पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?

Submitted by तुमचा अभिषेक on 2 April, 2012 - 13:09

"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??",
"एक चिकन हंडी... पार्सल", मी मेनूकार्डवर नजर न टाकताच ऑर्डर केली.
"बस..."
बस? च्यायला ह्याला काय पडलीय आम्ही एक डिश मागवू नाहीतर दहा.. गुमान ऑर्डर घे आणि निघ ना.. पण त्याचीही काही चूक नव्हती. आज वर्षाची अखेरची रात्र होती, ३१ डिसेंबर.. सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील चायनीजच्या गाड्या देखील हाऊसफु्ल होत्या. लोक फॅमिलीच्या फॅमिली घेऊन घराबाहेर जेवायला पडले होते. तिथे माझ्या एका चिकन हंडीच्या ऑर्डरवर त्याची प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित नव्हती. सकाळपासून डोक्यात पित्त चढले नसते तर मी देखील आता मिथिलासोबत कुठल्याश्या थ्री-स्टार हॉटेलमध्ये रेशमी कबाबच्या जोडीने रेड वाईन रिचवत बसलेलो असतो..

"साथ मे रोटी नही चाहिये क्या?", त्याचा पुढचा प्रश्न..
‘नको रे बाबा, आईने चपात्या केल्यात घरी, आणि माझ्या नशिबी नुसतीच दालखिचडी आहे..’, मी नकारार्थी मान हलवत मनातल्या मनात बोललो. आजूबाजूला नजर टाकली तर सारे जण नुसते चिकन मटण वर तुटून पडले होते. नाक्यावरचे एक साधेसे रेस्टॉरंट, फॅमिलीटाईप वाटायचे नाही म्हणून मिथिलाबरोबर कधी जाणे झाले नव्हते. एकदोनदा फोनवर पार्सल काय ते मागवले होते. पण आज मात्र बरेच जण तिथे सहकुटुंब आलेले दिसत होते. त्यांना हसत-खिदळत खाताना पाहून क्षणभर त्यांचा हेवा वाटला.

"और थंडा वगैरे कुछ..?", अजून याचे होतेच का, साला मागेच पडला होता. उगाच असे वाटले की त्याची नजर सांगतेय, ‘एवढे चांगले नवीन वर्षाचे ओकेजन आहे आणि हा चिकट एवढीशी ऑर्डर करतोय.’ आता मला काहीच नको म्हणून ठणकावून सांगावेसे वाटले, पण पुन्हा एकदा फक्त मुंडी हलवली. अर्थात नकारार्थी..

ऑर्डर दिल्यावर आता त्या गर्दीत जास्त वेळ उभे राहणे शक्य नव्हते. छोटीशीच असली तर आज किमान वीस-पंचवीस मिनिटे तरी लागली असती. तसेही मिथ माझी वाट बघत बाहेर उभी होती. बाहेर आलो तर बाईसाहेब कुठे दिसल्या नाहीत. आजूबाजूला नजर टाकली तर एका आईसक्रीमच्या दुकानाजवळ पोहोचल्या होत्या. अर्थात, घेणे शक्य नव्हते. कालपासून तिलाही खोकला झाला होता. तरीही नजर मात्र तिथेच लागली होती. मी काय ते समजलो. मुद्दाम जवळ जाऊन विचारले, "काय बाप्पू.. काय बघतेस?", "जळतेय रे", ती फटकन उत्तरली. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो.

