लॉर्ड्सची जादू!

Submitted by फारएण्ड on 21 July, 2011 - 13:56

"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा. इंग्लिश संघ तेवढा भारी राहिला नाही आणि गेल्या दशकात भारतीय संघ व बोर्ड सर्वात बलाढ्य झाले. १९९६ मधे शतक मारल्यावर रिची बेनॉला मुलाखत देताना अत्यंत बुजरा असलेला गांगुली २००२ मधे नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यावर तेथील व्हिझिटर्स गॅलरी मधे काहीतरी "एमसीसीच्या कामकाजातून वगळावे लागले असतील असे" शब्द उच्चारत स्वतःचा शर्ट गरागरा फिरवत नाचला तेव्हा हा बदल सर्वात जास्त जाणवला.

पण तरीही लॉर्ड्सचे आकर्षण तसेच राहिले. मागच्या वीस पंचवीस वर्षातील बर्याच इमेजेस समोर येतात.. ८३ चा विजय, ८६ मधे वेंगसरकरने तेथील शतकाची केलेली हॅटट्रिक, ९० मधे गूचच्या त्रिशतकानंतर अझर चे सुंदर शतक व फॉलोऑन टाळायला २४ रन्स व दुसर्‍या बाजूला फक्त हिरवानी बाकी असताना कपिल ने मारलेल्या चार सिक्स, मग ९६ सालचे गांगुलीचे झालेले व द्रविडचे हुकलेले शतक हे भारतच्या मॅचेसमधले व मॅग्राथच्या २००५ मधल्या पहिल्या पाच विकेट्स यासारख्या इतरांच्याही.

त्यामुळे लंडनला फिरायला जायचे म्हंटल्यावर पहिल्यांदा तेथील टूरची माहिती काढून घेतली. तेथे गेल्यावर आपण प्रभावित होतो ते तेथील याच इतिहासामुळे. तसे ग्राउंड फार मोठे नाही. पण तेथे आहे ती परंपरा व इतिहास. डब्ल्यू जी ग्रेस पासून सचिन तेंडुलकर पर्यंत असंख्य नवे जुने खेळाडू ज्या दारातून पॅव्हिलियन मधे जायचे/जातात तेथून आत जाताना आपल्याला काहीतरी वेगळे वाटतेच.

टूरमधे तो गाईड बरेच मजेदार, माहितीपूर्ण किस्से सांगतो. तेथील ड्रेसिंग रूम्स मधे तेथे शतक झळकवणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत त्यात असलेले अजित आगरकरचे नाव तो आवर्जून दाखवतो, तसेच सचिन, गावसकर, लारा, पॉण्टिंग ही नावे तेथे नाहीत हे ही दाखवतो (पुढच्या चार-पाच दिवसात सचिनचे लागावे). तेथे कसे कोणालाही सोडत नाहीत, अमुक/तमुक करू देत नाहीत वगैरे "आम्ही किती कडक आहोत" ची कौतुकेही अधूनमधून असतात. पण तरीही धमाल येते.

अॅशेसबद्दल बरेच असते त्यात पण इतरही खूप माहिती देतात. गाईड हलकेफुलके बोलून वातावरण जास्त गंभीर होउ देत नाहीत. स्टेडियम मधली ठराविक महत्त्वाची ठिकाणे, होम टीम व व्हिजिटर टीम ची ड्रेसिंग रूम्स, पॅव्हिलियन्स, लॉर्ड्सची ती प्रसिद्ध "लॉन्ग रूम" दाखवतात, पण या ठिकाणी फोटो काढू देत नाहीत. बाकी मग प्रेक्षकांच्या भागातून फिरताना फोटो काढता येतात. तसेच त्या मीडिया सेंटरमधे ही.

लंडनला जायचे म्हंटल्यावर बघण्याच्या लिस्टमधे लॉर्डस पहिले टाकलेच होते. तेथे टूर असते असे कळाले होते पण गर्दीमुळे बुकिंग केलेले बरे असेही कळाले. पण प्रत्यक्षात तेवढी गरज लागली नाही. सकाळी लौकर हॉटेल मधून निघून जवळच्या "बेकर स्ट्रीट" स्टेशन वर उतरलो आणि तेथून ट्यूब (अंडरग्राउंड) ची लाईन बदलून सेंट जॉन्स वूड येथे जायचे होते. पण ती लाईन नेमकी बंद होती (वीकेण्डला लंडन मधे ट्यूबच्या काही लाईन्स बर्‍याच वेळा मेन्टेनन्स साठी बंद असतात, त्याची माहिती त्यांच्या वेब साईटवर आणि स्टेशन्स मधे व्यवस्थित दिलेली असते). एकच स्टेशन एवढे अंतर होते, पर्यायी बसही होती. पण तेथील लोक म्हणाले पाचच मिनीट अंतर आहे, जा चालतच. म्हणून निघालो, पण प्रत्यक्षात अंतर बरेच निघाले. आणि त्याच रस्त्यावर बसेस असूनही घेतल्या नाहीत कारण किती पुढे जायचे आहे हेच माहीत नव्हते.

