सोनुला तिने तापाच औषध दिल आणि मांडीवर घेवुन तिला झोप येइपर्यंत हलकेच थोपटत राहिली. तोंडाने अंगाईगीता ऐवजी मोठीचा अभ्यास, तिच्या मॅथ्समधल्या सम्स चालू होत्या. पुन्हा उद्याची तयारी आहेच तिच्या सकाळच्या शाळेची. तरी बर राहुलला रात्रीची शिफ्ट आहे नाहीतर सकाळी ४ वाजता उठायचं अगदी जीवावर येत. मनातले विचार झटकुन तिने सोनुला बेडवर टाकल. मोठीला झोपायला पिटाळल आणि पुन्हा ती स्वयपाकघरात आली. भराभर फ्रीजमधुन भाजी काढुन चिरुन ठेवली उद्या दुपारची आणि सकाळच्या डब्याची. कणीक तिंबुन ठेवली. सगळी झाकपाक करुन, लाईट बंद करुन ती बेडकडे वळली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.
अरेच्च्या! राहिल की बघायच, आज टीव्हीवर कुठला तरी सिंधु संकपाळांचा सिनेमा होता पण ह्या कामाच्या गडबडीत टीव्ही कुठे बघायला वेळ मिळावा? उद्या सकाळचे विचार डोक्यात घोळवत ती झोपेच्या अधीन झाली. हे एक बरय, झोप येण्यासाठी अजीबात कष्ट करावे लागत नाहीत. पाठ टेकली की झोप लागते. मधे कधीतरी सोनुच्या कण्हण्याने तिला जाग आली. उठुन तिला औषधाचा एक डोस देवुन ती झोपायला वळणार इतक्याच पहाटे पावणेपाचचा गजर वाजला.
आता कुठली झोप? उठुन चहाच आधण ठेवल. सासर्यांच्या बेडरुमवर टकटक केली. हॉलमधे जावुन टीव्ही बंद केला. कधीतरी रात्री उशिरा आल्यावर राहुल टीव्ही बघताबघताच झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. तोंडात ब्रश आणि एका हातात झाडु घेवुन तिने केरवारे केले. चहा घेताघेता सासर्यांच्या सकाळच्या नाष्ट्याची तयारी व एकिकडे गॅसवर मोठीच्या डब्याची भाजी टाकली फोडणीला. सासर्यांनी चहा घेताघेता फर्मान सोडलच, अजुन अंघोळ नसेल तर मला नाष्टा नको.
गिझर लावल्यापासुन शॉवरखाली तासभर उभ राहण्याची इच्छा तिने परत एकदा मनामधेच दाबली व दोन तांबे घाईघाईत अंगावर घेवुन ती पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. मोठीचा डबा भरुन तिने सासर्यांसाठी कुकर लावला, पालकाची भाजी करुन ठेवली. आणि मोठीला उठवण्यासाठी बेडरुमकडे वळली.
"मम्मा, थोडा वेळ झोपु दे ना ग अजुन प्लीज"
"नाही पिल्ला, सहा वाजलेत आता बस येइल ग इतक्यात"
"खुप थंडी आहे ग, पाचच मिनिटे झोपते ना" अस म्हणुन ती परत रजईत गेली.
इथं थांबुन उपयोगच नव्हता. तिने स्वतःच्या कपाटातुन प्रोजेक्ट रिपोर्ट्स काढले जे तिने चार दिवसापासुन मेहनतीने केले होते. आज तिचं प्रेझेंटेशन होत कंपनीच्या सी ई ओंसमोर. तयारी झाली होती सगळी पण वेळेत पोचतोय की नाही ही एकच शंका होती.
परत एकदा मोठीला हलवुन आणि थोडस चिडुनच तिने उठवले. ती बिचारी आता निमुटपणे उठली स्वतःच्या चिमुकल्या हातांनी एवढ्या मोठ्या रजईची वेडीवाकडी घडी घातली व बाथरुमकडे वळली. साडेसहा वाजले तरी मोठी अजुन बाथरुममधुन बाहेर आली नाही म्हणुन तिने दारावर दोन तीन थापा मारल्या हलकेच दार ढकलले तर बाईसाहेब गरम पाण्याखाली निवांत झोपल्या होत्या. सकाळची थंडी तिला काही गरम पाण्यातुन बाहेर येवु देत नव्हती. कसतरी तिच्या मागे लागुन तिने मोठीला शाळेसाठी तयार केल व गेटजवळ सोडुन आली.
बापरे तोपर्यंत ७ वाजले होते आता १५ मिनिटात स्वत:चे आवरुन छोटीला पाळणाघरात सोडुन तिला बसस्टॉप गाठायचा होता. सकाळी कितीही लवकर उठा वेळच पुरत नाही अस पुटपुटत तिने भराभर स्वतःच आवरल एका हातात स्वत:ची पर्स प्रोजेक्टची फाईल दुसर्या हातात छोटीची बास्केट, कडेवर सोनु असा लवाजमा घेवुन ती गाडीकडे पार्कींगमधे आली. ओह थंडीमुळे हल्ली गाडी लवकर सुरु होत नाही. तिने चालतच देशपांडे काकुंच घर गाठल. तोपर्यंत कंपनीची बस स्वारगेटवरुन निघाल्याचा मिस कॉल येवुन गेला होता. तिने दारातुनच सोनुला देशपांडे काकुंच्या हवाली केल. ती बिचारी झोपेतच होती आणि थोडी ग्लानीतसुद्धा.
काय राहिल, काय विसरल याचा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तशीच घाईघाईत गाडीत शिरली. ड्रायव्हरने आज परत एकदा रागाने बघितल. पण त्याच्याकडे लक्ष देण तिला महत्वाच वाटल नाही. लगेच शेजारचीने तिच्या सासुच्या कंप्लेंटस करायला सुरवात केली. तिने हसुन प्रतिसाद दिला. थोड समजावल. डोक गाडीच्या सीटवर टेकताच डोळे मिटले व आजच्या प्रोजेक्टची रिव्हीजन केली.
