अवघी विठाई माझी (१६) - सुकुमा विकी
सुकुमा विकी हा किस्वाहिली (युगांडा, केनिया आणि टांझानिया ची भाषा ) भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ, आठवडा ढकला.
आता असे नाव एखाद्या भाजीला देण्याचे कारण वेगळेच आहे. निसर्गाने भरपूर दिले असले तरी, पूर्व आफ्रिकेतील, लोकांच्या अंगात आळस पण भरपूर आहे. शिवाय असतील नसतील ते पैसे, आठवडा अखेर खर्च करुन, बाकिचे दिवस कसेबसे ढकलायचे, हि वृत्ती.
तर आठवडाअखेर भरपूर दारु ढोसून, मैजमजा करुन, बाकिचे दिवस ढकलण्यासाठी, त्यांना ही भाजी उपयोगी पडते. हि भाजी तशी आहे ब्रासिका कूळातलीच, पण कोबी प्रमाणे, याचा गड्डा तयार होत नाही, उंच मजबूत देठाला, वरती हि निळसर हिरव्या रंगांची फूटभर लांबीची पाने लागतात. पाने जरा जाडच असतात. (हा देठही तसा मजबूत असतो. त्यापासून चक्क वॉकींग स्टीक करता येते, आणि या भाजीला तेही नाव आहे.)
या देशांतील गृहिणी, टिचभर जागा मिळाली तरी, या भाजीची लागवड करणारच (त्याचा पण फोटो मग टाकतो.) या भाजीची आठ दहा पाने मिळाली (त्यांच्या क्षमतेप्रमाणे, आपले पोट दोन तीन पानांतच भरेल )
तरी तिचा दिवस साजरा होतो.
असलाच तर एखादा कांदा, असलाच तर एखादा टोमॅटो आणि थोडेसे मीठ टाकून हि पाने बारिक चिरुन शिजवली कि झाले. पाने जरा शिजायला कठीण असल्याने, बारिक चिरावी लागतात, व बराच वेळ शिजवावी लागतात. अशी शिजवलेली भाजी मी अर्थातच खाल्ली आहे. पण आपल्या जिभेला रुचण्यासाठी मी जरा वेगळा प्रकार केला.
तूरीची डाळ अर्धा तास भिजवून घेतली. फोडणीला सांडगी मिरच्या कूस्करुन घातल्या. हळद हिंग टाकून, बारिक चिरलेली सुकुमा विकी ची पाने परतून घेतली. मग तूरीची डाळ, मीठ घालून कूकरमधे १० मिनिटे शिजवून घेतली.
सोबत आहे ती उगाली. उगाली हा पण पुर्व आफ्रिकेतील लोकांचा मुख्य आहार. उंगा म्हणजे पिठ. आणि उगाली म्हणजे पिठाची उकड. यासाठी मक्याचे जाडसर पिठ ते वापरतात. पाण्याला उकळी आणून त्यात हे पिठ शिवरले, कि दोन मिनिटात ते शिजते. आशियाई लोकांच्या संगतीने ते आता त्यात जिरे व मीठ वगैरे वापरु लागले आहेत. यात पाण्याचे प्रमाण असे काही ठरलेले नाही, उपलब्ध पिठ किती आहे, आणि खाणारी तोंडे किती आहेत, त्यावर ते ठरते (एकावेळी २ किलो पिठाची उगाली खाणे, त्यांना कठीण जात नाही.)
या भाजीत क जीवनस्त्व असतेच. पण क जीवनसत्व शिजवल्यावर नष्ट होत असल्याने, मी सोबत (गुलाबी रंगाचे दिसताहेत ते ) मबूयू पिलिपिलि घेतले आहे. पिलिपिलि म्हणजे तिखट. (चिकन पिरिपिरि मधल्या पिरिपिरि चा उगम हा आहे ) आणि मबूयू म्हणजे बाओबाब झाडाच्या बिया, बाओबाब हे आफ्रिकेतील लोकजीवनात मानाचे स्थान असलेले झाड आहे. आपल्याकडे ते गोरखचिंच म्हणून ओळखले जाते. त्याला दूधीभोपळ्याच्या आकाराची फळे लागतात. आतला गर आंबटगोड आणि पिठूळ असतो. या वरच्या फोटोतल्या बियांना चिमूटभर लाल तिखट आणि रंग लावलेला आहे. पूर्व आफ्रिकेतील लोक फारसे तिखट खात नाहीत. (मुंबईत डेरेदार वाढलेली गोरखचिंचेची झाडे, राणीच्या बागेच्या प्रवेशदाराशीच आहेत. या झाडांची फूले पण देखणी असतात. वसईच्या किल्ल्यात पण आहेत हि झाडे. दादरच्या पोर्तूगीज चर्च च्या आवारात पूर्वी होते, आता नाहि दिसत.)
