स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे.
आनंदवन-हेमलकसा हे अंतर २५० किलो मीटर आहे. १९७३ ते १९८६ या काळात नागेपल्ली ते हेमलकसा हा ६० किलोमीटरचा प्रवास रस्ताच नसल्याने फार अवघड होता. बैलगाडीच्या रस्त्यावरून घनदाट जंगलातून वाट काढीत नागेपल्ली येथून हेमलकसाला पोहोचायला ५-६ तास सहज लागायचे. पावसाळ्यात ६ महिने जगाशी संपर्क संपूर्णपणे तुटायचा. पावसाळ्यात हेमलकसाला जायचेच असेल तर २ दिवस चालत, सायकलीने किंवा बैलगाडीने जावे लागायचे.
आई-बाबा यांचे कार्य मी आणि माझ्या थोरल्या भावाने (डॉ.दिगंत) जन्मापासूनच अनुभवलंय. त्यांचा कामाचा प्रभाव आमच्या मनावर कायमचा कोरला गेला. नकळत घडलेले संस्कारच आम्हाला या हेमलकसा येथील आई-बाबांची कर्मभूमी असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या या मातीत परत घेऊन आलेत. जगाकडे पाठ फिरवून केलेले आई-बाबांचे हे निरपेक्ष कार्य आमच्यापुढे नेहमीच आदर्श राहील.
लोक बिरादरी प्रकल्पाचा सुरवातीचा काळ फारच खडतर होता. असे म्हणणे खरे तर चुकीचे ठरेल. कारण आई-बाबा व त्यांचा सोबतीला असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा मार्ग जाणून बुजून स्वीकारला होता. त्याबद्दल त्यांना कधीच पश्चाताप झाला नाही. उलट कार्याचा - दवाखान्याचा आदिवासी लोकांना फायदाच झाल्याने त्यांना समाधान मिळाले. वन्यजीवान प्रमाणे जगणाऱ्या - जंगलावरच १०० टक्के उपजीविका करणाऱ्या या अतिमागास अश्या माडिया-गोंड आदिवासींनी बाबा आमटे/प्रकाश आमटे यांना आमच्याकरिता दवाखाना किंवा शाळा सुरु करा असे कधी सांगितले नव्हते. या भागात प्रकल्प सुरु करणे म्हणजे आपली गरज होती. त्यांची नव्हती. स्वतःच्या समाधानाकरिता हे सुरु झालेले काम होते. हे काम आता त्याच पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासींना अन्न-वस्त्र-निवारा मिळावा, त्यांच्यावर नीट उपचार व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे ही आजही आमची गरज आहे. हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय हे महाराष्ट्रातील समाजकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. समाधाना पेक्षा अजून काय हवे असते आयुष्यात?
शिक्षणा अभावी आदिवासींची भरपूर लुट व्हायची. या भागातील आदिवासींना मीठ, तेल, साखर काहीच माहिती नव्हते. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी मीठा साठी त्यांची भरपूर लुट केली. शहरातून व्यापारी यायचे १ किलो मीठाच्या बदल्यात १ किलो चारोळी, डिंक किंवा मध घेऊन जायचे. त्या काळात १० पैसे किलो मीठ होते. आणि मध, चारोळी आणि डिंक याला २५ ते ४० रुपये भाव शहरात मिळायचा. अन्नात मीठ टाकल्यावर अन्नाला चव येते हे लक्षात आल्यावर मिठाच्या मोबदल्यात जंगलातील मध-चारोळी-डिंक आदिवासी व्यापाऱ्याला देऊ लागलीत. हे आदिवासी अशिक्षित आहेत म्हणून नागविल्या जाताहेत हे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की या भागातील लोकांना मीठ आणून पोहोचवायचे. वर्षातून एकदा एक मोठा ट्रक भरून मीठ या भागात आणले जायचे. ट्रक आल्यावर आमचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन लोकांना मीठाचा ट्रक आल्याची माहिती द्यायचे. या भागातील किमान ७०-८० खेड्यातील लोकांना मीठ वाटप केले जायचे. ज्या किमतीत विकत घेतल्या जायचे त्याच किमतीत आदिवासींना विकायचे असे सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले