तसा मी मायबोली चा गेले ५ वर्षे सभासद आहे. पण कायम रोमात असतो ( Read Only mode ) शक्यतो कधी लिखाणाच्या फंदात पडत नाही. मला ते तितके जमतही नाही म्हणा.....
पण यावेळेस वाटले काय हरकत आहे प्रयत्न करायला.... आत्ताच कोकणात जाउन आलो म्हणलं चला एक वृत्तांत लिहुन बघूया..... सोबत भरपुर फोटोज पण होतेच.......
भरपुर दिवस झाले कोकणात जायचं ठरवत होतो पण योगच जुळून येत नव्हते. आत्ता सगळं जुळून आलं तर वरचा कोकण कि तळकोकण हेच ठरत नव्हते. शेवटी गाडी चालविणारा मी एकटाच, हातात चारच दिवस म्हणून मग वरचा कोकणच करावे असे ठरविले.....
२ तारखेला मस्त सकाळी सकाळी निघालो. हरिहरेश्वरला जायच्या आधी दिवेआगारला मुद्दाम वाट वाकडी करुन गेलो शेटे कडे जेवायला, संदर्भः मायबोलीचे बीबी :- ( दर्या बीच हाउस कि असे काही तरी होते. ) तिथे दोघातिघांना शेटे म्हणून विचारले त्यांनी तेच एकमेव जे हॉटेल सांगितले तिथे गेलो. जेवण अगदी भारी असे नव्हते पण कोकणात सगळीकडे मिळते तसे होते. रेट व्यवस्थित होते उगाच अति महाग नाही. माझ्या बायकोला व्हेज खायचे होते म्हणून सुहास बापट यांना फोन केला साधारण ११.३० ला तर त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितले. एकच माणूस जेवायला आहे असे सांगून सुद्धा त्यांनी नकार दिला......
दिवेआगार शेखाडी रोड छान आहे, हरिहरेश्वरला जाताना. रोडच्या शेजारीच समुद्र. फोटोज काढायला एकदोन छान स्पॉट आहेत. पण नेमकी कॅमेराची बॅटरी गंडली होती.... ट्रिप च्या पहिल्याच दिवशी माझी हि परिस्थिती. वेंधळेपणा आणि दुसरं काय.....
हरिहरेश्चरला दिलीप बोडस यांचे घर शोधत गेलो. परत एकदा संदर्भः मायबोलीचे बीबी पण त्यांना रुम द्यायची नव्हती कि काय माहीत पण त्यांनी नाही म्हणून सांगितले. हो म्हणाले असते तरी मी कदाचित तिथे रुम घेतली नसतीच. त्यांच्या समोरचे माउली त्यापेक्षा खूप छान. मस्त ओसरी असलेले घर, घराच्या मागे २०० ते ३०० मीटर नारळ पोफळीची बाग, आणि त्यातून समुद्राकडे जाणारी पाउलवाट, मस्त होते घर. आणि मालक पण छान होते वागायला.
सध्याकाळी समुद्रावर गेलो तर क्रिकेट खेळणारी चार पाच मुले सोडली तर कोणी नव्हते.... आख्खा बीच आम्हाला हुंदडायला मोकळा. बीचवर कोणत्या तरी प्राण्याने छान नक्षी काढून ठेवली होती.
ईतका मोकळा बीच मिळाल्यावर आम्हाला पण दंगा करायला आणि फोटो साठी क्रिएटीव्हीटी ला वेळ मिळाला. ईथेच मायबोलीवर ते उडीबाबाचे फोटो कोणितरी नियमित टाकायचे बहुतेक यो रॉक्स..... म्हणलं चला आयडिया ढापायला काही हरकत नाही. मग बसलो उड्या मारत. ते फोटोज बायकोला ईतके आवडले कि रोज सकाळ संध्याकाळ उड्याच मारत होतो बीचवर.....
हे काही फोटोज उड्यांचे.....
