फेक आनंद .. ??

Submitted by अंड्या on 22 October, 2012 - 07:40

दुकानाचा माल आणण्यासाठी बरेचदा माझे दादरला जाणे होते. परवाही गेलो होतो. दादर स्टेशनजवळ काही मुलांचा ग्रूप दिसला. नवरात्रीच्या निमित्ताने हिरव्या रंगात नटलेला कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप. फोटोसेशन चालू होते. अर्थात, नटलेल्या अवस्थेत आजकाल हेच जास्त चालते. कारण संध्याकाळी हेच फोटो फेसबूक वर अपलोड करून इतरांची वाहवा जी मिळवायची असते. वरवर पाहता धमाल चालू आहे असे वाटत असले तरीही प्रत्येकाचे लक्ष मौजमजा करण्यापेक्षा फोटो कसा चांगला येईल याकडे लागले होते. मागेही रंगपंचमीच्या दिवशीही मला असेच द्रूष्य पाहायला मिळाले होते. मुलांचा ग्रूप एकमेकांना रंग लावायच्या पोजमध्ये फोटो काढत होता. रंग लावायचा, लाऊन घ्यायचा आनंद लुटण्यापेक्षा त्यांना फोटोमध्ये आपण एंजॉय कसे करतोय हे फोटो पाहणार्‍याला दिसले पाहिजे याची जास्त काळजी होती. जेणेकरून जेव्हा ते फोटो इतर जण बघतील तेव्हा बोलतील, "वाह, क्या मजा किया यार तुम लोगोंने...."

कुठे पिकनिकला गेले आजकाल तरी हेच होते. निसर्गाला डोळ्यात नाही तर कॅमेर्‍यात कैद केले जाते. निसर्गसौंदर्याला स्वताच्या फोटोंच्या बॅकग्राऊंडवर सजवून आपण त्या जागी जाऊन आलो हेच लोकांना दाखवायचे कौतुक असते.

फोटोवरून आठवले, बाकी विवाहाचे फोटो तर असावेतच.. आयुष्यभराची आठवण आहे ती.. परवडत असेल तर विडीओ शूटही असावा..
पण फोटो काय कसे काढायचे आणि काय टिपायचे हे फोटोग्राफरवर सोडून देणे उत्तम ना.. जर नवरा नवरी फेरे घेताना, हार घालताना, पाया पडताना, जेवताखाता जर फोटोसाठी पोज द्यायला लागले किंवा फोटो व्यवस्थित अँगलने खेचला जातोय की नाही याकडेच लक्ष द्यायला लागले तर आयुष्यातील सर्वोत्तम दिवस किती ठोकळेबाज पद्धतीने साजरा होईल त्यांना ना...

इतर छंदांचेही तेच झालेय. गाणी ऐकण्याचा छंद घ्या. कधीतरी शांत मूडमध्ये निवांत पडून गाण्यांचा लुफ्त घेण्यापेक्षा ट्रेन-बसच्या खडखडाटात शोऑफ म्हणून महागातले आयपॉड आणि हेडफोन लाऊन गाणी ऐकली जातात, सोबतीला गप्पा चालू असतात, तेरे पास कौनसा गाणा है याचे डिस्कशन. तर कधी गृहपाठाचा अभ्यास लिहिता लिहिता कानावर ती गाणी आदळत असतात.

मोबाईलगेमसारखा कृत्रिम आनंद जगात दुसरा नसावा. त्यावर न बोललेलेच बरे. फार तर फार चार बाय सहा ईंचाच्या स्क्रीनवर बसल्याबसल्या डोळे फाडत स्वताचेच रेकॉर्ड मोडत बसायचे..

या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या माझ्याच वयाच्या किंवा काही वर्ष कमी वयाची मुले आजकाल सर्रास करताना दिसतात. करताना त्यांच्या चेहर्‍यावर एक आनंद दिसतो, नक्कीच दिसतो. पण का माहीत नाही मला तो कृत्रिम भासतो. याला खरेच निर्मळ आनंद म्हणावे का की फेक आनंद म्हणावे की जमाना बदल गया है माँ जी बोलून चालवून घ्यावे.

