उम्मीद पे दुनिया कायम है... ?!
आज ३० नोव्हेंबर २०१०... आज तिची आठवण अधिकच गडद झाली...मलाच नाही तर तिच्या जवळच्या, तिला ओळखणा-या सगळ्यांच्याच मनात.
तसं पाहिला गेलं तर तिचा आणि माझा सहवास काही दिवसांचा (काही तासांचा खरं तर !). पण तरीही मला तिचं प्रसन्न व्यक्तीमत्व, चेह-यावरचं मुक्त पण निरागस हसू, डोळ्यातली चमक, मुख्य म्हणजे तिचं full of life असणं आवडायचं. का माहित नाही, जास्त कधी बोलायची संधी (असून) मिळाली नाही तरीही मला ती आवडायची... जवळची वाटायची !
खरं तर ती कोणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती. पण ती कोणाचीतरी लाडकी, गुणी मुलगी होती, कोणाचीतरी प्रेमळ बहिण होती...कोणाची लाडाची भाची होती....कोणाची जवळची मैत्रीण होती.. आणि कोणाचीतरी भावी पत्नी तर कोणाची भावी सून होती.
ती होती... होय... होती ! आजच्या दिवशी जिच्या नावामागे 'चि.सौ.कां' ही नाजूक, हळवी अक्षरं जोडली जाणार, त्या तिच्या नावामागे दोन महिन्यांपूर्वी 'कै.' ही अक्षरं लागली... ती होती, ती आज नाही !
नवीन संसाराच्या सगळ्या स्वप्नांना मागं सोडून ती गेली... नव्हे स्वाईन फ्लू नी तिला नेली !
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती सगळ्यात जास्त असते त्या वयात अवघ्या आठ दिवसात ... ती गेली... खेळ खलास... केस क्लोस्ड !
'योग्य निदान होणं सगळ्यात महत्वाचं... आता मेडिकल सायन्सनी खूप प्रगती केली आहे... नक्कीच उपाय सापडेल...' असं ठामपणे सगळ्यांना धीर देणारी मी "she is no more" हे वाक्य वाचून सुन्न झाले.
कसली प्रगती... कसली औषधं.. आणि कसलं काय !!!
वैद्यकीय क्षेत्रात रिसर्च करणारी मी 'सध्याच्या काळातलं मेडिकल क्षेत्रातलं हे इतकं मोठं अपयश' अजून पचवूच शकले नाहीये !
*******************
काही दिवसांपूर्वी घरी आई-बाबांना फोन केला.. बाबांच्या आवाजावरूनच काहीतरी चिंतेत आहेत हे जाणवलं.
समोरच्या काकांना अचानक intestinal tumor detect झाला होता.. ताबडतोब शस्त्रक्रीया केली गेली... आई-बाबा त्याच काळजीत...
'तू कॅन्सर मधेच रिसर्च करतेस... असं अचानक कशामुळे झालं असावं' .. आई-बाबांचा कळकळीचा प्रश्ण...
मी निरुत्तर !
समोरचे काका आता ठीक आहेत..मधे त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांचा प्रश्ण
'ट्यूमर परत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी... तू याच क्षेत्रात काम करतेस म्हणून तुझ्याकडून नक्की काहीतरी माहिती मिळेल'
रोज सकाळी उठून फिरायला जाणारा, योग्य तितका योग्य वेळी सात्विक आहार घेणारा, कोणतही व्यसन नसलेला हा माणूस... मी अजून वेगळी काय काळजी किंवा 'preventive measure' घ्यायला सांगणार त्यांना ?
मी निरुत्तर !
********************
एकूणच भारतातलं वाढलेलं कॅन्सरचं प्रमाण गेल्या दोन वर्षापासून मला अस्वस्थ करतंय. कदाचित कॅन्सर रिसर्च मधे काम करायला लागल्यापासून मला ते जास्त जाणवत असेल .. माहित नाही !
पण जवळच्या, दूरच्या नात्यात, मित्रपरिवारात कोणाच्या आईला, कोणाच्या वडिलांना, खुद्द मित्रांना...कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कॅन्सर detect झाल्याच्या खूप जास्त केसेस कानावर येतात.
भारतात गेलं की लोकं आशेने अश्या कॅन्सर पेशंटचे केस रीपोर्ट्स दाखवतात.. कदाचित माझ्याकडुन काही 'आशादायी उत्तर' मिळेल म्हणून...
रिपोर्ट्स पाहून 'लवकर detect झालाय हे त्यातल्या त्यात चांगलं' किंवा 'फक्त relapse होत नाही आहे ना यावर लक्ष ठेवा' यापेक्षा वेगळं काही सांगीतलं जात नाही... कारण वेगळ काय सांगणार?