होते. मीठ वाटप प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद आदिवासी बांधवांनी दिला. वर्षभराचा मीठाचा साठा लोक करून ठेवायची. मीठ घेण्याकरिता लोकांची भलीमोठी रांग लागायची. मीठा प्रमाणेच केरोसीन (रॉकेल) साठी सुद्धा या लोकांची लुट व्हायची. म्हणून केरोसीनचे ही वाटप लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत होत असे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीची १०-१२ वर्षे हा उपक्रम प्रकल्पाने यशस्वीरित्या राबविला. याभागातील आदिवासीनच्या अंगावर अतिशय कमी कपडे असायचे. फारसा पैसा हाताशी नसल्याने त्यांना नविन कपडे विकत घेणे परवडायचे नाही. म्हणून सुरवातीचे २५ वर्षे आई (डॉ.मंदाकिनी) ने या भागातील लोकांकरिता स्वत नविन कपड्यांचे दुकान चालविले. नागपुरातून जनता साड्या आणि आनंदवनातून टावेल, पंचे, धोतर होलसेल मध्ये अतिशय कमी दरात विकत आणायचे आणि इथे त्याच दरात लोकांना विकायचे. सकाळी दवाखान्याची OPD आटपल्यावर दुपारी दोन तास हा उद्योग आई करीत असे. या कामाला पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. छंद म्हणून दुपारच्या फावल्या वेळात बाबा (प्रकाश) लोकांचे रेडियो व घड्याळ दुरुस्तीचे काम करीत असे. आदिवासींकडे असलेला थोडाफार पैसा ठेवायला त्यांच्याकडे काहीच नसायचे. झोपडीत कुठेतरी वरती खोपच्यात ते नोटा लपवून ठेवायचे. अनेक वेळा त्या नोटा उंदीर कातरून टाकायचे. मग ते लोक बाबा-आई कडे यायचे. त्या नोटा नागपूरच्या रिझर्व बँकेत जाऊन बदलून आणायचे काम पण आई-बाबाचं करत. अनेक वेळा उंदराने नोटांवरील नंबर खाल्याने पैसे बरेच कमी होऊन मिळायचे. याला पर्याय म्हणजे बँक. म्हणून गडचिरोली जिल्हा को-ओपरेटीव बँकेची शाखा आमच्या प्रकल्पात सुरु करण्यात आली. आदिवासी अशिक्षित असल्याने अनेकांचे बँकेत खाते काढण्याचे काम सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनीच अनेक वर्ष केले. आदिवासी बांधवांचा लोक बिरादरी प्रकल्पावर असलेला प्रचंड विश्वास हाच आमच्या कामाचा श्वास आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यानी ही आदिवासींची पिळवणूक-फसवणूक केली होती. आदिवासींकडून काम करवून घ्यायचे पण हातात एकही पैसा देत नसत. तुम्ही जंगलात राहता म्हणून तुम्हाला हे काम करणे बंधनकारक आहे असे सांगून त्यांच्या कामाची सर्व मजुरी स्वतः हडप करायचे. अशा अनेक प्रकारे या अर्धनग्न - अशिक्षित आणि अतिशय भोळ्या आदिवासी लोकांची पिळवणूक - फसवणूक आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांकडून व्हायची.
म्हणून लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी १९७६ साली या भागात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे हक्क कळावे, अन्याया विरुद्ध लढण्याची ताकत निर्माण व्हावी तसेच रोजगार मिळविण्या पुरते शिक्षण आदिवासींना देण्या करिता १ जुलै १९७६ साली लोक बिरादरी आश्रमशाळेची स्थापना झाली.
अनिकेत प्रकाश आमटे
(संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा)
लोक बिरादरी प्रकल्प,
मु. हेमलकसा, पोस्ट-तालुका. भामरागड,
जिल्हा. गडचिरोली- ४४२ ७१०. मो. ९४२३२०८८०२
ईमेल - aniketamte@gmail.com
वेबसाईट - www.lbphemalkasa.org.in & www.lokbiradariprakalp.org
हे काम आम्ही फक्त स्वतःच्या
हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय >>> ग्रेट!!!
