ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी - म. वा. धोंड

Submitted by वरदा on 21 August, 2012 - 12:32

ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!

ज्ञानेश्वरी अतिशय वंद्य असल्याने आपण फारशी कधी उघडून बघायच्या भानगडीत पडत नाही. सहसा दोन गट ती वाचतात - एक म्हणजे भक्तिभावाने पारायण करणारे आणि दुसरे म्हणजे मराठी साहित्याचे अभ्यासक-विद्यार्थी-लेखकजन. याचं प्रमुख कारण म्हणजे ज्ञानेश्वरांनी जरी सर्वसामान्यांसाठी लिहिली असली तरी ते सर्वसामान्य लोक आणि त्यांची भाषा यांना सातशेहून अधिक वर्षं लोटली आहेत आणि तेव्हाची सोप्पी भाषा आज आपल्यासाठी दुर्बोध झाली आहे.
ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांवर नजर फिरवली तर लक्षात येतं की मुळात ज्ञानेश्वरीच्या पाठभेदांपासूनच वाद सुरू होतात. राजवाडे प्रत, माडगावकर प्रत, सांप्रदायिकांच्या प्रती यात अनेक तफावती आहेत. त्यातले कुठले भेद ग्राह्य कुठले अग्राह्य यावरून भरपूर लाथाळ्याही झाल्या आहेत (म्हणूनच 'गाळीव इतिहासा'त ज्ञानेश्वर एक का दोन असा वक्रोक्तीपूर्ण उल्लेख पुलंनी केलाय!). पण या सगळ्या चर्चा, शाब्दिक मारामार्‍या अभ्यासकवर्गापुरत्याच सीमित राहिल्या आहेत. कारण त्यातला व्युत्पत्ती, व्याकरण, शब्दार्थछटा, शब्दच्छल आणि याच जोडीला अध्यात्मिक अर्थ, योग-नाथ-भक्तीपरंपरा यांचा अगदी मुळापर्यंत जाऊन केलेला खल हा सर्वसामान्य वाचकांना फारसा रंजक वाटत नाही, उलट हे रुक्ष, कोरडे वाद कंटाळवाणेच वाटतात. त्याने ज्ञानेश्वरीच्या ढोबळ अर्थात आपल्यासाठी काही फरक पडत नाही. आणि आपल्या ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीबद्दल वाटणार्‍या भक्तीभावात किंवा त्यातल्या काव्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यातही कुठला अडथळाही येत नाही.
पण या ज्ञानेश्वरीवरल्या अभ्यासकवर्गापुरत्याच लोकप्रिय असलेल्या लेखनात एक पुस्तक मात्र त्याच्या वेगळेपणाने आणि रंजकतेने लक्ष वेधून घेते. ते म्हणजे म.वा. धोंड लिखित 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'

सर्वसाधारणपणे मराठी साहित्यात म. वा. धोंड हे नाव घेतलं की मर्ढेकरांची कविता आणि त्यावरचा साक्षेपी अभ्यास हेच सगळ्यात आधी आठवतं. धोंडांनी मराठी साहित्याच्या इतर पैलूंवरही काम केलंय, मूलगामी विश्लेषण केलंय, त्यावर पुस्तकं/लेख लिहिलेत. मराठीचे विद्यार्थी ही पुस्तकं बर्‍यापैकी संदर्भासाठी वापरत असणारच. पण उपरनिर्दिष्ट पुस्तक मात्र वाचकवर्गाकडून थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं दिसतं. त्याचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी हा प्रपंच.

मराठी साहित्यात ज्ञानेश्वरांचं (आणि इतर मध्ययुगीन संतकवींचं) साहित्य भाषासौंदर्य, त्यातली शब्दसंपत्ती, त्यातून दिसणारी असामान्य प्रतिभा, अध्यात्मिक अधिकार या मुद्यांच्या चौकटीतच अभ्यासलं गेलं आहे. या चौकटीपलिकडे जाऊन साहित्याचा अभ्यास करता येतो का याचा प्रयत्न फार क्वचित आपल्याकडे झालाय. त्या अपवादात्मक उदाहरणांत धोंडांचं ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी पहिल्या काही क्रमांकात निश्चितच गणता येईल.

