सिध्धगड अन भेटलेला पाऊस......

Submitted by रोहित ..एक मावळा on 4 December, 2010 - 05:30

अरे या रविवारी नाही जमणार...पुढच्या रविवारी नक्की...अस करत सरतेशेवटी २९ ऑगस्टला जायच ठरल.आदल्या रात्री पावसाने गडगडासह जोरदार आगमन केले.व्वा...हेच तर पाहिजे होते.ट्रेकिंगला वा कुठेही भटकायला जायच असेल तर आदल्या रात्री झोप येत नाही.तसेच झाले...आणि सकाळी तरीपण पावनेसहाला उठलो.आईने एवढ्या सकाळी उठुन डबा केला होता.सॅक पाठिला लटकविली आणि आईच्या भाषेत बोलायच तर उंडरायला निघालो.सकाळी पावसाची भुरभुर चालु होती.वातावरण पण एकदम प्रसन्न होते.ठाणे महानगरपालिकेची कृपा म्हणजे टि.एम.टि पकडुन ठाणे स्टेशनला पोहोचलो तर सव्वासात वाजले होते.रविवार असुनसुद्धा टिकिट काढायला भली मोठी रांग लागली होती.मग पन्नास रुपयाचे कुपन घेतले.कल्याणला जायचे आठ रु.चे कुपन पंच केले.प्रथेप्रमाणे रोहनने वेळेवर टांग मारली.मी ठाण्याहुन,करण आणि त्याचे दोन मित्र रोहन(हा दुसरा) व विजय घाटकोपरहुन,भाविन डोंबिवलीहुन असे आम्ही नो डेस्टिनेशन ग्रुप चे भटके कल्याणला भेटलो तेव्हा आठ वाजले होते.आंतरजालावर वाचल्याप्रमाणे कल्याणहुन मुरबाडला जायला अर्ध्याअर्ध्या तासाने बस लागते असे वाचले होते.पण साडे-आठ झाले तरी मुरबाडसाठी एस.टी काही लागली नाही.कंट्रोलरला विचारले तर त्यांच्या नेहमीच्या स्टायलने ' येईल एव्हढ्यात' असे उत्तर मिळाले.शेवटी एक लांबची गाडी आली जी मुरुबाडहुन जाणार होती.ती आधीच गच्च भरुन आल्याकारणाने आम्ही उभ्यानेच प्रवास (भाडे:२१रु.)करायचे ठरविले.मुरुबाडला साडे-नऊ वाजता पोहोचलो.नारीवलीला जाणारी बस ९:४० (बस क्रमांक ८३६०-इथल्या कंट्रोलरने बसक्रमांकसुद्धा सांगितला)ची होती.येथुन सुद्धा अर्ध्या-अर्ध्या तासाने नारिवलीसाठि बसेस सुटतात.मग येथे चहाची एक फेरी झाली.बस वेळेवर आली. लाल डबा बराच खाली होता.आजुबाजुच्या हिरवाईला डोळ्यात साठवत सव्वा-दहा वाजता नारिवली गावात पोहोचलो.

येथुन पुढे जाणारा डांबरी रस्ता देहरी गावाकडे घेऊन जातो.तेथुन गोरखगडला जाता येत.सिद्धगडला जाण्यासाठी आम्ही नारिवली गावाकडे वळलो.शहरापासुन जरी हे गाव लांब असल तरी गावातला रस्ता सिंमेट काँक्रिटचा बांधलेला दिसला.
गावातील एक कौलारु घर......

हे अजुन एक..पण गवताच्या पेंड्यांनी शाकारलेल कुडाच घर....

पुढे जाताना ही गोंडस वासर दिसली....

गावातल्या लोकांना गडाकडे जाणारी वाट विचारत आम्ही मार्गकमण करत होतो.पुढे आम्हाला ही एक म्हैस भेटली.करणला तिच्याजवळ उभे राहुन फोटो काढायचा होता.पण तिचा मुड काय ठीक दिसत नव्हता म्हणुन आम्ही लांबुनच तिचे फोटोसेशन केले.