सकाळी ऊठल्यावर परत बीच वर जायला निघालो. रुमच्या मागच्या दारा तून च बागेतून समुद्रा कडे जायला रस्ता होता. ईतकी छान बाग होती कि त्यातच फोटो काढत काढत जायला दिड ते दोन तास गेले. मग बीच वर चांग लेच उन असल्याने सरळ रुम वर परत येण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता....
का काय माहित पण तिथे जास्त दिवस रहवेसे वाटेना म्हणून मग गाडी काढली आणि सरळ कर्दे गाठलं, मधे फक्त जेवायला केळशीचा स्टॉप घेतला. हरिहरेश्वर वरुन जेट्टि वरुन गाडी बोटितून आणता येते.... त्यामूळे जवळ जवळ ७० ते ८० किमी वाचले......
कर्दे ला निवास, न्याहरीसाठी नागवेकर म्हणून आहेत त्यांच्या कडे राहिलो. घराच्या समोरच बीच आहे अगदी ५० फूटावर. हे घर खूप आतमधे आहे, शोधायला अवघड. गावात काही मिळत नाही, मासे खायचे असल्यास जाताना घेउन जावे लागतात. नाहीतर त्यांना फोन करुन सांगितल्यास ते आणून ठेवतात.
बीच अगदी घराच्या समोरच असल्याने आणि आजूबाजूला थोडी वस्ती असल्याने बीच वर अंधार पडल्यावर पण फिरायला जास्त भिती नाही वाटत.
कर्दे बीच वरचे उद्योग......
गुहागार ला वेलवण बीच हाउस ला गेलो होतो. पण रुम्स बूक होत्या, मग हिंडता हिंडता खरेज प्लेजर लिव्हिंग ला गेलो. मस्त होतं मला तर भयानक आवडले. एकदम बीच ला लागून. रुम्स आणि टेंट होते. आणि जेवण एकदम हायक्लास, खरे काका एकदम दिलदार माणुस. कशाला नाही म्हणाले नाही, चूल पेटवून पाणी तापवायला पण नाही आणि मासे भाजायला आणि बारबेक्यू करायला पण. ईत़की छान सोय १००० ते १५०० रुपयात मला तरी ४ दिवसात बघायला मिळाली नव्हती. रुम्स च्या पुढे बीचवर एक टेबल पण आहे मस्त कँडल लाईट डिनर वगैरेला, अगदी प्रॉपर बीच हाऊस. आणि आमच्या कडे असे चालत नाही, तसे चालत नाही हे करायचे नाही, ईकडे जायचे नाही असे काही नाही. या, रहा, खा प्या, मजा करा. गाणी लावायची असतील तर मोठे स्पिकर, नाचायला बीच किंवा एक टेंट आ॑हे.
तळीरामांसाठी अगदी योग्य ठिकाण
खरे काका पण एकदम छान, प्राणिमित्र. रात्री आम्हाला बीचवर टॉर्च घेउन खेकडे दाखवायला घेउन गेले. मदतीला अगदी तत्पर. काय लागेल ती मदत करतात. कशाची ददात पडू दिली नाही.
पण एक आहे. रुम्स अगदी समुद्राजवळ आहेत. आणि आजुबाजुला सगळ्या बागा. २ रुम्स आणि ९ टेंट. जर रुम्स मधे ऑक्युपन्सी नसेल तर एखादे वेळेस भिती वाटायची शक्यता आहे. रात्री गरजणारा समुद्र, झाडांची सळसळ, अधून मधून पडणारे नारळ, सुपार्या आणि किर्र् अंधार. आम्ही गेलो तेव्हा कोणीच नव्हते संध्याकाळी. मी रात्री बेरात्री तोरणा, लोहगड सारखे ट्रेक केल्या मुळे काही वाटत नव्हते. पण एखाद्या अमावश्येच्या रात्री भयानक पाउस पडत असताना कदाचित मी पण रहायला नाही म्हणेन कदाचित.
गुहागार ला अजुन रहावेसे वाटत असताना पण परत फिरणे भाग होते....आख्ख्या कोकण ट्रिप मधे शेवटचे दोन दिवस अगदी मजेत गेले. खरेज प्लेजर लिव्हिंग चा अनुभव खरच अगदी प्लेजंट......
