'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने..

Submitted by मी मुक्ता.. on 19 March, 2011 - 04:41

simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच. कारण स्त्रीविषयीची जीवशास्त्रीय सत्यं, तिचा इतिहास, मिथ्यके, जडणघडण, तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचा तिचा वावर, त्या भुमिका आणि तिच्या मानसिक अवस्था या सगळ्याच गोष्टींचा तर्कसंगत आणि सविस्तर उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
आता, इथे हा लेख वाचणार्‍या बर्‍याच स्त्रिया खर्‍या अर्थाने स्वतंत्र व्यक्ती म्हणुन जगत/वावरत असल्या आणि पुरुष स्त्रियांनी माणुस म्हणुन जगण्याच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते असले तरी या सर्वांची सुरुवात कुठे झाली? काय, कसे व कधी? या सर्वांची उत्तरं मिळवायला, घडणार्‍या परिस्थितीचे मानसशास्त्रीय विश्लेषण करायला हे पुस्तक वाचण अपरिहार्य आहे.
'Woman is not born but made' पुस्तकातील अर्पणपत्रिकेच्या जागी असलेलं हे वाक्य. या वाक्यावरच थांबुन आपण विचार करु लागतो आणि त्यानंतर मांडलेल्या प्रत्येक सिद्धांतावर, स्पष्टीकरणवर थांबुन, विचार करुन, स्वतःचं परिक्षण करुन मगच पुढे जाणं ह क्रम बनुन जातो.
माझ्याविषयीच बोलायचं झालं तर, आमच्या घरात कधीच मुलगा-मुलगी असा भेद नाही केला गेला आम्हा भावंडांमध्ये, परंतु पितृसत्ताक पद्धती नक्की पाहिली. कुटुंबप्रमुख म्हणुन वडिलांची ठेवली जाणारी बडदास्त लक्षात येण्याइतकी उघड होती. खरतर त्यांची निर्णयक्षमता आणि तो निर्णय प्रत्यक्षात आणण्याची हातोटी आईच्या तुलनेत डावी असतानादेखिल त्यांना निर्णयस्वातंत्र्य सहज मिळते ज्यासाठी आईला झगडावं लागतं हे कळ्त होतं. किंबहुना हे असं का, ही परिस्थिती का घडली याचं विश्लेषण करण्यात मी माझ्या बालपणाचा बराच काळ खर्ची केला. पण ही परिस्थिती घडण्यामागची मानसशास्त्रची एक धूसरशी कल्पना जी मनात येत होती ती धडधडीतपणे, सुर्यप्र्काशासारखी लख्ख समोर आली या पुस्तकाच्या निमित्ताने. आणि पुन्हा एकदा वैश्विक सत्याचा सा़क्षात्कार झाला म्हणायला हरकत नाही.
घरात मुलं वाढवताना तरी समानता असल्यामुळे यातल्या बर्‍याच गोष्टी वाचताना अपरिचित वाटल्या पण थोडाच वेळ. लगेचच आपल्या आजुबाजूला, ऐकिव आणि माहितीतल्या गोष्टी आठवतात आणि सहजपणे दिलेल्या स्पष्टीकरणाचं समर्थन करतात.
पुस्तकाचं एवढं कौतुक ऐकुनही खरतर वाचायला घेताना मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी धाकधुक होतीच की परदेशी स्पष्टीकरणं, तिथल्या सामाजिक परिस्थितीच्या आणि सुधारणवादी कल्पनांच्या अनुषंगाने केलेला उहापोह भारतीय समाजाला कितपत लागु होईल? पण स्त्रीचा हा धांडोळा वैश्विक आहे. बर्‍याचशा गोष्टी वाचताना तर ती भारतीय समाजाविषयीच बोलतेय किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीची पुर्ण जाणिव असलेल्या माणसाचंच हे लिखाण आहे असं वाटतं.
मला आठवत नाही नक्की केव्हापासून पण १२-१३ वर्षांची असल्यापासून, जेव्हापासून स्त्री-पुरुष भेदाची सामाजिक जाणिव व्हायला लागली तेव्हापासून स्वत:ला माणुस म्हणुनच वागणुक मिळावी या बाबतीत मी आग्रही आहे माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकच व्यक्तीकडून. गेलं एक तप स्वतःचं हे भान जाणिवपुर्वक सांभाळलय मी आणि इतरांनाही सांगितलय. हो, जाणिवपुर्वकच. कारण तुम्ही जरा बेसावध राहिलात तरी लगेच हे फरक, ही विषमता आग्रही/मोठी होऊन बसते. स्त्रियांवर केले जाणारे टिपिकल विनोद जेव्हापासून ऐकले तेव्हापासुन आपल्याला असं व्हायचं नाही हे पक्कं ठरवलेलं मनाशी. कारण त्या विनोदांत अतिशयोक्तीचा भाग असला तरी त्याची थोडी थोडी झलक मी आजुबाजूच्या बायका-मुलींच्यात बघतच होते. पण त्यावेळी स्त्री-पुरुष समानतेपेक्षापण आपल्याला दोन्हीचे चांगले गुण घेवुन जास्तीत जास्त चांगलं, पुर्ण आणि स्वतंत्र व्हायचं आहे हे ठरवलं होतं. त्यामुळे समारंभ असो की ऑफिस, ५-७ मिनिटात तयार होवुन बाहेर पडणं किंवा खरेदीचा कंटाळा, तिसर्‍या व्यक्तीविषयी चर्चा चाललेली असते अशा ग्रूपमध्ये न जाणं या गोष्टी माझ्या नैसर्गिक आहेत की त्या ऐकलेल्या, वाचलेल्या विनोदांवर प्रतिक्रिया म्हणुन आल्यात याचा शोध घेणं अवघड आहे. (आत्ममग्नतेमधून इतरांच्या खाजगी गोष्टींविषयी असलेली अलिप्तता किंवा स्वभावात असलेला मृदूपणाचा किंवा गोडव्याचा अभाव या गोष्टी मात्र १००% नैसर्गिकच.. Lol असो..)
