ऑक्टोबरची सुरवात कुलंग ट्रेकने केली होती.. नि आता शेवटसुद्धा एखाद्या ट्रेकनेच करायचे ठरवले.. दिवाळीपुर्व ट्रेक असल्याने जवळपासच कुठेतरी जाण्याचे ठरवले.. मायबोलीच्या भटकंती कट्ट्यावर तशी पोस्टदेखील टाकली.. तांदुळवाडी वा माहुली ठरवायचे होते.. याच वर्षी एप्रिलच्या सुरवातीला तसा मी माहुलीला नाईट ट्रेक करुन आलो होतो.. पण शुल्लक चुकांमुळे अख्खा माहुली गाव रात्री काळकुट्ट अंधारात पालथा घालावा लागला होता.. हे कमी म्हणून की काय आम्ही सकाळीदेखील वरती जाण्याची चुकीची वाट पकडली नि भर उन्हात माहुली चढायला घेतला होता... कडक उन त्यावेळी झेपले नव्हते.. नि पहिल्यांदाच मी त्या ट्रेकमध्ये माहुलीपुढे सपशेल शरणागती पत्कारली होती.. कसाबसा माहुली चढून तर गेलो होतो.. पण अवस्था माझी बेकार झाली होती.. तिथे वरती कुठेही न भटकता तसाच लगेच उतरायला घेतला होता...
आता इतक्या कटु आठवणी असुनदेखील मी ३० ऑक्टो. ला पुन्हा माहुली करण्याचे ठरवले.. काय करणार समाधानी नव्हतो मागच्या ट्रेकबाबत.. तर आता सोबत होती चार जणांची.. माझा एक ट्रेकर मित्र 'शिव' नि दोन मायबोलीकर 'रोहीत..एक मावळा' नि 'नविन'.. रोहीतने आपल्यासोबत त्याच्या भावाला (अतुल) देखील आणले होते.. ३० ऑक्टोबरच्या रात्री 'कसारा' ला जाणार्या शेवटच्या लोकलने निघायचे ठरले.. (माहुलीस जाण्याकरता 'आसनगाव' स्टेशनला उतरावे लागते) जेणेकरुन माहुली गडाच्या पायथ्याशी उर्वरीत रात्र काढता येइल नि पहाटेच चढाईस सुरवात करता येइल.. गिरीविहार ला आमचा प्लॅन कळवला पण ऑफिसमधील कामापुढे त्याचा नाईलाज होता..
रात्री दोन अडीचच्या सुमारास आसनगाव गाठायचे मग तिकडून भर चांदण्यात तंगडतोड करत ( ७-८ किमी अंतर - वेळ अंदाजे २ तास) जाण्याचा प्लॅन होता.. रात्री निघणे जरुरी होते कारण सकाळी जसजसा सूर्य डोके वर काढतो तसतसे माहुली चढणे कठीण होत जाते.. शिवाय मला मागचा वाईट अनुभव होताच..
भंडारगड नि पळसगड असे सख्खे शेजारी लाभलेल्या ह्या माहुलीला बराच इतिहास आहे.. बालपणात शिवरायांनी इथेच काही काळ शहाजीराजे नि जिजाबाईंबरोबर वास्तव्य केले होते.. याच माहुलीला रक्तरंजित इतिहासदेखील आहे.. पुरंदर तहानंतर हा किल्ला मोघलांना गमावल्यावर पुन्हा ताबा मिळवताना केल्या गेलेल्या लढाईत हजारो मराठी मावळ्यांचे रक्त सांडले गेले होते.. शिवाय पराभवदेखील झालाच.. पण दोन तीन महिन्यांच्या अवधीतच मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांचा पराभव केलाच..
आमची ट्रेन वेळेत आसनगावला पोहोचली.. बॅगेतील टॉर्च बाहेर काढल्या नि लेटस गो !! पण जायचे कुठून हा प्रश्ण होता.. मागच्या वेळेस आसनगावच्या पुर्व बाजूस उतरुन पश्तावलो होतो.. नि पश्चिमेकडे उतरायचे तर गावातून नाशिक हायवेकडे जाणारा शॉर्टकट रस्ता मला काहि आठवत नव्हता.. तिथेच फलाटावर मग "मानसरोवर" मंदीराकडे (माहुलीला जाताना वाटेत लागणारे हे प्रसिद्ध मंदीर) जाणारे दोघे भेटले ज्यांना रस्ता पक्का माहित होता.. आम्ही मग त्यांच्या मागूनच मोर्चा वळवला.. मागे मी याच रस्स्त्याने आलो होतो.. पण अंधारामुळे काहीच लक्षात येत नव्हते.. गावातील गल्ल्यागल्यांतून बाहेर पडलो ते थेट शेतीमळ्यांमधील वाटेवर.. आम्ही टॉर्चच्या प्रकाशात चाचपडत चालत होतो.. तर ते दोघे आमच्या ग्रुपच्या पुढे प्रकाशाची अपेक्षा न ठेवता बिनधास्त चालत होते.. रोजची ये जा करणारे असावेत असा अंदाज आला.. याच वाटेने आम्ही हायवेवर आलो.. ! आता पुढचा रस्ता मात्र मला तोंडपाठ होता..( * मागे अख्खे माहुली गाव पालथे घातल्याचा अनुभव..)
तिकडून पुढे आम्ही माहुली गावाकडे नेणारी मुळ वाट पकडली.. पाचेक मिनीटो चाललो नि तोच गावाकडे जाणार्या गाडीला हात दाखवला.. गाडी थांबली.. नशिबाने गावाकडेच राहणार्याची होती.. त्यामुळे साहाजिकच आमची तंगडतोड वाचली.. अंधार्या रात्री गाडी त्या खडबडीत रस्त्यावर सुसाट सुटली.. जी थांबली थेट माहुली गावातच.. इतके अंतर चालण्यापासून वाचल्याने सगळेच खुष झाले होते.. तिथूनच मग आम्ही पुढे दिसणार्या काळोखात शिरलो.. क्षणातच थंडीची चाहुल लागण्यास सुरवात झाली.. आकाशात चंद्र जरी अर्धा असला तरी त्याने मंद प्रकाश मात्र सर्वत्र पसरवला होता.. अधिक मजा घेण्यासाठी मग आम्ही टॉर्चच बंद केल्या..