पुढे गेल्यावर गावातल्या बायका विहिरवर पाणी भरताना दिसल्या.

जवळ-जवळ वीस ते पंचवीस मिनिटे चालुन झाल्यानंतर गावातला मुख्य रस्ता संपला होता.आता पुढे जाणारी वाट शेताच्या कडेकडेने जाणारी होती.

हिरवीगार भाताची शेत डोळ्यांना सुखावत होती.

शेतकरी दादा आणि हा त्याचा सखा वाटेत भेटले.

हिरवीगार गर्द झाडीने हा परिसर खुलुन दिसत होता.

त्या सौंदर्यात हि रानफुल अजुन भर टाकत होती.

आता पावसाचीसुद्धा भुरभुर चालु झाली.गडाकडे जाणार्‍या या वाटेवर तर पाण्याचेच राज्य होते.

वाट बरोबर हाय का नाय याची चौकशी आम्ही या गावकर्‍यांकडुन करुन घेत होतो.
गवताचे भारे घेऊन चाललेला हा अजुन एक गावकरी...

पाण्याच्या वाटेतुनच आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो.मध्ये-मध्ये पावसाची सर येत होती.
एकदाची पाण्याची ही वाट संपली.पायातल्या बुटांनी बर्‍यापैकी पाणी पिले होते.त्यांना रिते करुन आम्ही पुढे चालु लागलो.पुढे अजुन एक पाण्याचा ओढा लागला.तो पार करुन गेल्यावर समोर ढगात हरविलेला सिध्धगड आम्हाला दिसला.

आतापर्यंत कापसासारख्या दिसणार्‍या ढगांनी आपला रंग हळुहळु बदलायला सुरुवात केली होती.
याच भाताच्या शेताच्या कडेने जाणार्‍या वाटेने आम्ही पुढे जाऊ लागलो.खर म्हणजे आम्ही सर्व जण पहिल्यांदाच सिध्धगडला चाललो होतो.त्यामुळे गडाकडे जाणारी वाट हिच का याबद्दल थोडे साशंक होतो.समोरचा ढगांनी आछादलेला डोंगर म्हणजे सिध्धगड आणि आपल्याला त्याच्या कुशीत शिरायचय एव्हढच माहीत होत.पुढे याच वाटेने जाताना हे सुळके दिसले.

हो तोच तो गोरखगडचाच सुळका.....
गोरखगड आणि सिध्धगडला पॅनोरमा मध्ये घेण्याचा हा एक प्रयत्न.................

थोडे पुढे गेल्यावर अजुन एक पाण्याने भरलेला नाला लागला.खर म्हणजे ती वाटच होती.पाणी मस्त थंड आणि नितळ होत.त्या पाण्यातुन चालताना लय भारी वाटत होत.

जाताना हे अजुन एक गावकरी भेटले.आपण बरोबर चाललोय याची खात्री पटली.त्यांनी सांगितले कि पुढे गेल्यावर एक नदी लागेल.

थोड चालल्यानंतर खळखळणार्‍या पाण्याचा आवाज यायला लागला.नदी जवळपासच कुठेतरी असेल म्हणुन झपाझप पाउले टाकत आम्ही पुढे सरसावलो.नदीचा प्रवाह त्या मानाने छोटा होता.शांत,नितळ नदिचा प्रवाह पुढे कातळातुन उड्या मारत पळत होता.बहुतेक ही नदी फक्त पावसाळी असावी.
काळ्या कातळातुन वाहणारे हे फेसाळणारे पाणी पाहुन मनाला खुप प्रसन्न वाटले.

