तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास.
पण आज काही जमतंच नव्हतं. त्या लॅंपपोस्टाकडे टक लावून त्याचं बघणं चालू होतं. तो पिवळा दिवा, त्याच्या आजूबाजूला भिरभिरणारे किडे, मग त्या खांबावर वरून खालवर कमी कमी होत जाणार्या उजेडाची ग्रेडेशन्स, बाहेरून पिवळे आणि आतून अर्धे अंधारलेले असे त्याच्या खिडकीचे गज, ह्या सगळ्या मधल्या अवकाशात बांधून खेळत बागडत येणारा पिवळा प्रकाश आणि मग दिव्याहून दूर येत येत थकल्यावर यथाशक्ती त्या सीएफेली पांढर्यात एक होणं किंवा त्या दिव्याच्या आठवणीचं थोडंसं पिवळेपण टिकवून ठेवणं असं काय काय त्यानी पाह्यलं. खोलीतल्या शांततेचा, झोपलेल्या रूममेटचा, त्याच्या चुळबुळीचा, रातकिड्यांचा, गुरख्याच्या काठीचा, दूर कुठल्यातरी गाडीच्या हॉर्नचा असे अनेक आवाज शांततेसोबत ऐकून झाले. पण...
तो उठलाच. दिवा बंद करून पडला पलंगावर. एकाएकी त्याला भरून आलं, तिच्या आठवणींनी. ती...
ती यायची आणि त्याच्या रंगतुटक्या भिंतींवर काजळाचा टिळा लावून जायची; ती गेल्यावर त्याला एकटं वाटू नये म्हणून. ती यायची ते खूप बोलायला, सोबत जेवायला, त्याच्यावर खूप प्रेम करायला... मनसोक्त हुंदडायची, गोंधळ घालायची. तिचं अस्तित्व त्याला अगदी हलवून टाकायचं आतून. त्याचं अर्धवट लिखाण, ड्रॉवरमधल्या तुटक्या निबा तिला वेडावून दाखवतायत की काय असं व्हायचं. मग ती कागद फाईल करून ठेवायची व्यवस्थित. एखादा आवडलाच पॅरेग्राफ तर हलकेच ओठ टेकवायची. पण काळी शाई कधीच लागली नाही तिच्या गुलाबी ओठांना आणि त्यालाही कधीच संधी मिळाली नाही तिचे ओठ पुसून घ्यायची. तिचं येणं म्हणजे त्याला नेहमीच गरम सूर्यप्रकाशात चमकून उठणार्या नाजूकशा फुलासारखं वाटायचं. उन्हानं डोळ्यावर येणार्या आठ्या क्षणात गायब करणारं.
त्या काजळटिळ्यांची आठवण येताच तो धडपडत उठला. मोबाईलच्या प्रकाशात ते टिळे त्यानी मोजले. अगदी प्रत्येकाला हात लावत, तो तिला हात लावे तितक्याच प्रेमाने. अठ्ठावीस भरले. "अठ्ठावीस वेळा ती इथे येऊन गेलीये. दर वेळेस जाताना उजव्या डोळ्याला काजळ पारखं करून गेलीये. ते पापणी मिटत डोळ्यातलं काजळ हलकेच बोटावर घेणं आणि मग ते भिंतीवर पुसताना खट्याळपणे थेट डोळ्यांत बघणं" तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागला. अचानक रूममेटनं कूस बदलल्यानं तो भानावर आला. त्याच्या रूममेटला हे आधीच खराब भिंती अजूनच खराब करणं वाटे. "काय असतात एकेक माणसं!" असं म्हणत तो परत एकदा गादीवर पडला. डोळे टक्क उघडे. तो असा झोपलेला असताना तिला त्याच्या पायाची बोटं मोडायला फार आवडे. नुसत्या आठवणीनेच त्याची पायाची बोटं आवळली गेली अन् तो परत एकदा स्वतःशीच हसला.
