दळवींचे म्हातारे असणे. दळवींच्या बोलण्याचे विषय सोव्हिएत रशियाचे विघटन आणि आपले होणारे विघटन. दळवींचे छोट्या कामांसाठी अमरवर अवलंबून असणे. पैसा आल्यानंतर शेजारची/ओळखींची एव्हडी गरज उरत नाही. अमरचे नेहाबरोबर लफडे होणे आणि तेंव्हाच दळवींचा मृत्यू होणे जे जुना काळ संपून नवा काळ सुरु होतो आहे हे दर्शवते.
प्रश्न ५ : वरील अर्थ काढणे अति होत नाही का? हि नुसतीच गुप्तहेर कथा नाही कशावरून?
उत्तर : दिग्दर्शकाने ज्या गोष्टींवर जास्त भर दिला आहे त्यावरून हे लक्षात येते. शेवटी शेवटी घराचे आणि पात्रांचे रंगरूप बदलणे हे खूप भार देऊन उठावदार तऱ्हेने दाखवले आहे. अमरचे मोठे स्वगत शेवटी येणे. अमरची सगळी स्वप्ने. इ इ .
प्रश्न ६ : अमरचे फोटो कोण काढत असते?
उत्तर : पहिल्यांदा नेहाने ठेवलेला गुप्तहेर. नंतर प्रसाद साठेचा गुप्तहेर. (प्रसाद अमरला शेवटी म्हणतो कि आमच्याकडे नेहाच्या मृत्यूचे आणि तुमच्या नाण्याचे फोटो आहेत)
प्रश्न ७ : चित्रपटात अमर आणि नेहाचे प्रणयप्रसंग का घेतले आहेत(जास्त होतात)?
उत्तर : का नाही. तसेच अमरचे तिच्याकडे असलेले आकर्षण खूपच वास्तववादी पद्धतीने मांडले आहे जे मला आवडले. तसेच नक्की कोणत्या क्षणी अमर तिच्या लफड्यात पडतो हे खूप तपशिलात जाउन येणे आवश्यक होते ते यामुळे आले. तसेच कोणत्याही परिणामांचा/जवबादार्यांचा विचार न करता सेक्स करणे हे चंगळवादाचे उघड प्रतिक आहे.
प्रश्न ८ : गिरीश कुलकर्णी दिसायला गुप्तहेर वाटत नाही.
उत्तर : माझ्या मते जर एखादा माणूस गुप्तहेर असेल तर त्याच्या कामाची हि गरज आहे कि तो चारचौघात उठून दिसला नाही पाहिजे. नाहीतर सगळेच त्याला ओळखतील :).
आता मला का आवडला. अर्थातच तात्रिक बाबी, अभिनय, उत्तम संवाद ('मी तोच आहे ग प्राची' तर अप्रतिम). पण मी १९८५ ला जन्मलो आणि हा सगळा काळ मी पाहिला आहे. एकंदरीत उथळपणा वाढतो आहे. पैसा असेल तर काहीही चालते या गोष्टी खूप जाणवल्या. मला कुठेतरी आतमध्ये हि गिल्ट फिलिंग आली जी कि खूप वेळ माझ्या डोक्यात राहिली. असा चित्रपट आत भिडणे मला त्याचे खूप मोठ्ठे यश वाटते. मला नावडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाची गती खूप कमी जास्त होते (मला संथ वाटला नाही). हि गती थोडी सांभाळायला हवी होती. अर्थातच चित्रपट संपताक्षणी नाही कळला पण थोडा विचार केल्यावर कळला. मला तरी मला काहीतरी देणारे चित्रपट आवडतात. पाहिला काय नाही पाहिला काय फरक पडत नसेल तर चित्रपट बघायचाच कशाला? बाकी नाही तिथे हसणारे आणि कॉमेंट मारणारे प्रेक्षकांना एव्हडेच म्हणावेसे वाटते कि दिग्दर्शक मूर्ख आहे आणि त्यांच्याकडे फुटेज जास्त झाले आहे म्हणून त्यांनी चित्रपटाची लांबी वाढवली याशिवाय इतर कारण असू शकते का? आणि येउन बसलोच आहोत तर थोडासा अगदी म्हणजे अगदी थोडा विचार करायला काय जाते? का सगळे चित्रपट सोपेच असले पाहिजेत? मग त्यासाठी इतर खूप लोक पडलेले आहेत.
