Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:56
प्रकाशचित्रे शुगोलकडून साभार
नमस्कार मंडळी,
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
दरवर्षी आपण या आरतीद्वारे श्रीगणेशाची आराधना करत असतो. आरत्या आणि गणेशोत्सवाचं अगदी अतूट नातं आहे. मग आपल्या मायबोलीचा गणेशोत्सव याला कसा अपवाद असेल? चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या, भक्तीमय कवनं, स्तोत्रं इथे लिहूया आणि मायबोलीकरांची प्रार्थना बाप्पापर्यंत पोचवूया.
धन्यवाद
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया!!!
गणपतीबाप्पा मोरया!!!
गौरिनंदन श्रीगणेशा नमन तुजला
गौरिनंदन श्रीगणेशा
नमन तुजला आद्य ईशा
गजवदन तू, गणपती तू
पाश-अंकुश-परशुधारी
रिद्धि-सिद्धीस्वामि विकटा,
सौख्यदात्या, भक्त तारी
शरण आलो तुज दयाळा,
वरदमूर्ती पुरवी आशा
तीन लोकी तूच वसशी
तू गणांचा स्वामि, नायक
भालचंद्रा, एकदंता
धूम्रवर्णा, तू विनायक
वक्रतुंदा, शिवसुता रे
भवभयाच्या तोडि पाशा
ब्रम्हणस्पति, शूर्पकर्णा
सकल चिंता हरिसी देवा
रक्तवर्णी कमलपुष्पे
हरितदुर्वा धरिसी देवा
तव रुपाचे स्मरण करितो
धैर्य, मति दे विघ्ननाशा
जाऊ दे जळून । अमंगल
जाऊ दे जळून । अमंगल सारे।
रुजू दे विचार । मांगल्याचा॥
क्षमा अनुकंपा । कणा जीवनाचा।
कळोनी वळावे । माझ्या मना॥
मत्सराचे विष । सर्वांत जहाल।
होईल निष्प्रभ । तुझ्या कृपे॥
चुका ह्या होतात । पदोपदी माझ्या ।
बुद्धी दे त्यातून। शिकण्याची॥
हाची आशीर्वाद । द्यावा मला देवा ।
दांभिकता मना । शिवू नये॥
एक विनवणी । तुझ्या चरणाशी ।
वृथा अहंकार । लोप पावो ॥
चुकले माकले । लेकराचे काही ।
सांभाळूनी घ्यावे । देवा तुची ॥
यथामती केली । प्रार्थना जी देवा ।
मानुनिया गोड । स्वीकारावी ॥
मस्त आहेत दोन्ही कवनं. योग,
मस्त आहेत दोन्ही कवनं.
योग, पुढच्या गणपतीत सुरमाय तर्फे ही ऐकायला मिळतील ना?
करिते मी धावा । संकट निवारा
करिते मी धावा । संकट निवारा ।
भयमुक्त करा । गजानना ॥
चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥
थकले हारले । मोडून पडले ।
शरण मी आले । सावरावे ।
ठरेना वादळ । भरकटे तारु ।
सुखरुप न्यावे । पैलतिरा ॥
तुच माझा राम । तुच माझा शाम ।
सगुण स्वरुप । चैतन्य तू ।
स्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥
कविन, दोन्हीही कवनं अतिशय
कविन, दोन्हीही कवनं अतिशय सुरेख आणि भावपुर्ण आहेत.
तिन्ही रचना छान आहेत
तिन्ही रचना छान आहेत
क्रांतीतै मस्तच लिहिलयस
क्रांतीतै मस्तच लिहिलयस
येरे गणा येरे गणा ये
येरे गणा येरे गणा ये गजानना
चरणी तुझीया माझी वंदना....गजानना गजवदना
हीन कुणी न दिन कुणी सर्व सारखे
लेकरे तुझीच सारी सर्व लाडके
निर्मिलेस तुच जगा निर्मिले अम्हा
धाव घेशी जगदिशा तारिशी अम्हा
वरद सदा तुझा हवा हिच प्रार्थना .....गजानना गजवदना
येरे गणा येरे गणा ये गजानना
चरणी तुझीया माझी वंदना, गजानना गजवदना
इवली इवली ज्योतही तमास सारते
मी मजला जाणता कुणी ना पारखे
भेद करी खेद करी कळते ना मना
मोद करी दु:ख तरी छळते या मना
जाणिवांना सन्मती दे हिच प्रार्थना..... गजानना गजवदना
येरे गणा येरे गणा ये गजानना
चरणी तुझीया माझी वंदना, गजानना गजवदना
- सत्यजित
सत्यजीत एकदम सुरेख रचना
सत्यजीत एकदम सुरेख रचना
सुरमाय तर्फे वरची क्रांती तै ची आणि सत्यजितची रचना ऐकायला आवडेल