'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग २ : ''तोरणा- राजगड' मार्ग !

Submitted by Yo.Rocks on 31 January, 2011 - 13:05

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून ! इथून पुढे...

तोरणाच्या या कड्यावरून दिसणारा 'तोरणा-राजगड' मार्ग मस्तच !! बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.. ! बघून तरी अंधार पडायच्या आता पार करु असे वाटत होते..

तोरणाच्या बुधलामाचीपासून सुरु होणारी तोरणा-राजगडची वाट.. (सुरवातीचा टप्पा)

वाटेतील मधला टप्पा

वाटेतील अंतिम टप्पा नि डावीकडे दिसतोय तो "राजगड" !!
<

'तोरणा ते राजगड' या वाटेचा अंदाज आला नि आता उशीर करुन चालणार नाही म्हणत आम्ही झपाझप पावले टाकू लागलो.. जबरदस्त तंगडतोड होणार होती.. नि अजून तोरणावरील बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता... या माचीकडे जाणार्‍या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.. !!!

तर दुसर्‍या बाजूस तोरणाची एका बाजूकडील तटबंदी मस्त उठून दिसत होती..

- - - - - - - -

कोकण दरवाज्यासमोर उभे असलेले मायबोलीवीर..

इथूनच दूरवर रायगड नि लिंगाणा डोकावताना दिसले..

सभोवतलाचे सगळे दृश्य कॅमेर्‍यात टिपून आम्ही बुधला माचीच्या दिशेने उतरायला घेतले..

कोकण दरवाज्याकडील बुरुज नि तोरणाची भक्कम अशी तटबंदी..

वाटेत पहिलाच लागलेला बुरुज टेहळणीचा असावा कदाचित.. मस्तच बांधणी आहे.. शिवाय चोर वाट देखील.. !
अगदी सरपटत बाहेर पडावे लागते.. इथून संपूर्ण बुधला माची नजरेखाली राहते..

टेहेळणी बुरुजावर इंद्रा नि नविन -

------
खालील फोटोत रोहीतला शोधा कुठे आहे तो... Happy दिसला का ? चोरमार्ग बघतोय तो..

------
त्या बुरुजामध्येच असणारी चोरवाट..

या बुरुजावर मग गिरीला उडी मारण्यास प्रोस्ताहन दिले.. Proud

(साहेबांनी चक्का हातात कॅम घेउन उडी मारली.. बुधला माचीच्या सुळक्यापेक्षा उंच अशी उडी ;-))

आमच्याबरोबरीने अजून एक सात आठ जणांचा ग्रुप वाटचाल करत होता.. त्यांच्याशी देखील आमच्या गप्पा होत होत्या.. नि हो जोडीला कुत्रा नसेल तर नवलच..
या वाटेत दोन ठिकाणी थोडे ट्रॅफिक जॅम झाले.. पहिले ट्रॅफिक इंद्राने धरुन ठेवले होते.. नेमके त्या क्षणाला त्याचा आत्मविश्वास ढळला होता... कारण होते त्याचे बूट नि तापलेले खडक..

खालील फोटोत डावीकडे खाली इंद्रा लिड करताना.. Wink

पण लवकरच त्याने सावरले नि ट्रॅफिक क्लियर झाले.. पुढचे ट्रॅफीक ठरलेले होते जे म्हणजे बुधला माचीवरून तोरणा-राजगड मार्गावर उतरताना.. त्याआधी वाटेत चिणला, भगत, वकंजाई नावाचे अगदी कडेला असलेले हे तीन दरवाजे दिसतात...बुधला माचीचा पॅच हा अवघड आहे.. ज्याची मजा शिडी लावून घालवली आहे.. Proud मी आणि रोहीत बघतच होतो कुठे शिडीशिवाय उतरायला जमते का ते.. पण पडलेले कडक उन नि वेळेची बचत म्हणून शिडीनेच उतरण्यात धन्यता मानली..

- - - - - -


(इंद्रा नि गिरी खाली उतरताना.. मागे दिसतेय ती राजगडाकडे जाणारी वाट)

- -- - - - -

इथेच बाजूला डोंगरावर हिरवाईची उमटलेली तुरळक रांगोळी छानच भासत होती..