आणि आता ज्यांना एक सोपा 'सस्पेन्स थ्रिलर' पाहायचा आहे त्यांना एक खुशखबर! नुकताच 'रेस २' प्रदर्शित झालेला आहे. आणि लोकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे लवकरच रेस ३,४,५,.. येऊ घातले आहेत याबद्दल शंका नाही!
टीप : अर्थातच हि सगळी माझी मते आहेत आणि दुसऱ्या कुणाला यांचा वेगळा अर्थ लागू शकतो. तसेच मी चित्रपट एकदाच पाहिला असल्याने दिलेल्या तापशिलात काही चुका असल्यास क्षमस्व.
परीक्षण छानच लिहिलंय. तुम्ही
परीक्षण छानच लिहिलंय. तुम्ही १ते ८ जी काही प्रश्न-उत्तरं लिहिली आहेत, त्यावरून थोडा काहीतरी संदर्भ लागतोय काही न कळलेल्या प्रसंगांचा आणि एकूण चित्रपटाचा.
तरीही.... नाहीच आवडला हा चित्रपट.
( चित्रपटात अमर आणि नेहाचे प्रणयप्रसंग का घेतले आहेत(जास्त होतात)? )
तुमचं उत्तर वाचलं तरी अजूनही वाटतंय.. जास्तच होतात.
अर्थातच चित्रपट संपताक्षणी
अर्थातच चित्रपट संपताक्षणी नाही कळला पण थोडा विचार केल्यावर कळला. >>> करेक्ट. छान लिहिलं आहे.
केवळ मराठी आहे म्हणून किंवा
केवळ मराठी आहे म्हणून किंवा मा.बो. माध्यम प्रायोजक आहे म्हणून अशी स्तुतीसुमनं उधळली जात असावीत की काय ? असा संशय येऊ लागला आहे.
माझ्या मते हा एक अतिशय विस्कळित, भरकटलेला, (अनेक हिंदी सिनेमांप्रमाणे) ओव्हर हाईप्ड आणि थोडक्यात गंडलेला सिनेमा आहे. मी ह्यावर परीक्षण लिहिलं होतं, ते 'मी सिनेमाची संपूर्ण कथा उघड केली' असे कारण देऊन डिलीट केले गेले. (ह्या लेखात कथेचा कुठला कोपरा अंधारात ठेवला आहे? ह्याचे उत्तर मला नकोय. कारय, खरं कारण कळलं आता !)
असो.
चित्रपटाचे नाव पुणे ५२ का आहे? आणि १९९२च का? - हे अजूनही जस्टीफाय होत नाहीच. आर्थिक उदारीकरण अजूनही चालूच आहे.. सरळमार्गी माणसं आजही आहेत. जी नाईलाजाने गैरमार्ग धरण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतात आणि अमर आपटे बनतात. त्यासाठी १९९२ ची आवश्यकता नाही. पुणे ५२ तर उगाचच आहे. खासकरून नेहाने अमरसाठी घरपोच पत्र देताना त्यावर 'अमर आपटे, पुणे ५२' असं लिहिणे तर विनाकरणच. मला आजपर्यंत बाय हॅण्ड आलेल्या एकाही पत्रावर पत्र देणाऱ्याने माझे नाव आणि थेट पिन कोड असे लिहिले नाही. मीही कधी तसे लिहिले नाही.
