थांबला न सूर्य कधी.....थांबली न धारा

Submitted by अनिकेत आमटे on 9 October, 2011 - 02:26

स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे.
Pahili zopadi.jpg
आनंदवन-हेमलकसा हे अंतर २५० किलो मीटर आहे. १९७३ ते १९८६ या काळात नागेपल्ली ते हेमलकसा हा ६० किलोमीटरचा प्रवास रस्ताच नसल्याने फार अवघड होता. बैलगाडीच्या रस्त्यावरून घनदाट जंगलातून वाट काढीत नागेपल्ली येथून हेमलकसाला पोहोचायला ५-६ तास सहज लागायचे. पावसाळ्यात ६ महिने जगाशी संपर्क संपूर्णपणे तुटायचा. पावसाळ्यात हेमलकसाला जायचेच असेल तर २ दिवस चालत, सायकलीने किंवा बैलगाडीने जावे लागायचे.
Baba Amte-Prakash Amte.jpg
आई-बाबा यांचे कार्य मी आणि माझ्या थोरल्या भावाने (डॉ.दिगंत) जन्मापासूनच अनुभवलंय. त्यांचा कामाचा प्रभाव आमच्या मनावर कायमचा कोरला गेला. नकळत घडलेले संस्कारच आम्हाला या हेमलकसा येथील आई-बाबांची कर्मभूमी असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या या मातीत परत घेऊन आलेत. जगाकडे पाठ फिरवून केलेले आई-बाबांचे हे निरपेक्ष कार्य आमच्यापुढे नेहमीच आदर्श राहील.
लोक बिरादरी प्रकल्पाचा सुरवातीचा काळ फारच खडतर होता. असे म्हणणे खरे तर चुकीचे ठरेल. कारण आई-बाबा व त्यांचा सोबतीला असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा मार्ग जाणून बुजून स्वीकारला होता. त्याबद्दल त्यांना कधीच पश्चाताप झाला नाही. उलट कार्याचा - दवाखान्याचा आदिवासी लोकांना फायदाच झाल्याने त्यांना समाधान मिळाले. वन्यजीवान प्रमाणे जगणाऱ्या - जंगलावरच १०० टक्के उपजीविका करणाऱ्या या अतिमागास अश्या माडिया-गोंड आदिवासींनी बाबा आमटे/प्रकाश आमटे यांना आमच्याकरिता दवाखाना किंवा शाळा सुरु करा असे कधी सांगितले नव्हते. या भागात प्रकल्प सुरु करणे म्हणजे आपली गरज होती. त्यांची नव्हती. स्वतःच्या समाधानाकरिता हे सुरु झालेले काम होते. हे काम आता त्याच पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासींना अन्न-वस्त्र-निवारा मिळावा, त्यांच्यावर नीट उपचार व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे ही आजही आमची गरज आहे. हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय हे महाराष्ट्रातील समाजकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. समाधाना पेक्षा अजून काय हवे असते आयुष्यात?
Madia Adivasi Mule.jpg
शिक्षणा अभावी आदिवासींची भरपूर लुट व्हायची. या भागातील आदिवासींना मीठ, तेल, साखर काहीच माहिती नव्हते. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी मीठा साठी त्यांची भरपूर लुट केली. शहरातून व्यापारी यायचे १ किलो मीठाच्या बदल्यात १ किलो चारोळी, डिंक किंवा मध घेऊन जायचे. त्या काळात १० पैसे किलो मीठ होते. आणि मध, चारोळी आणि डिंक याला २५ ते ४० रुपये भाव शहरात मिळायचा. अन्नात मीठ टाकल्यावर अन्नाला चव येते हे लक्षात आल्यावर मिठाच्या मोबदल्यात जंगलातील मध-चारोळी-डिंक आदिवासी व्यापाऱ्याला देऊ लागलीत. हे आदिवासी अशिक्षित आहेत म्हणून नागविल्या जाताहेत हे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की या भागातील लोकांना मीठ आणून पोहोचवायचे. वर्षातून एकदा एक मोठा ट्रक भरून मीठ या भागात आणले जायचे. ट्रक आल्यावर आमचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन लोकांना मीठाचा ट्रक आल्याची माहिती द्यायचे. या भागातील किमान ७०-८० खेड्यातील लोकांना मीठ वाटप केले जायचे. ज्या किमतीत विकत घेतल्या जायचे त्याच किमतीत आदिवासींना विकायचे असे सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले होते. मीठ वाटप प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद आदिवासी बांधवांनी दिला. वर्षभराचा मीठाचा साठा लोक करून ठेवायची. मीठ घेण्याकरिता लोकांची भलीमोठी रांग लागायची. मीठा प्रमाणेच केरोसीन (रॉकेल) साठी सुद्धा या लोकांची लुट व्हायची. म्हणून केरोसीनचे ही वाटप लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत होत असे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीची १०-१२ वर्षे हा उपक्रम प्रकल्पाने यशस्वीरित्या राबविला. याभागातील आदिवासीनच्या अंगावर अतिशय कमी कपडे असायचे. फारसा पैसा हाताशी नसल्याने त्यांना नविन कपडे विकत घेणे परवडायचे नाही. म्हणून सुरवातीचे २५ वर्षे आई (डॉ.मंदाकिनी) ने या भागातील लोकांकरिता स्वत नविन कपड्यांचे दुकान चालविले. नागपुरातून जनता साड्या आणि आनंदवनातून टावेल, पंचे, धोतर होलसेल मध्ये अतिशय कमी दरात विकत आणायचे आणि इथे त्याच दरात लोकांना विकायचे. सकाळी दवाखान्याची OPD आटपल्यावर दुपारी दोन तास हा उद्योग आई करीत असे. या कामाला पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. छंद म्हणून दुपारच्या फावल्या वेळात बाबा (प्रकाश) लोकांचे रेडियो व घड्याळ दुरुस्तीचे काम करीत असे. आदिवासींकडे असलेला थोडाफार पैसा ठेवायला त्यांच्याकडे काहीच नसायचे. झोपडीत कुठेतरी वरती खोपच्यात ते नोटा लपवून ठेवायचे. अनेक वेळा त्या नोटा उंदीर कातरून टाकायचे. मग ते लोक बाबा-आई कडे यायचे. त्या नोटा नागपूरच्या रिझर्व बँकेत जाऊन बदलून आणायचे काम पण आई-बाबाचं करत. अनेक वेळा उंदराने नोटांवरील नंबर खाल्याने पैसे बरेच कमी होऊन मिळायचे. याला पर्याय म्हणजे बँक. म्हणून गडचिरोली जिल्हा को-ओपरेटीव बँकेची शाखा आमच्या प्रकल्पात सुरु करण्यात आली. आदिवासी अशिक्षित असल्याने अनेकांचे बँकेत खाते काढण्याचे काम सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनीच अनेक वर्ष केले. आदिवासी बांधवांचा लोक बिरादरी प्रकल्पावर असलेला प्रचंड विश्वास हाच आमच्या कामाचा श्वास आहे.
Baba-Aaji-Baba-Aai old.jpg
वन विभागाच्या अधिकाऱ्यानी ही आदिवासींची पिळवणूक-फसवणूक केली होती. आदिवासींकडून काम करवून घ्यायचे पण हातात एकही पैसा देत नसत. तुम्ही जंगलात राहता म्हणून तुम्हाला हे काम करणे बंधनकारक आहे असे सांगून त्यांच्या कामाची सर्व मजुरी स्वतः हडप करायचे. अशा अनेक प्रकारे या अर्धनग्न - अशिक्षित आणि अतिशय भोळ्या आदिवासी लोकांची पिळवणूक - फसवणूक आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांकडून व्हायची.
School-old picture.jpg
म्हणून लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी १९७६ साली या भागात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे हक्क कळावे, अन्याया विरुद्ध लढण्याची ताकत निर्माण व्हावी तसेच रोजगार मिळविण्या पुरते शिक्षण आदिवासींना देण्या करिता १ जुलै १९७६ साली लोक बिरादरी आश्रमशाळेची स्थापना झाली.

