दिनांक : २०-८-२००० ठिकाण : कोलेजचा कट्टा.
'आजोबा पर्वत'च्या पहिल्याच ट्रेकला सोलिड मज्जा आली रे. असे अजून काही मस्त ट्रेक्स लवकरच करायला हवेत" मी मित्रांना सांगत होतो. आदल्याच दिवशी केलेल्या आजोबा ट्रेकपासून माझी डोंगरयात्रा नुकतीच सुरू झाली होती. त्या एका दिवसातच सह्याद्रीच्या रांगडया सौंदर्याने इतका भारावलो होतो की आता या सह्ययात्रेमध्ये पुरते विलीन व्हायचे असे मनोमन ठरवले होते. आजोबा ट्रेकवरुन निघतानाच 'पुढचा ट्रेक कधी?' हा प्रश्न विचारून झाला होताच. पुढचा ट्रेक १-२ नाही तर तब्बल ५ दिवसांचा असून दिवाळी दरम्यान आहे असे कळले होते. काही आजोबा ट्रेकमधली टाळकी आणि काही नवीन टाळकी यूनीव्हरसिटीला काका (आमचे ट्रेकिंगचे गुरु) आणि राजेश सोबत भेटून ट्रेकबद्दल पुढे ठरवणार आहेत असे मला अभिजित कडून समजले होते. मी लगेच जायचे ठरवले आणि ट्रेकसाठी नाव नक्की केले.
या ट्रेकसाठी प्लानिंगची जबाबदारी राहुल, शेफाली, सत्यजित आणि हिमांशु यांना दिली गेली होती. ५ दिवसांसाठी लागणाऱ्या जेवणाच्या सामानापासून इतर बारीकसरिक जे काही लागेल त्या सर्व गोष्टींची यादी बनवून ते विकत घेणे, ट्रेक रूट नक्की करणे आणि त्याप्रमाणे वेळेचे गणीत मांडणे अशी बरीच कामे त्यांना करायची होती. महत्वाचे म्हणजे ह्यापैकी कोणीही आधी कधीही अशी प्लानिंग केली नव्हती. तेंव्हा राहुल, शेफाली, सत्या आणि हिमांशु यांच्यासाठी ही एक मोठे मिशन होते. कवीश ह्या ट्रेकचा लीडर असणार होता कारण त्याला १-२ ट्रेक्सचा अनुभव होता. पण तो ट्रेकच्या दुसऱ्या दिवसापासून येणार असल्याने पहिला दिवस हिमांशू लीडर असणार होता. मी त्यावेळी अगदीच नवखा होतो. अखेर सर्व नक्की झाले. २१ ते २६ ऑक्टोबर २००० असा दिवाळीच्या तोंडावरचा ट्रेकचा कालावधी ठरला. ठाणे-मुंबई मधल्या कोलेजेस मधील आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. सोबतीला होते ३ अनुभवी मार्गदर्शक ट्रेकर्स ज्यात काका, राजेश आणि विली यांचा समावेश होता. आमच्या १८ जणांमध्ये कोणालाही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता. तो ही खास करून सह्याद्रित ४-५ दिवस राहण्याचा. ट्रेकचा रूट असणार होता. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़. ट्रेकनंतर आम्ही थेट माळशेज घाटात उतरणार होतो. २० ऑक्टोबर पर्यंत सर्व तयारी झाली होती. आम्ही सर्वजण शनिवारी २१ तारखेला दुपारी ४ च्या आसपास ट्रेनने सी.एस.टी.ला पोचलो आणि आम्ही इगतपुरीला जायच्या गाडीत बसलो. सोबत प्रचंड सामान होते म्हणुन दादर-ठाणे ऐवजी सर्वांनी सरळ सी.एस.टी.ला बसायचे काकाने ठरवले होते. सर्वांशी तोंडओळख झाली. ट्रेनचा प्रवास इगतपुरीच्या दिशेने सुरू झाला आणि आमचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे. कळसूबाई... आजवर ऐकले होते, वाचले होते; पण आता मी स्वतः त्या शिखरावर पाय रोवायला सज्ज होतो. माझा एक अविस्मरणीय असा सह्यप्रवास सुरू झाला होता.