अमर आपटेने गुप्तहेर असणेही उगाचच 'हाईप' बनवण्यासाठी असावे. समाजावर नजर ठेवणारा गुप्तहेर असतो, हे स्पष्टीकरण पटत नाही. समाजावर प्रत्येक घटकाची नजर असते. माझ्या मते तर, अमर आपटे गुप्तहेर सोडून कुणीही असता तर चालला असता. त्याचे गुप्तहेर असणे पटतच नाही. तो गुप्तहेर वाटतच नाही.
दळवींचे पात्र अनावश्यक आहे, असे मला वाटत नाही.. पण त्या पात्राचा उत्कंठा वाढविण्यासाठी (किंवा निर्माण करण्यासाठी) वापर करता येऊ शकला असता, जो करता आला नाही.
अमर-नेहाचे प्रणयप्रसंग अनावश्यक वाटत नाहीत. पण 'अनाकर्षक' वाटतात !!
गुप्तहेर अमर आपटे ज्याप्रकारे समोरासमोर उघड-उघड फोटो काढत असतो.... (आणि गुप्तहेरगिरी म्हणजे फक्त फोटोग्राफीच समजतो की काय, असं वाटतं) त्यावरून त्याचा धंदा चालत नाही, ह्याचे आश्चर्य वाटत नाही. कुणाचे 'चोरून' फोटो कसे काढायचे असतात, हेही जर शिकवावे लागणार असेल, तर अवघड आहे !
असो.. रसभंग केल्याबद्दल क्षमस्व.
रसप, १९९२ सालच का, या
रसप,
१९९२ सालच का, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या वर्षी आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. भारतीय मध्यमवर्गाची वखवख वाढायला सुरुवात झाली, ते हे वर्ष. या चित्रपटाचा संबंध उदारीकरंणाच्या प्रक्रियेनंतर बदल व्हायला सुरुवात कशी झाली, याच्याशी आहे. त्यामुळे कथा १९९२ सालातच घडायला हवी.
पुणे ५२च का, तर पुणे ५२ हा भाग मध्यमवर्गीयांचा बालेकिल्ला. पेठीय मध्यमवर्गापेक्षा वेगळा. हा भाग १९९२ सालानंतर प्रचंड वेगानं बदलला.
अमर आपटे ही एक विशिष्ट व्यक्ती नाही. पापभिरू मध्यमवर्गाची ती प्रतिनिधी आहे. त्यामुळे पुणे ५२ हा इतकाच पत्ता पुरेसा आहे.
हा काही नेहमीचा 'सस्पेन्स' चित्रपट नाही. रहस्यकथेच्या माध्यमातून वेगळा आशय पटकथाकारानं मांडला आहे.
<केवळ मराठी आहे म्हणून किंवा मा.बो. माध्यम प्रायोजक आहे म्हणून अशी स्तुतीसुमनं उधळली जात असावीत की काय ? असा संशय येऊ लागला आहे.> कृपया इतरांच्या बुद्धिमत्तेवर आणि हेतूंवर संशय घेऊ नका. चित्रपट कळला नसल्यास पुन्हा एकदा पाहा.
सिद्धार्थ, परीक्षण उत्तम आहे.
सिद्धार्थ,
परीक्षण उत्तम आहे.
<ज्यांना एक सोपा 'सस्पेन्स थ्रिलर' पाहायचा आहे त्यांना एक खुशखबर! नुकताच 'रेस २' प्रदर्शित झालेला आहे. आणि लोकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे लवकरच रेस ३,४,५,.. येऊ घातले आहेत याबद्दल शंका नाही!> याला अनुमोदन.
चित्रपट कळला नसल्यास पुन्हा
चित्रपट कळला नसल्यास पुन्हा एकदा पाहा.>> भारतात कितीजण चित्रपट कळला नाही म्हणून परत बघतात....तोही सस्पेन्स ? ('कहानी' चा अपवाद)
पुणे ५२ ला चांगले म्हणायसाठी
पुणे ५२ ला चांगले म्हणायसाठी रेस २ ची मापं काढायची गरज काही कळली नाही. माबो ने प्रायोजित केला म्हणजे सगळ्या माबोकरांनी त्याला चांगलेच म्हणावे असा काही लोकांचा अट्टाहास का?
