सर्व्हे रिपोर्ट: उपसंहार आणि श्रेयनामावली

Submitted by संयोजक_संयुक्ता on 3 March, 2011 - 06:30

नमस्कार,

equality_yinyang.jpg

सुमारे वर्षभरापूर्वी प्रश्नावलीचे प्रश्न तयार करताना आणि नंतर विश्लेषणावर काम करताना आम्ही आणि आपण सगळ्याच मैत्रिणी उत्सुक आणि उत्साही होतो. स्त्रियांना स्वतःशी संवाद साधता यावा या दृष्टीने ही प्रश्नावली तयार केली गेली होती. आलेली उत्तरे इतकी लख्ख, प्रामाणिक आणि विस्तृत (आणि प्रश्नावलीतील त्रुटींमुळे विस्कळीतही) होती, की विश्लेषक म्हणून आमची जबाबदारी कैकपटीने वाढली.

सर्व्हे रिपोर्टचा एवढा मोठा घाट हेतूपुरःस्सर घातला नव्हता, त्यामुळेच कदाचित अजाणतेपणी बरेच काम होऊ शकले. या कामासाठी लागणारा 'वेळ' ह्या घटकाबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो असेच आता म्हणावे लागेल. त्याबद्दल वाचकांची आणि प्रश्नावली भरणार्‍या मैत्रिणींची पहिल्याप्रथम सपशेल माफी.

महिला दिन सर्व्हे रिपोर्ट

विश्लेषण करताना 'आपल्या वैयक्तिक मतांचा प्रभाव/ अंमल यात जाणवू नये' हे एकच तत्त्व आम्ही कटाक्षाने पाळले. आशा आहे, की हे उद्दिष्ट काही अंशी तरी सफल झाले आहे. एक समाधान आहे की या कामाला आमच्या अल्पमतीनुसार न्याय देता आला. आणि ज्याला खरोखर मेहनतीची/ वेळेची तमा नाही, पण उत्तम काम झाले पाहीजे एवढी एकच अट आहे, अशा विश्लेषकचमूचे सदस्य असल्याने (चमूतील तिघींना) फार छान वाटले. ''का? कशासाठी? वाचणार आहे कोण नाहीतरी ? उरका आता, टाका पाटी..'' अशा प्रकारचे संवाद या चमूत झालेच नाहीत याचे समाधान आहे. विश्लेषणादरम्यान प्रत्येक उत्तर कितीवेळा वाचले गेले याला गणतीच नाही. त्यामुळेच हा रिपोर्ट आम्हाला खूप काही देऊन गेला. आशा आहे की यातले योग्य ते आम्ही आपल्यापर्यंत पोचवू शकलो.

अनुवादकांनीही तोडीस तोड काम केले आहे. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. पहिल्या पाच भागांचा इंग्रजी अनुवाद इथे पाहता येईल.

वाचकांचा, प्रतिक्रिया देणार्‍यांचा आणि न-देणार्‍यांचा फीडबॅक येत गेला. कधी बरा, कधी चांगला, कधी हेटाळणीयुक्त, कधी अनुकरण करणारा. सर्वच प्रतिक्रियांचे स्वागत आहे आणि राहील.

'हे सगळं ठिक आहे, पण निष्कर्ष येऊ द्या' असाही अस्तन्या सावरून फीडबॅक आला. तेवढा मोह मात्र टाळायची विश्लेषकचमूची इच्छा आहे. प्रत्येक भागातील निष्कर्षात मुद्दे आलेले आहेतच. त्याबद्दल आमची वैयक्तिक मतं काय आहेत हे खरेतर तितकेसे महत्त्वाचे नाही. हा रिपोर्ट वाचत असताना आपल्या मनात जे काही प्रश्न येत गेले, विसंगती जाणवत गेल्या तेच महत्त्वाचे आहे. वैचारिक प्रवास हेच आपले उद्दिष्ट आहे.

तरीही पुढील काही मुद्यांत विश्लेषकचमूचे वैयक्तिक मत थोडक्यात मांडले आहे. हे मत पटण्या, न पटण्याचे प्रत्येक वाचकाला अर्थातच स्वातंत्र्य आहे.

