आमची पहिली गाडी

Submitted by ज्योति_कामत on 7 January, 2013 - 21:44

आमची पहिली गाडी

झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती. आणि गाडीत बसून जायला मिळालं तरी मी तेवढ्यावर खूष होते. शिवाय ड्रायव्हिंग शिकून घेतलं तर नवरा तेही काम माझ्यावर सोपवून आरामात राहील अशी साधार भीती होती. त्यामुळे नवरा एकटाच ड्रायव्हिंग स्कूलला गेला. त्या शिकवणार्‍या गुरूने काय पाहून देव जाणे पण याला प्रोफेशनल लायसन्स काढायचा अर्ज भरायला लावला. साहजिकच आर टी ओ ने प्रथेनुसार एकदा नापास करून दुसर्‍या टेस्टमधे त्याला एकदाचे लायसन्स दिले.

लायसन्स काढून झाले. आता गाडी घेऊया म्हणून विचारविनिमय सुरू झाला. तेव्हा नवी मारूती ८०० तशी आमच्या आवाक्याबाहेर होती. माटिझ, इंडिका वगैरे नव्या नव्या दिसायला लागल्या होत्या. गाड्यांची कर्जे आतासारखी स्वस्त आणि सहज मिळत नव्हती. आणि आवाक्याबाहेर कर्ज काढायचं नाही हा आमचा कोकणातला बाणा. साहजिकच तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एखादी सेकंड हॅण्ड प्रीमियर पद्मिनी ऊर्फ "फियाट" घेऊया असा विचार सुरू झाला. ती गाडी प्रीमियर पद्मिनी हे मला माहित आहे पण तिचं प्रचारातलं नाव फियाटच. तेव्हा मी तेच म्हणणार! ही १९९६-९७ ची गोष्ट आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नंतरही बरीच वर्षे फियाट गाड्या चालत होत्या, पण गोव्यात फियाट तेव्हा खूप स्वस्त मिळायला लागल्या होत्या. तसेही तिथे सगळे वर्रात गोंयकार! आमच्या बँकेतला शिपाई म्हणे, "तू फियाट घ्यायच्यापेक्षा ट्रक का घेत नाहीस?" पण आपण नवीनच ड्रायव्हिंग शिकलोय, तेव्हा भलीभक्कम लोखंडी फियाटच बरी. कुठे आपटली तर काय घ्या! असा विचार करून माझ्या नवर्‍याने फियाटच घ्यायची ठरवली.

दर पावसाळ्याच्या आधी तो स्कूटर रंगवायला द्यायचा त्या गॅरेजवाल्याचा चारचाकी गाड्या रंगवणे आणि दुरुस्ती करणे हा खरा प्रमुख धंदा. त्याच्या कानावर आम्हाला फियाट घ्यायची आहे हे पडताच त्याने उत्साहाने जुन्या गाड्या शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याचा फोन आला. "पात्रांव, उसगावला एकाची जुनी फियाट विकायची आहे. बघून येऊया." माझा नवरा लगेच धावला. गाडी पाहताच कोणीही प्रेमात पडेल अशी देखणी. फिकट निळ्या रंगाची डौलदार गाडी पाहून माझा नवरा खूश झाला. शिवाय गाडीचा मालक आर टी ओ चा भाऊ. तेव्हा कागदपत्रांचाही काही प्रॉब्लेम नव्हता. गाडी फारशी चाललेली नाही हे ऐकल्यावर आम्हाला वाटलं की गाडी नव्यासारखी असेल, टायर बरे दिसत होते. शेवट २५००० ला गाडी घ्यायची ठरली. तिथून बाहेर पडताना गाडीच्या मालकाची मुलगी सहज म्हणाली, "तुम्ही आमची गाडी घेताय? आम्ही आता नवी गाडी घेणार आहोत. ही गाडी एकसारखी बंद पडते!" तेव्हा शंकेची पाल खरं म्हणजे चुकचुकायला हवी होती. पण आम्हाला वाटले की गाडी फार वापरात नाही, त्यामुळे असं होत असेल. बरं मेक्यानिक मोहंमद म्हणाला "पात्रांव तू भिऊ नको. मी गाडी नीट ठेवीन तुझ्यासाठी." झालं. गाडीची बारीक सारीक कामे करून गाडी एकदाची घरी आली आणि आम्ही गाडीचे मालक झालो!