ती गावी गेल्यापासून त्याच्यावर असे स्वतःशीच संवाद साधण्याचे प्रसंग फार येत. इलाज नव्हता. अशा वेडपट स्वसंवादांतून तो दिवास्वप्नांकडे जाई आणि मग त्याची अपूर्ण स्वप्नांची यादी अजूनच वाढे. फार काही नाही तरी पहाटे लवकर उठून, नीट स्वच्छ आवरून वगैरे तो लिहायला बसलाय आणि लॅंपपोस्टाऐवजी सकाळचा व्हिटॅमिन डी वाला प्रकाश येतोय असं काहीतरी स्वप्न त्याला पडलं. आणि ते त्याच्या इतर स्वप्नांइतकंच अशक्य ही वाटलं. अशाच स्वप्नांच्या भेंडोळ्यात ओढला जाऊन तो झोपला कधीतरी. सकाळी जरा लवकरच उठला तेव्हा त्याच्या टेबलावर ऊन पडलं होतं, व्हिटॅमिन डी वालं.
रूममेट आवरून निघतच होता; त्याच्या लवकर उठण्याबाबत एक साश्चर्य टॉण्ट मारून ऑफिसला गेला. टॉण्टाकडे जरासं ही लक्ष न देता तो तडक उठला आणि त्या व्हिटॅमिन डी वाल्या उन्हात जाऊन बसला. कागदांकडे क्षणभरच पाहिलं अन् पेन उचलून कुरूकुरू लिहू लागला. गरळ ओकण्याइतकं अनावर झालेलं ते लिखाण असं सलग एकटाकी बाहेर पडलेलं पाहून त्यालाही बरं वाटलं. पेन बंद करून ठेवलं. आळस देत उठला दात घासायला. दात घासून आरामात मोकळा वगैरे होऊन तो बाहेर आला. गॅलरीत उभं राहून कोपर्यावरच्या चहावाल्याला हाक मारली. त्याचा पोर्या चहा घेऊन येई येई पर्यंतच त्याला सकाळचा कंटाळा येऊ लागला. तरीही दिवस इतका निवांत कसा असा विचार करत चहा पिता पिताच मोबाईलकडे गेला. मोबाईल बंद पडलेला. तो घाईघाईने चार्जिंगला लावून चहावाल्याला अजून एक सांगायला तो गॅलरीत जात नाही तोच सिरीयलवाल्याचा फोन.
त्याच्या आजवरच्या लेखन कारकिर्दीतलं घरून बाहेर पडून स्क्रिप्ट पोचवणं हेच काम त्याला आवडत नसे. तसा त्याने रूमवर टिव्ही न ठेवण्याचा शहाणपणा दाखवलाच होता. रोज सकाळी स्क्रिप्ट पोचवणं आणि आठवड्यातून एकदा पाकिट घेऊन येणं यात खंड फक्त ती असतानाच पडे. त्याने फक्त लिहीत जावं असंच तिला वाटे. तो कधीकधी मस्करीत तिला "उपदेशपांडे" म्हणे पण पुलंच्या पासंगालाही आपण पुरत नाही ह्या जाणिवेचा त्याला चिमटाही बसे.
इतर हजार सिरीयल्ससारखीच त्याची ही एक सिरीयल होती. सासू, सून, संपत्तीवरून हेवेदावे सगळा नेहमीचाच मसाला असे. फार काही ग्रेट करत नसल्याची जाणीव त्यालाही होती. सगळं सवयीचंच होतं. तरी तो ते मन लावून करे. तो वाईट लिहू लागला की त्याला झोप यायची. किंवा त्याला लिहीता लिहीता झोप येऊ लागली की आपण वाईट लिहीतोय असं तो समजत असे. आणि मग तिच्या विचारात गुंते किंवा अगदीच काही नाही तर लॅंपपोस्टाकडे बघत बसे. पण मग तो उठलाच. आवरून स्क्रिप्ट घेऊन निघाला तरातरा. तीन झेरॉक्स काढल्या. दोन द्यायला आणि एक स्वतःजवळ असावी म्हणून. तो नाक्यावर पोचेपर्यंत प्रॉडक्शनचा माणूस बाईकवर तयारच होता.