*****************
हे आणि अशी अनेक उदाहरणं ....रोग कदाचित वेगळे.. पण बहुतेक सगळ्या situations परत परत एकच प्रश्ण विचारणा-या - खरंच वैद्यकीय शास्त्र पुढे गेलं आहे का? की हा जगाला होणारा भास आहे !
वैद्यकीय शास्त्रापेक्षा 'मानवी शरीर, त्याची रचना, त्यातल्या घडामोडी' फार जास्त पुढारलेल्या आहेत... शास्त्र ४ पावलं पुढे गेलं तर मानवी शरीर त्याच्याही पुढची पावलं टाकतं... अनेकदा तर त्या पुढे गेलेल्या शास्त्राला झुंज देण्यासाठी, त्याच्याशी लढण्यासाठी...!
हे सगळं सगळं समजत असलं, मान्य केलेलं असलं .. तरीही एक 'उम्मीद', एक 'आशा' कायम असते...ह्या आशेवर जगात आजवर अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आहेत, आजही करत आहेत....
मी सुद्धा माझ्या नकळत कदाचित ह्याच आशेवर रोज लॅब मधे पाऊल टाकते. कदाचित त्याच आशेवर रोजचं प्रयोगात येणारं आणि आमच्या रिसर्चशी निगडीत आयुष्याचा जणू एक भाग झालेलं अपयश पचवलं जातं... कधीतरी प्रयोगात दिसणारं यश ही ती लहानशी, अंधुक आशा...मिणमिणता दिवा... पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवणारा !
पण मग तरीही 'खरंच उपयोग होतोय का?' हा प्रश्ण कधी कधी निराश का करतो? का त्रास देतो?
अशा वेळी मग आपणच लिहिलेले पेपर्स, मिळालेल्या ग्रँट्स, पुस्तकातले बुक चॅप्टर्स ... आपलंच सगळं काम.. अगदी सगळं सगळं नगण्य आणि नकोसं वाटायला लागतं... ते केवळ resume चांगली दिसते की की खरंच कोणाला त्या संशोधनाचा उपयोग होणार आहे? आणि असेलच तर तो 'उपयोग झालेला' आपल्याला दिसणार कधी? की आपल्या हयातीत तो दिसणार नाहीच !
माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश हे मला अजूनही समजलेलं नाही ... !!!
रार, मुक्तकातली बोच, असहायता,
रार, मुक्तकातली बोच, असहायता, तडफड सगळं पोचलं. शेवटी माणूस म्हणून, भावनांच्या अशा गुंतवणुकीमुळे आपल्या संशोधनाच्या एखाद्या टप्प्यावर कुठेतरी एक फोलपणा जाणवणं स्वाभाविक असतं.
>>माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश
एका विशिष्ट ध्येयामुळे घडणार्या किंवा जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या प्रवासातला एक टप्पा नाही का म्हणता येणार?
>> माझ्या संशोधनासाठी मला ५००
>> माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश हे मला अजूनही समजलेलं नाही ... !!!
अवघड आहे. या लिखाणावर 'अभिप्राय' काय देणार? मृण म्हणाली तसं त्यातली तडफड पोचते आहे.
काय अभिप्राय द्यावा कळत नाही.
काय अभिप्राय द्यावा कळत नाही.
स्वाती ला अनुमोदन!! जरासा
स्वाती ला अनुमोदन!!
जरासा नकारात्मक वाटला. अनेक आजरांचे मूळ आणि उपचार अजुन सापडले नसतील पण तरीही आजपर्यंत वैद्यक शास्त्राने अनेक असाध्य रोगांवर मात केलेली आहे. हे का बरे विसरले जाते.
प्रत्येक वाक्यातून अस्वस्थता
प्रत्येक वाक्यातून अस्वस्थता जाणवतेय.
मेडिकल कॉलेजला असताना गुंतागुंतीची केस आली की आनंद व्हायचा. अगदी आठवतंय,गायनॅक रेसिडेन्सी करताना सिझेरियन चालू असलं की कधीतरी वाटायचं अटोनिक पीपीएच ( गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट न झाल्याने होणारा रक्तस्त्राव ) व्हावा, मग त्यासाठी थिअरीमध्ये शिकलेले सगळे उपाय करताना बघायला मिळावं........एक मन अपराधी व्हायचं. त्या बिचार्या बाईचा जीव धोक्यात, आणि आपण असले वाईट्ट विचार करतोय. एकदा वाटलं, आपल्यालाच असले विकृत विचार येतात की काय ? मग गप्पा मारताना कळलं की सगळ्याच रेसिडेण्टसना अस्संच होतं......एकीकडे कॉम्प्लिकेशन्स व्हावेत ही इच्छा आणि दुसरीकडे त्याबद्दल अपराधी भावना.
<<माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश हे मला अजूनही समजलेलं नाही ... !!!>> हे तुझं वाक्य म्हणूनच खूप अस्वस्थ करून गेलं.
