आवडत्या कविता: अर्थ आणि रसग्रहण

Submitted by नानबा on 19 January, 2011 - 13:03

माहित असलेल्या किंवा हव्या असलेल्या कवितांचे अर्थ, गुढार्थ, रसग्रहण - सगळं इथं टाकता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरभाट | 17 January, 2011 - 20:18
शास्त्रीय संगीतात राग फुलवणे म्हणून काही एक प्रकार असतो. कवितेतसुद्धा मला त्याचा अनुभव आला आहे. वारंवार त्याच अर्थाचे शब्द, वारंवार थोड्याश्या वेगळ्या अर्थछटेचे शब्द, वारंवार बर्‍यापैकी वेगळ्या अर्थाचे शब्द, वारंवार भिन्नच अर्थाचे शब्द, वारंवार पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द..... कविता मनात फुलत जाण्याचा मला अनुभव येतो. राग घिसाडघाईने फुलवला तर मजा येत नाही. कवितासुद्धा आळवावी लागते. आळवण्याचा अनुभव आल्यामुळे वरील कविता आवडल्या. असो.

विंदांच्या आवडलेल्या कवितांचे रसग्रहण म्हणजे संख्येने जय्यत मोठे काम स्मित पण काही काळापूर्वी त्यांच्या 'उंट' या कवितेबद्दल काही मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जे वाटले होते ते परत इथे लिहितो. 'उंट' ही कविता बहुतेक 'गाजली' नव्हती. पण महाकवीत्व कुठेच लपून राहत नाही. 'माझ्या मना बन दगड', 'मुक्तीमधले मोल हरवले', इत्यादीसारख्या मराठीला ललामभूत लेणी कोरणार्‍या असामान्य प्रतिभेची झलक इथेसुद्धा दिसतेच.

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

मानवीसंस्कृतीचा जन्म मेसोपोटेमिया नावाने ओळखल्या जाणार्या भूभागात झाला असे मानले जाते. त्याला सर्वात जुन्या लिखित इतिहासाचा आधार आहे. मेसोपोटेमिया म्हणजे तायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोर्यांमध्ये येणारा सध्याच्या इराक, इराण, सिरिया इ. मधला भाग होय. मानवाचा जन्म जरी आफ्रिकेत झाला तरी 'समाज' म्हणून जगणे जेव्हा सुरू झाले (यात शेती सुरू झाली, भटकेपणा थांबला, गावे-नगरे वसली, लिपीचा जन्म होऊन लेखन सुरू झाले इ. बाबी येतात) त्याला आपण 'मानवीसंस्कृतीचा जन्म' म्हणतो. हे जगात मुख्यत्वे ५ ठिकाणी झाले - मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू नदीचे खोरे, चीनमधील पीतनदीचे खोरे, मेसोअमेरिका आणि अँडीज पर्वतरांगा. त्यातही उपलब्ध पुराव्यांनुसार मेसोपोटेमियामध्ये हे सर्वात पहिल्यांदा झाले म्हणून त्या भागास 'क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन' म्हणतात. मेसोपोटेमियामध्येसुद्धा एका विशिष्ट भागात मानवी समाज उदयास आला. तोच भाग का याचे कारण अगदी स्पष्ट आहे - तो भाग अतिशय सुपीक होता. तो भाग जर नकाशात पाहिला तर चंद्रकोरीसारखा दिसतो म्हणून मेसोपोटेमियामधील त्या विशिष्ट भूभागास आता आपण 'फर्टाइल क्रिसेंट (fertile crescent)' असे नाव दिले आहे.

माझ्या मते, विंदांची उंट ही कविता या मानवीसंस्कृतीच्या उदयासंदर्भात आहे. कवितेच्या सुरूवातीलाच धरलेली वाळवंटी भागाची कास विंदा पूर्ण कवितेत शेवटपर्यंत सोडत नाहीत. सर्व प्रतिमा मनात केवळ वाळवंटच उभे करतात. पण नक्की कुठले वाळवंट? तर -
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
इथे आपल्याला कळते की कुठलाही वाळवंटी भाग अपेक्षित नसून जिथे सृजन झाले तो भाग. नुसतेच सृजन नाही, तर 'पहिले सृजन'. कुठलेही सृजन तसेही पहिलेच असते. मग 'पहिले सृजन' अशी द्विरूक्ती करून विंदा सुचवतात की इथे खुद्द सृजनाचे सृजन झाले, म्हणजेच नियमित सृजनास सुरूवात झाली. विंदांची 'वांझपणावर पहिला सृजनाचा क्षण गळणे' ही ओळ मात्र केवळ अवाक करणारी आहे. संमीलनाचा सर्वोच्च बिंदू सृजनात्मक असतो आणि क्षणैकच असतो. 'सृजनाचा क्षण गळणे' ही तीक्ष्ण अशी शारीर पातळीवरची प्रतिमा आहे आणि म्हणूनच अत्यंत प्रभावी आहे. सृजनाची शारीर प्रक्रिया इतक्या मूर्तीमंतपणे, चोखपणे आणि तरी रेखीवपणे उभी करणे...... ही प्रतिभा. इथेच आपल्याला कळते की हे चंद्रभागेचे वाळवंट नसून जिथे 'पहिले सृजन' झाले ते वाळवंट असणार. इथे 'क्रिसेंटची फर्टिलिटी' याच्या अर्थाचे अनेक पदर विंदा उलगडत आहेत.
मानवी शरीराच्या उत्क्रांतीत डोळ्यांची उत्क्रांती हा मोठा वादग्रस्त विषय आहे. मानवी डोळे असेच असणे ही तसे पहिले तर फार बुचकळ्यात पाडणारी गोष्ट आहे. ते पक्ष्यांसारखे नसून एकाच प्रतलात आहेत. दुसरे म्हणजे ते अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. असे डोळे निर्माण होणे ही खरे पाहता अवघड गोष्ट आहे. म्हणून मानेवरची अवघड जागा. पण डोळे माकडांनाही तसेच आहेत, मग मानव आणि माकडे यांत फरक तो काय? तर नजरेचा. मानवाने 'नजर' प्राप्त केली, मानवाने नुसते पाहिले नाही, तर पाहिल्या गोष्टींवर विचार सुरू केला. त्याची नजर सशक्त झाली. अश्या सशक्त नजरेतून आपल्या विरूद्ध उभ्या ठाकलेल्या निसर्गाशी लढण्याची हिंमतही आली. सर्वत्र वाळूचे साम्राज्य असताना मानवाने तिथेच सृजन घडवले आणि माणसाच्या प्रगतीचे क्षितीज रुंदावले. रुंदावले, विस्तारले, क्षितीज दूर पळाले. 'नाही नाही' करणारी वाळू 'होय' म्हणू लागली. प्रतिकूल निसर्गावर माणसाने विजय मिळवायल सुरूवात केली, तिथेच माणूसप्राण्याचा मानवीसमाज व्हायला सुरुवात झाली. मानवी संस्कृती रुजू झाली.

