प्रस्तावना
महिला दिन २०१० निमित्ताने 'संयुक्ता'तर्फे एक सर्वेक्षण घेतले.
संयुक्ताच्या सदस्या आणि त्यांच्या परिघातील १२२ स्त्रियांकडून ही प्रश्नावली भरुन आली. गोपनीयतेची आणि अनामिकतेची पुरेपूर काळजी घेतली होती.
प्रश्नावलीत ९ वेगळ्या सदरात (अनिवार्य प्राथमिक माहिती, शिक्षण, विवाह आणि लग्नसंस्थेबद्दलची मतं/अनुभव, कुटुंब आणि समाज, नोकरी/करियर, आरोग्य, "स्व"संकल्पना ) एकूण ८७ प्रश्न होते
त्यांपैकी ६० अनिवार्य ठेवले होते. शिवाय मैत्रिणींचे मनोगत जाणून घ्यायला पुरेपूर वाव द्यावा या हेतूने खूपसे प्रश्न शब्दमर्यादेविना open ended (खुले) ठेवले होते.
आम्ही सर्वेक्षणामध्ये एकूण ८७ प्रश्न एकूण ९ विभागांमध्ये विचारले होते. प्रत्येक विभागानुसार सर्वेक्षणाचा आढावा:
त्यासाठी पुढील दुव्यांवर टिचकी मारा.
- प्राथमिक माहिती
- शिक्षण
- लग्न
- समाज
- नोकरी/व्यवसाय
- कुटुंब
- आरोग्य
- अर्थकारण
- स्वतःविषयी
- उपसंहार आणि श्रेयनामावली
अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक भारतीय/अभारतीय स्त्रियांनी वेळात वेळ काढून अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी, आडपडदा न ठेवता उत्तरं दिली. या सर्व qualitative inputsना योग्य न्याय देता यावा म्हणून आम्ही विश्लेषण तीन भागात प्रसिद्ध केले. एक महत्त्वाचा ऐवज आपल्या हाती या विश्लेषणरुपाने देता यावा याकडे आमचा कटाक्ष आहे.
या सर्वेक्षणातील प्रश्नावली तयार करणार्या आणि विश्लेषण करणार्या स्त्रियांचे मनोगत/अनुभव/मतं आणि त्याचा प्रश्नावलीवर किंवा विश्लेषणावर प्रभाव हेही आपण तपासून पाहणार
आहोत.
प्रश्नावलीच्या उद्दिष्टांबाबत थोडासा परिचय: (हा परिच्छेद प्रश्नावलीत समाविष्ट करण्यात आला होता.)
...........
ही प्रश्नावली हा एक आरसा आहे, थोडंसं थांबून नीट न्याहाळून पहा त्यातल्या छब्या. तांत्रिक अडचणी काहीशा आहेत, त्याला दुर्दैवाने आत्ता या क्षणी इलाज नाही. आम्हालाही प्रिव्ह्यू किंवा आपली उत्तरं सेव्ह करायचे पर्याय आवडले असते. त्या समजून पुढे जाऊयात. प्रश्नावलीचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- स्थळकाळादेशापलिकडे जाऊन स्त्रीत्व या विषयावरची काही वैश्विक मतं जाणून घेणे. मराठी/ भारतीय/परदेशी स्त्रियांची मतभिन्नता तपासणे.
- काही क्षण थांबून, विचार करुन एक स्त्री म्हणून आपली गृहितकं, आपले महत्त्वाचे निर्णय आणि त्याला कारणीभूत असणारे घटक जाणीवपूर्वक तपासून पाहणे.
- प्रश्नावलीची विषयवार व्याप्ती जरा मोठी आहे आणि तीच या प्रश्नावलीची मर्यादा आणि तेच मर्म आहे. यातील प्रत्येक विषयावर विचारण्यासारखे शेकडो प्रश्न आहेत, पण आत्ता सुरूवातीला आपण सर्वच थोडेथोडे पाहूयात.
- प्रश्नावलीला आलेल्या मतांचे व्यवस्थित संकलन करुन आपल्याला संयुक्तासाठी कशाप्रकारे मदत होईल, कुठले विषय चर्चेला घ्यावेत ते नीट पाहता येईल.
..........