हा एकमेव अर्धा तासाचा वेळ तिचा हक्काचा होता. या अर्ध्या तासात ती बर्याचदा मुलींचा, स्वत:चा, घराचा, भविष्याचा विचार करायची. स्वप्न रंगवायची प्रोजेक्ट लीड करण्याची. आजपर्यंत खुप संधी आल्या पण काही ना काही कारणाने तिला पाणी सोडाव लागल त्यावर. पण आता नाही यावेळी नाही हार पत्करायची. मनाची पक्की तयारी झाली होती तिच्या. आयुष्यभराच स्वप्न पुर्ण व्हायची वेळ आल्यावर माघारी फिरणार नव्हती ती. राहुलशी बोलुन झाल होत, तो तयारही झाला होता. एक सुस्कारा सोडला तिन विश्वासाने.
शेजारणीने हळुच धक्का देवुन उठवल्यावर तिने डोळे उघडले पटकन बसमधुन उतरली. देसाई सरांना भेटायलाच हव या प्रोजेक्टमधे खुप मदत केलीय त्यांनी. देसाई शांतपणे चहा घेत होते. तिच्या चेहर्यावरची उत्सुकता बघुन त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केल. ती हसली व कॉन्फरंसकडे वळली.
खरतर पहिल प्रेझेंटेशन नव्हत तिच पण हुरुप आणि उत्साह पहिल्यासारखाच होता. आजपर्यंत आत्मविश्वासाने डिझाईन केलेली सगळी प्रोजेक्टस कुणीतरी दुसर्यानेच एक्झिक्युट केली होती. पण यावेळी तीच एक्झिक्युट करणार असं तिन देसाईंना सांगीतल होत. त्यांना कोण अभिमान वाटला होता तिचा. त्यांची खुप आवडती विद्यार्थिनी होती ती. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा जपणारी.
खुप छान प्रेझेंट केले तिने रिपोर्टस स्लाईडसच्या सहाय्याने स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. देसाईसरांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर तिने मोबाईल पाहिला. बापरे राहुलचे ६ मिसकॉल. तिने बाहेर येवुन लगेच त्याला कॉल केला.
"मुर्ख कुठे तरफडली होतीस इतका वेळ?? केव्हाचा फोन करतोय मी"
"राहुल अरे ऑफिसात आहे ना मी"
"माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??"
"काय झालय?" तिने स्वतःचा अपमान गिळत विचारल.
"अरे वा, आहे की आठवण घराची" तो कुत्सितपणे म्हणाला.
"फोन का केला होतास?"
"सोनुला ताप असताना तू गेलीसच का ऑफिसला?? तिला कोण सांभाळणार??"
"अरे मी दिलय औषध तिला"
"आणि देशपांडे काकुंना कोण सांगणार?? त्यांचा दोनदा फोन येवुन गेला" राहुलने रागाने फोन आपटला.
तिला आठवल काय विसरल होत ते, प्रोजेक्टच्या नादात आणि सकाळच्या घाईत ती देशपांडेकाकुंना सोनुच्या तापाच सांगायचच विसरली होती. तिने लागलिच त्यांना फोन केला. सोनुच्या तब्येतीची चौकशी केली. सोनु रडुन झोपली होती. मोठीच्या शाळेतुन प्रोजेक्ट पुर्ण न केल्याने नोटीस आली होती. तिने देशपांडे काकुंना हे राहुलला न सांगण्याचे कबुल करुन घेवुन फोन ठेवला.
राहुलचा परत एकदा फोन आला.
"हातातल काम सोडुन लगेच घरी ये, बाबांचा पाय मुरगाळला आहे आणि मला आता सेकंड शिफ्टला जायच आहे."
"पण राहुल" पुढच ऐकायला राहुल लाईनवरच नव्हता.
प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, देसाईसरांची पाठीवरची थाप, इतरांनी केलेल कौतुक, मुलीच आजारपण, नवर्याचा त्रागा, मैत्रीणीची सासु, मोठीचा शाळेतला प्रोजेक्ट सगळ डोक्यात मोठा पिंगा धरुन नाचायला लागल.
का सगळ मी सहन करायच?? मुली काय माझ्या एकटीच्याच का?? कुणी कुणी मदत करत नाही. किती किती फ्रंटवर लढायच?? नवरा म्हणुन तो करतो ते कष्ट मग मी काय करते?? मुलींचा अभ्यास मीच घ्यायचा का? सगळ्यांची दुखणी खुपणी मीच करायची का? घर आणि संसार फक्त माझाच आहे का?? मला माझा विचार करायचा अधिकारच नाही का?? मी आकाशात भरारी मारायची नाहीच का? मला कायम दुसर्यांसाठीच जगाव लागणार का?
कितीतरी प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तर माहित असलेले नसलेले किंवा ज्यांच्या उत्तरांची कवाड आपणच बंद केलेले. न संपणारे प्रश्न.
तिने मनाचा निश्चय केला यासगळ्यातुन बाहेर पडण्याचा, स्वत:च आयुष्य परत एकदा स्वतःच्या पद्धतिने जगण्याचा. ती देसाईसरांच्या केबीनकडे वळाली.
घरी गेल्यावर सासर्यांच्या रुममधे डोकावली. ते कण्हत होते 'आई ग, फार दुखतय ग'. तिच्यातली आई लगेच जागी झाली. तिने त्यांना हाताला धरुन उठवल दवाखान्यात नेल. तिथुनच देशपांडे काकुंना फोन करुन उशिरा येतेय थोडी, तुमच्याकडेच दोघींना खिचडी खायला घाला अस सांगीतल. सासर्यांना घेवुन घरी यायला बराच उशिर झाला. मग त्यांना गरम गरम उपमा करुन दिला खायला व ती मुलींना आणायला देशपांडे काकुंच्या पाळणाघराकडे गेली.