"चल तुला पाणीपुरी खिलवतो" तिचे लक्ष तिथून विचलित करायला म्हणून मी म्हणालो. खरे तर पाणीपुरी ही मिथिलाची फेवरेट असली तरी ही वेळ नक्कीच पाणीपुरी खायची नव्हती. पण खायला तयार झाली. फारशी गर्दी नव्हती ठेल्यावर. बाजूची पावभाजीची गाडी मात्र बर्यापैकी गर्दी राखून होती. पाणीपुरीपेक्षा त्या भाजीचाच वास मस्त नाकात शिरत होता. लहानपणी अश्या गांड्यांवर बर्याचदा खाणे व्हायचे. तेव्हा बजेटही एवढेच असायचे की या गाड्याच परवडाव्यात. आजही काही तिथे वेगळे चित्र नव्हते. काही टॅक्सी ड्रायव्हर, रोजगारी करणारे वगळता लहान मुलांचेच ग्रूप जमले होते. तेवढ्यात दोन-तीन लहान मुलांचा गोंगाट कानावर पडला. त्या आजूबाजुच्या कोलाहलातही तो आवाज गोड वाटला. कारणही तसेच होते. आज आई पावभाजी खाऊ घालणार म्हणून स्वारी खुश होती. एक मुलगा जवळच्या खांबाला लावलेला बोर्ड मोठ्या आवाजात वाचत होता.. बटर पावभाजी, चीज पावभाजी, पनीर पावभाजी... एकेक नाव घेऊन त्याचे, ‘आई हे काय असते ग, आई ते काय असते ग’, चालू होते. आई काहीच उत्तर देत नव्हती. जे घ्यायचेच नाही ते उगाच मुलांच्या मनात भरवा कशाला, असा साधासरळ हिशोब होता त्या माऊलीचा. उगाच एखाद्या दिवशी बटर, चीज वगैरे घेतले आणि मुलांना त्याची चटक लागली तर दरवेळी तेच मागतील ही भितीही होतीच. त्यातला एक लहान भाऊ नुसताच आईचा पदर पकडून उड्या मारत होता. त्यांची ताई वयाने त्यांच्यामानाने मोठी दिसत होती, पण तिचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मगाशी त्या हॉटेलमध्ये हसत खिदळत गप्पा मारत मटणावर ताव मारणारे आणि आता आपण गाडीवरची पावभाजी खाणार आहोत या निव्वळ कल्पनेनेच उजळलेले तीन चेहरे. पण या चेहर्यांवरील आनंद पाहताना मात्र मला त्यांचा हेवा वाटत नव्हता. उलट नकळत मन भूतकाळात रमले.

मी एकुलता एक असल्याने सख्ख्या भावंडांचे सुख कधी लाभले नाही पण शाळेत असताना सुट्ट्या पडल्या की माझी २-३ चुलत भावंडे आमच्याकडे राहायला यायची. जेमतेम दहा-बारा रुपये असायचे आम्हा सर्वांकडे मिळून आणि त्याच्या जीवावर सारी मे महिन्याची सुट्टी काढायचे आव्हान. त्यामध्ये मग पंचवीस-पंचवीस पैशाला मिळणारी चिंच-बोरे, कधी ऐश करावीशी वाटली तर आठाण्याचा बर्फाचा गोळा, रोज रोज ही ऐश करू शकत नाही म्हणून चार आण्याच्या पाच या दराने मिळणार्या लिंबाच्या गोळ्या पाण्यात विरघळवून केलेले सरबत, एखादे रुपया-दोन रुपयाचे बक्षीस लागेल आणि पैसे वाढतील या आशेने दहा-दहा पैशाच्या काढलेल्या सोरटी.. सारे काही एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेले. थोडा मोठा झालो, प्राथमिक शाळेतून दादरच्या एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेत जाऊ लागलो तसा पॉकेटमनी वाढला. गाडीभाडे आणि खाऊचे मिळून दिवसाला चार रुपये मिळू लागले. पण बसचे येण्याजाण्याचे तीन रुपये काढले तर खाण्यासाठी एक रुपया शिल्लक राहायचा. त्यात शाळेबाहेरच्या गाडीवर मिळणारा दोन रुपयाचा वडापाव माझ्या आवडीचा म्हणून एकदोन दिवस काही न खाता पैसे साठवले जायचे. कधीतरी जवळच्या एखाद्या ठिकाणी चालत जायचे आणि आईकडून बदल्यात आठ आणे मिळवायचे. ही बचत कधी सात-आठ रुपयांच्या वर गेलेली आठवत नाही. अर्थात यापेक्षा जास्त पैसे कंपासपेटीत ठेवणेही रिस्की होतेच म्हणा..