  • आमच्या वैयक्तिक अपेक्षेबाहेर एकंदरीत homogenous sample size आढळून आला. तसेच, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादखल आलेले प्रतिसाद बर्‍यापैकी normal curve मध्ये होते. दोन्ही बाजूने टोकाच्या भूमिका तशा कमी आढळून आल्या.
  • काही विसंगतींवर आणि त्या नक्की कशा मांडाव्यात यावर आमच्यात (विश्लेषकचमूमध्ये) बराच उहापोह झाला. (विसंगती जास्त टोकदार शैलीत मांडता आल्या असत्या, पण तोही मोह विश्लेषक म्हणून टाळायचे ठरले. वाचकांच्या हाती तयार सवंग आणि सोयीस्कर निष्कर्ष न काढता, प्रत्येक भागात प्रश्न वाचकांच्या हाती सुपुर्द केले आहेत. एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास नोकरी हा भाग पहा. १६ स्त्रियांने पदोन्नती नाकारण्याचे कारणे, नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांबद्दलची मते इ.इ. या आणि अशा सर्वच भागांमध्ये भाषेबाबत जागरूकता पाळली आहे, आणि तरीही त्या विसंगती मांडल्या आहेत.)

    If we choose, we can live in a world of comforting illusion. - Noam Chomsky

    आमचे वैयक्तिक मत असे आहे की बर्‍याच अंशी अमुक एक ठाम तार्किक/ त्याही पुढे जाऊन तर्ककठोर/ किंवा त्याही पुढे जाऊन तर्ककर्कश भूमिका (आणि तिच्या यशापयशाची जबाबदारी घेणे) स्त्रियांना अजूनही शक्य होत नाही. किंबहुना काही गोष्टींकडे सोयिस्कररित्या कानाडोळा करण्याचा कल जास्त दिसून येतो. उदा- मंगळसूत्र घालणे/ न घालणे, लग्नखर्च मुलीकडच्यांनी करणे/ न करणे, नोकरी करणे/ न करणे, पदोन्नती स्वीकारणे/ न स्वीकारणे, मतदान करणे/ न करणे.
    Politically correct भाषेत याला 'choosing one's battles ' म्हणतात आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे आपल्या भूमिकेला वेळप्रसंग पाहून सोयिस्कररित्या बदलत राहणे/ नमतं घेणे.

  • आपल्या बर्‍यावाईट निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घेणे हे कुठल्याही निर्णयप्रक्रियेत अध्याहृत असते. शिक्षणाने/ नोकरीने/ स्वावलंबनाने/ अनुभवांच्या समृद्धीने हे सुकर व्हावे अशी अपेक्षा असते. ते आढळून येत नाही आणि दुसरीकडे विचारांती अमुक योग्य आहे हे माहित असते पण कृतीच्या पातळीवर उतरता उतरता राहून जाते. आणि कृतीच्या पातळीवर न उतरण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आढळून येत असावे. याचे कारण लहानपणापासून एक स्वावलंबी व्यक्ती म्हणून मुलींना वाढवावे अशी धारणा भारतीय समाजात न दिसून येण्याचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे.
  • हे सर्वेक्षण भारतीय शहरी स्त्रियांबाबत प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. तरीही यातील इतक्या उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या पुरेशा सक्षम कुंटुंबामध्ये झालेले संगोपन आणि आलेली उत्तरे आणि जास्त व्यापक प्रमाणात पहायचे झाल्यास भारतातील इतर गावा-शहरांमधून आलेली उत्तरे यांच्यात काय फरक असेल याचे काही ठोकताळे आपण बांधू शकतो का?
    (आणि तरीही आपल्या सर्वेक्षणापुरती समाजात समानता आहे असे बहुतांशी स्त्रियांना वाटत नाही.)
  • स्वयंपाक आणि घरकाम हे जणूकाही प्रजननसंस्थेचेच कार्य असावे अशीच पूर्वापार चालत आलेली सामाजिक धारणा. त्याबाबत स्त्रियांना स्वतःला काय वाटते हे जाणून घ्यायला
    'कुटुंब' या भागातील नोंदी आम्हाला महत्त्वाच्या वाटतात. आपल्या घरातील लिंगाधारित कामाची विभागणी असल्याचे ३३% स्त्रियांनी नोंदवले आहे.
  • Role (भूमिका) & Identity (स्व) यामधील द्वंद्वात किंवा समतोल साधण्यात (किंवा असमतोल कमी करण्यात) स्त्रीपुरुष दोघेही धडपडतात. तरीही सामाजिक अपेक्षांचे ओझे स्त्रीच्या भूमिकांना वेढून टाकते का?
    'नोकरी' / 'समाज '/ 'लग्नसंस्था'/ 'स्वतःविषयी' या भागांवर काम करताना आम्ही अनेकवेळा या प्रश्नापाशी थबकलो.

