नमस्कार नमस्ते

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. नोबेल पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते दिले जाते. ही गोष्ट आहे अशाच एका नोबेल विजेत्या अमेरिकन शास्त्रज्ञाची. बरेच दिवस लोटलेत हे वाचून, मला आता त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याचे विज्ञानातले गाव काहीच आठवत नाही. तर त्या समारंभात विजेत्यांना राजाशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळते. पाश्चात्य संस्कृतीत हा बहुमान समजला जातो. हस्तांदोलन म्हणजे केवळ 'पाश्चात्य नमस्कार' एवढाच अर्थ नाहीये. तो नमस्कार कोणात घडावा यालाही काही शिष्टाचार आहेत. शिष्टाचार असं सांगतो की हस्तांदोलनाचा सूचितार्थ म्हणजे हात मिळवणारे दोघे एका सामाजिक स्तरावर आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य देशांतील शाही लोकांशी हस्तांदोलन याचा अर्थ तो राजा/राणी तुम्हाला त्यांच्या पातळीवरचे समजतात असा होतो अन् तो बहुमान समजला जातो. जर तुमची भेट अशा कोण्या राजा/राणीशी होणार असेल तर शिष्टाचार अधिकारी तुम्हाला आधीच सूचना देतात, कसे बोला, कसा नमस्कार करा (म्हणजे हात मिळवायचे की वाकायचे वगैरे) इ. हात मिळवायला कोणीही, राजा असो वा रंक, नकार दिला तर तो तुमचा पाणउतारा समजला जातो. हात मिळवायचे असतील तर ते पूर्णतः राजाच्या इच्छेवर असते, राजाची तयारी नसेल आणि तरी तुम्ही हात पुढे केला तर ते हस्तांदोलन नाकरले जाऊ शकते आणि ती मोठी नामुष्की समजली जाते. अर्थात, यात काही नवीन नाही म्हणा. आपल्याकडेही नमस्काराला प्रतिसाद न देणे अपमानास्पद समजले जाते.