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी एक समजूतदारपणा होता त्या वयात. कदाचित परिस्थितीनेच आणलेला असावा. आईकडे कधी हट्ट केल्याचे आठवत नाही. आईसक्रीम, चॉकलेट हे चोचले फक्त श्रीमंत मुलांचे असतात हे मनाशी पक्के होते. पण स्वताहून जेव्हा ती केळ्याची वेफर आणायची, जी केवळ पगारालाच आणली जायची, तेव्हा ती जगातली बेस्ट आई वाटायची. अर्ध्याअधिक पाकिटाचा उघडल्या उघडल्या फडशा पाडायचो. उरलेले दुसर्या दिवशी संपायचे. आईने कधी त्यातील एखादे चवीला तरी खाल्ले असेल का याचे उत्तर आजही माझ्याकडे नव्हते. तिला पण आपल्यातले जरासे भरवावे एवढी अक्कल त्या वयात नव्हती याची खंत अचानक मनात दाटून आली. बायकोकडे सहज नजर गेली तर तिचे पाणीपुरीवर ताव मारणे चालू होते. ती खात्यापित्या उच्च मध्यमवर्गीय घरातली असल्याने तिचे बालपण माझ्या अगदीच उलटे होते. चॉकलेट-आईसक्रीमची आवड तशीच ठेवत पिझ्झा-बर्गर खातखातच ती वयात आली होती आणि माझी गाडी पहिला पगार हातात येईपर्यंत कधी मसालाडोसाच्या पुढे गेली नव्हती. आज मला रोज बाहेर खाणे सुद्धा आरामात परवडू शकत होते. त्यामुळे कधीकधी त्या खाण्याची किंमत काय असते हे विसरायला व्हायचे. पण असे कधी बालपण आठवले की याची जाणीव व्हायची. आताही तेच झाले. मगासपासून ऑफ झालेला मूड सुधारला. समाधानी वाटू लागले. तब्येत बरी नाही म्हणून काय झाले, मस्त तुपाची धार सोडून मी आज दालखिचडी खाणार होतो, आईसाठी चिकन हंडी पार्सल घेऊन जात होतो. बायकोलाही मनसोक्त पाणीपुरी खाऊ घालत होतो... सुखाची व्याख्या समाधानात शोधली तर हे सारे सुखी व्हायला पुरेसे होते. त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंदात मी नकळत माझा आनंद शोधू लागलो होतो.

तेवढ्यात त्यातील एक मुलगा समोरच्या बेकरीतून पाव घेऊन आला. अर्थात त्या पावभाजीच्या गाडीवरच का नाही घेतले हे समजायला मला वेळ नाही लागला. पाव पिशवीतून काढून दोन्ही भावंडे ते मोजत होते आणि आई त्यांना ओरडत होती. पण ते मात्र कोण किती खाणार याचा हिशोब करण्यात गुंतले होते. कोणता पाव छोटा आहे आणि कोणता मोठा, इतपर्यंत गहन चर्चा चालू होती. मला ते बघून अंमळ मौज वाटू लागली.

एव्हाना माझ्या बायकोची पहिली प्लेट खाऊन झाली होती. मला किंचित गालातल्या गालात हसताना बघून विचारले, "काय रे, लाजायला काय झाले?" जवळपास एकही सुंदरी दिसत नसताना माझ्या चेहर्यावरील ते भाव तिच्यासाठी अनाकलनीय होते.
"काही नाही ग, जरा त्या मुलांची गंमत बघतोय.", मी म्हणालो.
तसे तिलादेखील तान्हुल्या बाळांना ‘अलेल्लेले’ करत त्यांचे गालगुच्चे घेत त्यांची गम्मत बघण्यात आवड होती. पण मी त्या सात-आठ वर्षांच्या मुलांकडे का तसल्या नजरेने बघतोय हे तिला नाही समजले. तिचा प्रश्नार्थक चेहरा आणि मी नक्की यात काय एंजॉय करत आहे यामागील कारण जाणून घेण्यातील उत्सुकता बघून मी तिला नेहमीसारखा माझ्या बालपणीचा एक किस्सा सांगायला घेतला, जो आताच त्या मुलांना पाव मोजताना बघून आठवला होता.