२२ तारखेला पहाटे २ च्या आसपास ट्रेन इगतपुरीला पोचली. आमच्या सकट सर्व सामान धडाधड स्टेशनवर उतरवले गेले. जे सामान झोपेत होते ते सुद्धा. अर्धवट झोपेत आम्ही सर्वजण इगतपुरी स्टेशनच्या बाहेर पडलो आणि S.T. स्टैंडच्या दिशेने चालू लागलो. हवेत गारवा चांगलाच जाणवत होता. (१० वर्षे होत आली राव... त्यावेळी मुंबईमध्ये सुद्धा दिवाळीला थंडी जाणवायची. इगतपुरी तर काय गारेगार होते एकदम.) २० मिनिट्समध्ये स्टैंडला पोचलो. म्हटले आता पहाटेची S.T. असेल तोपर्यंत ज़रा झोप काढुया तर राजेश आणि हिमांशूने सामानाच्या ब्यागा उघडल्या. अंथरायच्या २-३ मोठ्या चादरी पसरून त्यावर हा... सामानाचा ढीग मांडला त्यांनी. उदया येणाऱ्या कवीश आणि प्रवीण या दोघांना सोडून बाकी १६ जणांना ४ ग्रुप्स मध्ये भागून, प्रत्येक ग्रुपवर एका-एका दिवसाच्या जेवणाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. त्याप्रमाणे सामान सुद्धा वाटुन घ्यायचे होते. मी, मनाली, आशिष आणि प्रशांत एका ग्रुपमध्ये होतो. आमच्यावर दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची जबाबदारी आली होती. आमच्या वाटचे सामान उचलले आणि आम्ही चौघांनी वाटुन घेतले. प्रत्येक ग्रुपने तेच केले. कोणा-कोणाकडे काय-काय सामान जाते ही त्याचा लेखा-जोखा शेफाली ठेवत होती. हा सर्व प्रकार उरकेपर्यंत पहाटेचे ४ वाजत आले होते. बाजुला काका आणि विली निवांत झोपले होते.
आम्ही पहाटेच्या पहिल्या पुणे S.T.ने 'बारी'ला उतरणार होतो. बारी म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याचे गाव. गावाकडच्या त्या गारठ्यातून पहाटेच्या प्रहरीच आम्ही बारीकडे निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर अचानक S.T. थांबल्याचा आवाज आला. इतका वेळ मी झोपेतच होतो. 'चला उतरा भरं भरं' काका बोंबा मारत होता. पुन्हा एकदा अर्धवट झोपेमधले सर्व सामान खाली उतरवले गेले. नुकताच सूर्योदय झाला होता. आपल्या आगमनाची द्वाही सुर्याने पसरवली असली तरी 'बारी'वर त्याचे साम्राज्य अजून यायचे होते. दुरवर कळसुबाईच्या शिखरावर पडणारे कोवळे ऊन पाहून मन सुखावून गेले. हिरवागार गालीचा पांघरलेला आई कळसुबाईचा पर्वत दुरूनच मन उल्हासीत करून गेला होता. डोंगराच्या पायथ्यापासून रस्त्याच्या कडेपर्यंत असलेली हिरवीगार भातशेती वाऱ्यावर डुलत होती. उजव्या हाताला बारीमधली जिल्हा परिषदेची शाळा होती. पण आज रविवार असल्याने सर्व शांत-शांत होते तिकडे. नाहीतर गावाकडची शाळा म्हणजे पोरांचा काय तो एकच गलका..