मुलिंचे कोमेजले चेहरे पाहुन पोटात तुटल तिच्या. सोनुला जवळ घेताना तिने मोठीशी तिच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस केल. तिची कळी खुलली. आई पुन्हा एकदा वाट्याला आली होती त्यांच्या १२ तासांनंतर.
घरी आल्यावर तिने सोनुसाठी डॉ. मानकरांच्या हॉस्पिटलमधे फोन करुन दुसर्या दिवशीची अपॉईंट्मेंट घेतली. सोनुला परत औषध दिल. तिच्या डोक्यातुन हात फिरवताना तिला सुद्धा दिवसभराच्या थकव्याने झोप लागली.
पहाटे कधीतरी राहुलने तिच्या मानेखाली उशी दिली, अंगावर पांघरुण टाकल, सोनुला गादीवर ठेवल. तिच्या कपाळावर येणार्या केसांना बाजुला सारुन तो हलकेच पुटपुटला,
"मी खुप वाईट आहे ना, बट स्टील आय लव्ह यु गार्गी"
हसली ती सुद्धा आणि बर्याच गोष्टींची आखणी केली मनातल्या मनात, मोठीच्या प्रोजेक्टला लागणारा मायक्रोसॉफ्ट वर्ड्चा स्क्रीनशॉट, सासर्यांच इंजेक्शन, सोनुची अपॉईंटमेंट, राहुलचा आवडता बदामाचा शिरा आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल.
स्वाती२ , गार्गी का आवडली
स्वाती२ , गार्गी का आवडली नाही याचे स्पष्टीकरण आवडले.
इथे सगळ्यांनी म्हण्लेय त्याप्रमाणे मलाही काहीच आयते मिळालेले नाही. जे आहे (किन्वा अजुनही मिळालेले नाहीये पण मिळवायचेय) त्यासाठी बराचसा वाईटपणा घ्यावा लागलाय आणि झगडा करावा लागलाय. हे वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही कडे पण. घरातच नव्हे तर नोकरी मधेही कधी कधी खडूस बॉस, अन्यायकारक वागणूकीला तोंड द्यावे लागतेच. so to live with dignity you need to fight. आणि हे सगळ्यांनाच लागू पडते. कधीच कुठेच काहीच मिळावण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही अशी व्यक्ति मला तरी वाटत नाही सापडेल असे. फक्त तुमच्या हुशारीवर आणि निर्णय घ्यायच्या क्षमतेवर संघर्ष कमी / जास्त वाट्याला येईल एव्हढेच. गार्गी चे आयुष्य काही वर्षांपुर्वी माझ्याही वाट्याला आलेच होते पण हे सहनशक्तीच्या पलीकडे जातेय असे लक्षात आल्यावर त्यातुन मार्ग काढला. त्या वेळी प्रचंड त्रास झाला पण नंतर सगळे व्यवस्थित झाले.
ज्याप्रमाणे एखाद्या प्रोजेक्ट मधे आपण क्लाएंट चे expectations set करतो , की या वेळापर्यंत एव्हढेच काम होईल ई. तसेच घरातही गृहीणीने काय काम कीती वेळात जमेल कोणते जमू शकतच नाही अशी expectations set केली पाहिजेत.
शुभांगी छान लिहिलयसं , आवडली
शुभांगी छान लिहिलयसं , आवडली कथा !
@स्वाती२ , डेलिया अनुमोदन
@स्वाती२ , डेलिया
अनुमोदन
(No subject)
अशा हार मानणार्या गार्गी,
अशा हार मानणार्या गार्गी, असे दुटप्पी राहूल असतातच तेव्हा त्यांच्या स्वभावासकट ते कथेत येणं ठीक आहे. पण एक कथालेखीका म्हणून या पात्रांना तुम्ही ज्या शेवटाकडे वळवलय ते आवडलं नाही.
अशा तर्हेच्या कथांमधे करिअर करु इच्छिणार्या स्त्रियांना टिपिकल नवरेशाहीचा कसा त्रास होतो, घर-ऑफिस अशा दुहेरी चक्रात ती कशी पिळून निघते वगैरे परिणामकारकरित्या मांडून झाल्यावर कथेच्या शेवटाकडे बाई नेहमी हातातल्या प्रोजेक्टचा बळी देते, नोकरी सोडते वगैरे दाखवून हार स्विकारताना'च' का दाखवलं जात ते खरंच कळत नाही. पटत नाही.
एक कथालेखीका म्हणून आपल्याला नायिकेला (इथे गार्गीला) एका वेगळ्या शेवटाकडे न्यायला पाहिजे असं का नाही वाटत? सगळं स्वतःवरच पडतय, कुणाचीच मदत नाही हे कळल्यावर त्यावर मार्ग शोधणारी, नवर्याला ठामपणे सांगून धुडकावणारी, सासर्याला स्पष्टपणे बोलून प्रसंगी वाईटपणा घ्यायला तयार असणारी गार्गी, आपल्या प्रोजेक्टलाही सारखंच महत्व देणारी गार्गी शेवटी दाखवली तर तिला हवी ती सहानुभूती मिळणार नाही असं वाटतं का?
अशा गार्गीही नक्कीच असतात पण त्या दाखवायच्या ऐवजी अशा डिस्करेजिंग शेवट स्विकारलेल्या गार्गीच कथांमधून का दाखवाव्या हे कळत नाही आणि पटत नाही मला. अशा कथा मला आवडत नाही तेव्हा त्या अर्थाने ही सुद्धा आवडली नाही.
