या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...

Submitted by अंड्या on 25 October, 2012 - 01:44

काल दसरा होता. पण आमचे दुकान नेहमीसारखे उघडेच होते. सकाळी एक्स्ट्रा पूजाअर्चा काय झाली तीच. अर्थात, ते खाते वडीलांकडेच. मी गेलो सावकाश घरचे आवरून.. नेहमीसारखाच.. त्यातल्यात्यात सणासुदीचे नवीन कपडे आणि व्यवस्थित भांग पाडून.. थोडावेळ मंगल वातावरण वाटले, पण त्यानंतर नेहमीचे काम होतेच ते चालू झाले. अधूनमधून नवीन शर्ट असल्याने आरश्यात बघणे काय ते होत होते, पण त्याचा कामावर काही फरक नाही की दुपारी दुकान लवकर बंद करून घरी पळायची सोय नव्हती.

अश्यातच साडेअकरा बाराच्या सुमारास वाडीतील मुलामुलींचा ग्रूप मला भेटायला, दसर्‍याच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांचा कुठेतरी मंदीरात जायचा कार्यक्रम होता त्या साठी औपचारीकता म्हणून बोलवायला आला. औपचारिकता म्हणालो कारण मला मंदीर फिरायची आवड नाही हे त्या सार्‍यांनाच माहीत असल्याने मी येणार नाही याची त्यांना कल्पना होतीच.

सारे नटूनथटून मिरवत होते. मुलांमध्ये कोणी सलवार-कुर्ता घातलेला तर कोणी जीन्सवरच सदरा चढवलेला. एकाने चक्क लांबून पाहता धोतर वाटावे असे काहीतरी घातले होते. दोनचार डोकी टोप्या-फेट्यांमध्येही अडकली होती.... पण मुली मात्र एकजात सार्‍याच साड्यांमध्ये.. फरक इतकाच की कोणाची अंगभर जरीमरी लावलेली तर कोणाची बॉर्डरच काय ती रुपेरी.. कानातले, गळ्यातले मात्र एकजात टीपिकल.. त्या त्या साडीला मॅचिंग काय ते तेवढेच.. बरे वाटले पण त्यांना असे सजलेले धजलेले बघून..

पण मला पाहताक्षणीच त्या म्हणाल्या, "काय रे तू... आजही असाच शर्ट-पँट घालून.. काहीतरी ट्रेडिशनल घालायचे होते आजच्या दिवशी तरी.. "

झाला.... माझा तर विरसच झाला.. नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. नाही म्हटले तरी चिडलोच..

म्हणालो, "नवीन शर्ट आहे दिसतेय ना, आणि तुम्ही काय असे मोठे ट्रेडीशनल घातलेय?"

"अय्या हे काय... साडी दिसतेय ना..?"

"बरं मग, त्यात ट्रेडीशनल ते काय? माझी आई घरी रोज घालते. साडी घालून घरातली कामेही करते. कचरा काढते, भांडी घासते.. साडीचे काय कौतुक सांगता मला.. "

"अरे पण आम्ही रोज घालतो का? नेसायला किती त्रास होतो माहित आहे का तुला?"

"तो तुमचा प्रॉब्लेम आहे.." मी म्हणालो, "आपल्याकडे एवढे प्रांतप्रदेश आहेत, प्रत्येकाची साडी नेसायची तर्‍हा वेगवेगळी आहे, दागिनेही कित्येक प्रकारचे त्या त्या नुसार असतात, महाराष्ट्रीयन म्हणाल तर ना तुम्ही नवारी नेसलीय ना तुमच्या नाकात नथ आहे. पदराचा पत्ता नाही, हेअरस्टाईलहीही मॉडर्नच दिसतेय, ब्लाऊजचा फॅन्सी कट तर कुठल्या संस्कृतीत मोडतो तुम्हालाच ठाऊक, हे असे नुसते साडी घालणे म्हणजे ट्रेडीशनल वेअर झाले तर कित्येक बायका रोजच असा दिवस साजरा करतात म्हणावे लागेल ना..."