माहुली गडाकडे जाणारा रस्ता तसा सरळच आहे.. वीस पंचवीस मिनीटातच आम्ही पायथ्यालगतच्या मंदीरात येउन पोहोचलो.. इथे दोन मंदीरे आहेत.. एक शिवलिंगाचे नि दुसरे बहुदा ग्रामदैवत आहे..दोन्ही देवळांची बांधणी उत्तम नि जागा देखील अगदी ऐसपैस.. दोन्ही मंदीराच्या समोरील अंगणात सुद्धा बर्यापैंकी मोठी जागा आहे.. जिथे आता रान वाढले होते.. इथवर लवकर पोहोचलो तेव्हा थोडी झोप घेण्याचा निर्णय घेतला.. पण कडाक्याची थंडीमुळे अंग गारठून गेले नि तासभरातच सगळे जागे झाले.. अजुन उजाडण्यास अवकाश होता.. तेव्हा शेकोटी करुन उब मिळवण्याचे आमचे प्रयत्न चालू झाले.. मंदीराच्या जवळपासच सुकी लाकडं मुबलक प्रमाणात असल्याने आम्हाला जास्त त्रास झाला नाही... आवश्यक तेवढीच लाकडं घेवुन शेकोटी पेटवली.. थोडी उब मिळाली नि कुडकूडणारे सगळे स्थिर झाले..
अंग तर थोडे गरम झाले.. पण भूक चाळवली.. सो नविन ने आणलेल्या ब्रेड-केकचा फडशा पाडला.. आताशे चारच वाजले होते.. त्यामुळे वेळही जात नव्हता...वरती आकाशात पाहिले तर धुक्यामुळे त्या अर्धचंद्राभोवती भले मोठे वर्तुळाकार विवर तयार झाल्याचे दिसले.. असे मी पहिल्यांदाच बघत होतो.. गप्पागोष्टी करत आम्ही वेळे काढला.. नि शेवटी ओसरणार्या रात्रीच्या अंधुक अंधारातच आम्ही माहुलीगडाची वाट धरली...! जी महादेवाच्या मंदीराच्या मागून जाते..
वाटेच्या सुरवातीलाच दहा मिनीटांच्या अंतरावर डावीकडे एक फाटा फुटतो.. तीच वाट पुढे माहुली गडाकडे नेते.. मागे मात्र आमचे या फाट्याकडे दुर्लक्ष झाले होते.. सरळ गेलो (ही वाट पावसाळ्यात धबधब्यासाठी जाते) नि मग सगळे भारी पडले होते.. यावेळी अंधारातून जाताना मात्र मी सतर्क होतो.. त्यात पावसामुळे सभोवताली जंगल असल्याने जरा जास्तच लक्ष देत होतो.. पण पायाखालची वाट मात्र स्पष्ट होती.. गवताने झाकलेली नाहीये.. नि वाट दाखवण्यासाठी अंतराअंतरावर दगडावर बाण रंगवलेले दिसत होते (असेच बाण त्या धबधब्याच्या वाटेवर देखील आहेत हे लक्षात असू द्या.. नाहितर आमच्यासारखा घोळ व्हायचा....) इतके असूनही या फाट्यावर मार्ग सांगणारा फलक कुठेही दिसत नाही..
माहुलीगडावर जाणार्या या डावीकडच्या वाटेने पुढे गेले असता सुका ओहळ लागतो.. तो पार करुन आम्ही पुढे गेलो.. आता उजाडण्याची वेळही झाली होती.. त्याचवेळेस पहिला चढ लागला.. मागोमाग दुसरा.. हे दोन्ही चढ पार केले नि नविनला त्याची बॅग जड वाटू लागली !! पठार लागले नि लगेच विश्रांतीसाठी थांबणे भाग पडले..
इथूनच दिसणारे नवरा, नवरी चे सुळके..
उजवीकडील पळसगड..
पहिल्या दोन चढणातच झोपलेले शिव नि नविन.. आणि अतुल... नि समोर पळसगड
तर एकीकडे रोहीत पोझ देताना..मावळा
फोटोशूट थोडक्यातच आटपून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.. आत सगळे क्लाईंबच होते.. त्यामुळे सूर्यदेवांची सुस्ती पुर्ण उडेस्तोवर आम्हाला जितके लवकर वरती जाता येइल ते बघत होतो..
सुरवातीची चढणीची वाट तशी जंगलातूनच आहे.. दोन्ही बाजूस कारवी नि विविध प्रक्रारची झाडी होती.. बागडणारी फुलपाखरे होती.. नि दम घेण्यासाठी थांबलोच तर पुढे चला सांगत हाकलवणारी मच्छर होतीच..
वाटेतच एक दिसलेले हे छोटे वेगळे फूल..
काही वेळेतच तांबडे पसरले.. तेव्हा झाडांमधून डोकावणारा तेजोगोल..
------
आम्ही टप्प्याटप्यावर थांबत कोवळ्या तांबूस उन्हात न्हाउन गेलेला सभोवतालचा परिसर न्याहाळत होतो..
- - - - - - - -
तांबडा देखावा..
- - - - - - - - -
माहुलीला खेटून असलेली सुळक्यांची डोंगररांग आता उठून दिसत होती..
