मी आणि माझा "तो"

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मी देवभोळी नाही पण नास्तिकही नाही. विश्वाचा पसारा निर्माण करणारी शक्ती कुठल्यातरी फॉर्ममधे अस्तित्वात आहे
हा विश्वास आहे बस. दगड, पोपट, साप, माकड आणि माणूस यांचं जाणिवांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असणं अशासारखा एखादा पुरावा अनेक दुबळ्या क्षणांना आधार म्हणून पुरेसा असतो.
नशिबापेक्षा कर्तृत्वावर माझा जास्त विश्वास आहे. पण कधीकधी उलट विचार करणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो.
"त्या" च्या भरवशावर सगळं सोडून द्यायचं आणि आपण रिकामं व्हायचं. पण असं रिकामं होता येतं का हाही
प्रश्नच आहे. तिकडं "तो" आपली मागणी ऐकेल का? ऐकली तरी हवं ते पुरवेल किंवा नको ते निस्तरेल का?
या काळजा असणारच. असं रिकामं मन माझं तरी फक्त "तो" आसपास आहे अशा ठिकाणीच होतं.
"त्या" च्या दारी जायचं म्हटलं की कुठल्याही जागृत देवस्थानापेक्षा भावतं ते एखादं शांत प्रसन्न ठिकाण.
खरंतर जागृत म्हणून नावाजलेली ती हारफुलाउदबत्त्यांचा खच पडलेली, नारळाच्या आणि हळदकुंकवाच्या पाण्यानं
बरबटलेली, पेढ्यांच्या, चुरमुरे फुटाण्यांच्या, कीचेनच्या आणि काळ्या केशरी धागांच्या दुकानांमागं लपलेली
देवस्थानं केविलवाणी वाटतात अगदी.
कुठल्याही शिल्पकलेचा नमुना असो, श्रद्धेतून आलेलं प्रत्येक देवस्थान सुंदर असतंच.
काळ्या कातीव दगडात बांधलेलं, केशरी छोटा झेंडा फडकवणारं, बुटकं, आतला अंधार अजून गडद करणारा दिवा
तेवणारं कुठल्या अनामिक गावातलं पारावरचं देऊळ असो की सोन्याहिर्‍यांचा मुकूट आणि रेशमाची वस्त्रं चढवलेल्या
मूर्ती संभाळणारं संस्थान असो. आपले देव सुंदर होतात ते तिथं मांडलेल्या भक्तीनं. पैशाच्या किंवा सत्तेच्या
आराशीनं नव्हे.
तसंच ईश्वराचं ईश्वरपण (आणि ऐश्वर्य पण) फक्त नवसाला पावण्यावर ठरावं हे तर अगदीच दुर्दैवाचं. फक्त पसरलेले पदर घेऊनच तिथं का पोचावं? किंवा आलोच आहोत तर मागून घ्यावं?
हे करू नयेच असं नाही पण..
आणि वर ते चित्रपटांतलं प्रसिद्ध वाक्य "भगवान आजतक मैने तुमसे कुछ नही मांगा." त्यालाच धारेवर
धरल्यासारखं. हे म्हणजे वडलांना इष्टेटीतला हिस्सा मागितल्यासारखं आहे. आत्तापर्यंत काही मागितलं नाही तर चला आता टाका झोळीत माझ्या नशिबाचा वाटा.
जर तोच सगळं हातात आणून देणार असता तर तुमच्या आयुष्याचं, अफाट जिद्द आणि दुर्दम्य आशा स्वभावतः बाळगणार्‍या
माणसाच्या जन्माला घालण्याचं, हास्य आणि संस्कार या कुठल्याही इतर प्राण्याकडं नसलेल्या देणग्यांचं आणि इतक्या