"म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.."

"चल निघतो आम्ही, तू बस दुकान सांभाळत.. हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...." जाता जाता मला टोमणा मारून गेल्या पण माझा बदला पुर्ण झाला... मी सुद्धा त्यांचा हिरमोड केला..

हा संवाद इथेच संपला... मला तर फार खुमखुमी होती, पण त्या आपल्या सणाच्या दिवसाची सुरूवात वादाने करण्यास उत्सुक नव्हत्या. त्या निघून गेल्या, पण त्यांना पाठमोरे पाहून डोक्यात एक विचार घोळत राहिलाच... या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...

- आनंद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना साडीत नटलेल्या मुली आवडतात तसे मुलींना धोतर चढवलेली मुले आवडतील का>>>> 'उंच माझा झोका मधे 'माधव रानडे' किती छान दिसतो Happy

हो, नीटनेटकेपणे धोतर नेसलं तर तेही छानच दिसतं.. आणि मुळातच भाव देणं वगैरे फार बालिश कल्पना आहेत. तुम्ही जे काही घालाल, नेसाल ते कॅरी करता आलं की स्मार्टच दिसता. नाहीतर अगदी ब्रॅन्डेड कपडे घालूनही अजागळ, बावळट दिसता. आवडणं, आकर्षण हे फक्त कपड्यांवर अवलंबून नसतं

@ आहना
द्वापारयुगात जाऊन उदाहरण शोधून न आणल्याबद्दल धन्यवाद.. Happy

@ वरदा
आवडणं, आकर्षण हे फक्त कपड्यांवर अवलंबून नसतं
>>>>>>>>>>
"फक्त" हा शब्द तुम्हाला वापरावासा वाटला यातच उत्तर आले.

हो, कारण कसेही असले तरी नीटनेटके कपडे हवेत. अस्वच्छ, अजागळ, भोंगळपणे घातलेले कपडे चांगले दिसत नाहीत अशा अर्थाने मी ते वापरले

त्याला त्याचं लिखाण ब्रह्मवाक्य आहे म्हणायचंय तर म्हणू द्या ना.
थोड्या वेळाने येतील त्याचे पाठीराखे.
मग संस्कृतीरक्षक पण येतील, मग साडी नेसल्यावर कशी पॉझिटिव्ह किरणे बाहेर पडतात अशी 'सनातनी' चित्रे पण येतील...

अखेर टाळे लागेलच बाफला..

मूळ लेखामधे (उतार्‍यामधे म्हणा हवेतर) असलेले मुद्दे आणि आता प्रतिकियांमधे मुद्दे यामधे प्रचंड विरोधाभास आहे, असं फक्त मलाच वाटतय की अजूनप्ण कुणाला?

म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे..">>>>>> +१ मित्रमंडळी हुशार आहे तुमची.

चांगल चाललय... लेख तो काय.... विषय तो काय?
आणि मुद्द्या-बिद्द्यावरुन वाद घालायला लागलेत लोक.... करमणूक सगळी Happy

म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे..">>>>>> +१ मित्रमंडळी हुशार आहे तुमची.
>>>
म्हण चुकली मंडळींची
तुला काही सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे
अस हवं होतं वाक्य!

आणि मला प्रतिक्रियांना पैसे पडले असते तरी मी दिला असता
पण सविस्तर प्रतिक्रिया द्यावी इतका वर्थ नाही वाटला मला लेख!

भौ.
येक उक्कूसा प्रश्ण उत्पन्न झाला आहे.
उत्तर देनार का?

तुमी म्हंताव,
या 'आज्च्या पोरींना' साड्यांच...

काहो आजोबा, तुमच्या काळी कसं हुतं मंग?