पुस्तकातल्या बर्‍याचशा गोष्टी तर मला अशा वाटल्या की अगदी माझ्यावरुनच लिहिल्यात की काय? निसर्गाकडे लहानपणीपासूनच ओढा होता पण निसर्गाच्या प्रेमात पडावं, त्याच्याशी एकरुप होण्याची ओढ वाटावी याचं माझ्यापुरतं कारण मी १५व्या वर्षी शोधलेलं की ते एक असं ठिकाण आहे जिथे मला माझ्या स्त्री असण्याची बंधनं किंवा वेगळेपणा भोगावा लागणार नाही.. एक असं ठिकाण जिथे माझं स्त्री असणं आड येत नाही. जिथे माझी ओळख स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन फक्त एक माणुस म्हणुन असेल. आता १५ वर्षांच वय म्हणजे स्त्री म्हणुन मिळणारी वेगळी वागणुक लक्षात येण्याचं आणि त्याचा अतीव राग, चीड मनात दाटण्याचं वय. आणि स्त्रियांच्या निसर्गाकडे असण्याच्या ओढ्याचं स्पष्टीकरण पुस्तकात पाहिलम तेव्हा स्वतःविषयीच नविन शोध लागल्यासारखं वाटलं मला. आणि अशा शोध लागण्याच्या आणि अचंबित होण्याच्या वेळा पुस्तक वाचताना अनेकदा येतात.
अजुनही मला माझ्या आयुष्यातले काही क्षण अगदी प्रकर्षाने आठवतात ज्या क्षणी मी विचार केला होता की,"बर्‍याच मुली इतकही नाही करत", किंवा "बर्‍याच मुली इतकाही विचार नाही करत, मी तरी बरी!" आणि पुढच्याच क्षणी पाल अंगावर पडल्यासारखी सटपटले होते. मुली?? माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का? की एका क्षणासाठी का होईना पण असा विचार माझ्या मनात यावा? कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या अंतर्मनावर होणारे संस्कार, परिणाम दूर ठेवणं जड जातं. अष्टोप्रहर जागृत रहावं लागतं त्यासाठी, कारण मोठं झाल्यावर क्वचित का होईना पण माझ्या सातमजली हसण्याबद्दल किंवा आडदांड वागण्याबद्दल भुवया वर गेलेल्या पाहिल्यात मी.
मी एक प्रवास सुरु केलाय आणि मला नक्की माहित आहे की त्यात सुख, सोय फारशी नसली तरी स्वातंत्र्य आणि समाधान नक्कीच आहे. या टप्यावर मला हे पुस्तक वाचायला मिळालं ही व्यक्तिशः माझ्या फायद्याची गोष्ट वाटते मला. या पुस्तकाने माझ्या संकल्पना अधिक सुस्पष्ट आणि स्वच्छ झाल्या आहेत, घटनांच्या, सवयींच्या कारणमीमांसा अधिक आशयघन झाल्यात हे नक्की. प्रत्येक स्त्री-पुरुषाने नक्की वाचावं असं पुस्तक आहे हे. त्या निमित्ताने आपल्या वागण्याचं आणि आपल्या आजुबाजूच्या सर्वच व्यक्तींच्या वागण्याचं परिक्षण अधिक चांगल्या प्रकारे करु शकू आपण.
पुस्तकाच्या सुरुवातीला सिमोनचा परिचय आणि अल्पचरित्र दिलय. त्यातल्या मतमतांतरात काही पटतं, काही नाही पटत. अगदीच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तिच्यावर झालेला आरोप की 'ती वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत हॉटेलात राहिली. पुरुषांसारखं सडेफटींग रहाणं म्हणजेच चांगलं असा चुकीचा आदर्श तिने घालुन दिला' पण मला वाटतम की अशा intellectual किंवा philosophical पातळीच्या माणसाचं ते लक्षन असु शकतं. त्या उंचीला तिचं स्त्री असणं किंवा पुरुष असणं याचा काही फरक पडत नाही. ही गोष्ट सगळ्यात कमी महत्वाची असते अशा ठिकाणी. त्यामुळे तिचं तसं वागणं हा तिच्या त्य स्वभावाचा भाग झाला, पुरुषी अनुकरणाचा नाही. असो.. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथेच पुस्तकाच्या गुणदोषांचीपण समीक्षा केली आहे. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की या सगळ्या गुणदोषांसह हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल.
याहीपुढे जाऊन 'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने "Man is not born but made" म्हणत पुरुष जर त्यांच्या घडणीचा विचार आणि विवेचन करु शकले तर खूप चांगलं होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्ता अतिशय सुंदर लिहिले आहे,
मागच्या वर्षापासून हे पुस्तक वाचेन अस मनात होत. TISS मधे एक teacher ने strongely reccomand केल होत.
मागच्या वर्षी ह्याची इंग्लिश कॉपी मिलालेली, अणि मी मराठीत जास्त comfortable अस्ल्यामुले अता नक्कीच वाचेन. थंक्स