या संस्कृतीची प्रगती तरी केवढी? तर खरोखर अमर्याद. निर्माणाची चिंता न करता, निर्माण झालोच आहोत तर निर्मितीचा आनंद घेऊ असे म्हणत रुबाइयात लिहिणारा खय्याम निर्माण झाला एकीकडे आणि दुसरीकडे, आपले निर्माण म्हणजे काय, निर्माणाचे प्रयोजन काय यासारखे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधणारा महंमदसुद्धा जन्मला. पण संस्कृतीचा उंट मात्र तिथेच थांबला नाही. तो पुढे जातच राहिला. मानवीसमाज सर्वत्र पसरला. फोफावला. ही तहान कसली? आपलीच संख्या सर्वात जास्त करण्याची? आपल्या संस्कृतीस सर्वात महान गणले जावे याची? म्हणजे मुळात आपण एक संस्कृती होतो/आहोत हे दाखवून देण्याची? आणि ही तहान आहे तरी कशी? तर मृगजळ प्यावे तशी - न शमणारी. मानवी संस्कृती पसरण्यामागची शक्ती काय? मानवी संस्कृतीची अंतःप्रेरणा काय? निळा पिरॅमिड शोधण्याची अपरंपार ओढ. काहीतरी चिरस्थायी निर्मिण्याची अत्यावेगी सर्वोच्च ओढ. निळा रंग शांततेचा, भव्यतेचा. पिरॅमिड ही आपल्या स्मृतीची खूण. शेवटी पिरॅमिड म्हणजे दफनस्थानच ना? मानवीसमाज निळा पिरॅमीड शोधत राहतो. त्या शोधातच तो पुरला जातो, गाडला जातो, त्याचे पिरॅमीड होतात. पण गंमत अशी की असे पिरॅमिड्स जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत कोणाच्याच लक्षात येत नाही की चिरस्थायी संस्कृतीच्या, निळ्या पिरॅमिडच्या शोधात असलेले आपण खुद्द एक संस्कृती होतो. आहोत. असतो.
+++++++++++

रैना | 18 January, 2011 - 12:34

देवाला अनुमोदन.

हे काही आवडते
www.astro.caltech.edu/~vam/bkavita.html
एटु लोकांचा देश आणि पिशीमावशी
घराकडच्या आठवणी, झपतालः ओचे बांधून पहाट उठते, माझ्या मना, तेच ते, असेच होते म्हणायचे तर
किंग लियरचा अनुवाद
अष्टपदी
ध्रुपद

कविता टाकताना शीर्षक वगळु नये किंवा ओळींची पुनरुक्ती वाटली म्हणुन त्याही असे मला वाटते.
शब्दब्रम्ह- हे त्या पहिल्या कवितेचे नाव आहे ना?
शब्दाच्या (आणि अर्थाच्या) निर्मीतीप्रक्रियेबाबतची कविता आहे. (अस्तित्वाचे कोन: खतरनाक)अनुभव समृद्ध होतील तसे भाषेला शब्दांचे परिमाण लाभेल, सर्व प्रकारचे शब्द, सर्व रसदर्शक/भावभावनादर्शक (म्हणजेच पर्यायाने सर्व मानवी अनुभव घेऊन/ गुंफुन/ त्यांची वीण घालुन) हळुहळु (काळाचा द्विभाजक- क्या बात है) दोन हात एकारेषेत येतात त्याप्रमाणे अनुभव आणि शब्द (जाणिवा आणि भाषा) परस्परपूरकरित्या समृद्ध होतील. हेच ते शब्दब्रम्ह आणि कदाचित अंतिम सत्य. यासाठीच लेखक/कवी जगतात आणि मरतात.
दोन टोकाची विशेषणे यासाठी वापरलीत कदाचीत की त्या दोन टोकांमधीलही सर्व प्रकारचे अनुभव शब्दांकित झाले की भाषा आणि मानवी आयुष्यही समृद्ध होईल.
अस्तित्वाच्या कोनासाठी करकटक इमॅजिन करा... वर्तुळ मोठमोठे होत जाते तसे अमूर्त अधिकाधिक शब्दरुप घेऊ लागते. साहित्य व्यापक होत जाते. निर्मीतीप्रक्रिया (काहीशी) परिपूर्ण होते.
पाहिजेत शब्द:
विश्वाला आळवणारे (ज्ञानबा)
अणूला उचलणारे (तुकाराम)