प्रतिसाद
संयुक्ताची सध्याची सभासदसंख्या १४८ आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रिया १२२, पैकी १० निश्चित अभारतीय वंशाच्या आहेत. यावरून प्रत्येक संयुक्ता सदस्येने (येनकेनकारणानी) भाग घेतला नाही असे सरळ अनुमान निघते.
तरीही प्रतिसादाची वैचारिक पातळी पाहता ज्यांनी भाग घेतला त्यांचे आभार मानायलाच हवेत. शिवाय ज्यांनी परदेशी मैत्रिणींना ही प्रश्नावली भरायला उद्युक्त केले त्यांचेही विशेष आभार मानायला हवेत कारण प्रश्नांच्या बाजावरूनच ही प्रश्नावली मुख्यतः भारतीय स्त्रियांशी निगडीत असावी असा समज होणे स्वाभाविक होते. असे असतानाही आपला अमूल्य वेळ आणि मतं त्यांनी आपल्याला दिली, जेणेकरून थोड्याप्रमाणात तरी तौलनिक अभ्यास मांडता आला, याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
(कुठलाही उपक्रम हा पालखीसारखा असतो. वेगवेगळ्या खांद्यांवरुन ती वाहून नेली जाते. शेवटच्या भागात दिंडीतील सर्व पालखीधारकांचे नामोल्लेख आणि ऋणनिर्देश करण्यात येतील.)
महत्त्वाचे काही
वाचक मैत्रिणींनो आणि मित्रांनो एक विनंती आहे- कृपया सांख्यिकींच्या कचाट्यात गिरक्या खाऊ नका किंवा त्याला अवास्तव महत्वही देऊ नका!
मराठी प्रश्नावली Web Based Form स्वरुपात मायबोलीवरच तयार करण्यात आली होती. मैत्रिणींच्या आग्रहानुसार आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे ती इंग्रजीत अनुवादीत करुन पुन्हा इंग्रजीतही टाकण्यात आली.
आलेल्या मराठी आणि इंग्रजी प्रतिक्रिया Excel मध्ये एकत्रित केल्या. विश्लेषकांनी पुन्हा एका भाषेत यातील सर्व माहिती code केली. सर्व खुल्या प्रश्नातील दोन्ही भाषेतील मजकूर त्यातल्या प्रमुख धाग्यानुसार वेगळ्या लिहून पुन्हा त्यातले संख्याबळ पाहिले. दोन/तीन/चार घटकातील परस्परसंबध पाहिले. सर्व तांत्रिक बाबींवर मात करुन/पर्याय शोधून आहे त्या सामग्रीनुसार विश्लेषण करण्यात आले आहे.
Advanced Statistical Analyses/ Data Mining Techniques यातील तज्ज्ञांची मदत घेऊन पुन्हा एकदा जास्त व्यापक स्वरूपात हे सर्वेक्षण आणि विश्लेषण करुन पहायला हरकत नाही असे विश्लेषकचमुचे (वैयक्तिक) मत आहे, आणि अजून काय जास्त चांगले करता येईल याची नम्र आणि यथायोग्य जाणीवही आहे.
निष्कर्षात बहुतांशींचे रेखाचित्र पाहून तिथेच थबकू नका, ही केवळ लिहिण्याच्या संकेताची मर्यादा आहे. तुम्हाला यातल्या अल्पसंख्यकांचाही पुरेसा परिचय होतो आहे ना ते नक्की पहा. (आणि मुख्य म्हणजे स्वतःची या विषयांवरील मतं नीट आजमावून पहा आणि आम्हाला कळवायला विसरू नका.) निष्कर्ष खरे म्हणजे दोहोंच्या मध्ये कुठेतरी आहे, तिथे पोचायची वाट नागमोडीच आहे हे मानवी अस्तित्वाचे केवढे भाग्य आहे आणि प्रवास हेच उद्दिष्ट आहे !
संयोजक, उपक्रम उत्तम आहे यात
संयोजक,
उपक्रम उत्तम आहे यात काहीच म्हणजे काहीच वाद नाही. सर्व्हे करणं हेच मुळात खायचं काम नाही आणि तुम्ही ते समर्थपणे पार पाडून आमच्यापुढे ठेवलयंत त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन!
