आम्रपाली
’पिरिअड फ़िल्म्स’ किंवा ऐतिहासिक काळावर आधारीत चित्रपटांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. नानविध पदार्थांनी भरलेल्या जेवणाच्या ताटात पुरणपोळीचे जे स्थान असते तसे. पुरणपोळी असली की ताट कसे भरगच्च दिसते, मेनूला आपोआप भारदस्तपणा येतो. या पदार्थाला नाजूक, नजाकतदार नखरा नाही असे वाटू शकते पण खवैय्याला माहीत असते की बनवणार्याच्या हातात कौशल्य नसेल तर या वर वर साध्यासुध्या दिसणार्या पदार्थाचे बनणेही अवघड. पोळीत पुरण भरले की झाली पुरणपोळी इतके सोपे नसते हे. पुरणाचा स्वाद आणि रंग मुळात चांगला जमायला हवा, लाटण्यार्याचे कसब पूर्ण पणाला लागायला हवे, भाजल्यावर पुरणपोळीला अलवार पदर सुटायला हवा, तरच ती खाण्यात मजा.
पिरिअड फ़िल्म्सचेही नेमके असेच आहे. भरजरी, ऐतिहासिक पोषाख व्यक्तिरेखांच्या अंगावर चढवून, भव्य, आलिशान सेट्स उभारुन चित्रित केले की बनली पिरिअड फ़िल्म असे अनेकांना वाटत असले तरी ते तसे नसते. पिरिअड फ़िल्म आणि नुसताच पोषाखी चित्रपट यात मुलभूत फ़रक आहे हेच अनेकांना माहीत नसते.
पिरिअड फ़िल्ममधे जो एक विशिष्ट काळ असतो तो पुरेपूर दिसायला हवा, समजायला हवा. काळाचा जो नाट्यपूर्ण तुकडा निवडलेला असतो त्याला असंख्य इतर संदर्भ चिकटून असतात. व्यक्तिरेखांचे दिसणे, बोलणे, पेहराव, दागदागिने, रितीरिवाज, आजूबाजूचा प्रदेश, घरे, खाणेपिणे, शस्त्रास्त्रे.. त्या काळातलीच दिसायला हवीत हा एक मुलभूत नियम. नेमकी इथेच भल्या भल्या निर्मात्यांची गोची होते आणि चित्रपट मुळातूनच फ़सतो.
आपल्याकडे आधी मुळात साहित्य आणि चित्रपटांमधून ऐतिहासिकतेच्या नावाखाली काल्पनिक व्यक्तिरेखा जन्माला घालून, त्यांची खरीखोटी प्रेमप्रकरणे रंगवण्यातच आपली प्रतिभा खर्च करण्याची लेखकांना, दिग्दर्शकांना भयंकर हौस. जे ऐतिहासिक सिनेमे बनले त्यात ’कल्पनेचे स्वातंत्र्य’ घेण्याची पुरेपूर मुभा निर्माता दिग्दर्शक बिदिक्कतपणे स्वत:हून घेतात. संशोधन आपल्या सोयीने करतात. त्यामुळे पिरिअड फ़िल्म हा चित्रप्रकार दर्जा चा निकष लावता फ़ारसा उच्च पातळीवर पोचू शकत नाही. लोकप्रिय ऐतिहासिक सिनेमे तरीही बरेच निघतात, गाजतातही.
ऐतिहासिक विषयांवर आधारीत चित्रपट भारतातल्या सर्व भाषांमधे बनतात. विशेषत: हिंदी चित्रपट निर्मात्यांचा तर तो लाडका विषय. जगज्जेता सिकंदर, मुघल राजवटीतले राजे, खास करुन अकबर, ताजमहाल बांधणारा शाहजहान हे विषय दिग्दर्शकांमधे सर्वकालीन लोकप्रिय. कारण त्यात शौर्य आणि प्रेमाचं नाट्य पुरेपूर दाखवता येतं हे तर आहेच पण मुस्लिम काळातला पोषाख, वातावरण दाखवणं फ़ारसं कठीण, आव्हानात्मक नाही. मोगले आझम, अनारकली, ताज-महल, जोधा अकबर, रझिया सुलताना असे अनेक भव्य, ऐतिहासिक चित्रपट बनले, गाजले.
काही वेगळ्या पिरिअड फ़िल्म्स बनल्या त्यात जुनून, शतरंज के खिलाडी, लगान, गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, उमराव जान, हे राम, गदर, पिंजार, १९४२-अर्थ, झुबेदा यांचा उल्लेख करायला हवा.
भिन्न दृष्टीकोनांच्या, विचारांच्या दिग्दर्शकांनी ऐतिहासिक विषयांच्या मोहात पडून पिरिअड फ़िल्म्स केल्या. दिग्दर्शकाने ऐतिहासिक विषयाला प्रामाणिक रहात चित्रपट बनवला तर तो वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदारच बनतो, व्यावसायिक, वास्तववादी असा काही भेद याबाबतीत नाही. हे दिसून आलं दोन ठळक उदाहरणांवरुन. के.आसिफ़सारख्या भव्य स्वप्ने बघणा-या दिग्दर्शकाने ऐतिहासिक चित्रपट काढायचं ठरवलं तेव्हा मोगले आझम सारखा लार्जर दॅन लाइफ़ चित्रपट बनला, सत्यजित रेंसारख्या वास्तववादी दिग्दर्शकाला ऐतिहासिक विषयाचा मोह पडला तेव्हा शतरंज के खिलाडी बनला. दोन्ही आपापल्या परीने दर्जेदार आणि विषयाला प्रामाणिक रहाणारे ठरले.
मोगलकालीन विषयांइतकाच अजून एक विषय ज्यावर सर्वाधिक पिरिअड फ़िल्म्स बनल्या तो विषय म्हणजे ’गौतम बुद्ध’. या विषयाचा मोह भारतीयच नव्हे, आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांनाही पडला. हिंदीमधे या विषयावर बनलेले महत्वाचे चित्रपट- सिद्धार्थ, अशोका, गौतम बुद्ध, चित्रलेखा, आम्रपाली.