चित्रपट समजण्या साठी येवढी
चित्रपट समजण्या साठी येवढी स्पष्टीकरणं द्यावी लागतात ह्याचाच अर्थ हा चित्रपट केवळ अश्या 'क्लास" साठी आहे.
जरुर बघणार...
पण असे चित्रपट लोकप्रिय होत नाहीत. कारण त्यांचा अर्थ लोकांना समजला नाही तर बीट्वीन द लाइन्स वाचायला आजकाल कोणालाही वेळ नाही... ते मग अडगळीत पडतात... एक प्रयोग म्हणुनच त्यांच्या कडे पाहिले जाते... देउळची जातकुळी वेगळी होती, मस्साला ची पण. ते दोन्ही अप्रतिम एंटरटेनर होते... अगदी देउळचा विषय गंभीर असला तरी तो खुप जीव्हाळ्याचा विषय होता, त्या मुळे प्रेक्षक खुप लौकर रीलेट झाले... पन पुणे ५२ च्या बाबतीत फारच उलगडुन सांगावं लागत आहे, म्हणुनच तो एक गहन सिनेमा आहे असं वाटतय...
वरचं परीक्षण उत्तम आहेच... आता मात्र सिनेमा बघायची उत्सुकता आहे.... कधी योग येतो पहायचे...
(ह्या सिनेमात जर बोल्ड दॄष्ये सुचक म्हणुन आली असती, तर तो "यु" किंवा नीदान " यु/ए" झाला असता. मग मला पाहाता आला असता...... येवढ्या गोष्टी बीटवीन द लाइन्स ठेवल्यात मग हे कशाला उघड..? का गल्ला खेचायला ? विरोधाभास वाटतो!!!)
mandard, परीक्षण लिहिताना
mandard,
परीक्षण लिहिताना एखादा चित्रपट मायबोली माध्यम प्रायोजक आहे की नाही, याचा संबंध येऊ नये. कोणी त्या चित्रपटाचं कौतुक करत असल्यास 'हा केवळ मायबोलीचा चित्रपट आहे म्हणून चांगलं लिहिलं गेलं आहे', असं म्हणणं अयोग्य आहे.
वा! चित्रपटाअचे रसग्रहण ही
वा!
चित्रपटाअचे रसग्रहण ही कल्पनाही आवडाली आणि लिखाण अगदी यथार्थ झालेय!
निव्वळ तुमच्या ह्या परि़क्षणाखातर मी हा चित्रपट बघेन.... आणि कळवेनही मला समजला का ते!
आभारी आहे!
(प्र २ चं उत्तर पटलं नाही, सध्यातरी, चित्रपट पाहिल्यावर रिलेट होतंय का ते पाहीन)
चित्रपट हा वर म्हणल्याप्रमाणे
चित्रपट हा वर म्हणल्याप्रमाणे जागतिकीकरण(Globalization) आणि त्याचे परिणाम याविषयी आहे<<<
तिचा मृत्यू(ग्लोबलाइज होणे)<<<
खाली पडलो मी
एवढं सगळं तुम्ही लिहील्यानंतर
एवढं सगळं तुम्ही लिहील्यानंतर आधीच खिसे तपासत सिनेमाला जाणारी मराठी जनता कशाला जाईल तिथे?
समीक्षणात एवढे खोलून(सविस्तर ह्या अर्थाने) लिहीणारे आपणच मात्र!
बघायचा होता पण रहीत केला.
चैत्राली, ललिता-प्रीती,
चैत्राली, ललिता-प्रीती, चिनुक्स, मोहन कि मीरा, बागेश्री लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल आभार !