बाई घरासाठी, मुलांसठी प्रोजेक्ट सोडायला तयार होते हे दाखवून कुठेतरी स्त्रियांनी शेवटी तसं केलेलंच चांगलं, त्याशिवाय इलाजच नाही असं सुचवायचं असतं कां? आणि ते राहूल शेवटी तिला स्टील आय लव्ह यू म्हणत मानेखाली उशी देतो दाखवणं कशाला? काय सुचवायचं आहे यातून? अशा उर्मटपणे बोलून अपमान करणार्या नवर्याच्या मनात तिच्यावरच्या (?) प्रेमाचा झरा आत कुठेतरी झुळझुळतोय आणि तिला तो जाणवला वगैरे दाखवायचय का त्या प्रसंगातून? की तिला नवर्याचा दुटप्पी स्वभाव कळलाय म्हणून ती हसतेय असं दाखवायचं आहे ते नाही नीट कळलं.
वर कुणीतरी लिहिलय ज्यांना यातून जावं लागलं नाही त्यांना हे कळणार नाही वगैरे. शहरातल्या ९५% स्त्रियांना लग्नानंतर करिअर जोपासताना अशा तर्हेच्या दुहेरी कसरतीतून जावं लागलेलं असतंच कधी ना कधी तेव्हा हे 'कळण" वगैरे आपण गृहितच धरायला हवय.
शर्मिलाला अनुमोदन. खूपच छान
शर्मिलाला अनुमोदन.
खूपच छान पोस्ट.
शहरातल्या ९५% स्त्रियांना
शहरातल्या ९५% स्त्रियांना लग्नानंतर करिअर जोपासताना अशा तर्हेच्या दुहेरी कसरतीतून जावं लागलेलं असतंच कधी ना कधी तेव्हा हे 'कळण" वगैरे आपण गृहितच धरायला हवय.
शर्मिलाताईंना अनुमोदन.
शर्मिला, नाही पटले. ते
शर्मिला,
नाही पटले. ते लेखिकेचे स्वातंत्र्य आहे ना? तिला ती गार्गी तशीच दाखवायची असेल तर?
गार्गीचे (पात्राचे) वागणे आणि कथा - या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना?
याचा व्यत्यास म्हणजे
आवडलेल्या साहित्यातील पात्रांचे वागणे आपल्याला पटते का? ते त्यांच्या जागी असतात.
लेखीकेचे स्वातंत्र्य आहे
लेखीकेचे स्वातंत्र्य आहे तिच्या पात्रांना कसे दाखवायचे आणि कुठे न्यायचे. मी ते अमान्य करतच नाहीये. ते परिणामकारकरित्या दाखवलेही आहे लेखीकेने. लेखकाची आपल्या लिखाणाच्या पलीकडे एक जबाबदारी असते हे मानणार्यांमधली मी एक आहे. तेव्हा त्या अर्थाने मला ही कथा आवडली नाही. शेवट नीट उतरला नाही हे फक्त पर्याय कोणता या अर्थानेच नाहीये. हे मी मला वाटतं पुरेशा स्प्ष्टपणे लिहिले आहे वर.
त्या त्या काळातल्या समाजात, त्या वेळेला अनुसरुन जे साहित्य येते त्यात कुठेतरी 'पुढे' नेलं जाण्याची, परिस्थितीवर मार्ग शोधले जाण्याची क्षमता असायला हवी, नकारात्मकताच फक्त नको असं मला वाटतं. हे फक्त वैयक्तिक नाही.
साहित्य आवडणे आणि त्यातल्या पात्रांचे वागणे पटणे/न पटणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला पात्र न आवडूनही साहित्य आवडू शकते किंवा उलट. उदा. नेमाडेंचे नायक.
किंवा पात्र खूप आवडूनही साहित्य नावडू शकते उदा. तेरुओ.
पण इथे मला कथालेखीकेने पुरेशा कन्विंसिंगली तिच्या पात्रांना शेवटाकडे नेले आहे असे वाटत नाही. त्या अर्थानेही शेवट पटला नाही. हाच पर्याय निवडण्यामागची तिची मानसिकता पुरेशी स्पष्ट नाही. कथेतल्या पात्रांना ज्या परिस्थितीतून जावे लागते ते पुरेशा परिणामकारकरित्या मांडल्यावर त्यांचे एक पर्याय निवडणेही ठामपणेच यायला हवे तसे ते इथे येत नाही.
साहित्य आवडले ते का किंवा आवडले नाही ते का हे लिहिताना नेहमीच फक्त साहित्याची मांडणी, शैली इत्यादी बाह्यचौकटी मोजमापाला धरुन चालत नाही. पात्रांचे स्वभाव विशेष, त्यांचा प्रवास हे सगळं वाचकांपर्यंत नीट पोचतय की नाही हेही पहायलाच लागतं.
गोष्ट मला आवडली पण शेवट पटला
गोष्ट मला आवडली पण शेवट पटला नाही.
गार्गीचे कथेतले वागणे पटले नाही असे म्हणणा-यांशी सहमत. मी स्वतःही गार्गीसारखेच ऐकुन घेतलेले आहे, पण जास्त काळ हे चालु दिले नाही. आपण जितके वाकतो तितके आपल्याला वाकवले जाते हे खरे आहे. आज गार्गीसारखे वागुन चालणारच नाही, मग भलेही आपल्याला कोणी कितीही इमोशनली ब्लॅकमेल करो.
स्वाती२ च्या ३.५९च्या पोस्टशी पुर्ण सहमत. एवढे सोसुन ती मुलींसाठी काय प्रकारचे आयुष्य देतेय आणि याचा त्यांच्या पुढच्या वाटचालीवर काय परिणाम होणार याचा तिने विचार करणे गरजेचे आहे. आणि तिच्या स्वतःच्या आयुष्याचे काय? एकच आयुष्य मिळते ते असे वाया घालवायचे?? तिने हा विचार केला नाही तर ओझ्याच्या गाढवात आणि तिच्यात काहीच फरक नाही.