- - - - - - - -


(बुधला माचीवरील सुळका खालून वरती बघताना)

इकडून आता आम्ही आमच्या ट्रेकच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येउन पोहोचलो..दुपारी दोनच्या सुमारास आम्ही डोंगरवाटेने कूच करायला सुरवात केली..

हे अंतर कापायला सहा तास लागतात ऐकून होतो.. वाटेत आम्ही जवळपास १०-१५ डोंगर पालथे घालणार आहोत हा अंदाज तोरणावरुनच घेतला होता.. आमचे मूळ उद्दीष्ट्य होते की शक्य तेवढ्या लवकर झाडाझुडूपांची वाट गाठायची.. सुरवातीला वाटेत सावली मिळणे अशक्य होते.. नि अंधार होण्याच्या आत आम्हाला त्या जंगलातील वाटेपर्यंत पोहोचायचे होते.. तिथेच वाटेत पुढे एक धनगराचा वाडा आहे हे माहित होते.. सो वेळ अपुरा पडला तर तिकडेच राहू असे ठरले होते.. पण आम्ही घेतलेल्या नकाश्यामध्ये या वाटेत एक डांबरी रस्ता येतो असे दिसले.. ज्याची मला कल्पनाच नव्हती.. मागे राजगडवरुन हा मार्ग पाहिला होता तेव्हाही तो रस्ता काही दिसला नव्हता.. नि तोरणावरुन दिसणे कठीणच कारण तो राजगडाच्या बाजूस पाली खिंडीत आहे.. म्हटले बघू कुठे आहे ते..

तोरणाकडे पाठ करुन आम्ही आता राजगडावरील संजीवनी माचीला नजरेसमोर ठेवून चालत होतो... बरेचसे अंतर चाललो तरी तोरणा आताच उतरलोय इतका जवळ वाटत होता.. तोरण्याची एक संपूर्ण बाजू नजरेत भरली..

ऊन एकदम कडक पडले असले तरी अधूनमधून येणार्‍या वार्‍यामुळे दिलासा मिळत होता.. अपेक्षेप्रमाणे वाट सुरवातीपासूनच आम्हाला "Up & Down" करायला लागली.. मोठ्या सावलीचा मागमूस नसल्याने वीस पंचवीस मिनीटांनी आम्ही ब्रेक घेत वाटेतच बसत होतो.. जेणेकरुन वाटेच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या कारवी झाडांची तरी सावली मिळावी.. जसजसे उन्हामध्ये अंतर कापत गेलो तसा घसा वारंवार कोरडा पडू लागला होता.. पाणी जवळ होते पण अजून पाच सहा तासांची वाटचाल बाकी होती नि वाटेत ते एक घर सोडले तर पाण्याची सोय नव्हती त्यामुळे आमची तहान आम्ही घेतलेल्या काकड्या, बोरं नि त्यातल्या त्यात पाण्याचा फक्त एकच घोट यांवर भागवत होतो.. Proud बाकी कुठलाही अडथळा नव्हता तोच गिरीच्या पायाचे अंगठे दुखायला लागले.. साहेबांनी माहित असुनसुद्धा नविन कोरे बुट घालून आले होते.. त्यामुळे जास्त त्रास होउ लागला.. शेवटी वैतागून गिरीने मध्येच सर्वांना थांबवून आपल्या पायाच्या अंगठ्याची वाढलेली नखे कापण्याचा कार्यक्रम हाती घेतला.. Proud आमच्या बरोबरीने असणारा ग्रुप याचवेळी पुढे गेला.. पण त्या कुत्र्याने मात्र आमच्या मायबोली ग्रुपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.. पायथ्यापासून गडावर येताना आपणहून सोबत देणारे कुत्रे मी पाहिले होते.. पण हा तर आमच्या सोबत तोरणा-राजगड करायला निघाला होता..