मी तेव्हा पाचवीत की सहावीत होतो. मे महिन्याची सुट्टी चालू होती. आमचे गली क्रिकेट फुल फॉर्मात चालू होते. प्रत्येक जण स्वताला सचिन तेंडुलकर समजायचा. पण खरेच आमचा खेळही चांगला होता. फक्त कधी आजमावण्याचा मौका आला नव्हता. कारण गल्लीच्या बाहेर कधी पडलो नव्हतो ना.. पण एक दिवस आमच्याच एरीआतील जवळच्या एका वाडीतील सात-आठ पोरे आम्हाला मॅच घेतात का म्हणून विचारायला आली. त्यांच्या वाडीतील लोकांनी दुपारच्या वेळी आरडाओरडीने झोपमोड होते म्हणून हाकलले असावे बहुधा. आम्ही त्यांना आमच्या गल्लीत असे काही खेळायला देणार नाही म्हणून मग मॅचचे निमित्त पुढे केले असावे. आम्ही या आधी असे कधी बाहेरच्या कोणा मुलांशी खेळलो नव्हतो. त्यांचा खेळ कसा आहे हे देखील माहीत नव्हते. पण त्या वयात कोणाचा खेळ कसा असेल हे त्याच्या हाईट-बॉडी वरून ठरवले जायचे. ती सारी साधारण आमच्याच वयाची आणि आमच्याच शरीरयष्टीची दिसत होती. सामना ठरवायला काही हरकत नव्हती. तसा त्यांनी आणखी एक पत्ता फेकला. प्राईझ मनी.. मॅच खेळायची तर काहीतरी बक्षीस हवे ना. आता मात्र आम्ही विचारात पडलो. तरी किती दिवस असे आपसातच खेळत राहणार होतो. कधी ना कधी बाहेरच्या जगात चालत असलेल्या स्पर्धेत उतरावे लागणारच होते. विचारविनिमयाअंती आम्ही तयार झालो. पूर्ण साडेपाच रुपयांची मॅच ठरली. प्रत्येक संघात सात-सात खेळाडू होते, म्हणजे प्रत्येकाला किमान रुपया तरी द्यावा लागणार होता. त्या वयात कोणी खिशात पाकीट घेऊन तर फिरत नसायचे की घातला खिशात हात आणि काढले पैसे. तरी बिनधास्त पैसे जवळ नसतानाही कबूल झालो. सामना हरलो तरच पैश्यांची जमवाजमव करावी लागणार होती. पण करावी लागणारच होती या वास्तवाचे भान ठेऊनच आम्ही जिद्दीने खेळलो. समोरचेही काही कमी चांगले खेळणारे नव्हते. खरे तर दोन्ही संघ तोडीस तोड होते, पण त्यांनी आम्हाला कमी समजण्याची चूक केली जी आम्ही केली नव्हती. आणि इथेच आम्ही जिंकलो.