अशा प्रत्येक वेळी मला ह्या ओळी हमखास आठवतात,
" नाही उत्तर देता येत नियतीच्या गणिताला
बुद्धाच्याही डोळा अंती शून्याचाच थेंब आला" ( कवी माहीत नाही )
अस्वस्थता पोचली. आरोग्य
अस्वस्थता पोचली.
आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रात असल्याने बहुधा असे वाटत असावे. पण या क्षेत्राच्या बाहेरून मला तरी वाटते की साध्या तापाने लोक आता मृत्यू पावत नाहीत ही सुद्धा मोठीच प्रगती आहे.
तसेच पन्नासेक वर्षे निरोगी जगता येते ही सुद्धा.
>>उम्मीद पे दुनिया कायम
>>उम्मीद पे दुनिया कायम है.
अगदी अगदी !
:| लिखाण पोचलं..
:|
लिखाण पोचलं..
उत्तम लेख, आवडला. एकूणच
उत्तम लेख, आवडला.
एकूणच भारतातलं वाढलेलं कॅन्सरचं प्रमाण गेल्या दोन वर्षापासून मला अस्वस्थ करतंय>>> मला नेहमी पडणारे प्रश्न - हे प्रमाण खरेच वाढते आहे की, वैद्यकिय सेवांचा प्रसार झाल्याने 'रिपोर्टेड' केसेसची संख्या वाढली आहे?
कॅन्सर ट्रिटमेंट/क्युअर यावर खर्चले जाणारे फंड्स आणि कॅन्सर प्रिव्हेन्शन/अवेअरनेस यावर केला जाणारा खर्च यात महत्वाचे काय? टीबी-मलेरिआ-डेंग्यू आणि कॅन्सर-डायबेटीस-अल्झायमर्स यात संशोधनासाठी जास्त महत्वाचे कुठले? की ही प्रतवारीच चुकीची आहे?
मलाही आगाऊ सारखचं वाटतयं,
मलाही आगाऊ सारखचं वाटतयं, शास्त्र प्रगत झाल्यामुळे किमान आजार तरी उघडकीस येताहेत , तुझ्यासारखे कळकळीने संशोधन करणारे असले तर हे आजारही देवीच्या आजारासारखे नामशेष होतील.
रार, सध्या मी पण हिच
रार, सध्या मी पण हिच अस्वस्थता अनूभवतोय. माझ्या अत्यंत हुशार असलेल्या मावस वहिनीला वयाच्या ऐन पस्तिशीत कॅन्सर डीटेक्ट झाला. योग्य वेळी लक्षात आला, ऑपरेशन झाले, सध्या केमो सुरु आहे, पण त्यात तिचे होणारे हाल बघवत नाहीत.
तगमग पोहोचली आरती.
तगमग पोहोचली आरती.
>>खरंच वैद्यकीय शास्त्र पुढे
>>खरंच वैद्यकीय शास्त्र पुढे गेलं आहे का? की हा जगाला होणारा भास आहे !>>
खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा!
तसेच, तू म्हणतेस त्या प्रमाणे शरीर आणि शारीरिक घडामोडी विज्ञानाशी लढत द्यायला चार पावलं पुढेच असतं असे मला प्रकर्षाने जाणवते.
माणूस दिवसेनदिवस निसर्गापासून दूर चालला आहे, आणि त्यामुळे यश आणि अधोगती यांच्या फसव्या व्याख्या सोयीस्करपणे प्रचलित करून घेतल्या आहेत असे वाटते.
या विषयावर बोलायला शब्द कमी पडतील!
छान मुक्तक शेअर केलस!
भिडलं अगदी!
रार, तुमची होणारी तगमग अगदी
रार, तुमची होणारी तगमग अगदी मनाला भिडली. आजच्या जिवनशैलीचे परीणाम आपल्याला भोगायला लागणारच आहेत. पण तुमचे काम ते (दु:)परीणाम कमी करण्याकरता चालू आहेत. तुम्हाला ट्युमर सॅम्पल्स न मिळोत ही शुभेच्छा !
धिरे धिरे रे मना
धिरे सबकुछ होय
माली सिंचे सौ घडा
ऋतू आये फल होय !
आरती, खुप छान लिहलयस. २००४
आरती,
खुप छान लिहलयस. २००४ मध्ये शिकत असताना आमच्या एका प्रोफेसरांनी पण काहिस असच मत व्यक्त केल होत, त्यांच्या मते एड्स वर उपाय येत्या एक दोन दशकात मिळेल (निदान प्रयोग्शाळेत तरी) पण कँसर च्या बाबतीत मात्र चित्र आशादायक नाहि :(. ते स्वतः कँसर वरच रिसर्च करतात. तुझ वैफल्य समजु शकते. संशोधनासाठी शुभेछ्छा!
