अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)

Submitted by निंबुडा on 27 November, 2012 - 02:10

ही १८९७ सालची गोष्ट आहे. हिवाळा संपत आला असूनही रात्री बोचरी थंडी पडत असे व सकाळी धुके! अशात एका भल्या पहाटे होम्स ने मला गदागदा हलवून उठवले. त्याने हातात धरलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच्या चेहर्‍यावरची उत्सुकता बघूनच मला समजले की काहीतरी खास बात आहे.

"चल, वॉटसन, चल!" तो ओरडला, "पटकन कपडे बदल आणि माझ्यासोबत चल."

अक्षरशः दहाव्या मिनिटाला पहाटेच्या अंधुक प्रकाशात आमची घोडागाडी चॅरिंग क्रॉस स्थानकाच्या दिशेने जाणार्‍या शांत व सुनसान रस्त्यांवरून धावत होती. कामावर जायला निघालेला एखाद-दुसरा चाकरमानी दिसत होता. होम्स आणि मी दोघेही आपापल्या कोटांच्या आत हात दडवून बसलो होतो. थंडी होतीच तितकी बोचरी! शिवाय अजून आम्ही सकाळचा नाश्ता ही केलेला नव्हता. स्थानकात पोचल्यावर गरम गरम चहा पिऊन थोडी तरतरी आली, तेव्हा कुठे आम्ही दोघे बोलण्याच्या स्थितीत आलो होतो - अर्थात होम्स बोलण्याच्या आणि मी ऐकण्याच्या! चिझलहर्ट स्थानकाकडे जाणार्‍या केंटिश ट्रेन मध्ये चढून आम्ही जागा पटकावल्या. लागलीच होम्स ने त्याच्या कोटाच्या खिशातून एक चिठ्ठी काढून वाचायला सुरुवात केली.

"अॅबी ग्रेंज, मार्शम, केंट
वेळ : पहाटेचे ३:३०

आदरणीय श्रीयुत होम्स,

माझ्याकडे असलेल्या एका अजब केसच्या संदर्भात तुमच्याकडून तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. घडलेली घटना तुमच्या कामाशी संबंधित आहे. ह्या घटनेशी संबंधित स्त्रीला घटनास्थळापासून मुक्त करण्याव्यतिरिक्त बाकी सर्व वस्तु जागच्या जागी जश्या सापडल्या तश्या राहतील ह्याची दक्षता घेण्याचे मी वचन देतो. तुम्ही एक क्षणही न दवडता इथे यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण सर ह्युस्टस ह्यांना इथे असे जास्त वेळ ठेवणे मला कठिण वाटते.

आपला विश्वासू
स्टॅनले हॉपकिन्स"

"हॉपकिन्स ने आत्तापर्यंत सात वेळा मला अश्या प्रकारे तातडीचे बोलावणे धाडलेले आहे आणि प्रत्येक वेळी खरोखरीच लगोलग जाणे फायद्याचेच ठरलेले आहे, " होम्स सांगत होता, "आणि ज्या केससाठी आपण आता चाललो आहोत ती एका खुनासंदर्भातली केस आहे."

"म्हणजे तुला असं वाटतंय की सर ह्युस्टस हे मरण पावले आहेत?"