ही फियाटची कामे म्हणजे काय याचा कोणी अनुभव घेतला असेल त्याला कळेल. एक तर ती पत्र्याची गाडी, त्यामुळे गंज येणे, पत्र्याला भोके पडणे, काहीवेळा पत्रा कोणीतरी खाल्ल्यासारखा दिसणे इ नाना प्रकार असतात. उन्हापावसात फियाट ठेवली की तिची रया गेलीच! ही गाडी बराच काळ छप्पराखाली जागेवर उभी असायची त्यामुळे पत्र्याची कामे नसली तरी विजेची, ब्रेक वगैरेची दुरुस्ती, पॉलिश, सीट कव्हर्स इ इ करायला हवे होते. तर त्या कामांचे आणखी १० एक हजार झाले. पण गाडी दिसत होती फारच सुरेख. माझा नवरा गाडीला रोज इंजिन चालू करून सोसायटीत चक्कर मारून आणायचा. तेवढ्यात सासूसासरे आले होते. मग प्ल्यान केला की आपल्या गाडीने देवळात जाऊया. दिवसभर बाहेर रहायचे आणि नवर्‍याला तर गाडी चालवायची सवय नाही म्हणून एक धंदेवाईक ड्रायव्हर बरोबर घेतला आणि आमची गाडी निघाली.

१०/१२ किमि जाईपर्यंत कसला तरी जळका वास यायला लागला. थोड्याच वेळात इंजिनाकडून धूर यायला लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही पटापट गाडीतून बाहेर आलो. ड्रायव्हरने गाडीचा जबडा उघडला आणि थंड व्हायला दिली. तोपर्यंत त्या गावातले लोक जमा होऊन सल्ले द्यायला लागले होते. गाडी सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर सगळे प्ल्यान गुंडाळून ठेवले आणि आमची वरात परत घरी गेली. नवरा स्कूटर घेऊन महंमदकडे धावला.

महंमदने गाडी सोडून दिली होती तिथे जाऊन पाहणी केली आणि सुवार्ता दिली की इंजिनात पाणी गेलंय. गाडीचं इंजिन उतरवायला पाहिजे. झालं होतं असं की रेडिएटर गळका होता. फियाटच्या रेडिएटरमधे रोज पाणी भरून त्याची पातळी बघत बसावी लागते. आता या गाडीचा रेडिएटर गळका आहे हे त्या महंमदच्या आधीच लक्षात आलं का नाही देवजाणे. शंका घ्यायला वाव नक्कीच होता. पण हे आम्हाला तेव्हा माहित नव्हतं. गाडी टो करून तो घेऊन गेला. मग नवर्‍याचे त्याच्या गॅरेजकडे हेलपाटे सुरू झाले. दोन एक महिने काढून, कायबाय करून गाडी परत चालती झाली. दरम्यान महंमदचं "हे काम करूया ते काम करूया" वगैरे सुरूच होतं. शेवटी त्याच्याकडचा इलेक्ट्रिशियन सांतान हळूच म्हणाला, "महंमदचं सगळं ऐकू नको रे! गाडी चालू झाली की पुरे!" झाली एकदाची गाडी तयार.