- आनंद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदमच पट्या .....वीट्टी दाडु ,, लगोरी , सागर गोटे हे पण अता एश्टाईल मधे कोम्प वर खेळतात ह्याचा सारखा दैव्दुर्विलास नाही ......असो .. जे जे होईल ते ते पहावे ......

'क्षण जगणे' ही स्वानुभूती आहे ती काही तुम्ही एखाद्याच्या कानीकपाळी ओरडून त्याला येत नाही.
एखादा दोन उघड्या डोळ्यांनी भरभरून बघतो तर एखादा कॅमेराच्या कृत्रीम डोळ्यातून.
तुमच्या वयाची मुले केवळ फोटो, आयपॉडमध्ये व्यस्त असतात म्हणून ती चुकीची होत नाहीत आणि तुम्ही पुस्तकं आणि निसर्ग निरिक्षणात दंग असतात म्हणून बरोबर किंवा मॅच्युअर ठरत नाही.

लहान मुलाला रुबिकक्यूब, चित्रसंच, आगगाडी, लॅपटॉप आणि मोबाईल ही खेळणी एकाचवेळी देऊन बघा ते बहूतेक वेळा लॅपटॉपशीच खेळत बसेल. लहान मुलं आणि फारसं जग न पाहिलेले अवखळ तरूण त्यांच्या आवडी थेट असतात त्याबाबतीत ते फार कन्फ्यूज नसतात. त्याग, मानवी भावना ह्यांची त्यांच्यालेखी किंमत कमी असते किंवा नसते. पण त्याचबरोबर ते अ‍ॅडाप्टिवही असतात, वहावत जातात आणि सावरतातही. ज्यांना सावरणं जमत नाही ते जास्त गटांगळ्या खातात आणि त्यात त्यांच्या पालकांचाही तेवढाच दोष धरायला हवा.

विषयांतर वाटेल पण न-कमावत्या, अवखळ मुलांना हे रिसोर्सेस पुरवणारे किंवा त्या रिसोर्सेसचा कन्स्ट्रक्टिव ऊपयोग न शिकवणारे आणि आपला पाल्य वहावत तर नाहीयेत ना ह्याची खातरजमा न करणारे पालकही बेजबाबदार म्हणावेच लागतील.

दाबून ठेवलेली ऊत्सुकता जशी वाईट तशीच कह्यात नसलेली किंवा दिशा नसलेली सुद्धा.
अवखळ तरुणांमध्ये तेवढा विवेक ऊपजतच असेल असे नाही, त्यामुळे त्यांना दोष देणे मला आततायीपणाचे वाटते.

विषयांतर वाटेल पण न-कमावत्या, अवखळ मुलांना हे रिसोर्सेस पुरवणारे किंवा त्या रिसोर्सेसचा कन्स्ट्रक्टिव ऊपयोग न शिकवणारे आणि आपला पाल्य वहावत तर नाहीयेत ना ह्याची खातरजमा न करणारे पालकही बेजबाबदार म्हणावेच लागतील. +१

उत्तम. अभिनंदन. चला कोणतरी माझ्यासारखा विचार करतो आहे हे पाहून/वाचून छान वाटले बुवा. मला नसीम तालेब म्हणतो ते पटते. ह्या विविध उपकारांनी जास्त हानी पोहोचली आहे. म्हणजे तो क्षण पकडून ठेवण्याची काय गरज काय माहिती. माझ्या लग्नाचे फोटो तर मी कधी नंतर बघितले पण नाहीत. फोटोग्राफरचा उत्तम धंदा झाला ह्यापलीकडे काही झाले नाही. तशीच गोष्ट ह्या रेकार्ड प्ल्येयरमुले झाली आहे. भीमसेन आणि लता वगैरेंना आईकून बाकीचे फालतू वाटत राहतात. एकसारखी तुलना होते. मुळात ते साठवले नसते तर बरे झाले असते असे वाटते कधी कधी.