गिरीने 'लेटस गो' ची आज्ञा दिली नि आम्ही पुन्हा चालू लागलो.. पण वेग बराच मंदावला होता.. परिस्थिती तशीच होती.. कारण आम्ही भर दुपारच्या वेळेस वाटचाल करत होतो ते देखील तोरणा सर करून ! दिर्घ विश्रांती घेतलीच नव्हती.. पाठीवर असलेल्या वजनाबद्दल तक्रार नव्हतीच.. एकीकडे गिरीला डोंगर चढण्याऐवजी उतरताना त्रास होत होता.. नि असे अजून बरेच डोंगर आमची वाट बघत होते.. छोटे ब्रेक्स घेऊन आम्ही पुढे सरकत होतो.. दिडदोन तास चाललो तरी आम्ही अजून मध्यभागी देखील पोहोचलो नव्हतो.. वाटेत दोन्ही राजगड तोरणा पुढे मागे दिसत होते.. पण वाट काही संपत नव्हती.. उलट राजगड दुर जातोय असे भासत होते.. Lol तोरणावरुन बघताना जितके सोप्पे वाटले होते ते तसे नव्हते.. नि भर उन्हात इथून चालणे म्हणजे चांगलाच दम निघत होता.. पण काहिही झाले तरी वाट मला आवडली... मस्तच आहे.. अगदी ठळक पाउलवाट.. मध्येच दोन फाटे फुटायचे नि पुन्हा येउन मिळायचे.. इथे हरवण्याचा संभव नव्हताच.. कारण संपूर्ण वाटेत लागणार्‍या डोंगरावरून राजगड दिसतोच.. काही ठिकाणी मात्र वाट अगदीच दरीला बिलगून जाते.. तिथे मात्र काळजी घेतलेली बरी..

सूर्याची पश्चिमेकडे झुकण्यासाठी सुरवात झाली.. आमची आतापर्यंत बरीच तंगडतोड झाली होती.. त्यात इंद्रा नि गिरी यांना त्यांची वयोमर्यादा आड येऊ लागली.. बर्‍याच वेळेनंतर आमची वाट उजवीकडे मूळ डोंगर सोडून खाली उतरु लागली तेव्हा चुकलो की काय अशी शंका वाटू लागली.. पण दुसरी ठळक अशी वाट दिसत नव्हतीच.. शिवाय आमच्या पुढे गेलेला ग्रुप मघासपासून दुरवर दिसत होता तोदेखील गडप झाला.. म्हटले ही वाट कुठे घराकडे जात असेल तेव्हा पाणी वगैरे घेउन पुढे जाउ.. इंद्राने आपण दमलोय तेव्हा इथेच कुठेतरी थांबू असे सुचवले.. आम्ही त्याच वाटेने पुढे गेलो तर वाटेपासून काही अंतरावर एका बाजूस घर दिसले.. तिथे जाणार तोच त्याच घराकडून एक गावकरी येताना दिसला जो त्याच घरातला होता.. आमची वाट बरोबर असल्याचे सांगितले.. त्याला विचारले असता कळले की दोन ग्रुप त्याच्याकडे थांबले आहेत..नि पाण्याचे विचारायचे तर तो तेच आणायला कुठेतरी लांब जात होता.. इथे थांबायचे म्हटले तर राजगड कुठच्या कुठे होता.. तेव्हा पुढे वाटेत लागणारा धनगर वाड्याला जाउनच विश्रांती घेउ म्हणत पुढे निघालो.. अर्थातच त्या गावकर्‍याला आधी सगळे विचारुन घेतले.. 'हो.. हे समोरचे दोन डोंगर पार केले की लागेल तो वाडा.. जेवणपाणी राहण्याची सगळी सोय करुन देतील तिथे...' हे असे त्या गावकर्‍याकडून ऐकल्यावर आमचा हुरुप वाढणार नाहितर काय..

एव्हाना थकलेला इंद्रादेखील जोमाने उभा राहिला.. नि आमचे पुन्हा लेफ्ट राईट चालू झाले.. Proud आताची वाट मात्र डोंगरावरुन न जाता त्याच्या खांद्यावरुन जात होती त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता.. शिवाय आता सूर्य मावळण्यास जेमतेम दिडेक तास उरला होता.. आम्ही चालत होतो.. जल्ला दोन काय चार डोंगर पार केले पण वाडा काहि लागला नाही.. साहाजिकच पुन्हा सगळ्यांची बॅटरी डाउन होण्यास सुरवात झाली.. पुन्हा एक ब्रेक घेतला तेव्हा दोन- तीन मावश्या कुठूनतरी आल्या.. त्यांना विचारले तर हा काय पुढेच आहे म्हणत त्या पुढे गेल्या.. गेल्या काय गायबच झाल्या.. ह्यांचा वेग पाहून आमची घोडदौड कासवापेक्षा धिमी वाटली..:D आम्ही कसेबसे त्या वाड्यापर्यंत पोहोचलो.. आनंद झाला पण... ! वाडा बंद असलेला पाहून आम्ही संकटात सापडल्याची जाणीव झाली.. प्रश्ण थकण्याचा वा राहण्याचा नव्हता.. पाण्याचा होता.. तीन चार बाटल्या भरलेल्या होत्या.. पण उर्वरीत अंतर बघता पुरेसे नव्हते.. तहान ती तहान .. किती म्हणून संयम बाळगणार... शिवाय जेवणासाठी पाणी लागणार होते.. आता मात्र त्या गावकर्‍याने सांगितले नसते तर त्याच्याकडेच मुक्काम केला असता असे वाटू लागले..

