दिनांक : 8 ऑगस्ट 201२
कै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंतिनिमित्त
कै. आप्पासाहेब भागवत हे पुण्याचे माजी चीफ ऑफिसर. ते 1920 ते 1938 या कालावधीत पुण्याचे चीफ ऑफिसर म्हणून काम पहात होते. त्याचप्रमाणे पुण्याच्या डेक्कन जिमखाना वसाहतीसाठी त्यांचा मोठा हातभार लागला आहे. 1919 ऎंटवर्प ऑलिंपिकसाठीही भारतातून खेळाडू पाठविण्यात त्यांचा हातभार लागला आहे. एक निराळी दृष्टी असणार्या या महान व्यक्तिचा आज जन्मदिवस. 8 ऑगस्ट 1882 रोजी गोकाकमध्ये आप्पासाहेबांचा जन्म झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इंस्टिट्यूट असावी असा निबंध त्यांनी 1917 साली किर्लोस्कर थिएटरमध्ये वाचून दाखविला. त्याप्रमाणे 1926 साली ती सुरू झाली. आप्पासाहेब त्याचे ऑनररी सेक्रेटरी होते. (संदर्भ-इंस्टिट्यूटने काढलेले मराठी पुस्तक.)
चीफ ऑफिसर पदावर असताना पुण्याच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी मोठी कामे केली. आप्पासाहेब अतिशय सद्विचारी आणि प्रामाणिक होते. त्याचबरोबर गोर-गरीबांवर अन्याय होऊ नये यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. नगरपालिकेतील कर्मचार्यांना पठाण लोक त्रास देत असत. कारण पठाणांकडून या कर्मचार्यांनी कर्ज घेतली होती. त्यावेळी आप्पासाहेबांनी स्वत:च्या खिशातून पैसे देऊन या कर्मचार्यांना कर्जमुक्त केले.
1934 साली महात्मा गांधी दौर्यावर आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी आप्पासाहेब जातीने कार्यक्रम स्थळाच्या गेटवर उभे होते. मात्र महात्मा गांधी यायच्या थोडावेळ अगोदर तेथे कोणीतरी बॉम्ब फेकला. त्यात आप्पासाहेब जखमी झाले. सुदैवाने फार लागले नाही. मात्र याचा कोणताही लवलेश न दाखविता त्यांनी महात्मा गांधींचे स्वागत केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॆंकेचे ते संचालकही होते. सर्व ग्रामीण शेतकर्यांसाठी आप्पासाहेबांच्या मनात प्रचंड सहानुभूती होती. त्यामुळेच चीफ ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्यानंतर महात्मा गांधींच्या सर्वोदय कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
साक्षरता प्रसारासाठी ते स्वत: बडोदा, सांगली, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी जात असत. सर्वांना साक्षरतेचे महत्व पटवून देत असत. या कामी कोणतीही अपेक्षा न करता ते स्वत:चे काम करीत असत.
गोरगरीबांबद्दल अत्यंत कळवळा असल्यामुळेच ते अनेक गरजूंसाठी जामीनही राहिले. त्यांना जमिनी घेऊन दिल्या. स्वत: जमिनी खरेदी करून गरीबांना मोफत दिल्या. मात्र याचमुळे त्या गरजूंनी कर्जे न फेडल्याने आप्पासाहेबांना स्वत:चे घर सोडावे लागले. त्याचा 1952-53 साली लिलाव झाला.
महात्मा गांधींचा 1948 साली वध झाल्यानंतर त्यांनी सर्वोदय कार्यासाठी पुणे सोडले. त्यावेळी ते मावळ विभागाचे संचालकही होते. जाळपोळीमुळे अनेक निरपराध लोकांनाही तुरूंगवास झाला. त्या लोकांना आप्पासाहेबांनी तुरूंगातून सोडविले. सिंहगड, तोरणा आणि राजगड परिसरात मोठे काम केले. मृद पर्जन्य संधारणासंबंधी त्यांच्या काही उत्तम संकल्पना होत्या. म्हणून राजगडाच्या पायथ्याशी सरकारने त्यांना 32 एकर जमीन प्रयोगासाठी दिली. त्यातील 8 एकरावर त्यांनी यशस्वी प्रयोग केला. संपूर्ण जंगलाचे वनीकरण केले. चर बांधणे, नाला बंडींग यासारखे प्रयोग यशस्वीरित्या केले. 1951 ते 1967 या काळात शेकडो झाडे लावली. अजूनही ती आहेत.
केंद्र तसेच राज्य सरकारच्या अधिकारी व मंत्र्यांबरोबर आप्पासाहेबांचा नियमित पत्रव्यवहार होत असे. त्यांच्या 15 वर्षांच्या संशोधनाला त्यांनी ‘राजगड मेथड’ असे नाव दिले होते. आज सगळीकडे ‘पाणी जिरवा – पाणी मुरवा’ असे सांगितले जात आहे. मात्र 1952 साली म्हणजे जवळजवळ 60 वर्षांपूर्वी एका मानवाने ओरडून ओरडून मृद-पर्जन्य संधारणासंबंधी जगाला हे सांगितले त्याकडे कोणी त्यावेळी लक्ष दिले नाही. असो. काळाचा महिमा असाच असतो. म्हणूनच त्यांचे काम करता आले नाही तर निदान त्यांची आठवण करून त्यांना वंदन करावे यासाठी हा सगळा खटाटोप.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
अजय अनंत जोशी
आप्पासाहेब भागवतांना
आप्पासाहेब भागवतांना आदरंजली.
प्र.के. घाणेकर यांच्या "राजगड" या छोटेखानी पुस्तकात घाणेकरांनी, आप्पासाहेबांच्या राजगड परिसरात केलेल्या कार्याचा थोडक्यात पण छान आढावा घेतला आहे.
धन्यवाद विजय! आपणाला
धन्यवाद विजय!
आपणाला आप्पासाहेब माहीत आहेत हे वाचून आनंद वाटला.
पुन्हा एकदा धन्यवाद!
अजय, पुण्यात नव्हतो, कसा झाला
अजय, पुण्यात नव्हतो, कसा झाला कार्यक्रम? वाचायला आवडेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)