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज
तो पाउलखुणांचा फोटो चिक्कार आवडला.
ती नक्षी बहुतेक खेकडेबाबाने
ती नक्षी बहुतेक खेकडेबाबाने काढली असेल, असे नाजूक साजुक काम त्यांचेच असते.:फिदी:
तुमची ट्रिप पण मस्त झाली, फोटु एकदम क्लीअर. कोकण भन्नाटच आहे. तुमच्याकडुन छान माहिती समजली धन्यवाद.
ती नक्षी बहुतेक खेकडेबाबाने
ती नक्षी बहुतेक खेकडेबाबाने काढली असेल, असे नाजूक साजुक काम त्यांचेच असते>>>>येस्स, खेकडेबाबांचेच नक्षीकाम आहे ते.
उडीबाबा आवडले... स्पेशली
उडीबाबा आवडले... स्पेशली तिचा.... "आज मेरे जमिपर नही है कदम!" किंवा " दिवाना मस्ताना हुवा दिल , जाने कहा हो के बहार आयी" आठवलं.
पाऊल-खुणा तर अप्रतिम !
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज >>> +१
धन्यवाद, जिप्सी, टुनटुन,
धन्यवाद, जिप्सी, टुनटुन, सुप्रिया.
तो पाउलखुणांचा फोटो चिक्कार आवडला.>>>>>>>>
पाउलखुणांची कल्पना बायकोची... त्यात अजुन भरपुर वेगवेगळे फोटो काढले आहेत पण तेच तेच रिपीट होतील म्हणून नाही टाकले.
उडीबाबा आवडले... स्पेशली तिचा....>>>>>>>>
ऊड्या मारतानाचे बायकोचे फोटो , आम्ही दोघांनी सोबत उड्या मारतानाचे फो टो अगदी मस्त आले. बीचवर अगदी कोणीच नसल्याने मस्त बिन धास्त फोटो काढता आले. आणि सुर्यास्ताचा बॅकग्राऊंड असल्याने अजुन मस्त दिसत होते. पण हा पब्लिक फोरम असल्याने टाकता आले नाहीत. तिचा तोच एक फोटो टाकू कि नको असे वाटत होते....
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज
सुरेख वर्णन आणि साजेसे फोटोज
तो पाउलखुणांचा फोटो चिक्कार आवडला.
>>>> +१००
छान वर्णन आणि फोटो. ( ५ वर्षे
छान वर्णन आणि फोटो. ( ५ वर्षे मौन का होते ? ) अगदी ओळखीच्या जागा वाटतात.
( गुहागरला माझी सख्खी आत्या असते. माझे नाव तिनेच ठेवले होते. पण त्यावेळी रस्ते चांगले नव्हते म्हणुन कधीच जाणे झाले नाही. तिच्याकडून तिथल्या समुद्राच्या आवाजाबद्दल खुप ऐकले आहे. इथे फोटोत तरी दिसले. छान वाटले. )
टेंटच्यावर पंडाल...
टेंटच्यावर पंडाल...
सर्व फोटो मस्त.
सर्व फोटो मस्त.
अमेझिंगली अमेझिंग! कौतुक
अमेझिंगली अमेझिंग! कौतुक करायला शब्द नाहीत.
सर्वच फोटो खूप आवडले.
सुरेख वर्णन, खरेज प्लेजर
सुरेख वर्णन, खरेज प्लेजर लिव्हिंग बद्दल अधिक महिती शेयर करा हि विनन्ती.
सुंदर फोटो आणि वर्णन.
सुंदर फोटो आणि वर्णन.
लय भारी लिहिलंस रे दोस्ता,
लय भारी लिहिलंस रे दोस्ता, फोटूही मस्तच.......
फिरत रहा, फोटो काढत रहा, लिहित रहा.......
सुंदर फोटो आणि वर्णन
सुंदर फोटो आणि वर्णन
छान वर्णन आणि फोटोज. तो
छान वर्णन आणि फोटोज.