घराच्या आजुबाजूस कोणी दिसतेय का हे बघताना मला हा सुंदर पक्षी दिसला.. शांतपणे बसला होता..

इथून संजीवनी माची बर्‍यापैंकी दिसत होती.. पण अंतर किती असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता..

आता सूर्यदेखील मावळ्याची वेळ झाली होती.. त्यामुळे संजीवनी माची पोहोचेस्तोवर अंधार पडणारच होता.. इथे राहण्यासाठी बरीच मोकळी जागा आहे.. पण पाणी नाही तर थांबून चालणार नव्हते. सो नाईलाजास्तव पुढे निघालो.. तरीसुद्धा आम्ही पाण्याने भरलेल्या शिल्लक बाटल्यांना हात लावला नव्हता.. पुढे वाट उतरणीची लागली.. उतरणीची म्हणजे अगदीच खाली.. म्हटले आता जितके उतरतोय तेवढेच चढावेदेखील लागेल.. उतरणीची वाट शेवटी' त्या' डांबरी रस्त्यावर उतरली.. ! च्यामारी हीच ती पाली खिंड.. डावीकडे गेलो तर पाली गाव लागेल नि उजवीकडे 'यसाजी कंक' यांचे भुर्तंडे गाव.. रस्त्याच्या पलीकडे 'राजगडकडे' असा बाण दिसला.. पण त्याची दिशा आम्ही जितके अंतर खाली उतरलो तितकेच वरती चढायचेय असे सुचवित होते.. बरं इतके चढूनसुद्धा राजगड गाठायचे म्हटले तर अजुन किती डोंगर असतील याची कल्पना नव्हती..

झाले इंद्राने आपला स्टॉप इथेच जाहीर केला.. ! Proud 'तुम्हाला पुढे जायचे असेल तर जा.. मी जातो पाली गावात' असा पवित्रा घेतला.. तर दुसरीकडे 'नविन' राजगड गाठण्यास भलताच उस्तुक झाला होता.. 'जाउ रे. हा चढ पार केला की राजगड लवकरच गाठू'.. एकीकडे 'गिरी'ला बुटांचा त्रास होत असल्यामुळे त्यालाही विश्रांती गरजेची होती..सो तो इंद्राबरोबर.. नि आमची भर रस्त्यात (त्या खिंडीत चिटपाखरुदेखील नव्हते) मध्येच बसून चर्चा सुरु झाली.. तिथे सुर्य अस्ताला जात होता.. 'पाली गावात जाउ नि दुसर्‍या दिवशी पालीच्या दरवाज्याने राजगड करू..' असे इंद्रा नि गिरीचे मत होते.. तर 'एकदा पाली गावात गेलो की मग दुसर्‍या दिवशी राजगड न करता तिकडूनच मी मुंबईला परतेन' हे माझे मत... कारण मला त्या पाली गावातून जाणार्‍या वाटेत जराही स्वारस्य नव्हते नि दुसरे हे माझ्या ट्रेकींगच्या तत्त्वात बसणारे नव्हते.... दुसरीकडे 'माझं ऐका.. थोडा धीर धरा.. टॉर्च तर आहेत.. तेव्हा आपण आजच राजगड गाठू' असे नविनचे मत.. आमच्यामध्ये फक्त रोहीतने राजगड पाहिला नव्हता त्यामुळे 'तुम्हीच काय ते बोला काय करायचे' असे रोहीतचे मत होते.. Lol बरं एवढी भिन्न मतं असूनही जर फक्त जिद्दीवर पुढे वाटचाल करायची तर इंद्रा सोडून सगळे तयार होते.. Proud आमचा इथे अर्धातास तरी वाया गेला.. पण योग्य निर्णय घेणे गरजेचे होते.. शिवाय या निमित्ताने पायांना थोडा आराम मिळतच होता..