त्या त्या काळातल्या समाजात, त्या वेळेला अनुसरुन जे साहित्य येते त्यात कुठेतरी 'पुढे' नेलं जाण्याची, परिस्थितीवर मार्ग शोधले जाण्याची क्षमता असायला हवी, नकारात्मकताच फक्त नको असं मला वाटतं.
सहमत. नुसते प्रश्न मांडून चालत नाही तर त्यांची उत्तरेही शोधणे आवश्यक आहे.
त्या त्या काळातल्या समाजात,
त्या त्या काळातल्या समाजात, त्या वेळेला अनुसरुन जे साहित्य येते त्यात कुठेतरी 'पुढे' नेलं जाण्याची, परिस्थितीवर मार्ग शोधले जाण्याची क्षमता असायला हवी, नकारात्मकताच फक्त नको असं मला वाटतं. >>
तुमच्या मताचा आदर करुनही, (इंट्रेस्टिंग डिस्कशन आहे म्हणून) 'क्षमता असायला हवी'- पात्रांच्या वर्तनाबाबत काहीही असायला हवे/ नको 'ought to' हा निकष ललितसाहित्यात ठेवणे हेच मुळात अवघड वाटते. मग ते किंचीत प्रचारकी होत नाही का?
जे जसं समाजात आहे, त्याचे प्रतिबिंब पडणार, ते प्रतिबिंब बरेवाईट कसेही असु शकते, मग पात्रांनी का 'योग्य ते' (आपल्याला योग्य वाटते ते) करावे?
हे फक्त शर्मिला यांना उद्देशुन अजिबातच नाही. केवळ विषय निघाला म्हणून जाता जाता..
पण इथे मला कथालेखीकेने पुरेशा कन्विंसिंगली तिच्या पात्रांना शेवटाकडे नेले आहे असे वाटत नाही- हा तंत्राचा/शैलीचा/लेखनकौशल्याचा भाग झाला. हा मुद्दा वेगळाच आहे.
वर कुणीतरी लिहिलय ज्यांना यातून जावं लागलं नाही त्यांना हे कळणार नाही वगैरे. शहरातल्या ९५% स्त्रियांना लग्नानंतर करिअर जोपासताना अशा तर्हेच्या दुहेरी कसरतीतून जावं लागलेलं असतंच कधी ना कधी तेव्हा हे 'कळण" वगैरे आपण गृहितच धरायला हवय. >> याला जोरदार अनुमोदन.
सिंडीलाही अनुमोदन.
शहरातल्या ९५% स्त्रियांना
शहरातल्या ९५% स्त्रियांना लग्नानंतर करिअर जोपासताना अशा तर्हेच्या दुहेरी कसरतीतून जावं लागलेलं असतंच कधी ना कधी तेव्हा हे 'कळण" वगैरे आपण गृहितच धरायला हवय.
>>लग्नानंतर नव्हे तर या सर्वाला लग्नाआधीही बरेच वेळा तोंड द्यावे लागते.
त्याअर्थाने मी स्वाती२, साधना, शर्मिला यासर्वांशी सहमत आहे!
कथेपेक्षा त्यावरची चर्चा
कथेपेक्षा त्यावरची चर्चा आवडतेय.
कथा "आवडली" नाही पेक्षा
कथा "आवडली" नाही पेक्षा "पटली" नाही असं म्हणेन मी , अर्थात शेवट काय करायचा ते स्वांतत्र्य लेखिकेला आहे.
राहुलचं वागणं तर राSSSSSSSSSSSSग
सायो, स्वाती२ अनुमोदन.
सायो, स्वाती२ अनुमोदन.
लेखिकेचे स्वातंत्रय याचा सन्मान आहे.
मी एक शेवट सुचवू?
राहूल यास घट्स्फोट ताबड्तोब. : जर तो घर कामात काही काँट्रिब्यूट करत नाही तर ते मधाळ हसून सॉरी म्हणणे वगैरे वाया गेलेले आहे. मित्र म्हणून ठीक आहे.
सासरे आपोआप आउट होतीलच. इट इज हिज ( राहुल्स) प्रॉब्लेम.
मुलींना चांगल्या हॉस्टेलात ठेवावे. हे सर्व थिंकिंग १५ मिनिटात व या प्लॅन चे एक्सी क्युशन एका आठवड्यात होईल. हाकानाका. दुसरा छोटा फ्लॅट भाडयाने घ्यावा लगेच.
करीअर वर नक्की जास्त लक्ष देऊन प्रॉजेक्ट नक्की हातात घ्यावा. ४ असेच प्रॉजेक्ट करून नवी कंपनी काढावी. फोकस मुलींवर असावा.
विचार बदलावेत No one else can make you suffer. There is no such thing as a super woman.
पात्रांच्या वर्तनाबाबत काहीही
पात्रांच्या वर्तनाबाबत काहीही असायला हवे/ नको 'ought to' हा निकष ललितसाहित्यात ठेवणे हेच मुळात अवघड वाटते. मग ते किंचीत प्रचारकी होत नाही का? >> मला नाही वाटत त्याला प्रचारकी म्हणता येईल. तसं झालं तर त्या साहित्यिकाचा कस कमी पडला. शिवाय हा निकष खरं तर लेखकांसाठी नाहीच. लेखकाने कोणत्याही स्वभावविशेषाची पात्रं निवडावीत त्यांचे त्यांना स्वातंत्र्य आहे हे गृहित धरुन आपण आपली आवडनिवड व्यक्त करत आहोत त्याला आहे. आणि आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींना कोणतेही पुस्तकी निकष लावण्याची गरज नाही.
हा तंत्राचा/शैलीचा/लेखनकौशल्याचा भाग झाला. हा मुद्दा वेगळाच आहे. >> नाही वैयक्तिक आवडनिवड बाजूला ठेवून निव्वळ साहित्यकृती म्हणून या कथेकडे बघतानाही ती कुठे आणि का फसली हे ठरवण्याच्या संदर्भात हा मुद्दा इथे महत्वाचाच आहे.