शेवटी १० च्या सुमारास पोहोचलो. आता कोणत्या गेटने जायचे, ते तेथे एक दोघांना विचारून नॉर्थ गेटने गेलो तर तेथील टीपिकल सरकारी माणूस म्हणाला तुम्हाला दुसर्‍या गेटने जावे लागेल. "जरा आतून जाऊ द्या" वगैरे म्हणून बघितले पण त्याच्या चेहर्‍यावर "आम्ही कॅमेरून साहेबांना सुद्धा येथून सोडत नाही" भाव बघून निमूटपणे त्या दुसर्‍या गेटवर गेलो. सव्वादहा झालेले. आम्हाला वाटले आता टूर डेस्कवरचा माणूस ब्रिटिश वक्तशीरपणा, परंपरा वगैरेवर एक लेक्चर देऊन पुढच्या टूरला यायला सांगणार पण तो बराच फ्रेंडली निघाला. थोडाफार उशीर तेथे चक्क चालतो. आम्ही तिकीट काढणारच होतो पण तरीही आडमुठेपणा करतील असे वाटले होते तसे झाले नाही.

जेव्हा मॅच चालू असते तेव्हा ही टूर नसते. तेव्हा तुम्ही जाणार असाल तर खात्री करून जा.

कपिल ने घेतलेला रिचर्ड्सचा तो प्रसिद्ध कॅच तेथे नक्की कोठे घेतला होता हे विचारायचे विसरलो, पण व्हिजिटर्स गॅलरीत उभे राहिल्यावर गांगुलीने शर्ट येथेच फिरवला होता ना हे विचारल्यावर "येथे येणारा प्रत्येक भारतीय ते विचारतो" हे त्याने सांगितले. पण तेथे उभे राहिल्यावर त्याचे महत्त्व जाणवते. आधीचे आपले खेळाडू तेथील संकेतांचा भंग होईल असे वागण्याची शक्यताच नव्हती. आधीच्या बर्‍याच पिढ्यांवर ते त्यांनी आपल्यावर राज्य केल्याचे बॅगेज होते, अधूनमधून त्यांच्या विरूध्द चांगले खेळताना सुद्धा चुकून एकदा जमून गेल्याचेच फिलिंग येत असे. त्यात ते एमसीसीचे जाणकार, इन्फ्लुएन्शिअल मेम्बर्स प्रचंड संख्येने आजूबाजूला बसलेले असतात. तसेच ब्रिटिश मिनिस्टर्स वगैरेही तेथे मॅच च्या वेळेस येत असणार. अशा वेळेस बहुतेक भारतीय खेळाडूंची मानसिकता त्या लोकांचा रोष ओढवेल असे काही करण्याची नसायची. नेटवेस्ट ट्रॉफी भारताने जिंकली तेव्हा आधीच्या वर्षी मुंबईत फ्लिंटॉफने फिरवलेला शर्ट गांगुलीच्या डोक्यात असावा. पण तरीही "तुम्ही आमच्याकडे असे वागलात तर आम्हीही तुमच्याकडे असेच वागू" दाखवायला जबरी हिंमत लागली असणार.

तसेच महत्त्व वाटते ते गावसकर ने नाकारलेल्या एमसीसीच्या मेम्बरशिपचे. सध्याच्या काळात एखाद्याने नाकारली तर त्याचे विशेष काही वाटणार नाही. पण ही गोष्ट आहे साधारण ८७-८८ च्या वेळची. टूरच्या वेळेस तो गाईडच सांगतो की ती मेम्बरशिप एवढी अवघड आहे की एखादा माणूस कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रचंड पैसे खर्च करून मेम्बरशिप साठी अर्ज करतो आणि त्याच्या मुलाच्या लग्नाच्या सुमारास त्याला एमसीसी कडून पहिले उत्तर येते. वीस बावीस वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सगळी सूत्रे त्यांच्याकडे असताना गावसकर ने ते नाकारण्याचेही तेवढेच महत्त्व आहे. आपल्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांच्या विरूद्ध असे फार क्वचित केले जाते.