अखेरीस सर्वांनुमते पाली गावात चलण्याचा निर्णय घेतला गेला.. कारण म्हणावे तर इंद्राला शक्य नसल्याने ग्रुपमध्ये फाळणी पडणार होती जे पटणारे नव्हते.. दुसरे म्हणजे नुसते संजीवनी माची गाठून आमची तहान भागणार नव्हती.. पाण्यासाठी पद्मावती माची गाठावी लागणार होती.. हे अंतर ३-४ किमीचे.!! नि उगीच जीवाचे हाल करत अंधारात रिस्क घेत पुढे जाण्यात पॉईंट नव्हता.. शेवटी आम्ही त्या डांबरी रस्त्याने पाली गावाच्या दिशेने उतरु लागलो.. उतरताना मात्र ट्रेक अर्धवट सुटतोय याची मला खूप रुखरुख लागली होती.. माझ्यासाठी तरी ट्रेक इथेच संपला होता.. ' बघू, उद्या पाली गावातूनच सकाळी मुंबईला रिटर्न जाउ' हे मनाशी पक्के केले !

क्रमश :

पुढील भागात : ?? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. ही चयाचित्र नव्हतीच. कारण ती छायाचित्र बघत असताना मी मला स्वतःला तिथे असल्याचे जाणवत होते. इतकी सर्व छायाचित्र वास्तव वाटली. खुपच छान.

"एक गोष्ट नमूद कराविशी वाटते ती म्हंजे प्रत्येक ट्रेक काही ना काही नविन अनुभव देत असतो... इतर वेळी कोणत्याच चढाईला न डगमगता पुढे जाण्याचा आत्मविश्वास बाळगणारा मी तोरण्याच्या एका सोप्प्या पॅचवर फसून बसलो... हात पोळणारा कातळ आणि घामाघूम झालेल्या शूजने माझी चांगलीच तंतरली होती... तसेच पुढे तोरणा-राजगड मार्गावरील दुपारच्या टळटळीत उन्हाने अग्निपरिक्षा बघितली... डिहाड्रेशन होऊन चक्कर येऊन पडतोय की काय असं वाटतं होतं... मात्र गोलमेज परिषदेत बाजी मारल्याचा आनंद काय सांगावा "

माझा राजगड्चा अनूभव अगदी अस्साच आहे. १९८३ मधे प्रथम आम्ही राजगड्ला गेलो होतो. बालेकिल्ला आमावास्येच्या रात्री २ वाजता चढ्ण्याचा प्रकार चान्गलाच त्रास देणारा ठरला. एका रॉक्वरून घसरत दहा फूट खाली आलो होतो. पूर्ण डावी बाजू सोलवटून नीघाली. आणी जबरदस्त शॉक आला. पुढे साध्या वाटेवर देखिल जपून चालत होतो.
पण रात्री २ तास बालेकिल्ल्य्यावर गप्पा मारत आणी गाणी गात कसे गेले समजलेच नाही.
अशा प्रसन्गामुळेच ट्रेक अविस्मरणीय होतात.

तुमचे सर्व लेखन आनन्ददाई असते. मला जुन्या आठवणीत घेवून जाते.

सन्जीव

तोरणा-राजगड प्रवास वर्णन आवडले. मी फक्त राजगडच पाहिला आहे.२ ते ३ वेळा राजगड केला पण तोरण्यावर जाणे झाले नाही. जाण्याची इच्छा आहे पण आता शक्य होईल असे वाटत नाही. तुमच्या या वर्णनाने स्वत: ट्रेक करत आहोत असे वाटते.

सगळ्यांचे धन्यवाद Happy

उर्वरीत भागांची लिंक खालीलप्रमाणे आहे :
तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग ३ : लक्ष्यवेध !
http://www.maayboli.com/node/23343

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : संपूर्णम !
http://www.maayboli.com/node/23460

krupya aapan " CHOR DARWAJA " lihu naye . je tya darwajyane utarle aani chadle te CHOR nhavte..
Aapan tyala "GUPT DARWAJA" sambhoduya ...

Pages