आता माझा नवरा अगदी लक्ष देऊन रेडिएटरमधे पाणी भरणे वगैरे कामे करायला लागला. जवळपासच्या फेर्‍या सुरू झाल्या. एकदा आम्ही त्या सांतानलाच बरोबर घेऊन रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो. आणि गाडी नीट चालते आहे म्हणून आम्ही सुटकेचा श्वास टाकला. पुढच्या वेळेला माझ्या नवर्‍याने एकट्याने गाडी चालवत सुखरूप रत्नागिरी गाठली. ४ दिवसांनी परत येताना निघायला जरा उशीरच झाला होता. कुडाळला पोचेपर्यंत ५ वाजून गेले. बाजारात चहा प्यायला थांबलो आणि परत निघताना गाडी सुरूच होईना! फियाट बंद पडली की बरेच लोक जमा होतात हा माझा अनुभव आहे. तसेच बरेच जण आले, आणि एकाने न सांगताच बाजूला असलेल्या गॅरेजवाल्याला बोलावले. तो दुरुस्ती करीपर्यंत आणखी उशीर झाला आणि मग काळोखातून ड्रायव्हिंग नको म्हणत आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गोव्याला आलो. त्यामुळे आणखी एक रजा घ्यावी लागली. आणखी काही दिवसांनी रविवारी फिरायला म्हणून गेलो आणि तिथे गाडी बंद पडली. मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच! तशी मोठी गुणाची गाडी!

फियाट जास्त चाललेली नाही हा प्लस पॉइंट नव्हे हे आतापर्यंत आम्हाला कळले होते. दरम्यान माझ्या नवर्‍याने गाडीचा डॉक्टर बदलला. हा दत्ता मेक्यानिक कायम दारू प्यायलेला असायचा. दारू प्यायला नाही तर त्याचे हात थरथरायचे म्हणे! त्याच्या गॅरेजमधे एक झुरळांनी कुरतडल्यासारखा दिसणारा फियाटचा सांगाडा होता आणि त्यात एक नरकासूर कायमचा उभा करून ठेवलेला होता. मुलांना पण तिथे गेले की मज्जा वाटायची. फियाटचे स्पेअर पार्ट्स खूप स्वस्त मिळायचे आणि मेक्यानिकची फी पण अगदी थोडी. त्यामुळे गाडीची दुरुस्ती महाग वाटत नसे. काही दिवस बरे गेले. आम्ही एक दोन वेळा बेळगाव, एकदा मालवण, आणि एकदा रत्नागिरीला फार काही न होता जाऊन आलो.

पण आतापर्यंत माझ्या नवर्‍याचा गाडीबद्दलचा उत्साह कमी झाला होता. रोज इंजिन सुरू करणे म्हणजे कंटाळवाणे काम. त्यामुळे हळूहळू २ दिवसांनी, मग ४ दिवसांनी, मग आठवड्याने अशी गाडीला सुरू करण्यातली गॅप वाढत चालली होती. साहजिकच गाडीची बॅटरी चार्ज न झाल्यामुळे इंजिन सुरू न होणे वगैरे प्रकार व्हायला लागले होते. बॅटरी काढून २/३ वेळा चार्ज करून आणावी लागली होती. फियाटचा एक दुर्गुण म्हणजे तिला जर रोज स्टार्ट मारला नाही तर इंजिन पटकन सुरू होत नाही. मग शेजारच्या पोरांना बोलावून ती ढकलायला लागते. तेही प्रकार सुरू झाले होते. मग गाडीचे टायर्स एकदा बदलून झाले. नंतर गाडी हळूहळू घरापेक्षा जास्त वेळ दत्ताच्या गॅरेजमधे पडून रहायला लागली होती.

