ह्युस्टनच्या गणपतीची क(व्य)था

Submitted by आशयगुणे on 20 September, 2012 - 02:22

ह्युस्टनच्या गणपतीची क(व्य)था

नारद मुनी त्यांच्या आयुष्यात ( कधी न संपणाऱ्या ) ज्या ज्या ठिकाणी हिंडले नसतील त्या त्या ठिकाणी जाण्याचा योग मला ह्या दहा दिवसात येतो. मी कुठे कुठे जातो ह्याची यादी सांगायला गेलो तर हे पान कमी पडेल. कधी मी असतो मोठमोठ्या मंडळांच्या गादीवर समोर असलेला भक्तसमुदाय आणि मागे ओतलेला पैसा बघत. कधी मी असतो लहानशा घरात समोर येणाऱ्या भक्तांची निरागसता आणि समर्पण बघत. वेगवेगळ्या प्रार्थना स्वीकारत आणि चित्रविचित्र इच्छांना सामोरे जाता जाता दहा दिवस कसे जातात समजत देखील नाही. खायला देखील निरनिराळ्या पद्धतीचं मिळतं. थोडक्यात काय माझं भारत भ्रमण ह्या दहा दिवसात होत असतं.

परंतु आपली लोकं भारताच्या बाहेर जाऊ लागल्यापासून मला तिकडून सुद्धा आमंत्रणं येतात. मी अर्थात स्वीकारतोच! उंदीर मामा आहेतच मला घेऊन जायला. मामांची एकंच तक्रार होती इतके दिवस - जग फिरायला मिळत नाही. बाकी त्यांची तरी काय चूक? जग पहायची मिळालेली एक संधी तर मी गमावून बसलो. लहानपणी भाऊ कार्तिकेय बरोबर स्पर्धा ठरवली आणि तो बिचारा मोरोपंतांवर बसून जगाच्या तीन चक्रा मारून आला. मामांना वाटलं आपल्यालाही जायला मिळेल. पण मी कंटाळा केला आणि शेवटी आई-वडिलांभोवती तीन चक्रा मारायची पळवाट शोधून काढली. पण आता बदलत्या काळात मला देखील बाहेर जावे लागते. त्यातील प्रमुख शहरं आहेत अमेरिकेत आणि युरोपात. इथे आपली मंडळी मंडळ स्थापन करतात. मोठ्ठं जेवण ठेवतात. आपल्या मुला-मुलींना लॉर्ड गणेशा बद्दल सांगतात. माझ्या 'स्टोरीज' ऐकवतात. गाणी म्हणतात. शब्द इंग्रजी असले तरीही मनातून उमटणाऱ्या भावनांच्या भांडवलावर मी इथे आनंदाने मुक्काम करतो. ह्याच अमेरिकेतील माझ्या मुक्कामात एक शहर आहे जे माझ्यावर वर्षानुवर्षे प्रेम करीत आले आहे - ह्युस्टन! पण गेल्यावर्षी मला ह्युस्टनच्या अजून एका ठिकाणून आमंत्रण आलं. सहज उत्सुकता म्हणून पत्र बघितलं तर पत्ता होता एका विद्यार्थ्याचा. हा विद्यार्थी तिथल्या एका विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. आपल्याला मोठ्यांच्या सहवासातून जरा ब्रेक मिळणार आणि तरुणांमध्ये जायला मिळणार ह्या आनंदात मी होकार कळवला! माझ्या सेक्रेटरीला विचारले असता त्याने मला सांगितले की स्वतंत्र दिन, दिवाळी, गणतंत्र दिवस आणि होळी ह्या सांस्कृतिक कॅलेंडर मध्ये आता माझी देखील स्थापना करायचे ठरले होते. तरुण मंडळी म्हणजे तरुण विचार आणि जुनाट विचारांचे विसर्जन! ठरलं तर मग! मी ह्यांच्या घरी जायचे ठरवले.