मोठ्या मेंदूचं प्रयोजनच काय होतं?
मैत्रिणीच्या आग्रहामुळं वैष्णोदेवीचा सुंदर ट्रेक करत वर पोचण्याआधी मैत्रीण, तिचे नातेवाईक म्हणत होते की इथं
यायला मातेचा बुलावा यावा लागतो. त्याशिवाय नाही होत येणं. आता आली आहेस तर आधीच ठरवून ठेव काय मागणार आहेस मातेकडं. तिथं पुजारी फार घाई करतात मग तसंच राहून जातं. विनोदीच वाटलं होतं मला ते. पण म्हटलं हाही विचार करून ठेवू.
खूप विचार करूनही देवीला असं कामाला लावण्याजोगं खास काही सुचेचना. नेहमी हात जोडले की मागण्यापेक्षा आभाराची आणि संवादाचीच सवय. हे अमेझींग जग तयार करणारा भेटला की फक्त दाद देणं एवढंच शक्य होतं. तेही जाणीवपूर्वक केलं तर. एरवी फक्त त्याचं ते निर्गुण निराकार असणं पार पेशींपर्यंत झिरपत जातं आणि तेवढंच उरतं. आपण भरतो ते सुखदुःखाचे रंग, भावनांचे उचंबळ म्हन्जे लुटुपुटूचं विश्व केवळ.
मग म्हटलं हात जोडले की आपलं सगळ्यांना सुखी ठेव असं जनरल मागणं मागून टाकू एवढा सगळ्यांचा आग्रह असेल
तर. वर पोचल्यावर ते निसर्गाचं रौद्रसुंदर रूप पाहून इतकं छोटं वाटलं आपोआप.
तिथं त्या गूढ जागेतल्या आदिशक्तीसमोर डोकं टेकवून बाहेर येऊन पुन्हा त्या रुद्रसौंदर्यासमोर उभी राहिल्यावर
आठवलं की जनरल, पर्सनल कसलंच काही मागायचं आपण विसरून गेलोय. तिथं फक्त होती आपल्या अस्तित्वावरची
तिची छाप आणि नगण्य असलं तरी तिनं दिलेल्या तिच्याच तत्वांच्या सगुण साकार लघुरूपाची जाणीव होऊन आलेली निर्विकार नतमस्तकता.
पण यामुळं इतर कुणाचा त्याच्याशी असलेल्या संवादाचा सूर असाच असावा असं काही माझं ठाम मत नाहीये. तो
तक्रारीचा, वैतागाचा, दीनवाणा, भांडखोर, असमाधानी कसाही असू शकतो. अगदी 'माझा मी समर्थ आहे. तो काय करणार
माझं' असाही एखादा. त्याचं तत्व लोकशाही हेच असावं. नाहीतर इतकं भाषणस्वातंत्र्य मिळालं नसतं आपल्याला.
लाडानं काळ्या म्हणणारे असतात. हे असलं आयुष्य का बाबा पदरात टाकलंस म्हणून शिव्याशाप देणारे असतात.
इतरांच्या देवांशी उभे दावे मांडणारेही असतात. तो नाहीच म्हणणारे, आहेच म्हणणारे, आहे असं वाटतं पण मॉडर्न
दिसण्यासाठी लपवणारे, नसावा असं वाटतंय पण असला तर उगीच रिस्क नको म्हणून जुलमाचा रामराम घालणारे असले
सगळे असतात. शेवटी हा एवढा पसारा घालून खेळ मांडलाय त्यानं, तर तो विविध भावनांचा आणि चमत्कारिक पात्रांचा
मसाला ठासून भरलेल्या हिंदी मूव्हीसारखा ब्लॉकबस्टरच असणार. मी तर सॉलीड फॅन आहे या निर्मात्याची. एकदम पाच स्टार्स.
तुमचं रेटिंग काय आहे?