धोंड हे मुंबईत मराठीचे प्राध्यापक होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी उलगडून शिकवताना त्यातली दुर्बोध कूटस्थळं (ही ज्ञानेश्वरीत भरपूर आहेत) कशी टाळता येणार? या कूटांचा अर्थ जाणून घेताना धोंडांना जाणवलं की फक्त अध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वचर्चा धुंडाळून हा अर्थ गवसणार नाही, तर ज्ञानेश्वरी ज्या काळात रचली गेली, ज्ञानेश्वरांच्या आसपास कुठली सामाजिक, भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती होती हे समजवून घेणं अटळ आहे. कारण ज्ञानेश्वरांची भाषा म्हणजे उपमा-उत्प्रेक्षादि अलंकारांनी, विविध शब्दप्रतिमांनी नटलेली आहे. आणि या बहुतेक सगळ्या प्रतिमा, शब्द, वाक्प्रचार हे त्यांच्या आसपासच्या, रोजच्या जीवनातून आले आहेत. साहाजिकच आहे! पारलौकिकाचं वर्णन सर्वसामान्य जनतेसाठी करताना त्यांना कळतील असेच, त्यांच्या जीवनाशी निगडित असेच दृष्टांत कवि वापरणार. तेव्हा लौकिक सृष्टीचा शोध घेतल्याशिवाय या पारलौकिक जगाकडे जाणं सोपं होणार नाही.
हे विचारसूत्र जरी या पुस्तकाचा आधार असलं तरी हा एखादा एकटाकी लिहिलेला प्रबंध नाही. तर वेळोवेळी धोंडांनी काही कूटस्थळं जाणून घ्यायचे जे प्रयत्न केले, त्यावर तीस वर्षांच्या कालावधीत जे काही लेख लिहिले त्यांचं एकत्रित संकलन आहे.

लेखांचे विषय विविध आहेत. सुरुवातीचा 'उखितें आघवें चि मी' हा लेख त्यांच्या या अभ्यासभूमिकेची ओळख करून देणारा असा म्हणता येईल. त्यात त्यांनी पुढे आलेल्या बहुतेक लेखांकडे कसे वळले, त्या शोधात काय अनुभव आले याबद्दल अगदी थोडक्यात लिहिलंय. त्यांच्या खास नर्मविनोदी खुसखुशीत शैलीत
एकूण लेखविषयांची व्याप्ती बघून थक्क व्हायला होतं. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला योगदुर्ग प्रत्यक्षात कुठला किल्ला डोळ्यासमोर ठेवून केलाय का याची शंका आल्यावर त्यांनी त्याचा शेवटपर्यंत तड लावून प्रत्येक ओळीचा-शब्दाचा (याआधी न लागलेला) अर्थ किती संगतवार लावता येतो ते दाखवलंय. तसंच योगसंग्रमाच्या रूपकाचा अर्थ आजपर्यंत कसा अपुर्‍या ज्ञानामुळे चुकीचा लावला गेलाय ते उलगडून सांगितलंय. 'अंगस्तिगौवण' किंवा 'माथा तुरंबिला बुरु' या शब्दांचा अर्थ नव्याने समाधानकारक लावला आहे. हिवराच्या झाडाच्या सावलीत सज्जन बसत नाहीत असा उल्लेख जेव्हा ज्ञानेश्वर करतात तेव्हा 'का?' हा प्रश्न धोंडांशिवाय कुणालाच पडत नाही. आणि त्यांना मिळालेलं उत्तर वाचकवर्गालाही अगदी अनपेक्षित असंच आहे. बाकीच्या लेखांत ज्ञानेश्वरीत तमाशाचं वर्णन कसं येतं, किंवा ज्ञानेश्वरीत उल्लेखलेली शिवी, ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या अशोकवृक्षाच्या प्रतिमांचा अर्थ, गीतेपेक्षा सरस वर्णन केलेलं विश्वरूपदर्शन असे विविध मनोरंजक मुद्दे धोंडांनी चर्चेला घेतले आहेत. पण संशोधनदृष्ट्या सगळ्यात सरस उतरलेला लेख म्हणजे ज्ञानेश्वरीतील सोन्याला उद्देशून आलेल्या तीन शब्दांचा अर्थवेध. तत्कालीन अर्थव्यवस्थेचा अतिशय विचारपूर्वक धांडोळा घेऊन, सोने या धातूवर सखोल तांत्रिक वाचन करून त्यांनी मांडलेले निष्कर्ष वाचून कुणाच्याही तोंडून दाद जावी!
ही सगळी चर्चा करताना धोंडांची सर्वगामी बुद्धी असंख्य विषयांना स्पर्श करते. व्याकरण, मध्ययुगीन मराठी, साहित्य-सौंदर्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र आणि नाणकशास्त्र, तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती, मौखिक परंपरा, ब्रिटिश कलोनियल अर्काईव्ज, आणि काय काय... आणि हे सगळं लिहिलंय ते अगदी सोप्या भाषेत. क्वचित भाषेची तांत्रिक घटपटादि चर्चा कंटाळवाणी वाटू शकते. पण तेवढ्यापुरतीच. शिवाय लिहितालिहिता धोंड 'विरुद्ध' पार्टीला (विशेषत: सांप्रदायिक अभ्यासक आणि एखाददुसरे मराठीचे प्राध्यापक) कोपरखळ्या मारत जातात ते अगदी स्पष्ट कळतं. पण त्यांच्या नर्मविनोदी शैलीत बोचरेपणा नाही. त्यामुळे आस्वादात बाधा येत नाही. उलट आपल्यासारख्या ज्ञानेश्वरीचर्चेविषयी अनभिज्ञ असलेल्यांना तत्कालीन वाद कळतात.

