भुसन्याचा विनोद

Submitted by अश्विनीमामी on 29 June, 2012 - 23:19

आज कोण वार? शुक्रवार हे स्पिरिट काल जरा जास्तच झाले. त्यात पॉप टेट ने भर टाकली. परमिटचे पाच रुपये जास्त गेले. पण चालतंय. सव्वा सहाला तिकीट काढले अमेझिंग स्पायडरमॅन चित्रपटाचे अन सव्वा सातला तो सुरू. अगदी पहिला दिवस अन दुसरा शो. तास भर काय करणार? महिना अखेर! त्यामुळे खरेदी प्रकरणात रस नव्हता.

दर आठवड्याला बिग सिनेमात सिनेमा बघून ती जनगणमनची फिल्म पाठ झाली आहे. तरी दर वेळेस गळ्यात आवंढा येतोच. त्यापासून लक्ष विचलित करायला ती मुले करतात तसे हातवारे करायचा प्रयत्न केला. पण आजूबाजूच्या लोकांनी बघितल्यावर गप्प. मनाच्या अश्या कातर अवस्थेत स्पाइडी सुरू झाला.

एक मुलगा जिन्यात बसून लपाछपी खेळत असतो. त्याचे आईबाबा येतात अन त्याला कोणत्यातरी दुसर्‍या काका मावशींकडे सोडून गायब होतात. हे कळेस्तोवर मला उगीचच आपण हॅरी पॉटरचाच कुठला तरी भाग बघतो आहोत असे वाटायला लागलेले. हो. आजकाल आपण हॅरी पॉटरचे सिनेमे बघायचे अन ती जनरेशन अस्ते फेसबुकवर. कॉमिक बुक वर बनविलेला सिनेमा. त्याने किती फॉर्म्युलेइक असावे? अगदी पेंट बाय नंबर्स सारखेच दिग्दर्शकाने हं आता हे दाखविले, आता ही स्टेप, मग ती असे दिग्दर्शन केले आहे. एक्कही आश्चर्याचा धक्का बसू दिलेला नाही.

मुलगा मोठा होऊन अँड्रयू गारफील्ड ( सोशल नेट्वर्क मधला. म्हणून जरा बघण्यात रस होता मला. ) बनला.
तो सत्रा वर्शाचा असून शाळेत जात असतो. अगदी एकलकोंडा असल्याने फक्त फोटो काढत असतो. त्याला नेहमीसारखेच एक दुसरा सशक्त मुलगा त्रास देतो. हा व्यवस्थित मार खातो. मग लगेच हिरविणीचा प्रवेश. ती
स्क्रिप्टनुसार फारच बारीक व ब्लाँड! तिथेही आ. ध. नाही. त्यांचे जमतेच.

मग हिरोस वडिलांची जुनी बॅग व त्यात लपविलेले जनुकशास्त्रीय रहस्य सापड्ते. मग तो आपण जे केले असते तेच करतो. पक्षी गूगल! त्याला लगेच पत्ता वगैरे सापड्तो. ही पुढची स्टेप पण लै सोप्पी. मोठ्ठीच्या मोठ्ठी इमारत असते. जनुक शास्त्रीय संशोधन जरा लपून छपून करतील तर ते नाही. लगेचच त्याला ती बिल्डिंग सापडते. आत एंट्री मिळते. स्टुपिड बाई त्याला लगेच वर बॉसला भेटायला पाठवते. सगळीच कामे अशी झाली तर कित्ती छान? माझा सात्विक संताप झाला. तर पुढे. तिथे लगेच हिरवीण आणि आपला इर्फान खान.
तो एका गुप्त खोलीत जातो व बाहेर येतो. तो तिथून गेल्यावर हिरो लगेच तसेच बघून ठेवलेले हातवारे करून
मोस्ट गुप्त खोलीत लगेच अ‍ॅक्सेस मिळवतो. आधना. तिथे एक अनंत कोळ्यांचे रंगीत झिरमीळ असते.
त्यात जाऊन आल्यावर त्याला अचाट जनुकशास्त्रीय संशोधनामुळे निर्माण केलेला
तो कोळी चावतो. ढँट्ढँ!!! आता आपला हिरो आला. मग त्याला आपल्या अफाट शक्तीचा शोध होणे, त्यासाठी एका मुलीचा टॉप स्ट्रॅटेजिकली फाटणे, थोडी विनोदी मारामारी इत्यादी होते.