आम्ही आमच्या आयुष्यातील पहिला सामनाच नाही तर तब्बल साडेपाच रुपये जिंकलो होतो. स्वताच्या जीवावर, स्वताच्या मेहनतीवर.. आमच्यासाठी ती पहिली कमाई होती असे म्हणालो तरी वावगे ठरू नये. पण आता या पैश्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नच होता. ते साडेपाच रुपये सार्यांचे मिळून होते. वाटणी करण्यात अर्थ नव्हता, की तशी कोणाला अपेक्षाही नव्हती. का नाही मग पहिलाच विजय साजरा करावा असे ठरले. दोघातिघांना घरून बोलावणे आल्यामुळे ते निघून गेले. आम्ही पाच जण उरलो होतो आणि जवळ होते ते साडेपाच रुपये. म्हणजे पुन्हा एकदा चिंच-बोरे किंवा बर्फाचा गोळा या पलीकडे जाणे काही शक्य नव्हते. पण आम्ही मात्र कल्पनेपलीकडचा विचार केला होता. हॉटेलमध्ये जायचे ठरवले. अर्थात आमच्याच नाक्यावरचे रामकृष्ण हिंदू हॉटेल. पैश्याचा आणि सर्वांच्या आवडीचा विचार करता उसळपाव हा मेनू फायनल झाला. खरे तर सर्वांना मिसळपाव खायची इच्छा होती. पण एकाला पाणी पिण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये पाठवलेले आणि पदार्थांचे रेट वाचून यायला सांगितले होते. त्याच्या अहवालानुसार उसळपाववरच समाधान मानावे लागणार होते. तेही हॉटेलमध्ये पाव घ्यायचे म्हणजे आठ-आण्याचा पाव एक रुपयात. साडेचार रुपयाची उसळ वगळता आमच्याकडे केवळ एकच पाव खाण्यास पैसे शिल्लक होते. म्हणून मग बेकरीतून एक रुपयाचे दोन पाव घेण्याचे ठरले. ते तसेच कागदात लपवून नेणे भाग होते. कारण हॉटेलमध्ये बाहेरचे खाण्यास मनाई होती. आणि आम्ही पडलो लहान मुले. मालकाने हाकलला असता तरी गुमान बाहेर पडावे लागले असते. कोपर्यातील एखादे टेबल पकडून बसलो. पाव एकाने घट्ट मांडीशी पकडून ठेवले होते. मेनूकार्ड घेऊन वेटर आला. परत एकदा उसळ साडेचार रुपयालाच आहे खात्री केली. आणि जराश्या संकोचानेच त्याला ऑर्डर दिली, "एक उसळ..."

"बस.." मगासचा वेटर एका चिकन हंडीची ऑर्डर घेतल्यावर पटकन मला म्हणाला होता ते आता सहज आठवले. पण त्यावेळी आम्ही पाच जणांत एक उसळ ऑर्डर केली होती. ती देखील पार्सल नाही तर हॉटेलमध्ये जाऊन. तो वेटर तेव्हा ‘बस?’ नाही म्हणाला तर पुढच्या ऑर्डरची वाट बघत बसला. जरासा वेळ लागला त्याला ही गोष्ट पचवायला की आम्ही फक्त एकाच उसळची ऑर्डर केली आहे. त्याक्षणी त्याच्या चेहर्यावर जे भाव होते, त्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया होती ती आमच्यातील पाचही जण आयुष्यभर नाही विसरणार. एकदम आश्चर्यचकीत झाल्यासारखे भाव चेहर्यावर आणत आणि उजव्या हाताची पाच बोटे हवेत फिरवित तो म्हणाला, "पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?"

जेव्हा आम्ही मित्र परत जमतो तेव्हा हा प्रसंग आणि त्याचे हे उद्गार नेहमी आठवतो. आयुष्यात असे पण दिवस पाहिलेत आणि त्यातही लाईफ एंजॉय केली आहे याचे समाधान जाणवते. त्यानंतरही असे बरेच किस्से घडले. आमचे बजेट हळूहळू वाढू लागले. तशी उसळीची जागा पावभाजीने घेतली, त्यावर मस्काही आला, पण पाव मात्र आम्ही बाहेरूनच घेऊन जायचो. मोठमोठ्या हॉटेलातही गपचूप ते टेबलाच्या खालून एकेमेकांना पास करायचो. सारे काही आज आठवू लागले. बायकोला सांगतानाही चेहर्यावर स्वताबद्दलचे कौतुक होते. गरीबीतल्या दिवसांतही किती गमतीदार आठवणी असतात याचे तिला अप्रूप वाटत होते.