हिंदी साहित्यिक उदय प्रकाश एकदा एका ठिकाणी म्हणाले होते की लेखकाची वैयक्तिक मूल्यं जशी साहित्यात उतरतात (तशी उतरता कामा नये तरीही) तशीच वाचकाची वैयक्तिक आवडनिवडही आस्वादात उतरते. साहित्यातली पात्रं म्हणजे तुम्ही आम्हीच असतो, साहित्यिकही काही वेगळ्या जगातला नसतो त्यामुळे आपल्याला साहित्यकृती आवडली किंवा नाही हे समिक्षकी व्याख्येच्या किंवा पुस्तकी चौकटींच्या पलीकडे जाउन ठरवता यायला हवं.
जे जसं समाजात आहे, त्याचे
जे जसं समाजात आहे, त्याचे प्रतिबिंब पडणार, ते प्रतिबिंब बरेवाईट कसेही असु शकते, मग पात्रांनी का 'योग्य ते' (आपल्याला योग्य वाटते ते) करावे?
मग ते किंचीत प्रचारकी होत नाही का?
मला नाही वाटत प्रचारकी होईल. किंबहुना प्रचारकी न होता पुढे जायचा मार्ग दाखवणे हेही लेखनीय कौशल्याचा एक भाग असु शकेल.
जे साहित्य लिहिले जाते त्यात समाजाचे प्रतिबिंब पडते, पडणारच.. पण लेखकाला केवळ तिथेच थांबुन चालणार नाही. समाजाचे प्रतिबिंब आपणही रोज पाहतो, कित्येकदा आपल्याला त्यातले काय रिलेट होते, न होते हे जाणवतही नाही. पण लेखक लिहितो तेव्हा त्याने आपण जे रोजच पाहतो तेच पाहुन मुद्दाम तो विषय निवडुन लिहिलेले असते. अशा वेळी फक्त अमुक एक गोष्ट अशी अशी आहे इथेच न थांबता त्या गोष्टीला अमुक एक असा समर्पक पुढचा रस्ताही असु शकतो हे दाखवणे गरजेचे आहे.
आपण आपल्या नकळत समाजातल्या गोष्टी पाहात असतो, जेव्हा त्या मुद्दाम लेखाच्या स्वरुपात वाचतो तेव्हा आपणही त्यावर विचार करु लागतो आणि कदाचित लेखकाने दाखवलेला पुढचा रस्ता आपल्यालाही मार्ग दाखवु शकतो.
अर्थात हेमाप्राम. मी इथल्या काही वाचकांइतकी या विषयावर अधिकारी नाहीय, तेवढा अभ्यास नाही.
गार्गी पटली की नाही पटली तो
गार्गी पटली की नाही पटली तो मुद्दा वेगळा पण कथा अजून प्रसंग उभे करुन कन्व्हिंसिंग व्हायला हवी होती ती पुरेशी पोहोचली नाही असं वाटलं.
गुब्बे तुला जमू शकतं ह्या नाही तर दुसर्या कथेच्या वेळी तू अजून जास्त प्रयत्न कर. तुला खूप शुभेच्छा
एक लोकरीचा हातमोजा आपण हातात घालून बघतो आणि त्यामुळे आपल्या हातांना एकदम उबदार वाटतं. तेव्हा आपण स्वत: ती उब अनुभवत असतो. पण ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगताना ती उब त्याला जाणवून द्यावी लागते ती वर्णनातून. (आता हातमोजा हे एक उदा. म्हणून घेतलय) माझही असं बर्याचदा (बर्याचदा काय नेहमीच) होतं, मला एखादी भावना मांडायची असते मी ती भावना (माझी स्वतःची असली/नसली तरी) जरी अनुभवू शकले/ते पण मला तो फील पुर्णपणे जिवंत करता येत नाही. माझ्या मनात ती भावना मला समजली असल्याने मी ती मांडताना काही गोष्टी गृहीत धरते माझ्याही नकळत आणि मग ते छोटे छोटे डिटेल्स निसटून जातात. तसच काहीस इथे झालं असावं अस आपलं मला वाटलं.
बाकी शर्मिलांच्या मतांमागचा हेतू पटतो, मला स्वतःला बर्याचदा आशादायक नोड वर एण्ड झालेला आवडतो. असा एण्ड मला चिअर अप करतो. पण बर्याचदा गुडी गुडी एण्डचा अट्टाहास धरुन एण्ड नसावा कथेच्या ओघाने एण्ड यावा आणि (आवडत असला मला तरिही) तो आशादायक की निराशा वादी ह्यापेक्षा तो कनव्हिंसिंग असावा. ह्याबाबत रैनाशी सहमत. अर्थात हे माझं मत आणि बाकीच्यांची मतं ही ह्यापेक्षा वेगळी पुर्णपणे अपोझिट असू शकतात आणि ती त्यांची मतं अस म्हणून त्याबाबत मला आदरच राहील.
थोडेसे अवांतर : ( हे या
थोडेसे अवांतर : ( हे या गोष्टीविषयी लिहित नाहीये. पण या विषयानिमित्ताने सुचले म्हणुन लिहिले.)
माहेरची साडी हा पिक्चर सिल्वर जुबिली हीट झाला होता. त्यात दाखवल्या गेलेल्या गोष्टी समाजात तेव्हा आणि आजही घडत असतीलही कदाचित. अजुनही हुन्डाबळी जातच आहेत. तेव्हा वरच्या गोष्टीतल्याप्रमाणे अन्यायकारक वातावरणाच्या बळी आजही अनेक महिला पडत असतील यात शंका नाही.