- - - - - - -
नवरा(डावीकडचा सुळका), भटोबा (मधला), नवरी (डावीकडून तिसरा सुळका) नि करवली (उजवीकडून पहिला)
- - - - - - -
करंगळी दिसते का पहा..
- - - - - - -
आम्ही बर्यापैंकी अंतर चढून आलो होतो तरी अजुनही अर्धे अंतर बाकीच होते !!! सगळ्यांची दमछाक होत होती.. हा ट्रेक खरे तर आपला स्टॅमिना किती आहे ते दाखवून देतो... गडाची उंची २८०० फूटच्या आसपास आहे.. पण सुरवातीपासून उभा चढ असल्याने पटकन धाप लागते.. सगळेजण छोटे छोटे ब्रेक्स वरचेवर घेत होते.. पहाटेला चढायला घेतले तर ही हालत होती.. कडक उनात चढणे म्हणजे भाजून घेतल्यासारखे.. दम गेलाच समजा.. मला बहुदा मागचा अनुभव असल्यामुळे माझा स्टॅमिना मात्र अजून शाबूत होता....
गडावरती पाणी पिण्यास हवे तितके योग्य नसल्याने मी सर्वांना पाणी थेंबे- थेंबे गिळण्याचा सल्ला दिला होता.. त्यामुळे तहान केवळ पाण्याच्या एका घोटावर भागवली जात होती.. शिव मात्र त्याच्या बॅगेतून संत्री, डाळिंब, काळी द्राक्षे अशी फळे काढत सगळ्यांना तृप्त करत होता...
जशी जंगलातील वाट सरली तसा आम्ही चढण्याचा वेग वाढवला.. काय करणार तळपती किरणेच आम्हाला पळवत होती आता वाटेत बर्यापैंकी सावली देइल असे मोठे झाड क्वचितच लागत होते.. त्यातच माहुलीची ही चढण्याची वाट सूर्यदेवांच्या अगदी विरुद्ध बाजूस असल्याने सावलीचा तसा दुष्काळच...
वाटेल एक लागलेले सुकलेले झाड
- - - - - - -
लवकरच आम्ही त्या वाटेने डोंगराच्या सोंडेवर येउन पोहोचलो.. इथून माहुलीगडावरील चढाईचा अंतिम टप्पा सुरु होतो..
डोंगराची सोंड पार करुन रोहीत पुढे चढाई करताना..
- - - -- - - -
तर एकीकडे शिव व नविन.. कारवी नि रानटी केळींच्या झाडीत..
- - - - -- - - -
इथूनच पुढे गेले असता एक मस्त नैसर्गिक कठडा लागतो.. फोटोशुटसाठी मस्त स्पॉट..
- - - - - - - -
इथे जर समाधान नाही झाले तर पुढे अजून एक मस्त असाच पण थोड्या उंचीवर स्पॉट लागतो.. इथेच एक सुकलेले झाड आहे.. मागे मी एप्रिल मध्ये आलो होतो नि आता पावसानंतर.. पण पानांची साधी पालवीसुद्धा फुटलेली दिसली नाही.. तरीही मोठ्या दिमाखाने उभे आहे ते झाड.. मग या झाडालाच संगतीला घेऊन माझ्या सवंगड्यांचा फोटो काढला..
मावळे !!
- - - - - - - - -
फोटोशुट म्हटले की धमाल हवीच.. असाच एक फोटो.. चष्मेबहाद्दूर..
- - - - - -- - - - -
याच कठड्यावरुन वाट समोरच असलेल्या छोट्या लोखंडी शिडीकडे जाते.. याच शिडीच्या आजुबाजूस तटबंदीचे काही अवशेष दिसतात..
- - - - -- - - - - --
हि शिडी पार केली की माहुली गडावर प्रवेश होतो.. इथे दरवाजा वगैरे प्रकार नाहिये.. पुढे पाउलवाटेने गेले असता पाण्याचे गलिच्छ(!!!!) टाके लागते.. इथूनच एक वाट डावी बाजुस टाकीला खेटून पुढे जाताना दिसली तर दुसरी सरळ जाणारी वाट ही माहुलेश्वर मंदीराकडे जाते हे ठाउक होते.. तिथेच पेटपूजा करुन घेउ म्हणत आम्ही ती वाट धरली..
पाच दहा मिनीटांतर ही पाउलवाट निमुळत्या वाटेने लाल मातीच्या चिखलवाटेने खाली उतरते.. तिकडून आम्ही खाली उतरलो नि डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदीराजवळ (छप्पर नसलेले) आलो.. चारही बाजूंनी डेरेदार वृक्षांनी व्यापलेली नि गारवा देणारी अशी ही जागा खरेतर आल्हाददायक ठरली असती.. पण हुल्लडबाजी करणारे, निव्वळ पिकनिक करण्यासाठी येणारे अशा मंडळीनी ह्या जागेत दुर्गंधी पसरवण्यात बराच मोठा हातभर लावला आहे.. पुरात्व खात्याने देखील आपला नेहमीचा दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतल्याने इथे स्वच्छतेची बोंब आहे त्यामुळे स्वच्छ पाणी मिळणे कठीणच.. शिवलिंगाच्या एका बाजूलाच छोटे डबके आहे.. (खरेतर पिण्यासाठीच पाणी आहे !!! तोंडात न घेतले तर उत्तम .. ) तर एका बाजूला पहारेकर्यांच्या देवड्यांकडे जाण्यास पायर्या आहेत.. तिथेच पुढे महादरवाजा आहे... आम्ही तिथे नंतर जाण्याचे ठरवून आधी जेवणखाणे उरकण्यास घेतले.. त्या डबक्याच्या बाजूने एक वाट पुढे पळसगडावर जाते.. ह्या वाटेच्या अगदी सुरवातीलाच डावीकडे पाण्याचा झरा आहे.. त्यातल्या त्यात ते पाणी पिण्यास योग्य आहे.. तेच पाणी घेवून आम्ही पेटपूजेचा कार्यक्रम सुरु केला.. निमित्त होते शिव ने आणलेली भाकरवडी नि रोहीत-अतुलने आणलेली भेळ !! एव्हाना एक वाजत आला असावा असा माझा अंदाज होता.. पण टाईम चेक केला तर आत्ताशे सकाळचे दहा वाजत आले होते.. आम्हाला मात्र मध्यदुपार लोटुन गेल्याचा फिल येत होता..