ठरलेल्या दिवशी मी तिकडे गेलो आणि विराजमान झालो. पण वातावरणात एक प्रकारची धुसफूस जाणवली. हे बिचारे विद्यार्थी ठरलेल्या वेळेत आपले शिक्षण सांभाळून माझी स्थापना करतात ह्या गोष्टीचा थोडा तणाव असेल असं मला वाटलं. पण तणाव काही वेगळाच होता. माझी आणि भक्तांची भाषा जरी भावनिक असली तरीही मला 'शाब्दिक भाषा' सुद्धा येतात! त्यामुळे ही मुलं काय बोलत होती हे कळायला आणि चकित होयला मला वेळ नाही लागला. संघटनेचा अध्यक्ष हा तेलगु भाषिक होता. ह्या मुलाने स्वतःच्या भाषेतील मुला-मुलींना माझ्या स्थानाभोवती होणाऱ्या सजावटीसाठी बोलावले होते. त्यांच्या बोलण्यावरून इतकेच कळले की 'ते' येण्याच्या आधी आपली सारी सजावट झाली पाहिजे. पूजेला पण आपलाच माणूस बसणार आहे. उगीच 'ते' येतील आणि 'त्यांची' माणसं त्यांच्या भाषेला पुढे करतील. पूजेचे पुस्तक बाहेर काढले गेले. सर्वांसमोर उशीर नको होयला म्हणून त्यातील एका विद्यार्थ्याने पूजेचा मजकूर वाचायला घेतला आणि त्याचा सराव करायला सुरुवात केली. दुसऱ्या एकाने इंटरनेट सुरु केले आणि laptop वर गाणी लावली. ही गाणी होती त्यांच्याच भाषेची. आणि तीच सुरु राहतील ह्याची दक्षता घेतली गेली पाहिजे असा आदेश देण्यात आला. तर अशाप्रकारे तेलगु भजनांच्या संगतीत माझ्या आजूबाजूला सजावट सुरु झाली. पण एक उत्सुकता नक्कीच होती. 'ते' कोण आहेत? आणि ते येण्याच्या आधी कसली ही एवढी घाई आहे तयारी करण्याची? पण माझे कान हत्तीचे असल्यामुळे ते टवकारल्यावर मला खूप लांबचं ऐकू येतं. आणि लांबून कुणीतरी येण्याची मला चाहूल लागली. बहुदा 'ते' हेच असावेत.

" आपल्याला यायला उशीर तर नाही झाला? ह्यांनी आपण यायच्या आधीच सारी तयारी केली असेल बघ. मी तुला सांगत होतो ना लवकर आवर! च्यायला आपल्या टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आणि तयारी मात्र हे करणार!" ही तर मराठी भाषा होती. चार-पाच मराठी भाषिक मुलं येत होती. आल्या आल्या त्यांनी सजावटीचा ताबा घेतला.
" अरे हे बरोबर सजवलेलं नाही. ह्यांना काही आरास येत नाही. पुण्याचा मी. गणपती सजावट मला नाही तर कुणाला येणार!" असं म्हणून तो मुलगा आहे त्या गोष्टींमध्ये बदल करू लागला. तेवढ्यात तेलगु गटातून एकाने आवाज दिला.
" दिस इज नॉट लुकिंग नाईस!" संभाषण एकदम इंग्रजीत होऊ लागलं.
" इट इज नाईस. वी हाव गणपती इन माय हाउस", ह्याने प्रत्युत्तर दिले. ह्यावर त्या तेलगु मुलीने नाक मुरडले आणि ती तिच्या आजूबाजूला असलेल्या तेलगु मुलामुलींना काहीतरी बोलली. उगीच ह्यांना बोलावले असं काहीसा ऐकू आलं मला पण माझं लक्ष दुसऱ्या एका संभाषणाने वेधून घेतलं. दोन मराठी मुलांनी आता laptop चा ताबा घेतला होता.

" च्यायला हे काय लावलाय बे अंडू-गुंडू. ह्याने काय बाप्पा प्रसन्न होणार आहे? आपण आपली गाणी लावूया!" असं म्हणून आता तेलगु गाण्यांची जागा मराठी गाण्यांनी घेतली. इकडच्या लोकांची नाकं अजून मुरडली गेली. दरम्यान, हळूहळू गर्दी वाढत होती. त्या घरी आता बरेच लोकं येऊ लागले होते. सारे विद्यार्थीच. त्यातील काही मुलामुलींनी माझ्या बाजूला उभं राहून फोटो काढायला सुरुवात केली. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. मला तर संध्याकाळी चार चे आमंत्रण होते. मी आधी येऊन बसलो होतो पण ह्यांचे फोटो काही आवरत नव्हते. शेवटी बरोब्बर सहा वाजता सगळ्यांना खाली बसायला सांगितले गेले. आणि अध्यक्ष महोदय बोलायला लागले. आता हा भाषण करतोय की काय ह्याची मला भीती वाटू लागली. सुदैवाने तसं काही झालं नाही.