लोकांना भांडणार्या बायकांपेक्षा बळी जाणार्या, रडत बसणार्या सोशिक बायका बघायला आवडतात यात काही शंका नाही. तेव्हा अशी सोशिक पात्रेच TRP वाढवणार. अलका कुबल गेली तर ऐश्वर्या नारकर गाजणार. ( जुना 'कुंकू' पिक्चर आठवतोय का कोणाला ? ( वडीलांच्या वयाच्या माणसाशी फसवून लग्न लावले म्हणून तो नातेसंबंध नाकारणारी तेव्हाची नायिका ) आणि आजची 'कुंकू' सीरियल बघा बरे. )
TRP वाढायला पाहिजे. आणि तो रडकथांनीच वाढतो. नायिका स्वतःचे निर्णय घेउ शकत असेल तर तिला सहानुभुति कशी मिळेल आणि मग TRP कसा वाढेल.
मी एक शेवट सुचवू? राहूल यास
मी एक शेवट सुचवू?
राहूल यास घट्स्फोट ताबड्तोब.>>>>>>>>>> सॉरी मामी,पण हे नाहि पटलं.घटस्फोटामुळे काय साध्य होईल? त्यापेक्षा गार्गीने ह्यासगळ्यांना विरोध करायला हवा. ती सगळं सहन करतेय म्हणून तिला हे सगळं करावं लागतय. तीने तिच्या नवर्याला त्याच्या जबाबदार्यांची जाणीव (जबरदस्तीने) करुन द्यायला हवी. तो बदलु शकतो.
खरतर काहि मुलींनाच हे सगळं करणं आपलं आद्य कर्तव्य वाटतं.घर्,नोकरी ,लोकलचा प्रवास, हे सगळं त्या एकटीने (पण रडत रडत) करतात. नवर्याने कधी कपडे जरी सुकायला टाकले तरी खुश होतात.
माझ्या काहि मैत्रिणी अश्या आहेत.
मामी विथ ड्यु रिस्पेक्ट टू यू
मामी विथ ड्यु रिस्पेक्ट टू यू मी म्हणेन अहो कथा तिची आहे त्याचा शेवट तिला वाटला तसाच राहुद्या. (मला स्वतःला असं बिचारं व्हायला आवडणार नाही तरिही ही कथा गार्गीची आहे गार्गिने काय करायचं ते गार्गी म्हणजे तिचं कॅरेक्टर उभ करणारी लेखिका ठरवेल फक्त जे ठरवेल ते कन्व्हिंसिंग असाव इतकच. (कन्व्हिंसिंग असाव आवडाव अस नाही)
मला थोडी माघार घेणारी थोडी समोरच्याला घ्यायला लावणारी व्यक्ती आवडते तो माझा नेचर झाला, प्रत्येक जण तसच असेल अस थोडच आहे. मलाही कुंकू टाईप सिरिअल्स आवडत नाही, रडूबाई सिनेमा आवडत नाही पण कथा म्हणून जमलय की फसलय हे बघताना माझी आवड बाजूला जाते नी ते कन्व्हिंसिंगली लिहिलय की नाही हे बघण महत्वाचं ठरतं
कविताच्या लेटेस्ट पोस्टला
कविताच्या लेटेस्ट पोस्टला पूर्णपणे अनुमोदन.
इथल्या उलट सुलट प्रतिसादांमुळे जे वाटतंय ते नक्की शब्दात कसं लिहावं ते सूचत नव्हतं. कविताने काम आसान कर दिया
गुब्बे, कथा आटोपशीर आणि छान झालीये. माघार घेणारी, पळपुटी स्त्री आजच्या जमान्यातल्या कणखर स्त्रियांना आवडणार नाही हे खरेच! पण खर्या आयुष्यात अशाच प्रसंगांना सामोरे जाव्या लागणार्या स्त्रिया बहुतकरून आहेत हेच अजूनतरी वास्तव आहे. त्यामुळे शेवट मला तरी कन्व्हिंसिंग (इथे कन्व्हिंसिंग हा शब्द "कथेच्या ओघाला धरून" या अर्थाने आहे. "मला पटणारा" या अर्थाने नव्हे) वाटला.
लगे रहो
धन्स सगळ्यांना. सगळ्यांच्या
धन्स सगळ्यांना.
सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा आदर आहे. शेवटी ही एक कथा आहे, ह्यातली सगळी पात्र आजही आपल्या आसपास अगदी आपल्यातच आढळतात. ती कदाचित पुर्णपणे खरी नसतीलही पण अस्तित्वातच नाहीत अस नाही.
शर्मिला म्हणतात त्याप्रमाणे कुठ्ल्याही कथेचा अंत सामाजिक बांधीलकी/ सुधारणावादी किंवा नक्कीच आशावादी असावा.
पण सगळच गुडीगुडी आणि आपल्याला हव तसच झाल तर फक्त राजश्री वाले किंवा करण जोहरचे सिनेमेच जास्त चालायला हवेत. तस होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तिचा वेगळाच असतो. अर्थात तो चुक की बरोबर हे नाही सांगता येणार.
गार्गीने कुठल्या परिस्थितीत पुन्हा त्या कोषात फिरण्याचा निर्णय घेतला हे पटवुन द्यायला मी कदाचित कमी पडले असेन, पण चुकलेय अस नाही म्हणणार. कारण निर्णय घेतानाची परिस्थिती, वेळ, सभोवतालचे पाश, मुलांची अगतिकता, जबाबदार्या आणि आपल्यावर कुणीतरी अवलंबुन आहेत ही भावना तुमचा ठाम निर्णय बदलायला तुम्हाला भाग पाडते कधी कधी. त्या कधी कधी मधलीच ही नायीका आहे.
मामी, काय ग लगेच एक घाव दोन
मामी, काय ग लगेच एक घाव दोन तुकडे???:हाहा:
गुब्बे, तुझ्या कथेवरून
गुब्बे, तुझ्या कथेवरून आठवलं.