गीतु.. नक्की नक्की.. Happy खरतर मी पण मराठी भाषांतराच्या शोधात होते. इतके दिवस मलाही माहिती नव्हतं की मराठी भाषांतर उपलब्ध आहे. खूप शोधलं. परवा महिला दिनाच्या आधी मटाच्या पुवरणीत लेख वाचला तेव्हा कळलं की मराठीत आहे. १० दुकानं शोधुन, एकाला पुस्तक आणायला लावुन मिळवलं शेवटी.. Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

रैना.. Happy ह्म्म... त्या पुस्तकावर लिहावं म्हटलं तर बरच काही आहे पण पुस्तकाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांत मी जे अनुभवलं किंवा जो विचार केला तो लिहिला आधी. म्हणुनच तर नाव 'द सेकंड सेक्स्'च्या निमित्ताने असं दिलय. पुस्तकाचा सारांश समर्पकपणे लिहिता येण्याचा प्रयत्न करते जमेल तसा लवकरच.. Happy खूप खूप आभार...

प्रतिसादाबद्दल आभार वैद्यबुवा.. Happy

आवडले कारण अत्यंत प्रामाणिक आहे.
माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का?>>> हा इतका आटापिटा कशासाठी ते मात्र मला कळले नाही. स्वतःच्या स्त्रीत्वापासून तू किती स्वतःला किती दूर ठेउ शकणार आहेस?
आत्ममग्नतेमधून इतरांच्या खाजगी गोष्टींविषयी असलेली अलिप्तता किंवा स्वभावात असलेला मृदूपणाचा किंवा गोडव्याचा अभाव या गोष्टी मात्र १००% नैसर्गिकच>>> हे एकदम डीट्टो!!!