अशातच एकदा नवरा मुलीला आणायला तिच्या शाळेत गेला. घरी येताना बस स्टॆँडच्या बाजूच्या मुख्य चौकात गाडी बंद पडली. लगेच दोन पोरांनी मदत करून गाडी बाजूच्या पेट्रोलपंपावर ढकलून ठेवली आणि मग दत्ताला बोलावून आणून ती परत चालू करणे वगैरे सोपस्कार पार पडले. पण घरी येताच कन्यारत्नाने जाहीर केले की बाबाने मला घरी न्यायला यायचे असेल तर फियाट आणता कामा नये. स्कूटर चालेल. तोपर्यंत चिरंजीवसुद्धा फियाटमधून कुठेही जाऊया नको म्हणायला लागले होते. मग आम्हीच कधीतरी हायवेवर एक फेरी मारून यायचो. होता होता एक दिवस एक भंगारवाला विचारायला आला, "साहेब तुमची गाडी द्यायची आहे काय?" आम्हाला कसंतरीच वाटलं. कारण काही झालं तरी ती आमची पहिली गाडी. दिसायला फार सुंदर. आणि गुणीसुद्धा. हो. कधीही मेक्यानिकपासून लांब बंद पडली नाही! त्या भंगारवाल्याला पळवून लावला. पण मग आणखी भंगारवाले यायलाच लागले.

तोपर्यंत गाडीची १५ वर्षे पुरी झाली होती. एकदा ग्रीन टॅक्स भरून गाडी परत पास करून घ्यावी लागली. शेवटी नवराही कंटाळला. "गाडी दुरुस्तीला दिली आहे का?" याऐवजी, "गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं!" असं शेजारी विचारायला लागले. तेव्हा अगदीच अति झालं असं म्हणून एका भंगारवाल्याला ती गाडी दहा हजाराला देऊन टाकली आणि माझ्या नवर्‍याने सुटकेचा श्वास टाकला. त्या गाडीची त्याला इतकी दहशत बसली होती की नंतर जेव्हा दुसरी गाडी घेणं सोपं झालं तेव्हाही तो गाडी घ्यायला कसाच तयार होईना. मग “आता तू जर दुसरी गाडी घेतली नाहीस तर मी ड्रायव्हिंग शिकून मीच गाडी घेईन” अशी धमकी द्यावी लागली, तेव्हा कुठे आमच्याकडे मारुती ८०० आली. पण तरी गाडी म्हटली की अजून ती फियाटच आठवते!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलय, मनापासून, साधे , सरळ.
कांही अंशी, माझाच अनुभव लिहिलाय.
अजून माझी पहिली फियाट म्हणजे प्रिमियर आठवते. ती एकच गाडी आहे जिचा नंबर अजून आठवतो. सी एच ए- आणि पंजाबीत म्हणायचे बाराबत्ती १२३२.
लाडाची असते हो फियाट सगळ्यांच्याच
Happy

छान लिहिलं आहे..
आमची Palio आहे पण कुणी कुठली गाडी विचारली तर फियाटच सांगतो.. फियाट सिर्फ नाम ही काफी है..

सुंदर अन प्रामाणिक.!
अंड्याकडे सध्या गाडी काय गाडीचा टायरही नसल्याने तुर्तास लेखनसीमा.!

लेख मस्तच..! पुलेशु.

अंड्या ... इथही तेच... सध्या दुचाकी वर समाधान आहे...
चारचाकी अजुन ही आवाक्या बाहेरच वाटते..! Sad

छान आठवणी.
त्या काळात फियाट आवडती होती कारण आंबा शिटर गाडी व्यतिरिक्त तोच एक बरा चॉइस होता. मारूत्या वगैरे नवीनच आल्या होत्या. अन तशा महागच होत्या.

हिशोब करून पाहिला तर त्या काळी सोनं ४.५-५ हजार रुपये १० ग्रामला होते. त्या काळी मारूती ४.५ लाखाला होती.
आज सोने ३०-३२ हजारावर आहे, अन मारूती साडेतीन-४ लाखाला. सो तुलनेने मारूती एक दशांश किमतीला मिळते आहे. अन कर्जही तेव्हा जे १७-१८%ने मिळत असे, ते ९% वर आले आहे.