टूर संपल्यावर आपल्याला तेथील स्टोअर मधे जाऊन लॉर्ड्सचा लोगो असलेल्या गोष्टी घेता येतात. तसेच तेथील म्युझियम मधे फिरता येते. तेथे असलेल्या एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले...भारताने जिंकलेला १९८३ चा प्रुडेन्शियल कप!

"१९८३ चा प्रुडेन्शियल कप आमच्या म्युझियम मधे आहे. तो येथे कसा? भारताने कधी तो मागितलाच नाही. तेव्हाच्या लॉर्ड्सच्या लोकांना ठामपणे वाटते की भारतीय संघ तो मागायचेच विसरला"

लॉर्ड्सच्या टूरचा गाईड आम्हाला सांगत होता. टूरनंतर तेथील संग्रहालयात नीट ठेवलेला तो कप पाहिला, कपिलच्या हातात तो उंचावलेला कप इतकी वर्षे फोटोत बघितला होता. प्रत्यक्ष बघताना जबरी वाटते. पण तो अजूनही भारतात का नाही हे मात्र समजत नाही.

हा ग्राउंडचा फोटो. यात दिसते ती तेथील पॅव्हिलियनची बिल्डिंग व आपल्याकडून बघताना उजवीकडे दिसते ती पांढरी पाहुण्या संघाची गॅलरी. आपला संघ तेथे नेहमी दिसतो मॅच च्या दिवशी. खाली पिच झाकण्यासाठी ते कव्हर वापरतात ते म्हणजे एक "हॉवरक्रॉफ्ट" आहे.
lords2.JPG

हे स्टेडियम. अत्यंत स्वच्छ वगैरे सांगायलाच नको. या बाजूने त्या मीडिया सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे. त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो.
lords1.JPG

हे मीडिया सेंटरमधून दिसणारे ग्राउंड.
lords3.JPG

हे "नर्सरी ग्राउंड". मुख्य मैदानाच्या बाजूला आहे. येथे सराव केला जातो. मॅचच्या दिवशी येथे बरेच खेळाडू असतात.
lords4.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास वर्णन..

>> या बाजूने त्या मीडिया सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे. त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो.

माझ्यामते ग्राऊंडचा स्लोप विकेटच्या डिरेक्शन मध्ये नाहीये, 'अक्रॉस द विकेट' आहे ?!? त्यामुळे पॅव्हेलिअन एण्डकडून चेंडू आपणच इन्स्विंग (उजव्या फलंदाजास) होतो.

कपिलने कॅच घेतला रिचर्ड्सचा तेव्हा मदनलाल नर्सरी एण्डकडून बोलिंग टाकत होता. डीप मिडविकेट/काऊ कॉर्नर ला तो कॅच घेतला ती जागा ग्रॅण्डस्टॅण्डच्या डाव्या बाजूला.. खाली चित्रात लाल रंगाने दाखवल्याप्रमाणे!

lord's map - kapil's catch position.png

लॉर्ड्सच्या इतक्या वार्‍या करून झाल्यात की कानाकोपरा ठाऊक असल्यासारखं वाटतं आता! Wink

टवेस्ट ट्रॉफी भारताने जिंकली तेव्हा आधीच्या वर्षी मुंबईत फ्लिंटॉफने फिरवलेला शर्ट गांगुलीच्या डोक्यात असावा. पण तरीही "तुम्ही आमच्याकडे असे वागलात तर आम्हीही तुमच्याकडे असेच वागू" दाखवायला जबरी हिंमत लागली असणार >>

दादाचे शर्ट फिरवणे लोकांना आवडले नाही, पण मला आवडले. त्या निमित्ताने दादासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत.

माझ्यामते ग्राऊंडचा स्लोप विकेटच्या डिरेक्शन मध्ये नाहीये, 'अक्रॉस द विकेट' आहे >>> हो मला तसेच म्हणायचे होते - त्या फोटोच्या संदर्भात आपल्याकडून विरूद्ध दिशेला. त्या स्टॅण्डची उंची ग्राउंडच्या जमिनीवरून कमीजास्त जाणवते प्रत्यक्ष तेथे गेल्यावर.

देवचार - नकाशा व माहितीबद्दल धन्यवाद!

फारेंडा, मस्त लिहिलं आहेस.. साधारण क्रिकेट ग्राऊंड गोल असतं पण हे ग्राऊंड आयताकार आहे ते पाहून मजा वाटलेली.. ते मिडीया सेंटर लई भारी आहे !आम्ही गेलो होतो त्यावेळी त्या टूर गाईडला फार माज होता... ग्रॅमी हीक तोंड फाटेस्तोवर स्तुती करायला लागल्यावर मी त्याच्याकडे तु.क. टाकले !