समाधाना पेक्षा अजून काय हवे असते आयुष्यात? >> हो, बांबाच्या चेहर्यावरही ते 'समाधान' दिसत आहे....त्यांचा नेहमी उत्साही राहणारा चेहरा कायम माझ्या लक्षात राहील.
अनिकेत खरतर तुम्ही करत असलेल्या कार्याला तोड नाही....,आई बाबांचा आदर्श समोर ठेउन त्यांची उद्दिष्टे पुर्ण करण्या करता त्यांचा विविध प्रकल्पांचा वारसा, तुम्ही मनापासुन पुढे चालवत आहात्...त्या बद्दल खरंच मनापासुन तुमचे 'अभिनंदन'!!!
आणि प्रत्येक प्रकल्पाला मनभरुन शुभेच्छा!!
बाबांनी सुरु केलेले हे महान
बाबांनी सुरु केलेले हे महान कार्य आपण तितक्याच तळमळीने पुढे नेत असल्याबद्द्ल आपलं खरंच कौतुक वाटतं..... मनःपूर्वक शुभेच्छा...
गेल्याच महिन्यात माझी वहिनी
गेल्याच महिन्यात माझी वहिनी या प्रकल्पाला भेट देऊन आली. निवृत्त झाल्यावर
काही काळ तिथे सेवा करायचीय असे तिने ठरवलेय.
बाबांच्या कार्याबद्दल लहानपणापासून वाचतोय. आदर, अभिमान, भक्ती, हेवा यापैकी
नेमके काय वाटते ते सांगता येत नाही.
मित यांना अनुमोदन अनिकेत
मित यांना अनुमोदन
अनिकेत तुम्ही करत असलेल्या कार्याला सलाम
खर आहे अनिकेत जी, तुम्ही सर्व
खर आहे अनिकेत जी, तुम्ही सर्व आमटे कुटुंबियांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे..
~~~~~भवतु हार्दिक: शुभाशय: | भवत: सेवाकार्यं, जीवनं च सर्वदा सुख समृद्धी दायकं भवतु इति वयम प्रार्थयाम: |
~~~~~ भवत: सौरभ एवं प्रज्ञा , संगमनेरनगरम |
बाबा आमटे व त्यांचे कुटूंबिय
बाबा आमटे व त्यांचे कुटूंबिय यांच्याबद्दल नेहमी वाचलं की कायमच ग्रेट वाटतं.
तुमच्या कार्याला खरंच तोड नाही.
अनिकेत तुम्ही सर्व कुटूंबिय
अनिकेत
तुम्ही सर्व कुटूंबिय खुप विशालर्हद्यी आहात. आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे.
तुमच्या करत असलेल्या कार्याला खरंच तोड नाही.
हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय >>> खरोखरीचा निरपेक्षपणा
जेव्हाही मला आपल्या कार्यात खारीचा का होईना वाटा उचलायला मिळतो तेव्हा तेव्हा मला अत्यंत आनंद होतो.
माझ्याकडून जेव्हाही शक्य होईल तेव्हा नक्कीच थोडाफार हातभार उचलायचा प्रयत्न करीन.
आपल्या कार्याला अनेकानेक
आपल्या कार्याला अनेकानेक शुभेच्छा .
मला तुमच्या पूर्ण कुटुंबाची
मला तुमच्या पूर्ण कुटुंबाची कमाल वाटते. एखाद्या कुटुंबातील १-२ व्यक्तींनी समाजसेवेला वाहून घेणे पाहिले आहे पण संपूर्ण कुटुंब ते ही ३ पीढ्या एखाद्या कार्याला वाहून घेतलेले उदाहरण विरळाच.
आपल्या कार्यात हातभार लावेन की नाही माहिती नाही पण जिथे राहाते तेथील लोकांसाठी तरी नक्कीच काहीतरी उपयुक्त काम करण्याची प्रेरणा आपल्या कुटुंबामुळे मिळते हे नक्की.
कृपया आपली विचारपूस पहा.