साड्या "घालतात" म्हणलं की डोक्यात जाते एकून. Proud

मला आवडते सणाला साडी नेसायला. आपली महागडी साडी दाखवायची संधी म्हणजे सण.... Happy

आनंदा, मला आत्या म्हणून तुला नाव ठेवण्याचा मान दिलास... ट्रॅडिशनली हं... Happy
काय म्हणून मला आत्त्या बनवलस कळलं नाही... तथास्तू.
<<तर मूळ मुद्दा असा आहे की पोरींचे बरे, साडी घातली की झाला ट्रेडीशनल वेअर, आणखी काही वेगळे करायला नको.. पण मुलांना ट्रेडीशनल वेअर म्हणजे सदरा-शेरवानी तत्सम घालावे लागते.. सर्वांनी ठरवूनच घातला तर ठीक अन्यथा आपणच घातला तर ऑड मॅन आऊट वाटते.. तसेच मोजून दोन-तीन फार तर फार सदरे वगैरे असतात, तेच तेच परत परत घालता येत नाहीत, म्हणून वर्षभरात येणारे हे असले सारेच दिवस साजरे करता येत नाहीत.. मुलींचे बरेय.. साड्या कधीतरी घालत असल्या तरी असतात ढिगाने.. ही नाही तर ती आलटून पालटून घालता येते.. मुले कुठून आणनार दरवेळी एवढे ट्रेडिशनल वेअर... बस हीच खंत.. पण कोण समजून घेईल तर शप्पथ..>>

ह्यातलं काही म्हणजे काहीतरी तुझ्या लेखात आलेलं आहे का?
साडी ही सदर्‍यासारखी डोक्यावरून "घातली की झालं"... हा तुझा साक्षात्कार साडी नेसणार्‍या कुणालाही, आईलाच विचारून खातरजमा करून घे. साडीव्यतिरिक्तं साडीला साजेसं अजून बरच काही घालावं लागतं...
कौतुकाने सणासुदीला साडी नेसणार्‍या मुलींकडे साड्या ढिगानी असण्याच्या तुझ्या विधानाला काय बेसिस आहे रे? हेच विधान तुझ्या वाडीतल्या मुलांबद्दल नाही का करता येणार? असतिल ढिगानी शेरवान्या, झब्बे, कुर्ते, टोप्या... (साडीपेक्षा किंचित स्वस्तच आहेत हे पेहराव)
नऊवारी, खोपा, नथ घातली की मुलींचं ट्रॅडिशनल का? मग शेंडी, धोतर, भिकबाळी, म्हणजेच मुलांचं म्हणायचं का?
असं नस्तं, ना. ट्रॅडिशन म्हणजे नक्की काय, त्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतात ह्याचं तारतम्यं प्रत्येकानं ठरवायचं नस्तं का?

आणि अजून एक... तुझी आई पाचवारी नेसून घरातलं सगळं काम-धाम करत्येय ह्याचा अर्थं तिला "पर्याय" असता तर तिनं पंजाबी घातला नसता असंच आहे का? (असेलही. )
पण नसतं, तर मग लिहून देते... तिच्यासाठीही सणासुदीला पाचवारी साडी ही कौतुकाचीच बाब झाली असती.

असो... तुझ्याकडून चांगलं लिखाण व्हावं हीच सदिच्छा.. पुढल्या लेखांसाठी शुभेच्छा.

@ दाद आत्या,
तू चाळीशीतली आहेस हा उल्लेख केल्याने, किंवा तुझी प्रतिक्रिया चारचौघांपेक्षा (चारचौघींपेक्षा म्हणूया हवे तर Happy ) वेगळी असल्याने, किंवा दाद या नावापुढे दादकाकू, दादमावशी, दादताई ऐवजी दादाआत्याच पटकन तोंडात आल्याने तसे झाले असावे. असो, आता बोल दिया तर बोल दिया, उगाच अंडू नाही करत. (अंडू म्हणजे कॉम्प्युटरचा UNDO ... याचा अंड्याशी काही संबंध नाही. Happy )

आता तुझ्या प्रतिसादाला उत्तर - निरुत्तर .. Sad

-------------------------------------------

एक गोष्ट मात्र नंदीनी आणि सर्वांसाठी - लेख लिहिताना जो मूड होता, जे विचार डोक्यात होते ते उतरवले गेले. ते तसेच ठेऊन, तेच मुद्दे प्रमाण मानून आज चर्चा केली पाहिजे असे मला गरजेचे वाटत नाही. अगदी विरोधाभास नसावा पण पुढे मांडलेल्या मुद्द्यांपैकी काही मुद्दे मूळ लेखात कवर झाले नसू शकतात, हे असे चालावे.