हे "त्या"च्यासाठी..

अथांग आभाळ दिलंस,
पंखांमधे बळ दिलंस.
पोचण्याची मनीषा दिलीस,
पोचेनच ही आशा दिलीस.
कर्तव्यांचं भान दिलंस,
कर्माचं समाधान दिलंस.
फूल, नैवेद्य, आत्मा, देह..
तुझेच, तुला काय देऊ?
जळ, स्थळ काष्ठ, पाषाण
तुला सोडून कुठे जाऊ?

विषय: 
प्रकार: 

संघमित्रा, चिंतनपर लिहिलं आहेस. शेवटही सुंदर कवितेने केला आहे.

त्याने मला माणुसपण दिले कि मी त्याला देवपण दिले ?
हा प्रश्न आहे, संघमित्रा.
कसा सोडवायचा तो ?

छान लिहीतीयेस. निसर्गाच्या जवळ जावुन पर्मेश्वराचे अस्तित्व जाणवावे म्हणुन निसर्ग रम्य स्थळी आपल्या पुर्वजांनी देवळ बांधली पण तिथेही सगळा बाजारच भरला त्याला वहायच्या सामानाचाच आणि देव बाजुलाच राहीला असे वाटते.

छान लिहीतीयेस. निसर्गाच्या जवळ जावुन पर्मेश्वराचे अस्तित्व जाणवावे म्हणुन निसर्ग रम्य स्थळी आपल्या पुर्वजांनी देवळ बांधली पण तिथेही सगळा बाजारच भरला त्याला वहायच्या सामानाचाच आणि देव बाजुलाच राहीला असे वाटते.

छान लिहिल आहेस. शेवटचा परिच्छेद व कविता भारीच आहे.फक्त मला काही मुद्दे मांडायचे आहेत.

त्या" च्या भरवशावर सगळं सोडून द्यायचं आणि आपण रिकामं व्हायचं.तिकडं "तो" आपली मागणी ऐकेल का? ऐकली तरी हवं ते पुरवेल किंवा नको ते निस्तरेल का?

हे चुकिच आहे कारण जे सर्व काही देवावर सोडून देतात ते या जगापासुन कुठल्याही material गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत. आणि त्याचमुळे हवं ते पुरवेल का प्रश्नच येत नाही तिथे. तिथे 'तो' जे देईल तेच माझ्यासाठी योग्य आहे ही भावना असते. त्यामुळे मला हे का मिळाल नाही किंवा मला 'तु' हे का दिल नाही अशा प्रकारचं lamentation नसतं.माझी काहीही मागणी नाहिये जे 'तु' देशील त्यातच मला आनंद आहे अशी भावना असते(खरी असते ,वरवरची नाही)

तसंच ईश्वराचं ईश्वरपण (आणि ऐश्वर्य पण) फक्त नवसाला पावण्यावर ठरावं हे तर अगदीच दुर्दैवाचं. फक्त पसरलेले पदर घेऊनच तिथं का पोचावं? किंवा आलोच आहोत तर मागून घ्यावं?

बिल्कुल पदर पसरुन पोहोचु नका देवाकडे.याला conditioned love म्हणतात म्हणजे 'देवा मला तु हे दे तर मग मी तुझी पुजा करेल'. हा व्यवहार आहे भक्ती नव्हे. भक्तीमधे देव जे देईल ते आनंदानी घेण असत. भक्ती म्हणजे unconditioned love. ज्यात कुठलीही मागणी नसते.आत्ता सध्या व्हायरसमुळे एक सॉफ्टवेअर चालत नाहीये नाहीतर गोकुळातील गोपींनी म्हटलेल एक अतिशय छान वाक्य आहे ते टाकले असते. नंतर सुरु झाल्यावर टाकेल्.

सर्वप्रथम इतके सुरेख लिहिल्याबद्दल अभिनंदन..

आता स्वगत (माझीच लाल म्हटल्यासारखे Happy ) : कधीकधी खरच वाटतं की श्रद्धा असावी "त्या"च्यावर.. आस्तिक असतो तर अधिक सुखी असतो का?? विशेषतः जेव्हा आतुन ढवळुन काढणारं काहीतरी मनात चाललेलं असतं.. पण नाही होत.. तर्क-वितर्क आड येतात.. एकदा मी एका भडजींना म्हणालो होतो की देव जर खरच असेल तर त्यालाच वाटत नाहीये की मी सश्रद्ध असावं Happy (वि.सु.: कृपया इथे देव म्हणजे काय हा बीबी सुरु करु नका.. कळकळीची विनंती)
पण तु म्हटल्याप्रमाणे, हिमालयातली ती फारशी कुणी भेट न देणारी देवस्थाने, वारीत ४ दिवस चालुन पायाचे तुकडे पडल्यावर १० तास रांगेत उभे राहुन बघितलेली विठ्ठलाची मुर्ती, अशा क्षणी काहीतरी केमिकल लोचा होतो नक्की..
>>>>स्वगत मोड ऑफ.<<<<<

सन्मे, अगदी अगदी!!
झकास लिहीलंयस.

सुंदर!!!

सन्मी खास लिहिलं आहेस.... जे जे मनात येतं ते इतक्या साधेपणे सहज शब्दात मांडतेस ना तू..