मस्त मस्त भेळ नि आम्ही केलेली सजावट..
-- - - - -- - - - -
खाणे उरकले नि त्याच जागेवर आम्ही वामकुक्षीच्या निमित्ताने आडवे झालो.. निरव शांतता नि वार्याबरोबर सळसळणारी झाडांची पाने यांच्या संगतीने डोळा कधी लागला ते कळलेच नाही.. तासभर झोप केव्हा झाली ते कळलेच नाही.. जाग आली ती कुणाचा तरी मोबाईल वाजल्यावरच... लवकरच आटपून आम्ही आजुबाजूचा परिसर फिरुन घेतला..
शिवलिंग
- - - -- - - - - -
पळसगडाच्या वाटेने थोडे पुढे गेले की एका बाजूने दिसणारी माहुली किल्ल्याचे एक धिप्पाड भिंत..
- - - -- - - - --
पळसगडावर बघण्यास फारसे काही नाहीये पण इथेच एका बाजूस कोरलेल्या पायर्या दिसून आल्या..
- - - - - -- - - -
आम्ही त्या पाच मिनीटाच्या अंतरावर असलेल्या वाटेवरुनच परतलो नि मुख्य दरवाज्याकडे वळालो..
पहारेकर्यांच्या देवड्या..
- - - - - - - -
- - - - -- - -
देवड्या..
- - - - -- - -
इथेच दरवाजाच्या एक कोपर्यात शिल्प ठेवली आहेत..
- - - - -
- - - - - -
तुटलेला मुख्य दरवाजा..
- - - - - -
नैसर्गिक भिंतीचा वापर करुन बांधलेली तटबंदी..
- - - - - -
याच दरवाज्याने रोहीत नि नविन थोडे खाली उतरले तर त्यांना तिथे मोठ्या आकाराच्या पायर्या दिसुन आल्या.. ही वाट वापरात नसल्याने पुढे ही वाट कशी असावी हे गुढच राहीले..
मुख्य दरवाज्याजवळ दिसलेली गेको
- - - - - - -- -
सारा परिसर धुंडाळला नि आम्ही तिथून मार्गी लागलो.. माहुलेश्वर मंदीराकडची ही लाल मातीची चिखलवाट..
- - - - - - - -
आम्ही त्या वाटेने वरती आलो.. माझा तर आता खर्या अर्थाने ट्रेक सुरु होणार होता.. कारण आम्ही शक्य तितका माहुली पालथा घालायचे ठरवले होते नि जे मागच्या वेळेस मी मुकले होते.. आता पुढचे सगळे आमच्या हातात असलेला नकाशा नि दिसणार्या पाउलवाटा यांच्यावर पुर्णपणे अवलंबून होते.. पण काही झाले तरी संध्याकाळी चारपर्यंत माहुलीची पायथा गाठायचा असे ठरवून आम्ही स्वत:च आमच्या भटकंतीवर निर्बंध लादून घेतले..
माहुलेश्वर मंदीराच्या वाटेने वरती आलो नि आम्ही मोर्चा उजवीकडे जाणार्या पाउलवाटेकडे वळवला.. काही अंतरावरच गडाच्या काही खुणा दिसुन आल्या.. खास असे बांधकाम नव्हते नि त्यातच त्या बांधकामाला झाडीझुडूपाने पुर्णपणे वेढल्याने आम्ही पुढे चालून गेलो..
आता आम्ही पकडलेली पाउलवाट सुक्या गवतातून मार्ग काढत पठारावर फिरवत होती.. नि आम्ही उन्हाचे चटके खात गुपचूप तिच्या मागं चालत होतो.. अधूनमधून ती वाट आम्हाला कारवीच्या दाट जंगलातून नेत होती.. आम्हीसुद्धा बिनधास्तपणे सर्पाची पर्वा न करता वाटेत आलेले जंगल तुडवत पुढे जात होतो.. मध्येच उतरण मध्येच चढण.. असे करता करता आम्ही तासभर चालतच राहिलो.. पुढे काही नसले वा बघावयास काही नाही मिळाले तर पोपट अशी शंकादेखील मनात येत होती.. पण आम्ही ठाम होतो.. एकतर ही वाट कल्याण दरवाज्याकडे सोडेल नाहीतर नवरा नवरी भटोबा सुळक्यांचे जवळून दर्शन देइल असे वाटत होते.. अगदीच नाही तर नकाश्यात म्हटल्याप्रमाणे गुहा नि वाडा तरी दिसतील..
आमच्यामध्ये सर्वात पुढे रोहीत सोबतीला एक काठी घेउन होता.. तर सर्वात मागे मी फुलपाखरांचे फोटो अयशस्वीपणे टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.. पुढचे नजरेआड झाले की एओ ची आरोळी देउन माग काढत त्यांना गाठत होतो..
छान किती दिसते फुलपाखरु..
- - - - - - - - - -
बरीच पायपीट झाली पण पाउलवाटेचा अंत काही होत नव्हता.. साहाजिकच आमच्यावरील दडपण वाढत होते.. एवढा वेळ, श्रम नि तंगडतोड फुक्कट की काय असा विचार मनात डोकावू लागला.. पण पाउलवाट आहे म्हणजे नक्कीच काहितरी असावे म्हणत आम्ही चालत राहीलो.. नि लवकरच दोन डोंगरामध्ये असलेल्या खिंडीजवळ पोहोचलो....