तर तो शास्त्रज्ञ... तिथे समारंभात स्वीडनच्या राजाने प्रथेप्रमाणे त्याच्याशी हात मिळवले. पुढे काही काळाने हाच राजा अमेरिकेच्या वारीला आला होता. तेव्हा परत या शास्त्रज्ञाची त्याच्याशी भेट होण्याचा योग आला. ही भेट बहुधा थोडी अनपेक्षित असावी, पूर्वनियोजित असावी. असं वाटण्याचं कारण पुढे स्पष्ट होइल. जेव्हा हा माणूस त्या राजासमोर आला, राजाला त्याची ओळख करून देण्यात आली, नोबेल विजेता वगैरे. या शास्त्रज्ञाला वाटले की आता हस्तांदोलन होईल. राजाने एकदा आपल्याशी हस्तांदोलन केले आहे तेव्हा आता हरकत नसावी अन् त्याने हात पुढे केला की... राजाने त्या शास्त्रज्ञाचा पुढे आलेला हात पाहिला आणि तो नजर रोखून थंड सुरात म्हणाला, "Once is enough." एवढे बोलून राजा पुढच्या माणसाकडे वळला. शास्त्रज्ञ अवाक्. तेव्हा कुठे त्याला कळले की राजाशी हात मिळवणे हा बहुमान वारंवार मिळत नसतो अन् तेव्हा जरी त्या विजेत्यांशी हात मिळवायला राजा स्वतःची पायरी उतरून खाली आला, तरी त्या विजेत्यांनी मात्र नेहमी स्वतःची पायरी ओळखून वागणे अपेक्षित आहे. ही घटना वर्णन करून झाल्यावर लेखकाने हस्तांदोलनावर थोडा ऊहापोह केला होता आणि तो मला या घटनेपेक्षाही रोचक वाटतो. हस्तांदोलनाचे मूळ काय असेल हा विचार केला तर काही अनपेक्षित पैलू समोर येतात. मी जेव्हा एखाद्याबरोबर हात मिळवतो तेव्हा आम्ही दोघे खरे काय करत आहोत ? आम्ही दोघं एकमेकांना हे दाखवून देत आहोत की आमचे हात रिकामे आहेत, आमच्या हातात काही नाही विशेषतः कोणतेही शस्त्र वा हत्यार. समोरच्या माणसाने हातात काही हत्यार लपवून दगाफटका करू नये म्हणून घेतली गेलेली काळजी... खरंच हा विचार असेल का त्यामागे ? माहिती नाही, पण शक्यता नक्कीच आहे. द्वंद्व खेळण्याआधीसुद्धा हात मिळवतात. जरी ते दोघं एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करणार असले तरी आधी हस्तांदोलन करतात. का ? ते खिलाडूवृत्ती वगैरे असेलही, पण त्याशिवाय जास्तीचे हत्यार हातात लपवण्याची लबाडी करू नये यासाठीसुद्धा असेल का ? गंमत म्हणजे नमस्कार करण्याच्या बर्‍याच पद्धती या कसोटीवर उतरतात. भारतीयांचा छातीपाशी पंजे जुळवून केलेला नमस्कार असो, हाताची उथळ ओंजळ करून मान थोडीशी लववून बोटांची टोके कपाळाला लावली न लावलीसं करून केलेला आदाब अथवा अस्सलाम आलेकुम असो किंवा अगदी पौर्वात्यांचा वाकून केलेला नमस्कार असो... Enter The Dragon मधलं सुरुवातीचच दृष्य आहे, ब्रुस ली एका विद्यार्थ्याला शिकवतोय. शिकवणी संपल्यावर प्रथेप्रमाणे गुरु-शिष्य एकमेकांना वाकून वंदन करतात... अन् विद्यार्थाला ब्रुसची जोरदार टप्पल मिळते आणि त्याचबरोबर 'वाकून नमस्कार करतानासुद्धा समोरच्या माणसावरची, विशेषतः प्रतिस्पर्ध्यावरची नजर ढळू देऊ नकोस' हा धडासुद्धा. हे वाकून केलेलं वंदनसुद्धा बघा कसे आहे... हात सरळसोट खाली सोडलेले शरीराला चिकटून असतात. अर्थात, त्यातही कोणासमोर किती वाकावे याला शिष्टाचार आहेतच. कुंग फू सिनेमांमध्ये दिसणारा अजून एक प्रकार म्हणजे उजवा पंजा पूर्ण सरळ, बोटे आकाशाच्या दिशेने अन् फक्त अंगठ्याची बाजू छातीला लागेल (गणिती भाषेत सांगायचे झाले तर, पंजा हा छातीच्या प्रतलाला लंब अन् प्रत्येक बोट आपल्या देहाला समांतर) असं धरायचा. जिम कॉर्बेटच्या 'माय इंडिया' पुस्तकात गढवाल, कुमाऊ भागात हात कोपराला लावून नमस्कार करण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे.
मध्यपूर्वेत आणि युरोपमध्येसुद्धा आलटून पालटून तीन वेळा एकमेकांच्या गालाला गाल लावण्याची पद्धत आहे. मध्यपूर्वेत हे दोन पुरुषांमध्येसुद्धा होते, युरोपमध्ये मात्र हे बहुधा पुरुष-स्त्री, स्त्री-स्त्री असं होतं असं वाटतं. हा सर्वात रोमॅंटिक आणि रोमांचक 'हाय, हॅलो' आहे, त्यामानाने आपला नमस्कार भलताच कोरडा वाटतो. अशा कोरड्या नमस्काराची सवय असलेल्या मला जेव्हा पहिल्यांदा एका स्पॅनिश मुलीने या पद्धतीने हाय केले तेव्हा मला झालेला हाय अजूनही आठवतोय. हा प्रकार वेगळाच आहे, तो वरच्या कसोटीत पूर्ण उतरत नाही असं कोणी म्हणेलही, पण काही ओळख नसताना गालाला गाल लाऊ शकणार्‍यावर वार वगैरे करावा असं कोणाला वाटेल ??!! या कृतीने पूर्ण नि:शस्त्र न होणारा कोणीही माणूस नव्हेच.
आता या पार्श्वभूमीवर हस्तांदोलनाची अजून एक खोच जाणवते. एकदा हात मिळवून जर हातात काही नाही याची खात्री झाली, समोरचा 'दोस्तीतला' आहे हे समजले, ठिक आहे. जर एकदा ही खात्री झाली असेल तर प्रत्येक वेळी भेटल्यावर हात मिळवणे हे समोरच्यावर अविश्वास दाखवणे आहे, नाही का? त्यात तो अविश्वास राजासारख्या माणसावर दाखवला तर..... 'once is enough' यातून 'असा अविश्वास "माझ्यावर" दाखवण्याची गरज नाही' हेसुद्धा सांगायचं आहे.

आपला नमस्ते 'त्या मानाने' थोडा कोरडा वाटला तरी त्याचेही एक मर्म आहे. नम् या संस्कृत धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते, म्हणजे ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती... गणेशाय, शिवाय ही सर्व गणेश, शिव या शब्दांची चतुर्थी विभक्तीची एकवचनी रुपे. नमस्ते = नमः + ते. यातले 'ते' हे त्वम् या सर्वनामाचे चतुर्थीशिवाय द्वितीया आणि षष्ठीचेही रूप आहे. 'ते' हे षष्ठी रूपात घेतले तर त्याचा अर्थ 'तुझा, तुझी, तुझे, तुझ्या' असा होतो. तेव्हा नमस्ते हा केवळ तुला नमस्कार नसून 'तुझ्या (देवत्वाला, ईशतत्वाला) नमस्कार' आहे. 'ईश्वर चराचरात आहे' हा विचार या संस्कृतीत किती खोलवर रूजला आहे याची साक्ष इथे पटते.

