' पान '

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऑफिसच्या खिडकी बाहेर पिंपळाचे मोठ्ठे झाड होते. रोज दुपारी जेवण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघत बसले कि, पिंपळाची पानं पडताना दिसायची. पिंपळाचे पानं कधीच झाडावरून 'टपकन' खाली पडत नाही. ते फांदीपासून विलग झाले कि हवेत किमान २-३ गिरक्या घेउन मगच जमिनीवर टेकते. मला तो छंदच जडला होता, सुटलेले पानं कुठे जाऊन पडते ते बघण्याच्या. असेच कधीतरी बघता बघता हि कविता सुचली.

रोजच बघतो पक्षी नवे
उंच उडणारे थवेच थवे
मनात असते नभी झेपावे
घेउन भरारी, मजेत गावे

त्याच फांद्या, तीच पाने
तेच तेच ते नकोच जिणे
तोडून सारे पाश जावे
रोज नव्या वल्लरी वसावे

आज अचानक काय हे घडले
वाऱ्याने मज अलगद खुडले
मधेच आली झुळूक हलकी
मीही घेतली खुशीत गिरकी

श्वास रोखला, मिटले डोळे
क्षणात भेटणार आभाळ निळे
अलगद शय्येवर विसावलो
मायेच्या स्पर्शाने सुखावलो

नव्हते अंबर, निळाईहि नव्हती
माझेच पूर्वज अवति-भवती
न सांगताच सत्य उमजले
शेवट हा तर आयुष्य संपले.

- आरती (मे, २००४)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: