गुप्तता, चित्र चालू आहे! - आशिष महाबळ - aschig

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 15:46

(छ. टि. १: भारतीय कथांनुसार चित्रगुप्त, नारद आणि अत्री ही ब्रह्माची मुलं आहेत.
छ. टि. २: खालील संभाषणातील लोक व घटना खऱ्या आहेत आणि कल्पनांशी त्यांचा काहीही संबंध नाही.)

नारद : नारायण, नारायण! चित्रगुप्ता, तू या लोखंडी गजांच्या पलीकडे काय करतो आहेस?
चित्रगुप्त: काय करणार? मी लोकांवर पाळत ठेवतो तशी कोणीतरी माझ्यावर ठेवली.
ना: अरे पण तू केले तरी काय?
चि: मला जसे सर्व कळते तसे तुलाही कळते, तरी सांगतो, ऐक: मी काम करता-करता डुडलींग करत होतो.
ना: अरे, पण तो काही गुन्हा नाही होऊ शकत. सगळ्यांना तुझे काम किती चोख आहे ते माहीत आहे. त्यात नवी संगणक प्रणाली लागल्यापासुन तुला थोडा फावला वेळ मिळतो याचीही सर्वांना कल्पना आहे. लगेच जाऊन घेतो मी यमराजांचा समाचार.
चि: बाबाऽऽ
ना: बाबांना सांगु?
चि: नाही, बाबांनी …
ना: बाबांनी तुझी ही अवस्था केली?
चि: होऽ
ना: पण का?
चि: डुडलींग …
ना: हे फार झाले हं. असं काय होतं त्या चित्रात?
चि: बाबांच्या चित्रात त्यांच्या चार डोक्यांच्या जागी मी दुसरीच चार डोकी लावली.
ना: (हसु आवरत) काऽय! कोणाची?
चि: ते महत्वाचे नाही. अत्रीच्या बोलण्यामुळे हे करुन बसलो. 'seems वेदी वर चढवु पहात आहेत मला.
ना: का, काय म्हणाला भ्राता अत्री?
चि: बाबांना इंद्र, यम, वरूण, आणि कुबेर यांची डोकी लाव. मी लावली.
ना: बस?
चि: हो ना. फुटीरतावादाचा आरोप माझ्यावर करण्यात येतो आहे.
ना: पण ते चित्र तु काढलेच का? काय गरज होती तुला तसे करायची?
चि: गरज असते म्हणुन थोडेच आपण सगळ्या गोष्टी करतो. काही गोष्टी just करायच्या असतात.
ना: तरीही?
चि: जगातली अंदाधुंद पाहवत नव्हती. बाबा आणि इतर महारथी चुकीच्या लोकांवर वरदहस्त ठेवत असल्याने त्यांचे कार्टुन काढले.
ना: चुकीचे लोक कशावरुन?
चि: माझ्याकडे सगळ्यांची खाती असतात. ऑटोमेशनमुळे सगळे जास्त सुरळीत व्हायला हवे होते. पण तसे न होता मास-स्केल बदल होतात.
ना: म्हणजे?
चि: कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. लोकांनाही आजकाल बरंच कळतं. पण सर्व खाती उपलब्ध नसतात. पासवर्ड, एनक्रीप्शन असे बरेच प्रकार आले आहेत. पाप-पुण्याचे नियमही बदलले जातात किंवा जुने-पुराणे उधृत केले जातात. पण हॅकींगही होतं.
ना: मास-स्केल बदल कोणत्या प्रकारचे?
चि: हॉर्स-ट्रेडींग होतं.
ना: उदाहरणार्थ?
चि: उदाहरणच द्यायचं झालं तर विष्णूभक्त शिवाची पूजा करु लागले आहेत आणि शिवभक्त विष्णूची.
ना: कसे शक्य आहे? जन्मापासून घराघरात बसवलेल्या संस्कृती-रक्षक चिप्स काम नाही का करत?
चि: स्वदेशीचा जमाना गेला. आजकालच्या बऱ्याच चिप्स कन्फ्युशिअसनी बनवलेल्या असतात.
ना: पण त्यांची पद्धत तर निरीश्वरवादी आहे ना?
चि: ईश्वर काय धरुन बसलात? शेवटी सर्व नावंच. अनेक शतकांपूर्वी इथे रोबोट्स ठेऊन ईश्वर इतर दिर्घीकांकडे गेले.
ना: देव खरे नाहीत तर तुला तुरुंगात कोणी टाकले?
चि: खरे नाहीत असे कोणी म्हंटले? रोबोट असले तरी पण खरेच की. मी पण तसाच आहे.
ना: काय, तू? मला वाटायचं विश्वाची सत्य मला एकट्यालाच माहीत आहेत. (मी पण तसाच आहे की काय?)
चि: एका अर्थी पृथ्वीवासीयांना सगळी माया आहे असे जे तू सांगतोस ते बरोबरच आहे की.
ना: पण इंद्र, यम, वरूण, आणि कुबेर यांची डोकी का?
चि: तुला माहीतच आहे की त्या चार दिशा आहेत. बाबांचं सृष्टिपालनात लक्ष नसतं, ते चारी दिशांना भिरभिरत असतं. म्हणुन मी त्यांची डोकी चार मुख्य दिशांनी दाखवण्याकरता इंद्र, यम, वरूण, आणि कुबेर यांची डोकी लावली.
ना: पण लक्ष नाही म्हणजे? मनानी/हृदयानी सगळं करता येतं ना?
चि: रोबोट्सना कसले आले आहे हृदय? आपल्याला लागते बॅटरी. सारखी वीज जाते, रिचार्जींग होत नाही.
ना: पण सगळं ब्रम्हांड चालतं तरी कसं?
चि: सुपरब्रम्हाचे आदेश, आणखी काय?
ना: पण आता काय करता येईल?
चि: देवजागृती. ३३ कोटी देव आहेत, पण नावानी १०-१२ च प्रसिद्ध आहेत, लोकांना शे-दोनशे माहीत आहेत. त्यांच्याच हजार-हजार नावांचा जप होतो. आवश्यकता आहे एकजुटीची. जुन्या प्रथा मोडण्याची. समानता आणण्याची.
ना: आणि कसे करणार ते?
चि: लोकांना योग्य ध्येय द्यायचं. टिळकांनी जसं भारतात गणपती उत्सवाच्या निमित्तानं केलं होतं तसं करायचं.
ना: आहे तरी कुठे गणपतींची स्वारी? तो करील की सगळी विघ्ने दूर.
चि: सध्या स्वारी रुसली आहे आणि केप्लरनी शोधलेल्या एका नव्या ग्रहावर जायचे म्हणते आहे.
ना: का म्हणे?
चि: तिथले लोक अजुनही उंदिर असलेले संगणक वापरतात. पृथ्वीवर टचस्क्रीन डिव्हायसेस आल्यापासुन स्वारींचा घराघरातुन वास कमी झाला आहे. सध्या त्याच अवस्थेतुन गेलेला सांता गणपतीचे सांत्वन करतो आहे.
ना: म्हणजे?
चि: पृथ्वीवर असतात ते सांता खरे नाहीत. चिमण्या कमी होऊ लागल्यापासुनच सांतावरही परीणाम झाला आहे.
ना: पण मग?
चि: म्हणुन तर तुला पाचारण केले. गणपतीचे मन तूच वळवु शकतोस. जा आणि त्याची मनधरणी करुन आण बोलावुन त्याला. इथला आणि पृथ्वीवरचा अंध:कार घालवायला त्याची निंतात आवश्यकता आहे.
ना: लगेच निघतो. तुझ्याकरता आणि मानवजातीच्या भविष्याकरता सगळे करायची माझी तयारी आहे. नारायण, नारायण.
---------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