aschig | 18 January, 2011 - 23:04

> युनिव्हर्सली काय आनंददायी आहे असे काहीसे आपोआप ठरते, ज्यावर तुम्ही, मी आणि विंदांसारख्या लोकांचे नियंत्रण नसते. मी त्याच्या बद्दल बोलत आहे.

हा मुद्दा चर्चेच्या मुळाशी असेल तर थोडे कठीण आहे. आनंदच काय पण कोणतीही गोष्ट युनिवर्सल नसते - न सत्य, न काळ - सर्वच सापेक्ष असते.

अरभाटा छान लिहिले आहेस.

स्तन्यसूक्त सर्क्युलर वाटते - कोटीवेळा उल्लेख करुन सृजनाशी असलेला त्यांचा पुष्ठ संबंध दाखवला आहे. चिता आणि अग्निशीखा शंकराकडे म्हणजे नष्टत्वाकडे बोट दाखवतात. शेवट मात्र ब्रह्माने, म्हणजेच पुनर्निमितीने होतो. पण १५% लोकच हिंदु असल्याने ते देखील युनिवर्सल नाही. चला खूप झाले, जरा युनिवर्स ची चिंता करावी.

मामी | 19 January, 2011 - 07:59

मी जे काही खाली लिहित आहे त्यात कोणत्याही कवितेचे रसग्रहण नाही. पण केवळ या अनुषंगानी माझ्या मनात आलेले विचार आहेत. मामी मुद्दा सोडून बोलताहेत वगैरे आरोप करण्याआधी जर नीट वाचून बघितलेत तर बर पडेल.

==================================

एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीमागे प्रेरणा काय असते? आणि हेतू काय असतो? इथे कलाकॄतीचा व्यापक अर्थ अभिप्रेत आहे. जिथे जिथे सृजन असते तिथे कला असते आणि कलाकृती कोणत्याही माध्यमातली असू शकते. काही उदाहरणे संगित, काव्य, चित्रकला, चित्रपट, लेखन इ.

तर यापैकी कोणतीही कलाकृती निर्माण होताना त्यामागे त्या कलाकाराची पार्श्वभुमी, तिचे अनुभव-विश्व, तिची त्या क्षणाची मानसिक अवस्था, त्या क्षणाची आजूबाजूची परिस्थिती असे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. पण यापेक्षाही महत्त्वाची असते त्या त्या कलाकाराचा एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि तो मांडण्याची शैली. उदा. चित्रकलेचा तासाला स्टिललाईफ किंवा पोर्ट्रेट करताना सगळ्यांच्या समोर एकच विषय मांडलेला असतो. पण प्रत्येकाच्या कुंचल्यातून उतरल्यावर तो वेगळा दिसतो. राग तोच असला तरी गाताना वेगवेगळे गायक तो आपापल्या ढंगाने गातात.

हेतूसुध्दा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. काहीजण केवळ आपल्यातल्या सृजनाला महत्त्व देत असतील, काही त्याकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून बघत असतील, काही लोकप्रिय विषयांवरच कलानिर्मिती करत असतील, काहींना या सगळ्यातला तोल सापडला असेल तर काहीना कधीच नाही. काहींची कला सगळेच डोक्यावर घेतात, काहींना केवळ समीक्षक नावाजतात, काही सुदैवी कलाकार दोन्ही ठिकाणी यशस्वी ठरतात. काही सगळं काही असून अयशस्वी ठरतात. कलेकरता लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्ही महत्वाचे पण हे दोन्ही एकत्र मिळणे प्रत्येकाच्या नशिबी नसते.

राजा रविवर्मा आणि पिकासो दोघेही दिग्गज चित्रकार. एकाची चित्रे सहज सोपी समजण्यासारखी तर दुसरा दुर्बोध. पण दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठच की. कारण त्यांना मोजण्याचे मापदंडही वेगवेगळे. कलेचं हेच तर वैशिष्ठ्य आहे. विज्ञान, गणितासारखी यात तर्ककठोर उत्तरे नाहीत. सगळी उत्तरे सापेक्षी असतात. एकाला आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही. पण जसा सर्वसाधारणपणे जनतेत प्रिय असणारा लोकाश्रय मिळवतो. तर समीक्षकांच्या कसोटीला उतरलेला राजाश्रय मिळवतो. आता हे समीक्षक कोण? तर तुमच्या आमच्या सारखीच माणसं पण त्या त्या क्षेत्राचा अनुभव असणारी. जसे प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकांबरोबर निकाल देणारे पंचही महत्त्वाचे असतात तसेच. त्यांचा रोल कमी महत्वाचा ठरवून चालणार नाही. नाहीतर स्पर्धाच बंद करा. सगळेच उत्तम असे ठरवा. पण तसे होत नसते. आता यामुळेच कलेचा घोडेबाजार भरतही असेल. पण मग हा आपल्या सिस्टीमचा दोष आहे. त्याकरता नुसतीच आगपाखड करून फायदा नाही कारण यावर सध्यातरी उपाय नाही. निदान मलातरी माहित नाही.

कलेकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहिले तर? कोणा कवीने 'पैसे घेऊन' काव्यवाचनाचा कार्यक्रम केला तर? कोणा चित्रकाराने केवळ घोडे विकतायत, केवळ गणपतीची चित्र खपतायत म्हणून केवळ तेच चितारायचं ठरवलं तर?? केवळ कौटुंबिक जिव्हाळ्याचे चित्रपट एखाद्याने काढायचे ठरवले तर??? हा पुन्हा त्या कलाकाराचा प्रश्न आहे. शेवटी कलाकारालाही पोट आहेच ना? कलानिर्मितीचा आनंद आणि व्यवहार याची सांगड कोणी घालत असेल तर इतरांना हरकत घेण्याची गरज का भासावी? शिवाय याही कलेचा आस्वाद घेणारे रसिक आहेत म्हणूनच हे घडतय ना? मग चालू दे की. Its a win win situation. असे कलाकारही कधीमधी केवळ स्वानंदाकरता कलानिर्मिती करतही असतील किंवा नसतीलही. हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.

आजच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे कलेचं क्षेत्रही व्यापक होत चालले आहे. तंत्रज्ञानाबरोबरच उत्तम मार्केटिंग आणि व्यवस्थापन करून जर कोणी आपली कला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असेल तर त्यात गैर ते काय? नाहितर कवीने आपल्या घरातल्या घरात कविता लिहून ठेवल्या असत्या. त्या छापून, कार्यक्रम करून, आंतरजालावरच्या विविध संकेतस्थळांवर पोस्टून टाकल्या नसत्या. शेवटी जेव्हा लोकांकडून वाखाणणी होते तेव्हा कलाकाराला पूर्णे समाधान मिळतेच पण शिवाय तिथेच कलानिर्मितीचं वर्तुळ पूर्ण होतं.

याचबरोबर आपल्या जाणीवा प्रगल्भ ठेवणे, आपल्या कलाक्षेत्राचा स्थानीय आणि जागतिक इतिहास जाणून घेणे, समकालिनांकडून शिकणे आणि व्यापक व पूर्वग्रह न बाळगणारा दॄष्टीकोन ठेवण्याचा प्रयत्न करणे यामुळे स्वत: कलाकार (किंवा कोणीही सामान्य माणुसही) एक माणुस म्हणून वरच्या पातळीवर जाऊ शकतो. आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या कलेत उमटते. याकरता कलाकाराने स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडून आत्मावलोकन करणेही तितकेच गरजेचे आहे. आणि या सगळ्या सगळ्या गोष्टींचं भान कलाकाराला ठेवणं गरजेचं आहे कारण तोही याच सिस्टीमचा भाग आहे. कदाचित यशस्वीतेचे हेच गमक ठरू शकेल. आणि जर कोणा कलाकाराला हे पटत नसेल तर त्याने हा मार्ग अवलंबू नये. कलंदर कलाकार म्हणून जगावं. पण मीच श्रेष्ठ आणि म्हणून मी म्हणतो तेच श्रेष्ठ असा आग्रह असेल तर त्यामुळे उलट प्रगतीचा मार्ग खुंटण्याची शक्यता अधिक.

रैना | 19 January, 2011 - 07:31

आश्चिग/ मामी- छान पोस्ट

अगा माझ्या देवा I साधलीस वेळ

अगा माझ्या देवा I साधलीस वेळ
देखोनियां कळ I दु:खिताची !
नाकारिले तेच I आले आकारास;
तुवां केला घास I सर्वस्वाचा.
दावोनिया मला I मृत्यूचे हे भय
साधलीस सोय I प्रार्थनेची!
भिवनोनी मला I लवविली मान
आणखी पाषाण I पूजवीला
विजेच्या जिभेने I विचारिले 'काय';
म्हटले मी 'होय' I कांपताना
दाविलेसी उग्र I महारोग, क्षय
वदविला 'जय' I आपला त्वां.
निराशेचे वज्र I हाणोनिया माथां
तुझी सर्व गाथा I लिहविली.
(चरकांत चाले I हळुहळु उस
भक्तीचा हा रस I गळों लागे)
शरण मी बापा I शरण शरण,
तुझाची चरण I मानेवरी
दु:ख हे शरण I देवा, मी न बद्ध
आत्मा स्वयंसिद्ध I सुखापोटी.