" नाऊ वी विल स्टार्ट द पूजा. ही विल डू द पूजा....इन तेलगु लांगुएज". शेवटच्या शब्दामुळे मराठी मुलं-मुलींनी नाकं मुरडली!

आता त्या घरच्या हॉल मध्ये दोन गट पडले होते. एका बाजूला पूजा सांगणारा गट होता, अर्थात तेलगु. दुसरीकडे पूजा ऐकणारा आणि नाक मुरडणारा गट होता, अर्थात मराठी. आणि तिसरीकडे पूजा न ऐकणारा आणि केवळ नाक मुरडणारा गट, अर्थात हे दोन्ही सोडून अन्य सर्व भाषा बोलणाऱ्या मुलांचा गट!
"च्यायला, काहीही काळात नाही आहे. काय चाललाय बे. कधी संपणार हे", अशा प्रकारची वाक्य अधून मधून दुसऱ्या गटातून ऐकू येत होती. आणि मुळात पूजा स्वतःचे शक्ती प्रदर्शन व्हावे म्हणून होत असल्या कारणाने इतक्या जोरात म्हटली जात होती की माझे एवढे मोट्ठे कान असूनसुद्धा मला तिसऱ्या गटातील मंडळी काय म्हणतायत हे ऐकू येत नव्हतं! अशा ह्या वातावरणात ती पूजा एकदाची संपली! आणि मंडळी प्रसादाचे ताट पुढे करणार तेवढ्यात...

" वेट वेट.. वी हेव आरती नाऊ! इन आवर प्लेस वी ऑलवेज सिंग आरती... इन मराठी!" नाक मुरडण्याची धुरा आता दुसर्यांकडे होती हे वेगळं सांगायला नको.
" येते का कुणाला आरती... लवकर... आपल्याला पण दाखवून द्यायचे आहे...चला मंडळी... "
" अरे.. laptop घे तो...गुगल वर मिळतील बघ आरत्या... कशाला काळजी करतोस.... सापडलं बघ!" आणि अशाप्रकारे आरत्या म्हणणे सुरु झाले.

सुखकर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची ....
..................................................
लंबोदर पीतांबर फणी वरवंदना
सरळ 'तोंड' वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे 'सजना'
'संकष्टी' पावावे निर्वाणी रक्षावे ....
..............................................

मी मूर्ती रुपात नसतो तर ह्या चुका नक्कीच ओरडून सांगितल्या असत्या. अहो, मी काय फक्त संकष्टीच्या दिवशी पावतो? मी तर संकटाच्या समयी पावतो. पण स्पर्धा होती अस्तित्वाची. आधीच्या गटाने माझ्या हत्तीच्या कानांना सुद्धा पेलवणार नाही इतक्या आवाजात पूजा सांगितली आणि ह्या गटाने मात्र माझ्या आरतीच्या अर्थाचा अनर्थ केला! एकदा अस्तित्वाची स्पर्धा सुरु झाली की दाखवायचे असते फक्त अस्तित्व. तिथे नाद नसतो, आवाज असतो; अर्थ नसतो, शब्द असतो! इथे माझ्याच नाही तर माझ्या नंतर म्हटल्या जाणाऱ्या सर्व आरत्यांची हीच तऱ्हा होती. शेवटी एक एक जण नमस्काराला मात्र येत होता.

मला H 1 विसा मिळू दे इथपासून मला विद्यापीठाच्या कॅमपस मध्ये जॉब मिळू दे आणि मला scholarship मिळू दे इथपासून अमुक अमुक मॉटेल किंवा gas station मध्ये मला नोकरी मिळून काही दिवसातच गाडी घेता येऊ दे इथपर्यंत सर्व प्रार्थना माझ्या समोर केल्या गेल्या. पण मला अपेक्षा होती एका मनापासून येणाऱ्या नमस्काराची. मुलं नमस्कार करत होते, माझा फोटो काढत होते, नमस्कार करताना फोटो काढत होते आणि माझ्या बरोबर पण फोटो काढत होते. तेवढ्यात मला एक-दोन वाक्य ऐकू आली.