या सगळ्यामुळे अजून एक उद्योग त्याकाळी तेजीत होता. पेट्रोलवर चालणारी सेकंडहँड फियाट घ्यायची अन तिला डिझेल इंजिन बसवून घ्यायचे. गुजरातेत शिप ब्रेकिंग यार्ड्स आहेत तिथे ही इंजिने स्वस्तात मिळत असत. हा असा जुगाडही बरेच लोक वापरत असत.

छान लिहिलंय. मला आधी वाटलं फोटो वगैरे असतील नव्या कोर्‍या स्विफ्ट, सिटी, सिव्हिक चे, पण ही स्टोरी खूप छान आहे. आपल्या मध्यमवर्गीयांना पहिल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप अप्रूप असते नै Happy

हिशोब करून पाहिला तर त्या काळी सोनं ४.५-५ हजार रुपये १० ग्रामला होते. त्या काळी मारूती ४.५ लाखाला होती.
आज सोने ३०-३२ हजारावर आहे, अन मारूती साडेतीन-४ लाखाला. सो तुलनेने मारूती एक दशांश किमतीला मिळते आहे. अन कर्जही तेव्हा जे १७-१८%ने मिळत असे, ते ९% वर आले आहे.

>>>>>>>>>>>>

ओह, तरीच आज उठसूठ लोक गाड्या घेत आहेत.
पण त्यामुळे ट्राफिक, पार्किंगचे जाम प्रॉब्लेम झालेत राव.
तसेच तेलपेट्रोल या नैसर्गिक संपत्तीचा झपाट्याने र्हास होत असेल ते वेगळेच.

एक सहज प्रश्न - त्या काळी पेट्रोलचे भाव काय होते हो?

@ अंड्या, तेव्हा पेट्रोल काहीतरी २१/२२ रुपये लीटर आणि डिझेल १०/११ रुपये होतं वाटतं!

@ इब्लिस, तेव्हा फियाट ५-१० हजाराला घेऊन गॅस किट बसवून घ्यायचा उपद्व्यापही लोक काही दिवस करत असत!

खुप मस्त आठवणी.... माझ्या बाबांची पण पहिली गाडी (१९८२) फियाटच होती. त्या नंतर २ री पण फियाटच घेतली . पहिली पेट्रोल होती. उगाचच दुसरी घेताना डिझेल घेतली ( साधारण १९९४) आणि त्या गाडीने जे पीदवलय.... बाबारे बाबा.... आठवलं तरी घाम फुटतो. चालुच न होणे, चिखलात अडकणे, मुंबई पुणे घाटात न चढणे, गरम होणे, हे सगळे प्रकार तिने केले. नवी कोरी गाडी असुनही खुप नखरे केले. बाबांनी वैतागुन मारुती घेतली दोन वर्षात.... भयानक छळवणुक..... परत बाबा ऑटोमोबाईलच्याच व्यवसायात असुनही त्यांना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला खुप त्रास झाला.

त्या गाडीची एक भयानक आठवण म्हणजे आम्ही माझ्या लग्नाची आमंत्रणं करायला कल्याणला गेलो होतो. येताना रात्र झाली आणि मॅडम (नशीब म्हणुन) एका पेट्रोल पंपा जवळ बंद पडल्या. आम्ही कल्याण ठाणे बाय्पास वर होतो. रात्रीचे ९ वाजलेल. बरोबर मी, आई आणि बाबा!!!! सगळा अंधार. गाडी ठेवायला पंप वाला तयार झाला. पण ठाण्याला पोचणार कसं? तेंव्हा त्यानेच एक ओळखीचा रिक्षावाला आणला. त्या रात्री बाबांची जी तंतरली होती... तरुण मुलगी आणि पन्नाशीतली बायको आणि ते एकटे!!!! पण चालवणारा रिक्षेवाला भला होता. आम्हाला अगदी घरा पर्यंत सोडलं त्याने. २०० रुपये घेतले ( १९९६ चे २०० रुपये) पण काही वाटलं नाही.

