केल्याने भाषांतर - प्रवेशिका ५ (सावली)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:42

हा जपानी ते मराठी भाषांतराचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही चुकले असेल तर सांभाळून घ्या आणि चुका नक्की दाखवून द्या म्हणजे पुढच्या वेळी तरी दुरुस्त करता येतील.
शुद्धलेखन आणि भाषांतराच्या इतर तपासणी साठी मंजिरीचे विशेष आभार.
-----------------------

गोष्ट: झाडाचा बहरोत्सव.
मूळ कथा : http://www.aozora.gr.jp/cards/000121/files/4724_13215.html
लेखिका: नीईमी नान्कीची (१९१३-०७-३० १९४३-०३-२२)
गोनगीत्सुने या नीईमी नान्कीची च्या परीकथा पुस्तकात प्रथम प्रकाशित

भाषांतर: स्वप्नाली मठकर (सावली)

木の祭り
新美南吉 (Niimi, Nankichi ) 1913-07-30 - 1943-03-22
मूळ कथा : http://www.aozora.gr.jp/cards/000121/files/4724_13215.html

------------

एका दाट जंगलात असलेल्या गवताच्या हिरव्यागार कुरणात मधोमध उभे असलेले एक साधेसे झाड होते. एरवी इतर झाडांसारखेच. पण आता बहराच्यादिवसात मात्र या झाडाला सुंदरशी पांढरीशुभ्र फुलं आली होती. झाडाची फांदी आणि फांदी फुलांनी नुसती डवरून गेली होती. स्वत:चे हे सुंदर रुपडे पाहून झाड तर हरखूनच गेले होते. या हिरव्या जंगलात हे एकमेव पांढरयाशुभ्र रंगाच्या फुलांचे झाड अगदी उठून दिसत होते. पण आता झाडाला एकटेपणाची जाणीव व्हायला लागली. आपले हे सुंदर रूप, आपला हा बहर कुणी बघितलाच नाही तर काय उपयोग? कुणीतरी यावं आणि आपल्या सौंदर्याचे गोडवे गावेत असं त्याला सारखं वाटायला लागलं. पण इतक्या आतमध्ये जंगलात येणार तरी कोण?

तेवढ्यात कुठूनशी वाऱ्याची एक झुळूक आली. त्या वाऱ्याच्या झुळूकीवर स्वार होऊन त्या फुलांचा स्वर्गीय गंधही भटकायला निघाला. वाऱ्याबरोबर वहात वहात तो गंधही छोटीशी नदी ओलांडून, गव्हाची शेते पार करून छोट्या टेकड्यांवरून घसरगुंडी करत दूरच्या बटाट्याच्या शेतांपर्यंत येऊन पोचला. बटाट्याच्या शेतात पुष्कळशी फुलपाखरे खेळत होती. त्यातल्या एका चिमण्या फुलपाखराच्या नाकात तो सुवास शिरला.

"कसला बरं इतका छान सुवास येतोय हा?" नाकाने हुंगत हुंगत छोट्या फुलपाखराने विचारलं.

"अप्रतिम गंध आहे ना! कुठेतरी नक्कीच सुंदरशी फुलं उमलली असणार." दुसऱ्या पानावर बसलेल्या फुलपाखरु अगदी हरखून म्हणालं. "ही नक्कीच त्या जंगलाच्या आतल्या कुरणामधल्या झाडाची फुलं असणार. इतका दिव्य सुवास त्याचाच आहे फक्त."

हळूहळू त्या शेतातल्या सगळ्याच फुलपाखरांना त्या सुवासाने मोहित केलं. हा सुवास सोडून इतर कुठेच जाऊ नये असं त्यांना वाटायला लागलं. शेवटी सगळ्या फुलपाखरांनी एकत्र विचार करून त्या झाडाजवळ जायचं असं ठरवलं. आणि अशा सुंदर वासाची फुलं देणाऱ्या त्या झाडासाठी बहरोत्सव साजरा करूयात या विचारावरही फुलपाखरांचं एकमत झालं.

मग पंखांवर सुंदरशी नक्षी असणारया मोठ्ठ्या फुलपाखराच्या मागे मागे रांगेत पांढऱ्या पिवळ्या ठिपक्यांचे, पानासारखी नक्षी असाणारे, छोट्याशा शिंपल्या सारखे पंख असणारे अशी वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची फुलपाखरे त्या गंधाचा मागोवा घेत निघाली. फुलपाखरांचा हा थवा उडत उडत बटाट्याच्या शेतावरून निघून, टेकडी वरून, गव्हाची शेते पार करत अगदी नदी ओलांडून जायला लागला. त्या सगळ्या मधले शिंपलीच्या आकारासारखे एक छोटेसे फुलपाखरू मात्र पंख छोटे असल्याने जरा दमले आणि नदीच्या काठी विसाव्यासाठी क्षणभर थांबले. एका पानावर बसले असतानाच जवळच्या एका पानावर त्याला झोपाळलेला एक नवीनच किडा दिसला. असा किडा शिंपली सारख्या फुलपाखराने कधी बघितलाच नव्हता. त्यामुळे फुलपाखराने उत्सुकतेने विचारलं.

"तू कोण आहेस रे? मी कधी तुला पाहिलंच नाहीये!"

"मी आहे काजवा!" डोळे उघडत काजव्याने उत्तर दिलं.

"जंगलातल्या कुरणामध्ये एका फुलांच्या झाडाजवळ आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. तू पण नक्की ये हं. मज्जा येईल." शिंपलीसारख्या फुलपाखराने काजव्याला अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले.