अभ्यासाच्या निमित्ताने मला रिपोर्ट्स वाचायची सवय आहे म्हणून रिपोर्ट्स चे १० भाग वाचून काढणं, मनन करणं, नक्की वस्तुस्थिती काय आहे याचा अंदाज घेणं आणि मग आपल्यापुरता त्या त्या भागाचा निष्कर्ष काढणं खूपच जिकीरीचं काम आहे, खरंच. ललित, कथा, कविता असं हलकंफुलकं वाचणारया (दिमागको कायको शॉट देनेका?)मायबोलीकर स्त्रियांना एकूणच जड जाईल हे प्रकरण असं मला उगाच वाटलं. वस्तुस्थिती तशी नसावी अशी आशा. मायबोलीवर सामाजिक प्रश्नांवर हिरीरीने चर्चा करणारे ओळखीचेच चेहरे मला प्रतिसादात दिसले.
मला स्वतःला लग्न, समाज, कुटुंब, अर्थकारण या गोष्टींत रस होता. २२% स्त्रिया मतदान करत नाहीत-हे प्रमाण धक्कादायक आहे. विशेषतः शिक्षण भागात डोकावून आल्यानंतर आणि प्रत्येक जण सुशिक्षित आहे हे कळल्यावर तर फारच हताश वाटलं. इतका ignorance का असावा? पहिला सेक्सचा अनुभ व ४% इतक्या लक्षणीय प्रमाणात १५ ते १८ व्या वर्षात घेतला गेलाय हे बघून माझ्या भुवया उंचावल्या गेल्या. स्त्रियांच्या मुक्तीसंबंधीच्या 'कल्पना' वाचून खरंच वस्तुस्थितीशी किती ताळमेळ बसतो हे बघायला 'समाजा'त गेले तर 'खेद वाटला-आश्चर्य नाही' अशीच भावना झाली.
रिपोर्ट अत्यंत प्रोफेशनली बनवला गेलाय यात वाद नाही. पण तो प्रोफेशनल असण्याचे बरेच तोटेही आहेत.
१)प्रत्येक गोष्ट आकडेवारीत वाचायला लागणं-त्यात गुंतून पडू नये असं कळकळीचं आवाहन संयोजकांनी केलेलं असलं तरी त्या रिपोर्ट चा भाग आहेत त्यामुळे त्या वाचल्या जाणं अपरिहार्य आहे.
२)पाय चार्टस, बारग्राफ्स मुळे रिपोर्ट वाचायला सुसह्य होतो. इथेही तसं व्हावं अशी अपेक्षा होती. अनेक पर्याय निवडलेल्यांसाठी बार ग्राफ , नंतर त्याची आणखी फोड करुन/ विश्लेषण करून आणखी एक पाय चार्ट याची खरंच गरज होती का? हे सगळं कमी किचकट करता आलं असतं.
सामान्य पब्लिकपर्यंत पोहोचायचं असेल तर एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे ती म्हणजे त्यांना आकडेवारीत बिलकुल रस नसतो. एखादी धक्का दायक आकडेवारी त्यांना पुरेशी असते. उदा. आपल्याकडच्या दंडकारण्य, दांतेवाडा, लालगढ भागातला बालमॄत्यू दर सब-सहारन देशांपेक्षा जास्त आहे. नो आकडेवारी पण सत्याची इंटेंसिटी पोहोचली. ही आकडेवारी वगळता त्यांना रोखठोक मतं हवी असतात. ती काढायला इथे झिजायला लागतंय म्हटल्यावर रिपोर्ट थोडा ऑफ-पुटींग वाटायची शक्यता आहे.
रिपोर्ट मध्ये अभारयीय वंशाच्या-ज्या काही दोन तीन स्त्रिया आहेत -त्यांना घेण्याचे कारण कळले नाही.
<<स्थळकाळादेशापलिकडे जाऊन स्त्रीत्व या विषयावरची काही वैश्विक मतं जाणून घेणे. मराठी/ भारतीय/परदेशी स्त्रियांची मतभिन्नता तपासणे. >>असं संयोजकांनी म्हट लेलं असलं तरीसुद्धा. वैश्विक मतांचा अट्टाहास कळला नाही. वैश्विक प्रातिनिधित्व तसेही कमीच दिसतेय.
ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आशादायक असावीत असं आपल्याला वाटतं पण आपल्याकडे तसं चित्र नसतं-पण त्यांच्याकडे असतं, हा काँट्रास्ट दाखवून देण्याचा प्रयत्न होता का?