बरे दिग्दर्शकाचे आडनावच वेब आहे. मज्जाय ना! आता त्याला काहीतरी हायर पर्पज पाहिजे. म्हणून फारेंडच्या चित्रपटीय नियमांनुसार कंटाळवाणे क्लास घेणार्‍या काकांचा खून होतो. त्या खुन्याला शोधायला हिरो काही च्या काही कोळी करामती करून दुसर्‍याच गुंडांना फाइट करतो. मध्येच संशोधन करून स्वतःचा ड्रेस शिवतो. क्रिश मधल्या सारखे एक बास्केट बॉलचा सीनही आहे. त्यातही एक मुलगी जिम मध्ये पोस्टर रंगवत असते
ती जपानी चेहरेपट्टीची अन बहुतेक बहिरी(आय शुड बी सो लकी!) इथेही आजिबात आधना.

आता गोष्ट पुढे न्यायची तर व्हिलन पाहिजे म्हणून एक हाती शास्त्रज्ञ स्वतःलाच काहीतरी पालींची जनुके वापरून अचाट संशोधन करून निर्माण केलेले इंजेक्षन देतो व त्याचा हातच केवळ परत उगवतो असे नाही तर ओएमजी तो स्वत:च पाल बनतो. इथे प्रेक्षागॄहातील युवतींनी नाजूक किंकाळ्यावगैरे आजिबात मारल्या नाहीत.
काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते.

मध्येच हिरविणीच्या विसाव्या मजल्यावरील घरात स्पायडीने पोहोचणे, नर्म फ्लर्टिंग व भावी सासर्‍या बरोबर वादावादी करणे इत्यादी आहेच. हिरविणीचे बाबाच पोलीस चीफ. मग ज्वाइंटली दुर्जनांचा विनाश होणार हे ओघानेच आले.

आता हा मोठा होणारा पाल- मानव पुलावर गाडया असतात त्यातील इर्फान खानास शोधून त्याची कार चेपून त्याला सिनेमातून हाकलून देतो. मग एका मुलाला पुलावरून पाण्यावर लट्कणार्‍या व जळणार्‍या गाडीतून वाचिवण्याचा सीन आहे. सो ओरिजिनल यू नो! त्यामुलाला बापसाच्या हातात दिल्यावर स्पायडीला आपल्या बाबांची याद येते. ( आधना!)

इथूनपुढे निरर्थक अशी स्पायडी व पाल-मानव अर्थात भुसन्याचा जोक ( संदर्भासाठी एलदुगो बाफ वाचावेत कृपया) यांच्यातील पाठलाग व मारामारी आहे. न्यू यॉर्क मधील अतिशय स्वच्छ व मोठ्या, कचरा नसलेल्या
गटारांची गाय्डेड टूर आहे.

मग परत हॅपॉ ची आठवण करून देणारी शाळेतील कोळी कुमार व पालमानव यांच्यातील मारामारी. पालमानव
काहीतरी जैविक शस्त्र बनवून लोकांना मारत/ फ्रीझ करत असतो. तो मोठ्ठ्या टावर वर चढतो. तीच ती हपीस बिल्डिग. एकच इमारत पाडायचे बजेट होते बहुतेक. त्याला नामोहरम करण्यास शूरवीर हिरविण कुमारी तिथे येते व इमारतीत अडकते. ( आध आजिबातच नाही. कारण मित्र अन बाबा सुट्का कोणाची करणार?) प्रयत्नांची शर्थ करून पालमानवाच्या दुष्ट प्लॅन पासून हिरवीण व हिरो शहरवासियांची सुटका करतात. ग्लोबल अँटीडोट मुळे जनता पण बरी होते व पालमानव नुसता परत एक हाती शास्त्रज्ञ होतो. ( मरत नाही - आपल्या नशीबी सिक्वील आहे ना. ) माझ्या मुली भोवती तुझे जाळे विणू नकोस असे वचन घेऊन भावी सासरे बुवा मरतात.
पण कोळी कुमार येडा प्रभात नसल्याने, घनाच्या सल्ल्या शिवायच असली फालतू वचने मोडतो. व त्यामुळे हिरविण हसते. चित्रपट संपल्याने आपणही हसतो.