त्यापैकी मला अनेक कारणांनी आवडलेला चित्रपट ’आम्रपाली’.
आम्रपाली कथा आहे वैशाली नगरीच्या एका नगरवधूची, जिला राजनर्तकीचा दर्जा मिळालेला असतो (वैजयंतीमाला).
मगध साम्राज्याचा राजा अजातशत्रू (सुनील दत्त) चक्रवर्ती सम्राट बनण्याची स्वप्ने बघत आहे. सगळी राज्ये त्याच्या अंमलाखाली आली आहेत, एक वैशाली सोडून. वैशालीचा पाडाव करायला तो उत्सुक आहे. मात्र वैशाली जिंकणे त्याला वाटते तेव्हढं सोपं नाही. अजातशत्रूच्या वडिलांनीही अनेक वेळा वैशालीवर स्वारी केली पण त्यांना ती काबिज करता आली नव्हती. अजातशत्रूची आई म्हणजेच मगध देशाची महाराणी (मृदुला राणी) ही मुळात वैशाली नगरीची राजकन्या असते. ती अजातशत्रूला याची आठवण करुन देते आणि वैशालीवर चालून जाण्याचा विचार सोडून द्यायला सांगते. युद्धात सहभागी व्हायचंही नाकारते. वैशालीचे सैनिक आणि नागरिक कोणा राजाचा अहंकार जपण्याकरता लढत नाहीत, ते स्वातंत्राची जपणूक करण्यासाठी लढतात, प्राण पणाला लावतात, त्यांना हरवणे म्हणूनच शक्य नाही असं ती त्याला बजावते.
खरं तर मगधेचं सैन्यही सततच्या युद्धांमुळे थकलेलं असतं. सेनापती वीर (प्रेमनाथ) अजातशत्रूची विनवणी करतो की सैन्याला थोडी विश्रांती घेऊ द्यावी, राजज्योतिषीही हा काळ अनुकूल नाही असं सांगत त्याला सावध करतो पण अजातशत्रू सर्वांचे सांगणे धुडकावून लावतो आणि वैशालीवर हल्ला करतो. वैशाली कडवा प्रतिकार करते आणि मगध सैन्याला हार पत्करावी लागते.
अजातशत्रू वैशालीच्या हद्दीत सैनिकांशी लढताना घायाळ होतो आणि स्वत:चा जीव बचावण्याकरता एका मृत वैशाली सैनिकाचा वेश अंगावर चढवतो. नगरामधे ज्या कुटीत तो शिरतो ती असते आम्रपालीची. सुंदर, नृत्यप्रविण आम्रपाली प्रखर देशाभिमानी असते, वैशाली जिंकणारच असा तिचा ठाम विश्वास असतो. वैशालीच्या सैनिकाच्या वेशातल्या जखमी अजातशत्रूला ती घरात घेते, त्याच्या छातीत घुसलेला बाण उपसते, त्याची सेवासुश्रूशा करते. बेहोशीच्या ग्लानीत अजातशत्रू तिच्या घरी मुक्काम करतो. दोघांमधे आकर्षणाची ठिणगी पडते.
वैशाली नगरीमधे विजयोत्सव साजरा होत असतो, अजातशत्रूला आपल्या पराभवाचा जल्लोष पहाताना वेदना होतात पण तो काही करु शकत नाही. अजातशत्रूच्या सुरक्षिततेबद्दल मगध महाराणी, सेनापती तिकडे काळजीत असतात मात्र इथे तो आम्रपालीच्या प्रेमात गुंतून जाऊन तिच्या घरिच मुक्काम वाढवतो.
दरम्यान वैशालीचा फ़ितूर सेनापती बदभद्र (के.एन.सिंग) त्याच्याशी संगनमत करतो आणि ते दोघे मिळून वैशालीच्या पराभवाची कावेबाज योजना आखतात. वैशालीच्या सैनिकांचा तनखा कमी करुन, प्रशिक्षण काढून घेऊन, मद्याचे व्यसन लावून सैन्याला खिळखिळ करण्याची, मनोधैर्य संपवण्याची त्यांची योजना आखणे चालू असते.
मगधेचा सेनापती अजातशत्रूला आपल्या कर्तव्याची आठवण करुन देत मगधेला परतण्याची विनंती करतो. स्त्रीच्या मोहात अडकून तो फ़ार मोठा धोका पत्करत आहे असंही सांगतो. अजातशत्रू अर्थातच त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला आम्रपाली प्रेमाखातर वैशालीचा त्याग करुन मगधेला आपलं म्हणेल अशी खात्री असते.
आम्रपाली या सगळ्याबद्दल अनभिद्न्य असते, तिला अजातशत्रूचं खरं नावही माहीत नसतं पण या अनाम सैनिकाच्या प्रेमात, त्याच्यावर संपूर्ण विश्वासाने ती विसंबून असते. लोकनिंदेची पर्वा न करता आपलं सर्वस्व त्याच्या हवाली करण्याची तिची तयारी असते.
मात्र त्याच रात्री तिचा गुरुबंधू, जो शिल्पकार असतो, तो सेनापती आणि अजातशत्रूचं बोलणं ऐकतो आणि आम्रपालीला सत्य कथन करतो. आम्रपाली अजातशत्रूला याचा जाब विचारते, अजातशत्रू तिला त्याच्यासोबत विवाह करुन मगधेची महाराणी बनण्याची विनंती करतो. आम्रपाली नकार देते मात्र त्यातून काही निष्पन्न व्हायच्या आतच अजातशत्रूला मगध देशात परतायला लागतं कारण त्याच्या आईचा, महाराणींचा मृत्यू झालेला असतो.