    What is sad for women of my generation is that they weren't supposed to work if they had families. What were they going to do when the children are grown - watch the raindrops coming down the window pane?
    - Jackie Kennedy

    स्त्रियांबाबतीत अनेक निर्णय सामाजिक संकेतांनुसार घेण्यात येतात आणि त्या स्वतःही अशा अपेक्षांनुसार हे निर्णय घेतात. 'शरीर ही स्त्रियांची नियती ठरते' ही समजूत अजूनही बर्‍याच अंशी लागू पडावी.
    पहा: 'समाज'
    समाजमान्य अध्याहृत अपेक्षांनुसार घेतलेल्या अनेक निर्णयांची परिणती भारतीय स्त्रियांच्या बाबतीत शारिरिक/ मानसिक आजारात होत असावी काय? 'आरोग्य' , 'अर्थकारण' आणि 'नोकरी' या भागांकडे आम्ही पुन्हा आपले लक्ष वेधू इच्छितो.

    ज्या भावनिक स्थैर्याच्या कारणास्तव आपण (स्त्रिया) अनेक निर्णयांप्रत येतो, ते भावनिक स्थैर्य खरंच त्या निर्णयांमुळे आपल्याला गाठता येते का हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

  • जाताजाता- जशा स्त्रिया भूमिकांच्या ओझ्यांखाली असतात तसेच पुरुषही, हेही विसरून चालणार नाही. संधी दिल्यास किती स्त्रियांना स्वतःहून वयाची ३० वर्षे आर्थिक जबाबदार्‍या पूर्ण करुन, कुटुंबाचे आर्थिक पालनपोषण करुन शिवाय भविष्याची तरतूद करून ठेवायला आवडेल?
  • भारतीय शहरी स्त्रियांमध्ये शिक्षणाच्या समान संधी, घटनेनुसार राजकीय निर्णयप्रक्रीयेत सहभागाचा हक्क आहे, पण तरीही आर्थिक/सामाजिक/कौटुंबिक/व्यावसायिक विषमता असे चित्र (एकंदरित) दिसून येते का? (तसेच स्त्रियांसाठी आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आर्थिक स्वावलंबनाला पर्याय नाही असे आपल्याला वाटते का?)
  • स्त्रीवादातील अलिकडला महत्त्वाचा विचार म्हणजे 'व्यक्तीवाद'. अतिशय सोप्या भाषेत ढोबळमानाने सांगायचे झाले तर 'आपण आधी एक व्यक्ती आहोत, आणि मग एक स्त्री.' महानगरी स्त्रियांमध्ये व्यक्तीवादाकडे कल निश्चितपणे जाणवतो (आणि वाढतो आहे) असे स्त्रियांना स्वतःला वाटते- हे गृहितक आम्ही आपल्यापुढे ठेवू इच्छितो. यामुळे भावनिक गुंता सुकर होतो अथवा नाही हे वाचकांनी ठरवायचे.

व्यावसायिक प्रश्नावलीकर्त्या नसल्यामुळे प्रश्नावलीत राहून गेलेल्या काही ठळक त्रुटी:

  1. ग्रामीण भागांतील स्त्रियांसाठी या प्रश्नावलीची उपयुक्तता अतिशय मर्यादित आहे याची आम्हाला नम्र आणि पुरेपूर जाणीव आहे. तसेच अभारतीय वंशाच्या स्त्रियांसाठीही या प्रश्नावलीची उपयुक्ततता मर्यादित असल्याचे ध्यानात आले आहे.
  2. पसरटपणा. प्रश्नावली व्यापक आहे परंतू बरेच प्रश्न पुन्हा विचारायचे झाल्यास अजून टोकदार करता येतील.
  3. वेळेअभावी प्रश्नावलीच्या इंग्रजी अनुवादात थोडी घाई करावी लागली. शब्दांकनात पुरेसा नेमकेपणा राहून गेला.