शेवटी असंय की नमस्कार हा नुस्ता विधी नाही, ती एक घटना आहे. माणसं एकत्र येऊन समूहात राहू लागली तेव्हा अनोळखी माणसाबद्दलची भीती तर असेलच, पण एकत्र राहणं खरोखर यशस्वी होण्यासाठी ते मुळीच पुरेसं नाही... तिथे आदर, आपुलकी या भावना असणे आणि ते व्यक्त होणेही खूप महत्वाचे ठरले. एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसाविषयी आदर व्यक्त करणे हे समाजधारणेसाठी आवश्यकच आहे. एखादा नवा माणूस समूहात आला तर त्याच्या मनात 'आपल्याला इथे स्विकारले जाईल' ही आशा निर्माण होणेही केवढे आवश्यक आहे, तशी आशा या नमस्कारांमुळे निर्माण झालीच असेल ना ? पद्धती अनेक आहेत, पण त्या प्रत्येक पद्धतीला हे सर्व पैलू आहेत. म्हणून मी 'घटना' म्हणतो अन् ही काय जबरदस्त घटना आहे ! त्यामागचं मंथन अचंबित करणारं आहे. कोणी हे शोधून काढले ? काय विचार असेल ? रामदासांनी 'राम राम' म्हणण्याचा पायंडा पाडला असं एकदा वाचनात आलं होतं. त्या काळाचा विचार केला तर असा पायंडा पाडण्यामागे केवढा खोल विचार असेल याची कल्पना येईल. कदाचित बर्‍याचशा पद्धती कोण्या एकाच्या डोक्यातून नसतील निघाल्या अन् तसे जर असेल तर माणसांनी एकत्र राहताना, किंबहुना, एकत्र राहण्यासाठी किती विस्तृत पातळीवर गोष्टी केल्यात हे ध्यानात येते आणि अगदी थक्क थक्क व्हायला होतं.

आपल्याकडे 'भेट झाली, नमस्कार चमत्कार झाले' असं म्हणायची एक पद्धत आहे. पूर्वी मला वाटायचं की हे यमक चांगलं जुळवलंय, फारतर एखादी लोककथा असेल या शब्दप्रयोगामागे. असेलही. पण आता वाटतं, नमस्कार या साध्यासुध्या वाटणार्‍या गोष्टीमागे इतकं काही आहे की खुद्द नमस्कार हाच माणसाने घडवलेला चमत्कार आहे याकडे तर लक्ष वेधायचं नसेल ना?!

प्रकार: 

नमस्कार स्लार्टी, काहीतरी वेगळं आणि चांगलं वाचायला मिळालं. ह्याचाच पुढील भाग म्हणजे नमस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यामागचा उद्देश ह्यावर पण खरचं तू किंवा इतर जाणकारांनी लिहायला हवं. दसर्‍याच्या दिवशी छातीला छाती लावून नमस्कार करण्याची पुरुषांची एक पद्धत मी पाहिली आहे विदर्भात. त्यानंतर मराठी बायका तीन वेळा जोडलेला हात पायाजवळ वरखाली करतात तीही एक वेगळी पद्धत आहे नमस्काराची. दाक्षिणात्य स्त्री पुरुष पायावर लोटांगण घेतात आणि त्यांचा हात कोपरात वाकून नाहीतर तो संपूर्ण सरळ करून ते नमस्कार करतात. असो.. लिहित रहा..

खुप छान आणि वेगळं काहितरी.
हात मिळवल्यावर तोच हात आपल्या छातीला डाव्या बाजुला लावणे.( पाकिस्तानी बहुदा असे करत ) थेट पायाला स्पर्श करुन केलेला नमस्कार. (हा खास परिक्षेआधी आपण करतो ) गुडघ्याच्या खाली दोन्ही हाताने स्पर्श करुन नमस्कार ( हा मी जैन लग्नात बघितला होता ). पायाची धूळ डोक्याला लावण्यासारखा प्रकार (बंगाली पद्धत ) कांदेपोहे कार्यक्रमात मुलीने केलेला सार्वजनिक नमस्कार ( जून्या नाटक सिनेमात हा दिसायचा ) असे अनेक प्रकार आठवले.

छान लिहिलंय स्लार्ती! Happy

स्लार्टी छानच. तुझी लिहीण्याची शैली नेहेमीच मुद्देसुद आणि तार्कीक असते. आणि मनुष्या, तुला किती विषयांमध्ये गती आहे.. थक्क आहेस तू..