रोहीत कड्यावरुन खिंड बघताना...
समोरील डोंगरावर एक ढासळलेली तटबंदी नजरेस पडली नि तेव्हा हाच भंडारगड असे कळून आले..
पण तिथे जायचे कसे हा प्रश्ण होता.. तोच आम्हाला त्या खिंडीत लोखंडी शिडी दिसली..
पण शिडीवरचा भाग चढून जाण्यास कठीण भासत होता.. त्यात उतरायचे कुठून ह्या संभ्रमात होतो.. शिवाय हातात वेळ कमी होता.. पण तिथे रोहीत रानातून वाट काढत शिडीजवळ पोहोचला नि त्याने कॉल दिला.. मग काय आम्ही सगळेच खाली उतरलो.. शिडीजवळ गेलो तर वरतुन अवघड वाटणारा पॅच अगदीच सोप्पा होता.. तो पार केल्या की दोनेक कोरलेल्या छोट्या पायर्या लागतात..
शिडी चढताना शिव आणि वरती रोहीत....
वरती आलो.. नि पुन्हा पाउलवाट सुरु झाली.. पंधरावीस मिनीटांनी उजवीकडे दरीत पाहिले तर सुंदर नजारा दिसला.. चोहोबाजुंनी गर्द हिरव्या झाडांची दाटी नि मध्यभागी विसावलेले एक मंदीर...
नंदकेश्वर मंदीर (रोहीतने माहिती काढल्याप्रमाणे)
आम्ही पकडलेली वाट पुन्हा कारवीच्या जंगलात घुसत होती.. त्यामुळे आम्ही मग तिथेच झाडाखाली ठाण मांडले.. उन्हाचे तसे चटके लागत होतेच.. बाकीचे बसले पण मी नि रोहीत तिथेच आजुबाजूला बघत होतो.. कुठे कल्याण दरवाजा दिसतोय का ते.. नकाश्याप्रमाणे आमची वाटचाल बरोबर होती.. बघताना मला तिथेच एक पुसटशी वाट खाली दरीत उतरणारी दिसली.. वाटत होते कल्याण दरवाज्याकडे जाणारी आसावी.. कल्याण दरवाजा हा जवळपास ५०० फूट खाली असल्याचे नि तो वरतून दिसत नसल्याचे ऐकून होतो..
त्यामुळे निदान तो मार्ग बघावा म्हणून कुतूहल होते.. शेवटी बघू प्रयत्न करु म्हणत मी आणि रोहीतने आमच्या बॅग्ज तिथेच इतरांकडे सोपवून खाली उतरलो .. पण जपूनच.. खरे तर आम्ही फक्त अंदाज बांधून पुढे सरकलो होतो.. नि जेव्हा खाली काहि अंतरावर पायर्या दिसल्या.. आम्ही दोघे भलतेच खुष झालो.. पुढेच आम्हाला चोर दरवाजा नजरेस पडला.. तो बघताच आम्ही वरच्यांना कॉल दिला..
चोर दरवाजा..
भले कल्याण दरवाजा बघायला मिळणार नव्हता.. पण मार्ग तर दिसला यातच समाधान.. चोर दरवाज्याच्या पलिकडे मात्र सरळसोट रॉक पॅच होता.. जिथे दोरीशिवाय खाली पोहोचणे अशक्य होते.. समोरच तुटलेली जुनाट शिडी दिसली.. पण तिथवर जाणेही धोक्याचे होते..
शिडी नि दरी...
---------
रोहीत तर भलताच उत्सुक झाला होता.. पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण वेळीच त्याला अडवले.. जल्ला खाली गेला तर नाडा कुठे होता ह्याला खेचायला..
त्या चोर दरवाज्याला धरुन वाकून पाहिले तर पायर्या नि वाट मात्र दिसत होती.. अतिशय हुशारीने केलेले बांधकाम होते..
झूम करुन बघितलेल्या कल्याण दरवाज्याकडील पायर्या..
इकडून मग आम्ही पुन्हा वरती आलो.. नि नकाश्याच्या माहितीनुसार जवळपास कुठे तरी असलेली गुहा शोधु लागलो.. त्यासाठी मग आम्ही त्या कारवीच्या जंगलात घुसलो.. ह्या कारवीच्या जंगलात घुसणे म्हणजे तंबूमध्ये एका बाजूने आत शिरायचे नि दुसर्या बाजूने बाहेर पडायचे असे होते..
जंगल पार केले की काही अंतरावरच आम्हाला "वजीर" सुळका डोकावताना दिसला...
- - - - - -
थोडा झूम करुन..
---------------
फोटो घेण्यात जास्त वेळ न दवडता आम्ही त्याच वाटेने पुढे गेलो तर एका बाजूस गुहा नजरेस पडली..
साहाजिकच ह्या गुहेतदेखील पाणी साचले होते... त्यामुळे आत शिरुन किती मो़कळी जागा आहे तो अंदाज आला नाही.. जरी तिथून वाट पुढे जात असली तरी तिथूनच मग आम्ही माघारी फिरण्याचे ठरवले.. भटोबाचा सुळका अगदी जवळून पाहण्याची इच्छा होती पण आम्हाला माघारी फिरताना उनाचे चटके सहन करत दोन डोंगर पुन्हा पार करायचे होते.. त्यात अजून तळे, वाडा बघायचे राहीले होते.. !!
आम्ही आता ब्रेक न घेता झपाझप अंतर कापायचे ठरवले.. नि अगदी ठरल्याप्रमाणे भंडारगड पार करुन आम्ही माहुलीच्या डोंगरावर आलो.. म्हटले वाडा, तळे पुन्हा कधी तरी.. पण गंमत अशी झाली की घाईघाईने परत येताना दुसरी वाट पकडली गेली... आम्हाला लगेच चुकल्याचे कळले.. पण वाट आम्हाला हव्या त्या दिशेनेच जात असल्याने निश्चिंत होतो.. काहि अंतरावरच अनपेक्षितपणे आम्हाला तळे लागले.. बर्यापैंकी मोठे आहे.. पण पाणी स्वच्छ नाहिये.. तरीदेखील परिसर सुंदरच दिसत होता..