आम्रपाली निराश अवस्थेत वैशालीच्या राजाला विनंती करते की तिचं राजनर्तकी पद काढून घेण्यात यावं. सर्वांना धक्का बसतो, ते तिला विनवतात, कारण विचारतात. तिच्याजवळ सांगण्यासारखे कोणतेच कारण नसते. दूर निघून जावेसे वाटत आहे इतकेच ती कळवळून त्यांना सांगते ज्यावर त्यांचा अर्थातच विश्वास बसत नाही. तिचे त्या अनाम सैनिकासोबतचे प्रेमप्रकरण सर्वांना माहीत असते. मात्र ती तो सैनिक निघून गेला इतकंच सांगते.
इकडे मगध देशात अजातशत्रूही नैराश्यात असतो. मातेचा शोक, आम्रपालीने वैशाली सोडून त्याच्यासोबत जाण्याचे नाकारल्याने आलेले नैराश्य यामुळे त्याचे राज्यकारभाराकडे लक्ष नसते. त्याचा सेनापती अखेर आम्रपालीला मनवण्याकरता वैशालीत जातो, तिची विनवणी करतो पण आम्रपाली वैशालीशी एकनिष्ठ असते. ती पुन्हा नकार देते. सेनापती तिचा नकार घेऊन परतत असताना वैशालीच्या हेरांच्या ताब्यात जातो. वैशालीच्या राजाला कळते की तो अनाम सैनिक म्हणजे अजातशत्रू होता. आम्रपालीवर देशद्रोहाचा आरोप ठेवला जातो. मृत्यूदंडाची सजा होऊन तिची रवानगी काळकोठडीत होते. अजातशत्रूच्या सेनापतीचा शिरच्छेद आम्रपालीच्या समोर करण्यात येतो. आपल्यावरच्या अन्यायाने व्यथित झालेली आम्रपाली मृत्यूच्या त्या भीषण दर्शनाने हादरते.
आम्रपाली कैदेत आहे, तिच्यावर अन्याय झाला हे कळल्यावर अजातशत्रू चवताळतो आणि सर्व शक्तीनिशी वैशालीवर तुटून पडतो. यावेळी वैशाली हरते. अजातशत्रू वैशालीचा नुसता पाडाव करत नाही तर तिला बेचिराख करुन टाकतो. मार्गात आलेल्यांना निर्घृणपणे कापून काढतो. नगरीवर प्रेतकळा पसरते. उध्वस्त स्मशानासारखी वैशाली नगरीची अवस्था होते. अजातशत्रू तुरुंगातून आम्रपालीला बाहेर काढतो आणि मोठ्या अभिमानाने तिला दाखवतो की बघ मी तुझ्या प्रेमाखातर, तुझ्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केला त्यांची काय अवस्था केली आहे. आता तु मगध देशाच्या चक्रवर्ती सम्राटाची महाराणी बनून सुखाने राज्य करशील.
तो बोलत असतो आणि आम्रपाली सुन्नपणे समोरचा तो नरसंहार आणि विध्वंस पहात असते. आपल्या प्रेमाची अशी भीषण परिणिती झालेली पाहून ती वैफ़ल्यग्रस्त होते. दु:खाने मुळापासून हलते. अंतर्बाह्य बदलून जाते आणि शेवटी तथागताला शरण जाते.
आपल्या अहंकारातून बाहेर पडलेल्या अजातशत्रूलाही आपल्या स्वार्थी प्रेमाच्या पलीकडचे दिसायला लागते, आम्रपालीच्या मन:स्थितीची त्याला जाणीव होते आणि तोही पश्चात्ताप होऊन तिच्या मार्गाने जात बुद्धाच्या शिकवणुकीसमोर नतमस्तक होतो.
१९६६ साली बनलेला ’आम्रपाली’ हा चित्रपट अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि देखणा. पिरिअड फ़िल्म्सच्या सर्व लक्षणांनी परिपूर्ण. मोगले आझम इतका खर्चिक आणि चर्चित नसला, तरी निर्मितीमूल्य, कलात्मकता आणि ऑथेन्टिसिटीमधे हा चित्रपट तोडीस तोड उतरला.
आम्रपालीची ही पटकथा पडद्यावर साकार होते अत्यंत नेत्रसुखद, श्रवणीय पद्धतीने. अर्थातच यात सिंहाचा वाटा होता वेशभुषाकार भानू अथैय्या आणि कलादिग्दर्शक एम.आर. आचरेकर यांचा. या दोन्ही अत्यंत गुणी महाराष्ट्रीय कलावंताच्या शिरपेचातला ’आम्रपाली’ हा मानाचा तुरा.
अभिनय, नृत्य, संगित, वेशभूषा, संवाद, पटकथा यामधेही चित्रपट अव्वल होता. दुर्दैवाने ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी म्हणावे तसे व्यावसायिक यश या चित्रपटाला लाभले नाही. भावनिक तीव्रतेत कदाचित हा चित्रपट कमी पडला असावा असं आता पुन्हा हा चित्रपट पहाताना जाणवून गेले. सामान्य प्रेक्षकांनी उदार आश्रय दिला नाही तरी समिक्षकांनी, कलारसिकांनी चित्रपट नावाजला. आम्रपाली हिंदी चित्रपटांच्या इतिहासात एक दर्जेदार, क्लासिक पिरिअड फ़िल्म म्हणून खास वैशिष्ट्यपूर्ण स्थान राखून आहे.
