नेफ्रतीती
मी शाळेत असताना शाळेत होण्यार्या स्नेहसम्मेलनातील सांस्कृतीक कार्यक्रमात जमेल तितक्या स्पर्धामधे आणि कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रयत्न करायचो. स्वयंशासन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वेषभुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि समयसुचक स्पर्धा ह्या स्पर्धा माझ्या सर्वात आवडीच्या असतं. इयत्ता चवथीत असताना निरोप समारंभात मला माझ्या बहिणीने एक भाषण लिहून दिले होते. ते भाषण मी वाचून पाठ केले आणि खूप भावनेच्या स्वरात वर्गात सर्वांसमोर उभे राहून दिले होते. शेवटी ते भाषण संपले तेंव्हा गालावर अश्रुंचे ओघळ उभे राहिले होते आणि मला कधीही ज्यांनी शिकवले नाही त्या दुसर्या वर्गाच्या मुधोळकर बाई माझे भाषण ऐकून खूप रडल्या होत्या. डोळ्यावरील चषमा खाली उतरवून त्यानी मला बक्षिस म्हणून दहा रुपये आणि एक रंगीत खडूचा डबा दिला. बक्षिसाचा आनंद काय असतो हे मला त्या दिवशी कळले आणि अशा रितीने मला स्पर्धांमधे भाग घेण्याची सवय लागली.
सातवित असताना मी एक भिकार्याचा रोल केला. हात हेच भिक मागायचे पात्र आणि डोळे हे अधू आहेत असा हावभाव करून मी 'उघड दार देवा आता, उघड दार देवा' अशा आर्त ओळी गात गात धापकन खाली पडलो कारण पायाखाली एकसमान नसलेली लाकडी फळी आली. प्रेक्षकाना वाटलं मी अधू आहे म्हणूनच पडलो. वा काय छान अभिनय केला! आठ दिवसानंतर स्पर्धांचा निकाल जाहिर झाला. ५ ते १० अशा वर्गातली सर्व मुलं बक्षिस समारंभाला हजर होती. मी खूप मागे खाली जमिनिवर बसलो होतो. आशा होती की मला समयसुचक स्पर्धेत 'बिरबल' ह्या विषयावर मी जे काही बोललो त्यासाठी बक्षिस मिळेल. पण त्या स्पर्धेत बक्षिस मिळालेल्यांची नावे जाहिर झाली आणि त्यात मी नव्हतो. फार उदास होऊन मी मातीत रेघोट्या ओढू लागलो. इतक्यात कुणीतरी माझे खांदे हलवून मला भानावर आणले. माझे नाव सारखे हवेत घुमत होते. मी कधी खारूताई सारखा चपळ गतीने पळून ते बक्षिस घेतले हे मला उमजले देखील नाही. विनोदाची गोष्ट म्हणजे ते बक्षिस नक्की कशासाठी मला मिळाले हे देखील मला त्यावेळी माहिती नव्हते. नंतर मला कळले की मी यशस्वीरित्या 'भिकार्याची' नक्कल करू शकलो.
एक मरूम रंगाची पारदर्शक अशी एक टोपली मला बक्षिस म्हणून मिळाली. आमच्या राहत्या 'पोलीस लाईनीत' मिरवून ती टोपली मला बक्षिस म्हणून मिळाली असे सर्वांना ऐटीत सांगितले. संध्याकाळी गोलाकार करून बसलेल्या बाया मला म्हणाल्यात ह्यात तू आता खीर खात जा. मी घरी येऊन ती टोपली आईला दाखवली. तिने लगेच माठात उमलण्यासाठी ठेवलेली कळ्या-पानं-फुलं उपसून त्या टोपलीत ओंजळभरून घातलीत आणि अशा रितीने मला मिळालेले पहिले बक्षिस मी देवाचरणी ठेवले. आनंदाने भरलेला हा एक छोटासा क्षण अजून स्मरणात आहे. पुढे अनेक स्पर्धांमधे मला बक्षिसं मिळतं गेलीत. पण ह्या पहिल्या टोपलीचा आनंद खास आगळाच आहे.
आता हे वाचणारे प्रिय वाचक म्हणतील मग ह्यात 'नेफ्रतीती' कुठून आली? आज पाडव्याच्या निमित्ताने सहभोजनाचा आणि त्यातच लहान मुलांसाठी वेषभुषा स्पर्धा असा एक हलकाफुलका कार्यक्रम इथल्या मराठी मंडळाने केला. मी नित्यनेहमीप्रमाणे उशिरा पोचलो (पण घरी विकतची गुढी उभारून गेलो हे महत्त्वाचे!). जसा पोचलो तसे कुणीतरी माझ्या तोंडात कडूजार मुठभर कडूनिंबाची पाने आणि नंतर गुळ कोंबला. एक अत्यंत सुबक वेषात माझ्यापुढे एक छोटीशी मुलगी चंदेरी झगा आणि त्यावर चांदीचा लांबट मुकुट परिधान करून आली. जिभेवर रेंगाळणार्या कडू चवीच्या नकळत मी मनातल्या मनात म्हंटले अरे ही तर 'नेफ्रतीती' सारखीच दिसते आहे. नंतर खरेच तीने 'नेफ्रतीती' चा अभिनय केला आणि तिलाच पहिले बक्षिस मिळाले. मग मला माझा वर सांगितलेला प्रसंग आठवला. चिमुकुल्या चिमुकल्या गोष्टींच्या आनंदांनी किती काठोकाठ भरलले दिवस होते ते!!!!
तुम्हा सर्वांना माझ्याकडून पाडव्याच्या पोटभरून शुभेच्छा!!!!!
- बी
छान
छान लिहिलयं बी. all rounder होतास कि शाळेत...
अगदी
अगदी मनापासुन लिहिल्याचे जाणवते शब्दांशब्दांतुन..... छानच.
बी
बी तुम्हालाही या नविन वर्षाच्या भरपुर शुभेच्छा. बक्षिसाचे मोल अनमोल.
पहिलं
पहिलं भाषण. पहिलं बक्षिस खूपच वेगळं असतं