मग आमची फोटुग्राफी सुरु झाली.खर म्हणजे येथुन निघावस वाटत नव्हत पण आमच लक्ष्य अजुन दुर होत.म्हणुन आम्ही तेथुन पुढे कुच कले.(फोटोत मागे जो पुल दिसतोय तोच आम्हाला नंतर तारणार होता.)

नदीच पात्र छोट होत पण गुळगुळीत झाल होत.सावकाशपणे आम्ही ती पार करत होतो.अन नेमका माझा पाय घसरला,पडलो त्याच वाईट वाटल नाही पण मोबाईल थोडा भिजला होता.फोटो काढता येणार नाय म्हणुन थोडा नाराज झालो.कारण करनच्या कॅमेराची बॅटरीसुद्धा एनवेळी डाऊन झाली होती.नाईलाजाने मोबाईल बंद करुन बॅगेत टाकला.आता पावसाही भुरभर पुन्हा सुरु झाली.पुढे जाणारी वाट चिखलाने भरली होती.कुठेकुठे शेणमिश्रीत चिखल झाला होता.त्यातुन वाट काढत चाललो होतो.पुढे सात-आठ घरांची वस्ती नजरेस यायला लागली.सिध्धगड पाडा म्हणतात याला असे आम्हाला तेथील एका घराच्या भिंतीवर लिहिलेल्या अक्षरावरुन समजलो.वरुन वरुणराजा कोसळतच होता.आता सव्वाबारा वाजले होते.एव्हढा वेळ कसा गेला काय कळलच नाही.आता येथुन खरी ट्रेकिंग चालु झाली.पुढचा रस्ता चढणीचा होता.
ही चढ सर करुन आम्ही वरती एका पठारावर आलो.तेथुन सिध्धगडच्या बाजुला असलेल्या डोंगर रांग छान दिसत होती.या कड्यावरुन पाण्याचे असंख्य धबधबे वाहताना दिसले.येथे फोटो घेण्याचा खुप मोह होत होता.म्हणुन बॅगेतुन मोबाईल बाहेर काढला.परत बॅटरी लावुन चालु केला आणि काय आश्चर्य तो चालु झाला.मग काय छत्रीच्या आडोशाने वेगवेगळ्या पोझमध्ये आम्ही फोटोसेशन केले.
हा निसर्गाचा अवतार खरच वेड लावणारा होता.

पावसामुळे दाट धुक निर्माण झाल होत.

आता येथुन पुढे जंगल लागले.पण पुढे जाताना दोन वाटा लागल्या.एक वाट खालच्या बाजुने तर एक वरच्या बाजुने जाणारी होती.आपल्याला वरतीच जायचय अस गृहीत धरुन आम्ही वरची वाट पकडली.दाट झाडीतुन वाट काढत आम्ही पुढे चाललो होतो.पण आता आपण वाट चुकलो कि काय असे वाटत होते.मध्ये-मध्ये रानटी केळीची झाडे लागत होती.बराच वेळ त्या जंगलातुन चालल्यानंतर आम्हाला पुढे एक झोपडीवजा घर दिसल.तेथे कोणी असेल तर चौकशी करु या हेतुने आम्ही त्या झोपडीपाशी गेलो.
झोपडीच्या आत डोकावलो तेव्हा आत काळोख दिसला.कोनी हाय का ? अशी हाक दिली.चेहर्‍यावर सुरकुत्या पडलेल्या एक आजीबाई आमच्या समोर आल्या.त्यांना आम्ही विचारले सिध्धगडाला जाणारी वाट कोठुन जाते.त्यांनी समोरची एक वाट दाखविली."इकुन सरल जा ,म्होर गेल्याव एक मोठा वल(ओहोळ) लागल ,तिकुन मग उजव्या हाताला वळा".आजीबाईंकडुन आम्ही थोड पाणी मागुन घेतले.माझ्याबरोबर जे मित्र आले होते ते गुजराथी होते.त्यामुळे आजीबाईंशी मीच गप्पा मारत होतो.माझ्या मित्रांनी मला विचारायला सांगितले पुढे जंगलात वाघ हाय का नाय.कारण थोड्याच दिवसापुर्वी मुरबाडजवळ असलेल्या जंगलात एका बिबट्याचे दर्शन झाले होते.आजी म्हणली, "काय नाय तसल".वरती गडावर पाणी भेटल का? म्हणजे तळ,टाकी वैगेरे.... मी विचारले.त्यांच्याकडुन उत्तर आल.."आवरा पका पानी पडतय वरतुन... अजुन कनाला पायजे"मग आम्ही आजींना आमच्याबरोबर एक फोटो काढा म्हणुन आग्रह केला."नको र पोरा,माजी कापड नाय बराबर....माजा नग ह्याचा झे...".एक वासरू झोपडीतुन बाहेर डोकावल.ते आमच्याकडे अस टुकुर्‍या डोळ्यांनी बघत होत....