-------------------------------------------

@ नीधप,
माझे पाठीराखे कोणी नाही हो, पण उद्या दुसर्‍या लेखातील माझा विचार तुम्हाला पटला तर तुम्ही स्वताच येथील वाद विसरून त्या विचाराची पाठीराखण करायला माझ्या बाजूने याल याची खात्री आहे. Happy

-------------------------------------------

@ रियाजी,
२ प्रतिक्रिया आल्या तुमच्या Happy

-------------------------------------------
-------------------------------------------

अवांतर - लेख अगदीच फुकट नाही गेला. एक गोष्ट शिकलो. साड्या घालत नाही तर नेसतात. Happy Happy

लेख अगदीच फुकट नाही गेला. एक गोष्ट शिकलो. साड्या घालत नाही तर नेसतात. >>> Lol :कपाळावर हात मारुन घेतलेली बाहुली: Happy

हुश्श ! समुद्रमंथन झालं. त्यातून बाहेर हेच आलं कि प्राण्यांमधे असे वाद होत नाहीत.

Lol

पंजाबी ड्रेस किंवा फ्रॉक घातलेली मांजर, धोतर नेसलेले भुभु ( कुत्रा हा शब्द नको, भलतेच वाद होतील ), साडी नेसलेली गाय किंवा म्हैस, शर्ट आणी pant घातलेले बैल किंवा बोकड लय भारी दिसले असते.:खोखो:

का कोण जाणे मांजर जेव्हा तिची शेपटी पुढे घेऊन बसते ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली वेणी ( रेखासारखी ) पुढे घेणारी बाई आठवते ( कोणतिही ).:फिदी:

खरच बरे असते ना प्राण्यांचे.

हा इतके हात पाय झटकतोय. जरा एका जागी गप्प बसला तर टुनटुनताई त्याला योग्य वस्त्र घालू शकणार ना?
कायतरीच कुठलंतरी चित्र शोधून चिकटवायचं झालं! त्याला खिडकीबाहेर सोडा पाहू.

अहो इकाकी आश्विनीमामी म्हणतायत ते खरे आहे, तो जर एका जागी बसतच नाही तर त्याला काय घालायचे? त्यालाच त्याच्यासाठी एखादे योग्य वस्त्र विणायला सांगा.:फिदी:

नाहीतर घरभर तुमच्यासाठीच कापड विणेल तो.

टुनटुन त्या वरील केश्वीताई आहेत हो. Happy पण एक अगदी १९७५-८२ परेन्त चे उदाहरण द्यायचे झाले तर माझे बाबा धोतर, सदरा, शर्ट नव्हे, कोट व टोपी असाच वेष करून रोज कॉलेजात शिकवायला जात. मधले व धाकटे काका शर्ट प्यांट घालत ते मला फार मॉडर्न वाट्त असत. रोजच्या वापरातील चार धोतरे, पंचे, तीन सदरे आणि एक कोट असा साधारण वॉर्डरोब असे. आई नऊवारीत. बाबांचे गांधर्व महाविद्यालयातील मित्र, कलीग्ज येत तेही धोतर सदरा टोपी असेच परिधान करत. अगदी नित्यातले होते. काळी टोपी मी अजून जपून ठेवली आहे.