इतक्यात बाजूच्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याच्या आईने त्याला धपाटा घातला होता. भाजीची पिशवी त्याच्या हातून खाली पडली होती. पातळ प्लास्टीकच्याच पिशव्या त्या, पडताक्षणीच फुटल्या असाव्यात. जमिनीवर नुसता लाल रंगाचा सडा पसरला होता. आजूबाजुचे आपल्या अंगावर तर नाही ना पडले हे चेक करत कपडे झटकत बाजूला सरकत होते. गाडीवाल्यानेही वैतागून आपल्या पोर्याला ते लगेच साफ करून घ्यायला सांगितले. तो सगळी भाजी खराट्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात ढकलत होता. पण त्या बाईची विषण्ण नजर अजूनही त्या भाजीवरच अडकून राहिली होती. आणि माझी तिच्यावर.. तिच्या मनात आता काय चालू असेल हे मी समजू शकत होतो. बदल्यात नवीन भाजीची ऑर्डर अजून दिली नव्हती. त्यासाठी लागणारे ज्यादा पैसे जवळ नसावेत, किंवा असले तरी ते खर्च करण्याची ताकद आता तिच्यात नसावी. मगासपासून त्या आपल्याच नादात हसणार्या खिदळनार्या, पैसा पैसा म्हणजे असा काय असतो याची चिंताही नसणार्या मुलांचा चेहरा आता बघवत नव्हता. आईचा धपाटा खाल्यावर हाच आपल्या पार्टीचा दी एण्ड आहे हे ती समजून चुकली होती. एक पावभाजी ती काय ते आज खाणार होते. आजूबाजूला इतर लोक या पेक्षा उंचे उंचे पदार्थ खात आहेत, धमाल करत आहेत याच्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते की त्यांच्याबद्दल यांच्या मनात असूयाही नव्हती. ती मुले माझी भावंडे नव्हती, ना ती बाई माझी आई होती. पण यांनी आज नकळत माझ्या काही आठवणी जागवल्या होत्या. सुख म्हणजे काय असते, समाधान कश्यात मानायचे असते, याची पुन्हा नव्याने जाणीव करून दिली होती, जी लाखमोलाची होती. आज मी यांच्या आयुष्यात एक अशी आठवण सोडून गेलो तर ती याची परतफेडच झाली असती. गपचूप मी मागच्या बाजूने त्या गाडीवाल्याजवळ गेलो आणि एक शंभराची नोट त्याच्या हातावर टेकवली. ‘बदल्यात त्यांना मस्का भाजी देऊ का?’, असे गाडीवाल्याने विचारले तर मी नकोच म्हणालो... मला त्या आईची मदत करायची होती, मेहरबानी करून तिचा अपमान नाही.. जाताना माझे नाव चुकूनही घेऊ नकोस असे बजावायला विसरलो नाही. परत आलो तर मिथिलाच्या चेहर्यावरही तेच समाधान दिसत होते जे मला माझ्या स्वतामध्ये जाणवत होते. माझ्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा तिने अलगद पुसून घेतल्या आणि नेहमीसारखे माझ्यातल्या लहान मुलाला थोपटले. त्या धपाटा खाल्लेल्या मुलाच्या डोक्यावरून सहजच हात फिरवून आम्ही तिथून निघालो. आमचे चिकन हंडीचे पार्सल आमची वाट बघत होते...

...तुमचा अभिषेक

गुलमोहर: 

खुपच सुन्दर आहे!! माझा मावासभाउ आणि मी अशेच एकदा बस चे भाडे फक्त जवळ असताना (हे नन्तर समजले होते) कसाटा रेस्टारन्त मधेमागअला होता.

छान, एके ठिकाणी लिंक द्यायच्या नादात ही कथा वाचणे झाले. पुन्हा आठवणी ताज्या झाल्या.
नवीन प्रतिसादांचे धन्यवाद. अभिषेक आयडी वापरत नसल्याने त्यावर आलेले नवीन प्रतिसाद कळत नाहीत आणि धन्यवाद द्यायचे राहून जाते Happy

ऋन्मेऽऽष
हे अस लिहायचे सोडून कसले बकवास धागे काढत बसता.

ओके Happy

धन्यवाद रानभुली,
१० वर्षे वाट पहावी लागली, शंभराव्या प्रतिसादासाठी. तो ही मलाच द्यावा लागला Happy

कदाचित तुझ्यासारख्याच परिस्थितीत वाढलो असेन, म्हणुन खुप रिलेट करु शकलो ह्या अनुभवाशी. का कोणास ठाऊक पण एकदम रडायला आलं.

Pages