"ते बघा. ते टोक दिसतय एकदम वरचे तिकडे जायचे आहे आपल्याला पुढच्या ५ तासात आणि मग जेवण करून पुढे ते........ तिकडे एकदम डावीकडे 'कुंकवाच्या करंडया'सारखा आकार दिसतोय ना... तिकडे पोचायचे आहे दुपारपर्यंत. आणि मग पलिकडच्या बाजुला उतरायचे शेंडी गावात संध्याकाळपर्यंत. चला आता थोडं दूर मंदीर आहे एक तिकडे जाउन नाश्ता करुया ." काकाने माहिती दिली आणि आम्ही सर्वजण मंदिराच्या दिशेने चालू लागलो. शेताच्या बांधावरुनच वाट पुढे पुढे जात होती. मध्ये एक मोठी विहीर लागली तिकडे सर्वांनी पाणी भरून घेतले. गाव सोडले की कळसुबाईच्या माथ्यावरच्या विहिरीपर्यंत पाणी नाही आहे बरं का. तसा ऑक्टोबरचा महीना सुरू असल्याने डोंगरात अधून-मधून ओहोळ भेटतात पण आपण सुसज्ज असलेलं बरं नाही का. असाच एक मोठा ओहोळ पार करत आम्ही गाव मागे टाकले आणि खऱ्या चढणीला लागलो. पाठीवर असलेल्या सॅक्स आता आपले खरे अस्तित्व जाणवून द्यायला लागल्या होत्या. माझ्या आणि सत्याच्या पाठीवर तर युटेंसिल म्हणजे भांडयानी भरलेल्या सॅक्स होत्या. किमान १२-१५ किलोचे वजन नक्की होते. शिवाय आमचे स्वतःचे सामान वगैरे होते ते निराळेच. त्या सॅक्स घेउन शेताच्या बांधावरुनच वाट काढताना, अधून-मधून येणारे ओहोळ पार करताना आम्हाला कसरत करावी लागत होती. शहरात रस्त्यावरुन चालणे आणि डोंगरातल्या मळलेल्या वाटेवरुन चालणे यातला फरक नेमका समजत होता. अगदी पहिल्या क्षणापासून नवीन नवीन अनुभव आम्ही घेत होतो. अखेर ४०-४५ मिं. मध्ये थोड़े वर चढत आम्ही त्या मंदिरापाशी पोचलो.
चुलीवर बनवलेला चहा, पार्ले-जी आणि सोबत ब्रेड-बटर-जाम असा नाश्त्याला मेनू होता. आमच्यापैकी कोणीच ह्याआधी 'चुल' ह्या प्रकारासोबत मारामारी केली नव्हती. आता मात्र पुढचे ४-५ दिवस चहा काय सर्व जेवण सुद्धा चुलीवर बनवून खायचे म्हटल्यावर शिकणे क्रमप्राप्त होते. त्यात इकडे काका , विल्या, राजेश होते ज्यांना 'चुल' येत असून सुद्धा आमची मज्जा बघत बाजूला चहासाठी नारे देत बसले होते. शेवटी काका पेटायच्या आधी अखेर महत्प्रयासाने ती चुल पेटली. पण त्याआधी राहुलने मारलेल्या जोरदार फूंकीमुळे डोळ्यात धूळ गेलेले ४ जण पेटले होते. शेवटचा एकदाचा तो चहा झाला आणि नाश्ता करून ४० मिं.च्या ब्रेक ऐवजी दिड तासाचा 'एक्स्टेंडेड ब्रेक' घेत, ट्रेकच्या पहिल्याच दिवशी वेळेचा घोळ घालत आम्ही पुढे निघालो.