सासरी सांगली कडे पांढरा पायजमा आणि सदरा असा वेष असे. चुलत सासर्‍यांचा. पुढे हैदराबाद मध्ये निजामी पद्धतीची शेरवानी टोपी घालणारे लोक कायम दिसत. अजूनही शुभ्र पांढरा पठाणी घातलेले व काळे जोडे घातलेले लोक्स दिसतात व ते फार एलिगंट व नीट दिसते. ( शालीन म्हणा)अस्सल खानदानी हैद्राबादी पुरुष फॅन्सी कपडे घालत नाहीत. तर रुबाबदार सफेद पठाणी वगैरे घालतात. दक्षिणेत सर्वत्र अगदी मोठमोठे उद्योग चालवणारे देखील शुभ्र लुंगी नेसतात व वस्त्र घेतात. मद्रास एअर पोर्ट वर उत्तम प्रतीच्या लुंग्यांचे दुकान आहे. लॅपटॉप ब्लॅ़कबेरी धारी कितीतरी
टॅम टाइप्स त्या दुकानात चक्कर टाकताना दिसतात.

साडी चे अपील तर टाइमलेस व क्लासिक आहे. सर्व देशातील पारंपारिक साड्यांवर मी माहेर मध्ये एक लेख लिहीला आहे. त्याला सांस्कृतिक तसेच भावनिक परिमाणे आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतात अजूनही पारंपारिक वेष म्युझिअम मध्ये ठेवले गेलेले नाहीत तर नित्याच्या वापरात आहेत.
थोडी क्षितिजे रुंदविल्यास सहज लक्षात येण्यासारखे आहे.

आश्विनीमामी,
छान माहितीबद्दल धन्यवाद .. Happy

बाकी सध्या बरेच जणांच्या कामाच्या ठिकाणी ड्रेसकोड हा असतोच तिथे पारंपारीक पद्धतीचे एखादा इच्छा असूनही नाही घालू शकत. काही ठिकाणी तर साडी सुद्धा या ड्रेसकोडमध्ये बसत नाही. मुंबईच्या ट्रेनमध्ये धोतर वा लुंगी घालणे हे धाडस ठरेल. पण राहूनच द्या हे आता सारे मुद्दे.. त्यापेक्षा तुमच्या साडीबद्दलचा लेख कुठे वाचायला मिळाला तर तेवढीच ज्ञानात भर पडेल.. Happy

खरंतर 'ट्रॅडिशनल' कपडे हे त्या त्या भागाच्या हवामान अन संस्कृतीचं प्रतीक असतात. प्रतिक म्हणण्यापेक्षा परिणाम असतात. कालांतराने कापडाचा दर्जा, रंग इ. अधिक प्रगत होतात तसे त्यांत थोडे बदल होतात, पण कंफर्ट अन सोय हे दोन भाग महत्वाचे असतात.

लुंगी किंवा धोतर घालून मला जाम कंफर्टेबल वाटते. उन्हाळ्यात दुपारी धोतर नेसून गाऽर झोप लागते. इट फील्स रेअली कूल. थंड या अर्थाने. दिसायला कूल दिसो की नसो. लुंगी हे सोपे धोतर आहे. पण दिवसभर ते वापरायला काही अडचणी आहेत. मोटारसायकल धोतर नेसणार्‍या माणसाचा विचार करून बनवलेली नाही. ती वापरायची तर दुटांगी नेसावे लागते, अन तरीही ते त्रासदायकच होते. दुसरे म्हणजे त्यात खिसे नसतात. पण लुंगी नेसून ती साऊथ इंडियन स्टाईलने अर्धी वर वाळून घ्यायला मला आवडते. खरेच कंफर्टेबल. त्या जरीकाठाच्या पिवळसर पांढर्‍या सुती लुंग्या मला जाम आवडतात. अगदी सणावारीही धोतराऐवजी घालतो मी Wink तरीही धोतर्/लुंगी घरी घालायचे कपडेच.