@ रसप : मी इथे स्पष्ट करू इच्छितो कि मी मायबोली आणि पुणे ५२ टीम यांच्याशी मी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही आहे. ना मी अगदी मायबोलीच्या कोणत्याही कंम्पुमधील आहे. ना हा लेख लिहिण्यात माझा कोणताही वैयक्तिक फायदा आहे. लेखाचे प्रयोजन मी सुरुवातीलाच लिहिले आहे. तुमचा लेख कुणी व का डिलीट केला हे मला माहित नाही. पण मला तुमचा याविषयीचा राग समजू शकतो.
@ चिनुक्स : <कृपया इतरांच्या बुद्धिमत्तेवर आणि हेतूंवर संशय घेऊ नका. चित्रपट कळला नसल्यास पुन्हा एकदा पाहा.>
@ मोहन की मीरा : देऊळ हा बऱ्याच पातळ्यावरती असणारा असला तरी तो एका गावाची कथा या गोष्टीचे पूर्ण समाधान देणारा होता. पुणे ५२ फक्त एक गुप्तहेर कथा म्हणून परिपूर्ण होत नाही आणि म्हणून हा चित्रपट बऱ्याच जणांना भरकटल्यासारखा वाटला.
@ बाजीराव मेंगाणे : मी १३० रुपयात प्राइम टाईमचा शो पाहिला. मला नाही वाटत पैसा हे कारण आहे.
आणि मी पुन्हा एकदा तेच सांगतो <एखादा चित्रपट कळणे आणि कळल्यानंतर तो आवडणे/नावडणे यात फरक आहे.>
रसग्रहण आवडले पण चित्रपट
रसग्रहण आवडले पण चित्रपट नाही!
मला तर पुलंच्या सदू आणि
मला तर पुलंच्या सदू आणि दादूचाच भास झाला हे रसग्रहण वाचताना
दिवे घ्या
@स्वरुप : <रसग्रहण आवडले पण
@स्वरुप : <रसग्रहण आवडले पण चित्रपट नाही!>
@आशुचँप : दिवेच घेतले आहेत. पण हे काही अगदीच इस्बेन आणि थिअटर ऑफ अबसर्ड नाही आहे.
उत्तम रसग्रहण सिद्धार्थ..
उत्तम रसग्रहण सिद्धार्थ.. चित्रपट पहाण्याची उत्सुकता निर्माण करण्याचं काम या तुमच्या परिक्षणाने नक्कीच केलं आहे.
"चित्रपट कळला नसल्यास पुन्हा
"चित्रपट कळला नसल्यास पुन्हा एकदा पाहा." >>
हे वाक्य लिहीताना तुमच्याच आधीच्या
"कृपया इतरांच्या बुद्धिमत्तेवर आणि हेतूंवर संशय घेऊ नका.">>
या वाक्याचेही स्मरण असूद्या
प्रेक्षकांना नाही कळला चित्रपट तर पुन्हा पहा म्हणून थेट प्रेक्षकांच्या बुद्धीमेत्तेवर शंका घेणे नव्हे काय?
चित्रपट पाहिला नाही.. पण
चित्रपट पाहिला नाही.. पण मायबोलीवर व इतर ठिकाणी वेगवेगळी परिक्षणे वाचली.. चित्रपट बहुदा आपल्याला पण आवडणार नाही असेच वाटतेय.. तरीपण तुमचे रसग्रहण खरच कौतुकास्पद आहे.. तुमच्या रसग्रहणामुळे तरी हा चित्रपट कधी आयताच समोर आला तर पाहण्याचे नक्कीच धाडस करेन.. किप इट अप.. अजुन वाचायला आवडेल.. शुभेच्छा !
सिद्धार्थ राजहंस चांगले
सिद्धार्थ राजहंस
चांगले रसग्रहण आहे. मी पाहिला आहे आणि काही गोष्टी तुमचा लेख वाचल्यावर रिलेट झाल्या.
स्वरुप यांनी म्हटल्याप्रमाणे मलाही चित्रपटापेक्षा तुमचे रसग्रहण जास्त आवडले.