पुन्हा एखादे सर्वेक्षण करायचे झाल्यास, या त्रुटी टाळता आल्या आणि प्रश्नावली छोटी, एखाद्याच मुद्द्याला धरुन तयार करता आली तर कदाचित अजून काही निष्कर्षांचे धागेदोरे हाती लागतील.

पुन्हा एकदा करायला गेलो गणपती आणि झालाय मारूती याची आम्हांला नम्र जाणीव आहे. तरीही मराठी संकेतस्थळांच्या मर्यादित विश्वात असे सर्वेक्षण बहुदा पहिल्यांदाच झाले असेल हेही जाता जाता नमूद करावे लागेल. आणखी पुरेशा व्यापक प्रमाणात जर स्त्रियांची उत्तरे मिळाली आणि या सर्वेक्षणावर काम होऊ शकले तर यातील निष्कर्ष किती प्रातिनिधीक आहेत याचा आकडेवारीसकट उहापोह करता येईल.

हे एक वास्तवचित्र आपल्यासाठी. परिशिष्ट .
हे वाचून पुन्हा एकदा जमल्यास सर्व्हे रिपोर्टवर नजर टाका. Need we say more?


stline2.gif

श्रेयनामावली

सर्वेक्षणाची माहिती संवेदनशील असणारच होती, पण त्याचबरोबर तिचे योग्य असे विश्लेषणही करणे आवश्यक होते. प्रश्न कोणते, कशा स्वरूपाचे असावेत, त्यांची मांडणी, त्यांचा रोख, प्रश्नावलीचे स्वरूप, ती तिच्या मर्यादांसकट भरायला सोपी जावी यासाठी घेतलेले कष्ट, हा उपक्रम 'संयुक्ता'च्या जास्तीतजास्त महिलांपर्यंत पोचावा यासाठी केलेली धडपड आणि सर्वात महत्त्वाचे असे उत्तरांचे विश्लेषण- ही आणि याबरोबरच कितीतरी कामे, जी पडद्यामागे चालू असतातच. ह्या निमित्ताने आमच्या चमूचा परिचय करून देतो.

  • पहिल्याप्रथम प्रश्नावली भरून पाठवणार्‍या आणि भरून पाठवण्यासाठी उद्युक्त करणार्‍या देशविदेशातील मैत्रिणींचे मनःपूर्वक धन्यवाद. त्याशिवाय हा उपक्रम होऊच शकला नसता.
  • मूळ मराठी प्रश्नावली- अनुदोन, रैना
  • प्रश्नावलीचा इंग्रजी अनुवाद- मिनी
  • विश्लेषण आणि सर्व्हे रिपोर्ट- अल्पना, अनुदोन, रैना
  • शिक्षण या भागातील विश्लेषण- अनिता
  • सर्व्हे रिपोर्टचे मुद्रितशोधन- पौर्णिमा
  • चित्र (संयुक्ता लोगो)- बस्के
  • इंग्रजी अनुवाद- पहिल्या पाच भागांचा अनुवाद (मृण्मयी, सखीप्रिया आणि वर्षा पेंडसे).
  • सूचना/ विश्लेषकांना मदत/ फीडबॅक- रुनीपॉटर, मृदुला, लालू
  • परिशिष्ट अरुंधती कुलकर्णी
  • मायबोली अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि संयुक्ता प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. अ‍ॅडमिन 'मायबोली'चे व्यासपीठ अशा उपक्रमांसाठी नुसते उपलब्धच करून देत नाहीत, तर वेळी-अवेळी अनेक अकल्पित प्रश्न उभे होत असतात, त्यांच्या निवारणासाठीही सतत तयार असतात, आणि योग्य ते उपायही सांगतात.

आणि अर्थातच वाचकहो, हे श्रेय आपलेही !