कळसुबाईच्या माथ्याला जाणारी वाट ह्या मंदिराच्या मागुन वर चढ़ते. वाट एकदम स्पष्ट आहे. कुठेही चुकायचा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो फ़क्त थकायचा. १५-२० मिं. चढून जातो न जातो ते आम्ही काहीजण त्या जड़ सॅक्स सकट खाली बसलो. इतके वजन घेउन 'अगेन्स्ट ग्राव्हिटी' चढायचे म्हणजे काय सोपे काम आहे का? ('खायचे काम आहे का' असे मी म्हणत नाही कारण खायचे काम सुद्धा काही सोपे नाही असे माझे ठाम मत आहे.. :D) आशिष, अभिषेक, संतोष, सुरेश, प्रशांत आणि त्या सर्वांसोबत 'द दीप्ती बावा' अक्षरश: पळत पुढे गेले होते. अंगात एखादी विरश्री संचारते ना तसे. आम्ही सर्व मध्ये होतो तर सर्वात मागे शेफाली, हर्षद-जाड्या आणि हिमांशु हे काका सोबत होते. थोडा आराम करून पुढे निघालो. आता कुठे थांबायचे नाही, थकलो तर स्पीड स्लो करायचा पण बसायचे नाही असे आम्ही ठरवले होते. ८:३० वाजता मंदिरामधुन निघलेलो आम्ही १०:३० वाजले तरी कळसुबाईच्या लोखंडी शिडया पार करत आगेकूच करतच होतो. ह्या मार्गावर एकुण ३ लोखंडी शिडया आहेत. दुसरी शिडी पार केल्यावर मात्र आम्ही थोड़े थांबायचे ठरवले. सत्या आणि माझे खांदे त्या सॅक्स उचलून भरून आले होते. इतक्यात 'टाण'कन आवाज आला. मी मागे वळून बघतो तरं... सत्याने एका दगडावर बसकण मारली होती. त्याच्या पाठीवरची सॅक बाजूला पडली होती. "काय रे काय झाले? आवाज कसला आला?" मी विचारले. सत्या शांतपणे बोलला,"काय नाय रे. सॅकचा वेस्ट आणि चेस्ट स्ट्रप उघडला तशी वजनाने मागे गेली आणि आपटली दगडावर. आतल्या भांडयाचा आवाज आला असेल." ती सॅक इतक्या जोरात आपटली दगडावर की आतल्या मोठ्या टोपाची कड वाकली होती आणि सॅक खालून थोड़ी फाटली सुद्धा होती. मी म्हटले,"केलास पराक्रम. आता खा शिव्या. इतका दमला असशील तर दे दुसऱ्या कोणाला ती सॅक" पण सत्या काही मानला नाही. वरपर्यंत ही सॅक मीच घेउन जाणार हा त्याचा निर्धार होता. आम्ही पुढे निघालो. तीसरी शिडी पार करून माथ्यावरच्या मोठ्या प्रस्तराखाली पोचलो. समोरच विहीर होती. पोहऱ्याने पाणी काढले आणि फ्रेश झालो. ११ वाजत आले होते. एव्हाना इकडून निघायचे होते. आम्ही तासभर मागे पडलो होतो आमच्या टाइमटेबलच्या.
कळसुबाईच्या माथ्यावरचा मोठा प्रस्तर आधी चढून जायला लागायचा. आता मात्र तिकडे लोखंडी शिडी लावली आहे. अगदीच खाज असेल अंगात तर डाव्या बाजुच्या जुन्या मार्गाने साखळी पकडून वर चढून जाता येते. आम्ही मात्र नवखे ट्रेकर्स असल्याने अजून ती तशी खाज उत्पन्न झालेली नव्हती तेंव्हा आम्ही धोपटमार्गाने देवीच्या दर्शनाला माथ्यावर पोचलो. माथ्यावरील मंदिर एकदम लहान आहे. छपरासकट संपूर्ण बांधकाम दगडी आहे. उंची फार तर ४-५ फुट उंच असेल. तेंव्हा आपण आत नाही जाऊ शकत. देवीचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरुन सभोवतालचा तो नयनरम्य परिसर न्याहाळला. अहाहा... काय वर्णावे... समोरच विहंगम भंडारदरा जलाशय पसरला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला रतनगड़ आणि कात्राबाईचे जंगल दिसत होते. अग्निबाण सुळका आणि त्या पुढचा 'आजोबाचा डोंगर' म्हणत होता. "काय विसरला नाही ना आम्हाला? इकडेच होतात २ महिन्यापूर्वी." दुसऱ्या बाजुला सह्याद्रीमधली सर्वात कठीण चढ़ाई समजली जाणारी त्रिकुटे दिसत होती. अलंग-मदन-कुलंग. ज्या बाजूने वर चढून आलो तिकडे छोटूसे बारी गाव दिसत होते. भाताची ती शेतं आता छोटी-छोटी खाचरे भासत होती. ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले.