पोटापुरतं लिहून झाल्यावर त्याचं तंगड्या वर करून लोळत पडणं तिला मुळीच पटायचं नाही. मग ती त्याचं शब्दशः बासनात गुंडाळून ठेवलेलं कादंबरीचं बाड बाहेर काढे. आणि त्याला लिहायला बसवी. कादंबरीतही त्याच्यासारखाच कुणीतरी होता, त्याचं एक वेगळं आयुष्य होतं. सुखदुःखांसहित जगणं मरणंही होतं. तो या कादंबरी विश्वाचा निर्माता होता. मग ती कधी लाडात आली की त्याला ब्रह्मदेव म्हणे. आणि ब्रह्मदेवाची गर्लफ्रेंड कोण या विचारानं तो बावचळे. तसंही त्याचं पुराणाबिराणांबद्दलचं ज्ञान रामायण महाभारतापुरतंच होतं. आणि मग तिने मस्करीत त्याच्या छातीवर चिमटा काढला की मग कसला विचार आणि कसलं काय. या विचारासरशी तो प्रचंड नॉस्टॅल्जिक झाला. मग बिल्डींगचा उरलेला अर्धा जिना धावतच वर आला. कुलूप काढलं. दार धाडकन लावून दिलं. टेबलाखालून ते कादंबरीचं बासन मांडीत घेऊन तो पलंगावर विसावला. शेवटच्या पानावर त्यानं त्याची सही करून ठेवलेली. त्याच सहीच्या बाजूला ती सुद्धा जाता जाता तिची सही ठोकून गेली होती.
तो ब्रह्मदेव असलेल्या त्या सृष्टीतला अजून एक तो. एक सुशिक्षीत तरूण, त्याची प्रेयसी, त्याची नोकरी, त्याचं वर्तुळ या सगळ्याचा एक वास्तववादी आणि समकालीन वेध, त्या तरूणाच्या समाजजीवनाच्या विस्तृत विवेचनासह तो घेत चालला होता. कादंबरीतल्या शहरात एक दंगल होते. दोघंही आपापल्या घरात दडून बसलेले असतात. त्यांच्यातला कोणीही जात, धर्म, पैसा, लुटालूट किंवा माणुसकी ह्यातल्या कुठल्याही कारणाने घराबाहेर पडत नाही. तो फक्त स्वतःचा जीव वाचवून घरात बसून असतो. ती तिच्या घरी. फार नाही चार पाच फ्लायओव्हर्स दूर. ते ही अंतर त्याला फार वाटतं. मग टिप्पीकल हिरोसारखं भर दंगलीतून तीला भेटावसं, घरी आणावसं वाटतं रहातं. पण तो करत काहीच नाही. एकटाच उरतो. तिलाही स्वतःच्याच घरी, भावंडांसोबत, असुरक्षित वाटत रहातं. ती ही तसं वाटून घेत रहाते. गप्प बसते. दंगलीला तोंड फुटण्यापासून तो लिहीत सुटला तो थेट इथपर्यंत. त्यांच्या तुटल्या मनस्थितीत अजून खोल शिरून शब्द बाहेर काढणं त्याला अशक्य झालं. तो अस्वस्थ झाला. शेवटी एक खणखणीत शिवी हासडून कादंबरी आणि तिच्यातलं त्यानं स्वतःच निर्माण केलेलं जग गादीवर आपटून तो चहा प्यायला घराबाहेर पडला.
लेख पोस्ट करूनही दिसत नसल्याच्या कारणास्तव दोन भागात विभागून टाकून बघतो...
हा पहिला भाग पोस्ट करतोय.
ग्रामिण मुंबईकर ,
ग्रामिण मुंबईकर , मदतपुस्तिकेत लेखनासंबंधी प्रश्न विभागात कथा अथवा लेख दिसत नाही हा धागा आहे. त्यात सांगितल्यानुसार
>>
एखाद्या कथेत/लेखात जर परिच्छेद खूपच मोठा असला त्यावेळेसही असे होते आहे. कथेत/लेखात योग्य ते परिच्छेद दिल्यास कथा/लेख दिसू लागेल.
<<
बदल केल्यावर कथा दिसू लागेल.
छान!!!
छान!!!
ग्रामिण मुंबईकर, तुमच लेख
ग्रामिण मुंबईकर, तुमच लेख अजूनही दिसत नाहीये...
आता दिसतंय...
आता दिसतंय...
पुढे वाट बघत आहे
पुढे वाट बघत आहे