मी सल्ले देतेय असं वाटण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्र शासनाचे, केंद्र सरकारचे रिपोर्ताज वाचून वाचून मला आता पुरेशी कल्पना आलेली आहे की त्यांच्यात सामान्य वर्ग रस का घेत नाही ते. म्हणून सांगावंसं वाटलं.
लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर आधीच क्षमा मागते. तुमचं काम मोठंय-मला इथे बसून कीबोर्ड बडवायला काय जातंय?
ललित, कथा, कविता असं
ललित, कथा, कविता असं हलकंफुलकं वाचणारया (दिमागको कायको शॉट देनेका?)मायबोलीकर स्त्रियांना एकूणच जड जाईल हे प्रकरण असं मला उगाच वाटलं.>>>> तुझी सगळी पोस्ट विचार करुन लिहिलेली वाटली हे एक वाक्य वगळता. नक्की कशाच्या आधारवर तू हे मत बनवलस ? सहज येता जाता कुणाविषयी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं नसशील अशी आशा.
केवळ रोमात असणारा मायबोली
केवळ रोमात असणारा मायबोली स्त्रीवर्ग मोठा आहे.सगळ्या पोस्टसवर निदान छान, आवडलं, किंवा एखादा स्मायली अभिप्राय देणारया स्त्रिया इथे नाहीत आणि ज्या आहेत त्या अशा सोशल कॉजवर नेहमी लिहीणारया आणि हिरीरीने बोलणारया आहेत हे मला जाणवलं म्हणून. हे विधान सरसकट सगळ्यांना लागू नाही, त्यात कोणाचीही खिल्ली उडवण्याचा यत्किंचितही हेतू नाही . चार घटका चांगल्या जायला हव्या असतात, काहीतरी हलकंफुलकं वाचायचं असतं तेव्हा मायबोलीवर आल्यावर बुद्धीला शॉट लावणारी (शॉट लावणे- विचार करुन मेंदूला गिरमिट लागणे या अर्थी), क्लिष्ट पोस्ट्स कधीकधी मी ही वाचत नाही. हलकंफुलकं वाचणारया वाचकांची आपली बौद्धिक कुवत कमी आहे किंवा सामाजिक विषयाचे भान नाही असं मला म्हणायचंय असा तुमचा समज झाला असल्यास तो गैरसमज आहे.
आणि ते मला 'वाटलंय'- ते चुकीचं असण्याचे, माझं निरीक्षण संकुचित असण्याचे चान्सेस असू शकतात हे मी 'मला वाटतंय ' मधून स्पष्ट केलंय असं मला वाटतं..
बाकीची पोस्ट चांगली आहे
बाकीची पोस्ट चांगली आहे मणिकर्णिका जरी मला सगळी पटली नसली तरी. पण
>>>ललित, कथा, कविता असं हलकंफुलकं वाचणारया (दिमागको कायको शॉट देनेका?)मायबोलीकर स्त्रियांना एकूणच जड जाईल हे प्रकरण असं मला उगाच वाटलं.<<<
हे जरा जास्तच जजमेंटल होतंय.
रिपोर्ट वाचला. तुम्ही खुप
रिपोर्ट वाचला. तुम्ही खुप कष्ट ,प्रयत्न करुन इतका क्लिष्ट डाटा आमच्यापर्यंत पाहोचवल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
पण तरीही एक स्पष्ट मत नोंदवावस वाटल. हे सर्वेक्षण घेताना जे अॅनालायसिस केल गेल आहे ते सर्वसमावेशक वाटत नाही आहे. थोडक्यात जी मते सर्वेक्षणात हाती आलेली आहेत ती सर्वसाधारणपणे त्या त्या गटाची मते आहेत अस वाटत नाही. याला मुख्य कारण म्हणजे एक असु शकेल अस वाटत ते म्हणजे डाटा खुप छोटा आहे.
बारीचशी कॉमन बॅकग्राउंड असणार्या १००/१२५ बायकांची मते सर्वसाधारण बायकांची मते रिप्रेझेंट करु शकत नाहीत अस वाटल. मग त्या दृष्टीने या सर्वेक्षणाचा फायदा कसा होणार असा प्रश्न पडतो.
तसेच सर्व्हे मधले प्रशन/उपप्रश्न हे खुप स्पेसिफिक होते अस वाटल.
कृपया , तुमच्या प्रयत्नांचे महत्व कमी करण्याचा हेतु अजिबात नाही आहे हे परत एकदा सांगु इच्छिते.