पण, सहज एखादा चांगला सरळ सस्पेन्स थ्रिलर पाहण्याच्या अपेक्षेने कुणी जात असेल तर त्यात चुकीचे काय आहे?
ज्यांना एक सोपा 'सस्पेन्स थ्रिलर' पाहायचा आहे त्यांना एक खुशखबर! नुकताच 'रेस २' प्रदर्शित झालेला आहे.
किंवा
चित्रपट कळला नसल्यास पुन्हा एकदा पाहा
हे सल्ले आगाऊपणे दिल्यासारखे वाटतात.
चित्रपट जसा कोणाला आवडला तसा कोणाला तरी आवडला नाही. उगाच कुणाच्याही बुद्धिमत्तेवर किंवा अभिरुचीवर शंका घेण्याचे काहीही कारण नाही.
तुमच्याकडून पुढेही जरूर काही वाचायला आवडेल.
रसग्रहण आवडले.
रसग्रहण आवडले.
रसग्रहण छान लिहिलय.. पण कथा
रसग्रहण छान लिहिलय..
पण कथा अन संथ वेग ..चित्रपटाला मारक ठरतो.
रसग्रहण आवडले. पण इथे
रसग्रहण आवडले.
पण इथे बुद्धिमत्तेवर शंका किंवा अभिरुची वर शंका असा वाद का?
जर मला एखादी गोष्ट ..कविता, चित्र कळली नाही, भावली नाही आणि त्या विषयी कोणीतरी चांगल वेगळा दृष्टीकोन देणार लिहिलेले वाचण्यात आल.. तर जातोच कि आपण परत त्या कवितेकडे किंवा गोष्टीकडे.. तसच चित्रपटाच .. लगेच आपल्या बुद्धिमत्तेचा अवमान झाला अस का वाटावं...
अर्थात या लेखात लिहीलेल्या सगळ्याशी सहमत असावं असा नाही:)
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
ब-याचशा न कळालेल्या गोष्टी हे
ब-याचशा न कळालेल्या गोष्टी हे रसग्रहण वाचल्यानंतर कळतात. पण महत्वाची गोष्ट अजूनही नाही कळाली.
अमर नेहाकडे रात्र काढतो तेव्हां त्याच्या बायकोला फोन येतो. ती अमरला नेहासोबत त्या अवस्थेत पाहते. पण ती काहीच न पाहील्यासारखी रिअॅक्ट का होते ? ती जेव्हां अमरला बघत असते तेव्हां अमरही तिच्याकडे बघत असतो. त्याच्या चेह-यावर तेव्हां "बघ, हे तुला दिलेलं उत्तर" असे भाव असतात का ? ती येऊन गेल्यानंतर तो ताबडतोब कपडे करून नेहाला न सांगता निघून जातो. त्याच्यासाठी ती रात्र हे बायकोच्या टोचून बोलण्याला (तिडीक येऊन) दिलेलं उत्तर होतं, त्यामुळे त्याला ते नातं पुढे चालू ठेवण्यात इंटरेस्ट नव्हता हे पटलं . पण त्याच्या बायकोचं काय ? तिची प्रतिक्रिया ???
आणि दोघांत कुठलेही संबंध येत नव्हते असे संवादातून समजत जाते. मग तिचं प्रेग्नन्ट असणं आणि नव-याची बेईमानी डोळ्यांनी पाहूनही थंड राहणं यांचा काही संबंध होता का ? या प्रश्नांमुळे सिनेमा अजूनही कळाला नाही.
कलाकार चांगले ही जमेची बाजू.
कलाकार चांगले ही जमेची बाजू. काही प्रसंग छान. पण एकूण चित्रपट गंडले ला वाटला
गॉडफादर या चित्रपटातही
गॉडफादर या चित्रपटातही गूढार्थ असावेत असे वाटू लागले आहे. जमले तर अशी समिक्षा करावी वाटतेय.