या मित्राला आणि प्रेमळ आजींना रामराम करुन आम्ही पुढे कुच केले.पाऊसाची रिपरिप चालुच होती.हि मळलेली वाट पाणाळलेली होती.म्हणजे या वाटेवरसुद्धा वरतुन येणारे पाणी वहात होते.जसजस पुढे जात होतो तसतस छोटे-छोटे धबधबे नजरेस पडत होते.हिरवीगार पान,फुल,वेली यानी नटलेला हा निसर्ग डोळ्यात साठवत आम्ही चाललो होतो.

हळुहळू आता आम्ही निसर्गाच्या कुशीत शिरत होतो.आता परत पाण्याच्या प्रवाहाचा आवाज कानी पडु लागला.थोड चालल्यानंतर आजीने सांगितल्याप्रमाणे एक ओहोळ लागला.खर म्हणजे हा ओहोळ कुठला,चांगला मोठा घबधबाच होता म्हना ना...

वरतुन तो बरसतच होता.त्यामुळे पाण्याला जोर खुप होता.पुढची गमंत म्हणजे आता हा आम्हाला ओलांडुन जायला लागणार होते.तिथले खडक गुळगुळीत झाले होते.कसेबसे एकमेकांना आधार देत हा ओढा ओलांडला.पाय सटकला असता तर या पाण्याबरोबर आमचा पण स्वाहा झाला असता.

हुश्श.. एकदाच तो अडसर पार करुन पुढे निघालो.पाऊसामुळे दम अजिबात लागत नव्हता.थोड आणखी वर चढल्यानंतर समोरचा नजारा पाहुन सगळ्यांनी जागच्याजागी उड्या मारल्या.त्याला कारणच तस होत.अस वाटत होत की आपण कुठल्या धबधब्यांच्या राज्यात आलोय कि काय..सगळीकडे धबधबेच दिसत होते.

मग काय या धबधब्याखाली मनसोक्त डुंबुन घेतल.पावसाच हे ताजताज पाणी चांगलच गार होत.वेगवेगळ्या पोझमध्ये धबधब्याखाली आमची मॉडलींग सुरु झाली.

करन तर या पाण्यातुन बाहेर पडायला नकोच म्हणत होता.पण आता पुढच लक्ष्य गाठायच होत.अजुन गड असल्याच्या कुठल्याच खुणा जाताना दिसत नव्हत्या.पण निसर्गाचे ह्या रुपाने मनाला अक्षरशा भिजवुन टाकले होते.

आता परत चढण सुरु झाली.ही वाट दगडधोंड्याची होती.

पाऊसाचा जोर थोडा कमी झाला.बर्‍याच वेळ चालल्यानंतर हा दगडी दरवाजा सामोरी आला.गड असल्याची एकमेव खुण आम्हाला आता दिसली होती.आपण बरोबर इथपर्यंत आलो होतो.ते पाहुन खरच खुप आनंद झाला.