"खेच.. खेच.. हां जोरात.. शाब्बास... सही रे. " जोरात आवाज येत होते. बघतो तर काय... अभिषेक आणि संतोष, दोघेही शक्ती प्रदर्शन करत लटकवलेली ती लोखंडी साखळी वर ओढत होते. इतक्यात मागुन काका आला आणि त्याना आर्नोल्ड आणि सिल्वेस्टरचा किताब देत, शिव्या घालत म्हणाला,"चला आता. उशीर झालाय आपल्याला आधीच. जेवण बनवायचे आहे ना?" आम्ही मग पुन्हा ती लोखंडी शिडी उतरत विहिरीपाशी आलो आणि एका बाजूला पुन्हा एकदा 'चुल' प्रकरण सुरू झाले. १२ वाजत आले होते आणि अजून उशीर होऊ नये म्हणुन काकाने राजेशला थोड़े लक्ष्य द्यायला सांगितले होते. सर्वांकडे असलेल पाणी वापरून भात शिजवला आणि फटाफट खिचडी भात तयार. जेवण आटोपले आणि भांडी घासून पुन्हा सर्व पाकिंग केली. जेवण होईस्तोवर विहिरीवर जाउन पुढच्या मार्गासाठी पाणी भरून आणावे म्हटले तर पोहरा गायब. मग मी आणि आशिषने बाजुच्या झाड़ीमधून काही मोठी पाने तोडली आणि दगडांवरुन पडणाऱ्या पाण्याखाली लावून पाण्याच्या बाटल्या भरल्या. डोंगरात कसे रहायचे याचे एक-एक मस्त अनुभव मिळत होते आम्हाला.
सर्वांचे आवरले तसे विल्याने त्याची सॅक पाठीवर मारली आणि पहिल्या टिम बरोबर तो पुढे निघाला. विहिरीवरुन आल्यावाटेने थोडेसे खाली उतरले की एक वाट उजव्या हाताला झाडीत शिरते. ह्या वाटेने 'कुंकवाच्या करंडया'कडे आणि तिकडून पुढे पलिकडे जाउन शेंडी गावत उतरता येते. तासाभारत आम्ही करंडयाच्या खाली होतो. इकडून आता फार तर २ तासात आम्ही खाली पोचू असा आमचा समज होता. कारण चढून यायला फार तर ३ तास लागले होते. मोठ्या मोठ्या सॅक घेउन उतरायला सुरवात केली तसे समजुन आले की डोंगर चढण्यापेक्षा उतरणे जास्त अवघड आहे. आमच्या म्हणजे मधल्या टीमचा स्पीड मंदावला होता. मी, सत्या, सुमेधा, मनाली, अभिजित एकत्र पुढे जात होतो. राजेश आमच्या सोबतीने होताच. सर्वात पुढची टीम विलीबरोबर सुसाट पुढे निघून गेली होते. तर काका मागे होता. त्याच्याबरोबर जाड्या, पायाला ब्लिस्टर्स आलेला हिमांशु आणि शेफाली होते. त्यांचा स्पीड हिमांशुमुळे कमालीचा कमी होता. अचानक २-३ तासाच्या अंतराला ५-६ तास लागणार की काय अशी वाट सुरू झाली. मोठे-मोठे प्रस्तर आणि त्यात वाट कुठेच नाही. अंदाजाने पुढे जायचे. विल्याने काही ठिकाणी मार्कर्स बनवले होते ते दिसले की आम्हाला समजायचे की हां... अजून योग्य वाटेवर आहोत. एका मागुन एक डोंगर सोंडा पार करत आम्ही शेंडीच्या दिशेने खाली उतरत होतो. सूर्य कलायला लागला होता तरी वाट संपत नव्हती. आता अंधार पडत आला होता आणि आम्ही गावाच्या अगदीच जवळ पोचलो होतो. काही मिं. मध्ये टोर्च लागणार म्हणुन सर्वांनी टोर्च बाहेर काढले. काका, जाड्या, हिमांशु अजून किती मागे होते ते कळायला मार्ग नव्हता.