हम्म, भावना पोचल्या.
हम्म, भावना पोचल्या.
मला कल्पना आहे ह्या लिखाणाला
मला कल्पना आहे ह्या लिखाणाला खूपसा निगेटीव्ह टोन आहे.. पण रोज 'नव्या उमेदीनं' कोणत्यातरी अंधुकशा आशेवर काम करताना, मनात कुठेतरी उमटणारे प्रश्ण ह्या अश्या काही प्रसंगानी वर येतात.. आणि मग विचार होत राहतो त्यावर... त्यातूनच हे लिहीलं गेलं असावं माझ्याकडून !
आरोग्य, नवीन नवीन आजार, वैद्यकीय शास्त्राची प्रगती, माणसाची बदलेली जीवनपद्धती हे सगळे विषय तसे खूप खोलवर विचार करायला लावण्याजोगे आहेत !
उम्मीद पे दुनिया कायम दुसरे
उम्मीद पे दुनिया कायम दुसरे काय !
तुला काय म्हणायचंय ते अगदी
तुला काय म्हणायचंय ते अगदी पोचलं. मॄण्मयीची पोस्ट ही त्या अस्वस्थतेवरचा उतारा वाटली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सामान्य लोकांसाठी वैद्यकीय संशोधनातील प्रगती फार फार दिलासादायक आहे. तुम्हा संशोधकांना पुढचा अज्ञात प्रदेश दिसत असतो. त्यावर उत्तरं सापडलेली नसतात. निराशा येणं स्वाभाविक आहे. आम्हाला मात्र जे घडून गेलंय ते दिसतं कारण अजून किती कमवायचं आहे ह्याचा तुमच्याइतका अंदाज नसतो. दोन्-तीन पिढ्या जरी मागे गेलं तरी घरोघरी सात-आठ मुलं होत आणि त्यातली दोन-तीनच जगत. किती भयंकर वाटतं आता हे ! ... अजून पन्नास वर्षांनंतरची पिढीही कदाचित हेच म्हणेल इतकं शास्त्र पुढे गेलेलं असेल. ही उम्मीद केवळ तुमच्यामुळेच ...
माझ्या संशोधनासाठी मला ५००
माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश हे मला अजूनही समजलेलं नाही ... !!!>>
असं वाटण्याला दाद.
खरच तूमची तगमग जाणवली, भिडली.
खरच तूमची तगमग जाणवली, भिडली.
भापो! संशोधकाची मनोवस्था काय
भापो! संशोधकाची मनोवस्था काय असते ते समजलंच!
अगोशी सहमत. संशोधनामुळे लाभ झालेले अनेक जणही पाहत आहोत.
पोहोचला लेख.
पोहोचला लेख.
ह्म्म.. अगदीच काही
ह्म्म.. अगदीच काही महिन्यापुर्वी मी ह्या बोचमधून गेले. गेले म्हणण्यापेक्षा जातेच अधून मधून. .. एकदम गिल्टी वाटते अजुनही कि आपण काहिच करु शकलो नाही....
त्यामुळे एकदम भिडले हे...
फक्त कॅन्सर/जीवेघेण्या
फक्त कॅन्सर/जीवेघेण्या आजाराबाबत नव्हे तर इतरही त्रासदायक आजारांबद्दल मला कायमच असं वाटतं. मी कॉलेजमध्ये असताना नातेवाईक्/ओळखीतले कुणाला सांधेदुखीसारखे आजार असले की मला विश्वासाने विचारायचे, "निदान झालेय, उपचार चालुयेत पण दुखणे कमी नाही, काय करावे. " अशा वेळी त्या माहीत असलेल्या निदानाचा तिटकारा वाटतो. "काही उपाय नाहीये हो, सहन करा दुखणे" हेच उत्तर असलं तरी जीभ जडावते सांगताना. वैद्यकशास्त्रे केवळ निदान करण्यापुरती उपयोगी पडतात असंख्य वेळेला
माझ्या संशोधनासाठी मला ५०० ट्यूमर सॅम्पल्स मिळणं, ती वापरून केलेल्या रिसर्चमुळे माझा पेपर प्रसिद्ध होणं - हे नक्की यश म्हणायचं की अपयश>>>>> आपल्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये मिळालेले तोकडे प्रिलीमिनरी रिझल्ट चार कॉन्फरन्समध्ये किती उड्या मारत प्रेझेंट केले होते, हे आठवताना स्वतःवरच उपहासात्मक हसायला येते.
(No subject)
बोच व अस्वस्थता पोचली.
बोच व अस्वस्थता पोचली.
पोचली तुझी तगमग!
पोचली तुझी तगमग!
कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि
तीन वर्षापुर्वीची आहे. कदाचीत rar यांना काही नवं मांडायचं असेल म्हणून वर काढतेय....