" हीच ती. आपल्या विद्यापीठाच्या ऑफिस मध्ये काम करते. तिला इंडिया बद्दल जाणून घ्यायचे आहे. फार क्रेझ आहे तिला आपल्याबद्दल. त्यामुळे आज मुद्दाम गणपती फेस्टिवल बघायला आली आहे."
कुणीतरी त्या स्त्रीला आणि तिच्या लहान मुलीला गणपती बद्दल समजावून सांगत होते. " दिस इस आवर elephant headed god ! यु हेव टू जॉईन युवर hands लाईक दिस.." त्या स्त्रीला आणि तिच्या मुलीला नमस्कार कसा करायचा हे शिकवले जात होते. त्यांना हे नवीन असल्यामुळे खूप उत्सुकतेने त्यांनी हे शिकून घेतलं आणि माझ्यासमोर आल्या. दोन्ही हात जोडले. त्या स्त्रीने तिच्या मुलीला सांगितले.

" Thank You God for this day .... because of You I met new people .... i could know them ....learn new things ....and flourish my life . Let these people who have come from their
country get whatever they want . " त्या मुलीने देखील ही प्रार्थना अगदी मनापासून म्हटली. मला मनापासून उमटलेली प्रार्थना ऐकायला मिळाली. माझे त्या घरी येणे सार्थक झाले.

शेवटी ह्या भारतीय विद्यार्थी संघटनेचा गणेशोत्सव संपला. जाता जाता ती अमेरिकन स्त्री अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद देत म्हणाली:
" Thank You guys for such a wonderful experience ....we came to know about the wonderful Indian culture because of You ". विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाने घोषित केले, " संघटनेचा गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पडला!"

हे ऐकल्यावर मी माझ्या तीन हातांपैकी कुठला हात कपाळावर मारू ह्याचा विचार करू लागलो. कारण चौथा हात नेहमी आशीर्वाद देण्यासाठी असतोच. शेवटी भोलेनाथांचा मुलगा ना मी!

- गणपती शंकर .... ( नको! आडनाव कशाला सांगू माझं. उगीच 'राज्या'भिषेक कराल माझा!)

आशय गुणे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कौशी! प्रतिक्रिया.... मग ती कधीही असो.. आनंदच आहे! Happy

धन्यवाद कल्पु, लेखाबद्दल सांगायचे झाले तर , खरा अनुभव - ६०% आणि ४०%- imagination Happy

धन्यवाद! Happy हो.. म्हणून तर लिहिलंय... एकदा अस्तित्वाची स्पर्धा सुरु झाली की दाखवायचे असते फक्त अस्तित्व. तिथे नाद नसतो, आवाज असतो; अर्थ नसतो, शब्द असतो! Sad

छान Happy

डोळ्यासमोर आलं. असे अनुभव इथे भारतात... आपल्या मुंबईत सुद्धा आलेत. तो ही मराठी आणि तेलगुच. Happy
इथे तुम्ही भाषिक मांडलय, पण आपणच कसे बरोबर (रादर दुसराच कसा चूक) हे दाखवायचा सोस प्रत्येकाला थोडा फार असतोच, त्यात थोडा कर्कश्यपणा आला की वरच्यासारखं होत असेल का?

काहीहि करण्यामागे मूळ हेतू काय हे समजून न घेता, उगीचच आपल्या अक्कलेचे, पैशाचे सामर्थ्य दाखवायला या रूढींचा उपयोग होतो. त्यात भाव नसतो. हिंदू धर्माची तीच व्यथा. म्हणूनच लोक उपहास करतात आपल्या ३३ कोटी देवांचा, जानव्याचा नि श्रावणी, वटसावित्री असल्या प्रथांचा!!
बिचार्‍या करणार्‍यांना मात्र वाटत असते आपण आपल्या मूर्तीला अस्सल सोन्याचे दागिने घालू नि हजार पेढ्यांचा नैवैद्य दाखवू! जणू देव म्हणजे सरकारी कचेरीतला कारकून, जास्त पैसे दिले की आपले हवे ते काम करून देईल!
जणू नुसत्या अक्षता वहाणार्‍या माणसापेक्षा आपण जास्त धार्मिक!

असू द्या. त्या निमित्ताने देवाची, धर्माची नुसती आठवण ठेवली तरी पुरे. वय वाढल्यावर अक्कल येईल अशी आशा आहे.