सुफळ आणि संपूर्ण नसली तरीही ही कहाणी आपल्याला काय देऊन गेली ते नक्की कळवा !

मोठ्या प्रमाणात आलेल्या माहितीचं विश्लेषण करून त्यावरून निष्कर्ष काढायचं काम हे खूपच मोठ आणि क्लिष्ट असणार ह्याची जाणीव रिपोर्ट वाचून होते आहे. गेल्यावर्षी आलेले रिपोर्ट वाचले होते, नविन पैकी काही वाचले. ह्यातून आलेले काही निष्कर्ष विचार करण्यासारखे आहेत.
हा सगळा उपक्रम खूपच व्यवसायिक पध्दतीने हाताळल्याबद्दल टीमचे अभिनंदन.. !

डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण करून झालं आहे. आता ह्या निष्कर्षांना अनुसरून संयुक्ता टीम काही अ‍ॅक्शन घेणार का, मायबोलीवर / मायबोलीबाहेर काही उपक्रम राबवणार का / सहभागी होणार का ? (थोडक्यात माहिती आणि निष्कर्ष मिळाले..आता पुढे काय? ) हे जाणून घ्यायला आवडेल.

आज सगळे रिपोर्टस् पुन्हा वाचले. ह्या कामाचा अवाका खरच खूप मोठा होता. एवढं मोठं काम जबाबदारीने पार पाडल्याबद्दल सगळ्या चमुचे अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना अनेकानेक धन्यवाद Happy

मी मुक्ता..12 March, 2011
सर्वात आधी म्हणजे मला आवर्जुन यात सहभागी करुन घेतल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमचं अभिनंदन.. Seriously, hats off..! सर्वेक्षण बघताना त्यातील प्रश्नांचा विचार करता, या सर्व बाबींचा खूप खोल, गांभीर्याने विचार केल्याचं, तितकंच Seriously, कष्ट घेवुन काम केल्याचं जाणवतय अगदी. खूप अभिनंदन..
ह्म्म... रीपोर्ट विषयी खूप काही लिहिण्यासारखं आहे. आणि प्रत्येकच मुद्दा महत्वाचा आहे. तरिही प्रामुख्याने मला जाणवलं की स्त्रिया फारशा आग्रही नाहीत. त्या विचार करतायेत, मतं मांडतायेत पण ती मतं तडीला नेण्याइतका आग्रह धरणार्‍या कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या. मला असं वाटतं की यातला एक खूप मोठा प्रश्नसंच पुरुषांना पण लागु पडतो. असा सर्वे घेवुन पाहिल्यास कदाचित आपल्याला एकाच वर्गात (मध्यमवर्ग- कारण या सर्वे मध्ये अशाच स्त्रिया आहेत) जगणार्‍या घटकांची मानसिकता कळेल. यांची तुलना करताना प्रत्येकीला नविन माहिती मिळेल नक्कीच..
पण लई भारी काम केलय तुमच्या टीम ने.. अभिनंदन आणि आभार..

नरेंद्र गोळे14 March, 2011 - 05:53

मला संयुक्ता हा स्त्रियांनी, स्त्रियांकरता चालवलेला, स्त्रियांचा प्रकल्प आहे असेच वाटत आलेले आहे. त्यामुळे तिथे मी प्रतिसाद द्यावा किंवा काय ह्याबद्दल निश्चित धारणा नाही.

तरीही, मी सर्व प्रकल्प वरवर चाळला. ढोबळ अभिप्राय खालीलप्रमाणे आहे.

व्यक्ती अंतर-तपासास सिद्ध होणे हे मानसिक स्वास्थ्य आणि स्थैर्याचे प्रतीक असते. या निकषावर सर्वच सहभागी स्त्रिया भाग्यवान आहेत. निरनिराळ्या कारणांखातर पुरूष एवढ्या बहुसंख्येने अशा अंतरतपासास सिद्ध होतील असे वाटत नाही.

सर्वेक्षणाच्या विश्लेषणाचा भाग "too much processing on feeble data" स्वरूपाचा असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यावरून भारतीय स्त्रियांच्या बदलत्या स्थितीबाबत निष्कर्ष काढणे धाडसाचे आहे. त्या धैर्याचे कौतुक वाटते. सहभागी सर्वच स्त्रिया, प्रत्यक्षात भारतीय समाजाचे नवनित (cream of the society) आहेत. त्यांच्यात उडदामाजी काळेगोरे करण्याने, शितावरून भाताची परीक्षा होऊ शकत नाही.