तेथुन थोड चालल्यानंतर एक मंदिर दृष्टिस पडल.मंदिराच्या पायर्‍या आणि चौथरा दगडात बांधलेल्या दिसल्या.लाकडी खांब आणि वरती पत्र्याच आछादन अस ते मंदिर होत.मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर शेंदुर लावलेल्या या मुर्ती दिसल्या.

मंदिराच्या बाजुला शिवलिंग आणि गणेशाची मुर्ति दिसली.खर म्हणजे इथ दगडात कोरलेले दोन शिवलिंग आणि दोन नंदी होते.बाजुला दगडी बांधकाम पडलेल होत.बहुतेक हे प्राचीन असाव.

मुख्य मंदिराच्या बाहेर मोठा व्हरांडा होता.तेथेच आम्ही विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला.पावसात मनसोक्त भिजल्यामुळे आता सगळे कुडकुडायला लागले होते.खुप भुक लागली होती.आम्हाला येथे पोहोचेपर्यंत तीन वाजले होते.अल्पोपहार करून पुढे जाऊया असा ठराव झाला.आईने डब्यामध्ये मस्त मिक्स भाजी आणि चपाती दिली होती.ब्रेड-सॉस,खाकरा,करनने आणलेला मसाले भात असे पदार्थ पोटात गेल्यावर थोडे हायसे वाटले.आता पावसाने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली.त्या मंदिराच्या समोर बसुन तो नजारा आम्ही बघत बसलो.
पावसाने खास आमच्यासाठी खेळ मांडला होता म्हणा ना..........

स्वर्ग म्हणतात तो हाच कि काय ?

ढग जमीनीवर आले कि आपण ढगाच्या राशीवर बसलोय असेच वाटत होते.या धुक्याची दुलई सरली कि मागे डोंगरावरुन कोसळणार्‍या जलधारा मन मोहुन घेत होत्या.

आता एकदम अंधारुन आले.ढगांनी कोंडाळ करुन जोरात धावा केला.दहा फुटावरचसुद्धा आम्हाला दिसत नव्हत.ढगफुटी झाल्यासारखे वाटत होते.जवळ-जवळ वीस ते पंचवीस मिनिटे पावसाने तुफान बॅटिंग केली.त्यामुळे आम्हाला तेथुन निघता येत नव्हत.पावसाचे हे रौद्र रुप सुद्धा खुप मोहक वाटले.

पाऊस जरा कमी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो.पुढची पायवाट संमातर अशा पठारावरुन चालली होती.सिध्धगड दोन टप्प्यात येतो.एक म्हणजे सिध्धगड माची ,जे आम्ही आता इथपर्यंत आलो होतो.दुसरा टप्पा म्हणजे सगळ्यात वरची बाजु गडाचा बालेकिल्ला.पण पावसाळ्यात बालेकिल्ल्याला जाणारी वाट खुप बिकट असते.बालेकिल्ल्यावर बघण्यासारख अस विशेष काहिही नाही.म्हणुन आम्ही निदान मध्ये लागणार्‍या गुहेपर्यंत तरी जाऊया म्हणुन चालु लागलो. हो पुढे कातळात कोरलेली एक गुहा लागते.त्यात कोणीतरी एक साधुबाबा रहातो.म्हंटल तिथपर्यंत तरी जाऊया.पण जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे आम्ही चाललो पण दुरदुरवर काय गुहा दिसत नव्हती.दोन्हि बाजुला दाट जंगल होते.दाट धुक्क्यामुळे पुढचा अंदाज येत नव्हता.

ढग थोडेसे बाजुला सरल्यानंतर गडाच्या माथ्यावरुन पडणारा हा एक सुंदरसा धबधबा दिसला.

आता साडे-चार वाजले होते.नारीवली गावातुन जाणारी शेवटची एस.टी आठची होती.त्यात पावसामुळे जाताना अजुन वेळ लागणार होता.म्हणुन आम्ही परतायचा निर्णय घेतला.