वैजयंतीमाला ’आम्रपाली’च्या भूमिकेत अप्रतिमरित्या शोभली. व्यक्तिरेखा सशक्त होती. तिचा अभिनय भूमिकेला साजेसा नाट्यपूर्ण, संवेदनशील होता. वैजयंतीमालाच्या सौंदर्य, अभिनय, नृत्यकौशल्याची अत्युच्च पातळी आम्रपालीत दिसली. भरतनाट्यममधे पारंगत असल्याने नृत्यदिग्दर्शक गोपीकृष्ण यांच्या कठीण नृत्यमुद्रा तिने लिलया साकारल्या. तिच्या नृत्यांमधे वीजेचे चापल्य होतेच शिवाय निसर्गदत्त सुंदर अभिनयाचीही साथ असल्याने नृत्यातल्या बारीकसारीक भावमुद्राही तिने अतिशय तन्मयतेनं साकारल्या. नील गगन की छावोंमे, दिन रैन गले से मिलता है.. दिल पंछी बन उड जाते है. हम खोये खोये रहते है.. हे नृत्य याचे उत्कृष्ट उदाहरण. राजनर्तिकेचा सन्मान मिळाल्यावरचे आम्रपालीचे दरबारातील हे पहिले नृत्य. तिच्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याची तारीफ़ ऐकलेले सर्वजण उत्सुकतेने तिच्यावर नजर खिळवून आहेत. ती नृत्यमुद्रा घ्यायला सज्ज आहे, तिच्या गळ्यामधून सूरही उमटताहेत पण पावले पदन्यास करायचे नाकारत आहेत, डोळे खिळले आहेत राजद्वारावर. तिचा प्रियकर सैनिक तिथे यावा, त्याने हे नृत्य बघावे अशी व्याकुळ अपेक्षा तिच्या नजरेत आहे. शास्त्रीय नृत्यातल्या मुद्राभिनयाची, हस्तमुद्रांची इतकी विलोभनीय अदाकारी वैजयंतीमालाने यावेळी साकारली की नुसते बघत रहावे. आणि त्यावेळी ती दिसतेही अत्यंत देखणी. तिचा पोषाख, गळ्यातले, हातातले, कमरेवरचे आणि सर्वात सुंदर केसांमधले दागिने.. नजर हटत नाही इतके अप्रतिम.
केवळ याच गाण्यात नाही, आणि फ़क्त वैजयंतीच्याच अंगावरचे नाही, तर अजातशत्रूच्या म्हणजे सुनील दत्तच्या अंगावरचे दागिनेही सुंदर आहेत. याआधी (आणि नंतरही) कोणताही पुरुष इतके वेगवेगळे दागिने अंगावर चढवून, धोतर-उत्तरीय अशा वेशात इतका देखणा दिसू शकला नाही. खरं तर सुनील दत्त मर्दानी सौंदर्याचा पुतळा वगैरे म्हणून नक्कीच प्रसिद्ध नव्हता. पण भानू अथैयाच्या वेशभुषेत तो शब्दश: आकर्षक दिसला. (जिज्ञासुंनी याकरता ’तडप ये दिन रात की..’ गाणे काळजीपूर्वक पहावे.).
बौद्धकालीन दागदागिने आणि पेहरावाची ऑथेन्टिसिटी येण्याकरता भानूजींनी अथक मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. संदर्भपुस्तकांवर अवलंबून न रहाता त्यांनी थेट अजिंठा लेण्यांकडे धाव घेतली. तिथे मुक्काम ठोकून भित्तीचित्रांवरुन स्वत: रेखाचित्रे बनवली. त्यातूनच इतके अद्वितीय घडणीचे दागिने वैजयंतीमालाच्या अंगावर चढले.
नुसते नायक नायिकांकरताच नाही, दरबारातील अधिकारी, सामान्य नागरीक, शिल्पकार, गायक, सैनिक, त्यातही सेनापती वेगळा, साधा सैनिक वेगळा, प्रत्येकाची वेशभुषा कालसुसंगत. वैजयंतीमाला आधी फ़क्त नगरवधू असताना आणि मग राजनर्तिका झाल्यावरच्या तिच्या केशवेशभुषेतला फ़रक, ती दरबारात असतानाचे भरजरी वस्त्रालंकार वेगळे, घरात वावरताना तिच्या अंगावरचा साधा साजशृंगार, झोपतेवेळी अंगावरचे सुती कपडे, दागिने उतरवलेले, इतकेच नव्हे तर घरात असताना कपड्यांचे रंगही सौम्य, म्यूटेड, एरवी दरबारात झगमगीत लाल वगैरे. हे बारीकसारीक तपशील भानूजींनी केलेल्या केशवेशभूषेत निरखून पहाण्यात मजा असते.
वैजयंतीमालाने राजनर्तिकेचा सार्थ अभिमान, प्रेयसीची व्याकुळता, आपल्या देशप्रेमावर ठाम रहातानाचा निश्चय, शेवटची वैफ़ल्यग्रस्तता, दु:ख, करुणा, बुद्धाला शरण जातानाची विनम्रता सुंदर रित्या अभिनीत केली. तिला पूर्ण मार्क्स. इतरांच्या अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं तर सुनील दत्तने भूमिकेला साजेसा जोश आपल्या देहबोलीमधे, मुद्राभिनयात आणि आवाजात नक्कीच आणला. अजातशत्रूची स्वकेन्द्रित वृत्ती, दुराभिमान, क्रौर्यतेकडे झुकणारा निष्ठूरपणा, आम्रपालीवरच्या प्रेमातही त्याच्या वागणुकीतला न लपणारा अहंकार या छटा आपल्या अभिनयातून दाखवण्यात सुनील दत्त कुठेही कमी पडत नाही, तरीही तो सुजाता किंवा मेरा सायासारख्या हळव्या भूमिकांमधे जास्त शोभून दिसतो हे वैयक्तिक मत. संपूर्णपणे नायिकाप्रधान अशा या चित्रपटात भूमिका स्विकारु शकणा-या अभिनेत्यांच्या यादीमधे सुनील दत्तची केलेली निवड सर्वात योग्य होती.
सेनापतींच्या भूमिकेत प्रेमनाथ, के.एन.सिंग प्रभृतींनी आपापल्या व्यक्तिरेखेला साजेशी कामे केली. आम्रपालीच्या गुरुंच्या, कुलपती महंतांच्या भूमिकेत गजानन जागिरदारांना लहान पण महत्वाची भूमिका आहे.
आम्रपालीमधले संस्कृतप्रचूर संवाद (अर्जून देव रश्क आणि बलबीर सिंग) मोगले आझममधल्या उर्दू संवादांइतके गाजले नसले तरी परिणामकारक आणि अर्थपूर्ण होते.