आगाऊ, स्त्रीत्वापासून दूर जायचा अट्टहास नाहिये किंवा तसा प्रयत्न पण नाहिये कारण मला स्वतःला माझं स्त्री असणं आवडतं. त्याचा आदर वाटतो. छान वाटतं. पण त्यासोबत स्त्री म्हणुन वेगळं काहितरी मिळावं असं मला चुकूनही वाटू नये असं वाटतं मला. माणुस म्हणुन जगणं खूप महत्वाचं आहे बाकी सगळ्यांपेक्षा.. Happy
प्रतिसादाबद्दल आभार.. Happy
आपल्याला फारच पटलेलं दिसतय मृदूपणाचं॑ विधान.. Lol

प्रामाणीकपणे लिहिलय, न आवडण्याचा प्रश्नच येऊ शकत नाहि.
--------------------------

पण त्यावेळी स्त्री-पुरुष समानतेपेक्षापण आपल्याला दोन्हीचे चांगले गुण घेवुन जास्तीत जास्त चांगलं, पुर्ण आणि स्वतंत्र व्हायचं आहे हे ठरवलं होतं

माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का? की एका क्षणासाठी का होईना पण असा विचार माझ्या मनात यावा?

कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या अंतर्मनावर होणारे संस्कार, परिणाम दूर ठेवणं जड जातं.

>>वरच्या तिन्हींमधे सुवर्णमध्य साधणे प्रचंड कष्ट्प्रद आहे, तुमच्या प्रवासाला सदिच्छा !!!

'Woman is not born but made' >>> Sad

पुस्तक वाचावंसं वाटतंय..

सुंदर परिचय करुन दिलाय्....पुस्तक वाचावसं वाटतंय.प्रकाशकाचं नाव सांगणार का ?

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

chamaki, पद्मगंधा प्रकाशन. ४५० रु. किंमत आहे.

गजानन, Woman is not born but made हे वाक्य मी खूप दिवस आधी वाचलं होतं सिमोन ची माहिती वाचतानाच आणि तेव्हाच विचार आलेला की Man is also not born but made. नंतर पाहिलं तर पुस्तकाच्या प्रस्तावनेत देखिल हे वाक्य आहे.. Happy

मानवाचे निसर्गाकडे आकृष्ट होणे हे नैसर्गीक पण असु शकेल ना?

Rather than man or woman being made (instead of being born), its children who are made into human of the sex they are born with (आपल्यातले बहुतांश तरी). ते नेमके काय (कोणत्या प्रकारचे मानव) बनतात हे समाज व घरातील nurture वरुन ठरते. आणि कधीकधी nurture च्या विरुद्ध जावुनही घडते (बहुदा तुमच्या बाबतीत असे घडले असावे). या करता डोळस असायची आवश्यकता असते. समग्र पालकांनी हे जाणुनबुजुन केले तर ते सर्वांच्याच दृष्टीने चांगले होईल.

> तेव्हापासून स्वत:ला माणुस म्हणुनच वागणुक मिळावी या बाबतीत मी आग्रही आहे

याकरता काय केले हे सांगीतलेत तर इतरांना मदत होईल.

अतिशय अतिशय प्रामाणिक लेखन.. मुक्ता, अभिनंदन. स्त्रीनं आधी एक माणूस म्हणून स्वतःचं आत्मभान जागृत ठेवणं सोपं नाही. ती अधिक आतली संवेदना आहे. प्रत्येकाचीच ती पहिली संवेदना आहे अन तीच अधिक कसोशीनं जपायला हवी. पुरुष, स्त्री, जात, धर्मं, देश हे सगळे त्यावरले पापुद्रे. सहजासहजी विलग करता येणार नाहीत असे.
जेव्हा संयुक्तावर स्त्री-मुक्ती विषयावर मला खो मिळाल्यावर मी अडखळले. एव्हढ्यासाठीच की, वेगवेगळ्या प्रसंगांमधलं माझं स्वत:चं वागणं मलाच संभ्रमात टाकत होतं. माझी नक्की भुमिका काय ते कळेपर्यंत काहीही लिहिणं मला पटलं नाही.
आज हा लेख वाचल्यावर लक्षात आलय की त्या सगळ्या वागण्याची जमीन एकच होती का ह्याचा विचार करायला हवाय...
मुक्ता, लाख धन्यवाद त्यासाठी.