उत्तम माहिती! तुमच्या कार्यात
उत्तम माहिती! तुमच्या कार्यात आपलाही थोडा सहभाग असावा असं वाटतंय. कसा सहभाग द्यावा हे लक्षात येत नाहिय्ये.
अनिकेत ~ प्रत्यक्ष देवाच्या
अनिकेत ~
प्रत्यक्ष देवाच्या नावाच्या तोडीचे 'आमटे' हे नाव झाले आहे आणि हे मी स्वत: त्या भागातील म्हातारेकोतारे पुरुष-स्त्री तर म्हणताना ऐकले आहेच पण आजच्या संगणक युगातील तरूणसुद्धा याच कृतज्ञ भावनेने तुम्हा सर्वांच्या आणि एकूणच 'आनंदवन' कार्याकडे पाहून म्हणताना आढळतो.
तुमच्या कार्याचे विश्लेषण करण्याची ना आमची पात्रता ना त्याची काही आवश्यकता आहे. लोक बिरादरी प्रकल्पातर्फे चालविल्या जात असलेल्या शिक्षण प्रसाराचे कामही तितकेच महत्वाचे आणि मोलाचे आहे जितके खुद्द बाबांचे. या शाळांतून उद्या खचितच एखादा असा हिरा बाहेर पडेल जो आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आदीवासीच्या उत्थानासाठी जोमाने कार्य करण्यासाठी तुम्हाला समर्थ साथ देईल.
फार समाधान वाटले हा लेख वाचून.
दादा नेहमीप्रमाणेच सुंदर लेख
दादा नेहमीप्रमाणेच सुंदर लेख ,दरवर्षीप्रमाणे भेटू परत १५ मे ला सोमनाथला
थांबला न सूर्य कधी थांबली न
थांबला न सूर्य कधी थांबली न धारा
आणि धुंद वादळास कोठला किनारा?
दु:खाच्या मुलुखातील तू प्रकाशयात्री
तुडवित घन निबिडातील त्या भयाण रात्री
तापल्या शिळांत प्राण जागवीत आला
आणि धुंद वादळास..
अनिकेत, 'बाबा आमटे' हे नाव
अनिकेत,
'बाबा आमटे' हे नाव लहाणपणा पासुन ऐकत आहे आणि तेंव्हापासुनच या नावची भुरळ पडली आहे.
त्यांचे नि:स्वार्थ कार्य पाहून थक्क होतो. त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!
लोकबिरादरीप्रकल्पाविषयी वाचून
लोकबिरादरीप्रकल्पाविषयी वाचून छान वाटले.
अनिकेत, प्रत्यक्ष
अनिकेत,
प्रत्यक्ष परमेश्वराच्या कुटुंबात जन्माला आलात तुम्हि,पण इतर सामान्य माणसां प्रमाणे आपल्या वडिलधार्यां च्या नावाचा फायदा उठवण्या पेक्षा ,बाबांनी सुरु केलेले हे महान कार्य आपण तितक्याच तळमळीने पुढे नेत आहात याचं खरंच कौतुक वाटतं.या पूर्वि खुपदा college मधल्या मित्र-मैत्रिणिं बरोबर आनंदवनात आणि लोकबिरादरीप्रकल्पात आले होते पण मनात असुनहि ,खुप काहि करता आले नव्ह्ते.पण त्या थोड्या काळात बरंच काहि शिकायला मिळाले.
तुमच्या प्रत्येक प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा!!
अनिकेत, तुमच्या अख्खं कुटुंब
अनिकेत, तुमच्या अख्खं कुटुंब हे परमेश्वरी परिवार आहे. अजून काय बोलू?...
अनिकेत, तुम्ही मायबोलीवर आहात
अनिकेत, तुम्ही मायबोलीवर आहात हे मायबोलीचं भाग्य आहे...
तुम्हा सर्वांच्या कार्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे. तसेच माझी छोटीशी मदत कधी लागलीच तर नक्की सांगा, मला आनंदाने सहभागी व्हायला आवडेल..
आनिकेत, सर्व आमटे कुटुम्बाचे
आनिकेत,
सर्व आमटे कुटुम्बाचे कार्य पाहून नतमस्तक होउन प्रणाम करते आहे. माझा खारु ताई चा वाटा द्यायला मी तयार आहे.