आम्रपाली चित्रपटात नेपथ्य महत्वाची भूमिका बजावते. चित्रकार आचरेकरांचे कलादिग्दर्शन अत्यंत अभिरुचीसंपन्न असे आहे. राजमहालांचे अंतर्भाग, दरबार योग्य त्या भव्यतेसह मात्र कुठेही भडकपणा न दाखवणारे. नकोशी वाटणारी कलाकुसर कुठेही नाही. अजातशत्रूचा महाप्रचंड पुतळा, त्याच्या पराभवानंतर वैशालीचे नागरिक जाळतात तो प्रसंग थरारक वाटतो. खांबांची उभारणी, आम्रपालीचे साधे घर, नगरातील रस्ते, चौक योग्य वातावरण निर्मिती करतात.
वैशालीवर हल्ला झाल्यावर नागरिकांची होणारी भयभीत अवस्था, त्यांच्या दिनक्रमात आलेला विस्कळीतपणा पहाताना शोलेतल्या वातावरणनिर्मितीचे स्फ़ुर्तीस्थान लक्षात येते. आम्रपालीचे छायाचित्रणही द्वारका दिवेचांचेच आहे. दिवेचांनी ज्या प्रकारे आम्रपालीचे कलर पॅलेट सुरुवातीला लाल-पिवळ्या रंगछटांमधले आणि नंतर जसजशी कथा गडद होत जाते तसे रंगही गडद, काळसर छटांमधले करत नेले आहेत ते थोर.
आम्रपालीचे संगीत शंकर जयकिशन यांचे होते, आणि सर्व गाणी म्हणजे चार होती, ती लता मंगेशकरांनीच गायली. एसजे आणि लता या अद्वितीय कॉम्बिनेशनच्या असंख्य गाण्यांपैकी आम्रपालीचे संगीत आणि गाणी पहिल्या पाचात स्थान मिळवणारे. वाद्यमेळ, स्वर या दोन्हींचा अपूर्व संगम आम्रपालीतल्या शास्त्रोक्त सुरावटींमधे आणि पार्श्वसंगितात दिसून येतो. शैलेन्द्रच्या गीतरचनेबद्दल वेगळं सांगायची गरजच नाही. साधी सोपी, प्रवाही आणि तरीही सखोल, अर्थसघन गीतरचना हे शैलेन्द्रचं वैशिष्ट्य आम्रपालीतल्या सर्व गाण्यांमधे दिसलं. नील गगन की छाओंमें, तडप ये दिन रात की, जाओ रे जोगी तुम, तुम्हे याद करते करते.. ही अप्रतिम चार गाणी. त्यापैकी माझं सर्वात आवडतं गाण- तुम्हे याद करते करते.. लताचा आवाज आणि वैजयंतीमाला या दोन्हीपैकी जास्त सेन्शुअस काय असा प्रश्न पडावा.
मी पाहिलेल्या डिव्हिडीत जाओ रे जोगी तुम गाणं कापलेलं होतं. का? माहीत नाही.
असं म्हणतात की आम्रपालीला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही याचा धक्का बसून प्रत्यक्ष आयुष्यातही वैजयंतीमाला वैफ़ल्यग्रस्त झाली आणि तिने चित्रपटसंन्यास घेण्याचे ठरवले. बी.आर.चोप्रांनी तिचे मन वळवण्याकरता खूप प्रयत्न केले.
दिग्दर्शक लेख टंडनही नंतर कधी फ़ारशी चमक दाखवू शकले नाहीत.
आम्रपालीमधली युद्धाची दृश्ये गाजली. आणि ती खरोखरच चांगली आहेत. मला तर ती जोधा अकबरपेक्षाही जास्त ऑथेन्टिक वाटली. दिग्दर्शक लेख टंडन यांनी त्याकरता बरिच मेहनत घेतली होती. भारतीय संरक्षण दलातील रणगाडे आणि जवानांचा युद्धात प्रत्यक्ष सहभागही होता.
प्रत्यक्ष आम्रपाली जरी खरीखुरी ऐतिहासिक व्यक्तिरेखा असली तरी मगधेचा राजा आणि तिचा प्रियकर होता बिंबिसार राजा. असं म्हणतात आम्रपालीने त्याच्या पुत्रालाही जन्म दिला होता आणि त्याचे नाव अजातशत्रू होते. आम्रपाली चित्रपटात हा बदल का केला गेला ते मात्र अनाकलनीय.
मजा वाटते अजातशत्रूच्या स्वभावातल्या वैशिष्ट्यपूर्ण पुरुषी छटेची. आम्रपालीची वैशालीबद्दलची काय भावना आहे हे अगदी पहिल्या भेटीपासून जाणून असणारा अजातशत्रू अगदी सहजपणे ठरवतो की आम्रपाली त्याच्याशी लग्न करुन, वैशालीशी द्रोह करुन मगध देशात येईल, तिथली महाराणी बनेलच. स्त्रीच्या मतांबाबतची ही पुरुषी बेपर्वाई किती सनातन आणि सार्वत्रिक. शेवटी त्याला तिची वेदना समजते पण तोपर्यंत व्हायचा तो विध्वंस होऊन गेलेला असतोच.
आजवर अनेक नायिकाप्रधान चित्रपट आले, सशक्त स्त्री व्यक्तिरेखाही पडद्यावर आल्या, परंतु प्रेमापेक्षाही आपले देशप्रेम महत्वाचे मानणारी, स्वत:ची एक ठाम राजकीय भूमिका असलेली आणि भावनिकतेमधे वाहून न जाता आपल्याला काय वाटते आहे ते निर्भिडपणे सम्राटाला सुनावणारी, बाह्यत: नाजूक, देखणी, हळवी कलावंत स्त्री मात्र मनातून अत्यंत कणखर अशी आम्रपालीची व्यक्तिरेखा बहुधा एकमेव.