मुक्ता, निखळ प्रामाणिक लिहीलेस. आवडलेच.
आत्ममग्नतेमधून इतरांच्या खाजगी गोष्टींविषयी असलेली अलिप्तता किंवा स्वभावात असलेला मृदूपणाचा किंवा गोडव्याचा अभाव या गोष्टी मात्र १००% नैसर्गिकच>> यू सेड इट! Happy

खरंच खूप प्रामाणिक व सडेतोड विचारमांडणी.....
पुस्तकाविषयी खूप कुतुहल निर्माण झालंय..
मनोमन आभार.....

प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

दाद, आपल्याला सापडलेले निष्कर्ष जाणुन घ्यायला खूप आवडेल.. Happy

आशूडी.. Happy

aschig,
मानवाचे निसर्गाकडे आकृष्ट होणे हे नैसर्गीक पण असु शकेल ना? >>
अर्थातच.. तो माणसाचा गुणधर्म आहे. पण याचं प्रमाण स्त्रियांमध्ये का जास्त आहे याचा मानसशास्त्रिय उहापोह पुस्तकात केलाय. जो मला माझ्या बाबतीत पटला.

जेव्हा कोणताही निष्कर्ष काढला जातो तेव्हा जनरल मास आणि त्यांची मानसिकता धरुन काढतात. असे निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीला लागु होतीलच असं नाही. त्यामुळे काही गोष्टींचा आपल्याला अनुभव नसला तरी समाजात आपण अशी उदाहरणे पाहु शकतो.

Rather than man or woman being made (instead of being born), its children who are made into human of the sex they are born with >>
I found this statement same as "woman/man is not born but made." Indeed when we say "made", it means made from a child to human of the sex they belong. What kind of a person you turn into, its a different thing. The book talks about not letting a child grow with his/her natural instinct and force them to adapt characteristics which are defined for that sex over the history.

याकरता काय केले हे सांगीतलेत तर इतरांना मदत होईल. >>
मी काही फार मोठी क्रांती केलेली नाही पण मला जमेल तसं माझ्या संपर्कात येणार्‍या माणसांना स्त्री ही आधी माणुस असते हे पटवुन द्यायचा प्रयत्न केलाय. उदा. मेकॅनिकल चे वर्कशॉप जॉब करताना तिथले सर किंवा सुपरवायजर मुद्दाम मुला-मुलींचे ग्रूप करायचे कारण मुलींना जॉब झेपणार नाही वगैरे. आणि मुलांच्या ग्रूपसोबत त्यांचा पण जॉब होऊन जाईल म्हणुन. मी कोणत्याही वर्षी कोणत्याच जॉबसाठी मुलांची मदत घेतली नाही आणि बाकी मुलींना पण हे पटवुन दिलं की त्या करु शकतात. आमच्या बॅचमधल्या सगळ्या मुलींचे जॉब मुलांच्या आधी तयार होते. इतरही काही प्रसंग आहेत. मी कोणतीही गोष्ट मुलगी आहे या सबबीखाली टाळली नाहिये. किंवा स्त्री दाक्षिण्याच्या नावाखाली मिळवली नाहिये. नाटकाच्या, शो च्या प्रक्टिसनंतर मला सोडायला या म्हटले नाही कोणाला. तू मुलगी असुनही असं का, एकटी कशी जातेस? असल्या प्रश्नांना जिथल्या तिथे उत्तरं दिलियेत. यातून फार लोकांची मतं बदलली असतील असं नाही. पण थोडाफार परिणाम नक्कीच झाला..

यावेळच्या लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत 'शब्दाला शब्द' या सदराअंतर्गत करुणा गोखले यांचे या भाषांतराविषयी मनोगत आले आहे. अगदी वाचण्याजोगा आहे हा लेख. ही त्याची लिंक -

http://epaper.loksatta.com/2156/indian-express/21-03-2011#p=page:n=23:z=2

Pages