तेंव्हा पासुन बाबांनी त्या फियाटचं नावच टाकलं.... ड्रायव्हरच ती गाडी दुसर्‍या दिवशी घेवुन आला....

बाकी मी घेतलेल्या नंतरच्या गाड्यां नी मात्र अशी करामत परत कधीच केली नाही. माझी पहिली गाडी पण मारुतीच होती. १९९८. तिला माझा नवरा लाडाने "पिंटी" म्हणायचा.... नंतर मग ऑफिसच्या खुप गाड्या मिळाल्या, अगदी सँट्रो पासुन ते टोयोटा कोरोला पर्यंत... पण पिंटी ती पिंटीच.....

मोहन की मीरा...

"...तिला माझा नवरा लाडाने "पिंटी" म्हणायचा...."

अरेच्या अशी एक 'पिंटी' मी इथे....कोल्हापूरात, अगदी आमच्या कॉलनीत पाहिल्याचे आठवते. नाव मागील काचेवर लिहिले होते, मोठ्या अक्षरात आणि शेजारी बार्बीसम एका बाहुलीचा फोटोही....आत्ता गाडीचे मॉडेल आठवत नाही. कदाचित तुमचीच गाडी असेल ती.

असेच गाडीच्या काचेवर लिहिलेले एक नाव लक्षात राहिले...."टुटुल". अर्थ काही समजला नाही टुटुलचा, पण भावले मात्र.

अशोक पाटील

नाही मामा...

आमची पिंटी काही लिहिलेली नव्हती. आणि दुसरं म्हणजे नवर्‍याने ती त्याच्या नात्यात कोकणातल्या घरी देवुन टाकली.... विकली नाही.....

पिंटी हे नाव ही मीच शोधले होते....

रच्याकने... मला अशी गमतीची नावं ठेवायची सवय आहे... एक कबुतर रोज येतं त्याला ' पिकलु" , मुलगी लहान असताना तिच्या एका बाहुल्याला " ड्रिंबीक" , ती झोपायची नाही, मग जो मुलांना घेवुन जायला यायचा तो " ड्रीपाँग" , तिच्या दुसर्‍या बाहुल्याला "पिचाकिलु"..... अशी अनेक....

वरच्या मोहनकीमीराताईंच्या पोस्टला फेसबूकस्टाईल लाईक
मलाही अशीच आवडकीछंद आहे.
वाडीतल्या पोरांना अन शाळाकॉलेजातल्या मित्रांना एकसोएक नावे मीच ठेवतो.
पण ते पुन्हा कधीतरी, इथे त्यावर चर्चा नको.

बाकी यावरून अमिताभच्या "अकेला" नामक चित्रपटातील "रामपियारी" आठवली.

सहि आहे लेख, थोड्याफार प्रमाणात रिलेट झाला. मी हात साफ प्रिमियर पद्मिनीवरच केला. त्यावेळेला (अर्ली एटीज) चॉइस अगदिच लिमिटेड होते - अँबेसेडर, पद्मिनी, काँटेसा किंवा स्टँडर्ड. परंतु आमची पद्मिनि बर्‍यापैकी रिलाएबल होती; कस्टम मेड होती म्हणुन असेल कदाचीत - मुळ मालक मधुसुदन वैराळे (किरण वैराळेचे बाबा). बहुतेक मंत्री होते, म्हणुनच गाडीचा टॅग ४४४४ होता. मित्रांमध्ये चार चौका याच नावाने संबोधली जायची...

मस्त लिहिलंय. Happy

"गाडी दुरुस्तीला दिली आहे का?" याऐवजी, "गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं!" असं शेजारी विचारायला लागले. >>> Biggrin

मस्त लिहिलयस ग Happy <<मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच! तशी मोठी गुणाची गाडी!>> Lol

मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच! तशी मोठी गुणाची गाडी!>>>>आवडलं Happy

Pages