अतिशय सुरेख आणि चपखल लिहिलं
अतिशय सुरेख आणि चपखल लिहिलं आहेस. अख्ख्या लेखाला अनुमोदन.
वैजयंतीमाला आणि सुनिल दत्त कधी नव्हे ते ह्या चित्रपटामध्ये मला आवडले. दिसायलाही आणि अभिनयही सुरेख जमला होता.
आहाहा.. शर्मिला..क्या याद
आहाहा.. शर्मिला..क्या याद दिलाई...
किती सुरेख विवचन केलंयस
आम्रपाली आणी चित्रलेखा... सो क्लोज टू द हार्ट!!!
"जाओ रे जोगी तुम गाणं कापलेलं होत"".. आई गं..
लेखांतून पडद्यामागच्या कलाकारांच्या खुबीही प्रकाशात आणतेस, तुझे विशेष कौतुक याबद्दल!!
नृत्यात वैजयंतीमाला सारख्या सुपर ग्रेस असणार्या फारच कमी नायिका लाभल्यात सिनेसृष्टीला..
माझाही अत्यंत आवडता चित्रपट.
माझाही अत्यंत आवडता चित्रपट. पोषाखी असूनही कुठेही भडक नव्हता.
एका गाण्याचा उल्लेख राहिला. हे गाणे फक्त कोरसने गायले आहे. आया मंगल त्योहार, लेके खुशिया हजार.
असा प्रयोग, माझ्या आठवणीतला एकमेव आहे.
सिनेमा नाही पाहिलाय हा पण
सिनेमा नाही पाहिलाय हा पण 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' हे प्रचंड आवडते - छायागीतच्या जमान्यापासून. तेच कापले तर कसे होणार? त्यात सुरवातीला जो हसण्याचा आवाज आहे तो अप्रतिमच.
नृत्यात वैजयंतीमाला सारख्या सुपर ग्रेस असणार्या फारच कमी नायिका लाभल्यात सिनेसृष्टीला >> +१००
नव्हता पाहिला आम्रपाली! आता
नव्हता पाहिला आम्रपाली! आता पहावाच लागेल
नेहमीप्रमाणेच छान परीक्षण!
शमा ताइ, काय सुंदर लिहितेस
शमा ताइ,
काय सुंदर लिहितेस गं, सुर्पब
एकदा 'गाइड" बद्दल लिहि ना. माझा आवडता चित्रपट आहे तो.
शर्मिला, या सिनेमातल्या
शर्मिला, या सिनेमातल्या नेपथ्याचा आणि वेषभूषेचा ऐतिहासिक वास्तवाशी फारसा काही संबंध नाहीये गं. वैजयंतीमाला सुंदर दिसते. भानू अथैयांनी मेहनतही खूप घेतली. पण घोळ असा आहे की आम्रपाली सिनेमाचा काळ इ.स पूर्व ६वं शतक आहे तर अजंठाचा काळ इ.स. नंतर ६वं शतक. दोन्हीच्या मधे हजार-बाराशे वर्षं अंतर आहे. त्यामुळे मला फार खुपतात त्यातले कपडे आणि दरबारचं नेपथ्य वगैरे गोष्टी. खांब वगैरे तर चक्क आणखी नंतरचे वाटतात. इ.स. १०००-१२०० चे .... त्याच्या तुलनेत उत्सवचं नेपथ्य फार वरच्या दर्जाचं होतं
बाकी, गाणी फारफार सुंदर.. कधी नव्हे ते सुनील दत्त सुसह्य दिसतो (पडोसन आणि मुझे जीने दो हे आणखी दोन सन्माननीय अपवाद). वैजयंतीमाला एरवी अति कृत्रिम अभिनय करणारी पण यात अगदी चपखल दिसते आम्रपाली म्हणून आणि तितकीच सहज...
वैजयंतीमाला आणि हेलन यांची
वैजयंतीमाला आणि हेलन यांची बहुधा नृत्य जुगलबंदी आहे या सिनेमात. त्यात नृत्य करताना पायाने रांगोळी काढतात असही आहे. ते गाणं फार सुरेख जमलय. आता आठवत नाही ती गोष्ट वेगळी.
कौतुक, या नाचाला गाणे नाही.
कौतुक, या नाचाला गाणे नाही. जाओ रे जोगी वर पण वैजयंतीमाला नाही नाचलीय.
भला ये रोग है कैसा, आणि तूम्हे याद करते करते वर पण तिचा नाच नाही..
हेलन आणि वैजयंतीमाला यांची जुगलबंदी, डॉ. विद्या (शिकलेली बायको ) आणि प्रिन्स (गाणे: मुकाबला हमसे ना करो) वर आहे.
मस्त लेख.
मस्त लेख.
अप्रतिम लिहीलाय हाही लेख.
अप्रतिम लिहीलाय हाही लेख. सिनेमा नाही पाहिलाय, काही गाणी छायागीतात पाहिलीत.
धन्स शर्मिला खुप पुर्वी,
धन्स शर्मिला
खुप पुर्वी, म्हणजे आठवी-नववीत असताना बघीतला होता हा चित्रपट. त्यामुले त्यावेळी त्याची शक्तीस्थळे, सौंदर्यस्थळे एवढी कळली नव्हती. आता हा लेख वाचल्यावर पुन्हा बघेन चित्रपट.
फार चांगला सीनेमा!!!! कधी
फार चांगला सीनेमा!!!! कधी नव्हे तो सुनील दत्त बघवतो. वैजयंतीमाला तर सुरेख. नाच गाणी सगळच छान.
शर्मिला आपला लेख खुप मस्त आहे. तुमची शैली छान आहे. त्यात तुम्ही लिहिल्या प्रमाणे नेपथ्य आणि वेषभुषा हे खरे हीरो आहेत. मला तुमचं म्हणणं पुर्ण पणे पटलं. मला कौतुक त्या दिग्दर्शकाचं वाटतं की त्याने १९६६ साली जेंव्हा सगळे लव्ह स्टोर्या बनवत होते तेंव्हा वैजयंती आणि सुनील दत्त हे रेअर आणि अजीबात न जुळणारं कॉम्बो घेउन इतका उजवा सीनेमा बनवला. ते ही अशा इतिहासा वर जो फारसा फेमस नाही. किंवा न माहित असलेला आहे.