आता परत आम्ही त्या दरवाजापर्यंत आलो.त्या दरवाजापासुन पुढे अजुन एक वाट समोरच्या पठारावर जात होती.समोर पावसाने पडदा उभा केला होता.त्या पडद्याआड खाली दरी असणार हे आम्हाला माहीत होत.त्या पठारावर हे एका छोट्या देवळासारख दिसल.ते मंदिर नक्की कशाच होत ते कळल नाही.

आता आम्ही गड उतरत होतो.मध्येमध्ये घसरायला होत होत.गड उतरत असताना समोरच्या डोंगरावरचा अजुन एक धबधबा नजरेस पडला.

अजुन थोड खाली उतरल्यानंतर हे एक छोट सुळक दिसल.त्याला सिध्धगडाचे लिंगी सुळके म्हणतात असे नंतर आंतरजाळावरून कळले.

हे एक सुंदर फुल उतरताना नजरेस पडल.

आता झपाझप पावल उचलत आम्ही निघालो होतो.


पावसाची रिपरिप चालु होती.पण त्याची आता सवय झाली होती.तासाभरात आम्हि पाड्यापर्यंत खाली आलो.जास्त वेळ न थांबता पुढची पायपीट सुरु केली.जाताना मागे वळुन बघितले तर सिध्धगडाच्या बाजुला असलेल्या डोंगरातुन असंख्या धबधबे वाहताना दिसले.

तेथुन पुढे गेलो तर नदिला पुर आलेला.........

ज्या नदिचा प्रवाह आधी शांत,छोटा वाटला होता.ती नदी आता खर्‍या रंगात आली होती.पुल जर नसता तर आज त्या पाड्यालाच रहायला लागले असते.सकाळी ज्या पाण्याच्या वाटेने आलो होतो.त्या वाटेला आता गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.त्या पाण्यातुन जाताना एखाद्या पावसाळी जंगल प्रदेशातुन (rainforest) जात असल्यासारखे वाटले.तसच पाय ओढत आम्ही नारीवली गावाच्या वेशीपर्यंत आलो.आता माझ्या बुटांचा प्राण कंठाशी आला होता.त्याची पुढची सोल पुर्ण निघाली होती.नशीब गावात पोहोचलो.आता थोडा अंधार व्हाया लागला.गावातल्या एका हापशीवर चिखलाने भरलेले शुज धुऊन घेतले.
गावातल्या लोकांना विचारले ,"एस.टी किती वाजता येईल?".सातची असेल म्हणुन त्यांनी सांगितले.फक्त पाचच मिनिटे राहिली होती.ही एस.टी गेली तर अजुन एक तास थांबायच जीवावर आल होत.मग आम्ही तेथुन पळतच सुटलो.स्टॉपवर आलो तर एस.टी येताना दिसली.मग ती एस.टी पकडुन आम्ही मुरबाड ला आलो.येथे एक फक्कड चहा घेतला.तेव्हा जरा बर वाटले.येथुन लांबच्या गावाहुन आलेली कल्याणला जाणार्‍या एस.टी मध्ये चढलो.गर्दी असल्यामुळे उभ्यानेच प्रवास करुन कल्याण गाठावे लागले.मग तेथुन लोकलने घरी परतलो.