तो पाउलखुणांचा फोटो चिक्कार आवडला>>+१
सर्वच फोटोज् मस्त.
सर्वच फोटोज् मस्त.
सर्वांना धन्यवाद, संजीव वर जे
सर्वांना धन्यवाद,
संजीव वर जे लिहिले आहे त्य शिवाय काही माहिती हवी असल्यास विचारा.....
सेनापती, टेंट मधे उन्हामूळे खूप त्रास होतो म्हणून पेंडॉल टाकला आहे बहुतेक. हे टेंट शक्यतो रात्री वापरण्यासाठी असावेत असे वाटते. .
अधिक महिती उदा. खरेज प्लेजर
अधिक महिती उदा. खरेज प्लेजर लिव्हिंगचा सम्पर्क क्रमान्क , सन्केत स्तलाची महिती. धन्यवाद!
सुंदर फोटो ...........
सुंदर फोटो ...........
खरे काकांचा मोबाईल क्रमांक :-
खरे काकांचा मोबाईल क्रमांक :- ९४२११३७०१४
संकेत स्थळ नाही आहे बहुतेक..... त्यांना फोन केलात तर ते सांगतील व्यवस्थित......
मस्तच.... नारळी पोफळी च्या
मस्तच.... नारळी पोफळी च्या बागेचा फोटो खुप आवडला...
वॉव.. सुरेख प्रचि आनी मस्त
वॉव.. सुरेख प्रचि आनी मस्त वर्णन..
खेकड्याने काधलेली नक्षी तर अतिच सुबक.. फारच आर्टिस्टिक दिस्तोय..
उड्या ही अप्रतिम...
गुहागर म्हंटल की संपलच सगळ
गुहागर म्हंटल की संपलच सगळ खरचं स्वच्छ आनी सुंदर आहे गुहागर
मस्तच सगळे काही..... लेख आणि
मस्तच सगळे काही..... लेख आणि फोटो सुद्धा.... खुप आवडले.:)
धन्यवाद, वर्षू, दिपक, केदार,
धन्यवाद, वर्षू, दिपक, केदार, प्रिती.
आत्ता वर्णन न वाचले .
आत्ता वर्णन न वाचले . खर्र्याचा रिसोर्ट "खाला पाट" ला आहे का "वरला पाट" ला ? माझ आजोळचा घर पण समुद्राला लागून आहे. घराच्या पाठी नारळाची वाडी आणि लगेच समुद्र . रात्री समुद्राची गाज ऐकायला यायची पण आम्हाला कधी भीती वाटली नाही. रात्री ७ पर्यंत समुद्रावर बागडायचे. शंख शिंपले गोळा करायचे. कुर्ल्या तुरु तुरु पळत असायच्या त्या चुकवायच्या आणि समुद्रावरून ७ पर्यत परत. घरात आल कि एवढी ती वाळू मोठ्या न्हाणीघरात धुवून काढताना खूप त्रास व्हायचा . पण रोज पाण्यात जायच तासान तास . शिरस्ताच होत तो
मस्तच फोटो
मस्तच फोटो
ऑसम वर्णन आणि फोटोज्
ऑसम वर्णन आणि फोटोज् सुद्धा...छान वाटलं
ती वाळूवरची नक्षी छोटया खेकड्यांनी बिळं उकरताना काढलेली .
रात्री ७ पर्यंत समुद्रावर
रात्री ७ पर्यंत समुद्रावर बागडायचे. शंख शिंपले गोळा करायचे. कुर्ल्या तुरु तुरु पळत असायच्या त्या चुकवायच्या आणि समुद्रावरून ७ पर्यत परत. घरात आल कि एवढी ती वाळू मोठ्या न्हाणीघरात धुवून काढताना खूप त्रास व्हायचा . पण रोज पाण्यात जायच तासान तास . शिरस्ताच होत तो>>>>> सुज्ञा ......माझं बालपण आठवलं, सेम असंच करायचो आम्ही सुद्धा
Pages