कमो
तिवरांच्या जंगलात जास्त करुन दिसणारे एक झाड म्हणजे कमो.
मुळांचे गुंतागुंतीचे जाळे आणि वर पानाचा तितकाच गच्च पसारा. झाड वर्षभर हिरवेगार असते.
खोडावर उभ्या चिरा दिसतात. पाने साधीच, जाडसर पण अगदी टोकदार. या टोकाला म्युक्रो असा लॅटिन भाषेत शब्द आहे आणि हि खासियत सांगणारे शास्त्रीय नाव Rhizophora mucronata
या झाडाला जवळुन बघायची संधी मिळाल्यास सर्वात आधी नजरेत भरतात ती अशी शेंगेसारखी दिसणारी लांबट फ़ळे. वरच्या फ़ोटोत दिसतेय तसे साध्या सालीचे फ़ळ असते किंवा आणखी एका जातीत त्यावर धारा दिसतात. या फ़ळाच्या वर एक गोलक दिसतो.
या गोलकात झाडाचे पिल्लु असते. शेंगेत त्या पिल्लाची शिदोरी. फ़ळ पुरेसे मोठे झाले कि या शेंगेला खालुन मूळे फुटतात आणि हि शेंग गळुन उभी पाण्यात पडते, आणि तिथेच रुजते. जर ती वाहत्या पाण्यात पडली ( भरती ज्यावेळी महत्तम पातळी गाठते त्यावेळी दहा पंधरा मिनिटे पाणी अगदी स्थिर असते. ) तर थोडी वहात जाते आणि पाण्याची पातळी जिथे उथळ होते तिथे रुजते. हि शेंग पान्यात उभी राहिली कि वरच्या गोलकातुन पाने डोकावु लागतात. हि शेंग ३० ते ६० सेमी लांबीची असते.
हि शेंग गोड लागते आणि खाण्यायोग्य असते अशी माझी माहिती आहे, पण ती चव बघायची संधी मात्र मला मिळाली नाही.
या झाडाला तशी बर्यापैकी मोठी फ़ुले लागतात. पुष्पकोष हिरवट रंगाचा असतो ( तो वरच्या शेंगेवरहि दिसतोय ) फ़ुले मात्र फ़िक्या रंगाची असली तरी खालच्या दिशेने झुकलेली असल्याने नीट दिसत नाहीत. आणि फुले बहुदा पावसाळ्यातच दिसतात.
भारताच्या दोन्ही किनार्यावर हा वृक्ष विपुल आहे. अंदमान निकोबार बेटांवरहि आहे. या झाडाची साल टॅनिंग साठी वापरतात आणि लाकुड जळण म्हणुन उपयोगी पडते.
थेट खार्या पाण्यात राहुन या झाडाला गोड फळ कसे लागते, त्याची मात्र मला खुप उत्सुकता लागलेली आहे.
कमाल आहे..
कमाल आहे निसर्गाची. आणि तुमचीही. कुठून एवढी माहीती आणि फोटो गोळा करता??
इथे फुलाचा फोटो आहे. अतिशय सुंदर..
http://homepages.vub.ac.be/~dagillik/mangrove/r_mucronata.htm
साधना
खरच कमाल आहे..
दिनेश माझी प्रतिक्रिया अगदी वरील वाचका प्रमाणेच आहे...
आभार
आभार साधना आणि बी.
हल्लि गळ्यात कॅमेरा असतोच. काहिहि नविन दिसले कि फोटो काढतो. मग चौकशी करून लिहितो.
साधना त्या फोटोबद्दल आभार. जिथे हि झाडे असतात ना तिथे दलदल असते. त्यात पाय ठेवणे कठिण. होडीतून फिरायची संधी मिळाली तरच या झाडांच्या जवळ जाता येते. त्यांची खोडे पण वक्राकार असल्याने त्यावर पाय ठेवता येत नाही. म्हणून मला फुलाचा फोटो काढायला जमलाच नाही. पण आता मात्र फुलाचा फोटो मिळवायचा प्रयत्न करणार हे नक्की. ( जवळ जाणे शक्य असते तर नक्कीच ती शेंग खाल्ली असती. )
बी अरे निसर्ग खराच किमयागार रे. अश्या जागी हि झाडे रुजणे हे सत्यच कल्पनेच्या पलिकडचे आहे. तरी आपल्याकडे जी झाडे दिसतात ती झुडुप प्रकारचीच. नायजेरियात मी प्रचंड वाढलेली झाडे बघितली. इतकी मोठी कि खाडीवर हिरवा बोगदा तयार झालेला असतो. किनार्यापासून दहा फुटाच्या पलिकडचे दिसत नाही, इतकी दाटी असते. मोठ्या बार्जेस सहज जातात या बोगद्यातून.