पूर्ण अंधार पडला तसा मागुन टोर्चचा झोत यायला लागला. मागची मंडळी बरीच मागे आहेत अजून ही आम्हाला समजले तर आमच्या टोर्च लाइट वरुन पुढच्या टीमला आम्ही जवळ पोचलो आहोत हे सुद्धा समजुन आले. बघतो तर पुढे फ़क्त प्रशांत आणि सुरेश. राजेशने विचारले,"काय रे, बाकी कुठे आहेत?" "माहीत नाही. आम्ही रस्ता चुकलो होतो. गावातल्या एका मुलाने इथपर्यंत आणून सोडले." - प्रशांत उवाच. आपल्याला वाट सापडली यापेक्षा आपण कोणाला तरी सापडलो ह्याचे त्या दोघांना हायसे वाटत होते. त्यांना घेउन आम्ही सर्व पुढे निघालो. १०-१५ मिं. मध्येच विली अणि बाकी काहिजण रस्तावर उभे असलेले दिसले. बाजूला एक ट्रक सुद्धा होता. गावत जाउन विल्या तो घेउन आला होता. त्यात बसून आता पुढचे २०-३० मिं. चे डांबरी अंतर कापायचे होते. आमच्या तासभर मागाहून काका शेवटच्या ३ जणांना घेउन पोचला तेंव्हा ९ वाजून गेले होते.
चालून दमलेले आणि भूका लागलेले आम्ही सर्वजण त्या ट्रकमध्ये बसलो आणि शेंडी गावाकडे निघालो. अजून सुधा उत्साह गेला नव्हता मग गाणी सुरू झाली. ती म्हणता-म्हणता गावात पोचलो कधी ते कळले सुद्धा नाही. गावातच शाळा होती. गावातील मंदिर, शाळा म्हणजे ट्रेकर्सचे हक्काचे घर. सामान टाकले आणि जेवायला जवळच्या एका होटेलमध्ये गेलो. जेवत असतानाच मस्त गप्पा सुरू होत्या. इतक्यात रात्रीच्या शेवटच्या गाडीने कवीश आणि प्रवीण सुद्धा येउन पोचले. आज पहिल्याच दिवशी काय एक-सो-एक प्रकार घडले होते. कळसुबाईच्या अनुभवाबरोबरच... डोंगरात चुलीवर जेवण बनवणे, रस्ते शोधणे, पानावरुन पाणी ज़मा करणे... आज हे सर्व इतके मजेशीर वाटते आहे.. पण त्या दिवशी ते अनुभवणे हिच एक मजा होती.
११ वाजत आले तसे दुसऱ्या दिवशीच्या अमृतेश्वर - रतनवाडी आणि रतनगड़बद्दल विचार करत आम्ही झोपी गेलो. बघुया उदया आता काय काय नवे अनुभव येतात याचा विचार करत...
आपल्याला वाट सापडली यापेक्षा
आपल्याला वाट सापडली यापेक्षा आपण कोणाला तरी सापडलो ह्याचे त्या दोघांना हायसे वाटत होते. <<< खरचं रोहन, ट्रेकिंगचे क्लास अनुभव लिहिले आहेस रे.. मान गये उस्ताद
भटकत रहा अन लिहित रहा..
जगसफरीच स्वप्नं पाहीलं असेल तर ते पुर्ण होवो हि इच्छा !
आडो ला अनुमोदन.. रोह्या.. ह्याचे फोटो हवेच रे.. कॉलेजच्या जमान्यातले फोटू अन तुमचा जोश खरचं खतरनाक असेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चांगलं लिहिलंयस भटक्या, फोटो
चांगलं लिहिलंयस भटक्या, फोटो नाहीत कां?
खरंच मस्त लिहिलंय
खरंच मस्त लिहिलंय भटक्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आडोला अनुमोदन. फोटो टाकच
छान लिहिलंयस. पण फोटो हवे
छान लिहिलंयस. पण फोटो हवे होते रे. असतील अजून तुझ्याकडे तर जरुर टाक इथे.
हया ट्रेकचे फ़ारसे फोटो उपलब्ध
हया ट्रेकचे फ़ारसे फोटो उपलब्ध नाहीत.
आहेत २-४ ते पुढच्या भागात टाकतो.
खुप छान , आज वेळ मिळाला
खुप छान , आज वेळ मिळाला वाचायला .:स्मित:
मस्त लिहीलयस !!
मस्त लिहीलयस !!