चमन,
तुमच्या वयाची मुले केवळ फोटो, आयपॉडमध्ये व्यस्त असतात म्हणून ती चुकीची होत नाहीत आणि तुम्ही पुस्तकं आणि निसर्ग निरिक्षणात दंग असतात म्हणून बरोबर किंवा मॅच्युअर ठरत नाही.

>>>>>>>>>>>>>>>>

नाही, मी त्यांच्या छंदाला चुकीचे बोलत नाहीये. की माझा छंद खूप भारी म्हणून स्वताचे कौतुक नाही.

एक उदाहरण देतो, बघा मला काय म्हणायचे ते समजावता येते का..

मी सुद्धा फेसबूकवर आहे, माझा एक मित्रही फेसबूकवर आहे.
आम्हा दोघांनाही कविता वाचायचा छंद आहे.
मी मिळेल तिथे कविता वाचतो, त्यातील एखादी आवडली तर माझ्या मित्रांसाठी शेअर करतो.
पण माझा मित्र कविता वाचतानाच त्याच्या डोक्यात असते की एखादी चांगली कविता सापडली तर ती शेअर करेन.
अश्याने तो कविता वाचताना तिचे खर्‍या अर्थाने रसग्रहण करू शकेल का? किंवा सहजपणे निखळ कि निर्मळ म्हणतात तसा आनंद स्वतासाठी घेऊ शकेल का?

फोटोंच्या बाबतीत लिहिलंय ते अगदी पोचलं. काही वेळेला हे प्रकर्षानं जाणवतं.
लग्नात एकमेकांना खास भरवताना, हार घालताना त्या फोटोत हवी तशी पोज येईस्तोवर ते रिपीट करायला लावतात किंवा त्याच अवस्थेत थांबायचे(म्हणजे नवर्‍याने नवरीच्या तोंडाजवळ लाडू न्यायचा आणि तिने आ करायचा आणि योग्य फोटो निघेपर्यंत पॉझ्ड! हात आणि तोंड अवघडलं तर थोडी रेस्ट घ्यायची. मग रिटेक. Proud )

अंड्याभाऊ चांगले विचार मांडलेत. माझी एक मैत्रिण रोज स्वता:चेच फोटो फेबु. वर टाकते. नीट पाहिल्याशिवाय कळतच नाही की हे लेह लद्दाखचे , हे उसगावातले, हे कोकणातले असे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. ती तसं खाली लिहिते.........ठिकाणांची नावं. पण मेन फोटो तिथल्या वैशिष्ठ्याचा नसून स्वता:चाच असतो!

कोणाला फोटो काढून तो लावण्यात किंवा नंतर तो परत परत बघण्यात आनंद मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपण स्वतः कुठल्या क्षणी फोटो काढून नंतर जर आपल्याला पुढे असं जाणवलं की तो क्षण आपण फोटो काढायच्या भानगडित न पडता घालवला असता तर जास्त मजा आली असती तर मग अर्थातच आधीचा आनंद थोडा कमीच होता पण फेक नव्हता.

आपल्याला एखाद्याचा आनंद फेक वाटू शकतो ह्या मूळ मुद्द्यातच गडबड आहे. समोरच्या माणसानी एखादा क्षण कसा घालवावा हे फक्त तोच ठरवू शकतो आणि त्यानीच ठरवावे. आपण त्याच्यावर विचार, भाष्य करुन काहीच उपयोग नाही.

सरतेशेवटी, पुर्वी आपल्याकडे फोन, कॅमेरे, फेसबूक हे काहीच इतकं सहजासहजी उपलब्ध नव्हत पण असतं तर तेव्हाच्या लोकांनी त्याचा सर्रास वापर केला नसता हे कशावरुन? शेवटी नवीन पिढी काय किंवा जुनी पिढी काय, त्यांचे वागणे हे त्यावेळी उपलब्ध असलेल्या सोयींवरुन नाही ठरणार का?

छान

Pages