तेव्हा काढलेले फोटो हार्डकॉपीज आहेत नाहितर झब्बू दिला असता..

दादाचे शर्ट फिरवणे लोकांना आवडले नाही, पण मला आवडले >>>> मला पण.. Happy

मस्त माहिती दिली आहेस अमोल. मजा आली वाचायला.
गांगुलीने भारतीय संघाला अ‍ॅटीट्यूड शिकवली म्हणायला हरकत नाही.
आणि गावसकर महान आहे तो केवळ त्याच्या खेळीमुळे नव्हे तर त्याच्या ह्या वागण्यामुळेही.. Happy

लॉर्डसच्या छान 'गाईडेड टूर'बद्दल धन्यवाद.
इतर देशातील खेळाडू व क्रिकेटप्रेमीनी लॉर्डसबद्दल स्वतःचं स्वतंत्र मत बनवणं जितकं योग्य तितकंच इंग्रज आपल्या क्रिकेटबद्दल व संबधित गोष्टींबद्दल जो अभिमान बाळगतात त्याने भारावून जाणंही !

मस्स्तच लिहिलंय Happy फोटो पण आवडले.

तसेच सचिन, गावसकर, लारा, पॉण्टिंग ही नावे तेथे नाहीत हे ही दाखवतो >>> ही ४ नावं नसतानाही त्या मैदानाची इतकी शान आहे. ती लागली असती तर काय !!

पण व्हिजिटर्स गॅलरीत उभे राहिल्यावर गांगुलीने शर्ट येथेच फिरवला होता ना हे विचारल्यावर "येथे येणारा प्रत्येक भारतीय ते विचारतो" हे त्याने सांगितले. पण तेथे उभे राहिल्यावर त्याचे महत्त्व जाणवते. >>> सहीच !! Happy

या बाजूने त्या मीडिया सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे. त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो. >>> ह्म्म्म! काल कमेंटेटर्स या उताराबद्दल बोलत होते. इशांत शर्मा ज्या बाजूने गोलंदाजी करत होता (बहुतेक पॅव्हेलियन बाजू) त्या बाजूने त्या उताराचा फायदा उठवणं त्याला जमत नव्हतं. त्यापेक्षा झहीरला त्या बाजूने गोलंदाजी द्यावी असं त्यांचं मत होतं.

सही Happy

मस्त टूर...

दादानी काढलेला शर्ट ही जबरी घटना आहे लॉर्डस वरची...

सचिनचे नाव लवकर लागू दे तिकडच्या पाटीवर.. पावसाची कृपा झाल्यास लागायची शक्यता आहे.. नाहीतर ती पाटी सचिनच्य नावाशिवायच..

छान वर्णन आहे. वाचून लॉर्डस एकदा बघावसं वाटतंय.

>>> आणि गावसकर महान आहे तो केवळ त्याच्या खेळीमुळे नव्हे तर त्याच्या ह्या वागण्यामुळेही..

सहमत. अरे ला कारे म्हणून प्रत्युत्तर देण्यासाठी तो फार पूर्वीपासूनच प्रसिध्द आहे. त्याने पाकिस्तानमध्ये नूरजहा या गायिकेलाही सडेतोड उत्तर देऊन गप्प केले होते.

>>> नेटवेस्ट ट्रॉफी भारताने जिंकली तेव्हा आधीच्या वर्षी मुंबईत फ्लिंटॉफने फिरवलेला शर्ट गांगुलीच्या डोक्यात असावा.

ते होतंच. तसेच सामन्यात विजयासाठी १०-१२ धावा हव्या असताना पंचांनी, इंग्लंडच्या गोलंदाजांनी २ वेळा लेगच्या बाहेर वाईड टाकलेला चेंडू वाईड दिला नव्हता, तोही राग त्याच्या मनात असावा.

पुढच्या चार-पाच दिवसात सचिनचे लागावे >>> आमेन.

गांगुलीने भारतीय संघाला अ‍ॅटिट्युड शिकवलाच Happy मला तरी त्याचे ते शर्ट भिरकावणे इतके आवडले की मला गांगुली भेटल्यावर पण मी त्याला "त्यावेळेला तुला काय वाटलं?" हाच प्रश्न पहिला विचारला होता. त्यावर त्याने डोळे मिचकावून "मला माझ्या प्लेयर्सचा गर्व वाटला होता" असे उत्तर दिले होते.