"मला तरी असेच वाटतेय. तसं बघायला गेलं तर हॉपकिन्स हा भावनाशील मनुष्य नाही, पण त्याच्या लिखावटीवरून असे वाटत आहे की त्याला जबरदस्त धक्का बसला आहे. आणि हो, असंही एकंदरीत वाटतंय की थोडाफार हिंसाचार किंवा झटापट नक्की झालेली आहे त्यामुळे शव आपल्या तपासणीसाठी तसेच ठेवण्यात आलेले आहे. ही फक्त आत्महत्येच्या संदर्भातली केस असती तर हॉपकिन्स ने मला असे लगोलग बोलावण्याचे काहीच कारण नव्हते. ज्या अर्थी त्या स्त्रीची सुटका करण्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे, त्या अर्थी मला असे वाटते की ही दुर्दैवी घटना घडत असताना तिला खोलीत बांधून ठेवण्यात आले होते. हा चिठ्ठीचा करकरीत कागद, कागदावरची "E.B." ही ठाशीव आद्याक्षरे, लिफाफ्यावरची ही शाही मुद्रा आणि चिठ्ठीत नोंदवलेला पत्ता ह्या सर्वांवरून हे उघड आहे की ही एखाद्या बड्या घराण्याशी संबंधित केस आहे. चल वॉटसन, आजची आपली सकाळ अतिशय रंजक असणार आहे. माझ्या मते खून रात्री १२ च्या आधी झाला असावा."

"आणि हा अंदाज कसा काय वर्तवतोस?"

"रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आणि आताची वेळ ह्यांची सांगड घालून! घटना घडल्या घडल्या स्थानिक पोलिस खात्याला खबर दिली गेली असणार. स्थानिक पोलिस स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना बोलावणे धाडणार. हॉपकिन्स तिथे तपासणीसाठी जाणार. मध्यंतरी हॉपकिन्स मला मदतीसाठी पाचारण करणार. ह्या सर्वाला एक सबंध रात्रभराइतका कालावधी नक्कीच गेला असेल. तसेही आपण चिझलहर्टला पोचलो आहोतच तर सगळ्याच शंका फेडून घेऊ!"

गावातल्या अरुंद गल्ल्यांमधून काही मैल प्रवास करून आम्ही एका बगीच्यासमोरील फाटकापाशी पोचलो. एका वृद्ध घरगड्याने फाटक उघडले. त्याच्या भयभीत चेहर्‍यावरून ताडता येत होते की इथे काहीतरी अघटित घडले आहे. फाटकापासून ते हवेलीपर्यंतचा चिंचोळा रस्ता नयनरम्य बगीच्यातून जात होता. दुतर्फा जीर्ण एल्म चे वृक्ष ओळीने उभे होते. रस्ता जिथे संपत होता तिथे इटालियन वास्तुकामानुसार समोरच्या बाजुस भरपूर खांबांनी युक्त अशी विस्तीर्ण पसरलेली हवेलीची वास्तु उभी होती. हवेलीचा मध्यभाग फारच जुना व लाकडी बांधकामाने वेढलेला होता. परंतु काही भागांतल्या भव्य खिडक्या आधिनुक बांधकामाची साक्ष देत होत्या. इमारतीचा एक भाग पूर्णपणे नव्या बांधकामाच्या धाटणीचा होता. प्रवेशद्वारापाशीच आमचे स्वागत एका सावधचित्त व औत्सुक्यपूर्ण चेहर्‍याच्या तरुणाने केले. हा हॉपकिन्स होता.

"तुम्ही आणि श्री. वॉटसन - दोघे इथे आल्याने मला अतिशय आनंद झाला आहे, श्री. होम्स. मी तुम्हा दोघांचा अतिशय आभारी आहे. परंतु, मला पुरेसा वेळ मिळाला असता तर तुम्हाला इथे येण्याची तसदी न घेण्याबद्दल मी कळविले असते. कारण त्या स्त्रीला शुद्ध आल्यानंतर तिने घडलेल्या सर्वच घटना इतक्या इत्थंभूत व स्पष्ट सांगितल्या आहेत की आम्हाला अजून काही शोधायचे शिल्लक आहे, असे आता वाटत नाही. तुम्हाला त्या लेविशम येथील दरोडा प्रकरणातील चोरांची केस आठवतेय का, श्री. होम्स?"

"काय? ते रँडॉल्स त्रिकूट?"