देवाचे अस्तित्व, आर्थिक मोकळिक, अपत्य-पालनामुळे व्यावसायिक आयुष्यात पडणारे व्यवधान इत्यादी बाबींवरील निरीक्षणे सुरस असून त्यावर अधिक मंथनास वाव आहे. जे नवनित निर्माण झालेले आहे तेही लक्षणीय आहे.

स्त्री-पुरूष स्वातंत्र्य, परस्पर सहकार्य आणि अपत्यपालनातील सहभाग, उर्वरित (सर्वेक्षणाबाहेरील) भारतीय स्त्रियांप्रतीच्या जबाबदारीची संभावना ह्यांबद्दल नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे!

"परतोनी पाहे" बाबतही सर्वेक्षणाची आवश्यकता होती असे वाटले. विशेषत: बदलत्या संदर्भांत.

ही माझी काही प्राथमिक मते आहेत. विस्ताराने वाचल्यावर कदाचित बदलूही शकतील.

मायबोली अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि संयुक्ता प्रशासनाचे अनेक आभार Happy तसेच अनुदोन, रैना, मिनी, अल्पना, अनिता, पौर्णिमा, बस्के, मृण्मयी, सखीप्रिया, वर्षा, रुनी, मृदुला, लालू, अरुंधती ह्या सर्वांचे मनापासून आभार. संयुक्ताचा लोगो भारी आहे. थॅन्क्स Happy

पहिल्या पाच भागांचा इंग्रजी अनुवाद वाचावयाची तीव्र इच्छा आहे. पण हे पान पहायची परवानगी नाही असा मेसेज येतोय. महिला दिन - सर्व्हे ह्या ग्रूपचा सभासद असून सुद्धा हा मेसेज का येतो?
(मुख्य म्हणजे - महिला दिन - सर्व्हे ह्या ग्रूपवर गेल्यावर रिपोर्ट मात्र दिसताहेत. Happy )

मी मुक्ता म्हणत्ये तसा सर्व्हेचा पार्ट २ येणार आहे का?

आता परत एकदा वाचून घेतो सगळं...

डुआय प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !

इंग्रजी सर्व्हे चे मुख्य पान सार्वजनिक करायचे राहिले होते. ते आता केले आहे. चूक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल
आभारी आहोत.

> मी मुक्ता म्हणत्ये तसा सर्व्हेचा पार्ट २ येणार आहे का?

अजुनतरी झालेला काहीही विचार झालेला नाही. आणि जर ठरले तर आपल्याला नक्कीच कळेल. Happy

रैना, अनुदोन, मला प्रश्नावली खूपच आवडली. ही प्रश्नावली भरुन पाठवायला नक्कीच आवडले असते, त्यनिमित्ताने स्वतःविषयी बराच विचार केला असता, जो एरवी केला जात नाही. आता वेळ काढून या प्रश्नांची स्वतःसाठी उत्तरे द्यायचे ठरविले आहे, पाहू कसे जमते. :).
सध्या वेळेअभावी सर्व सेक्शन्स संपूर्ण वाचले नाहीत. मात्र वेळ होईल तसे वाचायचे ठरवले आहे.
या सर्व्हे वर काम केलेल्या सर्वच चमूचे अभिनंदन. एक चांगला उपक्रम. :).
यातून साधारण अनेकांपैकी एका तरी आर्थिक्-सामाजिक पातळीवरच्या स्त्री-समूहा विषयी नक्कीच विश्लेषण झाले आहे.
हे सर्व काम इतके दिवस चिकाटीने केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच कौतुक वाटले.
काम सुरु करताना एकूण कार्यक्रमाची रुपरेखा निश्चित होती का ? मूळ कल्पना आणि त्याचा विस्तार हे कुठले उद्दीष्ट /स्त्रियांचा गट डोळ्यासमोर ठेवून केले होते ?
परत एकदा या कामाशी निगडीत सर्वांचेच आभार. Happy