हा रिपोर्ट एक अभ्यास म्हणून
हा रिपोर्ट एक अभ्यास म्हणून ठीक आहे, पण त्याचे निकष वापरून स्त्रियांना स्वतःच्या बाबतीत प्रश्न विचारून त्याची उत्तरे स्वतःच स्वतःला प्रामाणिकपणे देणे व पुरुषांना स्त्रियांच्या सर्वेच्या निमित्ताने काही बाबतींची जाणीव करून देणे ह्यापेक्षा जास्त होईल का याविषयी मी स्वतःलाच प्रश्न विचारते आहे. घेतलेला डाटा हा सर्वसामान्य निष्कर्ष काढण्यासाठी खूपच अपुरा आहे. शिवाय त्याला स्थल, काल, सांपत्तिक स्थिती इ. इ. बरेच निकष आहेत.
पण एक खरे, हे प्रश्न स्त्रियांनी स्वतःला वारंवार (किमान ३-४ महिन्यांनी तरी) विचारत राहिले पाहिजे. त्यातून त्यांना स्वतःचाच अदमास येईल. दुसरे म्हणजे दर वेळी आपल्या उत्तरांमध्ये कोठे जर बदल झाला असेल तर तो नोंदवायला हवा एखाद्या डायरीत. अशा नोंदींचा लेखाजोखा घेऊन स्त्री स्वतःच स्वतःच्या वाटचालीचा ग्राफ काढू शकते. मग तिला इतर निष्कर्षांवर अवलंबायला नाही लागणार. माझा विचार हा चाललाय की ह्याच सर्वेला अजून जरा त्रोटक किंवा आवरलेल्या/ संक्षिप्त स्वरूपात घेता आले तर माबोखेरीज इतर स्त्रियांना स्वमूल्यमापन करायला त्याचा उपयोग होईल काय....
ह्या रिपोर्टमधील / मला आवडलेल्या गोष्टी :
१. तपशीलवार, विविध बाजूंना कव्हर करणारी प्रश्नावली व मिळालेल्या उत्तरांचे तितक्याच काळजीपूर्वक केलेले विश्लेषण. अतिशय सिन्सियर. हा रिपोर्ट अजून वाचकफ्रेंडली कसे करता येईल हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट.
२. सर्व्हेत भाग घेतलेल्या स्त्रियांनी दिलेली (होपफुली) प्रामाणिक उत्तरं. जरी हा डाटा प्रातिनिधिक नसला तरी त्यातून स्त्रियांच्या जीवनशैली व मानसिकतेत झालेले जे सकारात्मक बदल दिसत आहेत ते नक्कीच आशादायक.
३. निष्कर्षातील वाचकांना विचार करायला लावणारे प्रश्न व वाचकांवर सोडलेली उत्तरे.
ह्या सर्व्हेचा उपयोग माझ्या मते असा होऊ शकतो :
ज्या स्त्रियांपर्यंत हा सर्व्हे रिपोर्ट पोहोचेल त्या स्त्रिया या रिपोर्टमधील पॉझिटिव्ह गोष्टी, जसे व्यायामासाठी नियमित वेळ, आरोग्याकडे विशेष लक्ष, कुटुंबनियोजनाच्या जबाबदारीत जोडीदाराचा सहभाग, आर्थिक निर्णय इत्यादीत दिसणार्या आशादायी चित्रातून स्वतःच्या आयुष्यासाठी प्रेरणा घेतील.
जिथे चित्र नकारात्मक आहे किंवा तितकेसे चांगले नाही त्या त्या एरियाज मध्ये आपल्याला अजून सुधारणा करता येईल ही जाणीव ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न. त्याविषयी, आपल्या वाटचालीविषयी नियमित नोंद व स्वमूल्यमापन.
पुरुषांनाही ह्या रिपोर्टमधून आपल्या जोडीदाराविषयी किंवा घरातील स्त्रिया, सहकारी महिलांच्या बाबतीत त्यांचे आयुष्य अजून सुकर कसे होईल, त्यांची सर्वांगी प्रगती कशी होईल यासाठी दिशा मिळेल ही आशा करुयात. तसेच त्या अनुषंगाने केलेल्या बदलांमुळे त्यांचे आयुष्यही अधिक समृध्द होईल हेही नक्की.
Pages