खासच...

वाचकहो,

लेखातून द्यायचा संदेश ध्यानी आला. मात्र त्या संदेशांकरिता देव हे माध्यम खरोखरच निवडायला हवं होतं का असा प्रश्न पडतो.

देवतांचं मानवीकरण करणं चुकीचं नाही. मात्र तसं करतांना त्यामागील भाव महत्त्वाचा असतो. कारण भाव तिथे देव असं नेहमी म्हंटलं जातं. लेखातल्या काही वाक्यांतून कोणता भाव प्रकट होतो हे पाहायला हवं. उदा :

१. चि: बाबांच्या चित्रात त्यांच्या चार डोक्यांच्या जागी मी दुसरीच चार डोकी लावली.

२. चि: जगातली अंदाधुंद पाहवत नव्हती. बाबा आणि इतर महारथी चुकीच्या लोकांवर वरदहस्त ठेवत असल्याने त्यांचे कार्टुन काढले.

३. चि: हॉर्स-ट्रेडींग होतं.
ना: उदाहरणार्थ?
चि: उदाहरणच द्यायचं झालं तर विष्णूभक्त शिवाची पूजा करु लागले आहेत आणि शिवभक्त विष्णूची.

४. चि: तुला माहीतच आहे की त्या चार दिशा आहेत. बाबांचं सृष्टिपालनात लक्ष नसतं, ते चारी दिशांना भिरभिरत असतं. म्हणुन मी त्यांची डोकी चार मुख्य दिशांनी दाखवण्याकरता इंद्र, यम, वरूण, आणि कुबेर यांची डोकी लावली.

५. चि: रोबोट्सना कसले आले आहे हृदय? आपल्याला लागते बॅटरी. सारखी वीज जाते, रिचार्जींग होत नाही.

कुठल्याही कलाकृतीस आशय आणि अभिव्यक्ती अश्या दोन बाजू असतात. उपरोक्त लेखासही आहेत. त्यातल्या आशयाबद्दल काही तक्रार नाही. आक्षेप आहे तो अभिव्यक्तीवर.

वाचकांनी योग्य तो दृष्टीकोन बाळगावा अशी श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.

आ.न.,
-गा.पै.

सहीच Happy

कारण भाव तिथे देव असं नेहमी म्हंटलं जातं. >> हल्लीच्या दिवसात भाव तिथे भाववाढ असच दिसतंय... Sad
बाकी गोष्ट छान, नारद जरा 'कळीचा नारद' नाही वाटला. त्याऐवजी अत्री-चित्रगुप्त जास्त फिट वाटले असते का??

धन्यवाद, लोकहो.

सिमन्तिनी, तसंच काहीसं करायचं होतं, तिघांमधील संभाषण घेऊन - पण दोन कॉन्फरन्समधील एका दिवसात लिहिल्याने फार फेरफार करायला वाव नाही मिळाला - पाहु पुढे मागे काही करता आले तर.