वेगळ्या विषयावर चांगला लेख आहे स्लार्ती.
एक इंग्लिश पुस्तक आहे 'जेस्चर्स' नावाचं. वाचलं नसेल तर जरूर वाचा.

धन्यवाद.
जेस्चर्स interesting दिसते. बघतो इथं कुठे मिळतंय का ते. टण्या, तू उत्तरार्ध कधी लिहीतोयस ?

*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***

लवकरच सुरुवात करतो लिहायला.. गेले २ महिने कामात आकंठ बुडालो होतो.. असो..

तिकडे देवाच्या बाफ वर ये.. च्यायला चांगल्या पोस्ट टाकतोय.. किमान मुद्देसुद चर्चा होईल असे दिसतेय..

हो, ते वाचतोय मी. तो सविस्तर लिहीणार आहे असे दिसते, तसे झाले तर चांगले आहे.

*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***

सुरेख... टण्याला अनुमोदन... तुमचे सगळेच लिखाण वाचण्याजोगे असते.
-प्रिन्सेस...

छान लिहिलय!!बरं या राजाचे कर्तुत्व काय्???काय अपमानास्पद वाटल असेल त्या शास्त्रज्ञाला!!!!माझ्यामते आपल्याकडच्या नमस्कारात आदर दाखवला जातो. हस्तांदोलनामागचे कारण संरक्षणासाठी नसावे( एका अर्मेनियननी माझ्या मित्राला हस्तांदोलनातुन खिळा का काहीतरी घुसवुन तळहाताला ईजा केली होती,आम्ही पोलिसांना बोलावतो म्हटल्यावर सर्व काळे केसवाले जमा होउन माफी मागु लागले)

स्लार्टी - मस्तच. त्यात कोपर्या पासुन केलेला नमस्कार नाही टाकलास?

धन्यवाद सर्वांना.
तशा पद्धती तर असंख्यच आहेत म्हणा. मला जास्त रस आहे औपचारिक पद्धतीच्या नमस्कारांमध्ये म्हणून त्यांची काही उदाहरणे घेतली. सर्वसाधारणपणे, आपण जिव्हाळा दाखवणारे नमस्कार (गळाभेट वगैरे) पहिल्याच भेटीत करत नाही.
आदर हा सद्गुण आहे म्हणून तो आवश्यक ठरला असं मला वाटत नाही. उलट, तो आवश्यक आहे म्हणून सद्गुण ठरला. त्यात स्वतःला vulnerable करणे हा एक महत्वाचा भाग आहे. समान स्तरावरच्या दोन व्यक्तींमध्ये हे दोघांनाही करावे लागते, भिन्न स्तरावरच्या दोन व्यक्तींमध्ये खालच्या स्तरावरच्या व्यक्तीला करावं लागतं जेणेकरून दुसर्‍या व्यक्तीचं श्रेष्ठत्व मी मान्य करतोय हे दाखवलं जातं. हा खूपच आदिम पैलू झाला. अतिशय गुंतागुंतीच्या समाजरचनेत याला अनेक भिन्न कंगोरे प्राप्त झाले. कोपरापासूनचा नमस्कार हे तर उत्तम उदाहरण आहे कंगोर्‍यांचं :). शिवाय काळाचे संदर्भ लक्षात घ्यावेच लागतील. आता काय, हात हातात मिळवताना खूनही करणे शक्य आहे, केलाही जातो, किंवा आस्तिक/नास्तिक सर्वच जण 'नमस्कार' म्हणतात, त्याचे विश्लेषण करताना सद्यकालाबरोबर ऐतिहासिक, समाजशास्त्रीय पार्श्वभूमीचाही विचार आवश्यक आहे. असो.
परत एकदा सर्वांना धन्यवाद.

*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

चांगलं लिहीलंय.

क्षणभर तुचं परत आलास असे वाटले.>>>
अगदी अगदी बी. शीर्षकापुढे 'नवीन' नाहीये, हे नंतर लक्षात आलं. Sad

स्लार्टी,
छान माहिती आणि मस्त लिहलंय.

मला माहित (ऐकुण असलेलो) असलेलं सांगतो. हस्तालोंदन करताना आपल्या मधील सर्व पॉसिटीव्ह एनर्झी ( मराठी शब्द माहीत नाही) आपण समोर च्या माणसाला देतो, म्हणुन आपण करतो ते नमस्कार योग्य आहे.

मस्त

रोचक लेख!

===
> ( एका अर्मेनियननी माझ्या मित्राला हस्तांदोलनातुन खिळा का काहीतरी घुसवुन तळहाताला ईजा केली होती,आम्ही पोलिसांना बोलावतो म्हटल्यावर सर्व काळे केसवाले जमा होउन माफी मागु लागले) > अरे बापरे
Uhoh