"होय! पिता आणि दोन पुत्र ह्यांचे त्रिकूट. हे नक्कीच त्यांचेच काम आहे. मला ह्यात जराही शंका नाही. पंधरवड्यापूर्वीच त्यांनी सिडनहॅम येथे दरोडा टाकला होता. तेव्हा त्यांना पाहिले गेले होते व त्यांची वर्णनेही प्रसिद्ध झाली होती. त्या घटनेनंतर इतक्या लवकर पुढची चोरी करणे खरे म्हणजे धाडसाचेच व अशक्यप्राय काम आहे! पण तरीही हे त्यांचेच काम आहे हे शंभर टक्के सत्य आहे!"

"सर ह्युस्टस मरण पावले आहेत का?"

"हो! त्यांच्याच छडीने त्यांच्या कपाळावर घाव घालण्यात आला आहे."

"सर ह्युस्टस ब्रॅकनस्टॉल असे त्यांचे पूर्ण नाव असल्याचे घोडागाडी चालकाकडून समजले!"

"बरोबर आहे! केंट विभागातील अतिश्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होत असे. श्रीमती ब्रॅकनस्टॉल दिवाणखाण्यात बसलेल्या आहेत. बिचारी स्त्री! त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात भयानक अनुभव आहे. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्या जवळपास अर्धमेल्या अवस्थेत असल्यासारख्या होत्या. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वात पहिल्यांदा त्यांना भेटून त्यांच्या तोंडून संपूर्ण वृत्तांत ऐकावा. नंतर आपण एकत्रितरीत्या भोजनक्षाची तपासणी करू."

श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्या सर्वसामान्य स्त्री नव्हत्या. आत्तापर्यंत इतकी सुंदर, रेखीव व आकर्षक स्त्री माझ्या पाहण्यात नव्हती. तिचे केस सोनेरी व डोळे निळ्या रंगाचे होते. आत्ता ह्या क्षणी तिचा चेहरा ओढलेला व थकलेला दिसत असला तरीही तिचा उजळ वर्ण तिच्या कमालीच्या गोरेपणाची व स्वरुपसुंदरतेची साक्ष देत होता. तिला शारीरिक तसेच मानसिक दोन्ही यातनांचा सामना करावा लागलेला दिसत होता. कारण तिच्या एका डोळ्याच्या वर लालसर सूज आल्यासारखे दिसत होते. तिच्या बाजुला एक घरकाम करणारी करारी व उंच स्त्री उभी राहून तिच्या सुजेवर पाणी व व्हिनेगर लावून मलमपट्टी करीत होती. बहुदा तिची दाई असावी. थकलेल्या श्रीमती ब्रॅकनस्टॉल सोफ्यावर मागे रेलून बसल्या होत्या. आम्ही आत शिरताच त्यांनी आमच्याकडे त्वरीत चौकस कटाक्ष टाकला. त्यांच्या सुंदर चेहर्‍यावरील ते सावध भाव पाहून हे जाणवून गेले, की इतके घडूनही ह्या स्त्रीची हिंमत व धैर्य अबाधित राहिले होते. त्यांनी निळ्या व चंदेरी रंगाचा सैलसर व पायघोळ असा झगा परिधान केला होता. परंतु काळसर रक्ताचे डाग पडलेला जेवणाच्या वेळी घातला जाणारा झगा त्यांच्या बाजुला सोफ्यावर पडला होता.

"मी तुम्हाला जे घडलंय ते आधीच सांगितलंय श्री. हॉपकिन्स.", त्या थकलेल्या स्वरात म्हणाल्या, "तुम्ही माझ्यावतीने त्याचा पुनरुच्चार करू शकाल का? तरीही तुमची इच्छाच असेल तर ह्या दोन श्रीमानांना मी परत सगळा घटनाक्रम सांगेन. तत्पूर्वी ह्या दोघांनीही भोजनगृहाला भेट दिली आहे का?"