अनिकेत प्रकाश आमटे
(संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा)
लोक बिरादरी प्रकल्प,
मु. हेमलकसा, पोस्ट-तालुका. भामरागड,
जिल्हा. गडचिरोली- ४४२ ७१०. मो. ९४२३२०८८०२
ईमेल - aniketamte@gmail.com
वेबसाईट - www.lbphemalkasa.org.in & www.lokbiradariprakalp.org

गुलमोहर: 

बिंदुमात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरीशंकर
माणूस माझे नाव
अग्नियान मम घेत चालले
आकाशाचा ठाव........

असाच होता बाबांचा प्रवास................
आमटे कुटुंबाला शुभेछा..!!!!

श्री अनिकेत,

स्व.बाबा आमटे यांच्यावर आणि कुष्ठरोग्यांवर लिहलेला एक धडा आम्हाला शाळेत होता. बाबांच्या दुसर्‍या पिठीत लोक बिरादारी हे आदिवासीसाठीच काम सुरु झालेल मला मायबोलीवरुनच समजल. आपल्या बरोबरच काम करुन स्व. नूतन ने सहा लेख मायबोलीवर लिहलेत.

भगिरथाने म्हणे स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली. या करिता एकटा भगिरथ नव्हे तर अनेक पिढ्या या कामाला वाहिल्या होत्या. हे उदाहरण "आमटे" या नावाला साजेस आहे. फक्त एक पिढी नव्हे तर सलग तिन पिढ्या या मोहमयी दुनियेचा त्याग करुन समाजसेवेच्या कामाला उद्युक्त व्हाव्या हे एक मोठ उदाहरण आहे.

Pages