बाहेर आल्यावर चिक्कार पावसात लगेच रिक्षा मिळाली हाच काय तो आश्चर्याचा मोठा धक्का.

मुलांना पॉपकॉर्न व कोकचे पैसे देउन थेटरात बसवून या. बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते. >>>>>>>>>>
अमा एकदा मुलांना घेऊन घाशीराम कोतवाल ला गेलो होतो. मुलांना काही त्यात इंटरेस्ट येत नव्हता.(घाशिराम आणि घाशीराम प्रेमी ....माफ करा!)
तरप्रेक्षकांच्यात पिनड्रॉप सायलेन्स ....आणि स्टेजवर कुणीतरी तलवार काढल्यावर आमच्या पुढचा एक असाच बाल प्रेक्षकाने अत्यंत तार स्वरात आपल्या बाबांना विचारलं होतं, " ओ बाबा......... ती तलवार खर्खरची आहे का हो?"
प्रेक्षकांच्यात खर्खरचीच खसखस पिकली होती.

काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते.
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
>>>> Lol लै भारी!

मामी Lol Rofl
मी असले स्पायड्याचे षिणेमे फक्त टिव्हीवर फुक्टात बघते. ते पण इतर चॅनलीवर काहीही बघण्याजोगे (म्हणजे स्पायडीपेक्षाही बेक्कार, टुकार) चालू असेल तर.

आज फॅक्ट्रीतल्या प्रसाधनगृहात गेलेले. तिथे दारात चिरडून दिवंगत झालेली एक चिमुकली पाल किंवा तिचा हसरा सांगाडा बघून मला पाल मानवाचीच याद आली.

Biggrin जबरी लिहिले आहे.

मुलांना पॉपकॉर्न व कोकचे पैसे देउन थेटरात बसवून या. बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील . >>> Biggrin

भुसन्याचे सं स्प दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद Happy

Lol आमच्या मिशाळ गुरुजींनी त्यांच्या सुन्या सुन्या आणि विपन्नावस्थेतल्या काळात स्वयंपाकघरात एक कोळी पाळला होता. त्यावरचा पिक्चर यापेक्षा जास्त हिट झाला असता. Proud

भुसन्याचा विनोद हे टायटलच आवडलं! भारी Lol
सिनेमानी इथे धुंवाधार डेब्यु केलाय असं आताच वाचलं. मला बघायचा होता पण बायकोनी बेत हाणून पाडला. ती पहिल्या स्पायडरमॅनची डाय हार्ड फॅन आहे आणि दुसरा कुठलाही स्पायडरमॅन खपत नाही तिला. Happy

मस्स्स्त! खुसखुशीत!! Proud

विंग्रजी शिनेमामध्ये काहीही केलं तरी ते चांगलं, असं वाटाणार्यांनी वाचावं हे परिक्षण !

लै भारी!

अश्विनीमामी... साष्टांग नमस्कार... जबरी लिहिलय... मी हस्तये खुसु खुसु...
लेक सिनेमांचा वेडा... विचारतोय सांग्ना काय काय म्हणून.. हे तुमचं मराठी त्याला ईंग्रजीत भावानुवाद करणं शक्यच नाही...
<लेकाला "मराठी" मराठी म्हणून वाचता येत नाही, किंवा कळत नाहीये ह्याचं दु:खं झालेली आई बाहुली>

मामी मी शनिवारी गाडीवरून बाहेर चालले होते, आणि रस्त्यात तुझा हा लेख आठवला, मी गाडीवर रस्ताभार खोखोखोखो Lol Rofl Proud

Pages