भरत मयेकर | 19 January, 2011 - 09:56

बेफ़िकीर यांचे आभार मानण्याची वेळ तशी कमीच येते. त्यांच्यामुळे आवडत्या विंदांच्या कविता पुन्हा वाचायला मिळाल्या, त्यावरचे काहींचे मनोगतही वाचायला मिळाले, यासाठी बेफ़िकीर यांचे आभार!
आततायी अभंग
अगा कृपावंता । आवर हे दान
पायांतील काटा। पायासह गेला;
ऐसा हा भेटला । धन्वंतरी.
दु:खासह गेला। घेवोनिया सुख;
भूक आणि मूख। सवें गेली.
प्रार्थियले काय। काय दिले हाती,
मातीवर माती । वाढलीस......
....अगा कृपावंता। आवर हें दान;
टाक ते निदान। दु:ख माझें

मानवाचे सारे। माकडाच्या हाती
संस्कृतीला झाला। नफ़्याचा उदर;
प्रकाशाचे पोर। कुजे गर्भी.
स्वातंत्र्याला झाला। स्वार्थाचा हा क्षय;
नागड्यांना न्याय । मिळेचना
मानवांचे सारे । माकडांच्या हाती
कुलपेच खाती। अन्नधान्य.
जगाचे पोशिंदे। भुकेने भाजती;
आणखी माजती। मधलेच.
मानवाचे आता। मानवा मिळू दे;
ना तरी जळू दे। विश्वगोल
जळताना जळो । निदान ही भूक;
प्रार्थना ही एक। करा आता.
नागड्यांनो उठा। उगवा रे सूड;
देहाचीच चूड। पेटवोनी.

भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत
कर कर करा,
मर मर मरा
दळ दळ दळा
मळ मळ मळा
तळ तळ तळा
तळा आणि जळा.
कर कर करा
मर मर मरा
बाज बाज बाजा
पाज पाज पाजा
पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा
कर कर करा
मर मर मरा
धूव धूव धुवा
शीव शीव शिवा
चीर चीर चिरा
चिरा आणि झुरा
कर कर करा
मर मर मरा
कूढ कूढ कुढा
चीड चीड चिडा
झीज झीज झिजा
शिजवा आणि शिजा.
विंदांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा आणि त्यांच्या निधनानंतर फ़क्त ’देणार्‍याने देत जावे’ एवढीच कविता सगळ्या(?) वृत्तपत्रांत छापली गेली? बहुधा त्या सगळ्या संपादकांनी शालेय पुस्तकाबाहेरील मराठी साहित्य वाचण्याच्या अनुत्पादक क्रियेत वेळ दवडला नसावा. मी वाचतो त्या लोकसत्ताने विंदांवर सहा पानी पुरवणी काढली होती. त्यात एक पूर्ण पान त्यांच्या काही कविता , अर्धे पान बालकवितांवर दवडले होते.

भरत मयेकर | 19 January, 2011 - 10:45

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना तत्कालीन शासनाने गुंड ठरविले होते...त्याच्यासाठी... पण हे श्रेय तुझेच आहे

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास
ह्याची मांडी मोडू नका; हा माणूस शेवटपर्यंत उभा होता,
बुडणार्‍या गलबताच्या डोलकाठीसारखा. ह्याच्या हाताच्या मुठी वळा;
भिऊ नका, त्याच्या हातांतील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत.
त्याचे उघडे तोंड असे आवळू नका, पैशाच्या पिशवीसारखे;
मेला असला तरी मवाली आहे...पटकन शिवी घालील!...
आणि उपचारासाठी कवटी फ़ुटेपर्यंत थांबूही नका;
ती अगोदरच फ़ुटलेली अहे...
पहा उगवतील ’फ़टफ़ट’ले आहे, आणि उद्याची ताजी बातमी
शाई पिऊन झिंगली आहे.
अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास
ती माती तुला विसरणार नाही, अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे.
-ह्या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरुज अजून दांत विचकर उभा राहील.
तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार यांच्यामधील रित्या रेताडांत डावा पाय रोवून
मी अजून उभा आहे...पण हे श्रेय तुझेच आहे.
विंदांच्या जातक मधल्या कवितांत सामाजिक आशय नाही अशी टिपण्णी वाचली. या सगळ्या कविता धृपदमधल्या. सगळ्याच कवींनी सगळ्याच काळात सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्याच पाहिजेत असे काही आहे का?
विंदांनी गझलाही लिहिल्या(की गझल लिहिले?), त्या त्यांच्या इतर कवितंसारख्या भिडत नाहीत (हे बरेच झाले का?)..पण त्यांची 'सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी' ही गझल मनात ठसलीय्..श्रेय पं यशवंत देवांनाही.
त्यातल्या या काही ओळी :
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे रे मी तुला, सांगु कसे रे याहुनी
संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती , आज्ञा तुझी ती मानुनी.
वहिवाटलेली वाट ही मी काटते दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी

व्वा!
हे बरं झालं. मीही लिहीन इथे नक्कीच!

रच्याकने- खडा म्हणून नाही पण मला मागे मर्ढेकरांच्या कवितांवर रसग्रहण केल्याबद्दल काही माबोकरांनी प्रताधिकार कायदा वगैरे बाबत सुनावले होते. अर्थात त्याबद्दल मला फारशी माहीतीही नाही.
इथे वा अन्यत्र त्याबाबत धागा/माहीती असल्यास कुणी कळवेल?
(खोच म्हणून नव्हे तर माहीती हवीये म्हणून विचारतोय, गैरअर्थ लावू/घेवू नये)

मी चांद झेलला ग पदरात त्या ठिकाणी
घे शपथ तू गळ्याची सांगेन मग कहाणी

होती अधीर संध्या कलली नदी किनारी
अन सावलीत होते लपले अधीर पाणी

आकाश सर्व त्याच्या केसात पिंजलेले
डोळ्यात डोह होता रक्तात गीत मानी

डोळे मिटून त्याचा नि:श्वास हुंगताना
मातीत मी मिळाले - माती किती शहाणी!