"खूप धन्यवाद हं. पण मी ना रात्री जागणारा किटक आहे. त्यामुळे कोणी मला खेळायला घेतलं नाही तर?" काजव्याने आपली काळजी बोलून दाखवली.

"असं काही नाही बरं. तू नक्की ये. आम्ही सगळे तुझ्याशी नक्की खेळू." असं म्हणत अनेक छान छान गोष्टी सांगत फुलपाखराने काजव्याला सुद्धा बरोबर आणलं.

आणि पोहोचल्यावर बघतात तर तिथे काय मस्त उत्सव चालू होता. सगळी फुलपाखरे झाडाभोवती फेर धरून नाचत गात होती. दमल्यावर झाडाच्याच पांढऱ्या फुलांवरबसून विश्राम करत होती. आणि भूक लागल्यावर त्या सुंदर फुलांमधला मध पोटभरून पीत होती.

मात्र हळुहळू सूर्य मावळतीला चालला होता आणि प्रकाश कमी कमी व्हायला लागला होता. आता रात्र झाल्यावर काही दिसणार नाही आणि खेळणं थांबवावं लागेल म्हणून फुलपाखरांना फारच वाईट वाटायला लागले.

"छे! उगीच रात्र होतेय. आता काळोखात काही सुद्धा दिसणार नाही. मग कसं काय खेळणार?" असं म्हणत फुलपाखरे दु:खी मनाने उसासे टाकायला लागली.

हे ऐकून काजवा पटकन उडत उडत नदीकाठी गेला. तिथे त्याचे इतर बरेच काजवे मित्र मैत्रिणी होते त्या सगळ्यांना घेऊन परत झाडाकडे आला. आल्यावर एक एक काजवा एका एका फुलावर जाऊन बसला. आणि काय आश्चर्य! अनेक छोटे छोटे इवलाले कंदील झाडावरच्या फुलांवर टांगले आहेत असे दिसायला लागले. त्या प्रकाशाने झाड नुसते भरून गेले. आणि या प्रकाशाच्या सुगंधी झाडाचा बहरोत्सव आता प्रकाशोत्सव बनून फुलपाखरांनी रात्री खूप उशिरा पर्यंत नाचत साजरा केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गोष्ट सावली!
आणि तु ती टिपिकल "ती वसंतातली सुंदर सकाळ होती" वगैरे वाक्य नाही भाषांतरीत केलीस ते बरं झालं Happy

कित्त्ती गोड!
सहज अनुवाद..आपणही कधी त्या फुलपांखरांच्या मागे जाउन कधी न पाहिलेल्या फुलांच्या झाडाजवळ जाउन पोहोचतो कळतच नाही.. Happy

कित्ती कित्ती कित्ती गोड!!!! Happy ते झाड, ती सुंदर फुलपाखरं, ते इवलाले कंदिल- काजवे... सगळं डोळ्यासमोर आलं... नाजूक, सुंदर कथेचा तितकाच नाजूक, सुंदर मराठी भावानुवाद... Happy

सावली सुरेख झालय भाषांतर. Happy त्या बटाट्याच्या शेताच्या जागी थोडी सवलत घेऊन दुसरे कुठलेतरी शेत घेतले असते तर चालले असते असे माझे मत. बटाट्याचे शेत कसेतरीच वाटते मराठीमधे. Happy

बाकी तुझ्या या भाषांतराच्या निमीत्ताने अनेक महीन्यांनी जपानी वाचायला मिळाले. त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. कांजीचा वापर कमी असल्याने अडचण अजिबात आली नाहीच. Happy

अतिशय सुंदर गोष्ट.. आणि अनुवाद इतका सहज की मुळ गोष्ट दुस-या भाषेतली आहे याचा पत्ताही लागत नाही. अनुवाद हीच मुळ गोष्ट झालीय.

गोष्ट वाचतावाचता एक दोन-तीन वर्षांची मुलगी चेह-यावर आश्चर्य, आनंद आणि उत्सुकता घेऊन गोष्ट ऐकतेय, तिचे चमकदार डोळे एका वेगळ्यात विश्वात हरवलेत, ज्या विश्वात ती फुलपाखरांचा नाच झाडाखाली उभी राहुन पाहतेय आणि मग काजवे फुलांवर बसल्यावर जे काही दृश्य दिसतेय ते पाहुन टाळ्या पिटतेय हे दृश्य नजरेसमोर तरळले.

मराठी दिनानिमित्त आलेल्या अनुवादांमधला हा अनुवाद सगळ्यात जास्त आवडला. संयुक्ताचे आभार हा उपक्रम सुरू केल्याबद्दल. नाहीतर ही गोष्ट मला कधीच कळली नसती.

रच्याकने, बटाटयाचे शेत फुलांवर येते तेव्हा ते सॉल्लीड सुंदर दिसते. ज्या शेतावरुन फुलपाखरे उडताहेत ती शेते फुलांनी बहरलेली असणारच....

सगळ्यांना धन्यवाद. Happy
पहीलाच प्रयत्न आवडल्याने छान वाटलं. आता पुढचे प्रयत्न पण दिसतीलच इथे Wink
केपी, हो ना लहान मुलांची कथा असल्याने वाचायला सोपीच होती. बटाट्याचं शेत का याचं उत्तर साधनाने दिलय बघ. त्या शेतात छान फुलं असतात.
साधना, तुझा प्रतिसाद वाचुन एकदम मस्त वाटलं Happy हि मुळ कथा वाचल्यावर मलाही असच काहीसं वाटलेलं. एकदम छान वाटलं होतं. बटाट्याचे शेत कधी बघितलं नाहीये, पण छान फुलं येतात हे ऐकूनच माहिती होते.