मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 March, 2011 - 16:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी लाल मोहरी
एक टीस्पून हळद
दोन टीस्पून कच्चा हिंग
तीन ते चार टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मेथीदाणे
पाच-सहा लिंबांचा रस
एक टीस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.
एक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.
उरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
वरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.

अधिक टिपा: 

काळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त. Happy
लाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)
चवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.
लिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी. फोटो टाक की जरा.

मृ, काळ्या मोहरीचा एक दाणा खाऊन बघ. तिखट लागला नाही तर लाल मोहरी आणशील का? Wink

हे लोणचं नव्याने खाणार्‍याच्या समोर बसून रहावं. लोणच्याचा बोटभर खार चाटल्यावर तो कसा हडबडला त्यावरून लोणच्यात मोहरी किती चढलिये याचा अंदाज येतो. Biggrin

स्वाती, मस्त आहे पाकृ. आई आवळ्याच्या पातळ कापांचं पण असंच लोणचं करते. फक्त लाल मोहरीची पावडर न करता ती पाण्याबरोबर मिक्सरमधे किंचित वाटून घेते.

मस्त पाकृ! लाल मोहरी नाहीये. काळी चालते का?>>>>
Lol

मृण्मयी, तुरीया पात्रामधे लाल भोपळा भसकवलास तरी यात काळी मोहरी भसकवू नकोस, लोणचं कडू होईल. Proud

मस्त पाककृती आहे. आई सेम अश्शीच करत असे. एक वाटीभर होइल एवढी करून बघते. ही मिरची मऊ दहिभाताबरोबर फार झकास लागते. ब्रेड मध्ये खार घालूनपण. शिवाय तयार झाल्यावर त्याचा एकत्रित वास
फार जबरदस्त. शहारे आले Happy

अहाहा.... सध्या आईनं असं बरणीभर लोणचं घालून ठेवलंय.... दुसर्‍या बरणीत आवळ्याचं असंच मोहरी फेसून लोणचं.... ती मोहरी चढली की असली मजा येते राव खाताना!

>> बोटभर खार चाटल्यावर तो कसा हडबडला त्यावरून लोणच्यात मोहरी किती चढलिये याचा अंदाज येतो
Lol

मंजू, बरोबर, आवळे उकडून घेतात आणि त्याच्याच पाण्यात मोहरी वाटतात.
पण मिरच्या साठवणीच्या करत असल्यामुळे पाण्यात नाही ना वाटता येत, म्हणून लिंबाच्या रसात वाटायची मोहरी.

मृण, काळी मोहरी नको, लालच हवी.

इथे एका रेस्टॉरंटमध्ये फेसलेल्या मोहरीचं एक डिप खाल्लं होतं. त्यांनी आधी सांगितलं होतं की हे फार स्ट्राँग आहे. खाल्ल्यावर जे काही झालं त्याला 'हडबडणे'च म्हणता येइल Proud

लाल मोहरी नसल्यामुळे काळ्या मोहरीला फेसून लोणचं केलं. ते आत्ताच चाखून बघितलं. अजीबात कडवट नाही. नाकात झिणझिण्या काढतंय मात्र! Proud

स्वाती, धन्यवाद!!

mirachi-loNache-swatistyle.JPG

आई आवळे कच्चेच ठेवते गं स्वाती... फोड करकरीत लागायला हवी असते बाबांना. आणि हे लोणचं टेम्पररीच असतं. मिरच्या मात्र टिकाऊ Happy

ह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला... आणि लोण्यात किंवा दह्यात मिक्स करून थालिपीठाबरोबर खायची. अहाहा!! Happy

>> ह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला

तशी आवडत असेल तर काकडी कोचवल्यावर तिला सुटलेल्या पाण्यात लाल मोहरी वाटून ती, तिखट-मीठ-चिंच-गूळ आणि थोड्या तेलात पण खरमरीत फोडणी - अशी करून बघ एकदा काकडीची कोशिंबीर. Happy

माझ्या बाबांची एक काकू असंच मोहरी फेटून काकडीचं लोणचं करायची. भरपूर दही मिसळल्याशिवाय खाताच यायचं नाही ते लोणचं ............... Happy

स्वाती : पुढच्या वेळेस देशात येताना घेउन ये हो आमच्यासाठी ............. Happy

ह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला... आणि लोण्यात किंवा दह्यात मिक्स करून थालिपीठाबरोबर खायची. >>>

तशी आवडत असेल तर काकडी कोचवल्यावर तिला सुटलेल्या पाण्यात लाल मोहरी वाटून ती, तिखट-मीठ-चिंच-गूळ आणि थोड्या तेलात पण खरमरीत फोडणी - अशी करून बघ एकदा काकडीची कोशिंबीर>>>
Angry काय अत्याचार आहे.

हाईला!! काकडीला तिखट मीठ चिंच गूळ आणि लामो... उद्याच करण्यात येईल. Happy

मृण्मयी, हापिसातून फोटो दिसत नव्हता, मोबाईलातून दिसतोय, काळ्या मोहरीबद्दल कमेंट मागे घेते लग्गेच Happy

मंजूडी, मी पयली. Happy

koshimbeer.jpg

काकडी कोशिंबीर माहितीबद्दल धन्यवाद स्वाती. छान झाली.मी थोडं भाजलेल्या तिळाचं कूटपण घातलं.

मस्त. करुन पहाणार या w/e ला. काकडीची कोशिंबीर आत्ताच करुन पहात आहे. जेवण झालय तरिसुद्धा.(उद्यासाठी आणि ) मंजुडीच्या अगोदर नंबर मिळावा म्हणून. Proud

Pages