मला या पुस्तकाची दोन वैशिष्ट्ये वाटतात -
एक म्हणजे त्यांच्या संशोधनातले अडथळे भरपूर होते. यादवकाळाचा अभ्यास हा प्रामुख्याने राजकीय इतिहास, तेव्हाचे शिलालेख, ताम्रपट, मंदिरं, धार्मिक ग्रंथ इ. वरच केंद्रित आहे. पुरातत्त्वातही या काळावर फारसं सलग काम न झाल्याने सर्वसामान्य दैनंदिन सामाजिक परिस्थितीवर फारशी माहिती उपलब्ध नाही. असं असताना या लौकिक सृष्टीचा वेध घेणं हे अतिकठीण काम त्यांनी यशस्वीरीत्या पेललं असंच म्हणायला लागेल

दुसरं म्हणजे या अशा विश्लेषणाची एकमेवाद्वितीयता! वरती उल्लेख केल्याप्रमाणे मध्ययुगीन मराठी साहित्य त्याच्या लौकिक सृष्टीच्या संदर्भात किंवा ज्या समाजात ते निर्माण झालंय त्याच्या सर्वांगीण अभ्यासाच्या संदर्भात सहसा अभ्यासलं जात नाही. तो अभ्यास वाङ्मयापुरताच संकुचित रहातो. त्याच्या पल्याड जाऊन त्याचा कॉन्टेक्स्ट (याला संदर्भ असा मराठी प्रतिशब्द असला तरी मूळ शब्दाचा नेमका अर्थ तो पकडत नाही म्हणून इंग्लिश शब्दच वापरतेय) जोपर्यंत अभ्यासला जात नाही तोपर्यंत आपला अभ्यास अपुराच रहाणार ही जाणीव धोंड सोडून आणखी कुणाला तोपर्यंत झाली नव्हती. अजूनही इये मराठिचिये नगरी असे अभ्यास होतात का शंकाच आहे!

दहा-बारा वर्षांपूर्वी सहज म्हणून पुस्तकाच्या दुकानात शिरले असताना हाताला लागलेलं हे पुस्तक अगदी अनपेक्षितरीत्या खजिना निघालं. कितीही वेळा वाचलं तरी प्रत्येक वेळी धोंडांच्या बुद्धीला आणि प्रतिभेला तेवढ्याच विस्मयाने सलाम करावासा वाटतो.
जाता जाता - 'जाळ्यातील चंद्र' या धोंडांच्या पुस्तकाचं शीर्षक कुठून आलं याचा उलगडा हे पुस्तक वाचताना झाला (मी जाळ्यातील चंद्र वाचलं नाहीये. कदाचित त्याचा उलगडा तिथेही लिहिला असेल) आणि ज्ञानेश्वरीतलं आणखी एक सौंदर्यस्थळ पदरात पडलं!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे

ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
म.वा.धोंड
मौज प्रकाशन गृह (१९९१)
छापील किंमत रु. ७५/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