"मला असे वाटते की पहिल्यांदा त्यांनी आपल्या तोंडून सर्व कहाणी ऐकणेच इष्ट आहे." - इति हॉपकिन्स

"कृपा करून भोजनगृहातल्या गोष्टींचा निकाल लवकरात लवकर लावू शकाल तर बरे. सर ह्युस्टन ह्यांचे शव तिथे अजूनही तसेच पडले असल्याची कल्पनाही मी करू शकत नाही." त्या आठवणीनेही त्यांचे शरीर कंप पावत होते. बोलता बोलता त्यांनी स्वतःचा चेहरा ओंजळीत लपवला. असे करताना त्यांच्या सैलसर झग्याची बाही कोपरावरून मागे ओघळली.

होम्स उद्गारला, "तुम्हाला अजूनही काही इजा झालेल्या दिसतात. हे काय आहे?"

त्यांच्या मनगटावर दोन लाल जखमा होत्या. त्यांनी घाईघाईत त्यांचा अंगरखा पुन्हा सारखा केला.

"तिकडे लक्ष देऊ नका. काल रात्री घडलेल्या भयावह प्रकाराशी ह्या जखमांचा काहीच संबंध नाही. तुम्ही आणि तुमचे हे मित्रवर्य आसन ग्रहण करणार असतील तर मी सगळा घटनाक्रम तपशीलवार सांगू शकेन."

"मी सर ह्युस्टस ब्रॅकनस्टॉल ह्यांची पत्नी. आमच्या लग्नाला जवळपास एक वर्ष झाले. आमचे लग्न फारसे यशस्वी नव्हते व मला वाटते ही गोष्ट लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कारण मी नाकारले वा लपवले तरी शेजार्‍यांकडून तुम्हाला हे वास्तव समजलेच असते. कदाचित आमचे दांपत्यजीवन अयशस्वी होण्यास अंशतः मीच जबाबदार आहे, असे मला वाटते. इथल्या मानाने अधिक स्वतंत्र आणि कमी औपचारिक वातावरण असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया मध्ये माझे लहानपण गेले आहे. त्यामुळे इथले औचित्यपूर्ण व पारंपरिक जीवन मला रुचणारे नाही. परंतु सर्वात महत्वाचे कारण हे आहे की सर ह्युस्टस हे अट्टल मद्यपी होते आणि हे वास्तव कोणापासूनच लपून राहिलेले नाही. अश्या इसमासोबत एक तासही राहणे माझ्यासाठी सुखप्रद असूच शकत नव्हते. माझ्यासारख्या संवेदनशील व स्वच्छंदी स्त्रीला जेव्हा अश्या व्यक्तीतीसोबत पूर्ण आयुष्य काढावे लागते तेव्हा त्या स्त्रीच्या यातनांची तुम्ही कल्पना करू शकता का? अशा प्रकारचे लग्नबंधन हे अपवित्र, जाचक नाही का? असे संबंध एखाद्या व्यक्तीवर लादणे हा गुन्हा आहे. तुमच्या ह्या राक्षसी कायद्यांमुळे ह्या पृथ्वीवर पाप वाढत जाणार आहे. एक ना एक दिवस हा पापाचा घडा नक्की भरेल. देव हा अन्याय टिकू देणार नाही." इतके बोलून एक क्षण त्या ताठ झाल्या. त्यांचे गाल रागाने आरक्त झाले. त्यांच्या डोळ्यांत त्वेषाचा अंगार फुलला होता. त्यांच्या दाईने आपल्या प्रेमळ हातांनी त्यांना कपाळावर थोपटल्यासारखे केले आणि त्यांना मागे उशीवर रेलायला लावले. क्षणात संतापाचा निचरा होऊन भावुक होऊन त्या अश्रु ढाळू लागल्या. सरते शेवटी त्या पुन्हा बोलू लागल्या:

"मी तुम्हाला सांगते काल रात्री काय झाले......"

क्रमशः......

अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २
अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ३
अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ४
अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुवादाचा पहिला प्रयत्न आहे. शब्दश: भाषांतर न करता संवाद, भाषा जमेल तितकी नैसर्गिक वाटेल असे राखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिसादांच्या अपेक्षेत! वाक्यरचना, अर्थ इ. गंडले असतील तर कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

(कृपया ज्यांनी शेरलऑक होम्स च्या कथा वाचल्या आहेत, त्यांनी रहस्य उकल प्रतिसादांत करू नये!) Happy

इग्लंड मधील काही ठिकाणांचे उच्चार मराठीत कसे करतात माहीत नव्हते. त्यामुळे स्पेलिंगप्रमाणे उच्चार लिहिले आहेत. ते तसे नसल्यास योग्य उच्चार कसे करतात ते माहितगारांनी सांगणे.

मस्त आहे...........
.
.
.
क्रमश ???? विशाल चि सावली पडली तुझ्यावर Wink

मस्तच..अनुवाद वाटत नाहिये..खूपच नैसर्गिक झालाय..
एक छोटीशी सुचना..
<<तिला शारीरिक तसेच मासनिक दोन्ही यातनांचा सामना करावा लागलेला दिसत होता.>>
हे बदलुन मानसिक करणार का?

एक लक्ष मोदक तुला निंबुडे Happy होम्स कथा अनुवादीत करण्याबद्दल. मी एकही हुकवलेली नाहीये.
अनुवाद अप्रतिम जमलाय एकदम ओघवता..... आता आणखी कथा अनुवादीत कर ( अर्थात आधी ही पुर्ण कर )

थ्री चियर्स फॉर निंबुडा

सगळ्याच शंका फेडून घेऊ!" >>>>>. पडताळुन घेउ.. हे योग्य वाटत आहे..
>>>

मी तरी "शंका फेडणे" (अर्थ: शंकेचे निरसन करणे) असा वाक्प्रचार ऐकला आहे. ह्या उलट संधी पडताळणे (चाचपून बघणे) ह्या अर्थी 'पडताळणे' हे क्रियापद योजलेले ऐकले व वाचले आहे.

अनुवाद करण्या आधी संबंधीतांची परवानगी घेतली आहेत का? नसल्यास असा अनुवाद प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरू शकतो.
>>>
हे काय आता? मी मनोगतावरही काहींनी केलेले पाहिले आहेत अनुवाद. मी माझ्या नावाने कुठेही अनुवादाचे क्रेडिट इत्यादी घेण्यासाठी केलेले नाहीत हे अनुवाद. का कुठे माझ्या नावाने छापून आणलेत! शेरलॉक होम्स च्या माझ्याच एका धाग्यावर मंजुडीनेच उल्लेख केलाय की समग्र शेरलॉक होम्स ह्या नावाने आधीच ऑथराईज्ड अनुवाद मार्केट मध्ये अवेलेबल आहे. Uhoh

तरीही कुठल्या कायद्याचे उल्लंघन होत असल्यास मायबोली प्रशासनाकडे मी चौकशी करून जरूर पडल्यास हे धागे स्वतःच अप्रकाशित करेन. मग तर झाले? Happy

मला इथे ह्या निमित्ताने हा प्रश्न विचारासा वाटत आहे की कुठल्याही कलाकृतीचा भावानुवाद (किंवा चला शब्दशः अनुवाद सुद्धा) करताना प्रत्येक वेळी अशी परवानगी आवश्यक असते का? तसे असेल तर मग गाणे, कविता ह्या सर्वच कलाकृतींना हा नियम लागू करावा लागेल.

मी तर बर्‍याच जणांना माननीय गुलझार किंवा हरिवंशराय बच्चन इ. ह्यांच्या कवितांचा मराठीत भावानुवाद करून स्वतःच्या ब्लॉग्स वर किंवा मराठी संस्थळांवर टंकल्याचे पाहिले आहे. ते प्रत्येक जण गुलझारांची परवानगी घेतात का?