वर लिहिल्याप्रमाणे, या पानांत क जीवनसत्व असतेच, पण त्याबरोबर अ आणि के जीवनस्त्व देखील असते. शिवाय फोलेट, प्रथिने आणि कॅल्शियम देखील असते. म्हणजे आठवडा ढकलायला, अगदी योग्य भाजी आहे ही.
हिचे शास्त्रीय नाव Brassica oleracea. इंग्रजीमधे कोलार्ड. फक्त पूर्व आफ्रिकेत नव्हे तर दक्षिण अमेरिकेत आणि भूमध्य समुद्रालगतच्या देशात, खास करुन स्पेन, पोर्तूगाल मधे हि खाल्ली जाते. इजिप्त मधेही खातात. आपल्याकडे काश्मिरमधे हि भाजी खातात. (तिथे त्याला हाक म्हणतात.)
चव म्हणाल तर थोडीफार मेथीसारखी लागते. आणि अगदी तूलनाच करायची तर कॉलीफ्लॉवर किंवा अलकोलच्या पानांशी करता येईल. हि दोन्ही पाने आपण टाकून देतो. शेतातून बाजारात येताना, या दोन्ही भाज्यांसोबत हि पाने येतात, पण भाजीवाले, ती कापून टाकतात.
एकदमच नविन भाजी दिनेशदा!
एकदमच नविन भाजी दिनेशदा! कधीही न ऐकलेली.
हि कोलार्ड ग्रीन सारखी वाटतेय
हि कोलार्ड ग्रीन सारखी वाटतेय इथे अमेरीकेत मिळणारी. मस्त लागते.
पहिल्यांदाच ऐकले. छान माहिती.
पहिल्यांदाच ऐकले. छान माहिती.
अवि, रैना या मालिकेमागचा माझा
अवि, रैना या मालिकेमागचा माझा उद्देश, या भाज्या भारतात उपलब्ध व्हाव्यात, निदान माहीत तरी व्हाव्यात असा आहे.
हो चिदेव कोलार्ड सारखीच ती. पण हि थोडिशी वेगळी असते.
पुन्हा एकदा मस्त माहिती
पुन्हा एकदा मस्त माहिती दिनेशदा!
तुमच्यामुळे अशा आम्हाला नवीन भाज्यांविषयी इतकी छान माहिती कळत आहे! मला सुकुमा विकी हे नाव फार आवडले. त्यात मला आपल्याकडची 'कुसुमा' दिसली! 
छान माहिती. नविनच भाजी
छान माहिती. नविनच भाजी
मी वर उल्लेख केलाय, तसा पुर्व
मी वर उल्लेख केलाय, तसा पुर्व आफ्रिकेतील गृहिणी, टिचभर जागेत सुकुमा विकी, वाढवते ती अशी...
दिनेशदा, तुम्हाला दंडवतच
दिनेशदा, तुम्हाला दंडवतच घातले पाहिजेत. काय काय भाज्या शोधून, त्यांचे काय काय प्रकार तयार करता! वर तोंडाला हमखास पाणी सुटेल अशा पध्दतीने पेश करता....
सुकुमा विकी नाव तर फारच
सुकुमा विकी नाव तर फारच मजेशीर आहे.....
पर्यटन स्थळांच्या भिंतींवर प्रेमबहाद्दर आपले आणि आपल्या प्रियकर/प्रेयसीचे नाव लिहितात ना, त्यातून उचलल्या सारखं वाटतयं - 'सुकुमा (loves) विकी'!

सुकुमा विकी - आठवडा ढकला
सुकुमा विकी - आठवडा ढकला
आता या भेटीत तुम्ही बियावाटप केले आहेच, या भाज्या इथेही रुजतील आता
दिनेशदा, तुम्हाला दंडवतच
दिनेशदा, तुम्हाला दंडवतच घातले पाहिजेत. काय काय भाज्या शोधून, त्यांचे काय काय प्रकार तयार करता! वर तोंडाला हमखास पाणी सुटेल अशा पध्दतीने पेश करता....>>> मामी तुम्हाला १००% अनुमोदन... नुकतेच मी अवघी विठाई वाचायला घेतलेय... सुकुमा विकी कडे कच्च्या स्वरुपात पाहून तिची इतकी इन्टेरेस्टिंग रेसिपी बनू शकते असं वाटलंच नव्हतं... सुगरण दिनेशदा!
दिनेशदा, या रेसिपी बद्दल अनेक
दिनेशदा, या रेसिपी बद्दल अनेक धन्यवाद. मी बरेचदा ही भाजी केली. छान होते.
पानाच्या वर असलेल्या लेखमालिकेच्या दुव्या (http://www.maayboli.com/node/17869) वरुन गेल्यास मात्र या मालिकेतील (अवघी विठाई माझी) फक्त १५ च लेख दिस्तात. त्या नंतर चे पण लेख त्यात असु द्या ही विनंती. उदा. अवाकाडो, बेल पेप्पर्स, अस्परागस इ. , त्याने शोधणे सोप्पे होईल. किंवा सर्व लेखंच्या शब्दखुण मधे "अवघी विठाई माझी" घाला ही विनंती.