बाकि ट्रिप कशी झाली? फोटो पाठव कि...

संघमित्रा छानच लिहीले आहेस.लवकरच येणार्‍या अर्थ डे च्या सेलीब्रेशन साठी तुझा हा लेख सगळ्यांनी वाचावा असाच आहे....

मनाला खुप भावलं !

फक्त पसरलेले पदर घेऊनच तिथं का पोचावं? किंवा आलोच आहोत तर मागून घ्यावं?
हे करू नयेच.

सन्मे, आवर्जून रंगेबीरंगीवर येऊन वाचन होत नाही.... आधीच कबूल करत्ये... पण आज तुझं वाचलं आणि भरून पावले.
हे सगळं इतकं प्रामाणिक आहे की त्याला फक्तं 'क्या बात है' अशीच दाद जाते.

विवेकानंद सांगतात की, कुणीतरी सांगतय म्हणून मुळीच विश्वास ठेवू नका... त्यापेक्षा अश्रद्ध म्हणवा स्वतःला.
'श्रद्धे' ला केलेले वैचारिक प्रश्न बहुतेकदा नुस्तेच 'एको' होऊन परत येतात... अनुभव महत्वाचा.

तुझ्या लेखातलं हे एक वाक्यं बरोबर घेऊन हिंडावं म्हणतेय-

****एरवी फक्त त्याचं ते निर्गुण निराकार असणं पार पेशींपर्यंत झिरपत जातं आणि तेवढंच उरतं. आपण भरतो ते सुखदुःखाचे रंग, भावनांचे उचंबळ म्हन्जे लुटुपुटूचं विश्व केवळ ****

मस्त ... भेटताना स्वतःपर्यंत पोचल्या सारख जिथ वाटत तिथ तो असतो जिथ वाटत नाहि तिथे आपण असतो ...

सन्घमित्रा,
खूप छान !!
एकदा स्वामि विवेकानंद, परमहंसांकडे आले त्यांना माहीत होते की विवेकानंदांच्या खाजगी जीवनात त्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्यांनी जगदंबा मातेकडे काही लौकीक गोष्टी जसे की धन, धान्य, सम्पत्ती वगैरे मागायला सांगितले जे त्यांना प्रयत्न करुनही शेवटी जमलेच नाही, प्रत्येक वेळी त्यांनी मोक्ष, आत्मज्ञान याच गोष्टी माग्गित्ल्या !! असो सहज सांगावेसे वाटले म्हणून सांगीतले .

मित्रा,एकूणेक मस्त!

उगीच रिस्क नको म्हणून >>>> Happy

रुद्रसौंदर्याबद्दलचं तर खूप पटलं.. अनेकदा सह्याद्रीत अनुभव घेतलाय! शब्द व्यर्थ ठरतात अश्य वेळि!

दाद ला अनुमोदक...

मस्त लिहिले आहेस.. शेवटही छान आता तुझी जुनी पोस्ट्स पण वाचली पाहिजेत रंगिबेरंगी वरची

visit http://milindchhatre.blogspot.com

सन्घमित्रा,छान लिहिलय तुम्ही.
एकदा मी आणि माझी मैत्रीण बसमधून जात होतो तेव्हा ती अभिमानाने म्हणाली,"मी अजिबात देवळात जात नाही".माझा प्रश्नार्थक चेहरा बघून म्हणाली,"काय मागायचं देवाकडे जाऊन?"
मी म्हटलं,"काही मागायला नसतं गं जायचं.तो काय सौदा आहे का देवाबरोबर करायचा?उलट आपल्याला चांगल्या कुटुंबात जन्म मिळाला,लाड करणारे आई-बाप मिळाले आणि आता चांगलं शिक्षण मिळतंय...या आणि अशा अनेक कारणांसाठी त्याचे आभार मानायचे त्याचे.त्याऊपर जे असेल ते तो देतच असतो आपल्याला!"

तुमचे विचार कुठेतरी आपले वाटले म्हणून सहज लिहिलं...

..प्रज्ञा

आज परत एकदा वाचलं... पुन्हा तीच झिलमिल!
सन्मे, परत एकदा.... क्या बात है!

मित्रा सुंदर लिहीले आहेस नेहेमीप्रमाणेच. Happy अगदी अगदी.