पुढचे नको विचारू, इतुकेच सांगते मी
मी चांद झेलला ग पदरात त्या ठिकाणी!

अस्तित्वकोनाचा
विकास होऊन
एक दिवस
येतील, येतील
अस्तित्वाच्या
दोन्ही भुजा
एका रेषेत;
जाणीव, जगत
होतील एक;
राहील उभा
काळाचा द्विभाजक
आणि बनेल
विश्व निर्ब्रह्म
सरळ कोनाच्या
साक्षात्कारांत!

अस्तित्वकोनाचा
विकास साधताना
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे.

पाहिजेत शब्द
करडे, काळे
रसाळ, रटाळ
रेखीव, रांगडे
चपळ, लंगडे
प्रगाढ, प्रशांत
पाहिजेत शब्द
जहाल, ज्वलंत

पाहिजेत शब्द
ओंगळ, ओवळे
सात्विक, सोवळे
चेंगट, हट्टी
तर्कटी, मर्कटी
सुखरूप, स्वादिष्ट
पाहिजेत शब्द
गरोदर, गर्विष्ठ

पाहिजेत शब्द
बकुळीच्या कुशीतले
दर्याच्या मिशीतले
पाहिजेत शब्दः
पहाटेच्या ओटीतले
थडग्याच्या मिठीतले

पाहिजेत शब्द
मुसमुसणारे
धुसफुसणारे
कुजबुजणारे
पाहिजेत शब्द:
कडकडणारे!

पाहिजेत शब्दः
विश्वाला आळवणारे
अणूला उचलणारे
रक्तांत मिसळणारे
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे

कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध,

छाया देसाई | 19 January, 2011 - 12:43

बेफिकीरजी , मला आपल्याबद्दल आदर आहे पण आपल्याला एखादी कविता नाही आवडली किंवा आपल्या
विचारांच्या कक्षेत ती बसली नाही म्हणून महान कवी कसपटासमान होउ शकत नाही .आता आपण नमूद
केलेली पहिलीच कविता घेउ.या कवितेतून मला अस जाणवल की -
सर्व प्रथम आपण सर्वासारखे असतो ,एका विसिष्ट साच्यातले ,सर्व कोनासारखे ,दोन बाजू एकत्र होऊन
निर्माण झालेले एक कोन .पण तेवढ्याने आयुष्याला परीपूर्णता नाही येउ शकत .मग आपण आपला
विकास साधण्याचा प्रयत्न करतो .त्या प्रयत्नाना कधी यश येतही .तेव्हा त्या कोनाचे दोन्ही बाहु जाणिवानी विकसीत होतात ,इतके की ते क्रियाशील होतात व घड्याळाच्या काट्याप्रमाणे सरकू लागतात .आता त्यांच्यात इतकी प्रगती होते की ते बाहु सरळ रेषेत येवून काल मापन करणार्‍या घड्याळाचेच द्विभाजक होतात .आता त्या बाहूत एवढी ताकत येते की ते काळालाच आव्हान करतात .त्या काळातील चालीरिती ,प्रचलीत धर्म ,प्रथा,एवढच नव्हे तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण करतात .आता ते काळाचेच द्विभाजक होतात .आता खरी कसोटी असते .अशा वेळी त्या बाहुना गरज असते ती समर्पक शब्दांची .या शब्दानी त्या विकसीत जीवाला ज्या ज्या व्यक्तीना जसे जसे समजतील अशा शब्दांची कारण आता हा विकास त्या व्यक्तीचा स्वत:पुरता मर्यादीत न रहाता तो वैश्वीक व्हायचा असतो त्यासाठी योग्य संवादाची गरज असते कारण असे अनेक काळद्विभाजक घडवायचे असतात .
खरच ग्रेट कविता .

शैलजा | 19 January, 2011 - 13:06

आगाऊ, खरंच अरेरे विंदांवर पर्टीक्युलर राग दिसतो.. असो.

डॉ. काय टुकार आहे त्या कवितांमध्ये सांगाल का? पहिल्या कवितेबद्दल छाया देसाई बोलल्याच आहेत.
दुसर्‍या कवितेचा मला जसा अर्थ लागलेला आहे त्याप्रमाणे - चूकही असू शकतो - काळाच्या ओघात एखाद्याच्या आयुष्यात कितीतरी घडते, खोट्या खर्‍या आशा, आकांक्षा, इच्छा असतात, काही पूर्ण होतात, काही होत नाहीत, पण त्यांच्या सुखावणार्‍या, दुखावणार्‍या आठवणी असतात, त्या तर पुसून जात नाहीत.

या गारा
वेचील कोण?
....आता वाजले
फक्त दोन...

ती स्वतःची सुखदु:खे, त्याची इंटेंसिटी दुसर्‍यांना तशीच जाणवेल का? बाहेर जरी काही दु:खे दाखवता येत नसली तरीही आतमध्ये ती जाणवत राहतात. माणसे मूक अश्रू ढाळत राहतात.