आता वरदाची पोस्ट वाचुन त्या लेखात उल्लेख केलेल्या गोष्टीं मधली हवाच गेली. कारण वेषभुषे च्या काळात १००० वर्षांचा फरक पडला. तिचं म्हणणं पटतं. पण पुर्वी जेंव्हा पीरीयेड फिल्म बनत तेंव्हा सत्या बरोबरच लोकांना काय बघायला आवडेल ह्याचा विचार जास्त दिसतो. वैजयंतीमाला सारखी टॉप ची हीरॉइन घेवुन जर टंडन साहेबांनी त्या काळातलं सगळ खरं खरं उभ केलं असतं तर आर्धा अधीक चित्रपट अंधारात शुट करायला लागला असता. आणि फिल्म कायमची डब्यात गेली असती.
शेवटी हा एक कमर्शीयल सीनेमा आहे हे विसरुन चालणार नाही. एकंदर भारतिय प्रेक्षकाची रुची लक्षात घेवुन त्यातल्या त्यात दर्शनिय आणि भव्य सिनेमा बनवण्याचा उद्देश ह्यात दिसुन येतो. त्या काळात येवढे धाडस त्यांनी केले हेच खुप. आणि त्यातही भानु अथैयां सारख्या वेषभुषाकाराला घेवुन त्यांनी त्यांचे वेगळे पण दाखवुन दिले आहे.
ह्यातल्या वैजयंतीमालाच्या देह प्रदर्शना वर टीकेची झोड उठली होती.
उत्सव बद्दल म्हणाल तर तो बनवण्याचा उद्देशच वेगळा होता. त्यात बरोबर उलटे झाले. नेपथ्य, वेषभुषा इ.इ. करता करता पटकथे कडे दुर्लक्ष झालं. बाकी गाणी छान, कलाकार छान सगळं सुरेख. पण मुळात गोष्टच नीट बांधलेली नाही. त्या मुळे केलेली मेहेनत फुकट गेली. त्यातला वात्सायन तर जोकर वाटतो. आणि नीना गुप्ताचे कामुक सीन अगदीच उगाचच वाटतात.
मीरा, मला मान्य आहे की <<नी
मीरा, मला मान्य आहे की <<नी त्या काळातलं सगळ खरं खरं उभ केलं असतं तर आर्धा अधीक चित्रपट अंधारात शुट करायला लागला असता.>>
सिनेमा दृष्टीसुखद आहे हे मला मान्यच आहे. आणि नेपथ्याची थीम सगळे बौद्ध स्थापत्यातले घटक वापरते तेही छान वाटतं बघायला. फक्त ऐतिहासिकतेशी नातं फारसं नाही असं म्हणायचंय...
वरदा +१
वरदा +१
वरदा, कुठल्या तरी काळाशी का
वरदा, कुठल्या तरी काळाशी का होइना प्रामाणिक आहेत ना??
तू असोका बघितला आहेस का? त्याबद्दलचे तुझे मत ऐकायला आवडेल.
मी हा पिक्चर अजून पाहिला नाही. फक्त काही नृत्यांचे व्हीडीओ पाहिलेत. आता डीव्हीडी मिळते का बघेन. पण याच कथेवर मधू (रोजा फेम) एक टीव्ही सीरीयल केली होती. मला वाटतं हेमा मालिनी त्याची दिग्दर्शिका होती. मधूने त्यामधे अत्यंत सुंदर नृत्ये केली आहेत. आणि ती दिसते पण खूप छान.
मस्त लेख, पण हा काही आवर्जून
मस्त लेख, पण हा काही आवर्जून लेख लिहावा असा सिनेमा आहे असं वाटतं नाही.
@नंदिनी- असोका फक्त शाहरुखशी प्रामाणिक आहे!!!
उत्तम लेख. माझा पण आवडता
उत्तम लेख. माझा पण आवडता सिनेमा आहे. वैजू अगदी खास सुरेख दिसते. एकेक विभ्रम बघण्यासारखे. नेपथ्य व कला दिग्दर्शन पण आवडले. गाइड वर नक्की लिहा, आणि उत्सव वर पण.
एखाद्या स्त्रीचे पुरषा पेक्षाही आपल्या जन्मभूमीवर प्रेम असू शकते असे दाखवणे किती क्रांतिकारक.
परिक्षण छान जमलंय पण आम्रपाली
परिक्षण छान जमलंय पण आम्रपाली बघितलेला नाही. आता बघावाच लागेल असं दिसतंय.
'तुम्हें याद करते करते' माझंही आवडतं गाणं आहे.
छान >>एखाद्या स्त्रीचे पुरषा
छान
>>एखाद्या स्त्रीचे पुरषा पेक्षाही आपल्या जन्मभूमीवर प्रेम असू शकते असे दाखवणे किती क्रांतिकारक.
मला मला सानिया मिर्झाची आठवण झाली (उलट अर्थाने)
मी हा सिनेमा वीसेकवेळा पाहिला
मी हा सिनेमा वीसेकवेळा पाहिला असेल कारण ह्यातील सुरेल गाणी आणि वैजयंतीमालेचा नाच नजर खिळवून ठेवतो. लता मंगेशकरांनी अत्यंत आर्त आणि तन्मयतेनी सगळी गाणी गायलित. सगळी नृत्ये सुरेख आहेत. दोन नृत्यांना गाणे नाही. त्यापैकी पहिले नृत्य हे दोन नर्तिकांमधली जुगलबंदी असते. त्यात वैजयंतीमाला जिंकते आणि मग ती नगरवधू होते. शेवटचे नृत्यात मुद्राचा वापर आणि अत्यंत खोलवर दु:खाच प्रगटीकरण फक्त नाचण्यातून आणि हावभावातून केलेल आहे. खूप सारख सारख ते नृत्य पाहिल की आपणही दु:खाच्या डोहात शिरतो. वैजयंतिमाला अगदी वीजेच्या गतीने नाचते ते बघावयास फार फार आवडले.