जबरदस्त पुस्तक आहे हे.
१९९५-९६ च्या सुमारास मला एका स्पर्धेत ज्ञानेश्वरांवर बोलायचं होतं तेव्हा वाचलं होतं हे पुस्तक.. आणि त्यापूर्वी ज्ञानेश्वरी वाचली नसूनही ह्या पुस्तकानं झपाटून गेले होते... अगदी काल-परवा घडल्यासारखी गोष्ट वाटली तुझं लिखाण वाचून.
अजून ज्ञानेश्वरी वाचली नाहीच, पण इच्छा मात्र नक्की आहे ! Happy

चांगला परिचय करून दिला आहेस, वरदा. धन्यवाद. Happy
(आणि 'कॉन्टेक्स्ट'ला मराठी प्रतिशब्द शोधायचा भुंगा लावून दिल्याबद्दलही! Happy
रेफरन्स आणि कॉन्टेक्स्ट दोन्हीला 'संदर्भ'च म्हणणं काही बरोबर नाही.)

धन्यवाद केश्विनी, रार आणि स्वाती Happy

रार - खरंच झपाटणारं पुस्तक आहे. माझीही ज्ञानेश्वरी विश-लिस्ट वर आहे. मध्ययुगीन मराठीची डिक्शनरी हातात ठेवून वाचेन म्हणते

स्वाती - हो. संदर्भ हा कॉन्टेक्स्ट ला प्रतिशब्द नाही होत. मी बरेच दिवस शोधतेय पण मिळत नाहीये

उत्तम परिचय. पुस्तक वाचावेसे वाटतेय.

काँटेक्स्ट = चौकट किंवा संदर्भरचना ...?

तदनुषंगिक शब्द :

फ्रेमवर्क = चौकटिबंध
पॅटर्न = ढाचा, साचा (दिवाळीतील चकलीचा वगैरे), आकृतिबंध
मोल्ड = साचा

चूभूदेघे!

-गा.पै.

उत्तम परिचय, धन्यवाद!
एखाद्या जुन्या कलाकृतीचा अथवा महान व्यक्तिचा अभ्यास करण्याची फार एकसुरी पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा तात्कालिक संदर्भाच्या अनुषंगाने अभ्यास हा विचारच दुर्मिळ आहे.

<<तेव्हाची सोप्पी भाषा आज आपल्यासाठी दुर्बोध झाली आहे.>> अगदी अगदी वरदा. रोज शाळेत म्हणण्यात येत असणारे पसायदान सुद्धा आठवीत त्याचा अर्थ समजावून सांगणारे एक भाषण झाले तेव्हा कळला. मग इतर वेच्यांबद्दल काय.
छान पुस्तक ओळख. तुम्ही असे लिहिले की जाणवते अरे आणखी किती खोल समुद्र आहे हा. आताशीतर थेंब भर
सुद्धा पाणी बघीतले नाहीए.

वा !!
एका उत्तम पुस्तकाबद्दलची माहिती मिळाली. Happy
(मलाही ज्ञानेश्वरी (आणि दासबोधही) दोन्ही ग्रंथ एक ना एक दिवस वाचायचे आहेतच.)

ललितादेवी,

इथे दोन्ही मिळतील :

दासबोध : http://sanskritdocuments.org/marathi/index.html#Dasbodh
ज्ञानेश्वरी : http://sanskritdocuments.org/marathi/index.html#Dnyaneshwari

मात्र सटीप आवृत्त्या अधिक वाचनीय होतात.

पुढील वाचनास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानेश्वरी 'संस्कृत डॉक्युमेंटस" च्या वेबसाईटवर जाऊन वाचायला मिळेल... ह्या संकल्पनेनी पटकन हसूच आलं Happy

प्रशासक, हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध करून देता येइल का?

हे वाचायलाच हवं.

जाळ्यातील चंद्राचा संदर्भ मला आठवतोय तो असा.

चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडते, तेव्हा तो चंद्र पाण्यात आहे असा भास होतो, ज्यावेळी कोळी पाण्यात जाळे टाकतो, त्यावेळी त्याला तो जाळ्यात पकडल्यासारखा वाटतो. पण खरा चंद्र ना पाण्यात ना जाळ्यात..

बरोबर आहे ना ?

ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा नीट अर्थ लावला तरच त्यातले सौंदर्य लक्षात येते, नाहीतर आदील कोण नोळखीजे चे भाषांतर, प्रेम कि गंगा बहाते चलो, असे विचित्र होऊन बसते.

Pages