(सौजन्य : रोहीतचा मोबाईल)
---------
तळे लागले तर वाडा पण इथे जवळपास असेल म्हणत आम्ही अंदाज घेत तळ्याच्या एका बाजूने पुढे गेलो.. नि तिथेच जंगलात लपलेला वाडा नजरेस पडला.. तीन बाजूंची भिंत बर्यापैंकी शाबूत आहे.. तिथेच एका बाजूला दगडात कोरलेले शिवलिंग नजरेस पडले...
(सौजन्य : रोहीतचा मोबाईल)
---------
इथेच आजुबाजूला पाहिले तर बरेच भगनावशेष पडलेले दिसले.. पण सगळीकडे रान वाढल्यामुळे शोधणे-बघणे जरा कठीण झाले होते.. तिथून लवकरच पाय काढला.. वाटेतच थोड्या अंतरावर अजून काही वास्तूचे अवशेष दिसले.. कसले ते कळले नाही..
(सौजन्य : रोहीतचा मोबाईल)
---------
आम्हाला वाट चुकल्याचा बराच फायदा झाला होता.. अर्ध्यातासातच आम्हाला वाटेने अगदी सुरवातीला लागणार्या त्या गलिच्छ पाण्याच्या टाकीकडे आणून सोडले.. तिथेच मग थोडी पेटपुजा, इलेक्ट्रॉल मिश्रीत पाणी पिउन उतरायला घेतले.. पाणी अजुनही शिल्लक होते पण जास्तही नव्हते.. लवकरच भर दुपारी अंदाजे दिड दोन वाजता उतरण्यास सुरवात केली.. आता मात्र खाली वाटेत लागणारे जंगल लागेपर्यंत आम्हाला थारा नव्हता..
अगदीच मनाची तयारी करण्यासाठी नि उतरण्याचा वेग वाढवण्यासाठी अधुनमधून मस्त-मस्त थंडगार पेय/ ताक/आइसक्रिमची आठवण काढत होतो.. "खाली जाउन हे खाउ.. खाली जाउन ते पिवूया.. "
नि खरच आम्ही टाणाटण उड्या मारत भलत्याच वेगाने खाली उतरलो होतो.. पण मग पायही तितकेच थरथरत होते... जवळपास अंतर आम्ही कापले.. नि आता खाली मंदीराच्या बाजुस असलेल्या दुकानात थंड काहीतर घेउ म्हणत आमच्याकडचे पाणी संपवून टाकले.. पण नंतर फोन केले असता कळले ते एकमेव दुकानच आज बंद होते.. नुकतेच पाणी पोटात गेल्यावर खुललेल्या चेहर्यांवरती त्रासिक मुद्रा उमटली..
पुढे मग तो ओहळ लागला.. तिथेच क्षणभर विश्रांती घेतली नि मार्गस्थ झलो.. पावणेचार वाजत आले होते.. नि एसटीची वेळ चारची होती.. पायथ्याच्या महादेवाच्या मंदीरापासून माहुली गाव विसेक मिनीटांवर आहे.. त्यामुळे इथेही लवकरात लवकर माहुली गाव गाठणे भागच होते.. गावात पोहोचता क्षणीच पहिले एका घरात जाउन पहिले पाणी मागितले.. मग एसटीची चौकशी केली असता बारानंतर एसटीच आली नसल्याचे कळले.. नि आता पण काय भरवसा नाय असे त्या घरातल्यांनी सांगून आम्हाला चांगलेच टेंशन दिले..
पण आतापर्यंत भलताच पॉजिटीवनेस दाखवणारे आम्ही इथेही 'वाट पाहेन पण एसटीनेचे जाईन' असा पवित्रा घेतला... खरे तर पायांत त्राण नव्हते ते ६-७ किमी अंतर चालून जायला.. ! थकलेभागलेले आम्ही तिथेच वाट बघत बसलो.. त्यात एका गावकर्याने बातमी आणली की एसटीचा टायर पंक्चर झालाय, उशीर होणार... हे ऐकताच आता घरीपण जायला उशीर होणार याची जाणीव झाली ... नि संध्याकाळी सातपर्यंत येतो असे घरी उगाच सांगून टाकल्याचा पश्चाताप झाला..
नशिबाने एक गावातील इसम रिक्षा घेउन चालला होता.. आधीच एकजण बसला होता.. तरीदेखील आम्हा पाचजणांना देखील नेतो म्हणत रिक्षात बसण्यास सांगितले.. रिक्षा सुरु झाली नि 'देवासारखा धावून आला' म्हणत सुटकेचा निश्वास टाकेपर्यंत रिक्षाचा टायर पंक्चर झाला.. !! आमचे चेहरेदेखील पंक्चर झाले हे सांगणे नकोच.. जाउदे,, इतका छान झालेल्या ट्रेकचा शेवटच खडतर आहे म्हणत आम्ही नाईलाजाने चालायला घेतले.. मानसरोवर मंदीरापर्यंत तरी चालावे लागणार होते.. पुढे भेटली तर भेटेल रिक्षा म्हणत चालू लागलो.. तोच रोहीतने एक युक्ती लढवली.. वाटेतून हायवेला बाईकने जाणार्या कुण्या गावकर्याकडे लिफ्ट मागितली नि तो त्याच्या भावासकट पुढे गेला.. नि पुढे त्या मानसरोवर मंदीराकडे रिक्षा पकडून मागे परत घेवून आला.. रिक्षा थेट आसनगाव रेल्वे स्थानकापर्यंत असल्याने आमचे चांगलेच फावले.. त्यामुळेच आसनगावहून साडेपाचची ट्रेन पकडू शकलो.. अर्थात ट्रेनमध्ये बसण्याआधी थंड पिण्याचे मात्र चुकवले नाही !!
