शाळे बाहेरच्या शाळा - भाग १

Submitted by रणजित चितळे on 14 December, 2010 - 02:35

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाइन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे कीर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. कीर्तन दोन भागात असायचे पाहिल्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनांबरोबर कीर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुसऱ्या भागात सांगितलेल्या कथेचा मथितार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा पण वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुसऱ्याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्त्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. जर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क "१९७१च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यू" असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे, ह्या कीर्तन, प्रवचनांना एकदा का जायला सुरवात झाली की आवड वाढते. नवनव्या गोष्टी कानावरून जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्त्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खूप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्त्वज्ञान स्वीकारतो व त्या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षात्कार केव्हानाकेव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्त्वज्ञान नुसते कानावरून जरी गेले तरी आपल्या अंतर्मनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतून बसते. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी राहावयास मदत मिळते.

शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे.

डोंबिवलीच्या नगरपालिकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खूप प्रसिद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पूर्णपणे डोक्यावरून गेले तरी आता कळते त्याचे महत्त्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन ही पुस्तके वाचल्याचे आठवत आहे. पुलंची सगळी पुस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यादी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची श्यामची आई, गोनीदांची पुस्तके व अजून खूप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची.

संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राउंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राउंड’ वर जायचे. व खेळ खेळायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राउंडला’ जातो. मोठी समजायची की अमकाअमका नेहरू मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा संध्याकाळी त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुलामुलींना सभाधीटपणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बोलायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला सुट्टी लागली की मुले आपापला छंद जोपासायची. त्यातून मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघून जातो.

हे सगळे होत असताना शाळा असायचीच. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले, मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत आंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरूर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात एखाददुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जीवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळू शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जीवन कसे घडले, त्यांचे विचार उमजू शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजू शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचितच येऊ शकते. एकूणच शाळा ही ‘अबकड’ शिकवणारी असते पण जीवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवून ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे, तोच मनुष्य यशस्वी गणला जातो.
(क्रमशः)

बोलघेवडा
राष्ट्रव्रत

गुलमोहर: 

रेल्वेलाईन जवळच्या गणपतीच्या देवळात >>>>>>>>>>>>> हे डोंबिवलीत गणपती म॑दिर बद्द्ल बोलता का? मला ते म॑दिर खुप आवडते. माझ्या आवडत्या म॑दिरापैकी ए़क आहे. त्यासमोरील बाग खुप छान आहे. मी लहान असताना मे महिन्यात माझ्या मावशीकडे राहायला जात होती. तेव्हा दररोज स॑ध्याकाळी आम्ही त्या बागेत कि॑वा त्याच्यासमोर म्हणजे east ला असणार्या बागेत सुद्धा जात होतो. मला डोंबिवली फार आवडते.

<<एकुणच शाळा ही ‘अ ब क ड’ शिकवणारी असते पण जिवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते.>>.........हे वाक्य फारच पटलं !
लेख आवडला. अशा शाळेबाहेरच्या शाळा खरंच खूप शिकवून जातात. Happy

शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही >>
एकदम बरोबर..
शाळे मधे माणसे कशी ओळखावीत ह्या वर पण एखादा विषय शिकवायला हवा.. काळाची गरज आहे ती Happy

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

शुभ स॑ध्याकाळ! मी मु॑बईला राहते. डोंबिवली एवडी ही बदलली नाही आहे आणि हो म॑दिरात सुद्धा काही बद्द्ल झालेला नाही.

रणजितजी,
लेख खुप आवडला.
महत्वाचे मुद्दे मांडले गेलेत..सध्याच्या शिक्षणव्यवस्था,शाळा आणि पालकांनी देखील याचा विचार करायची वेळ आलेली आहे, काही शाळा तर मुलांना यंत्रे बनवण्यासाठीच तयार झाली आहेत अस वाटतं.

रणजित चितळे,

>> जीवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळू शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जीवन कसे घडले,
>> त्यांचे विचार उमजू शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजू
>> शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचितच येऊ शकते.

नेमकं हेच खटकतं! शाळेत हे सारे शिकायला मिळाले पाहिजे. निधर्मी पद्धतीच्या नावाखाली शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टांना हरताळ फासला जात आहे.

आ.न.,
-गा.पै.