पावसा पावसा
पड पड
दार लावून
रड रड

तिसरी कविता तर माणसाच्या स्वभावाला मार्मिक अधोरेखित करणारी आहे.
भुते माणसांची
असतात माणसांसारखीच
घेतात विकत
नरकाचे गाईड

ह्यातून तुम्हांला काहीच उमगत नाही? जाणवत नाही? चार ओळींत आणि ८ शब्दांत विंदा नेमके लिहितात हाच त्यांचा गुन्हा की काय?

चिंगी | 19 January, 2011 - 14:11

वरचे काही प्रतिसाद मनापासुन पटले.. उंटावरचे परीक्षण मस्तच..
मला स्वतःला कवितेतलं फार काही कळत नाही.. मग त्या विंदांच्या असो वा माबोवरील कोणाच्या. (याचा अर्थ मी लिहु नये असा थोडाच आहे डोळा मारा) पण त्याच वेळी दुसर्‍याकोणाला तरी त्या आवडतात तर ते सगळे संकुचित, एकाच रंगाचा चष्मा लावुन बघणारे असं कसं काय, त्यांना होणार्‍या आनंदाचे, मिळणार्‍या स्फुर्तीचे, वा कोणत्याही भावनेचे परिमाण माझ्या जाणिवेच्या कक्षेत येत नाही इतकंच.

येथे कवीवर्यांना भाषा गरोदर वाटत आहे कारण त्यांच्या मते त्यांच्या मनातील 'अमूर्त' आशय मांडण्यासाठी जे शब्द पाहिजे आहेत ते तर मराठी भाषेतही नाहीत. तिला ते नव्याने प्रसवावे लागतील. ते नव्याने प्रसवावे लागतील हे मात्र उपलब्ध असलेल्या शब्दांमधूनच सांगण्यात येत आहे.
मला अभिप्रेत असलेला आशय मांडण्यासाठी मला हजारो गुणांनी युक्त असे शब्द हवे आहेत कारण उपलब्ध भाषेत तो आशय मूर्त स्वरूपात, म्हणजे ध्वनी स्वरुपात येऊ शकत नाही आणि तो तसा यावा म्हणून भाषा आता गरोदर राहिलेली आहे.
गद्यात मांडले तर तीन ओळीत बसते. असा निकष लावायचा तर (जगातल्या कोणत्याही भाषेतली ) हजारो/लाखो प्रेमकविंता पण यात येतील की.. पहिलं प्रेम, प्रेमभंग, विश्वासघात (तुमच्या गझलेच्या भाषेतली बेवफाई की काय ते.) सगळे अनुभव असे ३ ओळीत शब्दबद्ध करता येतात म्हणुन त्या सगळ्या सारख्या नसतात ना.. प्रत्येकाची संवेदनशीलता वेगळी आणि त्यांची पद्धतही निराळी. म्हणुनच कुणी 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' लिहुन जातो आणि कुणी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' असं. दोन्ही आवडणारे लोक आहेतच. जसं इथेही काही लोकांना तुमच्या कादंबर्‍या टुकार, उथळ वाटतात आनि काही जणांना फक्त त्यावर प्रतिसाद देता यावा म्हणुन सदस्यत्व घ्यावेसे वाटण्याइतक्या आवडतात.. दोघेही आपापल्या जागी बरोबर!
(वर लिहीलेली दोन्ही गाणी 'top of mind' वाली असल्याने लिहीली आहेत, आशय लक्षात घ्यावा.)

आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वरच्या कवितेच्या परीक्षणे वर काहींनी लिहीली आहेत पण लक्षात कोण घेतो! स्मित

भरत मयेकर | 19 January, 2011 - 16:14

शब्दब्रह्म बद्दल स्वतः विंदा : मी संपूर्ण जाणिवेला काव्यविषय मानीत असल्यामुळे संपूर्ण शब्दसृष्टीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला आहे; माझ्या दृष्टीने सगळेच शब्द महत्त्वाचे आहेत, काव्यात्म आहेत. त्या त्या जाणिवेच्या संदर्भात ते ते शब्द सच्चे बनतातः म्हणून ....पाहिजेत शब्द ओंगळ, ओवळे........................

रैना, हा धागा मी (आणि आणखी अनेक वाचक) मला आवडलेल्या कविता असाच वाचतोय. मध्ये मध्ये येणारे ब्रेक्स अपरिहार्य आहेत. आपल्या आणखी कोणत्या आवडत्या कवीच्या कवितांच्या शोधात बेफिकीरजी आहेत, याच्या प्रतीक्षेतः)

भरत मयेकर | 19 January, 2011 - 17:07

अगा माझ्या देवा I साधलीस वेळ

<<<<विविध पातळ्यांवर आलेले अपयश आणि संकटे यामुळे कवीमहाशय आता शरण गेले आहेत व अध्यात्मिक होत आहेत.>>>>
विंदा निरीश्वरवादी होते. त्यांच्या कवितेतला 'मी' म्हणजे ते स्वतः नव्हेत.
दु:खाला, संकटांना घाबरून ज्याला माणूस शरण जातो, अशी देव ही एक कल्पना आहे, असा अर्थ मला जाणवला.