सिध्धगडाला तसा फारसा शिवकालीन इतिहास नाही आहे.पण जेव्हा भारतावर ब्रिटिश राजवट होती.तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांनी हा गड बळकाविला होता आणि येथुन ते इंग्रजांशी लढा देत होते.या गडाच्या मागच्या बाजुला म्हणजे पलिकडे खाली स्वातंत्रसैनिक हुतात्मा भाई कोतवाल यांची समाधी आहे.सिध्धगडाच्या बाजुला असलेल्या ज्या डोंगराचा लेखात उल्लेख केला त्याला धमधमियाचा डोंगर असे म्हणतात.त्याची उंचीसुद्धा सिध्धगडाएव्हढी आहे.सिध्धगडाची उंची समुद्रसपाटीपासुन साधारणतः २७५०फिट आहे.गडाकडे जाणारी वाट धमधमियाचा डोंगर आणि सिध्धगड याच्या दरीतुन जाते.असा हा गड पावसाळ्यात एका दिवसात सर होण्यासारखा नाही.त्यामुळे आम्हाला त्याच वाईट वाटल नाही.पण ती गुहा बघायची राहुन गेली.त्याची रुखरुख मनात आहे.पण असो परत या गडाला भेटायला जायला नक्कीच आवडेल.

घराच्या खिडकित बसुन चहाचा आस्वाद घेताना पाऊस बघायला तर सगळ्यांनाच आवडते.पण आम्ही पाऊस पिवुन निसर्गाचा आस्वाद घेतला होता.
अशा ह्या पाऊसाने मनाला पार चिंब भिजवुन टाकलेय.........
निसर्गाने तर पार येडा करुन टाकलाय..................

मग काय म्हणताय ..भेटायच का परत असा पाऊस प्यायला.........

तोपर्यंत No Destination............

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही फोटो जबरीच आलेत.. मोबाईलमधून काढलेले अजिबातच वाटत नाहीत... आणि वर्णन पण मस्त लिहिलय..

ती भिमाशंकरला जाणारी वाट पुढे अहुपे घाटातुन जाते का ?>>> रोहीत, आपण जेव्हा सिद्दगड चढतो तेव्हा घाट जवळपास चढुन झालेला असतो... ही वाट डोंगरमाथ्यावरुन पुढे सह्याद्रीच्या मुख्य धारेला लागुन भिमाशंकरला जाते...

अहुपे घाट थोडा डाव्या बाजुला गोरख-मच्शिंद्रच्या जवळपास आहे....

रोहित.. माझ्यामते थेट सिद्धगडला जायचे तर 'बोरवाडी'ची बाजू ही पुढची बाजू झाली. पण ही वाट पण भारी आहे. मी कधी ह्या वाटेने गेलेलो नाही...

हा सिद्धगडचा एक फोटो.. गोरखवरून घेतलेला...

मस्त मस्त ! इतकी हिरवाई पाहून डोळे निवले !...धन्यवाद इतके छान फोटो आणि त्याला साजेसं वर्णन टाकल्याबद्दल. Happy

धन्यवाद ..... गजानन,मनोज,हिम्सकुल,रुणुझुणू.....
गिरी,पक्क्या भटक्या माहितीसाठी आभारी आहे.त्या बोरवाडीच्या वाटेने एकदा जायला पाहिजे.

हो जिप्सी नक्की जाऊया... पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यातला हा ट्रेक फिक्स झाला...

ती भिमाशंकरला जाणारी वाट पुढे अहुपे घाटातुन जाते का ? >>>>> नाही.. अहुपे घाट वेगळा आहे.
सिद्धगड - भिमाशंकर वाट साखरमाचीला डाव्या हाताला ठेवून, दमदम्या डोंगर चढून, गावंडवाडी मार्गे कोंढवळला जाते. कोंढवळ ते भिमाशंकर गाडी रस्ता आहे. सिद्धगड ते कोंढवळ अंतर जवळ जवळ ५ तासचे आहे आणी दमदम्या डोंगराची खडी चढण सॉलीड दमछाक करणारी आहे.

अहुपे घाट, अहुपे गाव आणी खोपीवली गावांना जोडतो

मनोज,जिप्सी .... माहीतीबद्दल धन्यवाद..
अहुपे घाट ते भिमाशंकर हा ट्रेकसुद्धा भन्नाट आहे.पुर्ण जंगल ट्रेक आहे.

धन्यवाद प्र-साद,स्मितागद्रे.................... आपला आभारी आहे.

Pages