सगळ्या वाचकांचे
सगळ्या वाचकांचे आभार.......कृपया कोणीही आम्हाला देवाची-परमेश्वराची उपमा देवू नये......वेळ मिळेल तेंव्हा प्रकल्पाला सर्वांनी जरूर भेट द्यावी.....लोभ असावा एवढीच अपेक्षा....
मीठाचा किस्सा, उंदरांनी नोटा
मीठाचा किस्सा, उंदरांनी नोटा कुरतडण्याचा किस्सा हे सगळे वाचून वाईट वाटले.
तुमच्या कार्याला शुभेच्छा !
हे काम आम्ही फक्त स्वतःच्या
हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय >>> ग्रेट!!!>> +१
लोकबिरादरीप्रकल्प आणि एकुणच आमटे परिवाराच्या कार्याला सलाम !
१९९७ च्या सुमारास "विज्ञान
१९९७ च्या सुमारास "विज्ञान शिबीरा"चे निमित्ताने आनंदवनात जाण्याचा अचानकच योग आला होता. जाण्यापूर्वी मला आनंदवनाविषयी फारशी माहिती नव्हती.
मात्र, भूविकास, आदर्श वसाहत आणि उन्नत समाजजीवन यांबाबत हातीपायी धड नसलेल्या लोकांनी निर्माण केलेले "आनंदवन" पाहून आश्चर्यचकित झालो. मग साधनाताईंचे चरित्र वाचनात आले. बाबांच्या कविता वाचल्या. जीवनाचा खराखुरा अर्थ उमगू लागला.
इथे धडधाकट शरीरे, सुखवस्तू राहणी आणि विपुल संपर्कसाधने असूनही "आनंदवना"सारखे समृद्ध समाजजीवन आम्ही आजही निर्माण करू शकलेलो नाही. ही खंत आहे.
तिथून परतलो तेव्हा उद्दिष्टांचा शोध घेण्याची दृष्टी लाभलेली होती. तिच्याच आधारे प्राप्त परिस्थितीत जीवन घडवत आहोत. इथेही "आनंदवन" निर्माण करण्याची उमेद आहे.
तिथेही लोक बिरादरी प्रकल्प, निश्चित उद्दिष्टाप्रत जाण्याचे भरकस प्रयास करत असेल अशी खात्री आहे. त्या सर्व प्रयासांना उदंड यश लाभो हीच प्रार्थना!
(No subject)
तुमच्या कार्याला मनःपूर्वक
तुमच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा !
अनिकेतजी, आमटे कुटुंबाच्या
अनिकेतजी, आमटे कुटुंबाच्या कार्याची सखोल माहिती ईथे मिळतेय. तसेच ह्या अती मागास भागातील लोकांचे कष्ट पाहून फार वाईट वाटते. खरंच तुम्ही मायबोलीवर आहात हे आम्ही आमचं भाग्य समजतो.
तुमच्या कार्याला अनेक
तुमच्या कार्याला अनेक शुभेच्छा !
मनःपूर्वक शुभेच्छा!
मनःपूर्वक शुभेच्छा!
अनिकेत्,बाबा, विकास
अनिकेत्,बाबा, विकास दादा,प्रकाश्जी,आपणा सर्वांसाठी-
शेज सोन्याला कधीच
नाही फुलांची मिळते
सोने जळता जळता
किती छान उजळ्ते
लाटा वादळ वा-याशी
मैत्र जीवाचे जोडतो
शांत सागरावरती
नाही खलाशी घडतो
तसे बाहेरचे युद्ध
इथे कुणिही जिंकतो
ज्याने जिंकले स्वताला
त्याचा तुकाराम होतो
ज्याच्या माथ्यावर सदा
लिहीलेले आहे युद्ध
तोच काल झाला होता
तोच उद्याचाही बुद्ध
कमलाकर देसले
संवाद-९४२१५०७४३४
तुमच्या कार्याला अनेक
तुमच्या कार्याला अनेक शुभेच्छा.
Pages