रैना | 19 January, 2011 - 17:19

बेफिकीर- अर्थ मयेकरांनी सांगीतला तोच. देवाच्या नावाखाली फक्त भीती प्रसवून समाजात किती कौशल्याने देव या संकल्पनेचे स्तोम माजविल्या गेले आहे. त्यावरही आधारीत ही कविता आहे.
मला ही चांगली वाटते आणि आवडते. त्यातील उपरोध मला आवडतो. आणि हो समाजोपयोगी/ प्रबोधनपर इ.इ. आपल्याच निकषात बसत होती म्हणून टाकली.
आणि हो ते निरीश्वरवादी होते हे अनुमान काढायला मुलाखतीची गरज नाही. या आणि अशा कित्येक कवितांमधून ते जाणवत जाते.

शीर्षक - अटळ

पुर्ण कविता..

योनीस्वरूप विश्व
हिमाची पेटवळ घेत
शापित सूर्याशी
लाडीगोडी करताना
येणारे स्वर
मंजूळ, सुरेल
तळाशी मात्र
अंताचे सुगावे
अस्तित्वाचे पुरावे
केविलवाणे स्वर
काहीसे निराधार
काहीसे निराकार

भूगर्भाची स्पंदने
पृष्ठावर येताना
केविलवाणेपणाला देतात
भीमपलासाची चाल
स्वतःच होतात
तानसेन; आणि
स्वतःच होतात
श्रोता त्याचा

युगानुयुगे होणारा
हा अंताचा कल्लोळ
शापीत सूर्यापासून
लपलेला, थिजलेला
स्तब्ध; तरी भक्कम
नक्की, ठाम

याचा अर्थ सांगाल का??

शैलजा | 19 January, 2011 - 18:01

मी वर दिलेल्या कवितेचा कुणी अर्थ सांगण्याचे प्रयास घेईल काय?

सृजनाची निर्मिती कितीही आनंददायी असली तरीही त्यालाही शेवट आहे, कधी कधी अतिशय करुण, केविलवाणा असा, लगेच जाणवला नाही तरीही. सृजन सुंदर आहेच, तरीही अंतही अटळ आहे, त्याची परिमाणे जाणवत नसली तरीही तो आहेच. जिथे जिथे काही सुरुवात आहे, तिथे तिथे अंत आहेच.

असो.

ईबा | 19 January, 2011 - 19:00

>> कविता ही काव्य व पद्य यांचे मिश्रण असावी. हा पहिला निकष असून तो तंत्राबाबत आहे. कुसुमाग्रज, बालकवी या सर्वांनी हा निकष तंतोतंत पाळलेला आहे.

कुसुमाग्रजांनी मुक्तछंद लिहिला आहे.

>> 'मी वाट्टेल ते लिहीन आणि तुम्ही मला महान समजा' ही भूमिका घ्यायला हे असले कवी म्हणजे कालिदास नव्हेत!
१. अशी भूमिका कालिदासानेही घेतल्याचं माझ्या वाचनात आलेलं नाही.
२. मला महान समजा - असं विंदांनी वा कुठल्याच कवीने म्हटल्याचं माझ्या वाचनात / ऐकिवात नाही. तुम्ही कुठे वाचलंत?

>> साहित्यिकांना व कवींना प्रथितयश होणे हे माध्यमांच्या अ‍ॅब्सेन्समुळे जरी थोडे अवघड असले तरी एकदा त्यांना उंची मिळाली की ते कायमचेच महान बनून जायचे.
अहो, पद्य हेच मुळात माध्यम म्हणून वापरलं गेलं नव्हतं का? जोवर साहित्य हे 'वाङमय' होतं, मौखिक होतं, ते 'डॉक्युमेन्ट' करायची सोय नव्हती, तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार होत रहावा म्हणून सांगायचा आशय तालबद्ध किंवा वृत्तबद्ध पद्धतीने रचायला सुरुवात झाली. वृत्तबद्धता हे साधन आहे, साध्य नव्हे.

>> कवितेचा आशय हा कायम मनस्थिती पालटवणाराच असला पाहिजे. उदाहरणार्थ कवीने त्याच्या मित्राचा मृत्यू पाहिला असला व ते कवितेत मांडले तर कवीला स्वतःला झालेल्या वेदना रसिकांना तितक्याच तीव्रतेने व्हायला हव्यात. कवीला आनंद झाला असला (इतर कुठल्या गोष्टीचा, जसे बागेत फुले उमलली वगैरे) तर तो आनंद तितक्याच तीव्रतेने व शुद्धतेने रसिकांनाही व्हायला हवा.

हे कुठल्या साहित्याला लागू नाही? हे काही काव्याचं व्यवच्छेदक लक्षण नव्हे.

नाने........ धन्स आता हा धागा आवडत्या दहात टाकायला हवी. जर काही हरकत नसेल माझ्या विपुत असलेली विंदांची कवितादेखील इथे अ‍ॅड करायला हरकत नसावी. Happy

VinDa - chukali disha tarihi.jpg

नानबा, माझी काढ मग - त्यात रसग्रहणात्मक काही नाहीये.
आणि 'वृत्तबद्धता हे साधन आहे' यापलिकडे काही इथे रेलेव्हन्ट ठरेल असा मुद्दाही नाहीये. तेवढंच ठेव हवंतर. Happy

.

Pages