एकंदर ट्रेकबाबत भलताच समाधानी होतो.. कसलाही प्रिप्लॅन न आखता अगदी प्लॅन केल्यागत ट्रेक झाला होता.. हा माहुलीचा ट्रेक सोप्पा आहे, एक दिवसाचा आहे असे म्हणतात.. पण दोनदा इथे जाउन आल्यावर माझे मत मात्र वेगळे आहे.. " माहुली ट्रेक हा सोप्पा नाहीये.. भले उंची २८०० फूटच आहे पण सरळ चढणाचे डोंगर पार करावे लागतात.. तेव्हा साहाजिकच तुमच्या स्टॅमिन्याची परिक्षा घेतली जाते.. नि फक्त माहुलीलाच जाउन यायचे असेल तरच एक दिवसाचा ट्रेक म्हणावा... फिरले, बघितले, नकाश्याप्रमाणे शोधले तर आणखीन काही खूणा सापाडतील..नि माहुलीला अगदी चिकटून असलेला भंडारगड पाहिल्याशिवाय हा ट्रेक अपुर्णच.. एक दिवस अपुराच पडेल.."
आता माहुलीवर जाणे होईल ते दोन कारणांसाठी.. एकतर रॅपलिंग करत तो कल्याण दरवाजा गाठायचाय.. नि दुसरे पावसाळ्यात येथील सुळक्यांना ढगांशी झटापटी करताना बघायचे आहे.. !!
छानच आहे व्रुत्तांत मी
छानच आहे व्रुत्तांत
मी शहापूरलाच असून एकदापण नाही गेलीये वरती......
आणि परत कधी याल तर कळवा मला.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो फीचर! स्वतः तिथे
छान फोटो फीचर! स्वतः तिथे गेल्यासारखं वाटलं. मावळे आणि नंदेश्वर मंदिराचा फोटो खास आवडले!
जबरदस्त योग्या.. अन रोह्या..
जबरदस्त योग्या.. अन रोह्या.. फुलपाखराचा फोटो मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीप्रमाणेच मस्त वृतांत आणि
नेहमीप्रमाणेच मस्त वृतांत आणि फोटोसुद्धा!!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
किल्ल्याची खुपच दुर्दशा झाल्याची दिसतेय फोटोतुन
योग्या, फोटु लई खास.
योग्या, फोटु लई खास. "तेजोगोल", फूल आणि फुलपाखरु मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वृत्तांत व फोटो मस्तच.
वृत्तांत व फोटो मस्तच.
यो मस्त वृतांत आणि छान फोटो
यो मस्त वृतांत आणि छान फोटो .. नेहमीप्रमाणे..:स्मित:
मस्त फोटो.... धमाल वर्णन.
मस्त फोटो.... धमाल वर्णन. कल्याण दरवाजाकडील त्या झूम केल्यानंतर दिसणार्या पायर्या आणि वाट बघता रस्ता सोपा असावा असे वाटते आहे.
सही रे यो.. मस्त माहुली ला
सही रे यो.. मस्त
माहुली ला कल्याण दरवाजाने नक्की जाऊया ...
न जाणो शिवकालीन गडाचे अजुन काय रहस्य कळेल.
जस तु सांगितले तसे खरच गडाची अवस्था बघवत नाही.
आपला इतिहास (काही लोक्स)
आपल्या हाताने पुसतायत अस वाटतय.....
योग्या... बर झालं तू जाऊन
योग्या... बर झालं तू जाऊन आलास ते... आमचा त्रास वाचला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सचित्र वृत्तांत नेहमीप्रमाणे अप्रतिम...
रोहितने शोधलेली वाट सहसा चुकत नाही... हा मागच्या ट्रेकचा अनुभव आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर झालं तू जाऊन आलास ते...
बर झालं तू जाऊन आलास ते... आमचा त्रास वाचला >>>:खोखो: इन्द्रा...
अरे काय!!! किती भारी झाला
अरे काय!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
किती भारी झाला ट्रेक...
जवळजवळ सगळं अनपेक्षित बघायला मिळालं असं वाटतंय!!
बाकी trek ची खरी मजा वाट शोधण्यामध्येच आहे!!
आणि यो.. आपण आता साहित्यिक होऊ लागले आहात असं काही काही ठिकाणी वाटतंय
बाकी trek ची खरी मजा वाट
बाकी trek ची खरी मजा वाट शोधण्यामध्येच आहे!! >>.१०० मोदक...
खूपच छान वर्णन... चित्रांमुळे
खूपच छान वर्णन... चित्रांमुळे प्रत्यक्ष गेल्याचा फील आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>एव्हाना एक वाजत आला असावा
>>>एव्हाना एक वाजत आला असावा असा माझा अंदाज होता.. पण टाईम चेक केला तर आत्ताशे सकाळचे दहा वाजत आले होते.. आम्हाला मात्र मध्यदुपार लोटुन गेल्याचा फिल येत होता.. <<
(माझाही भटकत असतानाचा अनुभव)
मग मनात अश्या ओळ्या उमटल्या....
वेळेचे भान नाही...भुकेची जाण नाही
भट्क्ण्याची मला.. अशी जड्ली नशा
काय सान्गु मित्रा तुला.....
बाट्लीची माझी आता डिमान्ड नाही
असेच भटकत रहा सदानकदा.....नी अनुभव पोस्ट करत रहा.......अप्रतिम लेख अप्रतीम ट्रेक.
मि एक चातक....(सध्या रेगीस्तानात बन्दीस्त असलेला)
धन्यवाद मित्रहो.. रश्मि..