कारण खिसे हे एक गमतीदार प्रकरण आहे. झब्ब्याचे दोन खिसे खरच पुरत नाहीत. बंडी घातली तर तिसरा. म्हणजे धोतर घालून बाहेर जायचे, तर नेहरुशर्ट कंपलसरी. किंवा मग पूर्वीसारखा कोट घालाय्ला लागेल वरून Wink कारण पाकिट, पेन, मोबाईल, चाव्या, कंगवा, रुमाल इ. सरंजाम असतो. नशीब विडीकाडी लागत नाही आजकाल. नैतर त्या दोन गोष्टि वाढतात खिशात ठेवायच्या. मग पर्स घ्यायला लागते हातात. नाही तर चंची Wink

खिसे नसलेला टी शर्ट, किंवा क्रॉस पॉकेट नसलेली आजकालच्या स्टाईलची जीन्स मला अजिबात आवडत नाही. असूनही निरुपयोगी खिसे मला राग आणतात. समोरच्या खिशात ठेवलेला रुमाल शिंक यायच्या आत बाहेर काढता तर आला पाहिजे ना? बुडावरच्या खिशात वस्तू ठेवायची, अन बसताना खालून ढेकूण चावत असल्या सारखी बैठक बदलत रहायची, हे मला आवडत नाही. दुसरं म्हणजे आपलं बूड जाम इन्सेन्सिटिव्ह असतं. बसून बसून तिथली सेन्सेशन्स कमी झालेली असतात. गर्दीत कुणी पाठीच्या खिशात हात घातलेला तुलनेने कमी समजतो.

कंफर्टसाठी झालेल्या पेहरावातील बदलाचे उदाहरणच म्हणायचे, तर पंजाबी ड्रेस म्हणता येईल. खरेच सुटसुटीत आहे. पण मग ते वरून ओढणीचे लोढणे आहेच. अन त्या कमीझ्/खमीज ला खिसे का नाही शिवत हो? त्या पायजम्यालाही आयमीन सल्वरीलाही शिवता येतील. चुस्त वाली नाही, पण ती दुसरी असते ती. मग खरा युटिलिटी ड्रेस होईल तो.

बाकी फेटे, टोप्या, पगड्या, पागोटी, (किंवा जोडे, वहाणा, कोल्हापुरी,) इ. ट्विस्ट्स फक्त 'अ‍ॅक्सेसरीज' मधे मोडतात. या सगळ्यांना सोपे करून एक गांधीटोपी बनवली, ती अजूनी पॉप्युलर आहे. अन हो. उपयोगीही आहे.

कामाच्या ठिकाणी ड्रेसकोडबद्दल म्हणायचं तर मी सुखी आहे, कारण माझ्या कामाच्या ठिकाणचा ड्रेसकोड मी हवा तसा ठरवू शकतो. अन ऑपरेशन करतानाचा ड्रेस तर कंफर्ट अन स्वच्छतेचा कळस असतो. ड्रेसकोडच्या नावाखाली भर मे महिन्यात स्वतःच्याच नरड्या भोवती कण्ठलंगोट आवळून घामाघूम होत त्या बॅगा उचलून भर उन्हात फिरत फिरत मला भेटायला येणार्‍या एम आर उर्फ वैद्यकिय प्रतिनिधींची मला खरी कीव येते Wink

मुलांना साडीत नटलेल्या मुली आवडतात तसे मुलींना धोतर चढवलेली मुले आवडतील का>>>> आता काही वेळापुर्वी झी अ‍ॅवॉर्डसला 'महादेव रानडे' धोतर, कोट, पगडी, उपरणं अशा ड्रेसमधे होते. तिथे असलेल्या सगळ्या गर्दीत तोच माणुस एवढा हॅन्डसम दिसला. थोडक्यात काय, शोभत असेल तर धोतर नेसलेली मुलं सुद्धा आवडतील की मुलींना. Happy

खरंतर 'ट्रॅडिशनल' कपडे हे त्या त्या भागाच्या हवामान अन संस्कृतीचं प्रतीक असतात. प्रतिक म्हणण्यापेक्षा परिणाम असतात.
>>>>>>>
सहमत
तसेच कच्च्या मालाची उपलब्धी हे कारण देखील त्यात आले.

बाकी उरलेल्या पोस्टमधून अक्खे इब्लिसराव डोळ्यासमोर उभे राहिले.. Happy

@ मनीमाऊ
पाहिले हो.. पण मला वाटते त्यांचे सौंदर्य त्यांच्या वेशभूषेत नाही तर केशभूषेत आहे.. Happy

Pages