आपलं शहर

Submitted by Vini on 18 October, 2012 - 10:42

मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न

खरंतर हे आपलंच शहर असतं,इथले ट्राफिक जॅम,खड्डे ,गर्दी ,छोटे रस्ते,असंख्य वन वे अशा सगळ्या गोष्टीं सहीत! पण या गोष्टी कधीच प्रकर्षाने जाणवल्या नसतात. एकेकाळी अनोळखी असलेल्या या शहरात एन्ट्री केल्यावर पाहता पाहता कधी हे शहर आपलंच होऊन गेलं हे कळलं देखील नसत. इथला पाऊस,इथला हिवाळा ,शॉपिंग करता प्रसिद्ध असलेल्या गल्ल्या ,ऐतिहासिक वाडे ,स्वतःची ओळख जपलेली भाषा , पाट्या ,शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विखुरलेली संकेतस्थळ,कॉफी पिण्यापासून ते ऑफिस ची पार्टी अरेंज करण्यासाठी भटकलेली हॉटेल्स हे सगळ आपलंच ..
आणि एके दिवशी इथून निघतो ते थेट सातासमुद्रापार. तिथली बोचरी थंडी ,निष्पर्ण झाडी ,निशब्द रस्ते आपण वेगळ्याच जगात आलो आहोत याची जाणीव घट्ट करत जातात. कोसळणाऱ्या बर्फासोबत संवेदना बधीर करत खिडकीतून डोकावता डोकावता ऋतू पालटतो. छोटी पाने -फुले डोकावू लागतात तसा स्वतःभोवतीचा कोषही निसटू लागतो. संयत पणे जपलेला कोपऱ्या कोपऱ्या वरच्या पार्कस मधला निसर्ग मन निववू लागतो. एखाद्या शांत तळ्याभोवती फिरता फिरता स्वतःशीच संवाद साधत अवघड वाटणारी कोडी सुटू लागतात.लांबलचक पसरलेले रस्ते ,टुमदार घरे , चित्रवत वाटावी अशी निसर्गदृशे ओळखीची वाटू लागतात ..घराचा टेरेस आपल्या नकळत नव्या नव्या फुलझाडांनी भरून जातो. हिवाळा ते उन्हाळा आणि पुन्हा हिवाळा हे ऋतुचक्र नव्याने उलगडू लागतं.हिवाळ्याच्या सुरुवातीला लाल,पिवळी ,नारिंगी होणारी झाडांची पणे शिशिराचा नव्हे तर वसंताची आठवण करून देत अलिप्त पणे गळून जातात तर वसंताची चाहूल लागतातच उमटणारी अगणित रंगांची मैलोनमैल पसरलेली रानफुले वेडावून टाकतात.दिवस महिने वर्षे पालटतात..आपण आपल्या नव्या विश्वात रंगून जातो
या अशा वर्षांमध्ये आपलं शहरही आपल्याला आठवत असतं पण ते एखाद्या छानश्या चित्रासारखं !
मग एके दिवशी आपण परत येतो, आपल्या आवडत्या शहरामध्ये..आपल्या शहरामध्ये. शहर तेच असतं पण अचानक इथे गर्दी आहे,कुणी ट्राफिक चे नियम पाळत नाहीय, किती खड्डे आहेत ,प्रदूषण किती वाढलंय, रसत्यावरची पाणीपुरी किंवा भेळ खाऊ की नको? , गाडी कुठे पार्क करायची, इथले वन वे किती अवघड आहेत वगैरे प्रश्न पडू लागतात. थोड्या वैतागलेल्या अशा मनस्थिती मध्ये काहीदिवस गेले की सहज भटकायला बाहेर पडावसं वाटू लागत, हळूहळू ओळखीचे रस्ते भेटू लागतात मग रस्त्यात मधेच गाडी थांबवून 'इथे ज्यूस मस्त मिळतो' किंवा इथली मिसळ..आहाहा.' अस काहीबाही आठवायला लागतं. आणि रस्त्यात गाडी थांबवली म्हणून तिकीट लागेल की काय अशी भीती नसते. मागचे लोक थोडा त्रास घेऊन बाजूने जातात. हे सुख मधली काही वर्ष मिस झालेलं असत..
असं जुन्या ओळखीच्या रस्त्यावर भटकल्यावर आपलं शहर पुन्हा नव्याने आपल्याला भेटू लागतं..वरचा चेहरामोहरा थोडासा बदललेला असला तरी जाणवत की 'हे शहर आपलंच आहे !'

माझ्या ब्लॉगवर (www.jhokaa.blogspot.com) पूर्वप्रकाशित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.
>> थोड्या वैतागलेल्या अशा मनस्थिती मध्ये काहीदिवस गेले की...
एक वर्ष गेलं तरी माझी गाडी वैतागाच्या स्थानकावरच अडकलेली आहे Sad

आवडलं. रीलेट होता आलं नाही कारण ऑनसाईट / दुसर्‍या देशाचा अनुभव नाही. पण मुंबई ऑलवेज रॉक्स फॉर मी. त्यामुळे कुठेही जाऊन बॅक टू मुंबई आलं की बरंच वाटतं मला. Happy