मी स्वतः इथे एक गीतानुवाद टाकला होता. मध्यंतरी भारतीताईंनी ही एका जुन्या सुरेख गीताचा कवितारुपी अनुवाद इथे टंकला होता. वैवकुंनीही एका फिल्मी गझलेचा मराठीतला गझलरुपी अनुवाद टाकला होता. तिथे तर कुणी असे प्रश्न उपस्थित केले नाहीत.

मुळात मी ह्या सर्व एक्सरसाईज कडे एक क्रीएटिव्ह गोष्ट म्हणून पाहतेय. इंग्रजी भाषेचा अभ्यास होतोय, कित्येक नवे शब्द वाचनात येत आहेत, त्यांचे अर्थ, व्युत्पत्ती, वाक्यात वापर इत्यादी अनुषंगाने गुगलल्यावर माहितीची खजिना सापडतोय. शिवाय ज्यांना रहस्यकथा वाचायला आवडतात , पण इंग्रजी वाचनाचा कंटाळा आहे किंवा वाचण्यात गोडी वाटत नाही त्यांच्यासाठी शेरलॉक च्या कथा माहीत करून घ्यायला सोपा उपाय ह्या नजरेने ह्या एक्सरसाईज कडे पाहतेय.

मराठी भाषेचाही आपोआपच अभ्यास होतोय. अनुवाद जास्तीत जास्त नैसर्गिक कसा होईल, इंग्रजी संस्कृतीत घडलेल्या घटना मराठीतून वर्णन करताना मराठी भाषा कुठे तोकडी पडते किंवा त्यावर मराठीतून कशी मात करता येईल इ. करताना एक निखळ आनंद मिळत होता. आता मात्र थोडेसे खट्टू व्हायला झालेय हा प्रतिआधिकात इ. मुद्दा उत्पन्न झाल्याने. Sad

असो. अ‍ॅडमिन ना विपूत विचारले आहे. बघू.

तुम्हाला खट्टू करण्याचा कोणताच हेतू नाहिये. आणि खरेच तुम्ही हे अनुवाद उडवावेत असा सुद्धा हेतू नाहिये. माझी भाग२ वरची पहिली ओळ "चांगला अनुवाद" अशीच आहे.

अजाणता उल्लंघन होत नाही ना, एवढाच प्रश्न आहे ज्यावर अ‍ॅडमिन मत देईलच.

the case book पुस्तक सोडल्यास बाकी सर्व होम्स साहित्य प्रताधिकारमुक्त आहे. त्यामुळे ह्या पुस्तकात नसलेल्या कथांचे अनुवाद करायला काहीच हरकत नाही.

निंबुडा,

ही कथा प्रताधिकारमुक्त आहे, तो भाग वेगळा. पण कुठल्याही प्रताधिकारमुक्त नसलेल्या साहित्याचा अनुवाद करण्यासाठी लेखकाची आणि प्रकाशकाची परवानगी अत्यावश्यक असते. मायबोलीवर, मनोगतावर, ब्लॉगावर कथा प्रकाशित करण्यासाठीही अशी परवानगी आवश्यक असते. मग ती पुस्तकरूपात छापली नाही तरीही. Happy

आता माझा जरा गोंधळ होतोय इथे! Uhoh

अ‍ॅडमिन ने म्हटल्याप्रमाणे ही कथा जर "the case book" ह्या पुस्तकात नसेल तर अनुवाद करायला हरकत नाही. पण चिनूक्स ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रकाशित करायला परवानगी हवी. मग अनुवाद करून स्वतःकडेच ठेवू म्हणता? ह्या कथेच्या बाबतीत कुठनं घ्यावी परवानगी? मदत करा प्लीज.

निंबुडा,

चिनूक्सच्या प्रतिसादात एक शब्द राहिला असलेल्याने गोंधळ झाला आहे. मी तो शब्द वर आता ठळक लिहिला आहे.

Pages