धन्यवाद मित्रहो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रश्मि.. नक्की कळवेन.. फकस्त खाण्यापिण्याची सोय करुन ठेवावी लागेल..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वाट बघता रस्ता सोपा असावा असे वाटते आहे. >> हबा.. पुढच्यावेळी तुम्ही यावे म्हणतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंद्रा, विन्या, आनंदयात्री...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चातका.. तिथून सुटका झाली की हाक दे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर वृतांत आणि ट्रेक..
सुंदर वृतांत आणि ट्रेक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यो सुंदर वृतांत, जल्ला मी
यो सुंदर वृतांत, जल्ला मी मिसलो महीना अखेर असल्याने.....
छान सफर घडवलीत. धन्स!
छान सफर घडवलीत. धन्स!
मित्रा सुंदरच वर्णन!!!! मी
मित्रा सुंदरच वर्णन!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी २ वेळा माहुलीवर जाउनदेखिल मनासारखा माहुली पाहता आला नाहीये.......
आपल्या ठाणे जिल्ह्याचे खरोखर भूषण आहे हा दुर्जेय किल्ला...: )
छान वर्णन. मला तूम्हा
छान वर्णन.
मला तूम्हा भटक्यांना एक सूचवावेसे वाटते. (ओमानमधे युरोपीयन लोक भरपूर भटकंती करतात. ओमानमधे डोंगर, वाद्या (नद्या) गुहा असे बरेच काहि आहे बघण्यासारखे. तर हे लोक काहि न ठरवता एखादी सहल आखतात. आणि तिथे काही अनोखे दिसले तर त्या वाटेचे अचूक वर्णन लिहून ठेवतात. उदा बिद् बिद् या गावापासून ४ किमी आल्यावर. डावीकडे वळा. मग एक्झॅटली सहा किलोमीटरवर तूम्हाला एक डोंगर दिसेल, त्याला वळसा घालून आग्नेयेकडे वळा.. आम्ही असे लेख घेऊन भटकत असू आणि त्यातील अचूक माहितीच्या बळावर नेहमीच योग्य त्या जागी पोहोचत असू. तर )
असे तूम्हाला करणे जमेल का ? जिथे वळण आहे, जिथे वाट चूकायची शक्यता आहे, त्या जागेचा फोटो काढून तो इथे देता येईल का.
गावात जो वाटाड्या मिळाला, त्याच्या परवानगीने त्याचे नाव व साधारण घराचा पत्ता दिला, तर पुढच्या टिमला त्याचा उपयोग होईल. आणि अर्थातच त्याला चार पैसे मिळतील.
मस्त रे !
मस्त रे !
यो झक्कास वृत्तांत आणि फोटोज
यो झक्कास वृत्तांत आणि फोटोज !
मस्त वृत्तांत. या गडाच्या
मस्त वृत्तांत. या गडाच्या पायथ्याशी बरीच फिरलेय. या डोंगराचा आकार दुरुन फार सुंदर दिसतो.
दिनेशदांनी सुचवलेले बरोबर वाटते आहे.
हबा.. पुढच्यावेळी तुम्ही यावे
हबा.. पुढच्यावेळी तुम्ही यावे म्हणतो >>> कधिही बोलाव!!! मी येईनच?
सगळ्यांना धन्यवाद अगेन
सगळ्यांना धन्यवाद अगेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या ठाणे जिल्ह्याचे खरोखर भूषण आहे हा दुर्जेय किल्ला...>> अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हबा.. वोक्के![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरी.. फिर कभी...
दिनेशदा.. छान सुचवलेत तुम्ही... !!
मी इथूनच छोटी सुरवात करतो..
माहुलीच्या पायथ्याशी आधीच सांगून जेवणनाश्त्याची सोय होउ शकते.. पायथ्याशी असलेल्या महादेव मंदीराच्या बाजूलाच केवळ एकच छोटेस दुकान आहे.. त्यांचा संपर्क.. विकास ठाकरे - मो.नं. ९२०९५२६२६८
माहुली का...जल्ला मागच्या
माहुली का...जल्ला मागच्या वर्षी जानेवारीत भर दुपारी १ वाजता आम्ही चढाईस सुरवात केली आणि ३ तासांचा घामटं काढणारा चढ पार करून एकदाचा माथा गाठला.सुदैवाने त्या वेळी ही गुहे जवळच्या छोट्या कुंडात गारेगार पाणी उपलब्ध होते.वेळे अभावी संपूर्ण माहुली भटकण्याचा बेत रद्द करावा लागला आणि मिट्ट काळोखात परत गड उतरायला सुरवात करावी लागली.पायथ्याच्या मंदीराजवळ पोहचे पर्यंत आम्हा सर्वांचे अवतार अगदी बघण्यासारखे झाले होते.
माहुली किल्ला कोकणातील ठाणे जिल्ह्यात असल्यामुळे येथील दमट हवामानामुळे चढाई करताना खुप दमछाक होते.तसेच चढताना वाटेतले लहान दगड आणि खडी यांच्या मुळे घसरायला पण होते.
आता इतक्या कटु आठवणी
आता इतक्या कटु आठवणी असुनदेखील मी ३० ऑक्टो. ला पुन्हा माहुली करण्याचे ठरवले............आता माहुलीवर जाणे होईल ते दोन ....
.... मानलं तुमच्या ऊत्साहाला,.... छान वृत्तांत आणि फोटोसुध्दा
खुपच सुन्दर.....
खुपच सुन्दर.....:)
आम्ही नववीत असताना गेलो होतो
आम्ही नववीत असताना गेलो होतो माहुली ट्रेकला, त्याच्या आठ्वणी ताज्या झाल्या. मी पार रडकुंडीला आले होते शेवटी शेवटी , पण खुप मजा आली होती.
Pages