बाकी कथा, महालाचा सेट वगैरे इतके प्राचिन नाही वाटले. बुद्धाला शरण जाण्याचा शेवटचा प्रसंग अजून थोडा विस्तारित करायचा होता.
वैजयंतीमालेचे शेवटचे वाक्य लक्षात राहते "घृणा ? मुझे किसीसे घृणा नही है! जब चारो और इतकी घृणा फैली हुई है!"
काही काही ठिकाणी वैजयंतीमालेचे हिन्दी फारचं दाक्षिणात्य पद्धतीचे वाटते.
काव्य म्हणून प्रियकराला "एक चन्द्र भी आनेवाला है..!" हे ऐकायला फार आवडले.
जावो रे जोगी.. हे गाणे का कापले हे एक कोडेच आहे. इतके सुरेल गाणे कुणी कापणे म्हणजे गायकावर अन्याय करणे आहे.
भानू अथैय्याने फक्त वैजयंतीमालेचे कपडे सुंदर बनवले. बाकी इतरांच्या दागदागिण्यांवर आणि कपड्यांवर फार मेहनत नाही घेतली गेली.
मला एक प्रश्न पडला -- ह्या लोकांनी अंकोर वाट ची मंदिरे का नाही अभ्यासली. इतक्या हजार एक अप्सरा बघून नक्कीच तेंव्हाचे कपडे आणि दागदागिणे ह्यांचा अंदाज आला असता.
नंदिनी, मी अशोका पूर्ण
नंदिनी, मी अशोका पूर्ण पाहिलेला नाही. केवळ तुकड्यात काही सीन्स बघितलेत. ट्रेलर पाहूनच सगळा पाहायची माझी हिम्मतच नाही. अशोक म्हणजे शाहरुख खान? पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अस्फुट का कायशी म्हणतात ती किंकाळी फोडलेली... अशोक कुरुप होता हे मान्य पण बथ्थड निश्चितच नसणार. त्याने तो सिनेमा पाहिला असता तर धर्माशोक चा तो परत एकदा चण्डाशोक झाला असता बहुदा.
खरंतर डोक्यात 'भारत एक खोज' मधला ओम पुरीचा अशोक फिट्ट बसलाय. या जन्मात तरी तो तिथून हलेल असं वाटत नाही
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
वरदा, पूण अवश्य पहा. अचाट आणि
वरदा, पूण अवश्य पहा. अचाट आणि अतर्क्यसाठी तूच व्यवस्थित लिहू शकशील.
बी, अजिंठ्याच्या लेण्यामधे अप्सरा आहेत की रे.
बी, अंकोर वाट चा कालखंड
बी, अंकोर वाट चा कालखंड अजंठाच्याही नंतरचा आहे.
आणि भारतात इतकं शिल्पवैभव असताना नेपथ्यकार आग्नेय आशियाकडे कशाला जातील संदर्भासाठी? चित्रपटाची कथा घडणार बिहारमधे आणि दागदागिने, कपडे याचे संदर्भ कंबोडियातले???
मला एक प्रश्न पडला -- ह्या
मला एक प्रश्न पडला -- ह्या लोकांनी अंकोर वाट ची मंदिरे का नाही अभ्यासली. इतक्या हजार एक अप्सरा बघून नक्कीच तेंव्हाचे कपडे आणि दागदागिणे ह्यांचा अंदाज आला असता.>>>>>
अंकोर वाट ही मंदिरे १२ व्या शतकातली आहेत. आपण जो आम्रपाली सिनेमाचा काळ इ.स पूर्व ६वं शतक म्हणतो आहोत, त्या पेक्षा खुपच अलीकडची. त्या मानाने अजिंठा बरीच जुनी आहेत. मग आम्रपालीच्या काळातल्या फॅशन अंकोर वाट मध्ये कशा सापडतिल? त्यांच्यात नीदान १८०० वर्षांचा फरक आहे.
जाओ रे जोगी तूम जाओ रे कधी
जाओ रे जोगी तूम जाओ रे कधी कापले ?
त्यात दुसरी नर्तिका (बेला बोस) नृत्यातून काही प्रश्न विचारते आणि आम्रपाली गाण्यातून उत्तरे देते, असा
प्रसंग आहे.
आम्रपाली सारखीच कथा असणारा, मीनाकुमारीचा चित्रलेखा होता. त्यातलीही गाणी खुपच सुंदर होती.
काहे तरसाये
मन रे तू काहे ना धीर धरे
संसार से भागे फिरते हो
छा गये बादल, नील गगन पर
ए री जाने ना दूंगी
हि सगळी गाणी, त्यातलीच.
अंकोर वॅटची तुलना अजिंठ्याशी
अंकोर वॅटची तुलना अजिंठ्याशी होऊच च च शकत नाही कारण अंकोर अफाट आहे. केवळ अप्रतिम आहे. तिथल्या अप्सरा वेगळ्याच आहेत. मी नंतर फोटो टाकेन. स्वतंत्र्य लेखात. शक्यच नाही ही तुलना..
<<अंकोर वॅटची तुलना
<<अंकोर वॅटची तुलना अजिंठ्याशी होऊच च च शकत नाही>> कुणी कधी करतही नाही, बी!
सॉरी, परत एकदा अवांतर प्रतिसाद
ठिक आहे पण सॉरी नको!
ठिक आहे पण सॉरी नको!
लहानपणी डीडी वर बघितला होता
लहानपणी डीडी वर बघितला होता चित्रपट. आता अजिबात आठवत नाही. एक एक करुन यादी वाढत चालली आहे
'तुम्हें याद करते करते' >>> हे गाणं मला पण फार्फार आवडतं.
Pages