मागे मी "वर्तुळ" कविता लिहिली होती. तुझ्या शीर्षकामुळे आणि कथेच्या थीम मुळे त्या कवितेची आठवण झाली. या कवितेचा उत्तरार्ध "वर्तुळानंतर"या नावाने लिहिला होता. जो तुझ्या कथेच्या शेवटाच्या एकदम अपोझिट आहे.
अशा वेळी फक्त अमुक एक गोष्ट
अशा वेळी फक्त अमुक एक गोष्ट अशी अशी आहे इथेच न थांबता त्या गोष्टीला अमुक एक असा समर्पक पुढचा रस्ताही असु शकतो हे दाखवणे गरजेचे आहे. >> लेखकाला दाखवावासा वाटला तर दाखवावा, नाही तर नाही. It is not an obligation. हाँ वाचक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे/होती, एवढेच आपण म्हणू शकतो.
आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींना कोणतेही पुस्तकी निकष लावण्याची गरज नाही. >> पुस्तकी निकष म्हणुन dismiss कशाला करायचे? जिथे ought to येते तिथे लेखनस्वतंत्र्यावर (काही प्रमाणात तरी )गदा येते.
या कथेकडे बघतानाही ती कुठे आणि का फसली >> यात इतर अनेक मुद्दे येऊ शकतील. फक्त निर्णयप्रक्रिया पुरेशी स्पष्ट नाही हाच का?
अशा गार्गीही नक्कीच असतात पण त्या दाखवायच्या ऐवजी अशा डिस्करेजिंग शेवट स्विकारलेल्या गार्गीच कथांमधून का दाखवाव्या हे कळत नाही आणि पटत नाही मला. अशा कथा मला आवडत नाही तेव्हा त्या अर्थाने ही सुद्धा आवडली नाही.>> म्हणजे जर भांडुन झगडुन काहीतरी मिळवणारे पात्र असते तर मला आवडले असते, ही अपेक्षा ठिक. पण अशी दाखवली म्हणून ते वास्तव खोटे ठरत नाहीच. ज्या लेखकाला ती तशी झगडणारी गार्गी रेखाटाविशी वाटेल तो ते करेल. पण प्रत्येकानेच तसेच पात्र रंगवावे अशी अपेक्षा धरणे याच्याशी असहमत (पुस्तकी निकष अँड ऑल दॅट) .
पुन्हा वै.प्रा.म आणि मी वाचते आहेच चर्चा होणार असेल तर.
शुभांगी अगं नाही. तुझा गैरसमज
शुभांगी अगं नाही. तुझा गैरसमज होत आहे. 'कुठल्याही' कथेचा अंत सामाजिक बांधिलकी, सुधारणा वगैरे नजरेसमोर ठेवूनच व्हावा वगैरे मला अजिबात वाटत नाही. आत्यंतिक निराशावादी शेवट असणार्या कथाही मला आवडलेल्या आहेत. अगदी नियतीवश कथाही मला आवडतात. जीएंची मी मोठी चाहती आहे तेव्हा असली काही खुळं माझ्या डोक्यात नाहीत.
फक्त तु जशा पद्धतीची कथा लिहिलेली आहेस तशा पद्धतीच्या कथांमधून हा एक ठराविक शेवट करण्याचा एक ट्रेन्ड ठरुन गेल्यासारखा झाला आहे. तो मला खटकतो. (एखादाच उंबरठा, तोही अनेक दशकांपूर्वी आलेला असतो ज्यात वाईटपणा पदरी घेऊनही बाई तिला हवी ती ठाम दिशा निवडण्याचं धैर्य दाखवू शकली.) निदान नव्या लेखिकांनी तरी जाणीवपूर्वक अशा कथानकांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला दाखवायला हवा असं माझं मत. तसं होत नाही म्हणून माझी चिडचिड. बाकी काही नाही. अशा कथांच्या बाबतीतली माझी वैयक्तिक आवड सांगण्याच्या प्रयत्नात चर्चा भलतीकडे वळत गेली.
खूप सुंदर लेखन...... आणि
खूप सुंदर लेखन...... आणि चांगली चर्चा....
खरं तर राहुलची एक बाजू दाखवून शुभांगीने इतर बाबी प्रतिसादकांवर सोडून दिल्या आहेत. राहुल आत्ता असं वागला म्हणजे तो नेहमीच तसा वागतो असं नाही... तो सुद्धा मुलांची काळजी घेतच असणार... अज्जिबातच लक्ष देत नाही असं लेखिकेने कुठेच सूचित केलं नाही. फक्त त्याची की बोर्ड बडविण्याची प्रतिक्रिया डोक्यात जाते.....
बाकी ह्या लेखाने मी जरा सिंहावलोकन केले स्व्तःचे.... की मी माझ्या बायडीसोबत असाच तर वागत नाही ना?......:)
निदान नव्या लेखिकांनी तरी
निदान नव्या लेखिकांनी तरी जाणीवपूर्वक अशा कथानकांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला दाखवायला हवा असं माझं मत. तसं होत नाही म्हणून माझी चिडचिड. बाकी काही नाही.>>
(एखादाच उंबरठा, तोही अनेक दशकांपूर्वी आलेला असतो ज्यात वाईटपणा पदरी घेऊनही बाई तिला हवी ती ठाम दिशा निवडण्याचं धैर्य दाखवू शकली.) >> टोटली पटलं.
एक भाबडा प्रश्न. करिअरच्या
एक भाबडा प्रश्न. करिअरच्या ऐवजी घरातल्या जबाबदार्यांना प्राधान्य देणं हा "रड्या" पर्यायच आहे का ?
कुणी स्वेच्छेने हा निर्णय घेउ शकत नाही का ?
हे फक्त ट्रायल प्रश्न आहेत. खरे प्रश्न नंतर विचारेन.
Pages